सेवाग्राम, वर्धा येथे १४ ते १६ नोव्हेंबर २०२५ दरम्यान ब्राइट्स सोसायटीने नास्तिक परिषद आयोजित केली होती. ह्या तीन दिवसीय निवासी परिषदेत देशभरातून सुमारे ३०० जण सहभागी झाले होते. परिषदेत सहभागी झालेल्यांपैकी काहींच्या प्रतिक्रिया प्रकाशित करीत आहोत
ब्राइट सोसायटीविषयी
समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी, समाज व बुद्धिप्रामाण्यवादी नास्तिक ह्यांच्यात सुसंवाद निर्माण करण्यासाठी, तसेच कला, विज्ञान–तंत्रज्ञान, उद्योग, समाजसेवा, राजकारण, आदि विविध क्षेत्रांतील नास्तिकांचे योगदान गौरविण्यासाठी ब्राइट्स सोसायटी २०१४ पासून प्रयत्नरत आहे. ब्राइट्स सोसायटीने नास्तिक्य विषयावर चित्रस्पर्धा व चित्रप्रदर्शनी भरवली, तसेच बुद्धिप्रामाण्य, तर्कशीलता ह्या विषयांवरील तीन पुस्तकेही प्रकाशित केलेली आहेत.
‘जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन निसर्गाधिष्ठित असणारी, पारलौकिक संकल्पना न वापरता जगणारी व्यक्ती‘ ह्या अर्थाने ब्राइट हा एक नवा रुजू घातलेला शब्द आहे. ब्राइट ह्या संकल्पनेत केवळ देव किंवा ईश्वर ह्यांचा भौतिक प्रभाव नाकारलेला आहे असे नव्हे तर त्यासोबतच धर्म, स्वर्ग–नरक,आत्मा, पाप–पुण्य–कर्म, पुनर्जन्म, भुते, इ. सर्वच पारलौकिक संकल्पनांचा भौतिक प्रभावसुद्धा नाकारलेला आहे. ही व्याख्या दोन प्रकारे सर्वसमावेशक आहे. ‘देव नाही‘ अशी खात्री बाळगणे आवश्यक नसल्यामुळे अज्ञेयवादी, स्केप्टिक, इ. व्यक्तीही स्वतःची ओळख ब्राइट म्हणून सांगू शकतात. कारण, ‘भौतिक विश्वात देव/ईश्वर हस्तक्षेप करतात असे न मानणे‘ ह्या मुद्द्यावर त्या व्यक्ती नास्तिकांशी सहमत असतात. नास्तिक ह्या शब्दाविषयी समाजात असलेला पूर्वग्रह ब्राइट ह्या शब्दामुळे टाळता येईल अशी ब्राइट्स सोसायटीची आशा आहे.
पारंपरिक संकल्पनांवरही प्रश्न उभे करण्याचे धाडस हवे
देव खरंच आहे का? ही शंका बहुतेकांच्या मनात कधी ना कधी येतेच. किंवा हा प्रश्न कुणाकडून तरी आपल्याला कधी ना कधी विचारला गेलेला असतो. पण ह्यावर मोकळेपणाने बोलले जात नाही. कारण ‘देव नाही’ असे म्हटले तर आपण इतरांपेक्षा वेगळे ठरवले जाऊ, एकटे पडू, अशी भीती मनात असते. ह्या विषयावर निकोप चर्चा घडविणारे वातावरण, अधिक स्पष्टतेने विचार करणारी माणसे आजूबाजूला सहजतेने दिसत नाहीत.देवाविषयी शंका घेणे म्हणजे ‘पापाचे धनी होणे’ अशी भीतीदेखील संस्कारातून व सभोवतालच्या श्रद्धाळू वातावरणातून मनामध्ये बिंबवली गेलेली असते. त्यामुळे आपल्यातील अनेक जण श्रद्धेच्या प्रदीर्घ अश्या संमोहनाखाली असतात. संमोहन अवस्थेत असताना प्रचंड उकाड्यातसुद्धा आपल्या अंगात थंडीने कापरे भरू शकते. भानावर आल्यावर मात्र वास्तवाची नीट जाणीव आपल्याला होते. सेवाग्राम येथे झालेली नास्तिक परिषद ही अशीच भानावर आणणारी प्रक्रिया वाटली.
देव आहे म्हटल्यावर कल्पनाविलास सुरू होतो, तर तो खरंच असेल का, अशी शंका घेण्याचे धाडस केले की वास्तववादी विचारांची साखळी सुरू होते. नास्तिक परिषदेमध्ये तसे धाडस करण्याचे स्वातंत्र्य जाणवत होते. नास्तिक्य लादले जात नव्हते, मनात निर्माण होत जाणाऱ्या प्रश्न–उपप्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी वक्त्यांच्या भाषणातून, चर्चेतून आणि प्रत्यक्ष संवादातून मदत होत होती. ‘देवाचे अस्तित्व नाहीच’ या ठाम निष्कर्षावर सगळे पोहोचले नसतीलही कदाचित, पण ‘खरंच देव आहे का?’ ही बहुतेकांची शंका मात्र अधिक गडद झाली. विचारांची एक सशक्त प्रक्रिया सुरू झाली हे ठामपणे सांगता येईल.
