खरा सुधारक कोण? प्रा. य. दि. फडके ह्यांच्या भाषणाचा सारांश

सुधारक कोणाला म्हणावे हा एक मूलभूत मुद्दा आहे. शंभर वर्षापूर्वीच्या ज्या अनेक प्रश्नांना आजही उत्तर दिले गेलेले नाही त्यापैकी हा एक प्रश्न आहे. १८९३ साली प्रार्थनासमाजात दिलेल्या एका व्याख्यानात न्या.मू. रानड्यांनी “सुधारक कोण?” असा प्रश्न उपस्थित केला होता. लोकांना राजकारणात भाग घेण्याची हौस असते. अशा वाचाळवीरांची सामाजिक सुधारणेच्या वेळी मात्र दातखीळ बसते. राजकारणाच्या वेळी आणलेला ताव पार नाहीसा होतो. त्या काळी केला जाणारा एक सवाल सुधारणाविरोधी आजही करतात. “सगळ्या सुधारणा हिंदू समाजालाच तेवढ्या का?” असा प्रश्न लोक विचारीत. त्यावेळी जे पाच जणांना जमवू शकत नसत असे वक्ते हा प्रश्न करीत. आज पाच पाच लाख लोक जमवू शकणारे वक्तेही हाच प्रश्न विचारीत असतात. “आम्हा हिंदूंच्या सुधारणांसाठी तुम्ही इतके का कासावीस झाला आहात?” असा प्रश्न तेव्हा विचारीत आणि वेगळ्या शब्दांत आजही तो विचारला जात आहे.

राजकारणी माणूस आणि सुधारक यांच्यात एक फरक आहे. उक्ती आणि कृतीतले दोष राजकारणी माणसाला माफ असतात. लोकांची त्यांच्याबद्दलची बुद्धी जास्त सोशीक असते. सामाजिक सुधारकामधला हा दोष खपवून घेतला जात नाही. १८९६ साली रानड्यांनी ‘सुधारणा म्हणजे पुनरुज्जीवन नव्हे,’ (Reform, not revival) या व्याख्यानात सुधारकांबद्दल एक महत्त्वाचा मुद्दा स्पष्ट केला आहे. सुधारणांचा पुरस्कार करणारा प्रत्येकच जण सुधारक असतो असे समजू नये. सुधारणांच्या मागची तात्त्विक भूमिका महत्त्वाची असते. रानड्यांच्या काळी आर्यसमाजी मंडळी सुधारणावादीच होती. त्यांच्या मते वेदकाळ हे सुवर्णयुग होते. भारतीय संस्कृती वेदकाळी उच्च शिखरावर होती. पुढे अवनती आली. परंतु आपल्याला पुन्हा तिथे जायचे आहे. आर्यसमाजींना सतीची चाल मान्य नव्हती, कारण सती जावे असे वेद म्हणत नाहीत. त्यांना स्त्रीशिक्षण मान्य होते, कारण ते वेदसंमत होते. पुनर्विवाह देखील वेदविरोधी नसल्यामुळे त्यांना चालत होता. अस्पृश्यतेलाही त्यांचा विरोध होता, कारण ती वेदोक्त नव्हती. याप्रमाणे अनेक सुधारणांचा पुरस्कार ते करीत. परंतु ही काही खरी सुधारणा नव्हती. सुधारणेच्या हेतूने केलेली सुधारणा ही नव्हती. वेदकालीन आदर्शजीवनाचे पुनरुज्जीवन ह्यांना करायचे होते. एरवी यज्ञयाग, होम-हवन या निष्फल कर्मकांडाचे समर्थन त्यांनी का केले असते? या कालबाह्य गोष्टींचे त्यांनी जे उदात्तीकरण केले ते कशाला केले असते? ज्यांच्यात कुठलाही कार्यकारणसंबंध नाही हे सिद्ध झालेले आहे त्या गोष्टी केवळ ग्रंथोक्त म्हणून करीत बसणे यात कसली आली आहे सुधारणा? रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंद, ॲनी बेझंट हेही असेच धर्मसुधारक होते. सुधारणेच्या मागची त्यांची भूमिका भिन्न होती. वाईट रूढींनी हिंदुसमाज दुबळा होतो आहे. तो सामर्थ्यशाली बनवायचा आहे. म्हणून अस्पृश्यता आणि त्या प्रकारच्या अन्य वाईट चाली नष्ट करा, असे त्यांचे प्रतिपादन होते. श्री. म. माटे, अनंत हरी गद्रे, स्वातंत्र्यवीर सावरकर यांनीही अस्पृश्यतानिवारणाचे कार्य केले. अस्पृश्यता हिंदुधर्मावरील कलंक आहे. तो धुवून काढावा या मताचे हे लोक होते. सावरकरांनी तर श्री. कीर या सधन गृहस्थांच्या मदतीने पतितपावन मंदिर बांधून घेतले आणि ते सर्व जातीच्या हिंदूंसाठी खुले ठेवले. आंबेडकरांनी या उपक्रमात सामील व्हावे अशी त्यांची इच्छा होती, पण आंबेडकरांना ते नको होते. त्यांचे मागणे होते आम्हाला नासिकच्या काळाराम मंदिरात प्रवेश द्या. काशीच्या विश्वेश्वराच्या मंदिरात, पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात आम्हाला प्रवेश द्या. शतकानुशतके हिंदूंना पवित्र वाटणारी जी मंदिरे आमच्यासाठी आजपर्यंत बंद आहेत ती खुली करा अशी त्यांची मागणी होती. सावरकरांना आगरकरांचे वारस मानले जाते. काही अंशी हे खरे आहे. काही अंशी नाही. सर्व सुधारणांचा उगम धर्मचिकित्सेत असतो हे त्यांना मान्य होते. हिंदुधर्मानुसार गाय ही माता आहे. त्यावर सावरकर म्हणतात, गाय माता कोणाचीच नसते. असलीच तर ती बैलांची माता असते. गाय हा उपयुक्त पशु आहे. या विचारांमधून दिसणारे सावरकर आगरकरांचे वारस म्हणता येतील. पण गायी वाचवण्याच्या वृथा हट्टापायी हिंदू लढाया हरले. हे होऊ नये म्हणून गायी मरू द्यायला हरकत नव्हती असे म्हणणे म्हणजे आगरकरांच्या वारसासारखे बोलणे नाही. इकडे केतकरांनी युरोपीय पत्नी केली तर आनंद वाटणे आणि तिकडे खान-पाणंदीकर विवाहाने खिन्न होणे हा फक्त कट्टर धर्माभिमान आहे.

