प्रा. (श्रीमती) मनू गंगाधर नातू – विवेकवादाची साधना 

३ एप्रिल ९० रोजी श्रीमती मनुताईंच्या मृत्यूला दोन वर्षे होतील. त्यांच्या वाट्याला जे सुमारे ६९ वर्षांचे आयुष्य आले ती एक विवेकवादाची प्रदीर्घ आणि खडतर साधना होती. खडतर अशासाठी म्हणावयाचे की, त्यांच्या जागी दुसरी एखादी स्त्री असती तर तिने विवेकवाद म्हणा किंवा बुद्धिप्रामाण्यवाद म्हणा या विचारसरणीची कास कधीच सोडली असती. एखाद्या चिकट आजारामुळे किंवा अपत्यसुखासारख्या सामान्य कौटुंबिक सुखाला वंचित झाल्यामुळे पुष्कळ उच्चविद्याविभूषित मंडळी मंत्र-तंत्र, व्रतवैकल्य अशा मार्गांकडे वळतात असे आपल्याला दिसते. लग्नाआधीचा ध्येयवाद लग्नानंतर जड ओझ्यासारखा दूर फेकला जातो. आपणही त्यांना दोष देत नाही. ज्याची त्याची कुवत आणि निष्ठा यांचा तो प्रश्न असतो. बाईंची विवेकवादाची साधना खडतर होती हे जे म्हटले ते या अर्थाने. 

मनुताईच्या वागण्याबोलण्यावरून त्यांच्या जीवनात लौकिक अर्थाने काही दुःखे असतील याची शंकासुद्धा कोणाला न यावी इतक्या त्या आनंदाच्या डोही सदैव बुडालेल्या असत. कॉलेजमध्ये जिथे त्यांची बैठक असे तिथे, त्यांच्याभोवती पाचदहा प्राध्यापकांचे कोंडाळे पडलेले असायचे. एका मागून एक हर्ष-विनोदाचे स्फोट व्हायचे आणि काव्यशास्त्र चर्चेचे खळखळाट बाहेर पडत असायचे. राजकारणावर कडाक्याचे वाद चालायचे. बाईंची स्वतःची कुठली तरी बाजू असायचीच. नेहमीच्या हिरिरीने त्या प्रतिपक्षावर तुटून पडायच्या. निवडणुका असतील तर जयपराजयाचे अंदाज बांधले जायचे. नुसतेच अंदाज बांधून त्या कुठल्या थांबायला? त्या पैजा लावायच्या. हरल्या तर पार्ट्या द्यायच्या. जणू स्वतः विजयी झाल्या इतक्या उत्साहाने! विदर्भ महाविद्यालय या अमरावतीच्या ख्यातनाम कॉलेजात त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे हे दर्शन प्रस्तुत निवेदकाला ज्या काळात घडले तो १९६७ ते १९७२ हा पाच वर्षांचा काळ होता. १९६७ च्या सार्वत्रिक निवडणुका नुकत्याच झालेल्या होत्या. इंदिरा गांधींना हवे तेवढे बहुमत मिळाले नव्हते. किचन कॅबिनेटची भाषा सुरू झाली होती. जनसामान्यांची कैवारी अशी त्यांची प्रतिमा पुढे येत होती. बाईंच्या नेत्या अर्थातच इंदिरा गांधी. पुढे गिरींची राष्ट्रपतिपदाची निवडणूक आली. इंडिकेट-सिंडिकेट वादात बाईंचा पक्ष इंडिकेट असणार हे उघड होते. एकाहत्तरचे भारत-पाकिस्तान युद्ध आले. या आणि अशा राजकीय घडामोडी घडत होत्या. त्यात बाई कमालीचा रस घेत. त्यावेळी इंदिरा गांधी स्त्रीशक्तीचे नवे कीर्तिमान स्थापीत होत्या. देशात येऊ घातलेल्या सामाजिक, आर्थिक क्रांतीच्या त्या जणू अग्रदूत बनू पाहत होत्या. मनुताईंना हे सगळे हवे हवे असलेले होते. बाईंचा उत्साह ओसंडून वाहात असायचा.

