विवाह आणि नीती (भाग २)

मातृवंशीय समाज
वैवाहिक रूढींमध्ये नेहमीच तीन घटकांचे मिश्रण आढळते: (१) साहजिक किंवा सहजात किंवा राजप्रवृत्तिमय (instinctive), (२) आर्थिक, आणि (३) धार्मिक. हे घटक स्पष्टपणे वेगळे दाखविता येतात असे मला म्हणायचे नाही; जसे ते अन्य क्षेत्रात वेगळे दाखविता येत नाहीत, तसेच ते येथेही येत नाहीत. दुकाने रविवारी बंद असतात याचे मूळ धार्मिक आहे. पण आज ही गोष्ट आर्थिक झाली आहे; आणि अंगिक बाबीतील कायदे आणि रूढी यांचीही गोष्ट अशीच आहे. धार्मिक मूळ असलेली रूढी जर उपयुक्त असेल तर तिचा धार्मिक आधार कमकुवत झाल्यावरही ती पुष्कळदा टिकून राहते. धार्मिक काय आहे आणि सहजात (instinctive) काय आहे यात भेद करणेही पुष्कळदा कठीण असते. ज्या धर्माची मनुष्यांच्या कर्मावर पक्की पकड असते त्यांना सामान्यतः काहीतरी सहजात आधार असतो. परंतु त्यांचे वैशिष्ट्य परंपरेच्या महत्त्वामुळे असते, आणि तरच साहजिकपणे शक्य असणाऱ्या अनेक प्रकारच्या कर्मांपैकी ते धर्म काही प्रकारांना मान्यता देतात यामुळेही असते. उदा. प्रेम आणि मत्सर दोन्ही भावना साहजिक आहेत; परंतु धर्माने मत्सराला सद्गुणी भाव मानला असून त्याला समाजाने मान्यता द्यावी अशी अपेक्षा असते, तर प्रेम फार तर क्षम्य मानले आहे.