विठ्ठल रामजी शिंदे हे धर्मसुधारक होते. त्यांची धर्म ही संज्ञा फार व्यापक होती. धर्म मुळात चांगलाच असतो, पण कालांतराने त्यात दुष्ट रूढी शिरतात त्या काढून टाकल्या पाहिजेत असे त्यांचे मत होते. परंतु आगरकर म्हणतात तसे, विवेक पूर्ण जागृत झाला नव्हता तोपर्यंत श्रद्धेने अंमल चालविला यात वावगे झाले नाही; पण येथून पुढे विश्वास आणि विवेक यांच्यात अधिकारान्तर झाले पाहिजे. विश्वासाधिष्ठित कल्पना आणि आचार यांना विवेकाची आच देऊन झाळून घेतले पाहिजे. प्रा. देशपांड्यांनी आगरकरांचा हा मार्मिक विचार ‘नवा सुधारका’च्या पहिल्या पानावर देऊन आपले संपादकीय धोरण सूचित केले आहे. प्रा. देशपांड्यांनी अतिशय प्रतिकूल सामाजिक स्थितीत हा उपक्रम हाती घेतला आहे. विवेकवाद्याचे काम कठीण असते. त्यांचा एक मोठा गट नास्तिक असतो, किमान अज्ञेयवादी असतो. श्रद्धावाद्यांचे काम सोपे असते. त्यांना प्रत्येक गोष्टीत ईश्वर कारण दिसतो. विवेकवाद्याला प्रत्येक प्रश्नाला उत्तर शोधावे लागते आणि हे जिकीरीचे असते. कारण ते सापडेलच असे नाही. उत्तरे शोधताना लोक ठेचाळतात. पण प्रयत्न करायला काय हरकत आहे? गेली १००-१५० वर्षे महाराष्ट्रातल्या प्रबोधनाची अशी बिकट वाटचाल आहे.
अलीकडे आंबेडकरांच्या ‘रिडल्स इन हिंदुइझम’ ह्या लेखांवरून अनेक वाद झाले. त्यातून एक विचार पुढे येत आहे. तो फार घातक आहे. तो म्हणजे, ‘आमच्या धर्मातील दोषांवर आम्हीच काय ती टीका करू. इतर धर्मीयांना तो अधिकार नाही’ हा. बरे, हिंदूच हे म्हणतात असे नाही. मुसलमानही तेच म्हणतात. शिवसेनापती बाळासाहेब ठाकरेही तेच म्हणतात, परंतु त्यांचे वडील प्रबोधनकार ठाकरे या मताचे नव्हते. त्यांनी सर्वच धर्मग्रंथांच्या भाकडकथांवर टीका केली होती. प्रबोधनकार म्हणत, ‘जो वाचत नाही तो वाचणार नाही.’ बाळासाहेबांना त्याची आठवण नसावी. त्यांचा खाक्या असा दिसतो की, ‘जो वाचेल तो वाचणार नाही.’ माझी ही कोटी कोणातरी वार्ताहराने बाळासाहेबांना सांगितली. त्यावर ते म्हणाले, “पण माझ्या वडिलांना हिंदुधर्मावर टीका करण्याचा अधिकार होता, कारण त्यांनी आपला धर्म सोडला नव्हता.” असा हा विचार आहे.

हिंदुधर्माबद्दल अभिमान बाळगणाऱ्या एखाद्या शिक्षिताचे वाचन किती असावे याचा एक किस्सा सांगण्यासारखा आहे. गेल्या पिढीपर्यंत हिंदुधर्माची पुस्तके प्रकाशित करणारा एक विख्यात छापखाना म्हणजे निर्णयसागर. मला, ‘हा निर्णयसागर कोण हो?’ असा प्रश्न विचारणारे शिक्षित धर्माभिमानी भेटतात, आणि त्यांना मला, ‘तो रामानंद सागरचा कोणी नाही’ हे आवर्जून सांगावे लागते.

अशा प्रतिकूल परिस्थितीत प्रा. देशपांड्यांनी हा उपक्रम हाती घेतला आहे. त्यांना साथ देण्याचे सामर्थ्य तुम्हाला लाभो ही शुभेच्छा.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.