कोणत्याही कार्यक्रमाच्या आयोजनात काही संकेत असतात. त्यामुळे नास्तिक परिषदेचे उद्घाटन दीपप्रज्ज्वलन करून होईल की आणखी कशाने — ह्याविषयी उत्सुकता होती. परंतु देशभरात लोकप्रिय असणाऱ्या जावेद अख्तरांसारख्या ‘सेलिब्रिटी’च्या स्वागतासाठी पुष्पगुच्छ देण्याची औपचारिकतादेखील येथे पाळली गेली नाही. पण त्यामुळे कार्यक्रमाची उंची, गांभीर्य, परिणामकारकता कमी झाली असेही अजिबात जाणवले नाही.एक निरीक्षण असेही : कार्यक्रमांमधील दीपप्रज्ज्वलन हे सर्वांचा एकत्रित फोटो प्रसारमाध्यमांना देता यावा ह्यासाठीची सोय तेवढी असते. बहुसंख्य श्रोते तर आपसात बोलत असतात. रसिकांना ह्या औपचारिकतेमध्ये थोडाही रस नसतो. ह्या पार्श्वभूमीवर नास्तिक परिषदेमधील अनौपचारिकता अधिक भावली.
पुण्याहून विश्वंभर चौधरी, सेवाग्रामचे सुषमा शर्मा, अतुल शर्मा, अशोक बंग, निरंजना बंग, हरीश इथापे, किशोर जगताप, किशोर वानखेडे, नूतन माळवी, संजय इंगळे, नागपूरहून सुरेश अग्रवाल, सुनील पाटील, लातूरचे अतुल देऊळगांवकर, जळगावचे मनोज आणि देवयानी गोविंदवार, आणि अमरावतीहून अतुल गायगोले हे मान्यवरदेखील तीनही दिवस परिषदेत उपस्थित होते. सर्व उपस्थितांच्या निवासाची सोय यात्री निवास आणि नयी तालीम ह्या संस्थांमध्येच करण्यात आली होती.
नास्तिक परिषदेच्या निमित्ताने आणखी एक बाब अधोरेखित झाली. ती ही की, देवाच्या अस्तित्वावर प्रश्न उभा झाला की श्रद्धाळूंच्या भावना हमखास दुखावतात; पण नास्तिकतेवर जर कोणी शंका घेतली किंवा त्याची खिल्ली उडवली तर मात्र भावना दुखावल्या न जाता उलट अधिक सखोल,बहुबाजूंनी विचार करण्यास चालना मिळते, आणखी स्पष्टता येण्यास मदत होते. संयमाने, हसत–खेळत, दुराग्रही न राहता, निर्भयपणे खुली चर्चा कशी करावी? कुणाच्याही आत्मसन्मानाला धक्का न देता पण न पटणारे मुद्दे कोणताही संकोच न बाळगता खोडण्याचे किंवा कुणाच्याही कोणत्याही मुद्द्यावर शंका घेण्याचे स्वातंत्र्य वय–पद–प्रतिष्ठा यापलीकडे जाऊन कसे घ्यावे? — ह्याचा वस्तुपाठ म्हणजे ही नास्तिक परिषद.
मोठ्या प्रमाणावर असलेला युवकांचा उत्स्फूर्त सहभाग, हे ह्या परिषदेचे ठळक वैशिष्ट्य होते. सेवाग्रामला वारंवार येणार्या वक्त्यांनी आवर्जून नमूद केले की ह्या कार्यक्रमातील तरूण पिढीचा सहभाग त्यांना आशादायक आणि आश्वासक वाटला. वक्त्यांमध्ये जावेद अख्तर, गौहर रझा, नरेंद्र नायक, कुमार केतकर, शारदा साठे, सुरेश द्वादशीवार, शमसुद्दिन तांबोळी, विनोद शिरसाठ ह्यांसारख्या मान्यवर ज्येष्ठ वक्त्यांसोबतच आलोक राजवाडे,सुनील सुकथनकर, आशिष महाबळ, असीम सरोदे, बंडू धोत्रे, मयूर कुलकर्णी असे तरुणांचे प्रतिनिधीही होते. शिवाय सेवाग्रामचे विजय तांबे, रवीन्द्र रुक्मिणी पंढरीनाथ, अशोक बंग हेदेखील वक्ते म्हणून उपस्थित होते.
