२० डिसेंबर २०२५ ला लल्लनटॉपवर देवाच्या अस्तित्वावर एक सार्वजनिक वादविवाद झाला. जावेद अख्तर आणि मुफ्ती शमैल नदवी ह्यांच्यातील दोन तास चाललेला हा संवाद बऱ्यापैकी संयत आणि आजच्या काळात दुर्मीळ असा होता. विशेषतः भारतात अशा विषयांवरील चर्चा बहुतेकवेळा गोंगाटात संपतात. इथे मात्र दोन्ही बाजूंनी दिलेल्या वेळांत मुद्दे मांडले, आणि शेवटच्या भागात प्रेक्षकांनी शांतपणे प्रश्न विचारले.
तरीही हा वाद ऐकताना सतत वाटत होते की दोघेही वक्ते प्रत्यक्षात दोन वेगवेगळ्या स्तरांवर बोलत होते. मुफ्ती शमैल नदवी देवाच्या अस्तित्वाकडे ‘कारण’ (reason), ‘अनिवार्यता’, ‘कार्यकारणभाव’ (causation) अशा संकल्पनांच्या आधारे तात्त्विक दृष्टिकोनातून पाहत होते. जावेद अख्तर मात्र वेगळाच प्रश्न उभा करीत होते, “जगभर जे अत्याचार आणि अपघात होताहेत ते होऊ देणारा देव मानणे नैतिकदृष्ट्या आणि मानवी अनुभवाच्या पातळीवर स्वीकारार्ह आहे का?” म्हणजेच, देव असू शकतो का ह्याऐवजी, असा देव असावा का? हा त्यांचा प्रश्न होता.
ह्या चर्चेत एक शब्द वारंवार आला, पण तो शेवटपर्यंत नेमका उलगडून सांगितला गेला नाही. तो शब्द म्हणजे ‘contingent’. तात्त्विक भाषेत contingent म्हणजे, अशी वस्तू, जी तिच्या अस्तित्वासाठी तिच्या व्यतिरिक्त इतर काही कारणांवर अवलंबून असते. ती कारणे अस्तित्वात नसती तर ती वस्तू वेगळी असू शकली असती किंवा अस्तित्वात आलीही नसती. एखादा कप, आपण स्वतः, आपला ग्रह, आपली संस्कृती – ह्या सगळ्या गोष्टी contingent आहेत. ठरावीक परिस्थिती, कारणे आणि योगायोगांमुळे त्या आहेत तश्या घडल्या. पण नेमकी तशी कारणे नसती तर, कदाचित त्या घडल्याही नसत्या.
ह्याच्या अगदी विरुद्ध संकल्पना म्हणजे अनिवार्यता, necessary – जी गोष्ट असणे आवश्यक असते किंबहुना जिचे अस्तित्वात नसणे अशक्य आहे.
मुफ्ती शमैल नवीदांचा युक्तिवाद साधारण असा होता: जगातील बहुतांश गोष्टी contingent आहेत; म्हणजे त्यांचे अस्तित्व स्वयंसिद्ध नाही. त्या स्वयंभू नाहीत. अशा गोष्टींचे ‘असणे’ दुसऱ्या वस्तूवर अवलंबून असते. त्या वस्तुच्या असण्याचे कारण, तसेच तिच्या असण्याचा उगम शोधावा लागतो. जसे, आपल्या घरातील फर्निचर. ते कशाचे बनते? तर, लाकूड; लाकूड कुठून येते? तर, झाडे; झाडे कुठून येतात? तर, बिया; बिया कुठून येतात? वगैरे वगैरे. माग काढत गेल्यास कारणांची/कर्त्यांची एक उंच शिडी बनत जाते. अशा शिडीला अनंत पायऱ्या आहेत असे मानणे किंवा अशी कल्पना करणे कठीण आहे, अशक्य आहे (infinite regress is impossible). त्यामुळे असे मानले जाते की, शेवटी कुठलीतरी अंतिम पायरी असलीच पाहिजे, जी कोणावरच अवलंबून नाही. अर्थात्, जी स्वतःहून अस्तित्वात आहे. एवढेच नव्हे तर बाकी सगळ्याचेही ती स्पष्टीकरण देते. आणि ती अंतिम पायरी, तो ‘necessary being’, म्हणजे देव होय.