लैगिक संबंधांतील सहजात घटक : मानवातील सहजप्रवृत्ती
लैंगिक संबंधांतील सहजात घटक आपण सामान्यपणे मानतो त्याहून पुष्कळच अल्प आहे. या पुस्तकात माझा इरादा मानवशास्त्रात (anthropology) वर्तमान प्रश्नांचे विवेचन करण्याकरिता अवश्य असेल त्याहून जास्त शिरण्याचा नाही; परंतु एका बाबतीत ते शास्त्र आपल्या दृष्टीने फार आवश्यक आहे, आणि ती बाब म्हणजे जे आचार सकृद्दर्शनी सहजप्रवृत्तीविरुद्ध दिसतात असे कितीतरी आचार सहजप्रवृत्तींशी फारसा किंवा उघड संघर्ष न करता दीर्घकालपर्यंत टिकून राहू शकतात हे दाखविणे. केवळ अनागरित (uncivilized) वन्य समाजांतच नव्हे, तर काही सापेक्षतः नागरित समाजांतही वधूचा कौमार्यभंग अधिकृतपणे (आणि अनेकदा चारचौघांसमक्षही) पुजाऱ्यांकडून करविण्याची रूढी सर्रास चालत आली आहे. ख्रिस्ती समाजात असे मानले जाते की कौमार्यभंग करणे हा वराचा विशेष हक्क आहे, आणि धार्मिक कौमार्यभंगाबद्दल आपल्याला वाटणारा विरोध सहजात (instinctive) आहे असे बहुतेक ख्रिस्ती लोक, निदान अलिकडेपर्यंत, म्हणाले असते. आपली पत्नी आतिथ्याचा भाग म्हणून पाहुण्याला देण्याच्या प्रथेबद्दल वाटणारी नावड सहजात आहे असे आधुनिक युरोपियनांना वाटते; पण ती प्रथा पुष्कळ विस्तृत प्रमाणात प्रचलित होती. अशीच आणखी एक रूढी म्हणजे बहुपतिकत्वाची. ही चाल अशिक्षित गोरे लोक मानवस्वभावाविरुद्ध मानतात. बालहत्या तर त्याहूनही अधिक मानवस्वभावाविरुद्ध असावी असे वाटेल; परंतु इतिहास असे सांगतो की ती जेव्हा आर्थिकदृष्ट्या सोईस्कर आहे असे दिसते तेव्हा तिचा स्वीकार अगदी सहज केला जातो. खरी गोष्ट अशी आहे की मानवप्राण्याच्या बाबतीत सहजप्रवृत्ती ही अतिशय संदिग्ध गोष्ट आहे, आणि नैसर्गिक मार्गापासून तिचा भ्रंश सहज होऊ शकतो. ही गोष्ट नागरित आणि अनागरित अशा दोन्ही समाजांत सारखीच आढळते. खरे म्हणजे लैंगिक बाबतीतील मानव-वर्तन इतके शिथिल आणि विविध आहे की त्याविषयी ‘सहजप्रवृत्ती’ हा शब्द वापरणे अयुक्त वाटते. कठोर मानसशास्त्रीय अर्थाने या क्षेत्रात ज्याला सहजात म्हणता येईल असे एकमेव कर्म म्हणजे बाल्यावस्थेतील चोखण्याचे कर्म, अनागरित समाजात काय स्थिती असेल मला माहीत नाही, पण नागरित मनुष्याला मैथुनक्रिया करायला शिकावे लागते. विवाह होऊन अनेक वर्षे झालेली जोडपी अनेकदा डॉक्टरकडे जाऊन मुले मिळविण्याचा उपाय विचारताना आढळतात; अशा उदाहरणांत त्या जोडप्यांना मैथुनक्रिया करणे ज्ञात नव्हते असे आढळून आले आहे. म्हणून मैथुनक्रियेकडे नैसर्गिक कल असला, आणि ती केल्याशिवाय न शमणारी नैसर्गिक इच्छा असली, तरी ते कर्म काटेकोर अर्थाने सहजात म्हणता येत नाही. खरे म्हणजे अन्य प्राण्यांमध्ये आढळतात तसे नेमके वर्तन-नमुने (behaviour-patterns) मनुष्यांमध्ये आढळत नाहीत, आणि त्या अर्थाने सहजप्रवृत्तीच्या जागी काहीशी वेगळीच गोष्ट आढळते. मनुष्यप्राण्यांमध्ये जे आढळते ते असे असते. प्रथम एक प्रकारच्या असमाधानातून काहीशी स्वैर आणि तुटक कर्मे उद्भवतात; नंतर त्यांतून हळूहळू, कमीअधिक अपघाताने, ज्या कर्माने समाधान होते ते कर्म अकस्मात् सापडते; आणि मग त्या कर्माची पुनरावृत्ती होते. म्हणून जे सहजात असते ते सिद्ध नसून ते हुडकून काढण्याची प्रवृत्तीच तेवढी सहजात असते; आणि जे कर्म समाधान देते ते निश्चितपणे पूर्वनियत असतेच असे नाही. मात्र जर काही विपरीत सवयी लागल्या नाहीत, तर जीवशास्त्रीयदृष्ट्या सर्वात लाभकारी कृतीने पूर्ण समाधान सामान्यपणे मिळते.

