स्त्रीचे दास्य आणि स्त्रीमुक्तीची वाटचाल

स्त्रीचे समाजात नेमके कोणते स्थान आहे? एक व्यक्ती म्हणून, समाजाचा एक घटक म्हणून तिचा समाजात दर्जा काय आहे? या प्रश्नाचा विचार केला तर आपल्याला असे आढळून येईल की सामाजिक व आर्थिक स्थित्यंतराशी आणि प्रस्थापित मूल्यव्यवस्थेच्या परिवर्तनाशी तो निगडीत आहे.

प्रत्यक्ष समाजव्यवस्थेमधील सहभाग, सहभागाचे स्वरूप, स्वतःच्या भोवताली घडणाच्या घटना संबंधी निर्णय घेण्याची क्षमता व निर्णयाचे क्षेत्र यांवर स्त्रीचे स्थान अवलंबून आहे. ऐतिहासिक स्वरूपाचा आढावा घेतल्यास आपल्या समाजातील स्त्रीचे स्थान कसे होते व ते कसकसे बदलत गेले यावर प्रकाश पडू शकेल.

मानवी संस्कृतीच्या विकासाच्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये स्त्रीचे समाजातील स्थान पुरुषाच्या बरोबरीचे होते असे दिसते. या काळात समाजजीवन संकीर्ण झाले नव्हते. मनुष्यांच्या गरजा, त्यांच्या आकांक्षा आणि समाजधारणेची मूल्ये प्राथमिक अवस्थेत होती. आर्थिक, सामाजिक, मानसशास्त्रीय ताण अद्याप निर्माण व्हायचे होते. स्पर्धेचा वारा अजून लागायचा होता. आपले व आपल्या टोळीचे उदरभरण, संरक्षणाची व्यवस्था यातच प्रामुख्याने स्त्री-पुरुषांना स्वतःची शक्ती वेचावी लागत असे. त्यात जे काही श्रमविभाजन करावे लागेल त्यात, अपत्यसंगोपनासोबतच सांस्कृतिक विकासाचे महत्त्वाचे कार्य स्त्रीने मुख्यत्वेकरून केलेले आढळते.

“धान्य जमा करणे, ते साठविण्यासाठी कोठारे करणे, ते दळणे, कुटणे, शिजविणे – या क्रियांसाठी ती ती उपकरणे तयार करणे, मांस शिजविणे, कातडी कमावणे, भांडी घडणे, त्यावर नक्षी काढणे, टोपल्या करणे इत्यादी सर्व कामे करून शिवाय निसर्गनिर्मित जबाबदारी पार पाडणे…. ही सर्व कामे स्त्रियांचीच….”

संस्कृतिविकासाच्या या सुरुवातीच्या टप्प्यावर स्त्रीच्या कर्तृत्वाला वाव होता असे दिसते. पुढल्या टप्प्यांवर स्त्रीवर अबलत्वाचे आणि कर्तृत्वशून्यतेचे जे आरोप करण्यात आले त्यांचा मागमूस सुरुवातीच्या काळात आढळत नाही. याउलट विधायक प्रवृत्तींच्या आविष्कारामध्ये स्त्री ही पुरुषाच्या तुलनेत अग्रेसर होती असेच म्हणावे लागेल.

‘पुढल्या पिढीची जन्मदात्री म्हणूनही स्त्रीला समाजात (टोळीमध्ये) मानाचे स्थान होते. विवाह-संस्थेचा जन्म होण्यापूर्वी समाजात मातृसावर्ण्य असले पाहिजे असे अनेक विचारवंतांचे मत आहे….’

