बर्ट्रांड रसेल (१८७२ ते १९७०) हे विसाव्या शतकातील सर्वश्रेष्ठ तत्त्वज्ञ होते असे सामान्यपणे मानले जाते. तत्त्वज्ञानाखेरीज सामाजिक, राजकीय, आर्थिक, धार्मिक, शैक्षणिक इत्यादि विषयांवरही त्यांनी विपुल लेखन केले. त्यांचे लिखाण नेहमीच अतिशय मूलगामी, सडेतोड, निर्भय आणि विचारप्रवर्तक असे. त्यांचा Marriage and Morals (१९२९) हा ग्रंथ अतिशय प्रसिद्ध असून तो अत्यंत प्रभावीही ठरला आहे. त्यात रसेल यांनी आपल्या प्रचलित वैवाहिक नीतीची मूलग्राही चर्चा केली असून विवेकवादी वैवाहिक नीती काय असावी याचे दिग्दर्शन केले आहे. प्राध्यापक म. गं. नातूंनी या ग्रंथाचा अनुवाद करावयास घेतला होता. आणि काही प्रकरणांचा अनुवाद पुराही केला होता. अनुवाद ‘नव्या सुधारका’त आम्ही क्रमशः प्रसिद्ध करणार आहोत.
उपोद्धात कोणत्याही समाजाचे वर्णन करताना, मग तो समाज प्राचीन असो की अर्वाचीन असो, त्याचे दोन घटक अतिमहत्त्वाचे मानावे लागतात. त्यापैकी एक आहे अर्थव्यवस्था आणि दुसरा आहे कुटुंबव्यवस्था.
सध्याच्या घटकेला दोन विचारसंप्रदाय विशेष, प्रभावी आहेत. त्यापैकी एक सर्व गोष्टीचे मूळ अर्थकारणात असते असे म्हणतो, तर दुसरा ते मूळ कुटुंब किंवा कामव्यवहार यात असते असे म्हणतो. पहिला संप्रदाय मार्क्सच्या अनुयायांचा, तर दुसरा फ्रॉइडच्या. मी स्वतः यांपैकी एकाचाही अनुयायी नाही, कारण अर्थ आणि काम यांपैकी कोणताही एक घटक दुसऱ्याहून कारणिक सामर्थ्यात वरचढ आहे असे मला दिसत नाही. उदा. औद्योगिक क्रांतीचा लैंगिक नीतीवर खोल प्रभाव पडला आहे आणि पुढेही पडत राहणार आहे यात शंका नाही; पण उलट प्यूरिटनांची लैंगिक नीती औद्योगिक क्रांतीला मानसशास्त्रीयदृष्ट्या अंशतः कारणीभूत झाली आहे. मी स्वतः आर्थिक किंवा लैंगिक घटकाला प्राधान्य द्यायला तयार नाही, आणि खरे म्हणजे त्या दोघांचे परिणाम परस्परांपासून स्पष्टपणे विभक्तही करता येत नाहीत. अर्थकारणाचा संबंध मूलतः अन्नप्राप्तीशी आहे; पण मानवप्राण्यांत अन्न केवळ स्वतःच्याच उपयोगासाठी क्वचितच मिळविले जाते; ते सबंध कुटुंबाकरिता हवे असते, आणि कुटुंबव्यवस्था जशी बदलते तसे आर्थिक हेतूही बदलतात. जर मुले त्यांच्या आईबापांपासून शासनाने काढून घेतली, आणि त्यांचे संगोपन प्लेटो ‘Republic’ मध्ये म्हणतो तसे केले, तर केवळ जीवनविमाच नव्हे, तर सर्व प्रकारची खाजगी बचत जवळपास संपुष्टात येईल; म्हणजे जर शासनाने पित्याची भूमिका स्वीकारली, तर त्या एकाच गोष्टीमुळे शासन हा एकमेव भांडवलदार होईल. कट्टर कम्युनिस्ट या मताचा व्यत्यास (converse) प्रतिपादतात : जर शासन हे एकमेव भांडवलदार झाले तर कुटुंबसंस्था आपल्याला माहीत आहे त्या स्वरूपात टिकू शकणार नाही असे ते म्हणतात. आणि जरी हे म्हणणे कोणाला अतिरेकी वाटले तरी खाजगी मत्ता आणि कुटुंबसंस्था यांच्यातील गाढ संबंध नाकारणे अशक्य आहे. हा संबंध अन्योन्य आहे, आणि त्यामुळे त्यापैकी अमुक कारण आहे आणि अमुक कार्य आहे असे आपण म्हणू शकत नाही.
