विवेकवाद – ४

विज्ञान, अध्यात्म आणि साक्षात्कार
गेल्या दोन लेखांकांत आपण पाहिले की ईश्वरारितत्वसाधक कोणताही युक्तिवाद निर्णायक नाही. त्यांपैकी काही निराधार गोष्टी गृहीत धरून त्यावर आधारलेले आहेत, तर काहींत स्वच्छ व्याघात आहे असे आपल्याला आढळून आले. पण एक युक्तिवाद अजून तपासायचा राहिला आहे, आणि त्यावर ईश्वरवाद्यांची बरीच भिस्त आहे. हा युक्तिवाद म्हणजे ईश्वराचा साक्षात्कार होतो या दाव्यावर आधारलेला. त्याकडे आता वळू.

या लेखमालेच्या पहिल्या लेखांकात असे म्हटले होते की कोणत्याही विधानावर विश्वास ठेवायचा (किंवा ते स्वीकारायचे) तर तो त्या विधानाच्या पुराव्यावर आणि त्या पुराव्याच्या प्रमाणात ठेवावा; आणि पुरावा आपल्याला तपासता येत नसेल, तर त्या क्षेत्रातील तज्ज्ञांना प्रमाण मानावे. यावर साक्षात्कारवादी चटकन् म्हणेल की ‘म्हणजे तुम्ही आप्तवचन मानता तर! मग आम्हाला ते का मानू देत नाही?

ईश्वराविषयीच्या कोणत्याही प्रश्नाचे उत्तर त्या क्षेत्रातील तज्ज्ञाला विचारावे लागेल, आणि ईश्वरविषयक क्षेत्राचे तज्ज्ञ म्हणजे ज्यांना ईश्वराचा साक्षात्कार झाला आहे असे संत, भक्त. ते जर सांगतात की ईश्वर आहे, आणि तो अमुक गुणांनी युक्त आहे तर त्यांचे म्हणणे अतज्ज्ञांनी स्वीकारण्याला काय हरकत आहे? त्यांच्यावर विश्वास ठेवणे विवेकवादास धरूनच होणार नाही काय? साक्षात्कारी पुरुषांची साक्ष नाकारण्याचा अधिकार त्या मार्गाने गेलेल्या, त्यात अवश्य असलेली साधना पूर्ण करून अधिकार प्राप्त केलेल्या व्यक्तीलाच असू शकेल. पण तुम्ही तथाकथित विवेकवादी त्या मार्गाने न जाता त्या मार्गाचा फोलपणा प्रतिपादता ही गोष्ट अविवेकी, असमंजस नाही काय? विज्ञानाच्या क्षेत्रात पुरेसे प्रशिक्षण घेऊन अधिकार प्राप्त न करता जर कोणी वैज्ञानिक सिद्धांतांना नावे ठेवू लागला तर आपण ते जसे अविवेकी समजू, तसेच ईश्वरप्राप्तीची साधना न करता ईश्वर नाही म्हणणे हेही तितकेच अविवेकी आणि गैर होईल.’

सकृत्दर्शनी हा युक्तिवाद बिनतोड दिसतो यात शंका नाही. परंतु वस्तुतः त्यात विज्ञान आणि ईश्वरशास्त्र किंवा अध्यात्म यांतील एका अतिशय मूलभूत भेदाकडे दुर्लक्ष झाले आहे. वैज्ञानिक पद्धती आणि अध्यात्माची पद्धती यांत फार फरक आहे, आणि त्या फरकामुळे विज्ञानावर विश्वास ठेवणे विवेकी ठरते, परंतु अध्यात्मावर विश्वास ठेवणे ठरत नाही.

अध्यात्म आणि विज्ञान
विज्ञानाची आणि वैज्ञानिक पद्धतीची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत.
