विवेकवाद – २

या लेखमालेच्या पहिल्या लेखांकात आपण ज्ञानक्षेत्रातील विवेकित्वाचा एक नियम पाहिला. तो नियम असा होता की ज्या विधानाच्या सत्यत्वाचा पुरेसा पुरावा उपलब्ध असेल अशाच विधानावर आपण विश्वास ठेवावा, आणि तो विश्वास पुराव्याच्या प्रमाणात असावा. तसेच विधानाचा पुरावा तपासण्याची शक्ती आपल्याजवळ नसेल तर त्या त्या ज्ञानक्षेत्रातील तज्ज्ञाला किंवा वैज्ञानिकाला प्रमाण मानावे.
नंतर आपण कर्मक्षेत्रातील विवेकाकडे वळलो, आणि आपली कर्मे विवेकी केव्हा होतील याचा विचार करण्यास आरंभ केला. आपल्या असे लक्षात आले की कर्माचा विचार आपण जसा साध्य म्हणून करू शकतो तसाच एखाद्या साध्याचे साधन म्हणूनही करू शकतो. यांपैकी दुसरा विचार सापेक्षतः सुलभ असल्यामुळे आपण त्याचे उत्तर आधी दिले. ते असे होते की एखाद्या इष्ट गोष्टीचे किंवा साध्याचे साधन म्हणून जेव्हा आपण एखादे कर्म निवडतो तेव्हा ते कर्म आपल्या साध्याचे समर्थ साधन असले पाहिजे. एखादे साध्य आपल्याला प्राप्त करावयाचे असेल तर त्याकरिता आपण असे साधन निवडले पाहिजे की जे वापरल्यानंतर आपले साध्य निश्चितपणे हस्तगत होईल. अर्थातच असे करता येण्याकरिता आपल्याला निसर्गातील कार्यकारणांचे बरेचसे बिनचूक ज्ञान असावे लागेल. उदा. एखादा आजार बरा करण्याचा प्रभावी उपाय आपल्याला माहीत असावा लागेल. जर आपल्या मुलाला देवी आल्या असतील तर त्या बऱ्या करण्याकरिता देवीला अभिषेक करून तिची प्रार्थना करणे व्यर्थ आहे हे आपल्याला माहीत असावे लागेल.

परंतु आपला बराच, किंबहुना बहुतेक, व्यवहार कार्यकारणाच्या अज्ञानावर आधारलेला असतो हे सहज दाखविता येईल.

आपली बहुतेक कमें ज्ञानावर नव्हे, श्रद्धेवर आधारलेली
आपण करीत असलेल्या अनेक कर्मात आपण अशा गोष्टी गृहीत धरतो की ज्यांची सत्यता असिद्ध असते किंवा ज्या असत्य आहेत हे सिद्ध झालेले असते. उदा. ईश्वराचे अस्तित्व, तसेच कर्मकांड यावरील विश्वास.

आपल्या व्यवहारांपैकी बहुतेक व्यवहार ईश्वर आहे आणि तो आपल्या पूजा-प्रार्थनांनी पावतो या दृढविश्वासावर आधारलेले असतात. आपण कोणतेही महत्त्वाचे काम करायला निघालो की आधी ईश्वराची प्रार्थना करतो. सकाळी उठल्यापासून तो रात्री झोपेपर्यंत अनेक वेळा आपण ईश्वराचे स्मरण करतो आणि त्याच्या मदतीची याचना करतो. दिवसारंभी आजचा दिवस मला सुखाचा, समृद्धीचा जाऊ दे असे आपण देवाला विनवितो. पूजा अर्चा करणारे ती करतात, पण न करणारेही ईश्वराचे स्मरण करून त्याची करुणा भाकतात. परीक्षेला जाण्यापूर्वी विद्यार्थी देवाला नमस्कार करतात. विवाहविधीतील प्रत्येक भागात देवाला साक्षी ठेवून आणाभाका घेतल्या जातात. व्यापारी, दुकानदार आपल्याला यश मिळावे म्हणून सत्यनारायण करतात. संध्याकाळ झाली की दिवे लागताना प्रत्येक दुकानात टांगलेल्या तसबिरीपुढे नीरांजन किंवा उदबत्तीने ओवाळतात. कोणत्याही कामात यश मिळाल्यास देवापुढे नारळ फोडतात. निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात देवाच्या दर्शनाने होते. भोजनारंभी आणि भोजनाच्या शेवटीही आपण ईश्वराचे स्मरण करून त्याचे आभार मानतो. या सर्व सार्वत्रिक व्यवहारात असे उघडच गृहीत धरलेले असते की ‘ईश्वर’ नावाची एक (किंवा अनेक) शक्ती आहे, आणि ती आपल्या प्रार्थनांनी प्रसन्न होते आणि आपले इष्ट आपल्यास मिळवून देते. परंतु समजा की ईश्वर नावाची वस्तू किंवा शक्ती नाहीच. तर हा सर्व व्यवहार अविवेकी होईल. एखाद्या नसलेल्या वस्तूचे अस्तित्व गृहीत धरून तिला उद्देशून हजारो कर्मे करणे किती असमंजस होईल याचा विचार करावा.