त्याच सुमारास बाईंच्या लिखाणालाही बहर आला होता. साहित्य हा तर त्यांच्या व्यासंगाचा विषय होता. त्यावेळी सत्यकथा, आलोचना, अस्मितादर्श, नवभारत अशा नियतकालिकांमधून त्यांचे लेख प्रसिद्ध होत. त्यांच्या चर्चा चालत. महिने-महिने बाई त्या धुंदीत असत. एखाद्या लेखाच्या तयारीसाठी त्या फार वेळ घेत. सगळे संदर्भ धुंडाळत. श्रीपाद कृष्णांच्या जन्मशताब्दीसाठी त्यांना भाषण करायचे होते. त्याआधी त्यांनी श्रीपाद कृष्णांची सगळी नाटके, विनोदी लेख पुन्हा वाचून काढले. नागपूरला विदर्भ साहित्य संघात गडकरीपुण्यतिथीनिमित्त डॉ. वि. भि. कोलत्यांनी त्यांना मुद्दाम पाचारण केले होते. तेव्हाही तसेच. संपूर्ण गडकरी पुन्हा वाचून काढल्यावरच त्या बोलल्या. वर सांगितलेल्या काळातच कै. मामा क्षीरसागरांची आचार्यकुलाची चळवळ सुरू झाली. 

तिच्यात तरुण प्राध्यापकांनी भाग घ्यावा, पुढे व्हावे म्हणून त्यांची घालमेल चाले. माधानच्या ताराबेन मश्रूवालांची आश्रमशाळा, तेथील अनाथ बालके यांकडे त्यांचे बारीक लक्ष असे. नेहमीची अबोल मदत सुरू असे. बाबा आमटे ऑपरेशनकरिता परदेशी गेले होते. मोठे खर्चाचे काम होते. आर्थिक साहाय्यासाठी बहुधा वर्तमानपत्रात आवाहन आले होते. अशा कामी बाईंचा नंबर पहिला असायचा. बाबा आढावांची ‘एक गाव, एक पाणवठा’ चळवळ, समता प्रतिष्ठान, पुरोगामी सत्यशोधक हे सगळे बाईंचे जिव्हाळ्याचे विषय. त्या चळवळींना त्यांची आर्थिक मदत कुठलाही गाजावाजा न करता, व्रत म्हणून चालू असायची. 

तेव्हा विदर्भ महाविद्यालय हे वाढते कॉलेज होते. पाउणे दोनशेच्यावर प्राध्यापक-संख्या गेली होती. नवी मंडळी येत राहायची. कोणी बदलून, कोणी नेमणूक होऊन, नव्या मंडळींचे गुण हेरून त्यांना पुढे आणण्यात त्यांचा हातखंडा होता. ते अवाढव्य सरकारी कॉलेज, प्राचार्य त्रिखंडी प्रवासनिवास करून आलेले. फर्ड्या वेगवान इंग्रजीशिवाय दुसरी भाषा त्यांच्या तोंडून निघायची नाही. नव्याने आलेल्या प्राध्यापकांना ते फार दूर, खूप उंच असे काहीसे वाटत. त्यांच्याजवळ जायची हिंमत नसे. चेंबरमध्ये बोलावणे आले तर घाम फुटायचा. पण अचानक तुमच्याशी ते बोलतात, प्रेमाने बोलतात, तुमची चौकशी करतात; आणि तुमची त्यांना माहितीही असते याचा गोड अनुभव यायचा एखाद्याला. नव्यांना धक्का बसायचा. आश्चर्य वाटायचे; त्यांना आपण कसे माहीत? हे नातूबाईंचे काम असावे याचा तुम्हाला पत्ता असायचे कारण नव्हते. 

हे सगळे चाललेले पाहाणाऱ्याला काय कल्पना येणार की, या नातूबाई नावाच्या व्यक्तीने आपल्या खाजगी जीवनात किती दुःखांवर मात केली आहे? जीवनातला आनंद परोपरीने इतरांच्या वाट्याला यावा यासाठी धडपडणारी व्यक्ती स्वतः मात्र साध्या आरोग्याच्या सुखाला पारखी असावी हे फार लोकांना ठाऊक नव्हते. 

नातूबाई १९४६ साली मराठीच्या प्राध्यापिका म्हणून अमरावतीला आल्या. त्यावेळी विदर्भ महाविद्यालयाला किंग एडवर्ड कॉलेज हे नाव होते. आदल्या वर्षी एम.ए.च्या परीक्षेत त्यांनी सुवर्णपदक मिळविले होते. पहिल्या वर्गात पहिल्या येऊन त्या काळी नागपूर विद्यापीठात हा पराक्रम लहान नव्हता. आणि बाईंच्या बाबतीत तर नव्हताच नव्हता. त्यांचे वाचनाच्या बाबतीत परावलंबन होते. दृष्टी इतकी अधू की पाचदहा मिनिटांचे वर वाचले तर डोळे दुख लागत. एम.ए.चे त्यांचे सगळे वाचन दुसऱ्यांकडून करून घेतलेले. त्यांची मोठी बहीण श्रीमती ताई वैद्य, त्यांचे भाचे, भाच्या यांनी आणि स्वतः मामा क्षीरसागरांनी त्यांना वाचून दाखवावे. वाचनात इतके परावलंबन, पण स्मरणशक्ती जणू ध्वनिमुद्रिका, बुद्धि एकपाठी. 