(१) विज्ञानाची पद्धती पूर्णपणे लौकिक आहे. तिच्यात कसलीही गूढता नाही. त्यात आपण लौकिक, दैनंदिन जीवनात वापरतो त्याच युक्तिवाद पद्धती वापरल्या जातात, विज्ञानात ज्ञानेंद्रियांना मदत म्हणून वैज्ञानिक उपकरणे वापरतात; पण ही उपकरणे साध्या दैनंदिन उपकरणांचेच परिष्कृत अवतार असतात. त्यात वापरले जाणारे गणित प्रगत असते, पण त्यात गूढ काहीही नसते. पुरेशी बुद्धी असलेले कोणीही ते गणित शिकू शकतो, आणि दरवर्षी सबंध जगात लक्षावधी लोक ते शिकतात आणि वापरतात.
(२) विज्ञान म्हणजे सर्वमान्य अशा निश्चित ज्ञानाचा सतत वाढत जाणारा एक विशाल संचय आहे. त्या ज्ञानाचे सतत लक्षावधी वैज्ञानिकांकडून परीक्षण आणि शोधन चालू असते. त्यात कोठेही लपवाछपवी नसते, कसलीही दादागिरी नसते. त्यामुळे कोणत्याही क्षणी संशयातीत ज्ञानाचा एक विशाल साठा कोणालाही उपलब्ध असतो. विज्ञानात मतभेद असतो, संशय व्यक्त केले जातात; पण ते ज्ञानाच्या प्रस्थापनेच्या काळात. ज्याविषयी वैज्ञानिकांचे मतैक्य नसेल, किंवा ज्याविषयी संशय व्यक्त करणे शक्य असेल, अशा विधानांना विज्ञानात प्रवेश मिळत नाही. ज्याचा विज्ञानात प्रवेश होतो त्याबद्दल कोणाचेच दुमत आढळत नाही; किंबहुना ज्याविषयी दुमत असेल ते विज्ञानात समाविष्टच केले जात नाही.
(३) आता हे खरे आहे की अनेकदा आज जे स्वीकृत, प्रस्थापित विज्ञान असते, ते उद्या शंकास्पद होते. पण येथेही प्रस्थापित विज्ञान शंकास्पद होते याचे कारण नवीन वास्तवे उघडकीस येतात, आणि त्यांचा उलगडा विद्यमान उपपत्तींनी होत नाही; किंवा विद्यमान उपपत्तीपेक्षा सरल (simpler) उपपत्ती कोणाला तरी सुचते, आणि मग तिचा विचार सुरू होतो. याचा अर्थ असा आहे विज्ञानात प्रस्थापित ज्ञान हे केवळ अद्ययावत् (up to date), म्हणजे आजपर्यंत, प्रस्थापित असते; पण ते उद्या संशयास्पद ठरू शकते, आणि क्वचित त्याचा त्यागही करावा लागतो. पण ते संशयास्पद किंवा अपुरे किंवा अकारण गुंतागुंतीचे आहे हे सिद्ध व्हावे लागते. जेव्हा नवी वास्तवे उघडकीस येतात तेव्हा अर्थातच विद्यमान उपपत्तीने त्यांचा उलगडा होऊ शकत नाही. अशा वेळी जुन्या आणि नव्या सर्व वास्तवांना आपल्या कवेत घेणाऱ्या, विद्यमान उपपत्तीहून अधिक व्यापक उपपत्तींचा शोध सुरू होतो, आणि अशी उपपत्ती सापडली की तिची परीक्षा करून तिचा स्वीकार केला जातो. एकोणविसाव्या शतकाच्या अखेरीपर्यंत अंतिम म्हणून चालत आलेले न्यूटनप्रणीत विज्ञान विसाव्या शतकात मागे पडले, आणि त्याची जागा आइन्स्टाइनप्रणीत उपपत्तीने घेतली. आइन्स्टाइनची उपपत्ती न्यूटनच्या उपपत्तीपेक्षा खूपच अधिक व्यापक आहे, म्हणजे न्यूटनच्या उपपत्तीने ज्या ज्या गोष्टींचा उलगडा होत होता त्या सर्वाचा उलगडा तर आइन्स्टाइनच्या उपपत्तीने होतोच, पण न्यूटनच्या उपपत्तीच्या आटोक्यात न येणाऱ्या एका विशाल क्षेत्रावरही तिचा अधिकार चालतो.
