विवाह आणि नीती – प्रकरण ३

पितृसत्ताक व्यवस्था
पितृत्व या शरीरशास्त्रीय गोष्टीची ओळख पटल्याबरोबर पितृत्वाच्या भावनेत एक नवीन घटक प्रविष्ट झाला आणि त्यामुळे जवळजवळ सगळीकडे पितृसत्ताक समाजांची निर्मिती घडून आली. अपत्य हे आपले ‘बीज’ आहे हे ओळखल्याबरोबर पित्याच्या अपत्यविषयक भावकंदाला (sentiment) दोन गोष्टींमुळे नवे बळ लाभते – अधिकाराची आवड आणि मृत्यूनंतर जीवनाची इच्छा. आपल्या वंशजांचे पराक्रम हे एका अर्थाने आपलेच पराक्रम आहेत आणि त्यांचे जीवन आपल्याच जीवनाचा विस्तार आहे; व्यक्तीच्या महत्त्वाकांक्षेचा तिच्या मृत्यूबरोबरच अंत होत नाही आणि वंशजांच्या चरित्रांतून तिचा हवा तितका विस्तार होऊ शकतो या कल्पना स्वाभाविक होत्या. एब्राहामला जेव्हा सांगण्यात आले की तुझे पुत्र-पौत्र कनानच्या प्रदेशाचे स्वामी होतील तेव्हा त्याला किती समाधान वाटले असेल याची कल्पना करा. मातृवंशीय समाजांत कौटुंबिक महत्त्वाकांक्षा स्त्रियांपुरतीच मर्यादित असावी लागते आणि स्त्रिया लढाईत लढत नसल्यामुळे त्यांना ज्या काही महत्त्वाकांक्षा असतील त्यांचा प्रभाव पुरुषांच्या महत्त्वाकांक्षेहून कमीच पडणार. त्यामुळे पितृत्वाचा शोध लागल्यावर मानवी समाज मातृवंशीय काळात होता, त्यापेक्षा अधिक स्पर्धक, अधिक उत्साही, अधिक उद्योगी आणि धडपड्या होणार असा निष्कर्ष काढावा लागेल. हा परिणाम काहीसा जर-तारी (म्हणजे जर-तर अशा स्वरूपाचा) आहे; पण त्याखेरीज पत्नीच्या पतिनिष्ठेचा आग्रह धरण्यास एक नवे आणि अत्यंत महत्त्वाचे कारण पुरुषास सापडले. ते कारण म्हणजे मत्सर. बहुतेक आधुनिक लोक समजतात तितका मत्सरातीले सहजात (instinctive) घटक बलवान नसतो. पितृसत्ताक समाजातील पराकाष्ठेच्या मत्सराचे कारण वंशपरंपरा भंग होण्याची भीती. ज्याला आपल्या पत्नीचा कंटाळा आला आहे आणि जो आपल्या प्रेयसीवर उत्कटपणे आसक्त आहे अशा मनुष्यालाही आपल्या प्रेयसीवर प्रेम करणार्‍या प्रतिस्पध्र्याचा जितका मत्सर वाटतो त्याहून आपल्या पत्नीच्या प्रियकराचा जास्त वाटतो यावरून हे सिद्ध होते. औरस अपत्य हे मनुष्याच्या अहंचेच संतान (continuation) असते आणि त्याला त्याबद्दल वाटणारा स्नेह एक प्रकारची आत्मप्रीतीच असते. परंतु जर ते अपत्य अनौरस असेल तर ज्याच्याशी त्याचा जीवशास्त्रीय संबंध नाही अशा मुलावर प्रेम करण्यात त्याची फसवणूक होते. म्हणून पितृत्वाचा शोध लागल्यानंतर पत्नीची एकनिष्ठा संपादण्याचा स्त्रीचे दास्य हा एकमेव उपाय ठरला. हे दास्य प्रथम शारीरिक होते, नंतर ते मानसिकही झाले, आणि त्याची परमावधी व्हिक्टोरियन काळात झाली. स्त्रियांच्या दास्यामुळे बहुतेक नागरित (civilized) समाजात पती आणि पत्नी यांच्यातील खरा सहचरभाव नाहीसा झाला; त्यांच्यामधील संबंधाचे स्वरूप एका बाजूने मेहेरबानी आणि दुसर्‍या बाजूने कर्तव्य असे झाले. आपले सर्व गंभीर विचार आणि आकांक्षा पुरुषाने आपल्या मनातच ठेवल्या; कारण जर पत्नीही महत्त्वाकांक्षी असेल तर ती त्याचा विश्वासघात करण्याचा संभव असतो. स्त्रीला बुद्ध या मूर्ख आणि अरंजक (uninteresting) बनविण्यात आले. प्लेटोच्या संवादावरून आपला असा ग्रह होतो की तो आणि त्याचे मित्र फक्त पुरुषांनाच गंभीर प्रेमास पात्र समजत. यात आश्चर्य काही नाही; कारण त्यांना ज्या ज्या गोष्टीत रस होता त्या सर्व अथेनियन स्त्रीला वज्र्य होत्या. नेमकी हीच परिस्थिती परवापर्यंत चीनमध्येही प्रचलित होती, आणि तशीच ती इराणमध्ये फारसी काव्याच्या वैभवाच्या काळातही होती, आणि हीच गोष्ट इतर अनेक काळ आणि स्थळे यांतही आढळते. पुरुष आणि स्त्रिया यांमधील प्रेमनामक संबंधाचा अपत्ये औरस असली पाहिजेत या आग्रहाने नाश झाला, आणि केवळ प्रेमच नव्हे, तर नागरणाली स्त्रिया जे उपदान करू शकतात ते सर्वच त्यामुळे अतिशय तुटपुंजे राहिले आहे.

