महानतेपलीकडे – महाराष्ट्रातील सामाजिक व वैचारिक योगदानाचे बहुआयामी मूल्यमापन

गौरवशाली/प्रभावशाली व्यक्तींची सूची – एक सामूहिक प्रयत्न

प्रत्येक समाजामधून संत, समाजसुधारक, राजकीय नेते, लेखक, कलाकार, शास्त्रज्ञ, विवेकवादी, व्यावसायिक, कार्यकर्ते, खेळाडू, उद्योजक अश्या व्यक्ती वेगवेगळ्या काळात, वेगवेगळ्या प्रकारे समाजाला आकार, दिशा देत असतात. ह्यांपैकी काहींनी कायदे घडवले आहेत, काहींनी समाजोपयोगी संस्था उभारल्या-वाढवल्या, काहींनी साहित्याद्वारे समाजातील प्रश्न चव्हाट्यावर आणले, काहींनी अन्यायाला थेट आव्हान दिले, काही केवळ स्वप्नरंजनात डुंबले. काहींनी प्रस्थापित समजुती तेवढ्या अधिक घट्ट केल्या; तर काहींनी अहितकारक, घातक समजुतींच्या विरोधात आंदोलनाचा/क्रांतीचा मार्ग स्वीकारला.

आपण ह्या सगळ्याकडे कशा नजरेने पाहतो? अश्या व्यक्तींना संबोधतांना आपण सहजपणे ‘महान’ हा शद्ब वापरतो. पण ह्यांची ‘महानता’ नेमकी कशात असते? निव्वळ त्यांच्या लोकप्रियतेत, की संस्थाबांधणीत, ज्ञानपरिवर्तनात, सामाजिक कार्यात, सामाजिक न्यायात, त्यांच्या आंदोलक कृत्यात, अथवा तात्काळ समाजोपयोगात? की कधी कधी केवळ काही इष्ट-अनिष्ट मार्गाने मिळालेल्या/मिळवलेल्या त्यांच्या सन्मानात, पुरस्कारात?

इतिहासाचार्य वि. का. राजवाड्यांनी १९१३ मध्ये “महाराष्ट्रातील बुद्धिमान, प्रतिभावान आणि कर्त्या लोकांची मोजदाद” करण्याचा प्रयत्न केला. त्यांचा निकष स्पष्ट होता : ‘थेट सामाजिक उपयुक्तता’. अर्थात्, समाजाच्या उपयोगी न पडलेले योगदान गणनेत धरता येणार नाही. पुढे अनेकांनी याद्या केल्या. अलीकडेच, म्हणजे २०१७ मध्ये राजन मांडवगणे ह्यांनी नवी यादीदेखील सुचवली.

अशा प्रयत्नांमधून एक गोष्ट स्पष्ट होते की अशा प्रकारचे परीक्षण सातत्याने होत राहिले तर आधीच्या सूचीतील प्रभृतींच्या आठवणींना, त्यांच्या कार्याला पुन्हा उजाळा मिळेल, तसेच अनेक नव्या लोकांचा, त्यांच्या कार्याचा परिचय लोकांना, समाजाला होत राहील. राजवाडे, मांडवगणे ह्यांनी महाराष्ट्रापुरती ही सूची मर्यादित ठेवली असण्यामागे अनेक कारणे असू शकतात. समाजोपयोगी न पडलेले योगदान सूचीत घेऊ नये असेही त्यांनी इंगित केले होते. योगदान तोलण्याचे त्यांचे मापदंडही खूप स्पष्ट नाहीत/नव्हते. पण तरीही त्यांचे हे प्रयत्न अनेक दृष्टींनी मोलाचे ठरतात. हेच प्रयत्न पुढे न्यायचे तर काही मर्यादा आपण ओलांडू शकतो का? आणि त्याअनुषंगाने एक नवी सूची तयार करू शकतो का? ह्या विचारातून पुढे आलेले हे आवाहन आहे. 

हे आवाहन वेगळे कसे?

