“बाई”

सुमारे ३० वर्षापूर्वी मी नातूबाईंना प्रथम पाहिले. “वाचक पाहिजे” अशी जाहिरात त्यांनी दिली होती. मला शिक्षण घेता घेता करण्याजोगे काही काम हवे होते. त्यांच्या खोलीत मी प्रवेश केला तेव्हा खोलीत काळोख होता. पडदे सरकवलेले होते. पंखा मंद सुरू होता आणि हाताशी असलेल्या आटोपशीर स्टुलावर डोके खाली केलेला टेबललॅम्प जळत होता. बाई पलंगावर किंचित रेलून, विसावून पहुडलेल्या होत्या. अंगावर शुभ्र सुती साडी, कपाळावर अगदी बिंदुले काळे कुंकू, लख्ख गोरा वर्ण, काळेभोर केस. त्यांनी पुस्तक पुढे केले तेव्हा दिसलेला मृदू गुलाबी तळवा आणि नाजुक त्वचा. अंगावर एकही अलंकार नाही. चेहरा प्रसन्न, टवटवीत. याच रूपात पुढे मी त्यांना रोज पाहिले. वाचक म्हणून मी त्यांच्या खोलीत शिरले, पण नंतर लवकरच आमचे नाते बदलले. प्रगाढ आत्मीय झाले. पुढे पाचेक वर्षांनी एम.ए. होऊन नोकरीच्या आणि आयुष्याच्या साध्या सरळ रेषेच्या शोधात वणवणले, तेव्हा या नात्यातील स्नेहाने आणि मायेने मनाला एवढा पीळ घातलेला होता की बाईंपुढे माझे सर्व प्रकारचे अपयश घेऊन जायला मी धजले नाही. घरापासून दूर कुठेतरी एका कोपऱ्यात अनामपणे जगत असताना केवळ आतड्याच्या ओढीने माझा पत्ता शोधून मला हाक मारणारे एक दोन ओळींचे साधे कार्ड आले. अक्षर कुणातरी ‘लेखकू’चे होते. पण खाली सही होती – म. गं. नातू.

बाई कटाक्षाने अशी सही करीत. म. गं. नातू. त्यामुळे हा कुणीतरी पुरुष असावा असा अनोळखी वाचकांचा ग्रह होई. बाईंनी त्याची पर्वा केली नाही. किंबहुना त्यांनी आग्रहाने आणि हेतुपुरस्सर ‘स्त्रीविशिष्टत्व’ नाकारलेच होते. वस्त्रालंकारांपासून स्वयंपाकपाण्यापर्यंत स्त्रियांची समजली जाणारी आवडनिवड किंवा मतेच नव्हेत तर स्त्रियांकडे पाहण्याचा समाजाचा आणि पुरुषाचा दृष्टिकोण त्यांनी नाकारला. त्यांनी विवाह केला, पण मंगळसूत्र घातले नाही, माहेरचे नाव बदलले नाही. स्वतंत्र, बुद्धिमान, मिळवत्या स्त्रीचे व्यक्तिमत्त्व ही आजच्या काळात देखील हक्काने, जाणीवपूर्वक भांडून झगडून मिळवावी लागणारी गोष्ट सुमारे ५० वर्षापूर्वी बाईंनी मोठ्या दिमाखाने मिरवली. हे त्यांनी ‘फैशन’ म्हणून केले नाही. किंबहुना कोणतीच गोष्ट त्यांनी फॅशन म्हणून केली नाही. त्यांच्या आचरणामागे विशिष्ट वैचारिक भूमिका होती, तत्त्वनिष्ठा होती व त्या भूमिकेचे प्रतिबिंब सहज त्यांच्या व्यक्तिमत्वात उतरले होते. त्यामुळे ‘नातूबाई’ या नावालाही एक वलय होते. त्यांचे बोलणे-वागणे, सहकारी प्राध्यापकांबरोबर बरोबरीच्या नात्याने चर्चा, वादविवाद आणि हास्यविनोद करणे, त्यांचा डी. वाय. देशपांड्यांशी झालेला प्रेमविवाह आणि त्या दोघांचे सहजीवन या साऱ्या गोष्टी सर्वापेक्षा वेगळ्या आणि विलक्षण वाटत. आज कदाचित त्या तशा वाटणार नाहीत. पण त्या काळात अमरावतीसारख्या लहान शहरात आजच्या मुक्त स्त्रीच्या व्याख्येत बसणारी ही स्त्री सहजपणे वावरत होती. “फैमिनिझम’ हा शब्द चलनात नसूनही बाई आचारविचाराने फेमिनिस्ट होत्या.