याचा अर्थ असा की या काळात स्त्री समाजाचा एक महत्त्वाचा घटक म्हणून जगत होती. समाजाच्या घडणीत तिला मानाचे स्थान होते. तिच्यातल्या निर्णयशक्तीचा उपयोग करण्यास तिला वाव मिळत होता. संस्कृतिसंवर्धनाच्या कार्यात ती मग्न राहात होती. परंतु लवकरच संस्कृति-संवर्धनाच्या या मंगल कलशाला तडा गेला. कृषि-संस्कृती आणि स्त्रीचे दास्य रानटी अवस्थेमधून कृषिसंस्कृतीमध्ये माणसाने प्रवेश केला. अग्नीचा शोध, धान्योत्पादन, धान्योत्पादनामुळे मांसाहार कमी होणे, भटकेपणा कमी होऊन शेतीच्या आलंबनाने स्थिर जीवन जगू लागणे, यासारख्या अनेक चांगल्या गोष्टी मनुष्याने हस्तगत केल्या. परंतु या सर्व चांगल्या बाबींसोबत त्याचे आंतरिक भावविश्वही बदलत गेले. जीवनाकडे बघण्याचा त्याचा दृष्टिकोन बदलला आणि पुरुषाच्या अहंकारीपणानेही डोके वर काढले. अपत्य-जन्मामध्ये आपला महत्त्वाचा वाटा आहे या गोष्टीची त्याला जाणीव झाली. स्त्रीची निसर्गदत्त गर्भधारणा आणि त्यात पुरुषाचा वाटा असल्याची स्पष्ट जाणीव यामुळे स्त्रीच्या पुढल्या बदलत्या दर्जाची बीजे कृषिसंस्कृतीमध्ये रोवली गेली. पूर्वी मातृसावर्ण्य असल्याचे जे पुरावे आपल्याला मिळतात त्यात या काळातल्या पुरुषांनी बदल करायला सुरुवात केली. समाजात पितृसावर्य रूढ करायचा प्रयत्न त्यांनी सुरू केला. स्त्रीचे कार्यक्षेत्र घर आणि पुरुषाचे कार्यक्षेत्र घराबाहेरचे व्यापक क्षेत्र असे विभाजन झाले आणि स्त्रीची भूमिका (role) गृहिणीची झाली. “घर ” अस्तित्वात आल्यामुळे संततीच्या संगोपनालाही एक शिस्त आली. आपली शेती, आपली गुरे, आपले घर, आपली “गृहिणी” या मालिकेत आपली मुले ही कल्पना येऊन बसली आणि हे जे जे माझे त्याचा त्याचा मी ” स्वामी”, “मालक” असा अहंभावही त्यातून निर्माण झाला.
कृषिसंस्कृती हा मानवी संस्कृतीचा प्रगत टप्पा मानला जातो. परंतु स्त्रीच्या दृष्टीने हा टप्पा तिच्या व्यक्तित्वावर घाला घालणाराच ठरला. नाही म्हणायला कृषिसंस्कृतीच्या सुरुवातीच्या काळात, म्हणजे वेदकाळामध्ये, सुलभा, गार्गी, मैत्रेयी, लोपामुद्रा, घोषा, वाचक्नवी इ. स्त्रिया विदुषी म्हणून समाजात गाजल्या. याचा अर्थ असा की, त्या काळात स्त्री पुरुषाच्या बरोबरीने समाजात वावरत होती. तिला समाजात मानाचे स्थान होते. तिच्या कर्तृत्वाला वाव होता. स्त्रीला दर्जा होता असे म्हणू शकू असा एवढा एकुलता एकच पुरावा इतिहासपूर्वकालाचा आपल्याला मिळतो. यानंतर मात्र स्त्रीच्या प्रतिष्ठेची घसरण सुरू झाली आणि तीही अतिशय वेगाने. पुरुषाच्या अहंकाराचे जणू हे राजकारणच होते. श्रुतिकाळातल्या स्त्री-प्रतिष्ठेच्या साच्या खुणा पुसून काढायचा जणू नंतर चंगच बांधला गेला. स्त्रीच्या प्रतिष्ठेची नंतर जी होळी झाली त्याचा पुरावा आपल्याला स्मृतिकाळात भरपूर मिळतो. पुरुष-प्राधान्य, चातुर्वर्ण्य आणि स्त्री-शूद्रांना कःपदार्थ मानणे अशी तीन वैशिष्ट्ये या काळाची मानता येतील.

मनुस्मृतीच्या नवव्या अध्यायात मनू म्हणतो,
‘अस्वतन्त्राः स्त्रियः कार्याः पुरुषः स्वैर्दिवानिशम् ।
विषयेषु च सज्जन्त्यः संस्थाप्या आत्मनो वशे ।।
पिता रक्षति कौमारे भर्ता रक्षति यौवने ।।
रक्षन्ति स्थविर पुत्रा न स्त्री स्वातंत्र्यमर्हति ।।
अ. ९ श्लोक २-३

