विवाह आणि नीती (भाग ४)

लिंगपूजा, तापसवाद आणि पाप
जेव्हा पितृत्वाचा शोध लागला त्या क्षणापासून धर्माला लैंगिक व्यवहारात मोठा रस उत्पन्न झाला. हे अपेक्षितच होते; कारण जे जे गूढ आहे आणि महत्त्वाचे आहे अशा सर्व गोष्टींत धर्म रस घेतो. कृषीवलावस्था आणि मेंढपाळ अवस्था यांच्या आरंभीच्या काळात राहणाऱ्या मनुष्यांच्या दृष्टीने सुपीकपणा, मग तो जमिनीचा असो, गुराढोरांचा असो, किंवा स्त्रियांचा असो, ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट होती. शेती नेहमीच पिकत नसे, आणि तसेच मैथुनातून अपत्यजन्मही नेहमी होत नसे. म्हणून धर्म आणि जादू (अभिचार) यांना इष्टफलप्राप्तीसाठी आवाहन केले जाई. सहानुभवात्मक अभिचाराच्या (sympathetic magic) तत्कालीन समजुतीनुसार लोक असे मानीत की मानवांतील बहुप्रसवत्व वाढले की जमिनीचेही वाढेल; आणि तसेच मानवांतील बहुप्रसवत्वाची आदिम समाजात मोठी मागणी असल्यामुळे तिच्याही वृद्ध्यर्थ विविध धार्मिक आणि अभिचारात्मक कर्मकांड सुरू झाले. प्राचीन ईजिप्तमध्ये मातृवंशीय युगाच्या उत्तरकाळात शेतीची सुरुवात झालेली दिसते; कारण तिथे धर्मातील लैंगिक भाग पुरुषलिंगाशी संबद्ध नसून स्त्रीलिंगाशी संबद्ध होता. स्त्रीलिंगाच्या कवडीशी असलेल्या साम्यामुळे तिच्या ठिकाणी जादूचे सामर्थ्य असल्याचे मानले गेले, आणि तसेच चलनाकरिताही कवड्यांचा वापर करण्यात आला. परंतु ही अवस्था लवकरच संपली, आणि उत्तरकालीन ईजिप्तमध्ये, आणि तत्कालीन जगातही सर्वत्र, स्त्रीलिंगपूजेची जागा पुरुषलिंगपूजेने घेतली. रॉबर्ट त्रिफॉच्या (Robert Briffault) ‘Sex in Civilization’ या ग्रंथातील एका प्रकरणात या संबंधातील महत्त्वाच्या गोष्टींचे वर्णन आढळते. तो म्हणतो :
‘कृषिविषयक सण, आणि विशेषतः पेरणी आणि कापणी यांनी संबद्ध असलेले सण, जगात सर्व स्थळी आणि सर्व काळी आढळतात, आणि त्यांत प्रामुख्याने लैंगिक स्वैराचार ठळकपणे दृष्टोत्पत्तीस येतो….अल्जीरियातील कृषीवल समाजात तेथील स्त्रियांवर कोणत्याही प्रकारची लैंगिक बंधने घातलेली चालत नाहीत, कारण लैंगिक बाबतीत नीती लादली गेल्यामुळे आपल्या शेतीवर प्रतिकूल परिणाम होतो असे ते मानतात.
‘अथेन्समधील पेरणी-उत्सवांत सुपीकपणाच्या जादूचे मूळ स्वरूप क्षीण स्वरूपात शिल्लक होते; तेथे स्त्रिया पुरुषलिंगाच्या प्रतिमा घेऊन फिरत आणि तोंडाने अश्लील भाषा उच्चारीत. रोमन पेरणी-उत्सवांत आणि त्यानंतर दक्षिण युरोपातही पुरुषलिंगप्रतिमांना प्रमुख स्थान असे.’