नातूबाईच्या या व्यक्तिमत्वाचा ठसा सहजी न पुसणारा आहे. जवळजवळ तीन तपे त्या विदर्भ महाविद्यालयात शिकवत होत्या. शेकडो विद्यार्थ्यांच्या मनांत त्यांचे शिकवणे अजून ताजे असेल. टिळक-आगरकरांचे निबंध असोत, ज्ञानेश्वरी असो, आज्ञापत्र असो किंवा साहित्यशास्त्र, विषयांशी समरस होऊन शिकवताना त्या विद्यार्थ्यांना विषयाच्या गाभ्यापर्यन्त घेऊन जात जात त्यांच्या आकलनाची कक्षा चौफेर वाढवीत असत. त्यांना वाणीची देणगी होती. अस्खलित, रसाळ आणि उत्कट असे त्यांचे वक्तृत्व अनेकांच्या स्मरणात असेल. त्यांच्यात एक प्रकारचे मनस्वीपणे होते. त्यामुळे स्वतःच्या मतांचा दृढ आग्रह त्या धरीत. कित्येकदा त्या एखाद्याच्या बोलण्याचा वा वर्तनाचा वेगळा अर्थ घेत आणि तो त्यांच्या मनातून काढून टाकणे कठीण असे. रसिकता, वैचारिकता, गांभीर्य, बालसुलभ उत्साह अशा वरवर विरोधी वाटणाच्या गोष्टी त्यांच्यात एकवटल्या होत्या. मी पाहिली ती पंधरा वर्षे आणि त्याही आधी त्या अनेक प्रकारच्या दुखण्यांनी जखडलेल्या होत्या. व्याधींनी त्रस्त झाल्या की त्या थकून जात, कोमेजत; पण पुन्हा काही दिवसांनी त्या आनंदी आणि टवटवीत दिसत. वाचायला, लिहायला, चालायला त्यांना मदत लागे. जड पुस्तक हातात पेलवत नसे. पण या गोष्टींनी त्यांच्यातील जीवनोत्साह आणि उल्हसितता कधी मंदावली नाही. त्यांच्यात ज्ञानलालसा होती. वाचकांकडून पुस्तकेच्या पुस्तके त्या वाचवून घेत. एकाग्रपणे ऐकत. ते सारे त्यांच्या तल्लख स्मरणशक्तीत मुरत जाई. विषयाच्या अनुषंगाने वर्गात शिकवताना त्या उतारेच्या उतारे तोंडपाठे म्हणून दाखवत. त्यांच्या अध्ययन-अध्यापनाला विचारांची धार असे आणि मांडणीत तर्कशुद्धता व सुसूत्रता असे. हेच त्यांच्या लेखनाचेही विशेष आहेत.