(४) कोणत्याही काळी एकाच घटित क्षेत्राविषयी दोन उपपत्ती विज्ञानात अरात नाहीत. उपपत्तींच्या परीक्षाकाळांत अनेक उपपत्ती असू शकतील; पण त्यांचे स्वरूप उपन्यासाचे (hypothesis) किंवा संभाव्य सत्याचे असते. या अवस्थेत कोणत्याच वैज्ञानिकाला समाधान वाटत नाही. तत्त्वज्ञानाच्या, अतिभौतिकीच्श (metaphysics) क्षेत्रात ‘ एकंसत् विप्रा बहुधा वदन्ति’ असे असेल; पण विज्ञानात मात्र सत्य एकच असते, बहुधा नसते. म्हणून अनेक संभाव्य उपन्यासांपैकी कोणता तरी आहे याचा शोध होणे अनिवार्य असते. असा शोध ताबडतोब सुरू होतो, आणि त्याचा निकालही लावला जातो. पण हा निकाल लागेपर्यंत कोणत्याच उपन्यासाचा प्रस्थापित विज्ञानात समावेश होत नाही.

आता विज्ञानाच्या तुलनेत अध्यात्माचा विचार केल्यास ते विज्ञानाहून वरील सर्व बाबतीत भिन्न आहे असे दिसून येईल.
(१) आध्यात्मिक ज्ञानाचे स्वरूप गूढ, गुह्य असून ते फक्त श्रद्धावान साधकालाच सांगितले जाते. जिज्ञासू जिज्ञासू म्हणून स्वीकारला जाण्यापूर्वी त्याला पूर्ण श्रद्धावान बनावे लागते. त्याच्या मनात गुरूच्या ज्ञानासंबंधी, किंवा त्याच्या सत्यतेविपयी शंकेचा लवलेशही असता कामा नये. अश्रद्ध मनुष्याला अध्यात्मज्ञान देऊ नये,‘संशयात्मा विनश्यति’, इत्यादि वचने प्रसिद्ध आहेत.
(२) भारतीय अध्यात्मापुरते बोलायचे तर ईश्वरविषयक ज्ञानाचा किंवा तत्त्वज्ञानाचा एकमेव मार्ग आहे, आणि तो म्हणजे श्रुतींतील शब्द. लौकिक गोष्टींचे ज्ञान आपली इंद्रिये आणि अनुमान यांच्या साह्याने मिळू शकते. परंतु ईश्वर, परलोक, इत्यादी गोष्टींची माहिती आपल्याला वेदांतूनच मिळू शकते. म्हणजे वेदवचने किंवा शब्द हे। तत्त्वज्ञानाचे अनिवार्य साधन आहे. परंतु वेदवचनांनी आपल्याला अंतिम सताची माहिती मिळत असली, तरी तिचे खरे आकलन होण्याकरिता शब्दाला साक्षात्काराची जोड द्यावी लागते. एक उदाहरण म्हणून वेदांताचे घेऊ, पण इतर कोणतेही दर्शन चालू शकते. वेदांतदर्शन असे शिकविते की ब्रह्म सत्य आहे, जगत् मिथ्या आहे, आणि जीव आणि ब्रह्म एकच आहेत. काही माहिती गुरुमुखातून प्राप्त करण्याला श्रवण म्हणतात. त्यानंतर या तत्त्वांची सिद्धी केली जाते, आणि त्यांवर येणाऱ्या आक्षेपांचे निरसन केले जाते. ही मननाची अवस्था. शेवटची अवस्था निदिध्यासनाची. म्हणजे गुरुमुखातून प्राप्त झालेल्या तत्त्वांचे निरंतर चिंतन करण्याची, निदिध्यासात सामान्यपणे एखादे महावाक्य (उदा. ‘अहं ब्रह्मास्मि’ किंवा ‘सर्व खल्विदं ब्रह्म, किंवा असेच एखादे वचन) सतत मनात घोळवावे लागते. रोज कित्येक तास चित्त एकाग्र करून एखाद्या महावाक्याचे ध्यान करावयाचे अशी साधना जेव्हा अनेक वर्षे केली जाते, तेव्हा जर साधक सुदैवी असेल तर त्याला एक दिवस साक्षात्कार होतो. आपण व्रह्म आहोत हे त्याने आधी नुसते ऐकले होते, आणि ते तर्काने सिद्ध केले होते; पण हे सर्व केवळ परोक्ष ज्ञान होते. आता मात्र त्याला आपण ब्रह्म आहोत ह्याची साक्षात् प्रचीती येते. असाचे साक्षात्कार अन्य मतानुयायांना आपापल्या मतांचाही होतो.