हा विचार ऐकताना प्रथमदर्शनी तर्कसंगत वाटू शकतो. पण इथेच एक सूक्ष्म, पण महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. Contingent गोष्टी आहेत हे मान्य करणे वेगळे, पण contingent गोष्टींच्या शिडीची एक अनिवार्य, अंतिम पायरी असलीच पाहिजे, असा दावा (claim) करणे तर्कसंगत ठरते का?
म्हणजेच, कारणांची साखळी खूप लांब असू शकते, कदाचित अनंतही असू शकते. ती आपल्याला अस्वस्थ करते, अपुरी वाटते. पण त्यामुळे अस्वस्थ करणारी शिडीच तार्किकदृष्ट्या चूक असा निष्कर्ष निघत नाही. आपल्याला समाधान/पूर्तता (closure) हवी आहे पण म्हणून विश्वालादेखील क्लोजर हवे असे वाटणे या दोन गोष्टी वेगळ्या आहेत.
देव ही संकल्पना इथे एक सोयीस्कर थांबा बनते. कारणांची साखळी तिथे थांबवता येते. आणि त्यातून मनाला समाधानही मिळते. पण हा थांबा विचारांचा आहे, वास्तवाचा नाही, हे आपण लक्षात घेतले पाहिजे.
देवाची संकल्पना मांडताना त्यात अंतर्गत विसंगती नसेल अशी रचना करता येते. म्हणजे विचार करता ती संकल्पना सुसंगत भासते. पण एखादी कल्पना वैचारिकरीत्या सुसंगत असणे, ह्याचा अर्थ प्रत्यक्षात ती अस्तित्वात असणारच , असा होत नाही.
उदाहरणार्थ, गणितात अनेक सुसंगत (internally consistent) संरचना असतात. जसे की, युक्लिडियन भूमिती, रिमानीयन (Riemannian) भूमिती, आणि हायपरबोलिक भूमिती. ह्या सगळ्या तर्कदृष्ट्या शक्य आणि स्वतंत्र्यरीत्या सुसंगत आहेत; पण ह्यांपैकी कोणती भूमिती आपल्या भौतिक विश्वाला लागू होते, हा गणिताचा नव्हे तर अनुभवाचा प्रश्न आहे. सुसंगती म्हणजे अस्तित्वाची हमी नव्हे.
मुद्दा हा नाही की देव असूच शकत नाही. मुद्दा असा आहे की contingent शब्दावरून मुफ्ती शमैल नदवी ह्यांनी necessary being कडे मारलेली उडी आपसूक योग्य ठरत नाही. ती केवळ एक शक्यता दाखवते, अनिवार्यता नाही.
मुफ्ती शमैल नदवी ह्यांनी जावेद अख्तरांना म्हटले की तुम्ही ‘देव आहे की नाही हे माहीत नाही’ असे म्हणू शकता, पण देव नाही असे म्हणणे हा दावा आहे, आणि दावे करणे अयोग्य आहे. मात्र त्यांनी स्वत: ‘अनिवार्य शेवट तो देव’ असा दावाच केला. एवढेच नव्हे, तर हा देव अंतिम न्यायनिवाडा करील, असाही बिनबुडाचा आणि म्हणून अतार्किक दावा केला.
त्यामुळे हा वाद शेवटी ‘देव आहे की नाही’ ह्यावर न थांबता, एका अधिक मूलभूत प्रश्नाकडे घेऊन जातो – कारणांच्या शिडीचे स्पष्टीकरण पूर्ण व्हायलाच हवे असते का? की आपल्याला असे समाधान देण्याचे कोणतेही बंधन ह्या विश्वावर नाही?