कोणत्याही समाजाच्या लैंगिक नीतीत अनेक स्तर असतात हे आपल्या लक्षात येईल. पहिला स्तर कायद्यात मूर्त झालेल्या संस्थांचा; उदा. काही देशांत प्रचलित असलेले एकपत्नीत्व, आणि अन्य देशांतील बहुपत्नीत्व. दुसरा स्तर म्हणजे जेथे कायद्याचे बंधन नसते, पण लोकमत प्रभावी असते. शेवटचा स्तर म्हणजे वैयक्तिक आवडीवर सोपविलेला तत्त्वतः नसला तरी निदान व्यवहारात तसा असलेला, जगातील एकही देश असा नाही, आणि जगाच्या इतिहासात असे युग नाही की ज्यात लैंगिक नीती आणि लैंगिक संस्था ह्यांची उभारणी विवेकी (rational) विचारांनी केली गेली असेल. याला अपवाद सोव्हिएट रशियाचा आहे. माझ्या म्हणण्याचा अभिप्राय असा नाही की या बाबतीत सोव्हिएट रशियातील संस्था निर्दोष आहेत; माझे म्हणणे एवढेच आहे की सर्व काळातील आणि अन्य सर्व देशांतील संस्था जशा अतिश्रद्धा (superstition) आणि परंपरा यातून निदान अंशतः निर्माण झालेल्या असतात, तशा त्या नाहीत. सार्वजनिक सौख्य आणि कुशल यांच्या दृष्टीने कोणती लैंगिक नीती उत्तम होईल हे ठरविणे हा अतिशय गुंतागुंतीचा प्रश्न आहे, आणि त्याचे उत्तर अनेक घटकांवर अवलंबून आहे. औद्योगिकदृष्ट्या प्रगत समाजात ती नीती जशी असेल, त्याहून सापेक्षतः आदिम कृषिप्रधान समाजात ती भिन्न असेल. जिथे प्लेग आणि अन्य साथीचे रोग यांनी लोकसंख्येचा बराच मोठा अंश प्रौढ होण्याच्या आतच मृत्युमुखी पडतो तिथल्यापेक्षा, जिथे वैद्यक-विज्ञान आणि आरोग्यशास्त्र यांना मृत्येचे प्रमाण घटविण्यात यश आले आहे तिथे ती भिन्न असेल. नव्हे, आपले ज्ञान आणखी वाढेल तेव्हा कदाचित आपल्याला असे म्हणता येईल की आदर्श लैंगिक नीती हवामानानुसारही भिन्न असेल, आणि तसेच ती आहाराच्या प्रकारानुसारही भिन्न होईल.
लैंगिक नीतीचे परिणाम अतिशय विविध प्रकारचे आहेत – वैयक्तिक, दांपत्यिक (conjugal), कौटुंबिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय. हे परिणाम यांपैकी काही बाबतींत चांगले, पण इतर बाबतींत वाईट आहेत असे असू शकेल. एखाद्या व्यवस्थेविषयी आपण एकंदरीने कोणते मत बनवायचे हे ठरविण्याआधी सर्वच बाबींचा विचार करावा लागेल. आपण शुद्ध वैयक्तिक परिणामापासून आरंभ करू या. या परिणामांचा अभ्यास मनोविश्लेषणशास्त्रात केला जातो. एखादी नीतिसंहिता मनावर ठसविली गेल्यामुळे निर्माण झालेल्या प्रौढांच्या वर्तनाचा जसा विचार करावा लागेल, तसाच एखाद्या संहितेने पालन करायला