परिषदेदरम्यान झालेल्या अनौपचारिक चर्चेमध्ये युवकांकडून कळले की अनेकजण त्यांच्या पालकांना ‘मी नास्तिक परिषदे’ला जातेय/जातोय’ असे सांगू शकले नव्हते. १८ वर्षे पूर्ण झाल्यावर मतदानाचे स्वातंत्र्य आहे, पण वयाच्या पंचविशीतही मोकळे मत मांडण्याचे किंवा स्वतःसाठी हा साधा निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य नाही, हे प्रकर्षाने जाणवले. आपली नास्तिकता उघड केली किंवा झाली तर अनेकजण आपल्यापासून तुटतील असेही अनेकांना भय होते.
नास्तिक परिषदेमुळे ही ओळख स्वीकारण्याचे बळ मिळाले. ‘देवावर विश्वास नाही म्हणजे काहीतरी भयंकर आहे, अनैतिक आहे, समाजविरोधी आहे’, हे ओझे कमी होण्यास मदत झाली. नास्तिक असणे अजूनही आपल्या समाजात प्रतिष्ठेचे नाही. तुम्ही आस्तिक का आहात ह्याचे कोणतेही स्पष्टीकरण द्यावे लागत नाही. उलट जितका जास्त धार्मिक किंवा श्रद्धाळू तितके त्याचे कौतुक जास्त, मान जास्त. या पार्श्वभूमीवर तुम्ही नास्तिक असणे खूपच धाडसाचे ठरते. कारण तुम्ही आस्तिक का नाही ह्याचे खुलासे पावलोपावली करावे लागतात.
परिषदेहून घरी परतल्यानंतर कुटुंबात सुरू असणारी कर्मकांड आणि सार्वजनिक कार्यक्रमांमधील आस्तिक्याचा अतिरेकी अंतर्भाव ह्याकडे अलिप्त होऊन बघता येऊ लागत असल्याचा सूर ओघाने होणाऱ्या चर्चांमधून जाणवला. एका छोट्याशा गावात राहणाऱ्या तरुण सामाजिक कार्यकर्त्याला प्रतिमापूजनासाठी आरतीचे ताट देण्यात आले तेव्हा, ह्या कृतीमुळे नक्की काय घडेल, असा प्रश्न त्याला पडला. हाती दिले जाणारे ताट त्याक्षणी नाकारण्याचे त्याला जमले नाही. संख्यात्मक भावनांचे दडपण अधिक प्रभावी ठरत असण्याचा तो क्षण होता. जे विधायक कार्य करायचे आहे त्यासाठी मर्यादित आयुष्य आपल्याला लाभलेले असते. अशावेळी नास्तिकता ही ओळख बनत असेल तर लोकसमूह आपल्यापासून तुटण्याची शक्यता निर्माण होते. मोठ्या प्रयत्नांनी लोकसहभाग निर्माण केला तोच गमावण्याची शक्यता निर्माण होते. त्यामुळे स्वतःची नास्तिकता ही वैयक्तिक ठेवून त्याला सार्वजनिक स्वरूप न देता मुख्य कार्याला किंवा उद्दिष्टाला प्राधान्य द्यावे का, ह्या द्विधेत अनेकजण अडकतात. पण नास्तिकता ही वैयक्तिक असावी आणि आस्तिकता मात्र सार्वजनिक — हे समीकरण अन्यायजनक असल्याचे मत मांडले गेले.
परिषदेच्या परिणामकारकतेवर साक्षी गांजरे ह्या तरुणीने लिहिलेले खालील पत्रदेखील पुरेसे बोलके ठरावे.
ही तीन दिवसांची परिषद ह्याअगोदर सहभागी झालेल्या इतर कुठल्याही कार्यक्रमापेक्षा किंवा परिषदेपेक्षा खूपच आगळी–वेगळी होती. ह्यातील सत्रांची रूपरेषा इतकी अनौपचारिक होती की भाषण ऐकण्याची मनातली भिती, कंटाळा ह्या परिषदेने काढून टाकला. अगदी सहजगत्या झालेल्या सत्रांनी तेवढ्याच सहजतेने खूप सारे विचार, प्रश्न मनात उभे केले. तिथे मला सर्वात जास्त आवडलेली एक गोष्ट म्हणजे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच समान वाटावेत, असे वातावरण तिथे बनले होते. कुणीही कोणाशीही सहजतेने बोलू शकत होते. समोरची व्यक्ती विचाराने, नावाने किंवा कामाने मोठी असली तरी ती सगळ्यांसाठी सहज उपलब्ध होती. ह्या परिषदेत मी जास्तीत जास्त लोकांशी बोलू शकले, निरीक्षण करू शकले ह्याचे कारण ह्या परिषदेचे नियोजनच ह्यासाठी अनुकूल होते.
