फुले-आंबेडकर शताब्दी समारोहाच्या निमित्ताने

हे वर्ष सामाजिक परिवर्तनाच्या प्रक्रियेबद्दल आस्था बाळगणा-या प्रत्येकासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, कारण या वर्षीपासून जोतीराव फुले यांची मृत्युशताब्दी आणि बाबासाहेब आंबेडकर यांची जन्मशताब्दी प्रचंड उत्साहानिशी साजरी होत आहे. कालगतीने जयंतीमयंती आणि त्यांच्या शताब्दीही येतच असतात, पण त्या सगळ्याच समारंभपूर्वक साजच्या होत नसतात. तुरळक महापुरुषांच्याच वाट्याला हे सन्मान येत असतात कारण त्यांच्या विचाराबद्दल व कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी समाजाला या सोहळ्यांमधून मिळत असते. पण त्याचबरोबर काळाचा संदर्भही तितकाच महत्त्वाचा असतो. १८२७ साली जन्मलेल्या जोतीरावांची जन्मशताद्वी १९२७ साली कालक्रमाने आली होती. अगदीच नगण्य प्रमाणावर ती साजरी झाली असावी असे काही पुरावेही कागदोपत्री सापडतात, पण एक गोष्ट निश्चित की महाराष्ट्र राज्य-स्थापनेनंतर जोतीरावांच्या प्रतिमेला जेवढा उजाळा मिळाला आणि त्यांच्या कीर्तीचा जेवढा उदोउदो झाला तेवढा पूर्वी कधीच झाला नव्हता. एका प्रदीर्घ अज्ञातवासात इथल्या ब्राह्मणी परंपरेने त्यांचे व्यक्तिमत्त्व व विचार यांना कोंडून टाकले होते.
आज त्या अज्ञातवासातून फुले बाहेर आल्यासारखे दिसतात. आंबेडकरांनी त्यांना आपले एक गुरू मानल्यामुळेही त्या दोन महापुरुषांच्या विचारांतील सातत्याकडे काही प्रमाणात अलीकडे लक्ष वेधले गेले आहे. पण एकंदरीत असे दिसते की फुले आणि आंबेडकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ खर्ची पडणारा वेळ, शक्ती व साधने यांचा जर ताळेबंद आपण मांडला तर त्यांचे सर्वात जास्त प्रमाण पुतळे, त्यांच्यावर हारतुरे, पताका, सुशोभन, छायाचित्रे, राणा भीमदेवी व भावनिक गौरवपर भाषणे इत्यादी ” उत्सवी” उपक्रमांवरच उधळले गेल्याचे आपल्या सहज लक्षात येऊ शकेल. बाबासाहेबांचे पुतळे आज गावोगावच नव्हेत तर वस्त्यावस्त्यांमधून उभे आहेत. जोतीरावांचेही आता सर्वत्र होऊ घातले आहेत. तत्त्वतः पुतळे उभारण्यास हरकत घेण्याचे कारण नाही किंवा त्यामागच्या भावनांचा अधिक्षेप करण्याचेही काहीच प्रयोजन नाही, पण काही सत्ये मात्र टाळता येणार नाहीत. एकतर पुतळ्यांच्या जागांपासून ते रंगरूपापर्यंत प्रत्येक तपशीलातून हिंदू समाजातील सामाजिक-आर्थिक विषमतांचे अभिव्यक्तीकरण घडत असते. दुसरे म्हणजे पुतळ्यांच्या उभारणीमागे अनेकांचे आर्थिक व राजकीय स्वार्थ व हितसंबंध दडलेले असतात आणि तिसरे असे की पुतळे हे संबंधित महापुरुषांच्या विचारांना पर्यायी तर ठरूच शकत नाहीत, उलट विचार गाडून टाकण्याच्याच दृष्टीने उपयुक्त ठरतात. ज्यांना त्या महापुरुषांच्या विचारांची भीती वाटते तेच बहुधा पुतळ्यांची उभारणी, समारंभपूर्वक मंत्र्याकरवी अनावरण, सजावट, गर्दी-यात्रा वगैरे सोहळे अशा “बिनडोक खटाटोपात आघाडीस असतात. महापुरुषांचे देव्हारे माजवून स्वतःकडे त्यांचे “प्रेषित”त्व मिरवणे त्यांना सर्वच दृष्टींनी सोयीचे असते.