म्हणजे जवळच्या (आप्त) पुरुषाने स्त्रियांना आपल्या ताब्यातच ठेवावे. त्यांना इतर विषयांची चटक लागू देऊ नये. रात्रंदिवस नजर ठेवावी. कौमार्यात स्त्रीला पित्याने सांभाळावे. तरुणपणी पतीने वागवावे व पतीनंतर किंवा वृद्धपणी पुत्रांनी स्त्रीची काळजी घ्यावी, असे मनू सांगतो. अगदी दुर्बल पतीनेसुद्धा पत्नीचे रक्षण करावे.'(‘ यतन्ते रक्षितुं भार्या भर्तारी दुर्बला अपि अ. ९, श्लो. ६.) म्हणजे सबल पत्नीपेक्षाही दुर्बल पती मनूने सबल मानला आहे. पुरुषाचे कर्तृत्व आणि स्त्रीचे शरीर एकदा महत्त्वाचे मानले की याशिवाय कुठले निष्कर्ष निघणार? मनू पुढे म्हणतो, घरातील बचत, विल्हेवाट करणे, झाडलोट, धार्मिक विधी, स्वयंपाक, आंथरूण, भांडीकुंडी इत्यादी कामांत त्यांना गुंतवून ठेवावे. मद्यपान, दुर्जनसंगती, पतीपासून दूर राहणे, उगीच भटकणे, वाटेल त्या वेळी झोपणे, परगृही निवास करणे यामुळे स्त्रियांकडून व्यभिचार घडतो. अशा वेळी त्या पुरुषाचे रूप, वय बघत नाहीत आणि कोणत्याही पुरुषाशी समागम करतात. पुरुषांना पाहताच त्यांना संभोगाची इच्छा उत्पन्न होते. त्या चंचल असतात, अप्रेमी असतात. म्हणून कितीही रक्षण केले तरी त्या व्यभिचारी बनण्याचा संभव असतो. पृथ्वीच्या जन्मापासूनच त्यांचा स्वभाव चालत आलेला आहे. म्हणून पुरुषाने स्त्रीचे रक्षण अगत्याने करायला हवे. चिरनिद्रा, अलंकाराकर्षण, बैठेपणा, क्रोध, काम, द्वेष, निंदा, हिंसा इत्यादि गुण तिला पृथ्वीच्या जन्मापासूनच मिळालेले असतात. म्हणून वेदोक्त संस्कार तिच्यावर करू नयेत असे मनूचे म्हणणे. स्त्रियांच्या इंद्रियांना मंत्राप्रमाणे वळण लागत नाही….( अ. ९,११ १८.) मात्र संतती, रतिसुख इ. स्त्रीवर अवलंबून असते, म्हणून तिचे रक्षण करावे असे मनू म्हणतो.

स्त्रीविषयीची वरील विचारसरणी काय दर्शवते? पुरुषप्रधान संस्कृतीने स्त्रीला मातीमोल करण्याचा अगदी उच्चांक गाठला असेच यावरून दिसून येते.

याच मनूने पुढे स्त्रीची देवी म्हणून पूजा करावी असेही म्हटले आहे. त्या वचनाचा दाखला देऊन असे भासविण्यात येते की स्त्री स्मृतिकाळात अतिशय वंदनीय होती. तिचा दर्जा अगदी देव देवतांच्या योग्यतेचा होता. परंतु हा केवळ आभासच होय.
“यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः । यत्रैतास्तु ने पूज्यन्ते सर्वास्तत्राफलाः
क्रियाः (अ. ३, ५६).

स्त्रियांचा मान जिथे पिता, पति ठेवतात तेथील देवता प्रसन्न होतात व अशा तऱ्हेचा मान न राहणे म्हणजे देवता असंतुष्ट असणे. अशा ठिकाणी यज्ञयागादिकांचे पुण्य निष्फळ होते. स्त्रीला संतुष्ट करावे. कशासाठी? तर यज्ञयागांचे पुण्य मिळावे म्हणून. शिवाय ती संतुष्ट कशाने होते? तर वस्त्रालंकारांनी, असे मनूने अनेक ठिकाणी सांगितले आहे. स्त्रीला एकदा कर्तृत्वापासून वंचित केले की ती असंतुष्ट होणार हे उघडच होते. म्हणून त्या काळच्या पुरुषांनी निर्माण केलेल्या धर्मशास्त्राने तिला वस्त्र-आभूषणाची लाच देऊन गप्प बसवण्याचा प्रयत्न केला. एका बाजूला कर्तृत्वापासून तिला दूर ठेवायचे, आणि संततिनिर्मिती व रतिसुखे यांवाचून तर पुरुषांचे अडते, म्हणून तिला खूश ठेवा असे म्हणायचे. कुणाला खूश ठेवायचे तर जी स्त्री पुरुषाच्या अंकित राहू शकेल तिला. एरवी तिचा त्याग करण्याचा इशारा देण्यास मनू चुकला नाही. विवाह, पुनर्विवाह, संपत्तीची वाटणी याविषयी पुरुष आणि स्त्री यांना वेगवेगळे न्याय मनूने लावले आहेत. प्रत्येक न्यायाचे झुकते माप पुरुषाला आणि अन्यायाचा वाटा स्त्रीला देऊन मनू नामानिराळा झाला आहे.