बाईंनी अतिशय मोजके पण महत्त्वाचे लेखन केले. माझ्या आठवणीतला त्यांचा पहिला लेख म्हणजे ‘सुधारक चुकले काय?’ हा १९६१ साली ‘नवभारता’च्या दोन अंकांत प्रसिद्ध झालेला प्रदीर्घ लेख. पण त्यापूर्वीही आगरकरांवरचा त्यांचा प्रदीर्घ लेख ‘नवभारता’तच प्रसिद्ध झालेला होता. नंतर ‘वामन मल्हार जोशी यांच्या स्त्रीजीवनविषयक चिंतनातील माघार’ हा प्रदीर्घ व अभ्यासपूर्ण लेख त्यांनी लिहिला तो माझ्या डोळ्यांदेखतच. हा लेख म्हणजे मराठीतले ‘स्त्रीवादी समीक्षे’चे (फेमिनिस्ट क्रिटिसिझमचे) पहिले आणि एकमेव महत्त्वाचे उदाहरण आहे असे माझे मत आहे. त्यानंतर आठ-नऊ वर्षांच्या दीर्घ कालखंडात त्यांनी फारसे लेखन केले नाही. त्यांच्या आजारपणातील गुंतागुंती वाढल्यामुळे असेल, सभोवती या ना त्या भूमिकांमध्ये वावरणाऱ्या माणसांच्या व्यवहारातील गुंत्यामुळे मन व्यग्र झाले असल्यामुळे असेल किंवा ‘करिअरिस्टां’प्रमाणे छोट्या छोट्या लेखांच्या गुंजा जमवून लेखक म्हणून ख्यातनाम होण्याच्या हौसेपेक्षा प्रथम स्वतःलाही वैचारिक आनंद देणारा व भरपूर ऐवज असलेला बृहल्लेख लिहिण्याकडे त्यांचा कल असल्यामुळे असेल, १९५७ ते ७६ अशा सुमारे वीस वर्षांच्या काळात बाईंनी फक्त सात लेख लिहिले. प्रत्यक्षात या सात लेखांचे सुमारे १५० पृष्ठांचे भरीव पुस्तक तयार झाले, ‘विवेकाची गोठी.’ हे नागपूरच्या अमेय प्रकाशनाने प्रसिद्ध केले. या पुस्तकात नातूबाईंच्या विचारांमागची बुद्धिप्रामाण्याची बैठक, विरोधकांवर हल्ला चढवून त्यांची टीका खोडून काढताना त्यांच्या भाषेला येणारी धार, तर्कशुद्ध प्रतिपादन आणि स्वतंत्र विचार करण्याचे सामर्थ्य यांचा प्रत्यय येतो.
यानंतर, पुढची दहा वर्षे बाईंनी आपली सर्व ताकद वाचन, चिंतन व लेखन याकडे एकवटली. पहिल्या पुस्तकाच्या पाठोपाठ, निवृत्तीच्या आधीच त्यांचे खानोलकरांच्या कादंबऱ्यांतील स्त्रीजीवनचित्रण केंद्रस्थानी ठेवून लिहिलेले ‘वेदनेचा वेध’ हे पुस्तक मुंबईच्या अभिनव प्रकाशनाने प्रसिद्ध केले.

