कोऽहं!

आस्तिक्य किंवा नास्तिक्याविषयी विचार करताना एकंदर माझ्या असे लक्षात येते की एखाद्या व्यक्तीचे नास्तिक असणे हे आस्तिकांना तर खटकतेच, पण नास्तिकांना तिच्या नास्तिकपणाच्या खरेपणाविषयी येताजाता टिका करणे, त्याहून जास्त आवडते. 

‘नास्तिक म्हणवते आणि हिच्याकडे देवघर आहे’

‘नास्तिक म्हणवते आणि ही दररोज दारात रांगोळी काढते’ 

‘नास्तिक म्हणवते आणि ही दिवाळीला दिवे लावते’ 

‘नास्तिक म्हणवते आणि ही सणासुदीला झेंडूच्या माळांनी घर सजवते’ 

ह्या आणि अशा टीका सतत एका प्रकारचे नास्तिक दुसऱ्या प्रकारच्या नास्तिकांवर करत असतात. 

मला वाटते मूळात ‘नास्तिक’ ह्या शब्दाचा अर्थ त्यांना कळलेला नसतो. जरी आपण theist म्हणजे आस्तिक आणि atheist म्हणजे नास्तिक हे शब्द बऱ्यापैकी एकमेकांचा अनुवाद म्हणून वापरत असलो तरी पाश्चात्यांची atheismची कल्पना आणि भारतीयांची नास्तिकत्वाची कल्पना भिन्न आहेत. आपण उत्सवप्रेमी जनता असल्याने आपल्याला क्षणोक्षणी वेगवेगळे उत्सव साजरे करावे लागतात. ह्यात लोकप्रथा आणि धार्मिकता ह्यांचे इतके बेमालूम मिश्रण झाले आहे की आपल्या जगण्यातून देव ही संकल्पना संपूर्णपणे वेगली करणे हे आत्ताच्या काळात जमणे अवघड आहे. 

पाश्चात्यांपैकीही ख्रिश्चन लोकांच्या थिस्ट/अथिस्ट कल्पनांचा एकंदरच आस्तिक आणि नास्तिक लोक आपले धार्मिक विचार सांगायला आधार घेतात.  त्यांच्याकडे देव हा जगाचा निर्माता आहे आणि त्याच्या इच्छेने जग चालते हा मूळ मुद्दा आहे. 

ह्यावर विश्वास ठेवणारे ते आस्तिक. 

ह्यावर विश्वास न ठेवणारे ते नास्तिक. 

झाले  काम. 

म्हणजे दररोज देवाची प्रार्थना केली नाही, चर्चला गेले नाही, लग्न/बारसे/मृत्यू ह्यांमध्ये देव आणि धर्मगुरूला आणले नाही की झालात तुम्ही बाह्यांगी नास्तिक. अंतरंगी तुम्ही देवाला सृष्टीचा निर्माता आणि नियामक मानले नाही की संपले. तुम्ही एकाचवेळी रूढार्थाने सेक्युलर (अधार्मिक) आणि नास्तिक होऊन जाता. 

भारतात तसे नाही. भारतीय संस्कृतीत तुम्ही एकाच वेळी नास्तिक आणि तरीही धार्मिक असू शकता. आत्ताच्या नवधार्मिक लोकांना कदाचित हे माहीतही नसेल की हिंदू म्हणून जो भारतीय धर्म ओळखला जातो, त्यातही कित्येक विचारधारा नास्तिक आहेत. 

देवपूजा न करता, देवाचे अस्तित्त्व न मानता, देव ह्या जगाला चालवतोय असेही न मानता किंवा एखादी बाह्य शक्ती ह्या जगाला चालवतेय असेही न मानता तुम्ही हिंदू (भारतीय परंपरावादी) आणि तरीही धार्मिक असू शकता. 

भारतीय तत्त्वज्ञानाच्या परिप्रेक्ष्यात वेदप्रामाण्य मानणारे ते आस्तिक आणि न मानणारे ते नास्तिक असा अर्थ घेतला जातो. ह्यातही काही प्रकारची तत्त्वज्ञाने वेदांना एक मोठे ज्ञानभांडार म्हणून मान्यता देतात पण त्यातल्या देवांना किंवा त्या देवांनीच हे जग चालवलेय ह्याला मान्यता देत नाहीत. 