पितृसत्ताक कुटुंबसंस्थेला स्त्रीचे पातिव्रत्य आवश्यक
सर्व नागरित आधुनिक समाज पितृसत्ताक कुटुंबसंस्थेवर आधारलेले आहेत, आणि स्त्रीच्या पावित्र्याची (female virtue) संपूर्ण कल्पना पितृसत्ताक कुटुंब शक्य व्हावे या हेतूने निर्माण केली गेली आहे, हे पाहता पितृभावनेच्या निर्मितीत कोणत्या नैसर्गिक प्रवृत्तींचा हात आहे हे शोधून पाहणे महत्त्वाचे होईल. हा प्रश्न सामान्य लोक समजतील तितका सोपा नाही. मातेची आपल्या अपत्याविषयीची भावना समजणे मुळीच कठीण नाही, कारण तिच्या मुळाशी एक गाढे शारीरिक बंधन, निदान स्तन्यत्यागक्षणापर्यंत असते. परंतु पित्याचा अपत्याशी संबंध अप्रत्यक्ष, औपन्यासिक (hypothetical) आणि अनुमानित असतो. तो पत्नीच्या एकनिष्ठेवर अधिष्ठित असतो, आणि म्हणून तो अशा बौद्धिक पातळीवर असतो की जिला खऱ्या अर्थाने सहजप्रवृत्तिमय म्हणता येत नाही. निदान ही भावना पुरुषाच्या स्वतःच्या अपत्यांच्या बाबतीतच संभवते असे मानले तर ती बौद्धिक पातळीवर असते असेच म्हणावे लागेल. पण ही गोष्ट खरी नाही. मेलानेशियनलोकांना मुलांना बाप असतात ही गोष्ट माहीत नाही. परंतु त्यांच्यामधील पित्यांचे आपल्या मुलांवर तितकेच प्रेम असते जितके ती आपली मुले आहेत हे माहीत असणाऱ्या पित्यांचे असते. ट्रोब्रिअँड** द्वीपनिवासी लोकांवरील मॅलिनौस्की**च्या ग्रंथांनी पितृत्वाच्या मानसशास्त्रावर मोठा प्रकाशझोत टाकला आहे. त्यांची विशेषतः तीन पुस्तके – ‘वन्य समाजातील काम आणि निरोध’, ‘आदिम मानसशास्त्रातील पिता’, ‘वायव्य मेलानेशियातील वन्य लोकांचे कामजीवन’ ही ज्या संमिश्र भावकंदाला (sentiment) आपण पितृत्व**** म्हणतो तिचे आकलन होण्याकरिता अनिवार्य आहेत. पुरुषाच्या ठिकाणी एखाद्या बालकामध्ये रस उत्पन्न होण्याची दोन अगदी स्वतंत्र कारणे आहेत : (१) ते बालक आपले आहे असा विश्वास त्याला वाटत असल्यामुळे त्याला त्याबद्दल आपुलकी वाटते असेल; किंवा (२) ते आपल्या पत्नीचे मूल आहे हे त्याला माहीत असल्यामुळे त्याच्याबद्दल आपुलकी निर्माण होत असेल. जेथे पितृत्वाचा भाग अज्ञात असतो तेथे केवळ दुसरे कारण हजर असते.

पितृत्व-कल्पना अज्ञात
ट्रोब्रिअँड द्वीपनिवासीयांना मनुष्यांना जनक असतात ही गोष्ट अज्ञात आहे हे मॅलिनौस्कीने वादातीतपणे प्रस्थापित केले आहे. त्याला असे आढळले की एखादा मनुष्य वर्षभर किंवा त्याहूनही अधिक काळ सफरीवर दूर राहिल्यानंतर जेव्हा परत येतो तेव्हा त्याला जर समजले की आपल्या पत्नीला नवजात बालक आहे तर त्याला आनंद होतो आणि युरोपियन लोकांनी त्याची पत्नी इमानदार नाही असे सुचविले तर ते तो समजू शकत नाही. याहीपेक्षा अधिक खात्री पटविणारी गोष्ट अशी की मॅलिनोस्कीला असे आढळले की ज्याच्याजवळ उत्तम जातीची डुकरे होती असा एक मनुष्य सर्व नरांना खच्ची करीत होता, आणि असे केल्याने डुकरांची प्रजा निकृष्ट निपजेल हे त्याला समजू शकत नव्हते. पिशाचे बालके आणतात आणि त्यांची मातांच्या शरीरांत स्थापना करतात अशी त्यांची समजूत आहे. कुमारी गरोदर राहत नाही हे त्यांना माहीत असते; पण याचे कारण ते असे सांगतात की – hymen च्या अडथळ्यामुळे पिशाचांना आपले काम करता येत नाही. अविवाहित पुरुष आणि मुली पूर्ण अनिर्बध जीवन जगतात, परंतु का कोणास ठाऊक, अविवाहित मुलींना क्वचितच गर्भ राहतो. मात्र जेव्हा तो राहतो तेव्हा ती गोष्ट कलंकास्पद मानली जाते.