जुन्या सी. पी. अॅण्ड बेरार प्रांतात अमरावतीचे किंग एडवर्ड कॉलेज हे फार मोठे नाव होते. तिथे १९४६ साली मराठीच्या प्राध्यापिका म्हणून नेमणूक मिळाल्यापासून १९७७ च्या अखेरपर्यंत बाईंनी ते कॉलेज आणि अमरावती हे शहर सोडले नाही. त्या काळी नागपूरच्या मॉरिस कॉलेजात कुसुमावतीबाई देशपांडे सोडल्या तर स्त्रीप्राध्यापिका जवळजवळ नव्हत्याच. अमरावतीच्या त्या पहिल्या स्त्री प्राध्यापिका. बी.ए., बी.एससी. ची पोरे नवखा प्राध्यापक आला की वर्ग डोक्यावर घेत. त्यातून एक तरुणी शिकवणार! पण नातूबाईंनी हे आव्हान सहज पेलले. अल्पावधीत पेलले. कारण सोपे होते. प्रेमाचे वारे भरलेले होते. आपल्या विद्यार्थ्यांवर प्रेम, विषयावर प्रेम, शिकवण्यावर तर अतोनात प्रेम. त्या दिवसांत नातूबाई हे नाव उच्चशिक्षणासाठी अमरावतीला आलेल्या विदर्भातल्या मुलामुलींच्या गावोगावी, घराघरात पोचले होते. कुतूहलाचा विषय झाले होते. त्यांची धिटाई, त्यांचे वक्तृत्व, त्यांचे नवमतवादी विचार. सारेच अप्रूप होते. 

नातूबाई नवमतवादी होत्या. स्त्रीपुरुष-समानता हे या वादाचे पहिले घोषवाक्य. स्त्रीशिक्षण, स्त्रीस्वातंत्र्य यांच्या त्या कैवारी होत्या. लग्न हे स्त्रीजीवनाचे सर्वस्व हे अर्थातच त्यांना मान्य नव्हते. शिकवण्याच्या विषयाच्या अनुषंगाने त्या हे आपले विचार मोठ्या आवेशाने मांडत. ‘ध्येय हाच देव’ ही वामन मल्हारांची शिकवण त्यांनी आत्मसात केलेली. आगरकर हे तर त्यांचे दैवत. पती हाच परमेश्वर ह्या मताच्या त्या कट्टर शत्रू. मुळात परमेश्वर हीच एक कविकल्पना. पती हा सोबती, सखा, सहचर एवढे जरी मानले, उभयपक्षांनी मानले तर जीवन किती सुखी होईल? आता ही मते म्हटली तर पाखंडी आहेत. आगरकरांना तेवढी झळ बसली, पुढे सगळे सोपे झाले असे नाही. आपल्या मतांबद्दल पडेल ती किंमत द्यायला त्या तयार असत. वामन मल्हार, आगरकर यांची सुधारणा समाजातल्या विशिष्ट गटापुरतीच सीमित होती अशी एक टीका असते. वास्तविक ती खोटी आहे. पण बाईंवर सुदैवाने हा आक्षेप आला नाही. कारण त्यांना जोतिबा तितकेच प्रिय होते. विठ्ठल रामजी शिंद्यांचे विचार तितकेच पसंत होते. कर्वे काय किंवा लोकहितवादी काय, जे जे रंजल्या-गांजल्यांचा कैवार घेत ते ते सगळे बाईंना अतिशय प्रिय होते. आपला अध्यापकी पेशा हे या महात्म्यांचे कार्य पुढे चालवण्याचे एक साधन म्हणूनच त्यांनी त्याच्याकडे पाहिले. 

