चैतन्याचा प्रश्न

Culver City मधील This Is Not a Café.
संध्याकाळची वेळ. मोठ्या काचांपलीकडे रस्त्यावर रहदारी संथपणे सरकताना.
आत कॉफी मशीनची घरघर, आणि तीन जण एका कोपऱ्यातल्या टेबलवर.

सोमणे – समोर गरम मद्रास फिल्टर कॉफी.
कासवे – डबल एस्प्रेसो.
खेकडे – ओट मिल्क कॅपुचिनोवरच्या फेसात बोटे फिरवत.

सोमणे (फिल्टर कॉफीचा सुगंध नाकात शिरू देत, मग खिडकीकडे पाहत, नंतर कासवेकडे वळून) : कासवे, एक गोष्ट मी खूप दिवसांपासून पाहतोय. तुमच्या त्या तर्कवादी चर्चा, पेपर्स, मॉडेल्स, छान आहेत, पण त्यातचैतन्याला कुठे जागा आहे? चैतन्य म्हणजे काही धुरकट अलौकिक प्रकार नाही. ज्ञानेश्वरांना जी “आतील ज्योत” वाटली, तुकारामांना “जगण्यातली ओढ” वाटली, त्या अनुभूतीबद्दल बोलतोय मी. (कॉफीचा घोट घेत) माणूस एखाद्या क्षणी स्वतःच्या भौतिक मर्यादांपलीकडे जाताना जाणवतो. अगदी तसे, जसे एखाद्या रागात अचानक सूर “लागतो.” हे काय केवळ न्यूरॉन्सचं एकमेकांना सुलगावणं आहे? मला वाटतं तुमच्या तर्कांच्या नकाशात काही प्रदेश कोरेच आहेत.

कासवे (एस्प्रेसोचा कप टेबलावर टेकवत, तीक्ष्ण नजर सोमणेकडे) : कोरे? अनन्वेषित म्हण एकवेळ. तुझ्या त्या चैतन्याची अनुभूती मी नाकारत नाही. पण अनुभवाचा अर्थ ठरवताना एकदम “भौतिकतेच्या पलीकडे” म्हणायची काय गरज? अनुभवाच्या व्याख्या अनेक असू शकतात. ह्या एस्प्रेसोकडे पहा – यात कडूपणा आहे, वाफाळती उब आहे, जागं ठेवण्याचा गुणधर्म आहे – पण चवीत कुठली ‘दिव्यता’ वगैरे मिसळलेली नाही.

खेकडे (कपच्या किनारीवर बोटाने हलका ठेका धरत) : मला तुमच्या दोघांची ही जुगलबंदी आवडते. दोन वेगळे सूर, पण कुठेतरी एकमेकांना प्रतिसाद देणारे.

सोमणे जे चैतन्य म्हणतो, ते मला एखाद्या रागाच्या मनोधर्मासारखं वाटतं. आरोह-अवरोह संपले की कलाकार जिथे स्वतःचे स्वर शोधतो, तिथला धूसर अज्ञात प्रदेश.

आणि कासवे म्हणतोय की त्या मनोधर्माला अलौकिकतेचं लेबल चिकटवणं गरजेचं नाही. तो प्रवास कलाकाराच्या श्वासातून, त्याच्या शिस्तीतून, त्याच्या रचनेतून उगम पावतो.

सोमणे (खेकडेकडे पाहून हलके स्मित) : रागाचा मनोधर्म कलाकाराला निवडतो. तो आपणहून येतो, कलाकाराला ओढून घेतो. ते चैतन्य आहे. कलाकाराला स्वतःपलीकडे नेणारं काहीतरी. (कासवेकडे वळत) मला तुझ्या तर्कांमधली रचना आवडते – स्वच्छ, सुसंगत – पण मला वाटतं ह्या ‘ओढीला’ फुलायला तुम्ही खऱ्या अर्थानं जागा देत नाही. तिला तर्काच्या चौकटीत घट्ट बसवायचा प्रयत्न करता. केवळ सवयीची गोष्ट असती, तर सगळ्या कलाकारांना तो अनुभव सारखाच आला असता. तसं होत नाही – म्हणूनच तर ती ‘ओढ’.

कासवे (नजरेत खेळकर गंभीरता) : मानवामध्ये अनंताची इच्छा नक्कीच असते – खोल काहीतरी शोधण्याची. माझा प्रश्न इतकाच की, त्या अनुभूतीला “देहबाह्य” म्हणणं आवश्यक आहे का? असं नाही का की मन, आठवणी, भावना, संस्कृती ह्या सगळ्यांच्या जुगलबंदीमधून ती उमलते?