अनेक देशांत अशी समजूत प्रचलित आहे की चंद्र हा सर्व मुलांचा खरा पिता आहे. ही कल्पना अर्थातच चंद्रपूजेशी संबद्ध आहे. चांद्रमसीय आणि सौर पुरोहित व्यवस्थांमध्ये चाललेला एक चमत्कारिक संघर्ष आढळतो. त्याचा आपल्या विषयात साक्षात् संबंध नाही, परंतु धर्मात पंचांगाला नेहमीच महत्त्वाचे स्थान मिळाले आहे. इंग्लंडमध्ये अठराव्या शतकापर्यंत आणि रशियात तर थेट १९१७ च्या क्रांतीपर्यंत चुकीच्या पंचांगाला लोक चिकटून राहिले, कारण ते पोप ग्रेगोरीने बनविले होते. तसेच अतिशय चुकीच्या असणाऱ्या चांद्रमसीय पंचांगाचा सर्वत्र पुरस्कार करण्यात आला कारण त्याला चंद्रपूजकांचा पाठिंबा होता. त्यामुळे सौर पंचांगाचा विजय अतिशय मंदगतीने आणि केवळ अंशत:च झाला. ईजिप्तमध्ये तर एका काळी हा संघर्ष यादवी युद्धास कारण झाला. त्याचा संबंध ‘चंद्र’ या शब्दाचे लिंग काय याविषयीच्या वादाशी होता असे म्हणता येईल. तो शब्द जर्मन भाषेत आजतागायत पुल्लिंगी आहे. सूर्यपूजा आणि चंद्रपूजा दोन्हींचे अवशेष ख्रिस्ती धर्मात सापडतात, कारण येशूचा जन्म दक्षिणायनात झाला, तर त्याचे पुनरुत्थान पौर्णिमेला झाले. प्राचीन नागरणावर विवेकशीलतेचा आरोप करणे साहसाचे आहे. परंतु जेथे सूर्योपासकांची सरशी झाली तेथे तेथे तिचे कारण पिकांवर चंद्रापेक्षा सूर्याचा अधिक प्रभाव पडतो हेच असले पाहिजे या निष्कर्षाला विरोध करणे कठीण आहे. त्यामुळे शनिदेवाचे उत्सव वसंत ऋतूत होत.
सर्वच प्राचीन धर्मांमध्ये लिंगपूजा बऱ्याच प्रमाणात होती, आणि त्यामुळे आद्य ख्रिस्ती लेखकांना त्यांच्यावर शरसंधान करण्यास संधी मिळाली होती. परंतु ही सर्व टीका होऊनही मध्ययुगाच्या अंतापर्यंत लिंगपूजेचे अवशेष अस्तित्वात होते. जेव्हा प्रॉटेस्टंट पंथ निर्माण झाला तेव्हा त्यालाच फक्त लिंगपूजेचा पूर्ण नाश करण्यात यश मिळाले.
धार्मिक वेश्यावृत्ती ही प्राचीन काळी सर्वत्र प्रचलित असलेली आणखी एक संस्था. काही ठिकाणी प्रतिष्ठित स्त्रिया देवळात जात आणि तेथील पुजाऱ्याशी किंवा एखाद्या आगंतुक परक्या पुरुषाशी संग करीत. अन्य ठिकाणी तेथील पुजारिणी स्वतःच धार्मिक वेश्या (देवदास) असत. या सर्व चाली बहुधा स्त्रियांचे बहुप्रसवत्व देवांच्या कृपेने प्राप्त करण्याच्या प्रयत्नातून, किंवा जमिनीची सुपीकता सहानुभवात्मक जादूने प्राप्त करण्याच्या प्रयत्नांतून उद्भवल्या असाव्यात.