बाईंना वाणीची देणगी मोठी होती. त्यांचे वर्ग म्हणजे विद्यार्थ्यांना दिव्य आनंदाची पर्वणी असे. शिकवणे हा त्यांच्यासाठीही मोठा आनंदानुभव असायचा. पुढे एम.ए.चे वर्ग अमरावतीला निघाल्यावर तर आपल्या दुखण्यांवर दुसऱ्या कोणत्याही औषधांपेक्षा शिकवणे हेच जास्त गुणकारी आहे असे त्यांचे मत होते. आजारातून उठल्यावर केव्हा एकदा कॉलेजात जाऊन विद्यार्थ्यांना भेटतो असे त्यांना व्हायचे. शेकडोच नव्हे तर सहस्रावधी विद्यार्थ्यांना बाईंचे शिकवणे जीवनाच्या प्रवासात तहानलाडू-भूकलाडू झालेले आहे. 

कर्तृत्ववान प्राध्यापक पुष्कळ असतात. मोठा झालेला प्राध्यापक कधी कवी असतो, नाटककार, लेखक-साहित्यिक असतो. कधी पुढारी, नेता होतो. अशा सगळ्यांच्या बाबतीत बाईंचा निकष एकच. तो शिक्षक कसा आहे? कामचुकार? तयारी नीट न करता वेळ मारून नेणारा? आपल्या विषयातल्या अद्यावत विकासाबद्दल आस्था नसलेला? मग त्याची काय मातब्बरी? शिक्षकी बाण्याची आपली ही मूल्ये त्यांनी आयुष्यभर जपली होती. जबर किंमत मोजून संपादन केली होती. आपल्या कार्याशी प्रतारणा करणाऱ्याला तुम्ही मोठा कसा म्हणता? असा त्यांचा रोखठोक प्रश्न असायचा. 

गुणग्राहकतेच्या बाबतीत तर त्यांचा कोणी हात धरू शकत नसे. सहकारी, कर्तबगार वरिष्ठ, विद्यार्थी यांच्यातले गुण त्यांना चटकन दिसत. दुसऱ्याचा कणभर चांगुलपणा त्या मणभर करून सांगत. तेव्हा ऐकणाऱ्याला गोड वाटे. पण नुसतेच ‘गुण गाईन आवडी’ एवढेच त्यांचे ब्रीद नव्हते. त्या जरा जादाच आदर्शवादी असाव्यात. अवगुणाचे त्यांना तेवढेच वावडे. आपला शिक्षकी बाणा त्या घडीभर विसरायला तयार नसत. भीड मुर्वत न ठेवता बोलत. निःस्पृहाला सारे जग तृणवत असते म्हणतात. तसा त्यांचा बाणा होता. त्याचा त्यांना त्रासही खूप झाला. पण स्वभाव तो स्वभाव. करण्यापेक्षा बोलणे लोकांच्या जास्त लक्षात राहते अशी खाजगीत तक्रार करीत. तुम्ही मुलाबाळांना शिस्तीसाठीही कठोर बोलू नका. केलेले सगळे वाया जाईल असा उपदेश तरुण मंडळींना करीत. पण स्वतः त्यांना ते जमले नाही. काही विद्यार्थी, काही मित्र, काही स्वकीय दुखावले, दूर गेले. 

बाईंनी विद्येची उपासना अक्षरशः क्षणशः केली. वाचनाच्या कामी परावलंबन होते. त्यामुळे मिळाला तो क्षण आपला असे करून त्यांनी ज्ञानसंचय केला. वेळोवेळी आपल्या अभ्यासाचे फलित असे संशोधनपर निबंध लिहिले. त्यांची पहिला लेखसंग्रह ‘विवेकाची गोठी’ १९७७ मध्ये निघाला. दुसरा १९७८ मध्ये ‘वेदनेचा वेध’ या नावाने.  

‘विवेकाच्या गोठी’त साहजिकच विवेकवादाचा आद्य प्रणेता हा पहिला लेख आगरकरांवर आहे. १९५७ मधे आगरकर जन्मशताब्दीनिमित्त नवभारतात लिहिलेला. त्यात, ‘आगरकरांना अभिप्रेत असलेल्या सुधारणा इतक्या व्यापक होत्या की त्या शतांशानेसुद्धा प्रत्यक्षात आलेल्या दिसत नाहीत’ असा खेद व्यक्त करून, ‘त्यांचे तत्त्वज्ञान फार चिरस्थायी अशा पायावर आधारलेले असल्यामुळे ते इतिहासजमा होण्याची भीती नाही.’ असा ठाम विश्वास त्या व्यक्त करतात. याच लेखात आगरकरांचे ‘संपूर्ण वाङ्मय आज उपलब्ध नाही’ याची खंत त्यांनी बोलून दाखविली होती. पण तेवढे करून त्या तिथेच थांबल्या नाहीत. पुढे मोठ्या हिमतीने आणि योजनापूर्वक त्यांनी हे काम अंगावर घेतले. आपले समानधर्मा पती प्रा. दि. य. देशपांडे यांच्या सहकार्याने तडीस नेले. १९८३ ते ८६ या वर्षांत आगरकर वाङ्मयाचे तीन मोठे खंड महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळाच्या साहाय्याने प्रसिद्ध केले. पहिल्या आणि तिसऱ्या खंडाला प्रदीर्घ विवेचक प्रस्तावना लिहिल्या. 