ज्येष्ठांचे अनुभव आणि तरुणांच्या अपेक्षा ह्यांच्यात समन्वय होऊ शकण्याचा अवकाश मिळाला तर अश्या प्रकारच्या कार्यक्रमांची उद्दिष्टे साधता येऊ शकतात ह्याचा अनुभव ह्या परिषदेने दिला.
देव (किंवा अल्लाह, गॉड इ.) आणि धर्म जिथे जिथे असतात तिथे तिथे ‘आपण आणि ते’ असे मनभेद माणसामाणसात निर्माण झालेले आणि हल्ली पराकोटीने वाढलेले दिसतात. नास्तिकता मतभेदाचे स्वातंत्र्य जोपासते पण मतभेदाला स्थान देत नाही. कोणीतरी देव मानतो किंवा त्याचे आस्तिक्य सार्वजनिक करतो म्हणून एखादा नास्तिक कुणाच्या जीवावर उठला आहे असे उदाहरण दाखविता येईल किंवा नाही; पण चार्वाकापासून पानसरे, दाभोलकर यांच्यापर्यंत आस्तिकतेने नास्तिकतेचा निर्घृण खून केलेला आहे. ह्या अनुषंगाने गॅलेलिओच्या संदर्भात जावेद अख्तरांचे म्हणणे मनात राहून गेले. ते म्हणाले होते, “वे लोग, जो गैलीलियो को मौत की सजा दे रहे थे, वे पागल नहीं थे, वे जाहिल थे. जाहिल और पागल होने में फर्क है. जो उनका ज्ञान था, वही उनका विश्वास था, वही उनकी आस्था थी. उनके ज्ञान और उनकी आस्था में कोई अंतर नहीं था. ये पहली दफा हुआ है, २०वीं और २१वीं सदी में कि आपका अपना माना हुआ ज्ञान और आपकी आस्था एक–दूसरे के खिलाफ जा रहे हैं.”
परिषदेच्या पहिल्याच ‘मिराकी थिएटर’ने सादर केलेल्या चार्वाकवरील नाटकाने सर्वांनाच चकित केले. अहंकाराने थरथरणारे आस्तिक्य आणि विवेकी नास्तिक्य यामधील अत्यंत परिणामकारक संघर्ष अपुऱ्या व्यवस्था असूनही प्रभावीपणे दाखवला. चार्वाकमधील ‘अँग्री यंग मॅन’ अनुभवताना बॉलिवूडमधील पटकथालेखक जावेद अख्तर इतके प्रभावित झाले की त्यांनी या नाटकाचे प्रयोग मुंबईमध्ये आयोजित करण्याचा विचार बोलून दाखविला. ती खरोखर एक अद्भुत कलाकृती होती.
माणूस अनुकरणातून शिकतो, त्याच्या सुप्त मनाची जडणघडण होते. त्यामुळेच तर भारतातील एखाद्या न्यायाधीशाच्या स्वप्नात येऊन निर्णय सांगणारा देव एखाद्या अभारतीय व्यक्तीच्या स्वप्नात येऊन त्याच्याशी मात्र बोलू शकत नाही. माणसाच्या जन्मापासून मरणापर्यंत त्याच्या पावलोपावली देवाचे अमाप अस्तित्व पेरून उदंड पीक घेतले जात आहे. अशा वातावरणात ‘देव न मानणे’ म्हणजे ‘माणसात नसणे’ असाच न्यूनगंड तयार होतो. कधी वाटलेही मनाला की ‘खरंच देव आहे का?’ तर स्वतःवरच शंका निर्माण होण्याची रचना भवताली सर्वत्र आहे. अशावेळी नास्तिकतेपर्यंतचा प्रवास अधिकाधिक सुखरूप व सुलभ होण्यासाठी कला, संगीत, नाटक, कथा, साहित्य, चित्रपट आदींच्या स्वरूपात मुबलक थांबे निर्माण करत राहावे लागणार आहेत. नास्तिक परिषद ही त्यासाठीचे आश्वासक आगार आहे, असे वाटते.
मनोज गोविंदवार, जळगाव
विवेकवादी विचारांचा प्रवास हाच सहजप्रवास
नास्तिक्य एक प्रवासच असतो. आपण त्या दिशेने जाणीवपूर्वक मार्गक्रमण करू शकतो अथवा अगणित कारणांमुळे अडकून पडतो. ही कारणे,वैयक्तिक मानसिक परिस्थितीपासून तर सभोवतालचे वातावरण कसे आहे, यावर अवलंबून असतात. कुठल्याही इतर सरधोपट शिकण्याच्या प्रक्रियेसारखे या प्रक्रियेकडे बघता येत नाही. अगदी बाल्यावस्थेपासून देव आणि त्याची भीती ह्याचे तथाकथित संस्कार विचारांवर, किंबहुना विचार करण्याच्या क्षमतेवर राज्य करीत असतात. पण सहप्रवासी भेटले तर कठीण प्रवासदेखील विनासायास निभावून नेता येतो. ह्या परिषदेत नेमके हे घडले.नास्तिकतेचे पहिले पाऊल कॉमन सेन्स. पण आपण नेमका तोच गमावलेला असतो, मानसिक गुलामगिरीत. त्यामुळे आपले सगे–सोयरे भेटले की ह्या गुलामगिरीला आव्हान द्यायचे बळ येते.
