दहशतवाद आणि धर्म

स्वातंत्र्योत्तर भारताला ज्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले त्यातील दहशतवादाची समस्या ही अत्यंत महत्त्वाची मानावी लागते. सद्यःपरिस्थितीतील दहशतवादाचे स्वरूप व व्याप्ती देशाच्या एकतेला आणि अखंडतेलाच आव्हान देऊ लागली आहे. निरपराध व्यक्तींचे शिरकाण हे ह्या समस्येचे एक प्रभावी अंग आहे. ह्यामुळेच दहशतवादाच्या समस्येचे विश्लेषण करण्याची गरज निर्माण झाली आहे. तसेच दहशतवादी कृत्यांशिवाय कोणत्याही समस्येकडे शासनाचे लक्ष जात नाही, म्हणून अशी कृत्ये करावी लागतात, असाही समज बळावत चालला आहे. दहशतवादाच्या मागे नेहमीच राजकीय, आर्थिक कारणे असतात व म्हणून आर्थिक संपन्नता हेच दहशतवादाला खरे उत्तर आहे असे मतही व्यक्त केले जाते. पंजाबातील आजच्या दहशतवादास उपरोक्त कारणे कितपत लागू पडतात यापेक्षा या दहशतवादास धार्मिक हितसंबंध कितपत कारणीभूत आहेत, याचा शोध घेण्याचा प्रयत्न प्रस्तुत निबंधात केलेला आहे.

पंजाबचे राजकारण स्वातंत्र्यपूर्वकालापासून धर्माधिष्ठित राहिलेले आहे. परकीयांच्या विरुद्ध लढतानाही धर्माने प्रेरणा दिली. अकाली दलाची स्थापना, पंजाबी सुभ्याची मागणी, ‘अमृतसर हे पवित्र शहर म्हणून जाहीर करावे’ ही मागणी आणि ‘खलिस्ताना’ ची मागणी – अशा इतर अनेक मागण्या धर्माचे नाव घेत केल्या गेल्या व केल्या जात आहेत. पंजाबामधील राजकारणाची शीखधर्म हा एक अन्योन्य घटक आहे. धार्मिकता हा पंजाबच्या राजकीय-सामाजिक मानसिकतेचा एक अविभाज्य घटक आहे हे लक्षात घेतले पाहिजे.

पंजाबात चांगले-वाईट परिवर्तन हे धर्मावरील निष्ठेच्या द्वाराच घडून आलेले आहे. तसेच शीख धर्मानही कळत नकळत धर्मगुरु, धर्मस्थळ, धार्मिक आचार-विचार, धार्मिक उत्सव यांच्याद्वारे ही निष्ठा टिकवून ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न केला आहे. धर्माच्या या प्रयत्नातूनच अकालतक्तासारखी सत्तास्थानेही निर्माण करता आली आणि त्यांचे महत्त्व व अधिमान्यता वाढविण्यात आली. इस्लामकडून स्वीकारलेला किंवा प्रतिक्रिया म्हणून उत्पन्न झालेला धार्मिक कडवेपणा असा जोपासला गेला की त्यातून शीख धर्मसत्ता नकळत अत्यंत प्रबल होत गेली. सुवर्णमंदिराभोवती घुटमळणारे पंजाबचे राजकारण ही फलश्रुतीच मानावी लागते. धर्मविचारांचा समाजमनावरील पगडा विलक्षण असल्याने मार्क्सवादी पक्ष पंजाबात यशस्वी होऊ शकले नाहीत, पण इतर राजकीय पक्षांनाही समाजमान्यता मिळविण्यासाठी शीख धर्माचा आश्रय वा आधार शोधावा लागला. अकाली दलातले सर्वच घटक आपल्या कृत्यांचे समर्थन करण्यासाठी सर्वप्रथम धर्माचाच आधार घेताना दिसतात. हे पंजाबातील राजकारणाचे एक प्रधान वैशिष्ट्य आहे. म्हणूनच पंजाबातील आजच्या दहशतवादाचे मूळ धार्मिक भाव-भावनांमधे शोधावे लागते.