लावण्याच्या बाल्यावस्थेतील शिक्षणाचाही करावा लागेल. बाल्यावस्थेत स्थिरपद झालेले निषेध (taboos) अतिशय चमत्कारिक असू शकतात, आणि त्यांचा आविष्कार अप्रत्यक्ष असू शकतो. याच्या पुढच्या अवस्थेत आपण स्त्री आणि पुरुष यांचे संबंध विचारात घेऊन लैंगिक संबंधापैकी काही इतरांपेक्षा अधिक मूल्यवान असतात हे स्पष्ट आहे. ज्या लैंगिक संबंधांत मानस अंश बराच मोठा असतो ते केवळ शारीर संबंधाहून अधिक चांगले असतात याबद्दल बहुतेक लोकांचे एकमत होईल. खरे म्हणजे नागरित (civilized) स्त्रीपुरुषांच्या मानसदृष्टीत कवींच्या प्रभावाने प्रचलित झालेले मत असे आहे की प्रेमीजनांची व्यक्तिमत्त्वे त्या संबंधात जितकी अधिक सहभागी होतील, तितके त्यांचे मूल्य वाढते. तसेच कवींनी अनेक लोकांना हेही शिकविले आहे की प्रेमाचे मूल्य त्याच्या तीव्रतेवर अवलंबून असते; परंतु हा थोडा अधिक विवाद्य मुद्दा आहे. प्रेम हा समानांमधील संबंध असला पाहिजे याबाबतीत सर्व आधुनिकांचे एकमत असेल असे वाटते, आणि निदान या कारणास्तव बहुपत्नीकत्व ही व्यवस्था आदर्श असू शकत नाही. या क्षेत्रात वैवाहिक आणि विवाहबाह्य संबंध या दोहोंचाही विचार करणे आवश्यक आहे; कारण भिन्न विवाहसंस्थांत विवाहबाह्यसंबंधाचे प्रमाण भिन्न असणार.
यानंतर आपण कुटुंबाकडे येऊ. भिन्न काळी आणि भिन्न स्थळी विविध प्रकारची कुटुंबे होऊन गेली; परंतु पितृसत्ताक कुटुंबाला त्यात मोठे आधिक्य राहिले आहे. आणि त्यातही एकपत्नीक पितृसत्ताक कुटुंब बहुपत्नीक कुटुंबाहून अधिकाधिक प्रबल होत गेले आहे. ज्या प्रकारची लैंगिक नीती ख्रिस्तपूर्व काळापासून नागरणात (civilization) चालत आलेली आहे, तिचा मूलभूत हेतू म्हणजे पत्नीची एकनिष्ठा निश्चितपणे प्राप्त करणे हा होता; कारण पितृत्व अनिश्चित असल्यामुळे पत्नीच्या एकनिष्ठेवाचून पितृसत्ताक कुटुंब टिकणे अशक्य होते. याच्या जोडीला पुरुषाच्या एकनिष्ठेवर ख्रिस्ती धर्माने जो भर दिला त्याचे मूळ तापसवादात होते. अलीकडे मात्र या हेतूला पत्नीच्या मत्सराने बळकटी आली आहे, कारण स्त्रियांच्या मुक्तीमुळे तो हेतु अधिक प्रभावी झाला आहे. मात्र हा घटक अल्पजीवी राहील असे दिसते, कारण जर अनुभव प्रमाण मानला, तर आपण आतापर्यंत सोसलेले निर्बंध पुरुषांवरही घातले जावेत, यापेक्षा ज्या अवस्थेत स्त्री आणि पुरुष या दोघांनाही सारखीच मोकळीक असेल ती व्यवस्था स्त्रिया एकंदरीत अधिक पसंत करतील असे दिसते.