महाराष्ट्राभरातून अश्या व्यक्तींची एक प्रातिनिधिक सूची तयार करायची, तर त्यासाठी सामूहिक सहयोगाची जोड हवी. संतांपासून विवेकवाद्यांपर्यंत, कलाकारांपासून प्रशासकांपर्यंत, उद्योजकांपासून शास्त्रज्ञांपर्यंत अशी ही समावेशक सूची असावी. ही सूची अंतिम नसून अश्या प्रकारच्या प्रयोगाचा आरंभमात्र ठरावी, एवढेच. ह्या टप्प्यात महाराष्ट्राचे सध्याचे भौगोलिक क्षेत्र विचारांत घ्यावे, तसेच महाराष्ट्रीय मनांवर प्रभाव पाडणारे (महाराष्ट्राच्या भौगोलिक क्षेत्राबाहेरील असले तरी, उदाहरणार्थ, कुमार गंधर्व, जी.ए.कुळकर्णी इत्यादि).

ह्या सूचीसाठी आम्ही साधारण १३ निकष ठरवले आहेत. कुणाला ह्यापेक्षा अधिक काही सुचू शकतील, त्याचेही स्वागत असेल. “कोण महान” ह्यापेक्षा “कशामुळे महत्त्वाचा वा विवाद्य” हे स्पष्ट करू पाहणारी ही चौकट आहे.

आम्हाला सुचलेले १३ निकष

१. प्रभावी संवाद आणि सांस्कृतिक जाळे – आपले विचार किंवा कला लोकांपर्यंत पोहोचवल्या का? अधिकाधिक लोकांशी नाते जोडले का?
२.
संस्था/व्यवस्था उभारणे, टिकवणे किंवा वृद्धिंगत करणे – शाळा, दवाखाने, वाचनालय, प्रयोगशाळा, कायदे, धोरणे, संस्था अशा शाश्वत, टिकाऊ व्यवस्था/रचना उभ्या केल्या का?
३. विषमतेविरोधात थेट भूमिका – जात, लिंग, वर्ग, धर्माधारित असमानता आणि तज्जन्य अन्याय कमी करण्यात त्यांची प्रत्यक्ष भूमिका होती/आहे का?
४.
राजकीय/नागरी हस्तक्षेप – राजकारण, प्रशासन, किंवा सार्वजनिक चळवळींत त्यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला का?
५.
शाश्वतता – त्यांनी सुरू केलेल्या संस्था/उपक्रम त्यांच्यानंतरही चालू आहेत का?
६.
नैतिकता – जनमानसावर प्रभाव असूनही त्यांनी स्वतः नैतिक मर्यादा पाळल्या का? जसे, सत्ता/लोकप्रियतेचा गैरवापर टाळला का?
७.
चिकित्सक विवेक/विवेचक बुद्धी – प्रस्थापित मान्यतांना प्रश्न विचारण्याची, तर्कशुद्ध विचार करण्याची, अंधश्रद्धेला आव्हान देण्याची भूमिका त्यांनी घेतली का? त्यासाठी सत्तेला, सत्ताधाऱ्यांना किंवा धोरणकर्त्यांना आव्हान दिले का?
८.
परिणामांचा आवाका/विस्तार – परिणामांचा विचार करता त्यांचे काम किती मोठ्या समाजघटकांपर्यंत/प्रदेशांपर्यंत पोहोचले?
९.
उचललेली जोखीम – आपल्या भूमिकेसाठी त्यांनी विरोध, संकट, नुकसान, अशी किंमत मोजली का?
१०.
ज्ञानविस्तार व नवी दृष्टी – सामाजिक, राजकीय किंवा वैज्ञानिक संशोधनक्षेत्रात काही भरीव कामगिरी केली आहे का? ज्ञान मिळवण्याचे नवे मार्ग उपलब्ध केले का? त्यामुळे समाजाची विचार करण्याची/समजून घेण्याची चौकट अधिक विस्तृत झाली का?
११.
आमूलाग्र बदल – लोकांच्या रोजच्या भाषेत, वर्तनात, सवयींमध्ये त्यांचे विचार रूजले आहेत का? त्यामुळे विचारप्रक्रियेत दृश्य फरक पडला का?
१२.
थेट सामाजिक उपयुक्तता – त्यांच्या आयुष्यातच समाजाला त्यांच्या कार्याचा, विचारांचा, धडपडीचा थेट फायदा झाला का?
१३.
ऐतिहासिक प्रभाव – ते नसते तर इतिहासाची दिशा लक्षणीय प्रकारे वेगळी झाली असती का?