आणि वस्तुस्थिती अशी आहे की ‘ईश्वर’ नावाची वस्तू आहे याची कसलाही निर्णायक पुरावा उपलब्ध नाही. ईश्वराचे अस्तित्व सिद्ध करण्याकरिता अनेक युक्तिवाद दिले गेले आहेत. परंतु त्यांपैकी एकही युक्तिवाद निर्णायक नाही असे म्हणावे लागते. ते सर्व युक्तिवाद सदोष आहेत हे अधिकारी व्यक्तींनी अनेकवार दाखविले आहे. परंतु त्याकडे दुर्लक्ष केले जाते आणि तेच तेच चुकीचे युक्तिवाद वारंवार केले जातात. ईश्वराचे अस्तित्व सिद्ध करणारे युक्तिवाद आणि त्यांची परीक्षणे ही दोन्ही तत्त्वज्ञांनी केलेली असल्यामुळे त्यांचे विवेचन पुष्कळदा गहन आणि सामान्यजनांना दुर्बोध वाटणारे असते. परंतु त्यापैकी अनेक युक्तिवाद समजायला फारसे कठीण नाहीत, आणि अनभिज्ञ वाचकाने जर नेटाने प्रयत्न केला तर त्यालाही त्यांचे आकलन होऊ शकते. यापुढे जे विवेचन येणार आहे ते क्वचित् कठीण वाटेल, पण ते आकलनाच्या पलिकडे जाणार नाही अशी काळजी घेतली आहे. परंतु ईश्वरास्तित्वसाधक युक्तिवादाकडे वळण्यापूर्वी श्रद्धेविषयी दोन शब्द लिहिणे जरूर आहे.

श्रद्धा म्हणजे काय?
श्रद्धा म्हणजे एखाद्या गोष्टीविषयीची पक्की खात्री, अविचल विश्वास. पण एवढ्याने श्रद्धेचे स्वरूप पुरेसे स्पष्ट केले असे होत नाही. एखाद्या गोष्टीवर माझी श्रद्धा आहे असे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपला असा अभिप्राय असतो की त्या गोष्टीला मुळीच किंवा पुरेसा पुरावा नाही. एखाद्या गोष्टीला पुरेसा पुरावा आहे म्हणून जर आपण तिच्यावर विश्वास ठेवला, म्हणजे ती खरी मानली, तर त्याला कोणी श्रद्धा म्हणत नाहीत. ‘२ + २ = ४’ अशी माझी श्रद्धा आहे किंवा ‘पृथ्वी गोल आहे’ अशी माझी श्रद्धा आहे असे आपण म्हणत नाही, कारण ही विधाने सत्य आहेत हे आपल्याला ज्ञात असते. त्या विधानांची सत्यता स्वयंसिद्ध असते, किंवा पुराव्याने सिद्ध झालेली असते. याचा अर्थ असा आहे की श्रद्धेची भाषा आपण जे सिद्ध करू शकत नाही किंवा ज्याला पुरावा नसतो अशा गोष्टींविषयीच आपण करतो. आता वर सांगितल्याप्रमाणे पुराव्यावाचून कोणतेही विधान स्वीकारणे अविवेकी, असमंजस आहे. अर्थात् श्रद्धा ही एक अविवेकी गोष्ट आहे, हे मान्य केले पाहिजे.

