वाचकांच्या निवडक प्रतिक्रिया

वा. वि. भट
संपादक ‘संग्रहालय’
अभिनव प्रकाशन
अंक मिळाला. लगेच वाचूनही काढला. त्यातील मनुताईंच्या परिचयाचा श्री. कुळकर्णी यांनी लिहिलेला लेख खूप आवडला. डॉ. भोळे यांचा सोव्हिएट रशिया व पूर्व युरोपातील घडामोडी संबंधीचा लेखही विचार प्रवर्तक आहे. श्री. दिवाकर मोहनी यांचे पत्र अत्यंत मार्मिक वाटले.

श्रीमती दुर्गा भागवत
अंक वाचनीय व उद्बोधकही आहे. बरट्रॅंड रसेल रसेलच्या पुस्तकाचा अनुवाद या मासिकाचे वैशिष्ट्य ठरावे.आपल्या कार्यात आपल्याला यश मिळो हीच इच्छा.

ना. ग. गोरे
अंक मिळाला. धन्यवाद, लेख आवडले.

श्री. वि. भावे (आय्. ए. एस्. निवृत्त) माजी उपलोकायुक्त,
महाराष्ट्र महाराष्ट्र शासनाचे निवृत्त मुख्य सचिव
तुमचा हा नवा उपक्रम पाहून वाटते की तुम्ही जुन्या आणि व्यापक अर्थाने तत्त्वज्ञ आहात. असे तत्त्वज्ञ की तात्त्विक जिज्ञासा आणि स्वाध्याय यांच्या लक्ष्मणरेपांनी सगळ्या लौकिक जगापासून ज्यांना बंदिस्त करून ठेवलेले नाही.

प्राचार्य जी. एस्. बेडगकर
आगरकरांचे पुनरुज्जीवन होणे अवश्य आहे. तसे पाहिले तर आजच्या इतकी आगरकरांची गरज पूर्वी कधी नसेल.

मं. वि. राजाध्यक्ष
विजया राजाध्यक्ष
या नियतकालिकाला लवकरच स्थैर्य लाभेल आणि त्या मागील संकल्प पूर्णपणे सिद्धीस जाईल अशी आम्हाला आशा आहे.

वसंत कानेटकर
उपक्रम स्तुत्यच आहे. विवेकबुद्धि घडवण्यासाठी ‘जवळचा पर्याय’ नाही हे खरेच आहे. तसेच एखाद्या पिढीत एक आगरकर निर्माण होऊन भागत नाही हेच, शंभर वर्षांनंतर तेच प्रश्न नवे रूप घेऊन उभे राहतात, तेव्हा लक्षात येते.
तुम्ही कै. आगरकरांचा उतारा सुरेख निवडला आहे. तुमच्या कै. पत्नीचे व्यक्तिचित्रही फार ठसठशीत आणि बोलके उमटले आहे. निदान काही थोड्यांना तरी तुम्ही चांगले वैचारिक खाद्य पुरवता आहात. धन्यवाद. शुभेच्छा.

भा. रा. भागवत
लीला भागवत
तुम्ही नवा सुधारक कादून फारच मोठी कामगिरी बजावली आहे. कारण समाजात नव्या सुधारणा होण्याची आणि विवेकवादाचा प्रचार करण्याची आज पुन्हा गरज उत्पन्न झाली आहे. मोठ्या मेहनतीने व आगरकरांसारख्या निःस्पृहतेने हे कार्य तुम्हाला करावे लागणार आहे. त्यात तुम्हाला यश लाभो असे आम्ही दोघे मनःपूर्वक इच्छितो.

डॉ. न. ब. पाटील
निवृत्त-भाषा संचालक,
महाराष्ट्र राज्य
पहिला अंक मिळाला. श्री. कुळकर्णी यांनी लिहिलेला बाईंचा जीवनलेख वाचला आणि जुन्या काळात हरवून गेलो. बाईंचा मी एक आवडता विद्यार्थी होतो. समाजाकडे आणि वाङ्मयाकडे पाहाण्याची वाईंनी जी दृष्टी दिली तिच्या आधारे आतापर्यंत वाटचाल करीत आलो. आता या मासिकाच्या निमित्ताने त्यांची विचारज्योत पुन्हा आमच्यासारख्यांची मते उजळू लागली आहेत. आगरकरांना व बाईंना अभिप्रेत असलेले सामाजिक परिवर्तन घडेपर्यंत हा नंदादीप सतत तेवत राहो ही इच्छा.

जयवन्त दळवी
पहिला अंक फारच सुरेख आहे. यावरून पुढील अंक किती दर्जेदार निघतील याची कल्पना येते. अशा प्रकारच्या मासिकाची गरज होती. आपल्या सारख्या व्यासंगी संपादकांनी हे कार्य हाती घेतले याचा आनंद वाटला.

पु. ल. देशपांडे
‘नवा सुधारक’ चा पहिला अंक मिळाला. धन्यवाद. अंक चांगला झाला आहे.

सौ. स्नेहलता दसनूरकर
असे विचारप्रधान मासिक काढण्याचे धाडस केल्याबद्दल अभिनंदन. मासिकाला सुयश मिळो.

रा. भि. जोशी
‘नवा सुधारक’ स्थिर व्हावा, वाढावा असे मला वाटते. पहिल्या अंकात आपण डॉ. मनू नातू ह्यांचा योग्य परिचय करून देणारा लेख प्रसिद्ध केला आहे त्याचा आनंद वाटला. विद्या, विद्यार्थी आणि समाज ह्यांना समर्पित असे त्यांचे जीवन होते. त्यांची तत्त्वनिष्ठा व दृढता या लेखातून व्यक्त झाली आहे.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.