येथपर्यंत आपण धर्मातील कामप्रेरणेला अनुकूल घटकांचा विचार केला. परंतु त्याचबरोबर कामविरोधी घटकही फार प्राचीन काळापासून धर्मात आढळतात, आणि जिथे ख्रिस्ती किंवा बौद्ध धर्म कायम झाले तिथे या कामविरोधी घटकांना पूर्ण यश प्राप्त झाले. ज्याचे वर्णन वेस्टरमार्क¹ ‘विवाहात, आणि सामान्यपणे सर्वच लैंगिक संबंधांत, काहीतरी अशुद्ध आणि पाप आहे हा चमत्कारिक समज’ असे करतो, त्याची त्याने अनेक उदाहरणे दिली आहेत. जगातील अतिशय भिन्न भागांत, ख्रिस्ती किंवा बौद्ध प्रभावापासून दूर अशा ठिकाणीही, ब्रह्मचर्याचे व्रत घेतलेले पुजारी आणि पुजारिणी यांचे गण किंवा आश्रम असत. ज्यूंचा जो एसीन (Essenes) नावाचा पंथ होता त्याचे अनुयायी सर्व लैंगिक व्यवहार अशुद्ध समजत, हे मत ख्रिस्तधर्मविरोधी लोकांतही त्यावेळी पसरले होते. खरे म्हणजे रोमन साम्राज्यात एकूण सामान्य प्रवृत्ती तापसवृत्तीला अनुकूल अशीच होती. एपिक्यूरसवाद² जवळजवळ नष्ट झाला होता, आणि सुसंस्कृत ग्रीक आणि रोमन लोकांत स्टोइकवादाने² त्याची जागा घेतली होती. बायबलमधील ‘ ॲपॉक्रिफा’ (Apocrypha) नामक भागांत असे कित्येक परिच्छेद आहेत की ज्यात स्त्रियांसंबंधी मठवासियांची वृत्ती व्यक्त झाली आहे. जुन्या करारातील (Old Testament) रांगड्या पौरुषाच्या वृत्तीहून ही अगदी भिन्न आहे. नवप्लेटोवादी हे जवळजवळ ख्रिस्ती लोकांइतकेच तापसवृत्तीचे होते. शरीर पापयोनि आहे हे मत इराणमधून पश्चिमेकडे पसरले, आणि ते मैथुनक्रिया अपवित्र आहे हा विश्वास बरोबर घेऊन आले. हेच मत ख्रिस्ती धर्माचेही आहे, पण मी त्याविषयी पुढील प्रकरणात लिहिणार आहे. परंतु एवढे स्पष्ट दिसते की काही विशिष्ट परिस्थितीत मनुष्यांना यदृच्छया लैंगिक व्यवहाराची घृणा वाटू लागते, आणि ही जेव्हा उद्भवते तेव्हा ती पूर्णपणे नैसर्गिकपणे उद्भवते. लैंगिक व्यापाराचे सामान्य आकर्षण जितके स्वाभाविक असते तितकीच घृणाही स्वाभाविक असते. कामव्यापाराची कोणती व्यवस्था मानवी स्वभावाला सर्वांत समाधानकारक होईल याचा विचार करताना ही कामघृणा लक्षात घेणे आणि तिचे आकलन होणे आवश्यक असते. प्रथम हे लक्षात ठेवले पाहिजे की या प्रकारची प्रतिकूल वृत्ती विशिष्ट समजुतींतून उद्भवते असे मानणे व्यर्थ आहे.