ईश्वर म्हणजे काय?
ईश्वराच्या अस्तित्वाचे साधक युक्तिवाद काय आहेत ते पाहण्यापूर्वी एका प्रश्नाचा निकाल लावावा लागेल. तो प्रश्न म्हणजे ‘ईश्वर म्हणजे काय?’ हा. ईश्वराचा शोध आपण करतो आहोत. पण ईश्वराचा म्हणजे कोणत्या पदार्थाचा? जो पदार्थ आहे की नाही असा प्रश्न आपण विचारतो आहोत, त्या पदार्थाचे स्वरूप काय आहे ते आधी सांगितले पाहिजे. ईश्वरवाद्यांना ‘ईश्वर’ या शब्दाने कोणत्या वर्णनाची वस्तू अभिप्रेत आहे ते आधी पाहिले पाहिजे.

याचे आणखीही एक कारण आहे. ईश्वरास्तित्वसाधक सर्वच युक्तिवाद एकाच वर्णनाच्या ईश्वराचे अस्तित्व सिद्ध करीत नाहीत. एका युक्तिवादाने सिद्ध होणारी वस्तू दुसऱ्या युक्तिवादाने सिद्ध होईलच असे नाही. म्हणजे जरी हे सर्व युक्तिवाद ईश्वराचे अस्तित्व सिद्ध करण्याकरिता केले गेले आहेत, तरी त्या प्रत्येकाने सिद्ध होणाऱ्या ईश्वराचे स्वरूप बहुधा थोडेफार आणि क्वचित् सर्वथाही भिन्न असते.
पाश्चात्य तत्त्वज्ञानात ईश्वराची एक प्रसिद्ध कल्पना बऱ्याच तत्त्वज्ञांनी स्वीकारलेली दिसते. ही कल्पना म्हणजे पूर्ण पदार्थाची, the most perfect Being ची. ज्यात सर्व प्रकारची पूर्णत्वे आहेत असा पदार्थ म्हणजे ईश्वर. याशिवाय विश्वाचे आदिकारण किंवा निर्माता, किंवा निर्माता आणि नियंता ही एक मोठ्या प्रमाणावर स्वीकारली जाणारी कल्पना आहे. हा निर्माता किंवा नियंता सर्वशक्तिमान, सर्वज्ञ आणि सर्वथासाधु (all-good) आहे असेही मानले जाते. पण या सर्व कल्पनांच्या जोडीला ईश्वराचे एक महत्त्वाचे लक्षण म्हणजे तो मानवांच्या प्रार्थना ऐकणारा आहे, त्यांनी प्रसन्न होणारा आहे, आणि शरण आलेल्यांचे रक्षण करणारा आहे. हा विशेष जर ईश्वरकल्पनेतून वजा केली तर अन्य सर्व गुणांनी विशिष्ट असा ईश्वर असला काय आणि नसला काय, मानवाला त्याचे काहीच सोयरसुतक वाटण्याचे कारण नाही. जर ईश्वर पूर्णपणे उदासीन असेल, म्हणजे मानवांच्याविषयी त्याला कसलाही जिव्हाळा नसेल, तर असा ईश्वर ईश्वरवाद्यांच्या दृष्टीने असून नसल्यासारखाच आहे. ईश्वराचे स्वरूप असे उदासीन आहे असे मानणारा मनुष्य नास्तिक आहे असेच ते म्हणतील. युरोपात सतराव्या शतकात स्पिनोझा नावाचा एक थोर तत्त्वज्ञ होऊन गेला, तो सबंध जग हाच ईश्वर असे मानी, आणि हा ईश्वर पूर्णपणे उदासीन किंवा तटस्थ आहे असे त्याचे प्रतिपादन होते. स्वाभाविकच सर्व ईश्वरवाद्यांनी त्याला नास्तिक ठरविले, आणि त्याला आपला जीव वाचविण्याकरिता देशातून परागंदा व्हावे लागले.

