समस्या हिंदुत्वाची – श्री. दिवाकर मोहनींना उत्तर
श्री. दिवाकर मोहनींनी ‘नवा सुधारक’च्या पहिल्या अंकात मुख्य दोन प्रश्न उपस्थित केले आहेत :- (१) हिंदू म्हणून करावयाची कर्तव्ये कोणती? आणि (२) ती न करताही एखाद्याला हिंदू म्हणवून घेता येईल काय? यांपैकी पहिल्या प्रश्नाचे उत्तर निश्चित ठरले तर दुसरा प्रश्न निकालात निघतो. कारण एखाद्याने ती किमान कर्तव्ये पार न पाडल्यास त्याला हिंदू म्हणवून घेणे वा त्याला हिंदू म्हणणे हे चुकीचे होईल.
या प्रश्नाची पार्श्वभूमी म्हणून श्री. मोहनींनी रामजन्मभूमी व बाबरी मशीद याविषयीचा वाद व त्यातून उसळलेल्या दंगली यांचा उल्लेख केला आहे. त्याविषयीचा तपशील आणि पत्रलेखकाचे आकलन ही दोन्ही विवाद्य आहेत.
रामजन्मभूमी व दंगली
रामजन्मभूमी ही वर्षानुवर्षे बहुसंख्य भारतीयांचे श्रद्धास्थान आहे. आक्रमकांपासून ती मुक्त व्हावी यासाठी शेकडो वर्षे हिंदुसमाज तनमनधनाने धडपडत आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पारतंत्र्याची शल्यभूत स्मारके दूर सारली जातील अशी फार मोठी आशा भारतीय बाळगत होते. रामजन्मभूमीची दुर्दशा त्यामुळेच भारतीय मनाला दुखःद वाटते. पण मुसलमान समाजाच्या गठ्ठा मताची लालची असणारी राजकारणी मंडळी रामजन्मभूमीच्या प्रश्नाकडे डोळेझाक करीत आली. शेवटी राजकारण्यांच्या टोलवाटोलवीने कळस गाठला. ती असह्य होऊन रामशिलापूजन व रामशिलान्यास या कार्यक्रमांतून देशातील बहुसंख्यसमाजाची इच्छाशक्ती प्रकट झाली. योगायोगाने रामशिलान्यासाचा दिवस गेल्या लोकराभा निवडणुकीच्या कालावधीत आला. त्यामुळे सत्ताधारी व सत्ताकांक्षी (विरोधक) या दोघांच्याही कसोटीचा प्रसंग उत्पन्न झाला. यास्तव गठ्ठा मतांची लालची असणाऱ्या, धर्माच्या नावावर अल्पसंख्य व बहुसंख्य अशी भांडणे लावून व कट्टरपंथी अल्पसंख्य समाजात भय जागृत करून त्यांची मते वर्षानुवर्षे स्वतःकडे खेचण्यात कुशल असणाऱ्या राजकारण्यांनी आपली नेहमीची अस्त्रे परजली, रामशिलापूजनाचे कार्यक्रम देशभर झाले. पण दंगली ज्या उसळल्या त्या मुख्यतः काँग्रेसशासित राज्यांत. याचा अर्थ कोणाच्याही लक्षात येऊ शकतो.
हिंदुस्थानातील बहुसंख्य हिंदुसमाज हा सर्वधर्मसमभाव, सहिष्णुता, एकात्मता, शांतिप्रियता यांच्याकडे स्वाभाविकपणे झुकणारा असल्यामुळे सर्व प्रकारचे साम्यवादी, पुरोगामी म्हणविणारे समाजवादी, नवबौद्धांतील आक्रमक वर्ग, दोन्ही डागरींवर हात ठेवून धार्मिक अल्पसंख्यकांच्या गठ्ठा मताचे लोणी पळवू इच्छिणारे इरसाल राजकारणी यांनी देशातल्या हिन्दुजागरणाने भयशंकित होऊन हिंदुसमाज विघटित व्हावा यासाठी हिंदुद्वेषाची आघाडी आपापल्या परीने प्रकट अप्रकट लढविण्याचा प्रयत्न शर्थीने केला. पण हिंदुसमाजात जन्मलेला, विश्वबंधुत्वाच्या कल्पनेने स्वतःला हिंदू म्हणवून घेण्यात संकुचितपणा मानणारा, प्रसंगी हिंदुहिताचा बळी देऊनही आपल्या सहिष्णू व अत्युदार वृत्तीचे प्रदर्शन इष्ट मानणारा, सर्वधर्मसमभाव व सर्वोदयवाद यांचा आदर्श बोलून दाखवणारा, असा एक लहानसा साधुदर्शनवर्ग पूर्वी काँग्रेसच्या पाठीशी होता. काळाच्या ओघात आचार्य विनोबांच्या निर्याणानंतर तो तुटलेल्या पतंगासारखा किंकर्तव्यमूढ अवस्थेत चाचपडत आहे. श्री. मोहनींच्या पत्रात नमूद असलेले रामजन्मभूमी, बाबरी मशीद दंगली याविषयीचे विवरण ह्या वर्गातल्या मनःस्थितीचे निदर्शक वाटते.
