जागतिकीकरण आणि लैंगिकताविषयक बदल

जागतिकीकरणाच्या तीन दशकांत झालेल्या अनेक बदलांपैकी सर्वात महत्त्वाचा व मूलभूत बदल भारतीय समाजाच्या लैंगिकताविषयक धारणा आणि प्रत्यक्ष व्यवहार ह्यांत झाला आहे, हे माझ्या प्रतिपादनाचे प्रमुख सूत्र आहे. ह्या परिवर्तनामुळे लैंगिकता व लैंगिक संबंध ह्यांचे पोतच नव्हे, तर आशयदेखील बदलला आहे.

नवे पर्व, नवे प्रश्न

नव्वदचे दशक आले. खाजगीकरण-उदारीकरण-जागतिकीकरण (खाउजा) पर्व सुरु झाले आणि सर्व काही वेगाने बदलले. त्यापूर्वी शहरीकरण, आधुनिकीकरण, शिक्षणाचा प्रसार इ. घटकांमुळे खेड्यांतील व शहरांतील वातावरण हळूहळू बदलत होते. स्त्रीमुक्तीचळवळ आकार घेत होती. बलात्कार, माध्यमांतून घडणारे स्त्रीदेहाचे प्रदर्शन, असे मुद्दे सार्वजनिक चर्चेत आणण्याचा तिचा प्रयत्न सुरू झाला होता. पण ह्या नव्या पर्वातील बदल अतिशय तीव्र व वेगवान होते. ह्या काळात जीवनाची बहुतेक सूत्रे बाजारपेठेच्या हातात आली. त्यामुळे स्त्रीस्वातंत्र्याच्या चळवळी मागे पडल्या. सौंदर्यस्पर्धांचे वारे आले आणि जागतिक पातळीपासून गल्लीबोळापर्यंत त्याचे लोण पसरले. अगदी अर्धशहरी भागातही ह्या स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी तरुण मुलींना त्यांच्या मध्यमवयीन आया उत्तेजन देऊ लागल्या. स्त्रियांच्या कितीतरी पिढ्यांच्या मनात दबून राहिलेली वाफ वेगाने बाहेर पडू लागली. आता खुली लैंगिकता हा आपल्या रोजच्या जगण्याचा भाग झाला आहे. सर्वसंचारी व खाजगीपणा जपणार्‍या सोशल मीडियामुळे हे बदल समाजाच्या सर्व स्तरांत जाऊन पोहचले आहेत, स्थिरावले आहेत. शहरातील उच्चभ्रु वर्गापासून अगदी लहान गावातील माध्यमिक शाळांपर्यंत सर्वत्र बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंडच्या जोड्या जमलेल्या आपल्याला दिसतात. ग्रामीण भागातील चित्र आणखी विचित्र आहे. तिथे सोशल मीडिया आणि दीड जीबी फ्री डेटामुळे पोर्नोग्राफी प्रत्येक घरापर्यंत पोहोचली आहे. मुलगे स्वैर झाले, पण त्याचवेळी मुलींवरील बंधने सैलावलेली नाहीत. मुला-मुलींमधील तारुण्यसुलभ आकर्षण नाकारणे, आपल्या मुलीने खालच्या जातीच्या मुलाशी बोलण्याने खानदानाची इज्जत जाते अशा सरंजामशाही कल्पना जोपासणे ह्यामुळे नवे पेच निर्माण झाले आहेत. किशोरवयीन मुलग्यांचे काय करावे हे शिक्षक, पालक, समाज कोणालाच कळेनासे झाले आहे. ही मुले कोणाचेच ऐकत नाहीत. अभ्यासात त्यांचे लक्ष अजिबात नसते. मोबाईलवरील क्लिप्स पाहणे हे त्यांच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचे कार्य होऊन बसले आहे.