भारतीय परंपरेत किंवा आता ज्याला हिंदूधर्म असे वेगळे ओळखले जाते त्यातली काही आस्तिक दर्शने पुढीलप्रमाणे –
१.  न्याय
२. वैशेषिक
३.  सांख्य
४.  योग
५. मिमांसा
६. वेदांत 

ह्यातही सांख्यदर्शनांत वेदांचे महत्त्व मान्य केले असले तरी त्यातील अर्थाने देव आणि देवाने बनवलेले आणि चाललेले जग न मानता जग हे पुरूष आणि प्रकृती, आत्मा आणि निसर्ग ह्यांनी बनवेले आहे, ह्याला दुसरा कोणी चालक नाही असे मानले जाते. 

भारतातील (पारंपरिक भारतीय तत्त्वज्ञान ज्याला आता हिंदू म्हटले जाते) काही नास्तिक दर्शने पुढीलप्रमाणे –
१. चार्वाक
२. आजीवक
३. अज्ञान
४. बौद्ध
५. जैन 

आता आपण जरी बौद्ध आणि जैन हे वेगळे धर्म म्हणत असलो तरी भारतीय तत्त्वज्ञानाचा अभ्यास करताना, त्या परिप्रेक्ष्यात ह्यांना वेगळे धर्म न समजता वेगळी विचारधारा समजली जाते आणि म्हणूनच त्यांना भारतीय धर्माचाच एक भाग समजले जाते. पैकी सगळ्या नास्तिक दर्शनांनी वेदांचे प्रामाण्य/माहात्म्य सरसकट नाकारले आहे. देव नावाचा कुणी ह्या सृष्टीचा निर्माता आहे आणि तो ही चालवतो हे ही नाकारले आहे. 

ह्यातील काही दर्शनांनी माणसाला सगळेच आताच माहीत असणे शक्य नाही/गरजेचे नाही असे म्हटले आहे. पण दैनंदिन जगण्यासाठी ते माहीत होणे गरजेचे नाही आणि त्याशिवायही आपण आध्यात्मिक (spiritual) असू शकतो . त्यापेक्षाही नैतिक, इतरांना त्रास न देता, न्यायाने जगण्यासाठी ‘देव आहे का, ही पृथ्वी तो चालवतो का, तो पापपुण्याचे हिशोब लिहून त्याप्रमाणे स्वर्ग, नरक, मोक्ष किंवा पुनर्जन्म अशा गती ठरवतो का’ हे माहीत असणे गरजेचे नाही, असे म्हटले आहे. किंवा असे असणे आवश्यकच आहे हे मानण्याची गरज नाही, असे म्हटले आहे. 

वरील तत्त्वज्ञानाहूनही थोडा अर्वाचीन म्हणता येईल असा एक धर्म/पंथ म्हणजे लिंगायत धर्मही भारतात आहे. हा देव ही संकल्पना मानतो म्हणून आस्तिक म्हणता येईल. हे लोक ‘शिव’ हा एकमेव देव मानतात पण रूढ धर्मानुसार शिवाला जोडली गेलेली नातीगोती, पुराणांतले संदर्भ मानत नाही. आत्मलिंग किंवा ‘स्व’ ह्या स्वरूपाला हा धर्म ‘शिव’ मानतो. ह्यातही मूळ धर्मानुसार देवळे/मूर्ती ह्यांची पूजा वगैरे करायची नसून ‘स्वतःतल्या शिवाचे प्रतिक’ म्हणून गळ्यात एक इष्टलिंग धारण करून त्याचीच पूजाअर्चा करायची असते आणि कृतीशील कर्म हाच कैलास समजायचा असतो. ह्यात बाकी कोणत्या देवदेवी ह्यांची पूजाअर्चा करत नाहीत. 

आता रूढ भाषा अशी असते की अध्यात्म किंवा आध्यात्मिक म्हटले की मग आत्मा आला, किंवा spiritual म्हटले की spirit आले. मी काटेकोरपणे नैतिक असा शब्द न वापरता आध्यात्मिक असा शब्द वापरला आहे. कित्येक भारतीय नास्तिक दर्शने आत्म्याचे अस्तित्वदेखील रूढार्थाने मानत नाहीत. शेकडो वर्षांच्या प्रवासात ह्यातील बरीच दर्शने विसरली गेली, त्यांच्या मूळ तत्त्वज्ञानात भेसळ झाली, काही तत्त्वज्ञाने आता मूळ स्वरूपात मिळतही नाहीत. काही नास्तिक, देव, पुनर्जन्म, आत्मा न मानणाऱ्या दर्शनांत पुनर्जन्म, अवतार ह्यांची भर पडली. 

