मनोगत

हैदराबाद येथे एका स्रीवर केला गेलेला सामूहिक बलात्कार, हिंसक रीतिने तिला ठार मारणारे निर्घृण, अमानुष कृत्य आणि त्या गुन्ह्याविरोधात आरोपींवर केली गेलेली कारवाई ह्या सगळ्या घटनांवरील निरनिराळ्या प्रतिक्रिया समाजमाध्यमांवर पसरत आहेत.. पसरत राहतील. वर्तमानपत्रांमधून किंवा समाजमाध्यमांमधून बाहेर येणार्‍या ह्या घटना मोजक्या असल्या तरी दररोज शेकडोंनी होणार्‍या अश्या निर्घृण बलात्काराच्या घटनांची साधी बातमीदेखील होत नाही. मुद्दलात ‘स्त्रीवर होणारे अत्याचार’ ह्याऐवजी ‘स्त्री असल्यामुळे होणारे अत्याचार’ ह्या विचारापर्यंत आपली मजल जोपर्यंत पोहोचत नाही, तोवर अत्याचाराच्या अश्या घटना कमी होणे अशक्य आहे. लिंगभेदाचे हे एक दाहक वास्तव आहे.

तिहार तुरूंगातील बलात्काराचा आरोप असणार्‍या अनेकांच्या मुलाखतीतून एक सत्य बाहेर आले ते म्हणजे, सहमतीने समागम (Consensual Sex) ही संकल्पना त्यातील अधिकांना ठाऊकच नाही. हे वास्तव धक्कादायक आहे. म्हणजे आपण करतो आहोत तो बलात्कार आहे हेदेखील पुरुषाला समजत नाही. केवळ कायद्याचे वा शिक्षेचे वा (सांप्रत घटनेत झाले तसे) मृत्युचे भय दाखवून असले गुन्हे टाळता येत नाहीत. आपली सामाजिक जडणघडण आणि पुरुषसत्ताक कुटुंबपद्धती या दोन्हींचे विश्लेषण करणे ह्या निमित्ताने निकडीचे ठरते. कोणताही पूर्वपरिचय नसतानाही केवळ ती स्त्री आहे म्हणून तिच्यावर बळजबरी करून संभोगाचे सुख मी उपभोगू शकतो हा अहंकार पुरुषांमध्ये येतोच कुठून? स्त्रियांना गुलाम आणि म्हणूनच ‘कायम उपलब्ध’ असा दुय्यम दर्जा देणारी अहंकारी मनोवृत्ती पुरुषांमध्ये मुळात येतेच कुठून? हे समजून घेणे अतिशय गरजेचे ठरते. नैसर्गिक ऊर्मी दाबायला शिकवणारी संस्कृती मिरवणार्‍या आपल्या समाजाचे हे विकृत चित्र पालटावयाचे झाल्यास नेमके काय करायला हवे? हे व असे अनेक प्रश्न मनात उद्भवायलाच हवे आणि त्यावर निकोप चर्चादेखील व्हायलाच हवी.

आपण अजूनही लैंगिकतेबद्दलच्या समजांच्या मुळापर्यंत पोहोचलेलोच नाही. लैंगिकता हा विषय अजूनही आपल्या समाजात खुलेपणाने बोलण्याचा विषय नसल्याने त्याविषयी जी संवेदनशीलता एकूण समाजमनात असायला हवी, ती तितकीशी असलेली दिसत नाही. आणि म्हणूनच आपला पुरुषसत्ताक समाज स्त्रीपुरुष संबंधाकडे किंवा एकूणच लैंगिकतेकडे निकोप नजरेने बघू शकण्यात असमर्थ ठरतो आहे. स्त्री व पुरूष ह्या दोघांचा समान सहभाग असणार्‍या आयुष्यातल्या एका महत्त्वाच्या अंगाविषयी जाणून घेण्याच्या त्यांच्या वाटा वेगवेगळ्या, एकेकट्याच्या असाव्यात हे अयोग्य वाटते. त्यामुळे पुरुषांच्या लैंगिक ऊर्मी समजून घेण्यात स्त्री किंवा स्त्रियांच्या लैंगिक ऊर्मी समजून घेण्यात पुरुष कमी पडतो असे वाटते.

लैंगिकतेसारख्या विषयावर स्त्रीपुरुष दोघांनाही सजग करणे, एकमेकांच्या शारीरिक गरजांविषयीची जाण वाढवणे, घराघरात, समूहासमूहात ह्याविषयी मोकळेपणाने चर्चा होणे अतिशय महत्त्वाचे आहे. निव्वळ शालेय अभ्यासक्रमात लैंगिक शिक्षणाचा पाठ टाकल्याने ही सजगता येणे शक्य नाही. कुटुंबात, समाजातच ह्याविषयीचा खुलेपणा आला तर आणि तरच स्त्रीपुरुषांमध्ये लिंगभेदाबद्दलचा थोडा जाणतेपणा येण्याची शक्यता आहे.

सुधारक’च्या जानेवारीच्या अंकामधून लैंगिकता ह्या विषयावर असे मोकळेपणाने लिहिले जावे, स्त्रीपुरुषांच्या निरनिराळ्या समजांच्या दृष्टीकोनातून लैंगिकतेबद्दल लिहिले जावे असे वाटते. अधिकाधिक लोकांनी अधिकाधिक जवाबदारीने ह्या विषयावर लिहावे असे आवाहन आम्ही करतो.

आभार.
समन्वयक : प्राजक्ता अतुल
aajacha.sudharak@gmail.com