घर, राज्यव्यवस्था, धर्मव्यवस्था, न्यायव्यवस्था, संपत्तीचे वाटप अशा कुठल्याही लहानमोठ्या क्षेत्रामध्ये निर्णयाचे सर्व अधिकार स्मृतिकाळात पुरुषाने स्वतःच्या स्वाधीन ठेवले होते. ज्ञानाचा अधिकार तर तिला नव्हताच. रतिसुख देणे, संतती निर्माण करून तिचे संगोपन करणे, स्वयंपाक, झाडझूड इत्यादि करून घराला घरपण आणणे हे स्त्रीचे कार्यक्षेत्र ठरले. या मोबदल्यात, वस्त्रे आणि अलंकार यांच्या साहाय्याने तिची पूजा करून तिच्या अस्मितेचा निखारा कधीच फुलू द्यायची नाही असा डावपेच स्त्रीशी खेळला गेला. स्त्री त्याला बळी पडली आणि याच जीवनपद्धतीला आणि जीवनमूल्यांना धर्मप्रणीत मानून पुरुषनिर्मित कंर्दमामध्ये उमलण्यात स्त्री धन्यता मानू लागली.
पुराणकाळातील सीता व द्रौपदी या दोन प्रातःस्मरणीय स्त्रियांची उदाहरणे पुरेशी बोलकी आहेत. पती हा मालक, स्वामी असल्याने आपल्या वस्तूचा-पत्नीचा-तो त्याग करू शकला, आणि द्रौपदीची परवड तर विचारायलाच नको. पणात जिंकून एकाने आणली, तरीही केवळ आईच्या शब्दाखातर ती पाचांची पत्नी झाली. धूतात पणाला लावली गेली. हरली गेली म्हणून तिची भर सभेत विटंबना करण्यात आली, आणि तिची विटंबना जणू शास्त्रसंमत असल्याने भीष्म-द्रोणांसारखे महारथी खाली माना घालून बसले, परंतु तिची विटंबना थांबवू शकले नाहीत. पुरुषांनी हजारो वेळा प्रायश्चित्त घेतले तरी द्रौपदीच्या विटंबनेचे त्यांच्या माथी बसलेले पाप धुवून निघणार नाही.

स्मृतिकाळात “स्त्री”-जीवनाची जी मूल्ये निर्माण झाली त्यांचाच विलास नंतरच्या काळात झाला. पुरुष ज्याप्रमाणे एक व्यक्ती म्हणून जगू, फुलू शकतो तशी स्त्री फुलू शकत नाही. किंबहुना तसे तिने फुलू नये असा दंडक निर्माण झाला. वृक्षाला लगटून वेलीने लाजत लाजत फुलत जावे, तसेच स्त्रीने पुरुषावलंबी राहून जगावे यातच तिच्या जीवनाचे सार्थक आहे असे स्त्री व पुरुष दोघांच्याही मनावर बिंबविण्यात आले. स्त्रीचे असले जगणे हे प्रथम प्रतीचे जगणे नाही; दुय्यम प्रतीचे जगणे आहे. पुरुषाचे गुण वेगळे, स्त्रीचे वेगळे; पुरुष शक्तिशाली, स्त्री अशक्त; पुरुष ताठ मानेने चालणारा तर स्त्री लज्जाशील, विनयवती म्हणून पायाच्या अंगठ्याने जमीन उकरणारी; तो रणांगणावर पौरुष गाजवणारा तर स्त्री घरी राहून त्याची डोळ्यात प्राण आणून वाट बघणारी; तो जिवंत परत आला तर त्याची आरती ओवाळणारी, तो न आला तर सती जाणारी- अशी दोघांची दोन विश्वेच निर्माण झाली. पितृप्रधान समाजव्यवस्थेने व संस्कृतीने अतिशय धूर्तपणाने ही रचना केली.

१. स्त्रीच्या मनावर वरील मूल्यांचा संस्कार करण्यात आला आणि समाजव्यवस्थेतील तिच्या दुय्यम भूमिकेला शास्त्रांचा आधार निर्माण केला.
२. पिढ्यानुपिढ्या या संस्कारांमधून स्त्रीचा स्वभाव अतिशय कौशल्याने तयार केली. आणि हे सारे अगदी सहज घडवून आणले. स्वतः दुय्यम भूमिकेत राहण्यात ती स्वतःहून राजी झाली. त्यामुळे बंडाचा उठाव तिच्याकडून होण्याचा संभवही उरला नाही.