वंशपरंपरेच्या गणनेची पद्धत बदलल्याबरोबर अर्थव्यवस्थाही बदलली. मातृवंशीय समाजात पुरुषाला वारसा मामाकडून मिळतो, तर पितृसत्ताक समाजात तो * पित्याकडून प्राप्त होतो. पितृवंशीय समाजातील पिता आणि पुत्र यांचा संबंध मातृवंशीय समाजात आढळणाच्या दोन पुरुषांमधील कोणत्याही संबंधाहून अधिक घनिष्ठ असतो, कारण आपण पाहिल्याप्रमाणे आपण जी कमें स्वाभाविकपणे पित्याकडे देतो त्यांची वाटणी मातृवंशीय समाजात पिता आणि माता यांच्यात, स्नेह आणि लाड पित्याकडे, तर अधिकार आणि संपत्ती मामाकडे, अशी केली जाते. म्हणून आदिम कुटुंबापेक्षा पितृसत्ताक कुटुंब हे अधिक सुबद्ध असते हे स्पष्ट आहे.

पितृसत्ताक व्यवस्थेच्या प्रवेशानंतरच वर वधूच्या कौमार्याची अपेक्षा करू लागले असे दिसते. जिथे मातृवंशीय व्यवस्था प्रचलित असते तिथे तरुण मुली तरुण मुलांप्रमाणेच स्वैर व्यवहार करतात; पण विवाहबाह्य संबंध पाप आहे हे स्त्रियांच्या मनावर बिंबवणे जेव्हा अति महत्त्वाचे वाटू लागले तेव्हा ते स्वैर जीवन चालू देणे असह्य झाले.