‘ध्येयप्राप्तीकरिता हिंसक मार्गाचाच उपयोग करणे’ ही दहशतवादाची एक ढोबळ व्याख्या म्हणता येईल. दहशतवादाची इतर काही ठळक वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे –
१. दहशतवादाचा अवलंब करणान्यांची स्वतःच्या विचारांवर व पद्धतींवर आणि संघटनेच्या ध्येयधोरणांवर असामान्य श्रद्धा असते.
२. दहशतवादी कृत्यातील व्यक्तींचा संघर्ष हा ‘जिवावर उदार होऊनच चालू राहतो. ध्येयधोरणांसाठी सर्वस्व देण्याची तयारी ही अत्यावश्यक बाब असते.
३. दहशतवाद समुदायाद्वारे स्वीकारला गेल्यास त्याची तीव्रता व समाजावरील त्याचा परिणाम अधिक प्रभावी असतो.
४. दहशतवादासाठी भावनेला आवाहन करणारी, स्वप्नरंजनास आधारभूत ठरणारी, भडक प्रचारकी स्वरूपाची विचारधारा आवश्यक असते.
५. अशी विचारधारा अधिक प्रभावी होण्यासाठी समाजातील आर्थिक, सामाजिक, राजकीय दोषांचा, विषमतेचा, परिस्थितीचा संदर्भ घेणे आवश्यक असते. असा संदर्भ नेहमीच दिला जातो.
६. दहशतवाद यशस्वी होण्यासाठी भावनेला भडकवू शकणारे, दहशतवादी कृत्यांत सुसूत्रता, संघटितपणा आणणारे व अनुयायांच्या मनातील निष्ठेला सदैव टिकवून ठेवण्याचे कसब असणारे प्रभावी नेतृत्व लागते.
७. समाजातील व्यक्तीचे भावविश्व, संस्कृती, धर्म, श्रद्धा, समज व रीतिरिवाज अशा भावनिक बाबींची दखल घेऊन त्यांचा उपयोग दहशतवादी करून घेतात, कारण समाजाचे पाठबळ असल्याशिवाय दहशतवाद यशस्वी होत नाही.

उपरोक्त सर्व वैशिष्ट्ये पंजाबमधील दहशतवादात आढळतात. मात्र ह्या दहशतवादाचे धार्मिक अंग अधिक प्रभावी आहे हे विशेष महत्त्वाचे. शीख धमनि पंजाबमधील राजकारणाला व आजच्या दहशतवादाला तीन मूलाधार उपलब्ध करून दिले आहेत. ते असे सांगता येतील.
१. एक ग्रंथ, एक विचारधारा, एक उपासनापद्धती विकसित करून त्याद्वारे धर्मसत्तेचा अंकुश असणार्‍या राजकीय संस्कृतीची निर्मिती केली.
२. धर्मगुरूंचे महत्त्व दिवसेंदिवस वाढवून धर्मसत्तेचे केन्द्रीकरण केले.
३. धर्मसत्तेचे नियंत्रण-संचालन करण्यासाठी शीख समाजाच्या भावजीवनाशी, धर्मभावनांशी निगडीत असे एकच प्रमुख श्रद्धास्थान – सुवर्णमंदिर – निर्माण केले.

या तीन बाबींचा परिणाम म्हणजे धर्माच्या आधाराने सुवर्णमंदिरातून चाललेले दहशतवादी राजकारण होय.

पंजाबातील दहशतवादी चळवळीस आता जवळजवळ ६ ते ७ वर्षे होत आली. दिवसेंदिवस ही चळवळ नष्ट न होता अधिकाधिक आक्रमक होताना दिसत आहे. हे होण्याचे कारण काय ? सर्वात महत्त्वाचे म्हणजे भिंद्रानवालेच्या रूपाने शिखांच्या भावनेला आवाहन करू शकणारे, धार्मिक अधिसत्ता (म्हणजे एक प्रकारे जनतेची अधिमान्यता असणारी) उपभोगणारे, असंतोपाला धार्मिक इब देऊन संघटित रूप देणारे असे अत्यंत प्रभावी नेतृत्व दहशतवाद्यांना मिळाले. दुसरी बाब म्हणजे अकाली दलातील दुफळीमुळे निर्नायकी स्थिती आलेली होती व काँग्रेस शासनाची सत्ता चिरकाल टिकून होती. शिखांच्या अस्मितेला चेतवण्याच्या आणि असंतोषाला संघटित करण्याच्या नेतृत्वाची उणीव भिंद्रनवाले व त्याच्या सहकार्‍यांनी काही अंशी भरून काढली आणि ‘पंथ संकटात असल्याची’ आरोळी ठोकली.