हा प्रश्न मंचावर थेट विचारला गेला नाही. पण कदाचित तोच ह्या संपूर्ण चर्चेचा खरा गाभा होता. हा प्रश्न विचारण्यामागे केवळ तर्क नसतो; अस्वस्थता असते. कारणांची साखळी अनंत असू शकते ही कल्पना आपल्याला समाधान देत नाही. म्हणून आपण ‘स्पष्टीकरण पूर्ण व्हायलाच हवं’, ‘कुठेतरी “उत्तर” मिळायलाच हवं’, असं गृहीत धरतो, आवश्यक मानतो.
कारणांची साखळी अखेरीस संपलीच पाहिजे, ही जशी विश्वावर लादलेली मानवी अपेक्षा आहे, तशीच आणखी एक अपेक्षा आपण विश्वावर लादतो; ती म्हणजे न्यायाची अपेक्षा. आपल्याला केवळ स्पष्टीकरणच नाही, तर नैतिक समतोलही हवा असतो. चांगल्याला चांगलं आणि वाईटाला शिक्षा — असा हिशोब कुठेतरी बसलाच पाहिजे, असं वाटत असतं.
आणि हाच धागा आपल्याला न्यायाच्या त्या प्रश्नाकडे नेतो, जो मुद्दा वादविवादाच्या सुरुवातीपासूनच पुढे येत राहिला.
‘निसर्गात न्याय नाही’ म्हणजे नेमके काय?
जावेद अख्तर ह्यांनी चर्चेदरम्यान “निसर्गात न्याय नसतो”, असे वक्तव्य केले. हे वाक्य अनेकांना धक्कादायक वाटू शकते. पण थोडे थांबून विचार केला, तर ते निसर्गाबद्दल कमी आणि आपल्या अपेक्षांबद्दल जास्त आहे हे लक्षात येते.
निसर्गात घडणाऱ्या घटना न्याय-अन्यायाच्या चौकटीत बसत नाहीत. भूकंप चांगल्या-वाईट लोकांमध्ये फरक करीत नाही. रोग सद्गुण-दुर्गुण पाहून येत नाहीत. एखादे मूल लहान वयात आजाराने जावे, किंवा एखादा अत्याचारी माणूस दीर्घायुषी ठरावा, हे आपल्याला अस्वस्थ करते – आणि ती अस्वस्थता साहजिक आहे. पण मुळात आपण निसर्गाकडून न्यायाची अपेक्षा का करतो? न्याय ही मानवी संकल्पना आहे. ती समाजातून, सहजीवनातून, नियमांमधून, आणि परस्पर जबाबदारीतून निर्माण झाली आहे. निसर्ग निव्वळ भौतिक नियम पाळतो – मूल्ये नाही. गुरुत्वाकर्षण नैतिक नाही; ते कुठल्याही भेदभावाविना सदैव कार्यरत असते. उत्क्रांती निर्दय नाही; ती ठराविक परिस्थितीत जे टिकू शकतात, त्यांनाच पुढे नेते.
इथेच देवाचा प्रश्न उभा राहतो. देव निसर्गासारखाच कार्यरत असेल – नियमांनुसार, अपवादांशिवाय (पूर्णपणे secular) – तर त्याच्याकडून नैतिक न्यायाची अपेक्षा करणे सपशेल चुकीचे ठरते. आणि देव निसर्गापेक्षा वेगळा, नैतिक न्याय देणारा असेल, तर मात्र निसर्गात दिसणाऱ्या असमानतेचे स्पष्टीकरण हे द्यावेच लागते.
ह्या अर्थाने जावेद अख्तर ह्यांचा मुद्दा देवावर हल्ला करणारा नव्हता. तो आपल्या अपेक्षांवर प्रश्न निर्माण करणारा होता. आपण देवाची कल्पना करताना निसर्गातील वास्तवाशी जुळवून घेतो आहोत, की आपल्या नैतिक अपेक्षा विश्वावर लादतो आहोत?