खेकडे (पुन्हा ताल धरत) : अहो, जुगलबंदी म्हणजे हेच ना – दोन वादक वेगळे असतात, त्यांचा स्वभाव वेगळा, तरीही त्यांच्यातून एक तिसरीच रचना जन्म घेते.

सोमणेचा स्वर—चैतन्याचा.
कासवेचा—तर्काचा.
आणि मी म्हणतो: ते दोन वेगळे प्रवाह असले तरी एकाच रागाचे भाग आहेत.

सोमणे (हळू आवाजात, जणू स्वतःशीच) : आपण चैतन्य, अर्थ, transcendence ह्याबद्दल बोलतो, पण हीच अस्वस्थता छोट्या-मोठ्या, अगदी परिचित प्रसंगांतही दिसते. जिथे नियंत्रण दिसत नाही, तिथे आपल्याला काहीतरी “असावं” असं वाटतं.

(बाहेर पाहत, एक Waymo गाडी सरकताना दिसते; चालकाच्या जागी कोणीच नाही)

हं. पण तरी एक प्रश्न उरतोच – चैतन्य जर आंतरिक प्रकाश असेल, तर तो केवळ सिग्नल्सच्या देवाणघेवाणींनी कसा उलगडणार? तर्क, पॅटर्न्स, कारण (reason) – ह्या सगळ्यात ‘तो’ प्रकाश कुठे? माणूस केवळ एखाद्या प्रणालीप्रमाणे फुलत नाही. त्यात काहीतरी अधिक असतं.

रिकामी सीट आणि भीती

Waymo गाडी वळते. ड्रायव्हरची रिकामी सीट पुन्हा तिघांच्या नजरेत येते. सोमणेच्या भुवया उंचावतात.

सोमणे (अस्वस्थपणे, खिडकीबाहेरच्या Waymo कडे पाहत) : कासवे, सांगेन तर गंमत वाटेल, पण ही रिकामी सीट मला फारच घाबरवते. गाडी चालते आहे – छान, शिस्तीत – पण ड्रायव्हर नाही. मानसिकतेला ते पचत नाही. आपल्याला लहानपणापासून शिकवलं जातं, “काहीतरी हलत असेल, होत असेल, तर त्यामागे कोणीतरी असतं.” इथे कोणीच नाही.

आणि ही भावना – ही पोकळी –  देवाशिवाय विश्व रिकामं वाटण्यासारखीच. जीवनाचा दिशादर्शक नसणं काय आणि कारचा नसणं काय— दोन्ही अस्वस्थ करतात.

कासवे : ह्या रिकाम्या सीटची भीती कशी अनाठायी आहे हे मी सांगू शकतो. त्यासाठी गाडी कशी चालते हे आधी समजावून घ्यायला हवं. त्यामागे भुताटकी नसून ह्या गाडीरूपी यंत्राचं सखोल प्रशिक्षण आहे, मशीन-लर्नींग आहे.

सोमणे : ठीक आहे – पण साध्या भाषेत सांग. मी मशीन-लर्निंगचा तज्ज्ञ नाही.

कासवे (हसत) : नक्की. गाडीच्या डोळ्यांपासून सुरुवात करूया. गाडीत असलेले Lidar, radar, आणि कॅमेरे म्हणजे तिचे डोळे. आपल्या मेंदूला मिळतात तसेच सिग्नल्स गाडीच्या संगणकाला त्यांच्याद्वारे मिळतात.

खेकडे : त्यामुळे आजूबाजूचे सायकल, कुत्रा, पादचारी, इतर गाड्या त्यांना दिसतात – तेवढं मला माहीत आहे.

कासवे : आपण बाजूने येणारा मुलगा पाहून “हा रस्ता ओलांडणार” असं भाकीत करतो. गाडीही तसंच करते, पण गाडी चक्क ३६० अंशात पाहू शकते, त्यामुळे ब्लाईंड स्पॉट्स नसतात.

सोमणे : पण गाडीचे अंदाज किती अचूक असतात?

कासवे : एखाद्या चांगल्या ड्रायव्हरइतकेच. प्रत्येक वस्तूचं स्थान, वेग, दिशा, गती, सगळ्याचं गणित गाडी करते. मग ती भाकितांची प्रारुपे वापरते. “हा पादचारी पुढच्या दोन सेकंदात डावीकडे जाईल की उजवीकडे?” वगैरे अंदाज ती बांधते.