या प्रकारच्या समजुती मुळात एका प्रकारच्या भाववृत्तीतून (mood) उद्भवतात. त्या समजुती एकदा उद्भवल्या की त्या भाववृत्ती कायम करण्यास त्या मदत करतात हे खरे आहे; पण त्या स्वतः कामविरोधी प्रवृत्तीचे कारण असतील हे असंभवनीय वाटते. या प्रकारच्या प्रवृत्तीची कारणे मुख्यतः दोन आहेत, मत्सर (jealousy) आणि लैंगिक थकवा, मत्सर थोडाही निर्माण झाला तरी मैथुनाविषयी उद्वेग वाटू लागतो, आणि कामेच्छा घृणास्पद वाटू लागते. पूर्णतः सहजप्रवृत्तिमय मनुष्याला (the purely instinctive man) जर शक्य झाले तर सर्व स्त्रियांनी आपल्यावर, आणि आपल्यावरच प्रेम करावे असे वाटते. अन्य पुरुषांना एखादीने प्रेम दिले तर त्यामुळे त्याच्या मनात अशा भावना उद्भवतात की ज्यांचे रूपांतर त्या स्त्रीच्या कर्माचा नैतिक धिक्कार करण्यात सहज होऊ शकते. जर ती स्त्री त्याची पत्नी असेल तर हे विशेषत्वाने होते. आपल्याला शेक्सपीअरच्या वाङ्मयात असे दिसते की त्याच्या पुरुषपात्रांना प्रबल काम असलेल्या स्त्रिया आवडत नाहीत. त्यांच्या मते आदर्श स्त्री पतीच्या आलिंगनादींना कर्तव्यभावनेने प्रतिसाद देते. पतीखेरीज आपल्याला कोणी प्रियकर असावा असा विचार तिला सुचतच नाही, कारण कामक्रीडेची तिला नावड असते, आणि ती ती सहन करते कारण नीतिनियमांचा तसा आदेश असतो. सहजप्रवृत्तिमय नवऱ्याला जेव्हा कळते की आपल्या बायकोने आपल्याला फसविले आहे, तेव्हा त्याला ती आणि तिचा प्रियकर दोघांच्याही विषयी जुगुप्सा वाटू लागते, आणि काम केवळ पाशवी आहे असा निष्कर्ष तो काढण्याचा संभव असतो. तो जर वार्धक्यामुळे किंवा अतिरेकामुळे नपुंसक झाला असेल तर त्याला काम केवळ पशूंनाच योग्य आहे असे वाटण्याचा संभव जास्तच असतो. बहुतेक समाजांत वृद्धांना तरुणांपेक्षा जास्त मान असल्यामुळे लैंगिक बाबीतील अधिकृत आणि ‘निर्दोष’ मते ही चंडप्रकृति तरुणांच्या मतांहून भिन्न असावीत हे स्वाभाविक आहे. लैंगिक थकवा ही नागरणाने (civilization) आणलेली गोष्ट आहे. ती पशूंमध्ये अज्ञात असावी, आणि अनागरित मनुष्यात ती फार क्वचित आढळते. एकपत्नीक कुटुंबात तो आढळलाच तर फार थोड्या प्रमाणात, कारण बहुतेक पुरुषांना अतिरेकाला प्रवृत्त करण्याकरिता नावीन्याचे प्रोत्साहन लागते. तसेच जेथे स्त्रिया पुरुपांना नकार द्यायला स्वतंत्र असतात तेथेही तो क्वचितच आढळतो, कारण तसे असेल तर प्राण्यांतील माद्यांप्रमाणे त्या प्रत्येक रतिकर्माच्या आधी प्रियाराधनाची अपेक्षा ठेवतील, आणि पुरुषाची कामेच्छा पुरेशी प्रबळ आहे असे कळल्यावरच त्याला अनुमती देतील. ही शुद्ध सहजात भावना आणि तदनुरूप वर्तन नागरणामुळे फार कमी झाले आहे. ते नष्ट होण्याचे मुख्य कारण आर्थिक आहे. विवाहित स्त्रिया आणि वेश्या दोघीही आपल्या उपजीविकेकरिता आपल्या लैंगिक आकर्षणावर अवलंबून असतात, आणि म्हणून त्या त्यांची स्वतःची कामेच्छा जागृत झाली म्हणजेच संभोगाला अनुमती देतात असे होत नाही. लैंगिक थकव्यापासून बचाव होण्याचे नैसर्गिक साधन म्हणजे प्रियाराधन; परंतु वरील कारणास्तव रतिकर्मात त्याचे स्थान फारच गौण राहिले आहे. म्हणून ज्यांच्यावर कडक नैतिक बंधनांचे नियंत्रण नसते असे लोक संभोगाचा अतिरेक करण्याचा संभव असतो; आणि त्यातून शेवटी थकवा आणि वैराग्य निर्माण होतात, आणि त्यातून तापसवृत्ती निष्पन्न होते.
जिथे मत्सर आणि लैंगिक थकवा दोन्हीचे सहकार्य होते, (आणि असे वारंवार होते), तेथे कामविरोधी भावना अतिशय प्रबल होऊ शकते. अतिशय उच्छृंखल समाजात तापसवाद वाढीला लागण्याचे प्रधान कारण हे आहे असे मला वाटते.