हे सगळे काम किती मोठे आहे हे समजायला त्यांची आणखी एक देहपीडा सांगणे भाग आहे. त्यांना वाचायला जसा वाचक लागे तसा लिहायला लेखनिक. विविध व्याधींचा परिणाम म्हणून बोटांत शक्ती राहिली नव्हती. साधे पत्र लिहिण्यासाठीही त्या परावलंबी होत्या. आपल्या लिखाणाला त्यांनी आपले पती प्रा. देशपांड्यांना राबविले असेल असे कोणाला वाटण्याचा संभव आहे. म्हणून हे सांगितले पाहिजे, की तसे काही नव्हते. प्रा. देशपांड्यांच्या योग्यतेची त्यांना जेवढी कल्पना होती तेवढी बहुधा कोणाला नसेल. स्वतः प्रा. देशपांडे बाईंच्या आदर्शाच्या तसबिरीत बसणारे होते. त्यांचा स्वतःचा तत्त्वज्ञानाचा व्यासंग फार मोठा होता. लिखाण होते. एका अखिल भारतीय दर्जाच्या इंग्रजी तत्त्वज्ञान संशोधन पत्रिकेचे ते संस्थापक संपादक होते. त्यामुळे त्यांच्याकडून लिहवून घेणे हे बाईंच्या हिशेबात बसणारे नव्हते. देशपांड्यांचे पांडित्य, त्यांची तत्त्वज्ञानाची वार्षिक अधिवेशने, त्यांचे त्रैमासिक या सगळ्यांचे बाईंना फार कौतुक वाटे. 

परस्परांना इतके समजून घेतलेले, एकमेकांशी इतके समरस झालेले दुसरे दाम्पत्य सहसा आढळणार नाही. आपल्या प्रकृतीच्या चढउतारापायी देशपांड्यांना फार वेळ द्यावा लागतो याची त्यांना हळहळ वाटे. आपली दुखणी नसती तर देशपांड्यांना अधिक कीर्ती आणि परदेशी मानमान्यता मिळवणे सहज शक्य होते असे त्या म्हणत. उलट आपण जे काही केले किंवा करतो त्यापेक्षा जास्त आपल्या हातून घडले नसते याची देशपांड्यांना खात्री होती. आपण कुठे मागे पडलो असू तर त्याचे धनी आपणच – बाईंकडे त्याचा दोष दूरान्वयानेही जात नाही – या देशपांड्यांच्या भूमिकेमुळे विकल्पाला कुठे जागा नव्हती. बाईंचे सहजीवन इतके कृतार्थ होते! 

