ई-संवाद

[आजचा सुधारक ने ऑगस्ट 2008 मध्ये प्रसिद्ध उत्क्रान्तिवादी शास्त्रज्ञ चार्ल्स डार्विन ह्यांच्या जन्माला दोनशे आणि त्यांच्या ओरिजिन ऑफ स्पिशीज ह्या ग्रंथाला दीडशे वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने डार्विन विशेषांक काढला होता; जो मागाहून डार्विन आणि जीवसृष्टीचे रहस्य ह्या नावाने पुस्तकरूपाने प्रकाशित करण्यात आला. हे पुस्तक वाचून तुषार बोरोटीकरांनी संपादक रवीन्द्र रु.पं. ह्यांच्याशी इ-पत्रव्यवहार केला. तो येथे देत आहोत.

आजचा सुधारक हे प्रांजळ, अभिनिवेशरहित चर्चा व वादविवाद ह्यांचे व्यासपीठ बनावे अशी आमची पहिल्यापासून इच्छा होती व आहे. त्या भूमिकेतून ह्या चर्चेचे आम्ही स्वागत करतो. तीत उल्लेखिलेला देवेन्द्र इंगळे ह्यांचा आंबेडकर-सावरकर : इतिहासलेखनातील द्वैत हा लेखदेखील शेवटी उद्धृत केला आहे. वाचकांनी हे सर्व वाचून ही चर्चा आणखी पुढे न्यावी अशी अपेक्षा आहे. – संपादक]

नमस्कार रवीन्द्र सर.

डार्विन आणि जीवसृष्टीचे रहस्य ह्या समग्र, सर्वसमावेशक पुस्तकाबद्दल अभिनंदन!! ह्यामध्ये डार्विनच्या सिद्धान्ताला सर्व कोनांनी आणि बाजूंनी पाहण्याचा विविध तज्ज्ञांनी प्रयत्न केलाय. खरेच संग्राह्य असे आहे हे पुस्तक!! परंतु एक गोष्ट नमूद करावीशी वाटते इथे. सर्व प्रकरणांपैकी देवेंद्र इंगळे ह्यांच्या प्रकरणाबद्दल थोडसे सांगावसे वाटते .सदर लेखकाने डार्विन आणि जात, जातीयवाद, जातीयतावाद ह्यांबद्दल जे काही मुद्दे. उपस्थित केलेले आहेत (तेही उदाहरणांसहित), ते नक्कीच विचार करण्याजोगे आहेत. सर्व मुद्दे अगदीच बिनतोड !! पण, सदर लेखकाने स्वा. वि. दा. सावरकरांबद्दल जे काही लिहिले आहे, त्याबद्दल नक्कीच आक्षेप घ्यावासा वाटतो. सावरकरांनी स्पष्ट म्हटलेले आहे, की The caste system has to be demolished completely! सावरकर हे जातिनिरपेक्ष कार्य करणारे स्वातंत्र्यसैनिक होते. त्यांनी हेदेखील म्हटले आहे, की अन्याय झाल्यामुळे जर अनुसूचित जातीजमातींचे लोक दुसऱ्या धर्मांमध्ये निघून गेले, तर हिंदू धर्माचे केवढे मोठे नुकसान होईल!. सावरकरांबद्दल, ते ब्राह्मणवादी होते अशा आशयाचे बेजबाबदार लिखाण करताना लेखक, सावरकरांनी नाशिकमध्ये व अन्य ठिकाणी (स्वतःस संचारबंदी असतानाही) अनुसूचित जातीच्या लोकांना कर्मठ पुजाऱ्यांपासून संरक्षण देत मंदिरांमध्ये प्रवेश मिळवून दिला होता, हे विसरले आहेत की काय? 

सदर लेखकाला नम्र विनंती, की कोणत्याही महान व्यक्तित्वाचे चरित्र आणि साहित्य ह्यांचा पुरेसा अभ्यास करून मगच काही वक्तव्य करावे. अन्यथा 11 वर्षे काळ्या पाण्याच्या शिक्षेसदृश परिस्थितीमध्ये राहून दाखवून मगच अशा ह्या जातिनिरपेक्ष नेत्याबद्दल अशी विधाने करावीत.