आता ईश्वरास्तित्वसाधक युक्तिवाद अनेक आहेत आणि ते भिन्न भिन्न वर्णनांचा ईश्वर सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात. उदा. एका प्रसिद्ध युक्तिवादाचे नाव आहे ‘सत्ताशास्त्रीय युक्तिवाद’ (‘the ortological argument’) आणि त्याचा प्रयत्न पूर्ण पदार्थाचे अस्तित्व सिद्ध करणे हे आहे. दुसरा एक प्रसिद्ध युक्तिवाद ‘जगच्छास्त्रीय युक्तिवाद’ (‘the cosmological argument’) या नावाचा आहे. त्यालाच ‘कारणिक युक्तिवाद (‘the causal argument’) असेही नाव आहे. हा युक्तिवाद जगाच्या आदिकारणाचे अस्तित्व सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो. तिसरा युक्तिवाद आहे, त्याला ‘The argument from Design’ असे नाव असून त्याचा हेतू जगाची योजना करणाऱ्या ईश्वराचे अस्तित्व सिद्ध करणे हा आहे. असेच आणखीही काही युक्तिवाद आहेत. हे सर्व परस्परांहून भिन्न असून ते अतिशय भिन्न अशा ईश्वराचे अस्तित्व सिद्ध करू पाहतात. परंतु या युक्तिवादांचे स्वरूप बारकाईने तपासले तर आपल्या असे लक्षात येते की त्यापैकी प्रत्येकात काही गंभीर दोष आहेत, आणि म्हणून ईश्वराचे अस्तित्व असिद्धच राहते. आपण उदाहरणादाखल एकदोन युक्तिवादांचे परीक्षण करू.

ईश्वरास्तित्वसाधक कारणिक युक्तिवाद
कारणिक युक्तिवाद हा अतिशय सार्वत्रिक आणि सर्वात चटकन सुचणारा युक्तिवाद आहे. पण तो एका गंभीर दोषाने युक्त आहे. हा युक्तिवाद असे प्रतिपादतो की प्रत्येक गोष्टीला कारण असते; म्हणून या जगालाही कारण असले पाहिजे. ते कारण म्हणजे ईश्वर, आता प्रत्येक गोष्टीला कारण असते या नियमाबद्दल आधुनिक तत्त्वज्ञ आणि वैज्ञानिक यांचे मत असे आहे की तो नियम ‘प्रत्येक गोष्टीला कारण असते’ असा ग्रथित न करता ‘प्रत्येक घटनेला किंवा बदलाला कारण असते’ असा प्रतिपादायला हवा. आपण दैनंदिन भाषेत ‘कारण’ हा शब्द अतिशय शिथिलपणे वापरतो. त्याचा एक अर्थ ‘कर्ता’ असा आहे. उदा. जगताचे कारण म्हणजे जगताचा कर्ता, उत्पन्न करणारा किंवा निर्माता. या अर्थी प्रत्येक गोष्टीला कारण असते म्हणजे प्रत्येक वस्तू निर्मिणारा, त्या वस्तूचा कर्ता असतो. परंतु हा नियम स्वयंसिद्ध नाही. आपल्या भोवताली जे जग आहे, त्यातील फारच थोड्या वस्तू कोणीतरी निर्मिलेल्या असतात. कृत्रिम वस्तू, म्हणजे मनुष्याने केलेल्या वस्तू, जर सोडून दिल्या तर बाकीच्या वस्तूही कोणातरी कर्त्याच्या (म्हणजे चेतन पदार्थाच्या) कृती आहेत असे मानायला कसलाही पुरावा नाही. म्हणून जगाला निर्माता किंवा उत्पत्तिकर्ता असला पाहिजे हा युक्तिवाद सदोष आहे असे म्हणावे लागते.