आमच्या परिसरात नुकतीच घडलेली दोन उदाहरणे बोलकी आहेत: एका शाळेतल्या मुलाने वर्गातील मुलीने ‘फ्रेन्डशिप’ नाकारली, म्हणून तिच्यावर बलात्कार करून तिचा खून केला. तो आता सुधारगृहात आहे. दुसर्‍या एका गावातील ज्युनियर कॉलेजात बारावीच्या परीक्षेचा फॉर्म भरायला जी विद्यार्थिनी आली, तिच्यासोबत तिचे १५ दिवसांचे मूल होते. त्याला कोठे ठेवण्याइतपतही आधार तिला मिळाला नाही. पूर्वी प्रेमभंग झाल्यावर तरुण दाढी वाढवून देवदास बनत. आता मात्र ‘डर’ चित्रपटातील ‘तू हां कर, या ना कर, तू है मेरी किरण’ हे गीत ब्रह्मवाक्य आहे, असे मानून आपली लैंगिक सुखाची मागणी झिडकारणार्‍या मुलीला धडा शिकविण्याचे व्रत त्यांनी घेतले आहे. दिल्ली-बिहार सोडाच, मुंबई-पुण्यापासून महाराष्ट्रातील सुदूर गावांपर्यंत हे लोण पसरल्याचे आपल्याला दिसते. पेट्रोल, सुरी, तलवार, अॅसिड अशा अनेक साधनांचा वापर करून आपल्या तथाकथित प्रेयसीला ‘धडा शिकविला पाहिजे’ अशी ह्या युवकांची मर्दानगी त्यांना सांगते व त्याचे ते पालनही करतात. दुसरीकडे, मुलीने ‘खालच्या जातीतील’ मुलाशी लग्न करून ख्नानदानाची इज्जत धुळीला मिळवली, म्हणून मुलगी-जावई ह्यांची कत्तल करण्याची साथही ‘सैराट’ सुटली आहे.

लैंगिकतेची ही लाट थोपवून धरणे केवळ अशक्य आहे. ऑनरकिलिंग, पॉर्नोग्राफी साईट्सवर बंदी, मुली-स्त्रिया ह्यांनी कोणते कपडे घालावे ह्याबद्दलचे फतवे अशा उपायांनी तिला वेसण घालता येणार नाही. आपल्या हातातील मोबाईलच्या माध्यमातून ती आपल्यापैकी प्रत्येकापर्यंत पोहोचण्याचा हरक्षणी प्रयत्न करीत आहे. मला ह्या माध्यमातून आठवड्यातून किमान दोनदा ‘फ्रेन्डशिप क्लब’ जॉईन करण्याची निमंत्रणे येतात. मी शहरातील ज्या रस्त्याने फिरतो, त्यात पावलोपावली पब्ज, क्लब्ज, डिस्कोथेक, हुक्का पार्लर आहेत. माझ्या शहरात ‘पुरेसे नाईट लाईफ’ नाही, त्यामुळे ते पुरेसे स्मार्ट नाही, ही माझ्या भाषेतील एका प्रमुख वृत्तपत्राला पडलेली चिंता आहे.

हे बदल केवळ महाराष्ट्रासारख्या शहरीकरण झालेल्या, आधुनिक विचारसरणीच्या राज्यात झालेले नाहीत. उत्तरप्रदेश, बिहारसारख्या हिंदी भाषिक गरीब राज्यांतदेखील कपडे, फॅशन, देहबोली, शारीरता, माध्यमे ह्यांतून हे बदल ठळक होत जाताना आपल्याला दिसत आहेत. जुने सरंजामशाही समाजमानस आणि लैंगिकतेची नवी लाट, पोट भरण्यासाठी पुरुषांचे इतर राज्यात होणारे स्थलांतर आणि स्त्रीगर्भहत्येमुळे स्त्री-पुरुष संख्येचा ढासळलेला समतोल अशा अनेक कारक घटकांच्या एकत्र येण्यातून तिथे नवे प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यांची दखल समाजशास्त्रीय अभ्यासक, माध्यमे व विचारवंत घेत नसले, तरी ‘पॉप्युलर कल्चर’मधून ते आपल्या समोर येत आहेत. एकेकाळी भोजपुरी लोकसंगीत हा भारतीय परंपरेतील मोलाचा ठेवा मानला जात असे. आता मात्र भोजपुरी गाण्यांतून उघडीनागडी लैंगिकता दुथडी भरून वाहताना आपल्याला दिसते. त्यात दूरदेशी गेलेला पती, बुभुक्षित पत्नी आणि कामातुर दीर ही थीम अगदी केंद्रस्थानी असल्याचे दिसते. अशा एका गाण्यात जेव्हा ‘दीर माझ्याशी वेळीअवेळी लगट करतो, तेव्हा तू आपली नोकरी सोडून लौकर इकडे ये’ अशी तक्रार पत्नी आपल्या पतीकडे करते, तेव्हा तो तिला ‘सध्या दीरावरच काम भागवून घे’, असा सल्ला देताना दिसतो. ह्या सगळ्याकडे केवळ धम्माल किंवा भावना उद्दीपित करण्याचे साधन असे न पाहता त्यामागील समाजशास्त्रीय वास्तव जाणून घेणे आवश्यक आहे.