लेखकाला असेही विचारावेसे वाटते, की त्यांना कोणत्याही विशिष्ट जातीबद्दल राग दर्शवायचा आहे, म्हणून त्यांनी सावरकरांना लक्ष्य केलेले आहे का? तसे असेल, तर त्यांनी ते करू नये.

संपादक, प्रकाशक ह्यांनाही विनंती करावीशी वाटते, की सदर लेखकाशी ह्याबाबतीत चर्चा करून प्रकरणामध्ये योग्य ते बदल करण्यास सुचवावे. लेखकाने इतर जे काही मुद्दे मांडले आहेत, ते नक्कीच अभ्यासण्याजोगे आहेत.

एक शिक्षक.

प्रिय श्री. तुषार बोरोटीकर,

आपण मनापासून पाठविलेली प्रतिक्रिया मिळाली. आपण केलेल्या समीक्षेबद्दल मनापासून आभार. मुळात विज्ञानाच्या पुस्तकाच्या संदर्भात सामाजिक विषयांवर अशी चर्चा घडावी हाच अशा पुस्तकाच्या प्रकाशनामागील हेतू असतो. व असायला हवा.

स्वा. सावरकरांविषयी देवेंद्र इंगळे ह्यांनी जी मांडणी केली आहे, त्याविषयी मतभेद नक्कीच असू शकतात. आपले मत मांडण्याचा लेखकाला जेवढा हक्क आहे, तेवढाच हक्क वाचकालाही आहे. आपल्या ई-मेलची प्रत मी लेखकाला पाठवीत आहे. त्यामुळे त्यांची इच्छा असल्यास ते तुमच्याशी स्वतंत्रपणे चर्चा करू शकतील.

मी फक्त तुम्ही संपादक/प्रकाशक ह्यांनी काय करावे ह्याबद्दल मांडलेल्या मताबद्दल लिहिणार आहे.

देवेंद्र इंगळे ह्यांना कोणत्याही विशिष्ट जातीबद्दल राग दर्शवायचा आहे, म्हणून त्यांनी सावरकरांना लक्ष्य केलेले आहे असे आम्हाला अजिबात वाटत नाही. तसे असते तर आम्ही त्यांचे लिखाण प्रकाशित केलेच नसते. तुम्ही त्यांचा लेख नीट वाचला तर तुमच्या लक्षात येईल की त्यांनी वर्ण-जात-व्यवस्थेचे समर्थन करणाऱ्या ‘ब्राह्मणी’ (ब्राह्मण नव्हे) विचारवंतांवर जशी टीका केली आहे, तशीच टीका मूळ निवासी सिद्धान्त मांडणाऱ्या बहुजनवादी नेते व विचारवंतांवरही केली आहे. त्यांच्या लेखाच्या समारोपाचा परिच्छेद पाहा –

“ब्राह्मणी व बहुजनवादी – संकुचित अस्मितांचे राजकारण करणाऱ्या ह्या दोन्ही प्रवाहांनी वैज्ञानिक संकल्पना व निष्कर्षाचा सोयीस्कर विपर्यास करण्याचा कितीही प्रयत्न केला, तरी विवेकवादाच्या कसोटीवर ते उघडे पडतात हे निश्चित.

सावरकरांना एकसंध हिंदू समाज निर्माण करायचा होता. म्हणून त्यांनी जातिभेदाविरोधी भूमिका घेतली. ह्या बाबतीत ते अन्य हिंदुत्ववादी नेत्यांपेक्षा नक्कीच वेगळे ठरतात. परंतु त्यांनी अनुवंशशास्त्राच्या प्रभावाखाली वर्ण-जात-व्यवस्थेचे समर्थन केले होते. लेखकांनी ते संदर्भ देऊन मांडले आहे. लेखाचा विषय जातिभेद हा नसून विज्ञानाच्या आधाराने आपले चुकीचे तत्त्वज्ञान प्रतिष्ठित करण्याविषयी आहे. त्यामुळे सावरकरांची सुप्रजननशास्त्राच्या आधारे केलेली वर्णश्रेष्ठत्वाची भूमिका हा टीकेचा विषय होऊ शकतो. त्याच आधारावर लेखकाने जेनोम प्रकल्पाच्या निष्कर्षाचे चुकीचे अर्थ लावणाऱ्या दलित-बहुजनवादी नेत्यांना धारेवर धरले आहे.