fareen with all (role) att for forean Faucarel (temperament) परिणाम तिच्या दर्जावर (status) झाला.
कुटुंब ही अशा दोन व्यावर्तक (diametrical) व्यक्तिमत्त्वांच्या निर्मितीची प्रयोगशाळा झाली. मुलीच्या जन्मानंतर आईच्याच कपाळावर आठ्या उमटू लागल्या. मुलीच्या हाती केरसुणी आणि मुलाच्या हाती तलवार किंवा क्रिकेटची बॅट आली. मुलाच्या पानात गरम पोळी आणि मुलीच्या ताटात शिळवड येऊ लागली. दिवाणखान्यातील सोफा पुरुषांसाठी आणि स्वयंपाकघरातला तोचतोपणा – रांधा, वाढा, उष्टी काढा – स्त्रीच्या पाचवीला पुजला. मुलाला तंत्रशिक्षण आणि मुलीला कलाविषयातले प्रावीण्य मिळू लागले. पुरुषासाठी पुरुषार्थ आणि स्त्रीसाठी विवाहाकांक्षा असे व्यस्त समीकरण निर्माण झाले. त्यामुळे हरतालिका, वटपौर्णिमा, यासारखी व्रतवैकल्ये ही स्त्रियांची एक भावनिक गरज होऊन बसली. पुरुषाच्या पावित्र्याचा प्रश्न उद्भवला नाही, परंतु स्त्रीचे पावित्र्य आवश्यक ठरले. मातृत्व निश्चित असल्यामुळे स्त्रीने एकाच पुरुषाजवळ राहणे आवश्यक ठरले. यातून तिच्या पावित्र्याचा संकेत उत्पन्न झाला. जणु पुरुषाची एक संस्कृती आणि स्त्रीची एक संस्कृती. दोन्ही संस्कृती परस्परांना समांतर! पुरुषसंस्कृतीला फुलण्याचे, विकासाचे, कर्तृत्वाचे स्वातंत्र्य आहे तसे ते स्त्रीला नाही. स्त्रीला संरक्षणासाठीही पुरुषाच्या तोंडाकडे पहावे लागावे अशी तिची दयनीय अवस्था झाली. स्वातंत्र्यही नाही आणि स्वयंभू अस्तित्वही नाही अशी स्त्री समाजव्यवस्थेने निर्माण केली. याउलट स्वातंत्र्यही आहे आणि संरक्षणाच्या बाबतीत जो स्वाश्रयी आहे असा पुरुष याच समाजव्यवस्थेने निर्माण केला. कौटुंबिक, सामाजिक व धार्मिक क्षेत्रांमध्ये स्त्रीची कोंडी करून वर तिला आर्थिक दृष्ट्याही हतबल करण्यात आले. वारसा हक्काने मिळणाच्या इस्टेटीत पुरुषांचे सर्व हक्क सुरक्षित झाले आणि स्त्रीचे पुरुषावलंबित्व समाजमान्य व धर्ममान्य असल्याने स्वतंत्रपणे तिच्या वारसा हक्कांचाही विचार झाला नाही. अशा रीतीने पुरुष-संस्कृतीने स्त्रीजीवनाची गोची केली.

स्त्रीच्या स्थानात परिवर्तन
१. आध्यात्मिक मुक्ती :- भारताच्या संदर्भात, बाराव्या तेराव्या शतकामध्ये संतांनी जी सामाजिक कामगिरी केली तिचा फायदा स्त्रीलाही मिळाला, ज्ञानोबा ते विनोबा असा आठ शतकांचा आढावा घेतला तरीही स्त्रीच्या बाबतीत सर्व संत उदार होते असेच म्हणावे लागेल. ‘ढोल, गवार, शूद्र, पशु, नारी । ये सब ताडनके अधिकारी ।।’ या भूमिकेच्या विरोधात सर्व संतांनी स्त्रीला आध्यात्मिक मुक्तीची कवाडे खुली करून दिली. ‘स्त्रीजन्म म्हणुनी न व्हावे उदास’ असा मोलाचा संदेश संतांनीच प्रथमतः स्त्रीच्या कानात ओतला. तसेच जनाबाई, सोयराबाई, निर्मळाबाई आणि त्याही पूर्वीची महानुभाव पंथाची महदंबा यांचा अंतर्भाव संतांच्या मालिकेत झाला. स्त्री-मुक्ती चळवळीचा हा एक आध्यात्मिक कवडसा होता. मात्र स्त्रीची आध्यात्मिक मुक्ती आध्यात्मिक क्षेत्रापुरतीच मर्यादित राहिली. इहलोकाशी त्याचा कुठलाच संबंध नव्हता. मुक्ती मिळवू शकणाच्या स्त्रीला फक्त परमेश्वराच्या दरबारात स्थान होते, आणि ज्या जगात तिला जन्मापासून मृत्यूपर्यंत जगावे लागे त्या जगात मात्र बालविवाह, सती जाणे, पुनर्विवाहास विरोध, वारसा हक्क जवळ जवळ नसणे- अशा परंपरागत रूढीच कायम होत्या. त्यामुळे आध्यात्मिक मुक्तीच्या बाबत स्त्री स्वतंत्र झाली असली तरी ऐहिक पातळीवर तिची अवस्था स्मृतिकाळापेक्षा वेगळी नव्हती.
२. स्वातंत्र्यपूर्व काळातील सामाजिक जाणीव-जागृतीचा स्त्रीला झालेला लाभ :- एकोणिसाव्या शतकात भारतात इंग्रजी राजवट सुरू झाली. या राजवटीत इंग्रजी विद्येचे वाघिणीचे दूध पिऊन विचारवंतांची एक पिढी तयार झाली. आजपर्यंत समाजधुरीणांच्या डोळ्यांवर धर्मांधतेची जी झापडे चढली होती ती इंग्रजी विद्येने बाजूला सारली आणि विचारवंतांचे लक्ष आपल्या भोवतालच्या समाजाच्या दयनीय स्थितीकडे गेले. स्त्रीची अतीव अनुकंपनीय अवस्थाही विचारवंतांच्या डोळ्यावरची झोप उडवण्यास कारणीभूत झाली. स्त्री-मुक्तीच्या चळवळीला प्रारंभ झाला तो याच काळात, व याच पार्श्वभूमीवर बंगालमध्ये राजा राममोहन राय व ईश्वरचंद्र विद्यासागर, महाराष्ट्रात महात्मा जोतिबा फुले व गोपाळ गणेश आगरकर यांच्यासारखे कळकळीचे समाजसुधारक हिंदू स्त्रीवरील सामाजिक अन्यायाविरुध्द बंड करून उभे झाले. याचा परिणाम समाजमन बदलविण्यात तर झालाच, पण मुख्यतः एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीपर्यंत अनेक सामाजिक कायदे करण्यात झाला. समाजसुधारकांना विरोध करणारा जो एक कर्मठ वर्ग होता त्याच्या म्हणण्यानुसार समाजसुधारणाविषयक कायदे करणे म्हणजे ‘हिंदू धर्मात व संस्कृतीत ढवळाढवळ करणे होय’ या ढोंगी युक्तिवादाला भीक न घालता जिद्दीने समाजसुधारकांनी लढा दिला. अशा या पार्श्वभूमीवर १८२९ साली सतीबंदीचा कायदा झाला. कायद्याच्या पातळीवरील स्त्री-मुक्तीचा हा ओनामा होता. या कायद्यामुळे हजारो वर्षे निघृण रूढीत जखडलेल्या स्त्रीची सुटका झाली. त्यानंतर सत्तावीस वर्षांनी १८५६ मध्ये विधवाविवाहाचा कायदा झाला व विधवेच्या पुनर्विवाहावरील सामाजिक बंदी उठली. १८९१ मध्ये संमतिवयाचा कायदा झाला. १९२९ साली बालविवाहाला विरोध करणारा कायदा झाला. आणखी एक महत्त्वाचा कायदा म्हणजे १९३७ साली झालेला ‘हिंदू स्त्रियांचा प्रॉपर्टी हक्क’ हा कायदा. भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या संधिकाळात अनेक प्रांतांमध्ये स्वदेशी मंत्रिमंडळे स्थापन झाली. १९४५-४७ मध्ये या नव्या मंत्रिमंडळांनी द्विभार्या-प्रतिबंधक कायदा पास केला. मुंबई, मद्रास व सौराष्ट्राने एकापाठोपाठ हा कायदा केला. घटस्फोटाचा कायदाही त्यासोबत तयार झाला. १९५५ मध्ये, म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आठ वर्षांनी, या सर्व कायद्यांचा अंतर्भाव हिंदू विवाह कायद्यात झाला आणि प्रांतीय कायद्यांचे अस्तित्व शिल्लक उरले नाही.