‘जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन निसर्गाधिष्ठित असणारी, पारलौकिक संकल्पना न वापरता जगणारी व्यक्ती‘ ह्या अर्थाने ब्राइट हा एक नवा रुजू घातलेला शब्द आहे. ब्राइट ह्या संकल्पनेत केवळ देव किंवा ईश्वर ह्यांचा भौतिक प्रभाव नाकारलेला आहे असे नव्हे तर त्यासोबतच धर्म, स्वर्ग–नरक,आत्मा, पाप–पुण्य–कर्म, पुनर्जन्म, भुते, इ. सर्वच पारलौकिक संकल्पनांचा भौतिक प्रभावसुद्धा नाकारलेला आहे.
ही व्याख्या दोन प्रकारे सर्वसमावेशक आहे. ‘देव नाही‘ अशी खात्री बाळगणे आवश्यक नसल्यामुळे अज्ञेयवादी, स्केप्टिक, इ. व्यक्तीही स्वतःची ओळख ब्राइट म्हणून सांगू शकतात. कारण, ‘भौतिक विश्वात देव/ईश्वर हस्तक्षेप करतात असे न मानणे‘ ह्या मुद्द्यावर त्या व्यक्ती नास्तिकांशी सहमत असतात. नास्तिक ह्या शब्दाविषयी समाजात असलेला पूर्वग्रह ब्राइट ह्या शब्दामुळे टाळता येईल अशी ब्राइट्स सोसायटीची आशा आहे.
नास्तिक्य हा विषय व्यापक आणि क्लिष्ट वाटतो, पण साधा–सरळ शुद्ध विचार केला तर प्रश्न पडावा की नास्तिक्याबद्दल इतका ऊहापोह करायची खरंच गरज आहे का? आपल्या दृष्टीला आणि आकलनाला योग्य मान द्यावा आणि त्यानेच प्रामाणिक व्यवहार घडावा – हा सहजसरळ मार्ग असायला नको का? आपण जन्माला येतो तेव्हा आपल्यासोबत आपले जगसुद्धा जन्माला येते – इतिहास, राजकारण, भयगंड आणि बरेच काही घेऊन. त्यामुळे इतका सहज वाटणारा विचारही आपल्या मनात सहज स्थान मिळवू शकत नाही. तेल लावलेल्या पैलवानासारखा जाणिवेच्या हातातून तो निसटत राहतो. आणि म्हणूनच एक गरज ऐरणीवर येत राहते – सजग असण्याची. हे सजग असणे एकट्याच्या प्रयत्नांने शक्य नसते. तसेच, वयाने मोठे होत असताना आपली विचारप्रक्रिया एकमार्गी, अधिकाधिक आग्रही होत जाते आणि आपण आत्ममग्न होऊ लागतो. अशा टप्प्यावर अश्या विशेष परिषदांचा अतीव उपयोग होतो.
परिषद आमंत्रितांसाठीच आहे, ह्या पूर्वअटीमुळे परिषदेत सहभागी झालेल्यांमध्ये रोखठोक नास्तिक, आणि नास्तिकता ह्या भूमिकेविषयी औत्सुक्य असलेले असे दोन गट ठळकपणे दिसत होते. एका गटाने हे ठरवलेले आहे की नास्तिक्याची भूमिका जाहीर करावी, तर दुसरा गट ही भूमिका जाहीर करण्याबद्दल चाचपणी करीत होता. दुसऱ्या प्रकारात तरुण जास्त असणे स्वाभाविक आहे. गम्मत अशी की खरेतर कुणालाच देव नाहीच ह्याविषयी संशय नसतो. पण मग आपण नेमका धुंडाळा कशाचा आणि का घेत असतो? तरीही एक प्रश्न राहतोच की परिषदेत येणारे सगळेच जर एकाच प्रवाहात आहेत, तर समाजातील ह्या ज्ञात प्रश्नांवर नव्याने बोट ठेवणारी चर्चा पुन्हा पुन्हा का करावी लागते?
परिषदेतील चर्चांमधून तीन सूर जाणवले – १: देव नाही हे पटवणारे, २: देव आणि धर्मांने आपल्याला कसे आंधळे बनवले आहे हे सांगणारे आणि ३: विवेकवादी विचार का आणि कसा करावा हे समजवू शकणारे.