पंजाबमधे प्रारंभापासून धर्माचा आणि संस्कृतीचा अहंकार जोपासला गेला होता. पुरोगामी धर्मनिरपेक्ष चळवळींचा प्रभाव न पडल्याने धार्मिक अस्मिता बोथट झाल्या नाहीत. जनतेमध्ये वैज्ञानिक, बुद्धिप्रामाण्यवादी विचारांचा प्रचार आणि प्रसार ने झाल्याने धार्मिक आचारविचारांना आह्वान देण्याची प्रवृत्ती विकसित झाली नाही. हे वैशिष्ट्य भारतातील इतर प्रांतातही कमीअधिक प्रमाणात दिसतेच. पंजाबातील उच्चविद्याविभूषितांनीही धर्मसत्तेचे श्रेष्ठत्व मुकाट्याने मान्य केले. सुवर्णमंदिरात सैन्य पाठविल्याबद्दल अकाल तख्ताने दिलेल्या जोडे पुसण्याच्या शिक्षेचे पालन करणारे मुख्यमंत्री सुरजीतसिंग बर्नाला असोत, की सुवर्णमंदिरातील अतिरेक्यां विरु द्धच्या ‘ब्ल्यू स्टार ऑपरेशन ‘ नंतर भारत सरकारकडून मिळालेल्या किताबास परत करणारे खुशवंतसिंग असोत, सारेच धर्मसत्तेचे गुलाम झालेले आहेत. राजसत्ता ही निधार्मिक व धर्मसत्तेपेक्षा उच्चतर असली पाहिजे, कारण त्यावर आधुनिक लोकशाही व्यवस्थेचे यशापयश प्रामुख्याने अवलंबून असते, ही जाणीवच अजून पंजाबात रुजलेली नाही.

अकालतख्ताने काढलेला हुकूमनामा नाकारण्याची बर्नालांची कृती हे उशीरा सुचलेले शहाणपण होते. पंजाबातील राजकारणाचे धर्मसत्तेवर अंकुश न ठेवण्याचे हे वैशिष्ट्यच तेथील राजकारणाला, लोकशाहीधिष्ठित निधार्मिक, राज्यव्यवस्थेला व पर्यायाने तेथील राजकीय प्रक्रियेला व नेत्यांनाच संपुष्टात आणू लागले आहे, ही अत्यंत चिंताजनक बाब होय.

धार्मिक नेत्यांचे नेतृत्व संपुष्टात आणण्यात धार्मिक नेत्याच्या धर्माच्या चुकीच्या उपयोगासाठी त्यांना आव्हान देऊन त्यांच्या विरोधी जनमत उभे करण्यात राजकीय नेते अपयशी ठरल्याने आजची परिस्थिती उद्भवली आहे.

‘धर्म ही अफूची गोळी आहे असे म्हणताना धर्माचा मानवी भावभावनांवरील प्रभाव व धर्मापायी वाटेल ते कृत्य करण्याची धार्मिकांची तयारी मार्क्सने लक्षात घेतली होती, पंजाबातील दहशतवाद दिवसेंदिवस अधिक उग्र होण्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे धर्माचा समाजमनावर असलेला प्रभाव होय. धर्माकरिता प्राण देण्याची तयारी असलेल्या युवकांची वाढती संख्या व परकीयांकडून मिळणारी साधनसंपत्ती यामुळे दहशतवाद दिवसेंदिवस वाढत आहे.

राजकीय सत्ता प्राप्त करण्यासाठी धार्मिक गटांचे सहकार्य स्वीकारण्याची परंपरा अजूनही चालू आहे. दहशतवादी अतिरेक्यांच्या मदतीने गेलेली सत्ता मिळविण्यासाठी तोहरा-प्रकाशसिंग बादलांसारखे नेते पुढाकार घेत असल्याने दहशतवाद्यांना अधिक महत्त्व प्राप्त होऊ लागले आहे. कोणतीही विशेष कुवत नसलेले धर्मगुरु, भिंद्रनवाले याने केलेले खलिस्तानचे स्वप्नरंजन, खलिस्तानसाठी मरणान्यांचे सत्कार, भिंद्रानवालेच्या प्रतिमांचे होणारे पूजन आणि धार्मिक कट्टरतेची व सूडाची भावना यामुळे बेभान झालेले युवक व त्यांचे पाठीराखे – या सार्‍यांचे दहशतवाद वाढविण्यात झालेले योगदान एका बाजूला; परंतु धर्म व राजकारण वेगळे ठेवले पाहिजे, निरपराध्यांचे शिरकाण थांबविले पाहिजे, असे म्हणणारे बर्नालासारखे नेते धर्मसत्तेच्या श्रेष्ठत्वाला आव्हान देण्याची भूमिका उघडपणे घेताना दिसत नाहीत. इंदिरा गांधीच्या खुन्यांना आमच्या धर्मानुसार शहीदच मानले पाहिजे असे म्हणणारे संत लोंगोवाल दहशतवादाचे नकळत समर्थन करून गेले.