हिंदुत्वाचे स्वरूप
वस्तुस्थिती अशी आहे की हिंदुस्थानात ‘हिंदू’ शब्दाचा वापर कायद्याच्या क्षेत्रातला अर्थ लक्षात घेऊन होतो. विवाहविधी आणि वारसा या उत्तराधिकारी ठरविण्याच्या संदर्भात व्यक्तिगत स्वरूपाचा जो विशिष्ट कायदा आहे तो हिंदुस्थानात जो मुसलमान नाही, पारशी नाही वा ख्रिस्ती नाही त्या सर्वांना लागू होतो. त्या कायद्याच्या दृष्टीने हिंदुस्थानातला मुसलमान व ख्रिस्ती नसलेला प्रत्येक नागरिक हिंदू आहे. त्यामुळे श्री. दिवाकर मोहनी इच्छा असो किंवा नसो, जेथपर्यंत मुसलमान किंवा ख्रिस्ती होत नाहीत, (पारशी धर्मात प्रवेश नसल्यामुळे पारशी होणे शक्य नाही) तेथपर्यंत हिंदू आहेत. हिंदुस्थानातला मुख्य धर्म हा सनातन वैदिक धर्म आहे. वैदिकधर्मी, जैन, बौद्ध, शीख हे सर्व हिंदू संज्ञेच्या अंतर्गत येतात. तेव्हा हिंदू हा शब्द या सर्वांना लागू पडणाऱ्या अर्थाने घेतला पाहिजे. मग या सर्वात हिंदू घटकसमाजांपैकी प्रत्येकाचे उपासनापंथ वेगळे आहेत. पण सर्वजण कर्मवाद व पुनर्जन्म मानतात. सामूहिक जीवनाचे अंग म्हणून व्यक्तिशः आचरणात आणावयाचा आचारधर्म सर्वांचा समान आहे. अहिंसा, सत्य, अस्तेय, स्वच्छ वर्तन (शौच) नियमपालन (इंद्रियनिग्रह) हा वैदिक धर्मातला सार्ववर्णिक धर्म व बौद्धांच्या सिख्खापदातून, जैनांच्या आचारसूत्रातून सांगितलेला आचारधर्म प्राधान्याने समान आहे. शीख हे तर हिंदुसमाजाची क्षात्रवृत्ती, कर्तव्य म्हणून जपणारे अभिन्न अंग आहे.
आता हिंदुसमाजात जन्माला येऊन मी ईश्वर मानीत नाही असे म्हणणारा माणूस हिंदू राहू शकेल काय हा प्रश्न घेऊ. तो हिंदू राहू शकेल. कारण हिंदुघटक असणारे बौद्ध, जैन किंवा वैदिक असणारे मीमांसक व सांख्य हेही ईश्वर मानण्याची चिंता करीत नाहीत. पण सार्ववर्णिक धर्म पाळतात. निरीश्वरवादी म्हणवणारा नास्तिक हिंदू चार्वाक हाही त्याचे पालन अपरिहार्य मानतो. त्यामुळे एखाद्याने ईश्वर न मानला तरी व्यावहारिक हानी नाही. वर्णधर्माविषयी वाद आहेत पण आश्रमधर्म, ब्रह्मचर्य, गृहस्थ आदी अवस्थेत पाळावयाची कर्तव्ये यांविषयी गंभीर मतभेद संभवत नाहीत. यामुळे हिंदुस्थानातला वरील नागरिक या अर्थाने हिंदू आहे. तात्त्विक चिंतनात पूर्ण मुक्तता, उपासनेचे स्वातंत्र्य, पण व्यवहारात आश्रमधर्म व सार्ववर्णिक धर्म यांचे निष्ठापूर्वक पालन हे हिंदुजीवनाचे वैशिष्ट्य आहे. हिंदुसंस्कृती हा शब्द हेच वैशिष्ट्य सुचवितो. ही संस्कृती तो पाळत असल्यास, परदेशात गेल्यावरही त्याचे हिंदुत्व संपुष्टात येत नाही.