आपल्या अस्तित्वाची ओळख पटल्यानंतर पित्यांनी सर्वत्र त्या गोष्टीचा पुरेपूर फायदा घेण्यास सुरुवात केली. नागरणाचा (civilization) इतिहास हा मुख्यतः पितृसत्तेच्या क्रमाने होणार्‍या व्हासाचा इतिहास आहे. बहुतेक नागरित देशांत पितृसत्तेने ऐतिहासिक कालखंडाच्या आरंभाच्या थोड्या आधी शिखर गाठले. चीन आणि जपान या देशात आपल्या काळातही आढळणारी पूर्वजांची पूजा हे प्राचीन नागरणाचे सामान्य लक्षण होते. पित्याची अपत्यांवर अनियंत्रित सत्ता चालत असे, आणि अनेक ठिकाणी, उदा. रोममध्ये, ती त्यांच्या जन्ममृत्यूवरही चाले. मुलींना नागरित काळात सर्वत्र आणि, अनेक देशांत मुलांनाही, पित्याच्या संमतीशिवाय विवाह करता येत नसे, आणि त्यांनी कोणाशी लग्न करावे हे पिता ठरवी. स्त्रीला उभ्या आयुष्यात कधीही स्वतंत्र अस्तित्व नव्हते; आधी ती पित्याच्या अधीन असे, आणि नंतर पतीच्या. त्याचबरोबर एखादी म्हातारी सबंध कुटुंबावर जवळजवळ अनियंत्रित अधिकार गाजवू शके. तिचे मुलगे आणि त्यांच्या बायका सर्वच तिच्या छत्राखाली एकाच घरात राहात, आणि तिच्या सुना तिच्या पूर्ण आज्ञेत असत. चीनमध्ये अगदी आजसुद्धा तरुण विवाहित मुलींना सासूच्या जाचामुळे आत्महत्या करावी लागल्याची उदाहरणे घडतात; आणि आज जे चीनमध्ये दिसू शकते ते अगदी अलिकडच्या काळापर्यंत युरोप आणि आशिया खंडातील नागरित भागांत सार्वत्रिक होते. जेव्हा येशू म्हणाला की, मी मुलाला बापाविरुद्ध आणि सुनेला सासूविरुद्ध चिथावणी देण्याकरिता आलो आहे, तेव्हा त्याच्या मनात ही अजूनही सुदूरपूर्वेत आढळणारी कुटुंबे होती. आपल्या वरचढ शक्तीच्या साह्याने जो अधिकार पित्याने मिळविला त्याला धर्माने पाठिंबा दिला. धर्माची व्याख्या देव शासनाच्या बाजूने असतात असा विश्वास अशी करता येईल. पूर्वजांची पूजा किंवा तिच्यासारखे काहीतरी सर्व दूर प्रचलित होते. ख्रिस्ती धर्माच्या कल्पना, आपण पाहिल्याप्रमाणे, पितृत्वाच्या माहात्म्याने भारलेल्या आहेत. समाजाची राजसत्तावादी आणि महाजनसत्तावादी (aristocratic) रचना, तसेच वारसाहक्काची व्यवस्था, सर्वत्र पित्याच्या अधिकारावर आधारली होती. आरंभीच्या काळात आर्थिक हेतूंनी ही व्यवस्था उचलून धरली गेली. मनुष्यांना विपुल संततीची इच्छा असे आणि ती असणे त्यांच्या किती फायद्याचे होते हे आपल्याला बायबलमधील जगदुत्पत्तीच्या (Genesis)वर्णनावरून दिसते. पशूचे मोठाले कळप जवळ असणे जितके लाभकारी असे, तितकेच पुष्कळ पुत्र असणेही असे. म्हणून त्या काळात यावेने ‘बहु व्हा’ ‘संख्या वाढवा’ असा आदेश दिला होता.