शीख धर्म दहशतवाद शिकवतो की नाही हा प्रश्न गौण ठरू पाहात आहे, कारण सध्यातरी शिखांचे प्रमुख धर्मस्थळ व अकालतख्त दहशतवाद्यांच्या कज्यात आहे. उपलब्ध शस्त्रांच्या मदतीने दहशतीचे वातावरण निर्माण करून शीख विरोधकांना नष्ट करणे वा सत्ताप्राप्तीची लालूच दाखवून स्वधर्मीयांना दहशतवादी कृत्यात सहभागी करून घेणे वा आपले समर्थक बनवणे हे दहशतवाद्यांचे नवे उद्दिष्ट आहे. त्यासाठी त्यांनी धर्माला वेठीस धरले आहे.

धर्मसत्तेच्या समर्थनामुळेच पंजाबातील दहशतवाद अधिक भीषण झाला आहे व राजकीय पक्षांच्या नेतृत्वाच्या अकर्मण्यतेमुळे राजसत्ता धर्मसत्तेची अंकित होऊ लागलेली आहे. राजकारणातील अपयश देशाला विभाजनाकडे नेणार आहे. धार्मिक राजकारणाची पंजाबातील दहशतवाद ही फलश्रुती लोकशाही व्यवस्थेला म्हणजे पर्यायाने निधार्मिक व्यवस्थेला धोका देणारी ठरणार आहे.

पंजाबातील दहशतवादाला संपविणे लष्कराला शक्य नाही, कारण शीख धर्माची व धर्मगुरूंची धर्माच्या नावावर साच्या पंजाबातून नवे अतिरेकी मिळविण्याची क्षमता आहे. ह्या दहशतवादाचे खरे उत्तर म्हणजे धर्मसत्तेला, राज्यसत्तेपेक्षा मिळालेले श्रेष्ठ स्थान संपुष्टात आणले पाहिजे. हे राजकीय पक्षांनीच करायला हवे आहे. अकाली दलातील पुरोगाम्यांना हे कार्य हाती घ्यावे लागणार आहे. हे त्यांनी केले तर येत्या काही वर्षात दहशतवादास आळा बसेल. धर्म, धर्मगुरु व धार्मिक स्थळे यांच्याकडून दहशतवाद्यांना मिळणारी अधिमान्यता व राजकीय सत्ताप्राप्तीसाठी अतिरेक्यांशी सहकार्य करण्याची नेत्यांची प्रवृत्ती — हा पंजाबातील राजकारणाचा झालेला स्थायिभाव संपुष्टात आणणे ही काळाची गरज आहे. यासाठी खालील उपाय योजावे लागतील.
१. पंजाबातील दहशतवादाविरोधी जनमत संघटित केले पाहिजे.
२. धर्मगुरूंच्या आदेशांना आह्वान देण्याचे धाडसे जनतेमध्ये व राजकीय नेत्यांमध्ये जागवले पाहिजे.
३. गुरुद्वारांमधून दहशतवाद्यांना होणारी मदत थांबविली पाहिजे. गुरुद्वारा अॅक्ट संसदेने लवकर मान्य करावा.
४. गुरुद्वारातील व सुवर्णमंदिरातील दहशतवादी कार्याचे केन्द्रस्थान फक्त धर्मकार्यासाठीच उपयोगात आणून मंदिराचा दुरुपयोग थांबवायला हवा.
५. पंजाबात घटनेनुसार अपेक्षित राजकीय प्रक्रिया कशी सुरू करता येईल याचा विचार व त्यानुसार कार्यवाही व्हायला हवी.
६. पाकिस्तान व पंजाब यांच्यामधील सीमारेषा लष्कराच्या ताब्यात देऊन ‘सील ‘ करण्यात यावी.

विद्यापीठ विधी महाविद्यालय नागपूर -४४० ००१.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.