प्रेतदहन, किंवा प्रेतदफन, और्वदेहिक, श्राद्धपक्ष, विवाहविधी, भक्ष्याभक्ष्य याविषयी वैदिक, शीख, बौद्ध वा जैन यांच्या ज्या चालीरीती असतील त्याप्रमाणे साक्षात् त्या त्या वर्गाचा घटक वागू शकतो. जिह्वालौल्यासाठी गोमांस खाणे वर नमूद केलेल्या हिंदुघटकात कुठे असल्याचे दिसत नाही. तेव्हा वर नमूद केलेल्या बाबीपैंकी त्या त्या हिंदुघटकवर्गाच्या चालीरीतींशी न जमणारी वा विरुद्ध आचारधर्म असल्यास तो त्या त्या वर्गाच्या दृष्टीने प्रायश्चित्तार्ह वा दंड्य, ‘तनखैया’ होईल. त्यामुळे तो हिंदूतला भ्रष्ट किंवा पतित म्हणविला जाईल. किमान पात्रता नसलेल्याला दूषित ठरविणारा तो हिन्दू. असा वैदिकधर्मी बौद्ध अथवा जैन म्हणवला जाईल. किमान पात्रता नसलेल्याला दूषित ठरवणारा तो हिंदू अशी एक शिवपार्वती संवादातली पुराणोक्त व्याख्या आहे.
हीनं दूषयतीत्येव हिन्दुरित्युच्यते प्रिये ।
श्रीराम : भारतीयांचा मानबिंदू
राम हा अवतार म्हणून वा महापुरुष म्हणून वरील सर्व हिंदुसमाजघटकांना मान्य आहे. भारतीय चारित्र्याचा आदर्श म्हणून पुरुषोत्तम राम हा बहुसंख्य भारतीयांना मान्य आहे. लोकशाही जर बहुमताने चालते तर बहुमत रामाच्या पाठीशी आहे. तेव्हा भारतीय राष्ट्राचा आदर्श पुरुष असणाऱ्या रामाची जन्मभूमी ही दुर्दशेत राहणे हा राष्ट्रीय अपमान होतो. मग तो तसाच राहू द्यावा असे म्हणणे राष्ट्रभक्तीचे लक्षण होईल असे वाटत नाही.
रामजन्मभूमीविषयी श्रद्धा प्रकट केली किंवा आपल्याला हिंदू म्हणवून घेतले तर हिंदुसमाजात जन्म घेतल्याचे शल्य बोचणाऱ्या, वेळी अवेळी वैश्विकतेचा मुखवटा चढवणाऱ्या या मानवतेच्या भारतीय शागीर्दांना वेळी अवेळी हिंदुत्वाची समजून न समजून टिंगल करीत फक्त हिंदुसमाजात बिनधोक वावरता येते. मुसलमान वा ईसाई समाजात हे शक्य नाही. इतके सगळे करूनही इतर सर्व समाज त्यांना हिंदूच म्हणतो! पं. जवाहरलाल नेहरू स्वतःला फक्त जन्माच्या अधिकाराने हिंदू म्हणत. शिक्षणाने पाश्चात्य व संस्कृतीने इस्लामी असल्याचे सांगण्यात त्यांना गौरव वाटत असे. अनेक पुरोगामी समाजवादी याच तऱ्हेचे आहेत. पण सारे जग त्यांना हिंदू म्हणूनच ओळखत असते.
जगात काय निर्दोष आहे? प्रत्येक संप्रदायाची छाननी केल्यास त्यात अनेक दोष आढळतात. तेव्हा मी आपल्या संप्रदायाला किंवा स्वधर्माला का हिणवावे? सर्व धर्म समान आहेत असे म्हणणाऱ्याची तर फारच पंचाईत होते. प्रज्ञाचक्षू गुलाबराव महाराज म्हणत, ‘सर्व धर्म समान आहेत तर मी माझा धर्म का बरे सोडावा?’