कोणत्याही कारणाने का असेना, लैंगिकतेविषयीचे निषेध-निकष (taboos) बाजूला सारले गेले, ह्याचे काही चांगले परिणामही झाल्याचे आपल्याला दिसतात. निसर्गामध्ये स्त्री-पुरुष भेदांच्या पलीकडे अन्य भेदही आहेत, हे भान समाजाला ह्याच काळात आले. तृतीयपंथी व त्यातील उपभेद, तसेच समलैंगिकता ह्यांच्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन व्यापक झाला. मासिक पाळी हा उघडपणे बोलण्याचा, समजून घेण्याचा विषय झाला. लैंगिकशिक्षण हे जीवनशिक्षण आहे हे भानही काही प्रमाणात रुजले. विविध वयोगटातील स्त्री-पुरुष मैत्री ही बाब आता पूर्वीइतकी भुवया उंचावणारी राहिली नाही. विशेषतः मोठ्या शहरात मुला-मुलींचे गट मोकळेपणाने वावरताना दिसू लागले. त्यांच्यात नातेसंबंधांचे गोंधळ असले, तरी मैत्री हे मूल्य त्यांच्यात बर्‍यापैकी प्रस्थापित झाल्याचे दिसते. मुख्यधारा मानल्या जाणार्‍या माध्यमांतून आजही स्त्री-पुरुषांचे ठोकळेबाज चित्रण होताना दिसत असले, तरी नाटक-चित्रपट, साहित्य, वेब-सीरीज ह्या माध्यमांतून व्यक्त होणार्‍या नव्या पिढीने त्यात अनेक अंगांनी नवेपण आणले आहे. शारीरिकता, लैंगिकता, मानसिकता यांचे कंगोरे संवेदनशीलता आणि धीटपणाने चितारण्याचे कौशल्य ही पिढी दाखवते आहे.

वर नमूद केलेल्या अनुभव-निरीक्षणात अनेक बाबींची भर घालता येईल, पण त्यांच्यामुळे माझ्या प्रमुख प्रतिपादनाला दुजोराच मिळेल. आपल्या अनुभव-निरीक्षणाला मर्यादा असतात हे मान्य करून, ह्या बाबतीत झालेली अध्यायने, संशोधने आपल्याला काय सांगतात त्याचा आपण विचार करू या.

नववधू आणि कौमार्यपट्टा

इला त्रिवेदी ह्या अमेरिकास्थित भारतीय अभ्यासकाने लिहिलेले ‘India in Love: Marriage and Sexuality in 21st Century’ हे पुस्तक ऑक्सफर्ड युनिवर्सिटी प्रेसने अलीकडेच प्रकाशित केले आहे. ह्या पुस्तकात त्यांनी भारतीय महानगरातील लैंगिकता आणि विवाहसंस्था ह्यांत घडणार्‍या बदलांचा शोध घेतला आहे. विवाहसंस्था आणि लैंगिकता ह्यांच्याशी संबंधित शेकडो व्यक्तींच्या मुलाखतींवर आधारित ह्या पुस्तकातील महत्त्वाची निरीक्षणे व निष्कर्ष खालीलप्रमाणे आहेत:

  • स्त्री-पुरुष नात्यात गेल्या दशकात जेवढे बदल झाले तितके गेल्या ३,००० वर्षांतही झाले नाहीत.
  • आतापर्यंत बहुतेक भारतीयांचा प्राधान्यक्रम लग्न, सेक्स व त्यानंतर (मिळाले तर) प्रेम असा होता. आता प्रेम, सेक्स (किंवा उलट) आणि नंतर वाटले तर लग्न असा क्रम झाला आहे. अनेक युवक-युवतींना आयुष्यात फक्त सेक्स व प्रेम हेच महत्त्वाचे आहेत, असे वाटू लागले आहे.
  • सेक्स आणि लग्न ह्या दोन्ही बाबींतील क्रांती एकाच वेळी होऊ घातली आहे. त्यामुळे होणारे परिवर्तन हे अतिशय वेगाने आणि अनेक क्षेत्रात होते आहे. स्त्रियांची मुक्तीची आकांक्षा वाढते आहे. त्या सारी बंधने नाकारीत आहेत. लैंगिक धारणा मुळापासून बदलत आहेत. युवा पिढीचा कल ‘ठरवून लग्न करण्या’ऐवजी ‘स्वतः जोडीदार शोधण्या’कडे झुकला आहे. कुटुंब हे आता अर्थव्यवस्थेचे एकक राहिले नाही; त्याची जागा व्यक्तीने घेतली आहे.
  • आर्थिक विकास, शहरीकरण, जागतिकीकरण, विस्थापन, प्रसारक्रांती (मोबाईल क्रांती), चंगळवाद ह्या सर्व घटकांचा हा एकत्रित परिणाम आहे.
  • ही ओसरणारी लाट नाही, तर पुढे रेटणारा जबरदस्त प्रवाह आहे.
  • आज शहरे आणि महानगरे ह्यांत राहणार्‍या स्त्रिया आणि पुरुष दोघांनाही सेक्स ही क्रयवस्तू म्हणून सहज उपलब्ध आहे. कॉलेज युवती, मध्यमवयीन गृहिणी ह्यांना हे सहज कमाईचे साधन वाटत आहे.
  • मध्यमवर्ग हा ह्या परिवर्तनाचा वाहक आहे. त्यामुळे हा बदल दीर्घकाळ टिकणार आहे, कारण त्याचेच अनुकरण खालचा वर्ग करीत असतो. भारतातील मध्यमवर्ग आकाराने खूप मोठा – युरोपमधील अनेक राष्ट्रांएवढा आहे. आत्ता आत्ता त्याला आपल्या क्रयशक्तीचे आणि राजकीय ताकदीचे भान येऊ लागले आहे. त्यामुळे, आपल्याला हवे ते बदल समाजात घडवून आणण्याबद्दल तो आता आग्रही झाला आहे.
  • गेल्या दशकात प्रेमविवाहांचे प्रमाण ५% वरून ३०% वर गेले आहे. महानगरात ते ह्याहून अधिक असण्याची शक्यता आहे.
  • सेक्सची खेळणी, पुरुषवेश्या ह्या बाबी आता नवलाईच्या राहिलेल्या नाहीत.

लेखिकेच्या शब्दात ह्या पुस्तकाचे सार असे आहे – “एखाद्या लाजर्‍या परंतु उत्सुक नववधूप्रमाणे हा देश हळूहळू आपला कौमार्यपट्टा दूर सारीत आहे.”

अन्य संशोधने

गुगलने केलेल्या एका सर्वेक्षणानुसार जगात पॉर्नोग्राफी पाहण्यात भारताचा सहावा क्रमांक लागतो. भारतात सर्वेक्षण केलेल्या पुरुषांपैकी ७५% पॉर्नोग्राफी बघतात. भारतीय स्त्रिया ह्यात पुरुषांच्या तुलनेत फारशा मागे नाहीत.

भारत सरकारने मध्यंतरी हजारो पॉर्नोग्राफी साईट्सवर बंदी घातली. पण ती कागदावरच उरली. कारण वेबसाईटवरील सारा मजकूर काही तासात नव्या साईटवर टाकणे शक्य आहे. त्यामुळे अशी बंदी कधीच यशस्वी होऊ शकत नाही, असा आतापर्यंतचा इतिहास आहे.