पण दुसऱ्या एका बाबतीत देशपांड्यांनी आपला पराभव केला अशी गोड तक्रार त्या अधूनमधून करीत. आगरकर – वा. म. जोशी यांच्या ध्येयवादाने भारलेली एक तरुणी फुले, कर्वे यांच्यासारखे प्रत्यक्ष समाजकार्य आपल्या प्रकृतीच्या दुर्बलतेमुळे का असेना – करू  शकत नाही तर नाही, पण जन्मभर अविवाहित राहून त्यांना अभिप्रेत असलेल्या विवेकवादाचे कार्य, त्याचा प्रसार हे तर काया, वाचा, मनाने एकनिष्ठपणे करू शकते ना? ते कार्य करायचे ठरवलेले आपण! एक दिवस प्रा. देशपांडे भेटतात काय आणि आपण आपले व्रत विसरतो काय! हा आपला पराभव सांगताना त्या हरखून जात. एकदम भूतकाळात जाऊन बसत. ते १९५० साल होते. प्रा. दि. य. देशपांडे अमरावतीला बदलून आले होते. विद्वान म्हणून लौकिक घेऊनच आले होते. ईश्वरविषयक सत्य (Truth about God), स्त्री, कुटुम्ब आणि समाजवाद (Women, Family and Socialism), प्रत्येक मनुष्यासाठी नीतिशास्त्र (Ethics for Everyman) ही पुस्तके त्यांनी तेव्हा लिहिलेली होती. विदर्भ महाविद्यालयाच्या परिसरातच राहत. एक दिवस, ही पुस्तके बाईंच्या पाहण्यात यावीत म्हणून ती त्यांना देण्याकरिता, बाईंची रिक्षा त्यांच्या घरावरून जाण्याच्या विशिष्ट वेळी, वाटेवर हातात पुस्तके घेऊन ते कसे उभे राहिले हा किस्सा त्या मोठ्या रंगवून सांगत. पुढे त्या पुस्तकातल्या विचारांनी आपण कसे भारले गेलो आणि एक्कावन्न साली आपला कसा प्रतिज्ञाभंग झाला हे त्यांच्या तोंडून ऐकताना मोठी मजा वाटायची. आपली ही कहाणी सांगून होत नाही तोच घाईघाईने त्या म्हणत, “पण का हो, देशपांड्यांच्या मदतीशिवाय, मी जे काही केले इतके करू शकले असते का मी?” 

बाईंचा विश्वास अनाठायी नव्हता. त्यांच्या कार्यात देशपांड्यांचा वाटाच होता. आडकाठी नव्हती. बाईंच्या मातृतुल्य मोठ्या भगिनी श्रीमती ताई वैद्य तर म्हणायच्या की, देशपांडे नसते तर बाईंना एवढे दीर्घायुष्य लाभते. जीवनात जे थोडेबहुत सुख लाभले तेही त्यांना न मिळते. बाईंचे ३ एप्रिल १९८८ रोजी निधन झाले. ह्यानंतर त्या दुःखातून स्वतःला सावरून बाईंना प्रिय असलेले विवेकवादाच्या प्रसाराचे काम देशपांड्यांनी ‘नवा सुधारका’च्या रूपाने सुरू केले आहे. ही मासिकपत्रिका चालवणे म्हणजे केवढे मोठे आह्वान आहे याची वयाच्या ७३ व्या वर्षी देशपांड्यांना कल्पना नसावी असे म्हणणे कठीण आहे. परंतु निश्चितार्थापासून विराम न पावणे हे ब्रीद असणाऱ्यांना त्याचे काय? 

आणखी एक सांगितले पाहिजे. ‘नवा सुधारक’ काढण्याचे हे साहस देशपांड्यांनी बाईंच्या शिलकीच्या बळावर केलेले नाही. मरणसमयी बाईंची जी शिल्लक होती तिचा त्यांच्या इच्छेप्रमाणे न्यास करण्यात आला आहे. त्यापैकी काही रकमेच्या व्याजातून विदर्भ महाविद्यालय अमरावती येथून आणि नागपूर विद्यापीठातून मराठीत एम.ए. ला पहिले येणाऱ्या विद्यार्थ्याला दोन पारितोषिके दरवर्षी दिली जातील. उरलेली रक्कम माधानच्या ताराबेन मश्रूवालांच्या आश्रमशाळेतील अनाथ बाल-बालिकांसाठी आणि बाबा आढाव यांच्या समता प्रतिष्ठानसाठी दिली जावयाची आहे. बक्षिसांपैकी एक त्यांचे मातुलसदृश कै. मामा क्षीरसागर यांच्या नावे आणि दुसरे मामांचेच सहकारी त्यागी देशसेवक श्री. बाबा रेडीकर यांच्या नावाने दिले जाईल. वर सांगितलेला न्यास बाईंचे वडील डॉ. गंगाधर जनार्दन नातू यांच्या नावे केला आहे. बाईंना वडिलांचे फार प्रेम. लग्नानंतर मुलीने नाव बदलायची गरज नाही हा समतावादी दृष्टिकोण बाईंनी स्वतःच्या बाबतीत पाळला हे जसे खरे तसेच त्यांना वडिलांचे नाव फार प्रिय होते हेही खरे. त्या ते यथायोग्य प्रसंगी पूर्ण लिहून आपला आदर व्यक्त करीत. ‘नवा सुधारक’ हे प्रा. देशपांड्यांनी सर्वार्थाने स्वतःच्या बळावर उभे केलेले बाईंचे स्मारक कोणत्याही पत्नीला हेवा वाटावा असे आहे.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.