तात्त्विक चिंतनाची पूर्ण मुक्तता, उपासनेचे स्वातंत्र्य, सार्ववणिक धर्म व आश्रमधर्म यांचे निष्ठापूर्वक पालन हे हिंदुत्वाचे – हिंदुजीवनपद्धतीचे वैशिष्ट्य आहे. संपूर्ण मानवसमाजाला आशास्थान असणारे हे हिंदुत्व तेजस्वीपणे प्रकट करण्याचे ऐतिहासिक कार्य आज स्वातंत्र्यप्राप्तीनंतर या समाजाला करावयाचे आहे.
के.रा. जोशी
२/२ एम्. आय्. जी. कॉलनी, वंजारी नगर, नागपूर ४४००० ३.
श्री. मोहनींच्या पत्रावरील आणखी काही प्रतिक्रिया :
(१) एकीकडे शास्त्रे सांगतात धर्म जन्माने नव्हे तर कर्माने ठरत असतो. तर दुसरीकडे अपत्यांवर पालक स्वतःच्या धर्माची लेबले लावण्यास उत्सुक असतात. त्यांचे हे करणे कितपते योग्य आहे? जन्मतः वा परंपरेने कोणाचा धर्म निश्चित होऊ शकतो काय? हा प्रमुख प्रश्न आहे.
देशात धर्माच्या नावाखाली सुरू असलेल्या घडामोडीत सश्रद्ध आणि अश्रद्ध सर्वांनीच कोणती तरी बाजू घेणे भाग आहे. निष्क्रिय राहणे म्हणजे या अत्याचारांना अप्रत्यक्ष मदत करणेच आहे.
एक तत्त्व आमचे धार्मिक नेते पुढे करत आहेत. धर्मपालनासाठी धर्मरक्षण करा आणि धर्मरक्षणासाठी अर्थातच इतर धर्मावर हल्ला करा.
अशा तऱ्हेचे धर्मकारण करणाऱ्या आमच्या नेत्यांचे धर्माबद्दलचे ज्ञान त्यांनी आणि आम्हीदेखील तपासून पाहिले पाहिजे.
श्री. अमोल पवाड़ टंडन वॉर्ड, भंडारा.
(२) हिंदुधर्माची दीक्षा दिली जात नाही. त्यामुळे मुद्दाम दुसऱ्या धर्माची दीक्षा आपण घेत नाही तोपर्यंत आपण हिंदूच राहतो.
गोमांस भक्षणासंबंधी, वैद्यकीय उपचार म्हणून घेतले तर पाप नाही, पण जिभेचे चोजले म्हणून घेतले तर पाप होईल. परंतु तेवढ्याने धर्म बुडाला, अगदी धर्मांतर झाले असे होत नाही.
ईश्वर न मानणारा नास्तिक मनुष्य हिंदू राहू शकत असेल तर कर्मसिद्धान्त, पुनर्जन्म, रामाचा अवतार आणि भगवद्वचने सगळे नाकारता येतील. पूर्वमीमांसा या दर्शनानुसार ईश्वर मानणे अवश्य नाही.
सांख्य दर्शनकार ईश्वर मानत नाहीत; त्यांना आणि सावरकरांना तुम्ही हिंदू समजत असाल तर तुमच्या प्रश्नाचे उत्तर आपोआप मिळेल. एक भारतीय म्हणून कर्तव्ये आणि हिंदू म्हणून कर्तव्य हे प्रश्न वेगळे करायला पाहिजेत. भागलपूर, पंजाब, काश्मीरची हिंसा आणि अत्याचार कोणीही केलेले असले तरी एका सुजाण भारतीयाचे काही कर्तव्य असेल की नाही?
परक्या देशाचे नागरिकत्व स्वीकारले तरी भारत ही माझ्या पितरांची भूमी व पूण्यभू राहू शकते. त्यामुळे माझ्या हिंदुत्वाला बाध येण्याचा प्रश्न येतोच कुठे?
प्रवीणा कवठाळकर
शांतिविहार, सिव्हिल लाईन्स, नागपूर
सुधारकांचा सोवळेपणा?
