पत्रव्यवहार

श्री. मोहनींच्या पत्रावर प्रतिक्रिया व्यक्त करण्याची इच्छा आहे. ‘हिंदू असणे’ आणि ‘धार्मिक’ असणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. खुद्द शंकराचार्यांनाही ‘प्रच्छन्न बौद्ध’ म्हटले गेले. (बुद्ध हा तर’ निरीश्वरवादी’आणि ‘आत्मा’ न मानणारा होता.) तरीही ते ‘हिंदू’च होते. ही सहिष्णुता हिंदुधर्मीयांशिवाय अन्यत्र कोठे दिसते?

‘हिंदू-मुसलमानांचे दंगे’ आणि ‘धर्म – त्यांतही वैदिक धर्म आणि विज्ञान’ यांतील वाद या वेगळ्या गोष्टी आहेत. त्यांची गल्लत करण्यात अर्थ नाही.

हिंदू समाजात मी जन्मलो, घडलो, वाढलो म्हणून बर्‍या वाईट गोष्टींसह मी हिंदूच आहे. त्याबद्दल खंत कशासाठी?

ईश्वरविषयक ‘भाविकता’ ही आणखी एक वेगळीच ‘मनोव्यथा’? त्याबद्दलचे भांडण ‘धर्म’ या संकल्पनेशीच सुरू होते.

आजच्या मानवापुढील आव्हाने ही ‘तत्त्ववेत्यांच्या क्षेत्रात येतात, त्यामुळे मूळ सवाल एकच आहे: हा शिकारी (hunter) कधी काळी ‘तत्त्ववेत्ता’ (philosopher) होणार आहे की नाही?

वसंत कानेटकर ‘शिवाई’
शरणपूर रस्ता नासिक ४२२००२

श्री. दिवाकर मोहनींनी काही विचारप्रवर्तक विचार आपल्या पत्रात मांडले आहेत.