(३) विज्ञान म्हणजे सर्वमान्य आणि प्रत्यही वर्धमान असा ज्ञानाचा साठा आहे असे वर सांगितले आहे. उलट अध्यात्मात जवळपास काहीही सर्वमान्य नसते. अध्यात्मात अनेक दर्शने असतात, आणि ह्या दर्शनांचे परस्परांशी पटत नाही. जगातील प्रत्येक धर्माचा एकेक स्वतंत्र पंथ असतो, एवढेच नव्हे तर प्रत्येक धर्मात अनेक पंथ असतात. फिरून केवळ भारतीय अध्यात्माविषयीच बोलायचे. तर इथे डझनावारी पंथविशेष आहेत. इथे वेदान्त दर्शनात अद्वैत वेदान्त आहे, तसेच शुद्धाद्वैत आणि विशिष्टाद्वैत असे पर्यायही आहेत. त्याशिवाय इथे अनेक द्वैती अध्यात्मेही आहेत. त्यातली काही ईश्वरवादी आहेत, तर काही निरीश्वरवादी आहेत. आणि विशेष म्हणजे त्या प्रत्येक पंथाच्या अनुयायाला आपापल्या तत्त्वाचा साक्षात्कार होतो. ईश्वरवाद्यांपैकी काही शैव आहेत, तर काही वैष्णव आहेत. काही शक्तीचे उपासक आहेत, काही रामाचे भक्त आहेत, तर काही कृष्णाचे भक्त आहेत, आणि त्या प्रत्येकाला आपापल्या देवतेचा साक्षात्कार होतो. प्रत्येक दर्शन अन्य सर्व दर्शनांचे खंडन करते आणि आपलेच दर्शन बरोबर आहे असा दावा करते. अध्यात्मात याप्रमाणे एकवाक्यता नाही. त्यामुळे अध्यात्मज्ञान हा काही सर्वमान्य आणि वर्धमान असा ज्ञानसंचय नाही.
(४) विज्ञानात कोणत्याही काळी अजून प्रस्थापित न झालेल्या गोष्टींविषयी मतभेद असतात, आणि त्यांत भरपूर वाद चालतो. पण हा वाद कसा मिटवायचा याच्या सर्वमान्य पद्धती विज्ञानात आहेत, आणि त्या पद्धतींनी मतभेद हळूहळू मिटत जातो. परंतु भिन्न अध्यात्मांच्या सत्यासत्यतेचा निर्णय करता येईल अशी कोणतीही सर्वमान्य चर्चा पद्धती नाही. एका अध्यात्माने दुसऱ्या अध्यात्माचे कितीही खंडन केले तरी त्या दुसऱ्यावर त्याचा काहीही परिणाम होत नाही. तो दुसरा पहिल्याचे खंडन करतो, आणि अशा तऱ्हेने खंडनाचे खंडन शतकानुशतके चालू असते. परंतु आपली तत्त्वे कोणी सोडत नाही.