बाईंच्या या कालखंडातील लेखनाचा जवळून अभ्यास केला व त्यामागचे सूत्र लक्षात घेतले की बाईंच्या हातून नानांच्या सहकार्याने जे एक मोलाचे कार्य घडले ते घडणे किती अपरिहार्य होते हे कळते. बाईंच्या आयुष्याचेच ते एका अर्थी सार्थक होते. हा केवळ काव्यातच शोभून दिसेल व खरा वाटेल असा एक न्यायही होता. बाईंचे वय साठीच्या उंबऱ्याला टेकलेले, नाना त्या पलीकडे उभे. या वयात सुमारे १५०० पृष्ठांचा मजकूर बारकाईने वाचून गोपाळ गणेश आगरकरांच्या संपूर्ण लेखनाचे जे तीन खंड त्यांनी तयार केले ते म्हणजे साक्षेपी संपादनाचा उत्तम नमुनाच होय. त्यांत समाविष्ट असलेल्या प्रस्तावनांमध्ये ‘ग्रंथकार आगरकर’ ही प्रस्तावना सर्व दृष्टींनी अतिशय महत्त्वाची आहे. साहित्य संस्कृती मंडळातर्फे हे तीन खंड प्रकाशित झाले. या कामामागे केवळ जिद्द आणि चिकाटीच नव्हती तर आगरकरांविषयीचा अपार आदरभाव व जन्मभर ज्या निष्ठा जोपासल्या त्यांच्यावरची श्रद्धा एक क्षणभरही कमी झाली नाही असा विश्वास तर आहेच, पण बाई आणि नाना यांच्या मनात महाराष्ट्रीय समाज आणि संस्कृती यांच्याबद्दल असणारी कळकळही आहे. राष्ट्रवादी म्हणवणाऱ्यांकडून आगरकरांच्या विचारांची अवहेलना झाली. त्यांनी सुचवलेल्या सुधारणांचे आता प्रयोजन नाही आणि त्यांचे विषय जुने तर झाले आहेतच, पण त्यांच्या सामाजिक तत्त्वज्ञानाचा पाया डळमळीत झाला आहे असे म्हणणाऱ्यांनी आगरकरांच्या लेखनाकडे दुर्लक्ष करताना कोणत्याही लेखनाचे मोल त्याच्या विषयात नसून त्या मागच्या विचारसरणीत असते याकडे लक्ष दिले नाही. आगरकरांनी मांडलेल्या सामाजिक तत्त्वज्ञानाचा पाया डळमळीत झाली आहे असे म्हणणाऱ्यांनी त्याहून पलिकडचे सामाजिक तत्त्वज्ञान मांडायला हवे होते. तसे तर त्यांनी केले नाहीच, परंतु धार्मिक पुनरुज्जीवनाकडे कड्यावरून कोसळणाच्या दगडाच्या गतीने समाज वाटचाल करीत आहे हे उघड्या डोळ्यांनी पाहात असूनही ते अरिष्ट थांबवण्याचे प्रयत्नही केले नाहीत. इतकेच नव्हे तर मी असे म्हणेन की फुले आणि आंबेडकर यांनी केलेल्या बहुजनसमाजविषयक कार्याचे महत्त्व प्रतिपादन करताना आगरकरांचे कार्य ब्राह्मणी व मर्यादित कक्षेचे मानून त्यांना अनुल्लेखाने मारण्याचा प्रयत्न हेतुतः करण्यात आला. एकीकडे सर्वधर्मसमभावाच्या नावाखाली छुप्या जातीयवाद्यांचा नवा वर्ग वाळवीसारखा गुपचूपपणे समाज पोखरून टाकण्याचे काम करीत होता तर दुसरीकडे धर्माचे पुनरुज्जीवन करण्याचा जाहीर घोष करणारे प्रत्यक्ष घाव घालीत होते. आज महाराष्ट्रामध्ये जे वैचारिक अराजक माजलेले आहे त्यामागची कारणे ही आहेत. पण हे सारे पाहवत नसूनही हात चोळीत गप्प बसण्यापेक्षा संकुचितांना जुनाट वाटणारे पण प्रत्यक्षात नवी दृष्टी देणारे काम करण्यासाठी एका नातूबाईंनी व एका दि. य. देशपांड्यांनी जिद्दीने व उमेदीने उभे राहावे ही गोष्ट आगरकरांचे मोठेपण सिद्ध करणारी आहेच, परंतु दि. य. आणि नातूबाई यांच्या मनात समाजहिताचे केवढे भान जागृत होते याचाही प्रत्यय देणारी आहे.