असो. सांगायचा मुद्दा असा की एक भारतीय व्यक्ती ही धार्मिक असूनही नास्तिक असू शकते. एक हिंदू व्यक्तीही हिंदू असून नास्तिक असू शकते. 

आता नास्तिकता पाळायची म्हणजे काय करायचे? पूर्ण संस्कृती विसरायचीय का? सगळे सण, समारंभ, रहाणी, लोकप्रथा, सुगीचे ग्रामीण उत्सव, वैयक्तिक उत्सव विसरायचेत का? आपल्या प्रथा, परंपरा, सुगीचे उत्सव, ऋतुबदलाचे/ऋतुंचा आनंद घेण्याचे उत्सव, जीवनक्रमातले काही वैयक्तिक महत्त्वाचे उत्सव ह्यांना धार्मिकतेने आणि देवाधिकांच्या गोष्टींनी इतके गुरफटवून ठेवले आहे की मग अमुक साजरे केले की झालात तुम्ही आस्तिक/थिस्ट. अमुक घातलेत म्हणजे झालात तुम्ही आस्तिक/थिस्ट असे स्वतःला कडवे नास्तिक समजले जाणाऱ्यांचे साधारण म्हणणे होत जाते. 

हे सगळे सण, समारंभ, उत्सव देवाची पूजा न करता किंवा देवच हे सगळे माझ्याकडून करवून घेतोय असा विचार न करता, किंवा नुसता आनंद साजरा करणाऱ्या काही गोष्टी आपण करू शकतोच. आणि ते करत असतानाही आपण नास्तिक असू शकतोच. नास्तिकता दाखवण्यासाठी ‘बाहर तो उजाला है मेरे घर में अंधेरा’ करत दिवाळीला मुद्दाम अंधार करून झोपण्याची काय गरज नाही.
(इथे आपण नास्तिकांचाच विचार करतोय म्हणून खरेतर हे अप्रस्तुत आहे, पण एकाच धर्मात आणि जातीतही प्रांतानुसार, प्रथांनुसार वेगवेगळे सण साजरे करायची पद्धत आहे किंवा अजिबातच साजरे न करण्याचीही पद्धत आहे त्यामुळे अमुकच आणि असेच का केले/का नाही केले असेही आस्तिकांनी म्हणण्याची गरज नाही.) 

अजून एक मुद्दा आहे आडमुठेपणाचा. अजूनतरी भारतात एखाद्या पुरूषाला मी नास्तिक आहे म्हणून मी अमुक एक कर्मकांड करणार नाही असे म्हणत बाजूला होणे सोपे आहे. पण सगळ्या सणासमारंभाच्या उत्सवाच्या कर्त्या-करवित्या स्त्रियाच असल्याने आस्तिक लोक असणाऱ्या घरांमध्ये काही साजरे होत असेल तर त्यातील नास्तिक स्त्रीला अंग काढून घेणे कठीण होते. त्यामुळे, समजा ती लोकलाजेस्तव, भांडणे/वाद टाळण्यासाठी तडजोड म्हणून पूजेला बसली, पुरणाचा स्वयंपाक केला, सजावट केली म्हणजे तिचे नास्तिक्य फुटून चक्काचूर झाले असे अजिबात हॉट नाही. 

असो. 

जसे आपण म्हणतो की मला माझ्या अमुक तमुक वागण्याबद्दल लोकांच्या सर्टिफिकेटाची गरज नाही, तसेच मी म्हणेन की प्रत्येक नास्तिकाने हे लक्षात ठेवावे की तुम्ही तुमच्या विचारांवर ठाम असलात तर दुसरे तुम्हाला काठावरचे, कुंपणावरचे, नुसतेच वरवरचे नास्तिक म्हणाले तरी काही बदलत नाही. 

बिदर (कर्नाटक) 

अभिप्राय 9

  • अति सुन्दर लेख डाक्टर स्वाति,
    खूबच छान,

  • लेख आवडला. नास्तिक्य सांभाळताना या अडचणी नेहमी येतात. त्याकडे कसे पहावे हा दृष्टिकोन मिळाला. धन्यवाद!