‘नवा सुधारका’च्या प्रकाशन समारंभी जी भाषणे झाली ती सर्व मननीय होती. पण एक गोष्ट खटकली, ती अशी: प्रा. दि. य. देशपांडे ‘नवा सुधारक’च्या धोरणाबद्दल खुलासा करताना असे म्हणाले, “आगरकरांच्या ‘सुधारका’चा ‘नवा सुधारक’ हा नवीन अवतार आहे. आमच्या नावावरूनच आमचे धोरण स्पष्ट व्हावे” इ. त्यानंतर मुख्य वक्ते प्रा. य. दि. फडके आपल्या भाषणात असे म्हणाले, “अवतार हा शब्द मला आवडत नाही.” पुढे कै. श्रीमती मनुताईंच्याबद्दल बोलताना ते म्हणाले, “आगरकर हे जणू मनुताईंचे दैवत होते, पण विवेकवाद्याला दैवत नसते.” ते असेही म्हणाले, “विवेकवादी बहुधा नास्तिक असतात, नाहीतर अज्ञेयवादी तरी असतात.” त्यामुळेच त्यांना ‘अवतार’, ‘दैवत’ या शब्दांचे, कल्पनांचे वावडे असावे, असा विचार मनात येऊन गेला आणि लक्षात आले की, कोणीही वक्ता आगरकरांचा उल्लेख करताना कै. हे विशेषण वापरत नव्हता. श्रीमती मनूताईंचे नावामागे कै. हा शब्द स्मृतिदिनाच्या फलकावर मात्र दिसत होता. तो मंचव्यवस्था सांभाळणाऱ्यांच्या भाषेचा व समजुतीचा द्योतक असावा.
मुद्दा असा आहे की, सर्व सुधारक विवेकवादी असतील, तरी सर्व विवेकवादी निरीश्वरवादी असलेच पाहिजेत असे आहे काय? पुढला प्रश्न असा की, निरीश्वरवादी झाले म्हणून त्यांनी रूढ भाषेतील ‘अवतार’सारखे काही अर्थवाही शब्द सोवळेपणाने दूर ठेवले पाहिजेत काय? ‘अवतार’ किंवा ‘नवा अवतार’ ह्या शब्दात जो अर्थ भरला आहे. तो इतक्या सहजपणे दुसऱ्या शब्दांत सांगणे सोपे नाही. आणि आपला ‘अवतार’ कल्पनेवर विश्वास नसेल म्हणून ‘अवतार’ शब्द वापरूच नये असे आहे काय? ‘कै.’ हा शब्दप्रयोग करणाऱ्या प्रत्येकाचा ‘कैलासा’वर विश्वास असणे आवश्यक आहे काय? खुद्द आगरकरांचा कैलासावर काय किंवा कैलासवासावर काय, विश्वास होता असे त्यांचा कोणी वाचक म्हणणार नाही. याबाबतीत त्यांच्या एका लेखाकडेच लक्ष वेधण्यासारखे आहे. ‘आगरकर-वाङ्मय खंड ३ (संपादक म. गं. नातू व दि. य. देशपांडे) मध्ये केरो लक्ष्मण छत्रे या आपल्या अद्वितीय गुरुवर्यांना श्रद्धांजली वाहताना आगरकरांनी त्यांचा उल्लेख “कै. रा. ब. केरो लक्ष्मण छत्रे” असा केला आहे. इतकेच नव्हे तर “परमेश्वरापाशी आमची एवढीच प्रार्थना आहे की, केरोपंतांचे उदाहरण डोळ्यापुढे ठेवून त्यांच्याप्रमाणे वर्तन करणारे अनेक लोक या भरतभूमींत निपजोत.” (पृ. ३५२) अशी करुणा त्यांनी भाकली आहे. एकूण काय तर सुधारकांनी इतका सोवळेपणा ठेवला तर हळूहळू शुभ (आरंभ), मंगल (कार्य) इत्यादी शब्दप्रयोगही ते वर्ज्य समजू लागतील. सुधारकांचा हा ‘सोवळे’पणा जरा जास्तच नाही का?
चारुशीला जोशी
१८, दक्षिणपूर्व रेल्वे, दुसरा लेआऊट, प्रतापनगर, नागपूर : २२