ह्या निकषांमधून सक्रिय योगदान, तटस्थ योगदान ह्यासोबतच संभाव्य नकारात्मक परिणामांचाही विचार करण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहोत. 

पण इतकेच नाही

हे मूल्यमापन करताना अनेक प्रश्न विचारण्याचे धाडसही करायला हवे. कोणत्याही व्यक्तीचे मूल्यमापन करताना, तिने समाजाला पुढे नेले की मागे रोखले — हा प्रश्न टाळता येत नाही. जसे, 

  • त्यांनी उभारलेल्या संस्था टिकल्या का? — त्या सर्वसमावेशक होत्या का?
  • त्यांनी लोकांना अज्ञानातून ज्ञानाकडे नेले का? — की समाजाच्या अंधश्रद्धा बळकट केल्या?
  • त्यांनी धर्म, जात, लिंग, वर्गभेद कमी केले का? — की ते अधिक घट्ट केले?
  • त्यांनी प्रश्न विचारायला शिकवले का? — की न विचारताच मान्य करायला?
  • त्यांनी स्वातंत्र्याचा पुरस्कार केला का? — की नियंत्रणाचा?

हे प्रश्न अस्वस्थ करणारे असू शकतात. पण अस्वस्थता टाळण्यासाठी प्रश्न टाळणे, हा उपाय नाही. आपले मत, आपले अभिप्राय मांडायचे, तर आत्मपरीक्षण करता आले पाहिजे आणि ते करायचे तर वरील प्रश्न पुनःपुन्हा विचारत राहण्याचे धाडसही करावेच लागते.

बऱ्याच प्रश्नांची उत्तरे तत्काळ मिळत नाहीत. बऱ्याच कार्यांचे परिणाम अनेक दशकांनंतर दिसू लागतात. अल्पकालीन फायदे कधी कधी दीर्घकालीन तोटे ठरू शकतात, अल्पकालीन तोटे कधी कधी दीर्घकालीन फायदे ठरू शकतात. म्हणूनच क्षणिक लोकप्रियता किंवा तत्काळ यश ह्यांवर आधारलेले मूल्यमापन धोकादायक ठरू शकते. अनेकदा, व्यक्तीच्या निधनानंतर तिच्याबद्दलची चर्चा बदलते. काही वेळा टीका मवाळ होते, तर काही वेळा बदलत्या सामाजिक, राजकीय परिस्थितीमुळे मूल्यांकन टोकाचे होते. 

आणि म्हणूनच अश्या प्रकारच्या मूल्यमापनात, दीर्घकालीन परिणाम, सामाजिक दिशा आणि ऐतिहासिक संदर्भ ह्या तिन्हींचा विचार आवश्यक ठरतो. निव्वळ ‘थेट सामाजिक उपयुक्तता’ ही कसोटी अपुरी ठरू शकते. एखाद्या व्यक्तीचे काम तिच्या आयुष्यातच समाजाला तात्काळ उपयोगी पडले का, हा प्रश्न महत्त्वाचा असला तरी तो अंतिम निकष ठरू शकत नाही. कारण काही विचार आणि शोधांचे परिणाम अनेक दशकांनंतर समाजावर उमटतात. 