  • या लेखाला दुसरी बाजू आहे. जर तुमच्या सर्व कृती,वागणं,आचार,वर्तन हे आस्तिकांसारखं असेल व तुमचे विचार नास्तिक असतील तर ते तुमचे विचार नास्तिक आहेत याला पुरावा काय ? कारण नास्तिकता ही फक्त धर्मापर्यंत मर्यादित राहात नाही / राहाता कामा नये तर तुमचा विज्ञानाविषयी दृष्टिकोन,विज्ञानवाचन, अंधश्रध्दा विरोध, स्त्रीमुक्ति,सामाजिक समता ह्या सर्वच क्षेत्रांशी नास्तिकविचार सुसंगत असला तरच ते खरे नास्तिक तत्वज्ञान. एकक्षेत्रीय किंवा संकुचित नास्तिक विचार हा केवळ विचार याच पातळीवर राहतो. जगात बदल घडवायचा असेल तर तरुण पिढीने नास्तिक तत्वज्ञान समजून घेऊन वर्तनात फरक केला पाहिजे.नाहीतर भारतात उच्च विचार आणि सामान्य वागणूक यांतील विसंगती प्रत्येकात आढळतेच. ते बदलले पाहिजे.

    • तुमचे म्हणणे रास्त आहे.
      पण परदेशात नास्तिक एक्स ख्रिश्चनांनी नाताळ साजरा करणे, थॅंक्सगिवींगला मूळ घरी येणे, काही विशिष्ट पदार्थ खाणे, वाढदिवसाला केप कापणे, लोकल जत्रेत भाग घेणे सोडले का?
      मजा वेगळी, सण वेगळा आणि धार्मिकता वेगळी.
      नास्तिक म्हणून कायम चोहरा पाडून बसायची काय गरज? किंवा नास्तिक लोक सेक्युलर सण तरी कुठे साजरे करतात फार?

  • डाँ. स्वाती, नास्तिक आणि आस्तिक विचार धारेची खूपच छान मामांसा केली आहे आपण या लेखात. नास्तिक लोक देवाचे अस्तित्व मानत नसले तरी आपण लिहिल्या प्रमाणे त्यांनी अस्तिक लोकांपासून फारकत घेण्याची काही गरज नाही. आपण समाजात रहातो आणि आपले अनेक नातेवाईक असतात. त्यात काही अस्तिक तर काही नास्तिक असण्याची शक्यता असते. पण आपल्याला नातेसंबंध आबाधित ठेवणे गरजेचे असते. मग आपल्या अस्तिक नातेवाईकाकडे काही धार्मिक कार्य असले, तर आपण नास्तिक असलोतरी त्या कार्यास जाणे गरजेचे असते व त्या धार्मिक कार्यात सहभागी व्हावेच लागते. नास्तिक लोक जसा देव मानत नाहीत त्या प्रमाणे पुनर्जन्मही मानत नाहीत. मग आपण समाजात पहात असतो एखादी व्यक्ती सात्विक असते. दुसय्राला मदत करत असते. कोणी अनाथालय चालवत असतो. गरजू विद्यार्थ्यांना मदत करीत असते. वगैरे वगैरे. पण तरीही त्याव्यक्तीवर संकटं कोसळत असतात. येथे पुनर्जन्माचा संबंध येतो. या जन्मी सत्कर्म करत असूनही त्यावर संकटं येतात, त्याचे कारण पूर्व संचित असण्याची शक्यता नाकारता येत नाही. आपण लेखात म्हटल्या प्रमाणे धार्मिक सणांमध्ये अस्तिक लोक मौजमजा करत सताना नास्तिकांनी सुतकी चेहरा करुन रहायचे काय? तसेच या लेखात आपण मांडलेला स्त्रियांचा मुद्दा मार्मिक आहे. पुरुष नास्तिक असलातरी त्याची पत्नी अस्तिक असली तर तिला धार्मिक सणवार साजरे करायला बंदी घालता येईल काय? त्यामुळे नास्तिक्याची विचारधारा संयुक्तिक वाटत नाही असे मला वाटते.

  • बरोबर आहे स्वातीजी. समाजात अस्तिक आणि नास्तिक असा भेद रास्त वाटत नाही. उलट नास्तिकता ही जास्त अडचणीचीच असते. एकतर नास्तिक तुलनेने कमीच असतात. समाजात प्रत्येक व्यक्तिला एकमेकांवर अवलंबून रहावेच लागते. अशा परिस्थितीत नास्तिकता अडचणीचिच ठरु शकते. समाजात असलेली देवाण, घेवाण अस्तिकतेमुळेच होत असते. एकमेका सहाय्य करु, अवघे धरु सुपंथ ही मानसिकता अस्तिकांमध्येच असते. आणि त्यामुळेच मानवीय जीवन सुकरितपणे चालू आहे असे नाहीका तुम्हाला वाटत?

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.