आपण गोष्टी ऐकत लहानाचे मोठे होतो. इसापनीती, रामायण, महाभारत, टारझन ह्यांसारख्या कथांमधून आपले बालपण फुलत जाते. लहानपणीच्या संस्कारामुळे पुढील आयुष्यात आपण गोष्टवेडे (Gossip Lover) होतो. कोणत्याही वयात रहस्यकथा, भयकथा, प्रेमकथा व विज्ञानकथा वाचाव्याश्या वाटतात. टीव्हीवर कौटुंबिक मालिकांमध्ये सासू-सून भांडणे, प्रेम-द्वेष चक्र, हास्यविनोद ह्यांचा मसाला वापरून मालिकांचे भाग वाढवले जातात. ‘चार दिवस सासूचे’ ही मालिका ३१४७ भागांपर्यंत चालली. रामायण चालू असताना रस्ते ओस पडत. आयपीएल ही क्रिकेटमालिका कथांसारखीच लोकप्रिय झाली आहे. हे सर्व कथाप्रकाराच्या यशाचे नमुने आहेत.
आपल्या जगण्याचा मोठा काळ कल्पित कथांमध्ये रमण्यात जातो. ह्या कथांना सुरुवात, मध्य आणि अंत असतो. नाट्य व रहस्य असते. भावनांचे पालनपोषण असते. बहुतेकवेळा सुखांत असतो. मराठी काय, किंवा जगात काय, कथांच्या आस्वाद, समीक्षा व एकूण व्यवहारांत बुद्धिमंत, विचारवंत संपूर्ण जीवन खर्च करतात. हजारो पीएचडी होतात. लाखो विद्यार्थी कथा-कादंबऱ्यांचा अभ्यास करतात.
स्टिव्हन वाईनबर्गसारखा भौतिकशास्त्रज्ञ नोबेल पारितोषिक विजेता घरी जेव्हा स्टडीरूममध्ये बसून अमूर्त चिह्नांशी खेळत असे, सिद्धांत मांडत असे, तेव्हा त्याचे डोके बधीर होण्याची पाळी येई. माणसे चिह्नांपेक्षा माणसांशी व्यवहार करणे पसंत करतात. त्यामुळे वाईनबर्ग गणिते सोडवताना समोर टीव्हीवर हाणामारीचे वेस्टर्न चित्रपट चालू ठेवत. ते बघताना संशोधन करणे त्यांना सुसह्य होई.
प्रत्येक गोष्ट कथेच्या चौकटीतून बघण्याच्या सवयींमुळे अनेक धारणा तयार होतात. त्यात एक आहे आत्म्याचे अमरत्व. जन्ममरणाला संगती नाही; मरणानंतर सगळे संपते. पण ही सत्ये माणूस पचवू शकत नाही. तो स्वर्ग निर्माण करतो. धर्माचे इमले बांधतो.
आपला मेंदू अनेक छोट्या भागांपासून बनला आहे. त्यांना मॉड्यूल्स म्हणतात. ही मॉड्यूल्स बऱ्याच अंशी स्वतंत्रपणे काम करतात. त्यांचे आपापसात मतभेद असतात. एक मॉड्यूल म्हणते, “श्रीखंड खाऊया”. दुसरे, वजन कमी करण्याची योजना आखते. शेवटी निर्णय कोण व का घेते, हे अजून मेंदूविज्ञानाने स्पष्ट केलेले नाही. पण जो निर्णय घेतला जातो त्याला, तर्कात बसवून स्पष्टीकरण दिले जाते (Rationalization). प्रत्यक्ष कारण अगम्य राहते. हे स्पष्टीकरण म्हणजे मेंदूच्या दुभाष्याने रचलेली गोष्टच.
जगण्यात येणारी असुरक्षितता, अपघात, अनाकलनीयता ह्यांमुळे देवकल्पना आली. त्यांच्याभोवती कथा रचल्या गेल्या. ह्या कथांना धर्मशास्त्राने बुद्धीचे अधिष्ठान दिले. पण मुळात सर्वच धुसर, अगम्य आहे.
मेंदूमध्ये जाणिवेबाहेरील अनेक क्रिया सतत कार्यरत असतात. नेणिवेमध्ये लहानपणापासून साठलेले अनेक गंड असतात. फ्रॉईडचे बरेच तपशील चुकीचे असल्याचे सिद्ध झाले तरी, अबोध मनाचे अस्तित्व मेंदूविज्ञानाने मान्य केले आहे. आपला जाणिवेचा भाग कथेसारख्या कल्पकशक्तीला वापरून मेंदूच्या डार्क मॅटरमध्ये झालेले अगम्य व्यवहार नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करतो.
विश्वामध्ये गोंधळ (Chaos) व अनिर्बंधता (indeterminism) आहे. पण आपला मेंदू गोंधळाला खपवून घेत नाही. मृत्यूचा स्वीकार करत नाही. देवाची जन्मकथा ही आपल्या मेंदूला पडलेले सुंदर स्वप्न आहे. पण स्वप्न वास्तवात येत नाहीत. कथांमुळे आपले आयुष्य सुसह्य होते, हे मात्र खरे आहे.