एकपत्नीक कुटुंबात देखील अनेक प्रकार आहेत. विवाह वधूवरे स्वतःच जुळवितात किंवा त्यांचे आईबाप ते जुळवितात. काही देशांत वधू विकत घेतली जाते; अन्य काही देशांत, उदा. फ्रान्समध्ये, वर विकत घेतला जातो. घटस्फोटाच्या बाबतीतही सर्व प्रकारचे भेद आहेत. एका टोकाला घटस्फोट अजिबात नाकारणारा रोमन कॅथलिक प्रकार, आणि दुसऱ्या टोकाला जुन्या चीनमधील बायको बडबडी आहे एवढ्या कारणास्तव काडीमोड देऊ देणारा कायदा. लैंगिक संबंधात एकनिष्ठा, किंवा बहुंश एकनिष्ठा ही जशी मानवप्राण्यात आढळते तशीच ती, जिथे जातिरक्षणाकरिता अपत्यसंगोपनात पुरुषाची गरज आहे अशा प्राण्यांतही आढळते. उदा. पक्ष्यांना आपल्या अंड्यांवर त्यांना ऊब देण्याकरिता सतत बसावे लागते, आणि त्याचबरोबर दिवसातील कित्येक तास अन्न मिळविण्याकरिता बाहेरही धडपडावे लागते. ही दोन्ही कामे एकाच पक्ष्याने करणे अशक्य असते, आणि म्हणून नराचे सहकार्य आवश्यक असते. याचा परिणाम असा होतो की बहुतेक पक्षी लैंगिक सदाचाराचे पुतळे असतात. मानवाच्या बाबतीत पित्याचे सहकार्य हा अपत्यांच्या दृष्टीने मोठा जीवशास्त्रीय फायदा आहे. अस्थिर काळात आणि भोवतालची जनता नाठाळ असते तेव्हा हा फायदा विशेषच महत्त्वाचा असतो. परंतु आधुनिक नागरणाच्या (civilization) वाढीमुळे शासनसंस्था पित्याची भूमिका आपल्याकडे अधिकाधिक घेत आहे, आणि लवकरच पिता, निदान मोलमजुरी करणाऱ्या वर्गात, जीवशास्त्रीय दृष्ट्या लाभकर राहणार नाही. जर असे झाले तर पारंपरिक नीतिव्यवस्थेचा संपूर्ण बीमोड होईल; कारण मग आपल्या मुलाचे पितृत्व संशयातीत असण्याची गरज कोणत्याही मातेला वाटेनाशी होईल. प्लेटो तर म्हणेल की आपण आणखी एक पाऊल पुढे जावे, आणि शासनसंस्थेची योजना केवळ पित्याच्याच नव्हे, तर मातेच्याही स्थानी करावी. मी स्वतः शासनसंस्थेचा फारसा प्रशंसक नाही, की अनाथाश्रमातील सुखांनी पुरेसा प्रभावितही नाही; त्यामुळे मी वरील योजनेला सोत्साह संमती देऊ शकत नाही, परंतु आर्थिक कारणांमुळे हा मार्ग काही प्रमाणात अवलंबिला जाणे अशक्य नाही हेही खरेच आहे.
कायद्याचा संबंध लैंगिक बाबींशी दोन भिन्न प्रकारांनी येतो. एक म्हणजे समाजाने स्वीकारलेल्या लैंगिक नीतिव्यवस्थेची अंमलबजावणी करण्याकरिता, आणि दुसरा म्हणजे लैंगिक क्षेत्रात व्यक्तीच्या सामान्य हक्कांचे रक्षण करण्याकरिता. या दुसऱ्या प्रकारात दोन प्रमुख विभाग आहेत : स्त्रिया आणि बालके यांचे आक्रमणापासून आणि शोषणापासून रक्षण, आणि गुप्त रोगांचा प्रतिबंध. मात्र या दोन्ही विभागांत त्यांच्या वास्तविक गुणदोषांनुसार मूल्यन होत नाही, आणि दोन्हीतही शक्य असेल तितक्या प्रमाणात बंदोबस्त होत नाही. यांपैकी पहिल्या विभागासंबंधी असे आढळते की गोऱ्या गुलामांच्या व्यापाराविरुद्ध केल्या जाणाऱ्या क्षुब्ध मोहिमांमुळे असे कायदे पास केले जातात, की ज्यांच्या बंधनांतून धंदेवाईक अपराधी सुटून जातात, आणि निरपराध लोकांना लुबाडण्याच्या संधी उपलब्ध होतात. दुसऱ्या विभागासंबंधी बोलायचे तर गुप्त रोग ही पापांची न्याय्य शिक्षा होय ह्या मतामुळे शुद्ध वैद्यकीय दृष्टीने जे सर्वांत प्रभावी उपाय असतील त्यांची योजना करण्यात अडथळे उत्पन्न होतात, आणि गुप्तरोग ही लाजिरवाणी गोष्ट आहे ह्या सामान्य समजुतीमुळे ते लपविले जातात, आणि त्यामुळे त्यांच्यावर ताबडतोब आणि पुरेसे उपाय केले जात नाहीत.