हे चमत्कारिक आहे, कारण ज्यामुळे गर्भ राहतो असे त्यांनी काही केले नाही असेच सर्व मानतात. केव्हातरी मुलगी विविधतेला कंटाळते आणि लग्न करते. ती आपल्या नवऱ्याच्या गावी राहायला जाते, पण ती आणि तिची मुले ही तिच्या मूळ गावाचीच म्हणून गणली जातात. तिच्या नवऱ्याचा आणि तिच्या मुलांचा कसलाही रक्ताचा संबंध आहे असे कोणी मानीत नाही, आणि वंशाची परंपरा मातृक्रमाने ओळखली जाते. अन्यत्र मुलांवर ज्या प्रकारचा अधिकार पित्याचा चालतो तसा अधिकार ट्रोब्रिअँड द्वीपवासीयांमध्ये मामाचा चालतो. इथे एक चमत्कारिक गुंतागुंत दृष्टीस पडते. भातृ-स्वसृनिषेध (brother and sister taboo) कमालीचा कठोर असतो. इतका की प्रौढ झाल्यानंतर भाऊ आणि बहीण लैंगिकविषयाशी दूरान्वयानेही संबद्ध असलेल्या विषयावर आपसात कधीही संभाषण करू शकत नाहीत. त्याचा परिणाम असा होतो की जरी मामाचा भाचे-भाच्यांवर अधिकार चालत असला तरी ते आईपासून दूर गेलेले असतील तो काळ सोडला तर त्यांचा (मामाचा) त्यांच्याशी संबंध क्वचितच येतो. या अवस्थेमुळे शिस्तीविना प्रेमाचा एवढा मोठा लाभ होतो की तसा अन्यत्र कोठेही होत नाही. मुलांचा बाप त्यांच्याबरोबर खेळतो, त्यांच्याशी स्नेहाने वागतो, परंतु त्याला त्यांच्यावर गाजवायला अधिकार नसतो; आणि त्यांच्या मामाला अधिकार असतो, पण तो गाजविण्याकरिता भाचे मंडळी जिथे राहतात तिथे राहण्याचा हक्क नसतो. मुले आणि त्यांच्या आईचा नवरा यांच्यात रक्ताचा संबंध नसतो असा विश्वास असूनही मुले आईच्या नवऱ्यासारखी दिसतात, आणि आई किंवा आपले भाऊ किंवा बहिणी यांच्यासारखी दिसत नाहीत असे मानले जाते हे आश्चर्यकारक आहे. बहीण आणि भाऊ, किंवा मूल आणि त्यांची आई यांच्यात साम्य आहे असे सुचविणेही अशिष्टपणाचे समजतात, आणि अतिशय उघड दिसणारा सारखेपणाही तीव्रपणे नाकारला जातो. मॅलिनौस्कीचे मत असे आहे की पित्याला अपत्याबद्दल वाटणारे प्रेम पित्याचे त्याचे साम्य असते या विश्वासाने उद्दीपित होते. पिता आणि पुत्र यांच्यातील संबंध ते नागरित समाजात आढळतात त्याहून त्याला अधिक अनुरूप आणि स्नेहाचे आढळले, आणि इडिपस गंडाचा तर कुठे मागमूसही आढळला नाही.