पण नागरण जसे वाढत गेले तशी आर्थिक परिस्थितीही बदलली आणि त्यामुळे जे धार्मिक आदेश एका काळी स्वार्थाला आवाहन करीत ते त्रासदायक होऊ लागले. रोमची भरभराट झाल्यावर तेथील श्रीमंतांची कुटुंबे मोठी राहिली नाहीत. रोमन उत्कर्षाच्या उत्तर काळातील शतकांत जुनी अभिजात (patrician) घराणी नीतिमार्तंडांच्या आदेशांना यावे (Yaveh), म्हणजे ज्यूंचा परमेश्वर, न जुमानता क्रमाने नष्ट होत होती; हे उपदेश आज जितके निष्फळ होत आहेत तितकेच तेव्हाही होते. घटस्फोट सोपे आणि सामान्य झाले. वरच्या वर्गातील स्त्रियांना जवळपास पुरुषांच्या बरोबरीचे स्थान प्राप्त झाले आणि पित्याची सत्ता उत्तरोत्तर कमी होत गेली. हा बदल अनेक प्रकारे पुष्कळसा आपल्या काळातील बदलासारखाच होता, पण तो वरच्या वर्गापुरता मर्यादित राहिला होता, आणि जे त्याच्यापासून लाभ करून घेण्याइतके श्रीमंत नव्हते त्यांना त्यामुळे धक्का बसला. आपल्या नागरतेहून प्राचीन नागरता या बाबतीत भिन्न होती की ती लोकसंख्येच्या फारच लहान अंशापुरती मर्यादित राहिली होती. त्यामुळे ती जोपर्यंत अस्तित्वात होती तोपर्यंत ती अस्थिर असे आणि त्यामुळेच शेवटी ती खालुन येणार्‍या अतिश्र द्धेच्या (superstition) लोंढ्याला बळी पडली. ख्रिस्ती धर्म आणि बर्बर टोळ्या यांच्या आक्रमणाने ग्रीक-रोमन विचारप्रणाली नष्ट झाली. पितृसत्ताक व्यवस्था जरी राहिली आणि सुरुवातीला जरी ती रोमन महाजनशाहीतील व्यवस्थेपेक्षा अधिक बळकट झाली, तरी तिला एका नव्या घटकाशी समझोता करावा लागला. हा घटक म्हणजे कामविषयक ख्रिस्ती दृष्टिकोण, आणि आत्मा व मुक्ती यांच्याविषयीच्या ख्रिस्ती सिद्धांतातून निष्पन्न होणारा व्यक्तिवाद. कोणताही ख्रिस्ती समाज प्राचीन नागरित समाज व सुदूर पूर्वेकडील समाज यांच्या इतकी उघड स्वाभाविक किंवा नैसर्गिक होऊ शकत नाही. शिवाय ख्रिस्ती समाजातील व्यक्तिवादाचा ख्रिस्ती देशांतील राजकारणावर प्रभाव पडला आणि वैयक्तिक अमरत्वाची ग्वाही मिळाल्यामुळे अपत्यांच्याद्वारे मिळणाया मानीव अमरत्वाविषयी मनुष्यांची आस्था कमी झाली.

आधुनिक समाज जरी अजून पितृवंशीय असला आणि कुटुंबही अजून अस्तित्वात असले, तरी प्राचीन समाजांच्या तुलनेत पितृत्वाला फारच कमी महत्त्व उरले आहे. तसेच कुटुंबाचा आकारही पूर्वीच्या मानाने फारच अल्प झाला आहे. मनुष्यांच्या आशा आणि महत्त्वाकांक्षा आज बायबलमध्ये जगदुत्पत्तीत वर्णिलेल्या कुलपतींच्या आशा आणि महत्त्वाकांक्षा याहून फारच भिन्न झाल्या आहेत. मोठ्या वंशविस्ताराने मोठेपणा मिळविण्याऐवजी माणसे आता शासनसंस्थेत अधिकाराचे स्थान मिळवून मोठेपणा मिळवू इच्छितात. पारंपारिक नीती आणि देवविद्या यांचे सामर्थ्य कमी झाले आहे. याचे कारण हे आहे. हे कसे घडून आले हे पाहण्याकरिता मनुष्यांच्या विवाह आणि कुटुंब यांविषयीच्या मतांवर धर्माचा काय प्रभाव पडला ते आता तपासले पाहिजे.

अनुवादक: म. गं. नातू

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.