लेखकाने राजकीयदृष्ट्या सोयीची किंवा लोकप्रिय भूमिका घेण्याचे टाळले आहे व विवेकवादी दृष्टीने निष्कर्ष मांडले आहेत, असेच संपादकाना वाटते. म्हणूनच त्यांचा लेख आम्हाला प्रकाशनयोग्य वाटला. त्यामुळे लेखकाला सांगून मजकूर बदलण्याचा प्रश्न उद्भवत नाही.

अर्थात लेखकाच्या मांडणीतल्या त्रुटी सोदाहरण दाखवून आपण ही चर्चा पुढे नेऊ शकता. आम्हीही अशा चर्चेचे स्वागत करू. मात्र महान व्यक्तिमत्त्वांवर कोणी टीकाच करू नये, असा आग्रह आपल्याला धरता येणार नाही.

आपला,
रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ

सर्वप्रथम.

आपण दिलेल्या नेमक्या पद्धतीच्या स्पष्टीकरणाने प्रभाविंत झाल्यासारखे वाटले!!

आधीच नमूद केल्याप्रमाणे, लेखकाचे अन्य मुद्दे उच्च दर्जाचे व बिनतोड आहेतच.त्यात काहीही शंका नाही. त्यात डार्विन आणि जातीयतावादाच्याबद्दल सर्वांगीण विवेचनाचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे.

माझा मुद्दा केवळ सावरकरांबद्दलाचाच होता.सावरकरांची सुप्रजननशास्त्राच्या आधारे वर्णश्रेष्ठत्वाची भूमिका हा भाग, ते Biologist नव्हते म्हणून त्यांच्या मर्यादा लक्षात घेऊन जेव्हा आणि जितके लेखकाने मांडले आहेत, तेही लक्षात घेण्यासारखे आहे. तथापि, त्यांनी हिंदुत्ववाद आणि बहुजनवादाची परस्परपूरकता ह्या मथळ्याखाल सावरकरांबद्दल जे काही लिहिले आहे, त्याला ओपिनिअन म्हणावे की fact हे समज येत नाही आणि म्हणूनच त्यांनी ह्याबद्दल अधिक संशोधन करावे असे वाटते आणि ते त्यांनी केलेले असेल, तर सोदाहरण दाखवून द्यावे. (सावरकर हे वंश व वर्णश्रेष्ठत्ववादी कसे होते, ह्याबद्दल त्यांनी वसंत पळशीकर काय म्हणतात ह्याचा संदर्भ दिलेला दिसता ना की खुद्द सावरकरांच्या लेखनाचा.) अर्थात ह्या सुधारणा सुचवल्या. तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे, इच्छा असल्यास ते स्वतंत्रपणे चर्चा करू शकतील. बाकी संपादकांच्या/ प्रकाशकाच्या भूमिकेतून तुम्ही जे लिहिलंत, ते 100% पटलं! लेखकाची इच्छा असल्यास ते माझ्याशी email व्यवहार करतील अशी आशा आहे. परंतु तुम्हासही वरील गोष्टी communicate कराव्या असे वाटले म्हणून हा email प्रपंच!!

email साठी आपला बहुमूल्य वेळ दिलात ह्याकरिता शतशः धन्यवाद!

आपला नम्र,
तुषार बोरोटीकर.

आदरणीय रवींद्र सर,

बोरोटीकरांची प्रतिक्रिया आणि त्या संबंधीचा पत्रव्यवहार फोरवर्ड केलात म्हणून आभारी आहे. आपले लेखन कुणीतरी चिकित्सकपणे आणि रस घेऊन वाचतंय याचा मनस्वी आनंद आहे. बोरोटीकरांनी अगदी स्पष्टपणे नाराजी व्यक्त केली हे सुद्धा आवडले. वैचारिक चर्चा व स्वतःला सुधारून घेणे ह्या दोन्ही गोष्टी साठी मी नेहमी तयार असतो. पण बोरोटीकरांनी अशा कुठल्याही चर्चेआधीच मला “बेजबाबदार’ ठरवून टाकले! पळशीकरांना कोट केले याचा अर्थ सावरकरांविषयी माझा अभ्यास नाही असा कसा असू शकतो?