“निसर्गात न्याय नाही”, असे म्हणणे म्हणजे, निसर्ग क्रूर आहे असे म्हणणे नसून न्याय ही मानवी जबाबदारी आहे, विश्वाची नाही, असे म्हणणे आहे. आपल्याला जर न्याय शोधायचा असेल, तर तो आकाशातल्या अदृश्य शक्तीत नाही – तो आपल्यातच शोधायला हवा.
देव नसला तरी नैतिकता का कोसळत नाही?
अनेकदा असा प्रश्न विचारला जातो – कधी थेट, कधी सूचकपणे की “देव नसेल तर नैतिकतेचे काय?”
म्हणजेच, देवावर श्रद्धा नसेल तर माणूस स्वार्थी, निर्दयी, बेफिकीर, अनैतिक होईल का? चांगले-वाईट ह्यांतील फरक नष्ट होईल का?
हा प्रश्न विचारण्यामागे एक गृहितक असते: नैतिकतेचा उगम दैवी आहे, नैतिकता मानवात देवाकडूनच येते.
आपल्या आजूबाजूला मात्र एक वेगळेच चित्र दिसते. देवावर विश्वास नसणारे अनेक लोक रोज आपण पाहतो. पण तरीही ते प्रामाणिकपणे जगतात. ते देवावर श्रद्धा ठेवणाऱ्या लोकांपेक्षा जास्त खोटं बोलत नाहीत, ते अधिक फसवणूक करीत नाहीत, दुसऱ्याच्या दुःखाकडे दुर्लक्ष करीत नाहीत. ह्याउलट, देवावर श्रद्धा असलेले लोकही अनेकदा अन्याय करतात, क्रूरपणे वागतात, किंवा स्वार्थासाठी नियम मोडतात. म्हणजेच, देवावर विश्वास असणे आणि नैतिक वागणूक ह्यांत निर्विवाद संबंध दिसत नाही.
ह्याचे कारण असे असू शकते की नैतिकता ही देवाने दिलेली वैचारिक ‘सूचना-पुस्तिका’ नसून, मानवी सहजीवनातून जन्मलेली गरज आहे.
आपण एकत्र जगतो, म्हणून नियम निर्माण होतात. हे नियम म्हणजेच नीती. नीती पाळणे म्हणजे नैतिकता. म्हणजे न्याय-अन्यायाप्रमाणे नीती-अनितीदेखील मानवनिर्मित आहे. आपण एकमेकांवर अवलंबून असतो, म्हणून परस्परांवरील विश्वास महत्त्वाचा ठरतो. आपण इतरांना दुखावू शकतो आणि इतरांमुळे दुखावले जाऊ शकतो, ह्यातून सहवेदना (empathy) निर्माण होते. ह्या सगळ्यांतून नैतिकता हळूहळू घडते – धर्म येण्याआधीही, आणि कदाचित धर्मानंतरही.
इथे पुन्हा “निसर्गात न्याय नाही” ह्याची आठवण ठेवणे महत्त्वाचे आहे. निसर्ग आपल्याला नैतिक नियम देत नाही. पण निसर्गाचा भाग म्हणून जगताना आपण न्यायाच्या संकल्पनेला जन्म देतो. न्याय हा काही वरून/आकाशातून आलेला आदेश नाही; तो आतून, अनुभवातून, संवादातून, चुकत-माकत सिद्ध होत असतो.
देव नसल्यास नैतिकता कोसळेल ही भीती खरोखरीच वाटत असेल तर त्याउलट असलेलाही प्रश्न पडायला हवा: जर नैतिकतेसाठी देव किंवा देवाची भीती आवश्यक वाटत असेल, तर ती नैतिकता खरी, आतून आलेली नैतिकता आहे का? म्हणजेच देव नाही असे सिद्ध झाल्यास आस्तिक अचानक अनैतिकतेने वागू लागतील का?