ब्रिटिश राजवटीत झालेले हे कायदे म्हणजे स्त्री मुक्ती चळवळीची भरघोस पावले होत. वेद, स्मृती व पुराणकालात धर्माच्या आधारावर रचलेले कायदे यांमध्ये स्त्रीला व्यक्ती म्हणून स्थान नव्हते. कुटुंब किंवा समाज यांत कुठेही तिला हक्क नव्हते. तिचे संपूर्णपणे वस्तूकरण झाले होते. ही स्थिती एकोणिसाव्या शतकात बदलू लागली.

सामाजिक चळवळीने तिच्या परिस्थितीत सुधारणा घडायला सुरुवात झाली. तसेच तिची सामाजिक व आर्थिक स्थिती सुधारण्यास या कायद्यांची फार मदत झाली. परंतु ही सुधारणा झाली म्हणजे स्त्रीला स्वतंत्र व स्वायत्त स्थान प्राप्त झाले असे नव्हे. कायद्यांमध्ये होणाच्या सुधारणा म्हणजेही सुधारणेचे पुढले पाऊल ठरेल. परंतु कोणत्याही कायद्याची मदत होत असली तरी कायदा पुरेसा ठरत नाही.

स्वातंत्र्यपूर्व काळातील स्त्री-मुक्ती चळवळीची एक प्रभावी व यशस्वी प्रयोग:- १९२० नंतर स्वातंत्र्यप्राप्तीसाठी महात्मा गांधींनी जो अभूतपूर्व अहिंसक लढा दिला त्या लढ्यात त्यांनी स्त्रीला सर्वार्थाने सामावून घेतले. अहिंसात्मक सत्याग्रह, दारूच्या गुत्त्यावरील पिकेटिंग, परदेशी मालाची होळी आणि चरख्यावर सूत कातणे या सर्व कार्यक्रमात भारतीय स्त्री सामील झाली. प्रेम, करुणा, अहिंसा या आपल्या स्वभावगत गुणांसहित स्वातंत्र्याच्या लढ्यात ती सामील झाली. गांधींच्या अर्थनारीश्वराच्या कल्पनेतील नारी खर्‍या अर्थाने जगायला शिकली. घराच्या चार भिंती आणि कुटुंबाचा परिघ यांतून ती प्रथमच बाहेर पडली, आणि ऐन स्वातंत्र्याच्या चळवळीत प्रथमच स्वातंत्र्याचा अर्थ जाणून घेऊ लागली. स्त्रीमुक्तीचा एक पुढला प्रयोग आचार्य विनोबा भावे यांनी परंधाम आश्रमात सुरू केला. वेदकाळापासून स्त्रीच्या ललाटी लिहिलेली *विवाहाकांक्षा पहिल्यांदा या प्रयोगाने पुसून टाकली. पुरुषाचे संकल्पित ब्रह्मचर्य जेवढे आदरणीय ठरते तेवढेच स्त्रीचेही संकल्पित ब्रह्मचर्य आदरणीय ठरविणारा हा प्रयोग आहे. सर्वार्थाने स्त्रीचे स्थान उंचावण्यासाठी झालेले प्रयत्न याच नात्याने याकडे आपल्याला बघावे लागेल.