या लेखारंभी ईश्वरवाद्यांचा जो एक आक्षेप दिला आहे त्याला उत्तर काय द्यायचे ते आता स्पष्ट होईल. विज्ञानांच्या क्षेत्रात तज्ज्ञ कोण आहे आणि कोण नाही याचा निर्णय लावता येतो. परंतु अध्यात्माच्या क्षेत्रात कोणाही दोन तज्ज्ञांचे परस्परांशी पटत नाही. अशा स्थितीत अतज्ज्ञाने कोणत्या तज्ज्ञाकडे जावे? साक्षात्कार आणि त्याचा आशय येथे एक गोष्ट विशेष लक्षात ठेवायला हवी. ती म्हणजे येथे आपण कोणाही साक्षात्कारवाद्याला साक्षात्कार झाला नाही, किंवा आपल्याला साक्षात्कार झाला आहे असे तो खोटेच सांगतो आहे असे दुरूनही सुचवायचे नाही. अर्थात् साक्षात्काराची महती गाणाऱ्यांपैकी कोणी लबाड नसतीलच असे नाही. परंतु निदान काही सच्चे, प्रामाणिक साक्षात्कारवादी आहेत हे आपण मान्य करू या. परंतु साक्षात्कारवादी प्राणिक आहे हे मान्य केले तर त्याचा साक्षात्कारही खरा मानावा लागणार नाही काय? याला उत्तर आहे, नाही. कारण एका महत्त्वाच्या भेदाकडे वाचकाचे लक्ष आकृष्ट करायचे आहे. तो भेद आहे अनुभव आणि त्याचा आशय यांचा. उदाहरणार्थ, जागेपणी आपल्याला भिन्न इंद्रियांनी भिन्न अनुभव येत असतात. त्यांपैकी काही अनुभव यथार्थ असतात आणि काही अयथार्थ असतात असे आपण म्हणतो. एखादा अनुभव यथार्थ आहे याचा अर्थ त्या अनुभवाचा विषय (उदा. दृष्टीचा विषय – दोरी, साप, शिंपला, रुपे इत्यादि) जसा असेल तसे त्याचे स्वरूप आपल्याला भासते, आणि भ्रमात विषयाचे स्वरूप जसे आहे त्याहून अन्य भासते, पण म्हणून भ्रामक अनुभव अनुभव नसतो असे आपण म्हणत नाही. म्हणजे जिथे दोरी होती तिथे जर कोणाला साप दिसला, तर आपण साप पाहिला असे म्हणताना तो खोटे बोलत होता असे म्हणावयाचे कारण नाही. त्याला खरोखरच सर्प दिसला असा भास झाला असेल, आणि तो ते खरे मानीत असेल. तसेच झोपेत आपल्याला स्वप्नांचा अनुभव येतो. तो अनुभव आपल्याला खरोखरच येत असतो; म्हणजे आपल्याला स्वप्ने दिसतात ही गोष्ट काही खोटी नसते. पण त्या स्वप्नांचा आशय वास्तव नसून मनोनिर्मित असतो असे आपण म्हणतो. दारुड्या मनुष्याला पिऊन तर्र झाल्यावर म्हणे गुलाबी उंदीर दिसतात; पण वस्तुतः गुलाबी उंदीर त्याच्याजवळ आसपास किंवा कुठेच नसतात. तेव्हा आपल्याला एखादा अनुभव येतो हे पूर्णपणे खरे असूनही तो अनुभव यथार्थ नसू शकतो हे मान्य करायला हवे.

आता साक्षात्कारी मनुष्याला जे साक्षात्कार होतात ते दारुड्याला दिसणान्या गुलावी उंदरासारखे भ्रामक असतात असे येथे सुचवायचे आहे. साक्षात्काराच्या प्रांतात भ्रम होतात याचे प्रमाण काय असा प्रश्न विचारला जाईल. या प्रश्नाचे उत्तर द्विविध आहे. एक उत्तर म्हणजे साक्षात्काराची विविधता, आणि दुसरे साक्षात्कारी मनुष्याची मनःस्थिती साधारण (normal) नसते, ती विसाधारण (abnormal) असते. या दोन उत्तरांकडे आता वळू.