सावरकरांसंबंधी मी दहा वर्षांपूर्वी लिहिलेला लेख बोरोटीकरांच्या अवलोकनाकरिता पाठविणे ठीक राहील का? सुचवा.

आपला,
देवेंद्र

सन्मान्य तुषार बोरोटीकर,

मी देवेंद्र इंगळे. रवींद्र सरांनी आपण माझ्या लेखाविषयी नोंदविलेली प्रतिक्रिया कळवली. आपले लेखन कुणीतरी चिकित्सकपणे वाचतंय याचा मनस्वी आनंद आहे. आपण अगदी स्पष्टपणे नाराजी व्यक्त केलीत हे सुद्धा आवडले. वैचारिक चर्चा व स्वतःला सुधारून घेणे ह्या दोन्ही गोष्टीत मलाही रस आहेच. त्यासाठी मी कधीही तत्पर असतो. आपण मात्र कुठल्याही चर्चेआधीच मला ‘बेजबाबदार’ ठरवून टाकले. मी पळशीकरांना कोट केले याचा अर्थ सावरकरांविषयी माझा अभ्यास नाही असा कसा असू शकतो? सावरकरांसंबंधी मी दहा वर्षांपूर्वी लिहिलेला व समाजप्रबोधन पत्रिकेत प्रसिद्ध झालेला लेख आपल्या अवलोकनार्थ पाठवतो आहे. रवींद्र सरांची सूचना आहे की चर्चा पुढे न्यावी. आ. सु. मधून प्रसिद्ध करता येईल.

‘हिंदुत्वा’चे संघटन करता यावे म्हणून सावरकरांनी जातीच्या सप्त बेड्या तोडण्याची भाषा जरूर केली आहे पण जातिअंताकडे नेणारी कोणतीही कृतिशील भूमिका त्यांनी घेतली असल्याचे दिसत नाही. उलट जातिव्यवस्थेस समर्थन देणाऱ्या धर्माचा, ग्रंथांचा, प्रतीकांचा, परंपरेचा त्यांनी कायम कैवार घेतला हे नाकारता येणार नाही. स्वतः सावरकर ब्राह्मणवादी परंपरेचा गौरव बाळगत असतील तर त्यांना ब्राह्मणवादी म्हणणे गैर कसे? सावरकरांना ‘ब्राह्मणवाद विरोधी’ म्हटलेले तुमच्या दृष्टीने जबाबदारपणाचे ठरेल का?

सावरकर एक व्यक्ती म्हणून किंवा कुठल्याही एका जातिसमूहाविषयी राग दर्शविण्याचा हेतू नाही. तसे माझ्या लेखनात कुठेच दिसणार नाही. माझ्यालेखी मुद्दा आहे. सर्वंकष शोषणमुक्तीचा. वैश्विक मानवी नीतीचा. समतेचा आणि मानवतावादाचा.

विषमतामूलक वर्ण-जातव्यवस्थाकं शोषणप्रणालीच्या उपस्थितीसह कोणताही समाज/समूह कसा बरे राष्ट्र म्हणण्याच्या योग्यतेचा ठरू शकतो? सावरकरांची राष्ट्र- संकल्पना ब्राह्मणवर्चस्वकेन्द्री नव्हती का? ते जन्मजात-वांशिक श्रेष्ठत्वाचे पुरस्कर्ते होते हे मी पुरेशा जबाबदारीने आणि पुरावे देऊनच सिद्ध केले आहे.

आपला,
देवेंद्र इंगळे

रवींद्र सर.