जसे, न्यूटन किंवा आइनस्टाइन ह्यांच्या कार्यामुळे तत्कालीन समाजात काही तत्काळ बदल झाले नव्हते. राजवाड्यांच्या निकषावर त्याकाळात न्यूटन वा आइनस्टाइन अपयशीच गणले गेले असते. परंतु आजच्या आपल्या अवकाशमोहिमा, उपग्रह, इंटरनेट, आधुनिक तंत्रज्ञान आणि औद्योगिक प्रगती — ह्या सर्वांचा पाया त्यांच्या संशोधनात आहे. दीर्घकालीन सामाजिक समृद्धीत त्यांच्या योगदानाइतके मोलाचे योगदान फार थोड्यांचे आहे. म्हणूनच एका निकषावरून संपूर्ण निर्णय देणे म्हणजे आपल्याच मूल्यमापनाला अपुऱ्या चौकटीत बंदिस्त करण्यासारखे ठरेल. म्हणूनच ‘थेट सामाजिक उपयुक्तता’ हा एक महत्त्वाचा निकष असला, तरी तो सर्व प्रकारच्या योगदानांचे मूल्यमापन करण्यासाठी पुरेसा नाही. तत्काळ समाजोपयोग आणि दीर्घकालीन ज्ञानविस्तार ह्यांच्यातील फरक आपण ओळखला पाहिजे.

निकष आणि मूल्यदृष्टी

वरील निकषांकडे पाहण्याची ‘लेन्स’ (मूल्यदृष्टी) बदलली, तर निष्कर्षही बदलतील. सामाजिक न्यायाला अग्रक्रम दिल्यास एक चित्र उभे राहील. ज्ञानवर्धनाला दिल्यास दुसरे. राजवाड्यांच्या थेट समाजोपयोग निकषाला दिल्यास तिसरेच. मतभेद अपरिहार्य आहेत — आणि तेच अपेक्षित आहेत. वाद व्यक्तींबाबत नसून मूल्यांबाबत व्हावेत, आणि ती मूल्ये उघडपणे मांडली जावीत, हीच इच्छा आहे.

हा प्रयत्न काय नाही

ही क्रमवारी नाही.
ही अंतिम यादी नाही.
हा शिक्कामोर्तब नाही.

हा प्रयत्न काय आहे

हा प्रयत्न म्हणजे  चर्चा सुरू करण्याची निव्वळ एक चौकट आहे. आणि ती खुली आहे — बदलण्यासाठी, आव्हान देण्या/स्वीकारण्यासाठी आणि पुनर्विचारासाठी.

महाराष्ट्राची वैचारिक परंपरा केवळ स्मरणाची नाही; ती परीक्षणाची आहे. राजवाड्यांनी, राजन मांडवगणेंनी (कुणी आणखीही कुणी) वेगवेगळ्या काळात ही गणना केली. आज ती पुन्हा, पण थोडी अधिक व्यापक करावी, असे वाटते. केवळ प्रसिद्ध नावेच नव्हे, तर स्थानिक पातळीवर दीर्घकाळ काम केलेल्या व्यक्तींची नावेही आम्हांला महत्त्वाची वाटतात, महानतेच्या पलीकडे जाऊन, महत्त्वाच्या मितींचा विचार करत. 

म्हणून आपणास आवाहन

आपल्याकडून अशी नावे येणे अपेक्षित आहे. आपण ज्या व्यक्तींना ‘महान’ म्हणतो, त्या आपल्या समाजाला खरोखर पुढे घेऊन गेल्या की आपण त्यांच्यामागे विचार न करताच चालत राहिलो  – हा प्रश्न आपण स्वतःला, आणि इतरांनाही अधूनमधून विचारत राहणे आवश्यक आहे.

* ह्या यादीत टाकता येतील अशी नावे सुचवा.

* आमच्या निकषांवर टीका करा, बदल सुचवा, नवे निकष सुचवा.

* तुम्ही सुचवणाऱ्या व्यक्तीचे वरील १३ पैकी शक्य तितक्या अधिक निकषांनुसार विश्लेषण पाठवा.

* स्वत:ची एखादी मूल्यदृष्टी टाकून विश्लेषण करा.

ही यादी आपण सुधारकच्या ईमेल आयडीवर (aajacha.sudharak@gmail.com) वर पाठवावी. आपल्या मनात काही प्रश्न किंवा शंका असल्यास ह्याच ईमेल आयडीवर लिहून पाठवाव्या. आम्ही त्यांचे निरसन करण्याचा प्रयत्न करू.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.