(१) साक्षात्कार अतिशय विविध आहेत; त्यामुळे कोणाचा साक्षात्कार मानायचा ते ठरविणे अशक्य होते. जर सर्व साक्षात्कारी व्यक्तींना एकच, निदान बराच सारखा साक्षात्कार झाला असता तर साक्षात्कार भ्रामक आहेत असे म्हणण्याचे कारण नव्हते. आपल्या लौकिक अनुभवातसुद्धा एखाद्या गोष्टीचे आपल्याला घडलेले दर्शन यथार्थ की अयथार्थ हे आपण कसे ठरवितो? एक उपाय म्हणजे सर्व लोकांची साक्ष, सर्वांचे एकमत. मी या क्षणी टेबलाशी बसून काहीतरी लिहितो आहे हा यथार्थ अनुभव आहे. याचे एक प्रमाण म्हणजे घरातील अन्य लोकांनाही तेच दिसते आहे हे आहे. जर मला एकट्याला मी लिहितो आहे असा अनुभव आला असता, आणि अन्य लोकांना मी अंथरुणात गाढ झोपलो आहे असे दिसले असते, तर माझा अनुभव भ्रामक आहे असे आपण म्हणालो असतो. परंतु अध्यात्माच्या क्षेत्रात साक्षात्कारी पुरुषागणिक भिन्न साक्षात्कार आढळतात. ईश्वराचे भक्ताला होणारे साक्षात्कार, अध्यात्मात त्याच्या तत्त्वांचे होणारे साक्षात्कार हे अतिशय भिन्न आहेत. रामभक्ताला होणारा साक्षात्कार वेगळा आणि कृष्णभक्ताला होणारा साक्षात्कार वेगळा. तसेच वेदांन्त्याला होणारा साक्षात्कार वेगळा आणि सांख्यमतानुयायाला होणारा साक्षात्कारही वेगळा. ज्याचे जे मत असेल, किंवा श्रद्धा असेल तसा त्याला साक्षात्कार होतो. साक्षात्कार हे ज्ञानप्राप्तीचे एक साधन आहे असे मानण्याच्या मार्गात हा मोठा अडथळा आहे.
(२) साक्षात्कारी मनुष्याची मनोवस्था साधारण नसते, विसाधारण असते असे म्हणण्यास सबळ कारणे आहेत. साक्षात्काराची जी साधना आहे तिचे स्वरूप बरेचसे स्वसंमोहनाचे (self-hypnosis) आहे. साधनेच्या आरंभीच ज्याचा साक्षात्कार व्हायचा आहे त्याच्या सत्यतेविषयी साधकाची पूर्ण खात्री झालेली असते. त्याच्या संबंधाने तो पूर्ण निःशंक असतो. आणि नंतर तो दीर्घकालपर्यंत त्या विषयाचे निरंतर ध्यान करीत असतो.

जर कोणी वर्षानुवर्षे रोज तासचे तास ‘मी ब्रह्म आहे’ असा मनाशी घोष करीत असेल, तर केव्हातरी त्याला तसा अनुभव येणे अनिवार्य आहे. याचा अर्थ साक्षात्कार ही गोष्ट स्वसंमोहनाच्या स्वरूपाची आहे. तिच्या द्वारा आपल्याला यथार्थ ज्ञान होते असे म्हणणे दुरापास्त आहे. तसेच साक्षात्काराची जी प्रक्रिया सांगितली तिने साक्षात्कारांच्या विविधतेचाही उलगडा सहजच होतो. आपण ज्या गोष्टीचे ध्यान करू तिचा आपल्याला साक्षात्कार होऊ शकतो, आणि साधना करणारे विविध तत्त्वांचे अनुयायी असल्यामुळे त्यांचे साक्षात्कारही अतिशय भिन्न असतात.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.