परंतु ब्रह्मचर्य हे जे ऐतिहासिक घटित (phenomenon) आहे त्याच्या उत्पत्तीची अन्यही कारणे आहेत. देवतांना वाहिलेले पुजारी आणि पुजारिणी यांचे त्या देवतांशी लग्न लागले असे समजतात, आणि त्यामुळे त्यांना मर्त्य मानवांशी संभोग करण्यापासून अलिप्त राहावे लागते. ते (आणि त्या) स्वाभाविकपणेच अनादि पवित्र समजले जातात, आणि अशा रीतीने पावित्र्य आणि ब्रह्मचर्य यांत अनुबंध निर्माण होतो. आजही कॅथलिकांच्या भिक्षुणींना ख्रिस्ताच्या वधू समजतात, आणि त्यांनी मर्त्य मानवांशी संभोग करणे पाप समजले जाते याचे एक महत्त्वाचे कारण हे आहे.
आपण आतापर्यंत विचारात घेतलेल्या कारणांव्यतिरिक्त प्राचीन काळाच्या उत्तरार्धात आढळणाऱ्या वाढत्या तापसवादाची अन्यही कारणे असावीत असे मला वाटते. अशी काही युगे असतात की जेव्हा जीवन आनंदमय वाटते; लोक उत्साही आणि उद्योगी असतात, आणि इहलोकीची सुखे पूर्ण समाधान देऊ शकतात. पण अन्य काही युगे अशी असतात की जेव्हा लोक श्रांत भासतात, जेव्हा त्यांना हे जग आणि त्यात मिळणारी सुखे अपुरी वाटतात, जेव्हा लोक आध्यात्मिक सांत्वनाकडे डोळे लावून बसतात, किंवा इहलोकाच्या असारतेच्या भरपाईकरिता परलोकाची प्रतीक्षा करतात. ‘Song of songs’ मधील सॉलोमनची तुलना Ecclesiastes मधील सॉलोमनशी केल्यास हे लक्षात येईल. त्यांपैकी पहिला प्राचीन जगाच्या उत्कर्षाच्या काळाचा प्रतिनिधी आहे, तर दुसरा त्याच्या ऱ्हासकाळाचा प्रतिनिधी आहे. या बदलाचे कारण काय आहे ते मी सांगू शकत नाही.
कदाचित् ते एखादे अतिशय सोपे आणि शरीरशास्त्रीय कारण असू शकेल. उदा. मोकळ्या हवेतील उत्साही आणि उद्योगी दिनचर्येच्या जागी बैठे नागरजीवन आल्यामुळे असेल; कदाचित् स्टोइक तत्त्वज्ञांचे यकृत मंदगती असेल; कदाचित् Ecclesiastes चा लेखक पुरेसा व्यायाम करीत नसल्यामुळे त्याला सर्व जग असार वाटत असेल. ते काहीही असो, या प्रकारच्या भाववृत्तीत (mood) मनुष्य कामप्रेरणेचा धिक्कार सहज करू शकतो यात शंका नाही. बहुधा आपण सुचविलेली कारणे, आणि कदाचित् इतरही काही असतील, या सर्वांचा प्राचीन युगाच्या उत्तरकाळातील श्रांततेला हातभार लागला असेल आणि त्या श्रांततेचे एक अंग तापसवृत्ती हे होते. दुर्दैवाने ख्रिस्ती नीती ग्रंथित झाली ती या ऱ्हासाच्या आणि रुग्ण मनोवृत्तीच्या काळी. ज्यांचे जीवशास्त्रीय मूल्ये आणि मानवी जीवनाचे सातत्य यांचे भान पूर्ण नष्ट झाले होते अशा या रुग्ण, श्रांत आणि निराश झालेल्या माणसांची जी जीवनदृष्टी होती तिच्यानुसार आयुष्य व्यतीत करण्याकरिता नंतरच्या काळातील दमदार मनुष्यांना खूपच प्रयत्न करावे लागले. परंतु हा विषय पुढच्या प्रकरणाचा आहे.

अनुवादक: म. गं. नातू

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.