काही नवकथांमध्ये कथानक नसलेल्या कथा लिहिल्या गेल्या. बेकेटचे “वेटिंग फॉर गोदो” हे नाटक त्याचेच उदाहरण. पण अशा कथांना लोकप्रियता मिळत नाही. कथानक नसलेल्या कथा सामान्य वाचकाला परक्या, नीरस वाटतात, ह्यात नवल काय? गोष्टीरूप मेंदू हे अटळ तथ्य आहे.
वास्तवात विज्ञान हीसुद्धा न संपणारी कथा आहे. विज्ञानाला अंत नाही. विज्ञानात अंतिम सत्य नाही. विज्ञानाला कथनमूल्य नाही. बिग बँगनंतर विश्व निर्माण झाले असे म्हणतात, तरी प्रत्यक्षात अनेक विश्व असू शकतात. प्रत्येक विश्वाचे वेगळे नियम असू शकतात. डार्क मॅटर, डार्क एनर्जी, हबल टेन्शन ह्या विश्वाच्या कोड्यांना चौकटीत बसवण्याचा प्रयत्न विज्ञान करते. पण पुरावा नसल्याने तसे करणे विज्ञानाला शक्य होत नाही. त्यामुळे विज्ञानाने सांगितलेली विश्वाची कथा अजूनही अपुरीच आहे व ती कायमच अपुरी राहील. हे सर्व सांगितले तर सामान्य माणसे दूर पळतील म्हणून त्याचा क्वचितच गवगवा होतो. पण विश्वाचा इतिहास सुसंबद्ध क्रमात व कथेत बसणारा नाही हेच सत्य आहे. जे विश्वाच्या पातळीवर आहे, तेच आण्विक विश्वाच्या पातळीवर आहे. अतिसूक्ष्म पातळीवरील कित्येक घटिते शब्दांत मांडता येत नाहीत. त्यांना समीकरण व गणिताचा आधार घेऊनच मांडावे लागते. म्हणूनच भौतिकशास्त्र म्हणजे जवळजवळ गणितच असल्याचा अनुभव येतो. ह्या सूक्ष्म पातळीवरील विज्ञानाला गोष्टीरुपात सांगणे अशक्य झाल्याने ते समजाच्या व सुगमतेच्या पलीकडे गेले आहे. वाईनबर्गसारखा शास्त्रज्ञ गणित करताना टीव्हीवरील गोष्टींना समोर ठेवूनच गणित सोडवू शकतो, हाच सर्वात मोठा धक्का आहे. विज्ञान हे कथाबद्ध होण्याच्या पलीकडे गेले आहे.
विश्व हे कथेच्या विकासक्रमानुसार न चालता एंट्रॉपीच्या नियमानुसार चालते हा विज्ञानाचा अबाधित नियम आहे. अव्यवस्था (disorder) सतत वाढत असताना त्याला क्रमबद्धतेत बसवणे कठीण. पण विश्वाच्या ज्या भागात जीवन आहे, जाणीव आहे व विज्ञान आहे; जेथे एंट्रॉपी अतिशय कमी झाली आहे, त्या पृथ्वीवरील जीवनाला विश्वाची प्रतिकृती मानून पूर्ण विश्वालाच तर्कचौकटीत बसवण्याचा संकुचित मानवी प्रयत्न आपण करतो. तरीसुद्धा स्टीफन गूल्डसारखे जीवशास्त्रज्ञ म्हणतात की काही अपघात घडले म्हणून मानवजात पृथ्वीवर अवतीर्ण झाली. डायनोसॉरचा अंत एका अस्मानी संकटात झाला म्हणूनच माणसाला आपल्या वर्चस्वाची कथा लिहिता आली. नाहीतर डायनॉसोरना स्वतःच्या उत्क्रांतीच्या विजयाची कथा लिहिणे कठीण नव्हते. उत्क्रांती हा यादृच्छिकतेचा (randomness) खेळ आहे. उत्तर आधुनिकतावाद (Post Modernism) या विचारसरणीचा हाच सारांश आहे.
असे असले तरी आधुनिकोत्तर विज्ञानाची थोडी तरी ओळख सामान्य जनतेला व्हायला हवी व ती कथेच्या माध्यमातूनच होईल यात शंका नाही. म्हणूनच तर टर्मिनेटर, जुरासिक पार्क, अवतार, अराव्हयल ह्यांसारख्या चित्रपटातून सामान्य माणूस विज्ञानाला थोडा तरी स्पर्श करू शकतो. जयंत नारळीकरांच्या विज्ञानकथा विज्ञानाची तर्कबद्धता आपल्या आवाक्यात आणू शकतात. विश्व अमूर्त असले तरी माणसाचा मेंदू मूर्त संकल्पना व कथाकल्पना ह्यांच्यामार्फत त्या अमूर्ततेला रूप देऊ शकतो. अमूर्त आणि मूर्त ह्यांमधील दरी कमी करण्याचे आव्हान विज्ञान व विज्ञानकथेसमोर आहे.