दुसऱ्या प्रकारच्या चर्चेत नेहमीच फार रंजकता आणता येते. पण ही चर्चा आपल्या भात्यात तयार उत्तरे जरी देऊ शकते तरी ती अंतर्मनात खोलवर जात नाही, असे माझे वैयक्तिक मत आहे. जावेद अख्तरांची स्टार व्हॅल्यू, सडेतोड तर्क आणि निरीक्षणे फार मोलाची आहेतच; पण तिसऱ्या प्रकारची विवेकवादी चर्चा जास्त खोलवर परिणाम करू शकते. उदाहरणादाखल: प्रत्येक धर्म स्त्रियांचे सारखेच शोषण करतो ही जाणीव जळजळीत अंजन आहे. पण आपण अनाहूतपणे इतर शोषणांचे भागीदार होत नाही ना, याचे भान विवेकशील विचार केल्यानेच येईल. ते कसे करावे ह्याचे प्रशिक्षणच घ्यावे लागेल. त्यामुळे स्त्रीमुक्तीवादी शारदा साठे जेव्हा स्त्रीमुक्तीचे त्यांचे विचार पुढे मांडतात तेव्हा जाणवते की हा मुद्दा आपल्या विवेकाबद्दलचा अधिक आहे, देव असण्या–नसण्याचा नाही.
कुमार केतकर, असीम सरोदे, सुरेश द्वादशीवार ह्यांच्याकडे जटिल विषयांकडे बघण्याची अभ्यासू दृष्टी आणि संभाषणाचा दीर्घ अनुभव आहे.त्यांच्यासोबत अधिक चर्चा घडायला हवी होती. राजकीय विचारांची स्पष्टता यायला मतांची देवाणघेवाण घडावी लागते. अर्थात्, त्यासाठी केवळ अबोल श्रोता न राहता, आपणही तयारीने यायला हवे.
मनाला सर्वात जास्त भिडले ते सुनील सुकथनकर आणि आलोक राजवाडे ह्यांचे सत्र. मी कलेविषयी अधिक सजग आणि संवेदनशील असल्यामुळे असेल कदाचित. कलानिर्मितीची प्रक्रिया नेहमीच गूढ राहिल्यामुळे तिचा स्रोत देवाधिष्टीत मानण्याकडे बराच कल आहे. पण निर्मितीप्रक्रियेकडेदेखील निरलसपणे बघिल्यास अनेक मूल्यनिर्मितीच्या संभावना उद्भवतात, हा विचार मला महत्त्वाचा वाटला. गौहर रज़ा वैज्ञानिक दृष्टीने विश्व आणि उत्क्रांतीची रचना समजवून सांगत असताना, कलेसारखाच हा दुसरा विचारही डोक्यात रुंजी घालत होता. ज्याचे अस्तित्वात येण्याचे कारण तितकेसे ज्ञात नाही, तेथेही देवाधिष्टीत संकल्पना रुजतात, पसरतात. तेव्हा आपल्यावर ही अधिकची जबाबदारी येऊन पडते की वैचारिक थकव्याने तर्कावरील आपली पकड सैल होऊ नये. गौहर रज़ा ह्यांच्या भाषणात आलेले महत्त्वाचे विवेचन हेही होते की जेव्हा विज्ञानाचा आधार हवा असतो, तेव्हा नव्यात नव्या तंत्रज्ञानाकडे आपली नजर जाते. याउलट धर्म हे प्रमाण मानायचे तर आपण जुन्यातल्या जुन्या दस्तावेजाकडे वळतो. परिषदेतील विषयांच्या प्रचंड आवाक्यामुळे दीर्घकाळ मनात ताजी राहणारी आणि नास्तिक्याबद्दल आपला आत्मशोध सुरू ठेवणारी सत्रे अधिक असावीत, असे वारंवार जाणवत राहिले.
विजय तांबे, अशोक बंग आणि रवींद्र रुख्मिणी पंढरीनाथ यांचे विवेचन नास्तिक्याबद्दल सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करणारे होते. त्यांनी नास्तिक्यालाही एक प्रकारची कल्पित सुरक्षितता समजून न घेण्याचा इशारा दिला. साधकबाधक चर्चा घडण्यासाठी असे खंडन–मंडन होत राहणे आवश्यक असते. पण ह्या सत्रानंतर अनेकांच्या मनात जी चलबिचल झाली होती, तिला वाट मिळाली नाही. मुख्यत्वे वेळेअभावी. त्यामुळे प्रश्नोत्तरांना अधिक वेळ मिळायला हवा होता. तांबे ह्यांच्या ‘माझा धर्म ही माझी खाजगी बाब आहे’ ह्या विधानाने अनेकांचे समाधान झाले नाही. एक गट ह्या विचारांना मोठ्या संघर्षातून पार केलेल्यांचा होता. त्यांची तगमग वेगळी होती. परंतु नास्तिक्याच्या कुंपणावर असणाऱ्या गटासाठी हा खोटा दिलासा तर ठरणार नाही ना, अशी शंका मनात येणे स्वाभाविक होते.