एखादी गोष्ट चुकीची आहे म्हणून आपण ती टाळायला हवी, की कदाचित शिक्षा (देवाकडून अथवा न्यायालयाकडून) होईल म्हणून? आपण कुणाला मदत करतो ते स्वर्ग मिळावा ह्या हेतूने, की त्या व्यक्तीबद्दल मनात आपुलकी, सहवेदना असते म्हणून?
देव असो वा नसो, हे प्रश्न आपल्यासमोर उभे राहतातच, किंवा रहायलाच हवे. असे प्रश्न टाळण्यासाठी देवाचा आधार घेऊन किंवा देवावर सारे सोपावण्याऐवजी आपण ह्या प्रश्नांवर प्रामाणिकपणे विचार केला पाहिजे.
नैतिकतेचे खऱ्या अर्थाने अस्तित्व देवाच्या उपस्थिती किंवा अनुपस्थितीमुळे नसून, इतरांप्रति आपली जबाबदारी स्वीकारण्यात आहे. देव नसेल तरी नैतिकता कोसळत नाही – कारण तिचा पाया भीतीत नाही, तर सहजीवनात असतो.
देव असो वा नसो, न्यायाची, तसेच नैतिकतेची जबाबदारी आपण टाळू शकत नाही.
समाज, बहुमत आणि नैतिकतेचा धोका
नैतिकता समाजातून निर्माण होते असे म्हटले की लगेच एक आक्षेप उभा राहतो, “बहुमत ठरवेल तेच योग्य का? आणि कसे?” इतिहासात समाजांनी, समाजात बहुमतांनी अनेक चुकीचे निर्णय घेतले आहेत. लोकशाही चौकटीतील प्रक्रियांचा वापर करूनच हिटलरसारखा नेतादेखील सत्तेवर आला. काही समाजांमध्ये कधीकाळी जादूटोणा, सती, अस्पृश्यता, गुलामगिरी ह्या रीतींना नैतिक मान्यता होती. असे जर असेल तर समाजावर, बहुमतावर आधारीत नैतिकता धोकादायक नाही का?
ह्या प्रश्नाकडे गांभीर्याने बघणे गरजेचे आहे – कारण हा खराखुरा, प्रामाणिक प्रश्न आहे. पण येथे एक महत्त्वाचा फरक लक्षात घ्यायला हवा: नैतिकतेचा उगम समाजात असतो, पण नैतिकतेचे अंतिम सत्य कोणा एका समाजाच्या बहुमतात असेलच असे नाही. बहुमत कायदे करू शकते, पण कायदा झाला म्हणजे तो न्याय्यच असेल असे नाही. लोकशाही म्हणजे “जे बहुमत म्हणेल तेच बरोबर”, अशी काही स्थिर, अचल व्यवस्था नाही. लोकशाही ही सतत स्वतःला तपासणारी आणि दुरुस्त करत जाणारी प्रक्रिया आहे. ती चुकते – पण त्या चुका ओळखण्याची आणि बदलण्याची शक्यता तिच्यातच असते.
युरोपमध्ये कधीकाळी जादूटोण्याच्या संशयावरून स्त्रियांना जिवंत जाळले जायचे. नैतिकतेच्या, योग्यायोग्यतेच्या कल्पना आणि समज बदलले, तसे कालांतराने त्या प्रथा गेल्या. भारतातही मांत्रिक असत. पण आज भारतात जादूटोणा किंवा अंधश्रद्धेला थेट समर्थन देणारे कायदे नाहीत – उलट अश्या प्रथांमुळे होणाऱ्या हिंसाचाराला आळा घालण्यासाठी कायदे बनले आहेत. हा बदल समाजाच्या जाणिवेत झालेल्या परिवर्तनाचेच लक्षण आहे. पण येथेच गोष्ट संपत नाही.
कायदे कागदावर असणे आणि ते प्रत्यक्षात अमलात येणे, ह्यातही तफावत आहे. आजही अनेक गावांमध्ये आजारी व्यक्तीला वैद्यकीय उपचारांऐवजी मांत्रिकांकडे नेले जाते. भीती, अज्ञान, परंपरा, आणि पर्यायांची कमतरता – ह्या सगळ्यांमुळे जुन्या रूढी, जुने समज सहज बदलत नाहीत.