युक्तिवादांची पराकाष्ठा करूनही ‘मॅलिनोस्की’ला त्या बेटावरील आपल्या मित्रांना पितृत्व नावाची एक गोष्ट आहे हे पटवून देणे अशक्य आहे असे दिसून आले. मिशनऱ्यांनी कल्पिलेली ती एक मूर्खपणाची गोष्ट आहे असे ते म्हणत. ख्रिस्ती धर्म हा पितृसत्ताक धर्म आहे, आणि जे लोक पितृत्व मानीत नाहीत त्यांना तो धर्म भावनिक किंवा बौद्धिकदृष्ट्या आकलनीय होत नाही. ‘पितृरूप देवा’विषयी न बोलता ‘मातुलरूपी देवा’बद्दल बोलावे लागेल; पण याने अर्थाची बिनचूक छटा व्यक्त होत नाही, कारण पितृत्वाने अधिकार आणि प्रेम दोन्ही सूचित होतात, परंतु मेलानेशियन मामाला अधिकार असतो, पण प्रेम मात्र पिता करतो. माणसे परमेश्वराची लेकरे आहेत ही कल्पना ट्रोब्रिअँडद्वीपवासीयांना समजावून सांगताच येत नाही, कारण पुरुषाचे मूल असते ही गोष्ट ते मान्यच करीत नाहीत. परिणामतः मिशनऱ्यांना आपल्या धर्माची शिकवण देण्याअगोदर प्रथम शरीरशास्त्रीय माहितीवर भर द्यावा लागतो. मॅलिनौस्की म्हणतो की या प्राथमिक उद्योगात त्यांना यश मिळत नाही, आणि त्यामुळे त्यांना शुभवर्तमान शिकविण्यास आरंभच करता येत नाही.

पित्याचे वात्सल्य कसे निर्माण होते?
मॅलिनौस्कीचे मत असे आहे (आणि ते बरोबर असले पाहिजे असे मला वाटते) की मनुष्य आपल्या पत्नीच्या गरोदरपणी आणि अपत्यजन्माच्या वेळी तिच्याजवळ राहिला, तर मूल जन्मल्यानंतर त्यासंबंधी त्याच्यात स्नेह उत्पन्न होण्याची साहजिक प्रवृत्ती असते, आणि वात्सल्यभावाचे हे मूळ आहे. तो म्हणतो, ‘मानवी पितृत्व आरंभी जीवशास्त्रीयदृष्ट्या जवळजवळ पूर्णपूणे निराधार वाटते, पण ते सहजात स्वभाव आणि जैव गरज यांत खोल रुजलेले आहे.’ परंतु त्याचे असे मत आहे की जर कोणी मनुष्य पत्नीच्या गरोदरपणी तिच्यापासून दूर राहिला, तर त्याला तिच्या अपत्याचे प्रेम सहजप्रवृत्तीने वाटणार नाही; परंतु जर रूढी आणि ज्ञातीय नीती यांच्यामुळे माता आणि तिचे मूल यांचा त्याला सहवास घडला तर स्नेह निर्माण होऊ शकतो. तो जर सर्व वेळ पत्नीजवळ असता तर जितका स्नेह निर्माण होतो तितकाच होऊ शकतो. सर्वच महत्त्वाच्या मानवी संबंधांत सामाजिकदृष्ट्या इष्ट अशा ज्या कर्माच्या बाबतीत सहजप्रवृत्ती असते, पण ती सर्वथा बाध्य करण्याइतकी बलवान नसते, अशी कर्मे सामाजिक नीतिनियमांमुळे करविली जातात; आणि या वन्य लोकांतही असेच घडते. रूढीचा आदेश असा असतो की आईच्या नवऱ्याने मुले लहान असताना त्यांची काळजी घ्यावी आणि त्यांचे रक्षण करावे; आणि ह्या रूढीची अंमलबजावणी करणे कठीण नसते, कारण सामान्यपणे तिचा व्यापार सहजप्रवृत्तीच्या दिशेतच होतो.