१. जन्माने व परंपरेने हिन्दू आहे व विधिवत हिंदुत्वाचा त्याग केलेला नाही म्हणून त्यांची हिंदूतच गणना होणार.
२. हिंदूची एकसंध संस्कृती, एकात्म्य तत्त्वज्ञान नाही. हिंदूची नेमकेपणे व्याख्या करता आलेली नाही. वैदिक संस्कृतीचे कट्टर पुरस्कर्तेही आर्यसमाजाचे वेदोक्तींचे अर्थ मान्य करतात असे नाही. कित्येक अवैदिक संप्रदाय व पंथ हिंदूत आहेत. तसेच वेदान्ताचा शंकराचार्य, रामानुज, वल्लभादींचा अर्थही भिन्न आहे. पूर्वमीमांसेत ईश्वराची गरज मानलेली नाही, मुख्य सांख्य दर्शन ईश्वर मानीत नाही, योगदर्शनाच्या मते ईश्वर सृष्टीच्या उत्पत्ती-स्थिती-लयाचा कर्ता व माणसाचा नियंता नाही; त्याचे चैतन्य कैवल्यात आपणात समावून घेणारा नाही. वेदान्ताचा ईश्वर मायापती खरा, पण बाधित होणारा म्हणून ब्रह्मन् समोर शबलचे आहे. जसे अवतार मानणारे हिंदू आहेत, तसे न मानणारे आहेत व भिन्न अवतार मानणारेही आहेत. श्रुती, स्मृती, पुराणे आणि दर्शने यात एकात्म व मान्य समन्वय नाही. अनेक कमीजास्त प्रगत समाज एकत्र येऊन हिंदु समाज झालेला असल्याने कोणत्याही बाबतीत त्यात एकवाक्यता नाही, ही वस्तुस्थिती आहे. विनोबांनी विचारपोथीत हिंदूची गौरवस्थाने नेमकेपणी दिली आहेत, पण त्यावर सार्वमत झालेले नाही ; तशी शक्यताही नाही. म्हणून अमुक विचार व आचार हिंदुत्वापासून स्वतःला पूर्ण तोडणारा, असा सांगता येणार नाही.
३. सर्व मानवजातीच्या इतिहासाचे विश्लेषण करून टॉयनबी किंवा योगी अरविंद इ. च्या एखाद्या मताचे निखालस तार्किक श्रेष्ठत्व जोखणे आज कठीण आहे.
४. पण पृथ्वीवर गेल्या सुमारे अडीचशे कोटी वर्षात जी जीवोत्पत्ती व तिचा उत्क्रांतीरूप विकास झाला त्याचे संक्षिप्त सिंहावलोकन येथे मार्गदर्शक ठरू शकेल. आज माणसाच्या ८०-८५ % क्रिया भावनांच्या लपेटीत होताना दिसतात, असे मानसशास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. माणसाचा निम्न मेंदू (mid-brain, medulla, pons, hypothalamus, limbic) माणसाचे भावनिक वर्तन ठरवितो व याचा बवंश भाग अन्य स्तनी (mammals) पेक्षा माणसांत फारसा निराळा नाही. केवळ ५-१० लाख वर्षात कपी- (apes) पासून माणसाच्या प्रमस्तिष्काचा (cerebrum) फार विकास होऊन त्याने मन, बुध्दी, प्रातिभ सर्जनशीलता, अमूर्त सांकेतिक भाषा आदिमध्ये व स्वतंत्रपणे विचार व कृतीचा अधिकार प्राप्त केलेला आहे. पार्थिव जीवनाच्या पुढील महामानवतेप्रतच्या उत्क्रांतीचा बीजभूत ‘ डीएनए’चा आराखडा आनुवंशिकतः माणसाला प्राप्त आहे. आजवरच्या प्रगतीच्या अनुरोधाने प्रमस्तिष्क कवच (cortex) हा विवेकी, तर्कसंगत, उच्च मानसिक-बौद्धिक क्षमतेचा भाग निम्न भावनिक भागावर हळूहळू वर्चस्व स्थापून १०:२० लाख वर्षात येणार्‍या महामानवाची स्थापना होणार असे जैविक उत्क्रांतिसूचक पाऊलखुणांवरून स्पष्ट आहे. अपवादरूप तत्त्वज्ञ, द्रष्टे, वैज्ञानिक व विचारवंत त्या उच्च निर्भेळ विवेकापर्यंत आजच पोहचले आहेत. काही योगसाधना (उदा. प्राणायामात ‘कवच’ हे निम्न श्वसन-भावनिक स्तरीय केंद्रावर वर्चस्व स्थापित करते.) संशोधनातून (पहा, योगमीमांसा, लोणावळा, जाने. १९८८) याच्या पाऊलखुणा स्पष्ट दिसत आहेत. पुढे भावनांचे मार्दव व गोडवा राहील, पण विवेकाचे अधिराज्य होईल असा उद्याचा महामानव येऊ घातला आहे. असा विवेक येईतो भावनांचे साम्राज्य निपटून टाकता येणार नाही. आजपेक्षा आणखी १० लक्ष वर्षानंतरचा माणूस अधिक विवेकी भेदक सूक्ष्म मूलगामी बुद्धीचा व अधिक सत्यदर्शी असणार आहे. मनुष्याने वस्तुनिष्ठ जग बरेच जिंकले, पण आत्मनिष्ठ जगात त्याची प्रगती त्रोटकच राहिली आहे. पुढील उत्क्रांती मानवावरच सोपविली आहे, व यास्तवच त्याचे स्वातंत्र्य आहे. अन्यथा महामानवाच्या आगमनास पर्यायी मार्ग निवडून भावनांध माणसाला निसर्ग बाजूला सारून अश्मीभूत करील.
५. अविवेक, अतिरेकी भावना यांचे उद्रेक उद्वेग देणारे आहेत. विवेक, नीती, मानवमात्र ऐकात्म्य यांचा सर्वत्र पराभव व पाडाव होत आहे. पण अशा अनेक लढाया हारल्या तरी मनुष्य-विवेक शेवटल्या शेवटल्या लढाया जिंकून शेवटले युद्ध जिंकून महामानवाचा पृथ्वीवर स्थापना करीलच हे योगी अरविंदाचे काव्यप्रधान स्वप्निल चित्रण नव्हे, नैसर्गिक उत्क्रांती मुसंडीचे सत्यार्थ दर्शन आहे.
६. रामजन्मभूमी व बाबरी मशीद हा मालमत्तेच्या हक्काचा प्रश्न आहे. भारतीय कायदा याची साक्षपुरावा नीट तपासून निवाडा देण्यास समर्थ आहे. माझ्या तर्फेचा निकाल म्हणजेच खरे न्यायदान असा अट्टाहास कोणत्याही पक्षाला भावविवश व भावनिक ठरवील.
७. पण हा प्रश्न कोणी धार्मिक समजून त्याला या वा त्या धर्माला अन्यायाचा असे समजत असेल तर त्या अन्यायासाठी प्राणपणाचे मोल देऊन लढा देण्याचा पर्याय त्याला उरतो. हिंदू धर्मात एक छत्री धर्म-निष्कासक शक्ति आज नाही. पण हा निर्णय भावनांध आहे किंवा नाही, हे स्वतःच नीट तपासावयाचे आहे. मनुष्याला विवेकाचे व कृतीचे स्वातंत्र्य निसर्गाने दिले आहे; पण तो जो निर्णय घेईल, त्याला पूर्णत्वाने तोच जबाबदार आहे, हे त्याने स्पष्ट समजून घेतले पाहिजे. मला सुचली ती उत्तरे मी दिली आहेत. काही मित्रांचाही यात मला सल्ला लाभलेला आहे.

ना. वि. करबेलकर
सेवानिवृत्त प्राचार्य,
१२१, शिवाजी नगर, नागपूर.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.