म्हणजेच बदल कुठल्या दैवी आदेशातून अचानक अवतरत नाहीत; तसेच ते आपोआप घडत नाहीत. ते येतात कारण ज्ञानवर्धन होते, वैद्यकीय समज वाढते, आधी न पोहोचलेल्या ठिकाणी शिक्षण पोहोचते, आणि लोकांना वेगळे पर्याय दिसू लागतात. पण हे सगळे घडण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावे लागतात. लोकांचे बुवा-बाबांकडे जाणे थांबवण्यासाठी फक्त श्रद्धेवर टीका पुरेशी नसते; विश्वासार्ह उपचार, सुलभ आरोग्यसेवा, आणि सामाजिक आधार देणे तितकेच महत्त्वाचे असते. थोडक्यात, प्रश्न फक्त नियम बदलण्याचा किंवा कायदे बनवण्याचा नसून, ते नियम, ते कायदे लोकांच्या आयुष्यात उपयोगी ठरतील अशा पद्धतीने राबवण्याचा आहे.
समाजाधारीत नैतिकतेचा खरा अर्थ येथे समजतो. नैतिकता म्हणजे फक्त ‘योग्य काय?’ हे ठरवणे नाही; तर योग्य गोष्ट प्रत्यक्षात घडण्याजोगी परिस्थिती तयार करणे होय. नियम बनवणे हा पहिला टप्पा आहे. लोकांच्या हितासाठी हे नियम उपयोगी ठरतील, हे पाहणे ही खरी जबाबदारी आहे. आणि ती आपली सामायिक जबाबदारी आहे.
इथेच ज्ञानाचा मुद्दा महत्त्वाचा ठरतो. नैतिकता अपरिवर्यनीय वा अविकारी नसते; ती आपल्या ज्ञानाशी व सहवेदनेशी जोडलेली असते. जसजसे आपले विज्ञान प्रगत होते, तसतशी नैतिक समजही बदलते. पूर्वी आजार, दुष्काळ, मृत्यूसंबंधित अनेक अंधश्रद्धा होत्या; आज त्यामागची कारणे माहीत आहेत. अशा बदलांबरोबर त्या गोष्टींशी संबंधित नैतिक विचार आणि वागणूकही बदलतात.
थोडक्यात काय, तर सामाजिक नैतिकता म्हणजे “काहीही चालेल” असे नसते. ती कधी-कधी चुका करणारी पण चुकत-माकत शिकणारी, स्वत:ला सुधरवणारी एक प्रक्रिया आहे. देवाधारित नैतिकतेत मात्र एक वेगळाच धोका असतो: एखादी गोष्ट एकदा “दैवी आदेश” म्हणून घोषित झाली की, तिला प्रश्न विचारणे अवघड होते.
हिटलरचा दाखला दिला जातो तेव्हा हेही लक्षात घ्यायला हवे की त्याला विरोध करणारे लोक देवाच्या नावाने नव्हे, तर विवेक, सहवेदना आणि अन्यायाच्या जाणिवेच्या आधाराने उभे राहिले. नैतिकतेचा आधार देव होता म्हणून नव्हे, तर माणूस होता म्हणून.
त्यामुळे समाजातून येणारी नैतिकता अपूर्ण असू शकते – पण ती दुरुस्तही होऊ शकते. आणि कदाचित हीच तिची सर्वांत मोठी ताकद आहे. आज नैतिक वाटणाऱ्या काही गोष्टी भविष्यात चुकीच्या ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही शक्यता स्वीकारणे म्हणजे नैतिकतेचा त्याग करणे नाही; तर ती स्वीकारणे म्हणजे नैतिक नम्रता स्वीकारणे आहे.
देव असो वा नसो, आपण चुका करू शकतो.
पण देव असो वा नसो, आपण त्या सुधारूही शकतो.