नास्तिक्य → विवेक → कॉमन सेन्स – या उतरंडीनुसार परिषदेत दैनंदिन जीवनातील बरेच प्रयोग करण्यात आले. उपस्थितांना दिलेली प्रवेशपत्रे आणि गळ्यात बांधण्याची फीत हस्तनिर्मित होती आणि प्लॅस्टिकचा अंतर्भाव वगळलेला होता. प्रवेशपत्रे मातीत टाकली तर त्यातून झाडे उगवावीत म्हणून प्रवेशपत्राच्या आत बियाही घातलेल्या होत्या. तीच बाब स्वास्थ्यासाठी उपयुक्त व्हावी ह्या दृष्टीने केलेल्या खाण्यातील पदार्थांच्या निवडीची. हे दोनही प्रयत्न उत्साहवर्धक होते. तर्काच्या आग्रहामुळे कुठलाही मार्ग सुकर होण्यास वेळ लागूच शकतो, पण हे प्रयत्न जेव्हा रोजच्या साधारण निर्णयात दिसतात, तेव्हा लगेच नजरेत येतात.
बुद्धिप्रामाण्याचा पुरस्कार करणाऱ्या ज्येष्ठ व्यक्तीला दरवर्षी ब्राइट्स सोसायटीतर्फे चार्वाक पुरस्कार प्रदान करण्यात येतो. ह्यावर्षी हा पुरस्कार खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर ह्यांना दिला गेला. पुरस्कार ज्यांना दिला गेला ते व्यक्तिमत्व केवळ पुस्तकात किंवा कुठल्या प्रतिमेत मर्यादित नसून नास्तिक्य जपणारी एक आपल्यासारखीच व्यक्ती आहे हा विचार मनाला उभारी देणारा आहे. नास्तिक बाप निरस नसतो(च) ह्याची झलक लीलावती नारळीकर यांनी जयंत नारळीकर यांच्या ज्या आठवणी सांगितल्या त्यात मिळाली. त्यांच्याकडून हे ऐकणे आल्हाददायक वाटले. आशिष महाबळ यांनी व्यक्ती म्हणून नारळीकरांबद्दल ज्या काही आठवणी सांगितल्या त्या सुंदर होत्या.
परिषदेचा उद्देश्य केवळ संख्याबळ वाढवणे आहे, असा भ्रम मात्र होऊ नये. तरुण सहकाऱ्यांच्या उत्साही आणि कार्यतत्पर सहभागामुळे परिषदेला नवेपण, ताजेपण आले. तरूणाईचा उत्साह पाहून जावेद अख्तर म्हणाले की ते रात्रीचे जेवण मुलांसोबत करतील. त्यानुसार, त्यांनी पन्नासेक मुलांसोबत दोन तास गप्पा मारल्या. मुळात हा प्रवास प्रत्येकाचा वेगवेगळा असला तरी प्रत्येकाला ह्या गाडीत येऊन बसावेसे वाटले पाहिजे. त्यामुळे कुणा एकाला न पटणारे मत कुणा दुसऱ्याच्या विचारप्रक्रियेला वाहतेही करू शकेल.
परिषदेतील शेवटचे सत्र एक अभिनव प्रयोग होता. नयी तालीम शाळेचे पटांगण मंच बनले. मान्यवर वक्ते मंचावर बसले, तर त्यांच्या चारही बाजूने प्रेक्षक होते. हा फॉर्मैट अतिशय अनौपचारिक आणि प्रभावी वाटला. निव्वळ मंचरचनेमुळे वक्ते आणि श्रोते ह्यांच्यामधील अंतर लुप्त होऊ शकते, ह्याचा अनुभव आला. ह्या सत्रात धर्मश्रद्धेशी संबंधित काही बातम्या ऐकवल्या आणि मंचावरील वक्त्यांनी तसेच प्रेक्षकांनी त्या बातम्यांवर आपली मते व्यक्त केली. असीम सरोदे ह्यांनी विद्यापीठातील धार्मिक कार्यक्रमांविरोधातील त्यांची मते प्रखरतेने आणि स्पष्टपणे मांडली. धर्मसिद्धांताचा विषय इतिहासासारखा एक विषय म्हणून विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात टाकलेला एकवेळ चालू शकतो. परंतु विद्यापीठांमध्ये धार्मिक उपक्रम राबवले जाण्यावर त्यांनी जाहीर निषेध नोंदवला. असे कार्यक्रम तुरुंगातदेखील अस्वीकार्य असावेत, असेही ते म्हणाले. आजूबाजूच्या धर्मांध वातावरणात अश्या नाजूक विषयावर उघडपणे विरोध प्रदर्शित करणे खूप धाडस देऊन गेले. कलकत्ता येथील पश्चिम बंगाल उर्दू अकॅडेमीने जावेद अख्तर ह्यांचा ‘हिंदी सिनेमातील उर्दू‘ ह्या विषयावरील कार्यक्रम काही मुस्लिम गटांनी विरोध दर्शवल्यानंतर रद्द केला होता. मंचावरील वक्त्यांनी तसेच प्रेक्षकांनी ह्या घटनेचा निषेध नोंदवल्यानंतर ब्राइट्स सोसायटीतर्फे निषेधाचा औपचारिक ठराव मांडला गेला. हेदेखील एक धाडसी पाऊल वाटले.