बाई ‘आगरकरवादी’ होत्या एवढे म्हणणे पुरेसे नाही. त्यांच्या संपूर्ण व्यक्तिमत्वावर आगरकरांच्या विचारांचा, सरणीचा व शैलीचा प्रभाव होता. परंतु बाईंचे स्वतःचे असे, आणि केवळ स्त्रीतच सापडू शकेल असे एक हळुवार, हळवे मनही त्यांच्या लेखनामागे स्पंदन पावताना दिसते. ‘विवेकाची गोठ’मधले प्रतिपादन तर्कशुद्ध व वैचारिक स्वरूपाचे असूनही त्यात एक प्रकारचा जिव्हाळा आणि ममत्वाचा ओलावा आहे. आगरकरांवरच्या अन्यायाने बाई प्रथम हेलवल्या आहेत आणि नंतर विरोधकांवर तुटून पडल्या आहेत. वामन मल्हारांसारख्या समतोल विचारसरणीच्या लेखकाकडून स्त्रीजीवनाला न्याय मिळत नाही हे पाहून त्यांच्यातली ‘स्त्रीवादी’ लेखिका चकित झाली आहे आणि वामन मल्हारासंबंधी पूर्ण आदर देऊनही त्यांनी त्यांच्या लेखनातील विसंगती दाखवण्यास मागेपुढे पाहिलेले नाही. खानोलकरांच्या लेखनातून दिसणाच्या स्त्रीजीवनातील दुःखाने प्रथम त्यांचे अंतःकरण करुणेने भरून आलेले आहे आणि नंतर त्यामागच्या कारणांचा वैचारिक शोध त्यांनी घेतला आहे. बाईंमधली ही करुणा, वात्सल्यभाव आणि मायाळूपणा केवळ मीच नव्हे, अनेकांनी अनुभवला. कित्येक विद्यार्थ्यांवर त्यांनी मुलांसारखी माया केली. त्यांची आयुष्ये घडवली. कित्येकदा आपले मन समजून न घेता माणसे कृतघ्नपणे वागतात, गैरसमज करून घेऊन दुरावतात या अनुभवाने त्या उन्मळून गेल्या. पण असे काही घाव जिव्हारी घेऊनही त्यांनी आपला मायाळूपणा कुठे आवरून घेतला नाही. ईश्वरी क्षमाशीलता बाईंनी दाखवलेली मी स्वतः अनुभवली आहे.

माझे आणि बाईंचे नाते कोणत्याही शब्दांमध्ये न बसणारे आहे. एकेकाळी मी त्यांची जिवलग शिष्या होते. ‘आधीची विवेकाची गोठी, वरी प्रतिपादी श्रीकृष्ण जगजेठी, आणि भक्तराजु किरीटी, परिसत असे.’ असे आमच्यातल्या गुरुशिष्यसंबंधाचे मार्मिक वर्णन ज्ञानेश्वरांनी करून ठेवले आहेच! माझ्या व्यक्तिमत्वावर त्यांचा गाढ प्रभाव पडला. त्यांच्या सहवासात मी काही अविस्मरणीय क्षण घालवले. बाहेर रणरणता उन्हाळा असताना वाळ्याच्या ताट्या लावलेल्या गार खोलीत मंद प्रकाशात आम्ही एकत्र बसून पुस्तके वाचली आणि चर्चा केल्या.

संध्याकाळी अंगणात पाणी शिंपडून खुर्च्या टाकून मातीचा गंध आणि नानांनी फुलवलेल्या मोगऱ्याचा गंध अनुभवीत आम्ही जी.एं.च्या कथा वाचीत अधिकच हळव्या झालो. त्यांचे वेगवेगळ्या निमित्ताने प्रक्षुब्ध होणे आणि तगमगणेही मी जवळून पाहिले. त्यांना झोप येत नसे तेव्हा ‘घनु वाजे घुणघुणा’ किंवा ‘स्वर आले दुरुनी’ अशी त्यांची आवडती गाणी गाऊन त्यांचा डोळा लागतो आहे म्हणून हलकी पावले टाकीत निघून जाताना मला किती शांत वाटत असे ते या क्षणी आठवून मी कातर होते आहे… आणि नानी आणि बाईंमधल्या अपूर्व आणि विलक्षण प्रेमाचे जे चित्र माझ्या मनात आहे ते असे डोळ्यातल्या पाण्याने डळमळते असताना एकट्या नानांचे या क्षणी काय होत असेल या जाणिवेने माझा गळा भरून आला आहे….

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.