आपली स्वतःची लैंगिक ओळख ही आतापर्यंत स्त्री किंवा पुरुष अशा द्वंद्वात्मक पद्धतीने होत होती. पण मेंदूविज्ञान, पुनरुत्पादक अंतस्रावविज्ञान इ. विषयांतील अभ्यासातून आता असे सिद्ध झाले आहे की असले ठोकळेबाज वर्गीकरण आता कालबाह्य झाले आहे. आपल्या सर्वांच्या शरीर-मनात स्त्रीत्व आणि पुरुषत्व ह्या दोन्ही प्रकारचे गुणधर्म आहेत. त्यांचे परस्परप्रमाण कमी जास्त होते, त्यानुसार आपण एखाद्या व्यक्तीला स्त्री किंवा पुरुष म्हणून संबोधतो. पण हे प्रमाणही बदलत असते. म्हणजे आपण काही प्रसंगात स्त्रीसुलभ भूमिका घेतो, तर कधी ती पुरुषत्व अधोरेखित करणारी असते. आपली लैंगिक ओळख ही आता स्त्रीत्व आणि पुरुषत्व ह्या दोन बिंदूंमधील गतिमान पटासारखी आहे, किंवा एखाद्या गोधडी (mosaic)प्रमाणे आहे, असे विज्ञान आपल्याला सांगते.

आपली इच्छा असो वा नसो, खा-उ-जाने आणलेल्या लैंगिकतेच्या ह्या तुफानाने भारतीय समाजजीवनात अतिशय महत्त्वाचे बदल घडविले आहेत व अनेक बदल भविष्यातही घडणार आहेत, हे वास्तव आहे. प्रश्न हा आहे की आपण ह्यांकडे कसे पाहणार?

दृष्टिकोन

ह्या बदलांकडे पाहण्याचे प्रामुख्याने तीन दृष्टिकोन आहेत:

  1. पारंपरिक नैतिक: आमची भारतीय संस्कृती थोर आहे, जिच्यात ह्या ‘थेरां’ना जागा नाही. ही सर्व पाश्चात्य संस्कृतीने आणलेली विकृती आहे. आमच्या संस्कृतीने अशी अनेक वादळे पचविली आहेत, असे मानणारी एक विचारधारा आहे. मुळात ती स्त्री-पुरुष विषमता आणि वर्णवर्चस्व ह्यांवर आधारित आहे. आज तिचे पाठीराखे मोठ्या संख्येने दिसत असले, तरी मुळात ती काळाच्या उलट दिशेने जाणारी विचारधारा असल्याने बदलत्या काळाने निर्माण केलेल्या कोणत्याही प्रश्नांची उत्तरे तिच्याकडे नाहीत. स्त्रीच्या लैंगिकतेवर बंधने घालून तिला नियंत्रित करण्याचे ह्यापूर्वीचे प्रयत्न, उदा.: सती, विधवाविवाहबंदी, कौमार्यचाचणी इ. यशस्वी झाले नाहीत आणि २१व्या शतकात आत्मभान आलेल्या स्त्रीला बंदिस्त करणे, सार्वजनिक स्थळी दिसणार्‍या जोडप्यांना मारहाण करणे आणि ‘मर्यादाभंग करणाऱ्यां’ना जातपंचायतीने शिक्षा ठोठावणे ह्या मार्गाने हे प्रश्न सुटणार नाहीत, हे निश्चित!
  2. यांत्रिक ननैतिक: हा तथाकथित आधुनिकतावादी विचार आहे. त्याच्या मते ह्या प्रश्नावर नैतिकतेची भूमिका घेणारे आपण कोण? काळाच्या ओघात होणारे बदल स्वीकारणे एवढेच आपल्या हातात असते व ते आपण केले पाहिजे. जगात घडणार्‍या तंत्रज्ञानीय-राजकीय-अर्थशास्त्रीय बदलांतून खा-उ-जा घडले. त्याला पर्याय नाही व ते बदल परत फिरविता येणार नाहीत. त्यांच्यानुसार स्वतःला बदलून घेणे हाच एकमेव पर्याय आपल्यापुढे आहे. ह्या दृष्टिकोनामागे एक (अराजकीय म्हणविला जाणारा) राजकीय विचार आहे; पण त्याला मूल्यविवेकाची बैठक नाही. जे येईल ते कसलीही चिकित्सा न करता स्वीकारणे असा हा ‘नव-नियतीवादी’ विचार २१व्या शतकाच्या आव्हानांना सामोरे जाताना पुरेसा आहे, असे वाटत नाही.
  3. विवेकवादी न-नैतिक: हा विचारही स्त्री-पुरुष संबंधांच्या बाबतीत किंवा कोणाही व्यक्तीच्या आचार-विचाराच्या संदर्भात न्यायाधीशाची भूमिका घेत नाही. एखादी गोष्ट नैतिक आहे की नाही ही संबंधित व्यक्तींनी ठरविण्याची बाब आहे, असे तो मानतो. पण लैंगिकता आणि समाज ह्याचे नाते काय असावे, ह्याबद्दल त्याची विशिष्ट भूमिका आहे. स्त्री-पुरुष (व अन्य) ह्यांच्या नात्याबद्दल काय चूक, काय बरोबर अशी निवड करता येते, करायला हवी, असे तो मानतो. मात्र केवळ परंपरा किंवा नवता ह्या आधारावर ही निवड न करता समानता, परस्परांचा आदर, वैविध्याचा स्वीकार, शोषण, दडपण व ब्लॅकमेलिंग ह्यांना नकार, कोणाही व्यक्तीचे किंवा नात्याचे बाजारीकरण करण्यास नकार ह्या निकषांवर ती करावी असे हा विचार मानतो. थोडक्यात त्यामागे मूल्यविवेकाची बैठक आहे. परंपरेतून येणार्‍या सती, देवदासी, स्त्री-पुरुष भेदभाव व नैतिकतेचे दुहेरी मापदंड ह्या गोष्टीना तो नकार देतो, त्याचप्रमाणे खा-उ-जाने मानवी नात्याचे बाजारीकरण केले ह्याचीही त्याला चीड आहे. खा-उ-जा ही आकाशातून पडलेली गोष्ट नाही, तर अनियंत्रित भांडवलशाहीने आपल्या स्वार्थासाठी, जगभरातील नैसर्गिक साधनांचे दोहन करत यावे, ह्यासाठी उभारलेली ही व्यवस्था आहे, साम्राज्यशाहीचा हा नवा अवतार आहे, ह्याचे भान त्याला आहे. सौंदर्यस्पर्धा असोत की पॉर्नोग्राफीचे जगभर विणलेले जाले, त्यामागे नफ्याची गणिते आहेत, स्त्री आणि पुरुष हे केवळ देह आहेत व अमर्याद उपभोग हेच त्यांचे अंतिम श्रेयस व प्रेयस आहे, ह्या तत्वज्ञानातून ह्या व्यवस्थेचा जन्म झाला आहे, असे हा विचार मानतो. म्हणूनच जुन्या आणि नव्या सर्वच शोषकव्यवस्थांमध्ये गुदमरणारे स्त्री-पुरुष व अन्य ह्यांचे नाते नव्या शतकात तरी मुक्त व निरामय व्हावे ही त्याची आकांक्षा आहे.

एकविसाव्या शतकातील स्त्री-पुरुष संबंध कसे असायला हवेत, हे सांगण्यासाठी विसाव्या शतकातील प्रसिद्ध कवी चित्रकार इमरोझ ह्यांची ही रचना पुरेशी आहे; ते म्हणतात –

पुरुष
स्त्रीसोबत
झोपतो,
जागत
का नाही?

शारीरिकतेच्या पलीकडे जाणारे, स्त्री-पुरुष ह्यांच्यातील वेगळेपण ओळखून त्यांच्यातील समता आणि पारस्परिकता जपणारे मैत्रीचे नाते त्यांच्यात उमलावे, अनेक शतकांच्या निद्रेतून दोघांनीही जागावे, ह्याहून वेगळे आपणही काय मागणार?

(हा लेख अधिक विस्तारित स्वरुपात ‘शब्द रुची’ मासिकाच्या एप्रिल २०१९ मध्ये प्रकाशित झाला होता. )
ईमेल: ravindrarp@gmail.com

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.