खेकडे : पण अशा शेकडो शक्यता असतील. 

कासवे : हजारो असतात. आपण माणूस म्हणून मोजक्याच पर्यायांचा विचार करतो – थांबायचं, वळायचं, पुढे जायचं, इत्यादी. गाडी मात्र हजारो शक्यता पटापट लक्षात घेते आणि सर्वांत सुरक्षित, नियमसंगत निर्णय घेते.

सोमणे : आणि गाडी वळवणं, वेग कमी-जास्त करणं, ब्रेक दाबणं? हे सगळं कसं केलं जातं?

कासवे : कंट्रोल सिस्टीमद्वारे – नियंत्रणप्रणाली. निर्णय एकदा झाला की गाडी वळवणं, ब्रेक दाबणं, गती वाढवणं किंवा कमी करणं. क्षणागणिक शेकडो बारके बदल होत असतात.

सोमणे (कसेनुसे हसतो) : म्हणजे गाडी ‘विचार’ करत नाही, फटाफट पण काळजीपूर्वक निर्णय घेत असते.

कासवे : नेमकं बोललास. निर्णय म्हणजे ‘विचार’ नाही – पण वर्तनाचा गाभा असतो, आधार असतो. सीट जरी रिकामी दिसली – तरी त्यामागे एक अख्खं विश्व आहे. सगळं चलनवलन आतल्या गणनेमुळे व त्यावर आधारित प्रारूपांमुळे होत असतं. ‘कर्ता’ सीटवर नसून गाडीच्या मेकॅनिकल आणि इलेक्ट्रॉनिक सिस्टीम्स आहेत. त्या मिळून योग्य ‘कर्म’ घडवत असतात. बाह्य पर्यवेक्षक नसतानाही व्यवस्था एकसंध असू शकते, ह्याचं हे उत्तम उदाहरण आहे.

सोमणे (हळू, प्रांजळ) : हे मी ऐकलं होतं, पण इतकं स्पष्ट आणि सोप्या भाषेत नाही. पण तरी… त्यामागे जिवंत, बुद्धिमंत कर्ता नसल्याची कल्पना अस्वस्थ करतेच. जग तर कितीतरी पटींनी जास्त गुंतागुंतीचं आहे.

खेकडे : सोमणे, तुला वाटतंय ते अगदी नैसर्गिक आहे. मी स्वतः पहिल्यांदा Waymo पाहिली तेव्हा माझीही मान पटकन सीटच्या मागे कोणी लपलं आहे का ते पाहायला वळली. माणसाला नियंत्रणविरहीत भासणाऱ्या प्रणाली स्वीकारायला वेळ लागणारच. पण कासवे जे सांगतोय ते महत्त्वाचं आहे. गाडी चालते आहे कारण तिच्यात कर्ता आहे, कर्तृत्व आहे – फक्त ते बाहेर दिसत नाही.

सोमणे (थोडा पुढे वाकून, आता त्याचा आवाज अधिक धारदार) : ठीक आहे – गाडीचं कामकाज जबरी आहे. ते मी नाकारत नाही. पण माझा मुद्दा हा की तुम्ही निरिश्वरवादी किंवा तर्कवादी लोक सगळं ह्याच पद्धतीनं बघता.

सिस्टम. नियम. सेन्सिंग. निर्णय. आउटपुट.

माणूस फक्त ह्या चौकटीत बसू शकत नाही. भीती, करुणा, अपराधाची भावना, चुकल्यावर पश्चाताप – ह्या भावना algorithms पेक्षा मोठ्या आहेत, त्यापलिकडच्या आहेत. माणसाच्या अंतर्मनात एक साक्षी असतो – जो फक्त नियम पाळण्यावर समाधानी राहत नाही. “का केलं? काय हवंय? मी करतो ते योग्य आहे का?” असे प्रश्न विचारतो. स्वयंचलित गाडी असे करते का? ती स्वतःच्या निर्णयावर कधी विचार करते का? कधी स्वतःवर रागावते का? कधी असे विचार येऊन अडखळते का की मी चुकीच्या लेनमध्ये तर नाही ना?

तुम्ही म्हणता “जग आतून चालतं” –  पण आत्मचिंतन, अर्थनिर्मिती, प्रार्थनेतला रोमांच— ह्या सगळ्याचं काय?

To be continued



तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.