कारणाचा नियम ‘प्रत्येक वस्तूला कारण असते’ असा आहे असे मानले नाही, आणि कारणाचा अर्थ कर्ता असा घेतला नाही तर तो नियम प्रत्येक बदलाला (change) किंवा घटनेला, (event) कारण असते असा लिहिता येतो, आणि याच स्वरूपात तो लिहिला जावा असे विज्ञानात आणि तत्त्वज्ञानात मानतात. या अर्थाने प्रत्येक कार्य (effect) ही एक घटना किंवा घडणे असते, आणि तिचे कारणही एखादी घटनाच असते. उदा. पावसाचे पडणे ही घटना घ्या. तिला कारण आहे आणि ते ही एक घटनाच आहे. ही घटना म्हणजे ढगातील वाफेला थंडी लागणे. परंतु या स्वरूपात जर कारणाचा नियम प्रतिपादला गेला, तर कारणिक युक्तिवादाचे काय होईल? त्या युक्तिवादाने ईश्वराचे, म्हणजे आदिकारणाचे अस्तित्व सिद्ध होईल काय? अर्थात् नाही, कारण प्रत्येक घटनेला कारण असते या नियमानुसार आदिकारण किंवा पहिले कारण ही कल्पना वदतोव्याघाताचे एक उदाहरण होईल. जी कोणती घटना पहिले कारण म्हणून उल्लेखिली जाईल, तिलाही कारण असावेच लागेल. म्हणजे कारण-कार्याची परंपरा अनादि आहे. प्रत्येक घटनेला कारण असते या नियमावरून आदिकारण असू शकत नाही हेच सिद्ध होते.

‘कारण म्हणजे कर्ता’ हा अर्थ घेऊनही जगताला कर्ता असला पाहिजे हे निष्पन्न होऊ शकत नाही. कारण समजा आपण म्हणालो की जगताचा कर्ता म्हणजे ईश्वर, तर लगेच असा प्रश्न उद्भवेल की मग ईश्वराचा कर्ता कोण? आणि या प्रश्नाचे उत्तर द्यावे लागेल. जॉन स्टुअर्ट मिल् आपल्या आत्मचरित्रात म्हणतो की, ‘माझ्या वडिलांनी मला शिकविले की “मला कोणी निर्मिले?” या प्रश्नाचे उत्तर ‘ईश्वरा’ने असे देणे व्यर्थ आहे, कारण त्यातून लगेच “ईश्वराला कोणी निर्मिले?” हा प्रश्न उद्भवतो.’ यावर असे उत्तर दिले जाईल की ईश्वर अनादि आहे किंवा स्वयंभू आहे, त्यामुळे त्याला कर्ता किंवा निर्माता लागत नाही. पण त्यावर असा प्रतिप्रश्न संभवतो की ‘जर ईश्वर अनादि असू शकतो तर जग का असू शकत नाही?’ सारांश आदिकरणाचा युक्तिवाद सपशेल फसतो.

ईश्वर सर्वशक्तिमान, सर्वज्ञ आणि सर्वथासाधु असू शकत नाही.
ईश्वरस्वरूपाची एक कल्पना अशी आहे की ईश्वर सर्वशक्तिमान, सर्वज्ञ आणि सर्वथा साधु असा पदार्थ आहे. या सर्व गुणांनी युक्त अशा ईश्वराचे अस्तित्व सिद्ध करणारा एक युक्तिवाद म्हणजे ज्याला ‘सत्ताशास्त्रीय युक्तिवाद’ असे नाव आहे. ‘सत्ताशास्त्रीय युक्तिवाद’ हा एक सदोष युक्तिवाद आहे असे आज सामान्यपणे मानले जाते. त्या युक्तिवादाची रचना तत्त्वज्ञानातील काही तांत्रिक सिद्धांतांच्या साह्याने केलेली आहे, आणि म्हणून तो साध्या भाषेत समजावून सांगणे कठीण आहे, म्हणून ते मी येथे करणार नाही. त्या युक्तिवादाचे खंडन अनेक थोर तत्त्वज्ञांनी केले आहे आणि तेही समजावून सांगणे अवघड आहे. परंतु त्याऐवजी वरील वर्णनाचा ईश्वर म्हणजे ज्याच्या ठिकाणी सर्वशक्तिमत्त्व, सर्वज्ञत्व आणि सर्वथासाधुत्व हे तीनही गुण आहेत असा ईश्वर असू शकत नाही हे निर्णायकरीत्या दाखविता येईल. ते आता संक्षेपाने दाखवितो.