महाराष्ट्राच्या विधानसभेसमोर जोतीराव फुले यांचा भव्य पुतळा उभारून कृतकृत्य होणा-या राज्यकत्र्याना फुले समग्र वाङमयाचे हिंदी व इंग्रजी भाषांतर करवून घेऊन सरकारी खर्चाने ते प्रकाशित करण्याची मात्र गरज भासत नाही यातले “नवब्राह्मणांचे कसब” समजून घेण्याची फार गरज आहे. आज राज्यपाल- मुख्यमंत्र्यांपासून लुंग्यासुंग्यापर्यंत कोणीही उठतो आणि “ जोतीराव थोर महात्मा होते, त्यांनी अमुक केले तमुक केले.” अशा स्वरूपाची मोघम शेरेबाजी करीत सुटतो. मुळात फुले-वाङ्मय वाचण्याची व समजून घेण्याची कुणालाच गरज भासत नाही. आंबेडकर जन्मशताब्दीची कालपरवा सुरुवात झाली, काही कार्यक्रम झाले, काही संकल्प घोषित झाले. बहंश कार्यक्रमांचे स्वरूप प्रासंगिक, उत्सवी व उत्साही असेच दिसते. अमुक एका प्रसंगी कोणी रक्तदान केले, गरीब मुलांना पाट्यापुस्तके वाटली, सहभोजने आयोजित केली किंवा मुंबई ते दिल्ली आणि परत अशी दौड काढली तर त्यात मुळात वाईट काहीच नसते. उलट काहीतरी स्वागतार्ह इष्टांश हमखासच असतो. पण प्रश्न असा आहे की शताब्दीच्या निमित्ताने फुले-आंबेडकरांचे नेमके काय टिकवायचे आणि जगासमोर ठेवायचे याबाबत काहीच निर्णय झाला नसल्याचे हे सारे कार्यक्रम द्योतक आहेत. सच्चे व बुद्धिवंत, अनुयायीसुद्धा संबंधित महापुरुषांना वैचारिक वारसा आचारप्रचारातून पुढे नेण्याऐवजी जेव्हा फक्त घोषवाक्यांची पोपटपंची करू लागतात तेव्हा भाटगिरी हाच ज्यांचा पारंपारिक व्यवसाय आहे त्यांचे आयतेच फावते आणि ते सिद्धांत फुले-आंबेडकरांच्या पुतळ्यांभोवती स्वयंसेवकांच्या शिस्तबद्ध पलटणी उभ्या करून मानवंदना देऊ लागतात आणि औष्ठिक पातळीवरून त्यांचा जोरदार जयघोष करून स्वतःचे नाणे उजवू लागतात. तेवढ्यावरून फुले आंबेडकरांचे परिवर्तनवादी विचार त्यांनी स्वीकारले वा सर्वमान्य झाले अशा भ्रमात कोणीही राहू नये.
शताब्दींचे कार्यक्रम केवळ अशा औपचारिकतेच्या पातळीवरच राहिले तर फुले आंबेडकरी विचारांना समाजात रुजवण्याच्या दृष्टीने ते कुचकामीच ठरतील हे उघड आहे. कोणताही विचार जनमानसात जोपर्यंत रुजत नाही तोपर्यंत त्याचे सामाजिक शक्तीत रूपांतर होत नाही आणि असे झाल्याखेरीज सामाजिक परिवर्तनाची प्रक्रियाच गतिमान होत नाही.
या शताब्दींच्या निमित्ताने असाही एक विचार येतो की फुले-आंबेडकरांचे जे कोणी स्वयंघोषित वारसदार राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रांत वावरतात त्यांच्यापैकी खरोखर आमूलाग्र परिवर्तन व्हावे या मताचे किती आहेत ? आणि आहे त्याचे समाजव्यवस्थेत स्वतःचे पुनर्वसन प्रतिष्ठित स्थानांवर झाले म्हणजे मग बाकीचे सारे जसे आहे तसेच राहिले तरी हरकत नाही असे वाटणा-यांची संख्या किती आहे? फुले आणि आंबेडकर यांना स्त्री-शूद्रादि अतिशूद्र शिक्षणवंचित आहेत याची सर्वात मोठी खंत होती. त्यांना असे वाटत होते की या वर्गातील काही व्यक्ती सुशिक्षित झाल्या की त्या सामाजिक परिवर्तनाची धुरा सांभाळतील आणि मग परंपरेच्या पंकात रुतून पडलेला नवसमाजरचनेचा गाडा गतिमान होईल. प्रत्यक्षात मात्र तसे झालेले नाही, ‘ब्राह्मण’ किंवा ‘ब्राह्मणशाही’ यांची जी काही गुणदोषवैशिष्ट्ये फुले आंबेडकरांनी अधोरेखित केली होती त्या सर्व गुणदोषांची बाधा झालेल्या नवब्राह्मणांचीच निपज आजच्या अभिजातवादी शिक्षणप्रणालीतून झालेली आज पाहायला मिळते.’ब्राह्मणी साम्राज्यवादा’चा निःपात हे आता कोणाचेच साध्य राहिले नसून ‘ब्राह्मण्यात’ आपला प्रवेश झाला की ‘साम्राज्यवादा’ला फारसा विरोध करण्याचे कारण नाही असाच एकूण या वर्गाचा पवित्रा असतो.
स्वातंत्र्यपूर्वकाळात फुले-आंबेडकरांच्या विचारधनाची उपेक्षा करून त्यांना विचारवंतच न मानण्याचा अक्षम्य अपराध करणारे ब्राह्मणश्रेष्ठी आज सापेक्षतः बरेच निष्प्रभ झाले आहेत; पण त्यांची जागा शूद्रादि अतिशूद्रांतील नवब्राह्मणश्रेष्ठींनी घेतली आहे. फुले आंबेडकरांच्या समतावादी विचारांचे त्यांनाही ब्राह्मणांना होते तेवढेच वावडे आहे; आणि त्यामुळे त्यांच्या जेव्हा लक्षात येईल की तळागाळापर्यंत फुले-आंबेडकरांचे मौलिक विचार जाणे आपल्या हितसंबंधांना मारक ठरत आहे तेव्हा तेच सर्वशक्तीनिशी हे विचार, आणि तशीच गरज पडली तर, त्या विचारांचे कर्ते यांनाही अज्ञातवासात पाठवण्यास मागेपुढे पाहणार नाहीत. नव्हे ती प्रक्रिया एका परीने देव्हारे माजवण्यातून सुरू झाली आहे असा इशारा करावासा वाटतो. कुणी सांगावे? फुले-जयंतीची द्विशताब्दी येईपर्यंत फुल्यांचा विसर पडून आंबेडकरांचे विचार गांधीविचारांप्रमाणेच फक्त खंडबद्ध होऊन सरकारी गुदामांची शोभा वाढवीत असतील. कधी काळी यांच्या शताब्दीचे संयुक्त सोहळे झाले होते अशी कोरडी माहिती फक्त इतिहासकार परस्परांना देतील. त्यासंबंधी वादही माजवतील. बाकी सारे जिथल्या तिथे असेल.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published. Required fields are marked *