स्त्रीशिक्षण व आर्थिक स्वावलंबन :- एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीस मिशनच्यांनी स्त्रीशिक्षणाची सुरुवात केली. तेव्हापासून आजपर्यंत म्हणजे दीडशे वर्षात स्त्री शिक्षणाच्या क्षेत्रात आघाडीवर आहे. आज कोणत्याही विद्याशाखेचा निकाल वाचला की लक्षात येते की मुलांच्या बरोबरीने मुली गुणवत्तार्‍यादीमध्ये असतात. अनेकदा तर पहिल्या काही क्रमांकावर मुलींचीच नावे झळकताना दिसतात. तरी देखील आज भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी केवळ स्त्रियांची संख्या विचारात घेतली तर केवळ २०% स्त्रियाच शिक्षित आहेत.

एकूण शिक्षितांचे प्रमाणही अल्पच आहे, परंतु एकूण पुरुषांच्या संख्येत शिक्षित असणारे पुरुष आणि एकूण स्त्रियांच्या संख्येत शिक्षित असणार्‍या स्त्रिया यांची शेकडेवारी बघितली तर स्त्रियांपेक्षा शिक्षित पुरुषांची संख्या दुपटीहूनही अधिक दिसते. स्त्री-शिक्षणाविषयीची ही अनास्था स्त्रीला समाजात असणार्‍या दुय्यम स्थानावर अवलंबून आहे. गरीब कुटुंबामध्ये आई कामाला गेल्यानंतर मुलांना सांभाळण्यासाठी ८-८ वर्षाच्या मुलींना देखील घरी थांबावे लागते. आर्थिक दृष्ट्या स्थिर कुटुंबांमध्ये देखील मुलांच्या शिक्षणास अग्रक्रम असतो. सधन कुटुंबामध्ये पैशाभावी मुलींचे शिक्षण थांबले नाही तरी विवाहाचे उद्दिष्ट शिक्षणाच्या उद्दिष्टापेक्षा अधिक महत्त्वाचे मानले जाते. मुलींना शिक्षण द्यावे की न द्यावे या वादात अनेकदा काही फसवी कारणे पुढे केली जातात.

‘असले महागडे शिक्षण मुलीला देऊन तिचा आपल्या संसाराला काय उपयोग? मुलीला हवे ते शिक्षण दिलेही तरी पुढे लग्न झाल्यावर सासरची मंडळी तिच्या शिक्षणाला अनुसरून व्यवसाय करू देणार आहेत याची खात्री आहे का?

‘मुलींच्या शैक्षणिक व एकूणच महत्त्वाकांक्षेला वेळीच आवर घातली नाही तर पुढे ती व तिच्या भोवतालचे लोक दुःखी होतील.’ ‘मुलगी जास्त शिकली तर तिच्यापेक्षा सरस जावई कसा मिळणार? आणि तो सरस असला तर त्यासाठी “मोठा” हुंडा कुठून आणायचा?
हे प्रश्न म्हणजे चहूबाजूंनी आवळून स्त्रीला खाली खेचणारे दोरखंड आहेत. पुरुषाशिवाय स्त्रीच्या अस्तित्वाला अर्थ नाही या मूळ व पारंपारिक भूमिकेच्या आधारावर स्त्री-शिक्षणाचा विचार केला जातो म्हणून वरील प्रश्न निर्माण होतात.

एकूण स्त्री-शिक्षणाचे प्रमाण पुरुषांपेक्षा कमी असले तरी काळाच्या मानाने दिवसेंदिवस हे प्रमाण वाढते आहे हे खचित. या शिक्षणाने स्त्रीला कुटुंबात व समाजात सर्वत्र पूर्वीच्या तुलनेत निश्चितच मानाचे स्थान मिळवून दिले आहे.

सामाजिक परिवर्तन, विभक्त कुटुंबपद्धती, वाढती महागाई या सर्व कारणांमुळे मिळालेल्या शिक्षणाचा उपयोग स्त्री अर्थार्जनासाठी करू लागली आहे. तरीही स्त्रीच्या अर्थार्जनासंबंधी काही विचित्र मते आपल्या कानी पडत असतात. ‘घरी सुबत्ता असेल तर स्त्रीने नोकरी करू नये, स्त्रीने नोकरीसाठी अर्ज करणे म्हणजे एका कर्या कुटुंबप्रमुखाची जागा अडवणे होय.’ अशासारखे युक्तिवाद केले जातात. अशा प्रकारच्या युक्तिवादांच्या बुडाशी पुरुषप्रधान संस्कृतीचा दृष्टिकोनच दडलेला आहे.