देवेंद्र सरांचा प्रतिसाद मिळाला, त्यांना reply पण दिला.त्याची एक प्रत तुम्हाला पाठवत आहे. ही चर्चा प्रकाशित करण्याची आपली इच्छा असेल तर माझीही काहीच हरकत नाही. मलाही इतर वाचक, लेखक ह्याबद्दल काय काय म्हणतात, ते वाचायला आवडेल. कदाचित त्यातून माझ्या किंवा इतरांच्या विचार-दिशांमध्ये बदल होण्याची गरज असल्यास तोही होईल!

आपला नम्र,
तुषार बोरोटीकर.

देवेंद्र सर.

आपला प्रतिसाद वाचला आणि आवडला सुद्धा!! आपला लेखही वाचला. आपला प्रयत्न हा सावरकरांच्या दृष्टिकोनाला अजून वेगळ्या कोनाने पाहण्याचा आहे असंही समजलं. आपण वेगळा प्रयत्न करीत आहात, हेदेखील चांगले आहे.

परंतु, मी आधीच लिहिल्याप्रमाणे, सावरकरांचे ‘ब्राह्मणवादी’ दृष्टिकोन उघडे पाडण्यासाठी ज्या दाखल्यांची गरज आहे, ते दाखले हे त्यांच्याच बऱ्याच पुस्तकांमधील पुनःपुन्हा ब्राह्मणी व जातीयवादाला समर्थन देणारे आहेत, हे दाखवून देणारे असावेत. तरच त्यांचा हिंदुत्ववाद हा ब्राह्मणधार्जिण अथवा ब्राह्मणेतरांना दुर्लक्षित ठेवणारा आहे, हे पूर्णपणे सिद्ध होईल. (एखाद्याच सावरकर- पुस्तकातून, अथवा सावरकरेतर लेखकांच्या लिखाणांतून जर संदर्भ घेऊन/दाखवून लिहिल्यास सदर दृष्टिकोन हा वेगळा जात असूनही अपूर्ण राहतो आहे, असा जाणवतंय.)

जातिअंताकडे नेणारी कोणतीही कृतिशील भूमिका त्यांनी घेतली असल्याचे दिसत नाही. आणि उलट जातिव्यवस्थेस समर्थन देणाऱ्या धर्माचा, ग्रंथांचा, प्रतीकांचा, परंपरेचा त्यांनी कायम कैवार घेतला हे नाकारता येणार नाही ही दोन्ही वाक्ये व तत्सम इतर वाक्ये वाचताना, दोन प्रश्न ताकदीने समोर उभे राहतात :
१.
मागास जमातिच्या (तथाकथितच म्हणावे.कारण मागास वगैरे असे कुणी असतं, ह्यावर माझा विश्वास नाही.) लोकांना ब्राह्मणवादी लोकांचा विरोध डावलून (नाशिकमध्ये) मंदिरांमध्ये प्रवेश मिळवून देण्याचे कार्य ही कुतीशील भूमिकाच नव्हे काय?
२. गांधी-सावरकर भेटीत, सावरकरांनी caste system has to be de- stroyed असे म्हटल्यावर, caste system तर आपल्या हिंदू धर्माचा आधार आहे हे गांधीजींचे मत आपणास मान्य नाही, असंही म्हटल्याचा कुठेतरी संदर्भ आहे, हेदेखील विसरून चालणार नाही.मग जातिव्यवस्थेचा कैवार त्यांनी घेतला, असे अजूनही आपण म्हणायचे का?

बाकी, तुमचा कुठल्याही एका जातिसमूहाविषयी राग दर्शविण्याचा हेतू नाही, हे लक्षात आले आणि पटले सुद्धा!

असो.! ही चर्चा रंगते आहे, असे दिसतंय!! ह्यातून नक्कीच काहीतरी positive अथवा, गरज पडल्यास मध्यम-वैचारिक मार्गदेखील निघेल अशी आशा आहे. त्या दृष्टीकोनातून वरील संदर्भाच्या विषयावरील आपले मुद्देही वाचायला आवडेल. आणि चर्चा ही प्रकाशित करण्याची इच्छा असेल तर माझीही काहीच हरकत नाहीये.

आपला नम्र,
तुषार बोरोटीकर.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.