विशेष उल्लेख ‘चार्वाक’ या नाटकाचा. अगदी कमी वेळेत सादर झालेल्या या नाटकाने मनावर छाप पाडली. ग्रंथातील नास्तिक्याचे जड तर्क सामान्यांसाठी नाटकाद्वारे सादर करायचे प्रयत्न फारच अप्रतिम. सगळीकडून गळचेपी होत असताना, कुठेतरी आपला आवाज सापडल्याचे फार मोठे समाधान आहे. एका मिनिटात रिलद्वारे गहन ज्ञान देणाऱ्या या काळात असे नाटक होणे तेवढेच दुष्कर. पण थिल्लर प्रश्नात अडकवून ठेवलेल्या समाजात जर मांड ठोकून आपण तयारी केली तर आपली भूमिका परिणामकारकपणे सांगणे शक्य आहे हे या नाटकाने दाखवून दिले. यासाठी मंगल, रुपेश आणि मेराकी थिएटरचे आभारच मानायला हवे. चार्वाक हा शब्द आपल्या रोजच्या बोलण्यात यायला हवा आणि यासाठी असे रुळलेल्या फॉरमॅटबाहेरचे प्रयत्न आपण करीत राहायला हवे. न जाणो, काही वर्षांनी कुणाला आपल्या मुलाचे नाव चार्वाक ठेवायचे धैर्य येईल.
एकंदरीत, परिषदेची छान भट्टी जमली. अशा संवादाच्या अधिकाधिक जागा निर्माण होत राहाव्या. काही उणे काही दुणे होतच राहणार.
हर्षवर्धन पाटील, नागपूर
परिषदेदरम्यान, ब्राइट्स सोसायटीतर्फे जावेद अख्तर ह्यांच्या उपस्थितीत खालील ठराव मांडण्यात आला. सोसायटीची भूमिका स्पष्ट करणारा हा ठराव अभिनंदनीय आहे.
धर्माच्या जोखडातून कलेच्या मुक्तीचा ठराव
कलकत्ता येथील पश्चिम बंगाल उर्दू अकॅडेमीने ‘हिंदी सिनेमातील उर्दू‘ हा कार्यक्रम आयोजित केला होता. ह्या कार्यक्रमात नास्तिक भाषातज्ज्ञ, कवी,आणि पटकथाकार जावेद अख्तर ह्यांच्या सहभागाला इस्लामी राष्ट्रवाद्यांनी विरोध केल्यानंतर आयोजकांनी कार्यक्रम स्थगित केल्याविषयी आम्ही खेद व्यक्त करतो आणि ह्या दडपशाहीचा निषेध करतो.
भाषा धर्माला किंवा धार्मिक राष्ट्रवादाला आंदण म्हणून देऊ नये. उर्दू अकॅडेमी ह्या संस्थेला अल्पसंख्याक आणि मदरसा शिक्षण ह्या खात्याच्या अखत्यारीत टाकून आणि बिगर मुस्लिम लोकांना उर्दूच्या कार्यक्रमात प्रवेश नाकारून पश्चिम बंगाल सरकार असा पायंडा पाडते आहे की उर्दू ही भाषा मुस्लिमांची किंवा मुस्लिम राष्ट्रवादाची आहे. असा सवतासुभा हिंदुत्ववाद्यांनाही हवाच आहे. अभिव्यक्तिस्वातंत्र्याची गळचेपी करण्याविषयी सर्वच धर्मसंघटनांचे आणि सरकारचेही एकमत असते.
सरकारी, धार्मिक, किंवा राष्ट्रवादी नियंत्रणपासून वेश, भाषा, आहार, इ. सांस्कृतिक पैलू एकंदरच मानवी संस्कृती मुक्त व्हावी अशी अपेक्षा आम्ही व्यक्त करत आहोत आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न करू असा निश्चय करत आहोत.