खरे तर स्त्रीचा दर्जा सुधारण्यासाठी अर्थार्जन – मग ते नोकरी करून असो की स्वतंत्र व्यवसाय करून असो – एक अत्यावश्यक बाब आहे. स्वतःच्या पायावर उभे राहण्याने आत्मविश्वास वाढतो आणि एकूणच इतरांचा तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सुधारतो. आजची गृहिणी अर्थार्जन करताना एका विलक्षण मानसिक ताणातून प्रवास करीत आहे. असा ताण पुरुषाला कधीच सहन करावा लागत नाही. जणू प्राप्त झालेल्या सामाजिक स्थानाची व मानाची मानसिक ताणाच्या रूपाने ती किंमत मोजते.

शिक्षण आणि अर्थार्जन या दोन गोष्टींमुळे स्त्रीचा दर्जा सुधारत असला तरी या दोन गोष्टी पुरेशा नाहीत. याचे कारण असे की स्त्रीच्या दर्जाचा विचार केवळ स्त्रीच्या प्रश्नांचा विचार ठरत नाही. तो समग्र सामाजिक विचार आहे. म्हणून तो पुरुष-निरपेक्ष असू शकत नाही. स्त्रीकडे बघण्याचा स्त्रीचा दृष्टिकोन बदलणे जितके आवश्यक आहे, तितकेच स्त्रीकडे बघण्याचा पुरुषांचा दृष्टिकोन बदलणेही आवश्यक आहे. म्हणून या दृष्टीने पुरुषांचेही शिक्षण होणे आवश्यक आहे. हे शिक्षण औपचारिक व अनौपचारिक दोन्ही पद्धतींनी व्हावे. पुरुषांना स्वतःच्या स्वैराचारात परिवर्तित झालेल्या स्वातंत्र्यावर बंधने घालावी लागतील आणि स्त्रीला संकल्पपूर्वक नटण्या-मुरडण्याची व शरीराला अवास्तव महत्त्व देण्याची हौस बाजूस सारावी लागेल. तसेच हरतालिका, वटपौर्णिमा यासारख्या विवाहसापेक्ष व्रतांचा निष्ठेने त्याग करावा लागेल. पुरुषाचे कर्तृत्व व स्त्रीची विवाहाकांक्षा अशी दोन व्यावर्तक मूल्ये आता समाजात शिल्लक उरायला नकोत. थोडक्यात, ‘पती हा परमेश्वर व स्त्री त्याची दासी’ या मूल्याच्या जागी, आचार्य दादा धर्माधिकारी म्हणतात त्याप्रमाणे, सहजीवनाचे मूल्य प्रस्थापित झाले पाहिजे. अलिकडे पाश्चात्य देशांमध्ये स्त्री-मुक्ती चळवळीने पुरुष-विरहित जीवनाचा पुरस्कार करणारे जे टोक गाठले तेही स्त्रीच्या दर्जाच्या दृष्टीने व एकूण समाजाच्या दृष्टीने श्रेयस्कर नाही. ‘पुरुपाशिवाय नव्हे तर पुरुषासोबत तिने जगले पाहिजे.

सारांश, मूल्यव्यवस्थेची जुनी टाकाऊ चौकट फेकून देऊन नव्या मूल्यांचा आश्रय आता केला पाहिजे. स्त्री, पुरुष, समाज सर्वांनीच हे काम अंगावर घेतले पाहिजे. स्त्री संस्थांनी तर हे आपले ब्रीदचे मानले पाहिजे. १९२७ पासून A.I.W.C. सारख्या स्त्री संस्थांची निर्मिती झाली आहे. आजतर भगिनी मंडळे, स्त्री-शिक्षण संस्था, अनाथ स्त्रियांना आसरा देणार्‍या संस्था अशा कितीतरी व विविध प्रकारची कामे करणाच्या स्त्री संस्थांचा उदय झाला आहे. या सर्व संस्थांच्या कार्यपद्धतीच्या मुळाशी ही मूल्यव्यवस्था पक्की रुजलेली असली पाहिजे.

असे जर झाले तर स्त्रीला खरे स्थान प्राप्त होऊ शकेले. पुरुषाच्या तुलनेत ती दुय्यम असण्याचा प्रश्न मग शिल्लक उरणार नाही. स्त्री व पुरुष दोघेही या समाजाचे समान नागरिक या नात्याने जगू शकतील व त्यामुळे एकूण समाजाचा सांस्कृतिक विकास होईल. म्हणून स्त्रीच्या स्थानाचा प्रश्न हा सांस्कृतिक प्रश्न आहे व त्या नात्यानेच तो प्रश्न सोडविला पाहिजे.

६०, अंबाझरी लेआऊट नागपूर – ४४० ०१०

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.