मॅलिनौस्कीने मेलानेशियातील पित्यांच्या आपल्या अपत्याविषयीच्या संबंधाच्या स्पष्टीकरणाकरिता ज्या सहजप्रवृत्तीला आवाहन केले आहे ती त्याच्या ग्रंथातून दिसते त्याहून अधिक सार्वत्रिक आहे असे मला वाटते. प्रत्येक मनुष्यात, मग तो पुरुष असो की स्त्री, अशी प्रवृत्ती असते की जिच्यामुळे तो ज्या बालकाचा सांभाळ करीत असेल त्याच्याबद्दल त्याला स्नेह वाटू लागतो. जरी आरंभी रूढी, रीत किंवा वेतन यांच्यामुळे एखाद्या प्रौढाला एखाद्या बालकाचे पालन करावे लागले, तरी कालांतराने केवळ पालनामुळेच बहुतेक प्रकरणी स्नेहोद्भव होतो. जेथे ते मूल त्याला प्रिय असणाऱ्या स्त्रीचे असते तेथे ही मूळ प्रवृत्ती अर्थातच बलवत्तर होते. त्यामुळे ह्या वन्य पित्यांना आपल्या बायकोच्या अपत्यांचा लळा लागतो हे समजू शकते; आणि तसेच नागरित लोक आपल्या अपत्यांना जो स्नेह देतात त्यातही हाच मोठा अंश असतो हेही निश्चित मानायला हरकत नाही. मॅलिनोस्की म्हणतो – आणि त्याच्या म्हणण्याचा प्रतिवाद कसा करता येईल हे सांगणे कठीण आहे की ज्या अवस्थेत आज ट्रोब्रिॲंडद्वीपवासी आहेत त्या अवस्थेतून सबंध मानवजातीला केव्हा तरी जावे लागले असले पाहिजे, कारण जेव्हा पितृत्व ही गोष्ट सर्वथा अज्ञात होती असा कालखंड केव्हातरी येऊन गेला असला पाहिजे. पशुपक्ष्यांतील ज्या कुटुंबात पित्याचा समावेश होतो त्यांच्याही बाबतीत हाच आधार असला पाहिजे, कारण दुसरा कोणताच आधार तेथे असू शकत नाही. पितृत्वाचे स्वरूप ज्ञात झाल्यावर फक्त मानवांतच पितृत्वाचा भावकंद (sentiment) आपल्याला परिचित असलेल्या स्वरूपात विकसित होऊ शकतो.

* मेलानेशिया – पॅसिफिक महासागरातील एक द्वीपसमूह, तेथील रहिवासी
** ट्रोब्रिअंड द्वीपे मेलानेशियातील द्वीपविशेष
*** ब्रॉनिस्लॉ मॅलिनौस्की – विख्यात . मानवशास्त्रज्ञ (anthropologist)
**** Sentiment ही गोष्ट emotion (भावा) हून अधिक संमिश्र असून त्यात एखाद्या वस्तूभोवती अनेक भावांचे संघटन झालेले असते. उदा. वात्सल्यभावात अपत्याभोवती भय, क्रोध, आनंद, दुःख इत्यादि भाव अनुभवण्याच्या प्रवृत्तींचे संघटन झालेले असते. अपत्याला अपाय होण्याची शक्यता असल्यास माता-पिता भयभीत होतात, त्याच्यावर कोणी आघात केल्यास क्रोधाविष्ट होऊन त्याच्या रक्षणास धावून जातात. त्याला दुःख झाले की त्यांना दुःख होते, आणि ते आनंदात असले की ती सुखावतात. भावांच्या अशा संकुलाला sentiment असे नाव असून त्याला ‘भावकंद’ हा शब्द वापरला आहे.

अनुवादक : म. गं. नातू

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.