त्यानंतर आपण लोकसंख्येकडे गेलो, ही स्वतःच एक विराट समस्या आहे, आणि तिचा विचार अनेक दृष्टिकोणातून करायला हवा. त्यात मातांचे आणि बालकांचे स्वास्थ्य, तसेच बालकांच्या संगोपनावर मोठ्या आणि छोट्या कुटुंबाचे होणारे मानसशास्त्रीय परिणाम यांविषयीच्या प्रश्नांचा अंतर्भाव होतो. जिला आपण या प्रश्नाची स्वास्थ्यविषयक बाजू म्हणू शकतो ती होय. त्यानंतर या समस्येची सार्वजनिक आणि वैयक्तिक अशी आर्थिक अंगे : कुटुंबाचे दरडोई उत्पन्न आणि त्याचा कुटुंबाच्या आकारमानाशी, तसेच समाजातील जन्मप्रमाणाशी संबंध याच्याशी गाढ संबंध असलेला, लोकसंख्येच्या प्रश्नाचा आंतरराष्ट्रीय राजकारण आणि जागतिक शांतता यांच्यावर पडणारा प्रभावही लक्षात घ्यायला हवा. शेवटी येतो सुप्रजाशास्त्रीय प्रश्न, समाजातील विविध गटांतील जन्म आणि मृत्यू यांच्या भिन्न प्रमाणांमुळे मानववंशाची उन्नती होते आहे की ऱ्हास हा प्रश्न. कोणत्याही लैंगिक नीतीचे समर्थन किंवा तिला द्यायचे दूषण या गोष्टी मजबूत आधाराने करण्याकरिता तिचा या सर्व बाजूंनी विचार करावा लागेल. सुधारक आणि परंपरावादी दोघांनाही या समस्येची एखादीच, किंवा फार तर दोन बाजू विचारात घेण्याची सवय असते. विशेषतः व्यक्तिगत आणि राजकीय दृष्टिकोणांचा मेळ क्वचितच पाहावयास सापडतो, आणि तरी या दोघांपैकी कोणता दुसऱ्याहून अधिक महत्त्वाचा आहे हे सांगणे अशक्य आहे. जी व्यवस्था वैयक्तिकदृष्ट्या हितकर आहे ती राजकीयदृष्ट्याही हितकर असेल, आणि जी राजकीयदृष्ट्या हितकर असेल ती वैयक्तिकदृष्ट्यासुद्धा हितकर असेल अशी कसलीही खात्री आपण बाळगू शकत नाही. माझी स्वत:ची समजूत अशी आहे की बहुतेक कालखंडांत आणि बहुतेक देशांत गूढ मानसशास्त्रीय शक्तींच्या प्रभावामुळे जिच्यात अनावश्यक क्रूरता आहे अशा व्यवस्था मानव स्वीकारतो, आणि ही गोष्ट आजही नागरित मानवसमाजात कायम आहे. तसेच मला असेही वाटते ही वैद्यक-विज्ञान आणि आरोग्यशास्त्र यांतील प्रगतीमुळे लैंगिक नीतीत बदल करणे, हे वैयक्तिक तसेच सार्वजनिक दोन्ही दृष्टींनी इष्ट झाले आहे. मी वर सुचविल्याप्रमाणे शासनसंस्थेच्या शिक्षणातील पुढाकारामुळे पित्याचे संपूर्ण ऐतिहासिक काळात असलेले महत्त्व कमी झाले आहे. म्हणून प्रचलित नीतिसंहितेवर टीका करताना आपल्याला द्विविध काम करावे लागेल : एका बाजूला आपल्याला अतिश्रद्धेचा (Superstition) प्रभाव (हा पुष्कळदा उपसंज्ञेतून (Subconscions) कार्य करतो.) दूर करावा लागेल, आणि दुसऱ्या बाजूला ज्या नवीन घटकांमुळे भूतकाळातील शहाणपणे वर्तमानाचे शहाणपण न राहता मूर्खपणा झाले आहे, ते घटक आपल्याला हिशेबात घ्यावे लागतील.
प्रचलित व्यवस्थेचे सम्यक दर्शन आपल्याला घडावे म्हणून मी प्रथम अशा काही व्यवस्थांचे निरूपण करणार आहे की ज्या भूतकाळात होऊन गेल्या, किंवा ज्या अल्पनागरित समाजात आजही आहेत, नंतर मी सध्या पाश्चात्य नागरणात प्रचलित असलेल्या व्यवस्थेचे वर्णन करणार आहे, आणि शेवटी ही व्यवस्था कोणत्या बाबतीत बदलणे इष्ट होईल, आणि हे बदल घडून येतील अशी आशा करण्यास काय आधार आहेत यांचा विचार करीन.
अनुवादक: म. गं. नातू