सर्वशक्तिमत्त्व, सर्वज्ञत्व आणि सर्वथासाधुत्व हे धर्म परस्परविरुद्ध नाहीत. म्हणून ते एकाच वस्तूत असू शकतात हे मान्य केले पाहिजे. परंतु ते तीन गुण एकाच वस्तूत असू शकत नाहीत असे निर्णायकपणे दाखविणारा पुरावा उपलब्ध आहे. ही पुरावा म्हणजे जगात असलेले अशिव किंवा असाधु (evil) गोष्टी. उदा. जगात फार मोठ्या प्रमाणात दुःख आहे; त्यात दुष्टपणा, क्रूरपणा, निर्दयपणा ओतप्रोत भरलेला आहे; त्यात अज्ञान आहे, आजार आहेत, सर्व प्रकारची व्यंगे आहेत. बरे, दुःख आपल्या दुष्कृत्यांचे फळ आहे असेही म्हणता येत नाही, म्हणजे ते दुःख अनर्हित (undeserved) आहे. ज्यांना दुष्कृत्ये करण्याची संधीच मिळाली नसते अशी नवजात बालकेही व्याधिग्रस्त होतात आणि मृत्युमुखी पडतात. कितीतरी बालके दारिद्र्यात जन्मतात, आणि दारिद्र्यातच सबंध जन्म बहुतेकांना घालवावा लागतो. माणसे अन्याय करतात, सबल दुर्बलांना नाडतात, आणि यातून अनंत दुःख उद्भवते. हे जग जर सर्वशक्तिमान, सर्वज्ञ आणि सर्वथासाधु अशा ईश्वराने निर्मिले असेल, तर हे सर्व दुःख तो कसे चालू देतो? ज्याअर्थी हे दुःख तो चालू देतो त्याअर्थी त्याच्या ठिकाणी वरील तीन गुणांपैकी निदान एका गुणाचा अभाव असावा लागेल. म्हणजे एकतर त्याला जगातील दुःख दिसते, ते दूर करण्याची त्याची इच्छाही आहे, पण ते नाहीसे करण्याची शक्ती त्याच्याजवळ नसली पाहिजे; किंवा तो सर्वशक्तिमान असेल, पण सर्वज्ञ नसेल आणि म्हणून जगातील दुःख नष्ट करण्याचे उपाय त्याला माहीत नसतील; किंवा शेवटी तो सर्वशक्तिमान असेल, सर्वज्ञही असेल, पण साधु नसेल, म्हणजे अशिव नाहीसे करण्याची इच्छाच त्याला होत नसेल. याप्रमाणे जगातील अमर्याद अशिवाचे अस्तित्व ही गोष्ट ईश्वराच्या सर्वगुणसंपन्न असण्याला बाधक आहे असे म्हणणे भाग आहे.

या अशिवाच्या समस्येला आस्तिकांकडून अनेक उत्तरे दिली गेली आहेत. त्यापैकी भारतीय तत्त्वज्ञानात दिलेले उत्तर प्रसिद्ध आहे. ते उत्तर असे आहे. जगातील दुःख हे प्रत्येकाला त्याच्या कृतकर्मामुळे भोगावे लागते. जगात कोठेही अनर्हित दुःख नसते. मला जर दुःख भोगावे लागत असेल, तर ते मी माझ्या स्वतःच्या कृतीने स्वतःवर ओढवून घेतलेले असते. पण हे म्हणणे विपर्यस्त दिसते. वर लिहिल्याप्रमाणे ज्यांना कर्मे करण्यास सवडही मिळाली नाही अशा नवजात बालकांना दुःख का सहन करावे लागते? यावर उत्तर दिले जाते की त्यांच्या अनुभवाला येणारे दुःख त्यांच्या पूर्वजन्मातील दुष्कर्माची फळे होत. पूर्वजन्म आणि पुनर्जन्म याविषयीच्या या मताचा परामर्श आपण पुढील अंकात घेऊ.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.