धर्म की धर्मापलीकडे?

तुम्हाला धर्म हवा की नको? ह्या प्रश्नाचे एका शब्दात नेमके उत्तर द्या, असा प्रश्न अनेकदा विचारला जातो. धर्म की धर्मापलीकडे? हा प्रश्नही काहीसा याच स्वरूपाचा आहे. समाजामध्ये ‘धर्म हवा’ असे म्हणणारा एक मोठा वर्ग अस्तित्वात असतो, तर ‘धर्म नको’ असे म्हणून या वर्गाला विरोध करणारा दुसरा एक छोटा वर्गही आढळतो. या दोन वर्गांमध्ये आढळणार्‍या विरोधाचे स्वरूप समजावून घेण्यासाठी या विरोधाचे ‘शाब्दिक’ अणि ‘वास्तव’ असे दोन प्रकार ध्यानात घेतले पाहिजेत.

शाब्दिक विरोध
शाब्दिक विरोधाचे स्वरूप पुढीलप्रमाणे असते. ‘धर्म’ या संज्ञेचा कोणता अर्थ अभिप्रेत आहे, याविषयी प्रत्येक व्यक्तीच्या धारणा वेगवेगळ्या असतात. ‘धर्म हवा’ म्हणणाऱ्याने ‘धर्म’ म्हणून ज्या मूल्यांचा स्वीकार केला आहे त्याच मूल्यांचा ‘धर्म नको’ म्हणणाऱ्याने नकार केला आहे, असे ऐकणाऱ्याचे मत बनत असले, तरी वस्तुस्थिती नेहमी तशीच असते असे नाही. येथे स्वीकारलेल्या आणि नाकारलेल्या वस्तूसाठी ‘धर्म’ हा एकच शब्द वापरलेला असूनदेखील प्रत्यक्षात एकाने स्वीकारलेली वस्तू वेगळी आणि दुसर्‍याने नाकारलेली वस्तू वेगळी असेही असू शकते. उदा. एकाला धर्म म्हणजे माणुसकी, तर दुसर्‍याला विषमता असे अभिप्रेत असू शकते. अशा वेळी मूल्यांच्या वा आशयांच्या बाबतीत एकमेकांशी मतभेद नसूनही केवळ शब्दामुळे विरोध निर्माण झालेला असतो. गैरसमजाने निर्माण होणारा हा विरोध विवेकपूर्वक टाळला नाही, तर विनाकारण शक्तीचा अपव्यय तर होतोच, पण मित्राचे शत्रू बनून मोठी हानी होते. शाब्दिक विरोध टाळल्यामुळे ज्या मुद्द्यांवर अपरिहार्यपणे संघर्ष करणे आवश्यक आहे, त्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करणेही सोयीचे ठरते. थोडक्यात सांगावयाचे तर संघर्षाची रणभूमी निश्चित करता येते.

मूलगामी विरोध
जीवनदृष्टी, हितसंबंध इत्यादींच्या भिन्नतेमुळे दोन व्यक्ती धर्माविषयी वेगवेगळी मते मांडतात, तेव्हा मात्र तो गैरसमजातून निर्माण झालेला केवळ शाब्दिक विरोध नसतो. उदा. चातुर्वर्ण्य ईश्वराने निर्माण केलेले असल्यामुळे चातुर्वर्ण्यरूपी धर्माचे पालन केले पाहिजे, असे एक जण म्हणतो. याउलट, ईश्वर अस्तित्वातच नाही आणि असला तरी चातुर्वर्ण्य त्याने निर्माण केलेले नाही, असे दुसरा म्हणतो. या दोघांमध्ये असलेला विरोध शाब्दिक नसून मूल्यांच्या बाबतीतील अत्यंत मूलगामी असा विरोध आहे. जेव्हा असा विरोध असतो, तेव्हा आपल्याला इष्ट वाटणाऱ्या मूल्यांची स्थापना करण्यासाठी संघर्ष करणे अटळ असते. कोणता संघर्ष टाळावयाचा व कोणता संघर्ष निर्भयपणे करावयाचा याचे भान ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

धर्माचे स्वरूप
धर्म हवा की नको याचा निर्णय घेता यावा म्हणून धर्माचे स्वरूप समजावून घेणे आवश्यक आहे. धर्माची सर्वसमावेशक व्याख्या करणे जवळजवळ अशक्यच आहे. तरीही स्थूलमानाने असे म्हणता येईल की कल्पित असूनही वास्तव मानल्या जाणार्‍या विशिष्ट अतिमानवी शक्तीला अनुकूल करून घेण्यासाठी मानवाने निर्माण केलेली उपासनापद्धती म्हणजे धर्म होय. हा धर्माचा अत्यंत व्यापक असा अर्थ आहे. मानवी अस्तित्वाच्या जवळजवळ प्रारंभापासूनच या स्वरूपाचा धर्म अस्तित्वात आहे. ज्याच्यामध्ये अशा प्रकारचा धर्म नाही, असा एकही समाज जगाच्या पाठीवर समाजशास्त्रज्ञांना आढळलेला नाही. अशा प्रकारचा धर्म न मानणाऱ्या व्यक्ती वा संघटना मात्र आढळू शकतात.

आत्मसंरक्षणाची गरज
धर्माच्या या व्यापक प्रभावाची आपण कारणमीमांसा केली पाहिजे. धर्माची मुळे माणसाच्या एका महत्त्वाच्या गरजेत रुजलेली आहेत, हे ध्यानात घेतले पाहिजे. ही गरज म्हणजे आत्मसंरक्षणाची गरज होय. आपण दुबळे आहोत, आणि आपल्याहून अतीव प्रबळ असलेली अतिमानवी शक्ती आपल्याला प्रतिकूल झाली, तर ती आपल्याला नष्ट करू शकेल, अशी भीती माणसाला सतत वाटत आली आहे. भीती ही एक अत्यंत प्रबळ भावना आहे. या भीतीवर मात करण्यासाठी माणूस धर्माच्या साहाय्याने अतिमानवी शक्तीला अनुकूल करून घेण्याचा प्रयत्न करतो. माणसाला वाटणार्‍या भीतीचे कारण खोटे असले, तरी त्याची भीती खरी असू शकते. सर्पदंशाने मरणार्‍या लोकांपैकी अनेकजण बिनविषारी सापाचा दंश झालेला असतानाही मरतात. नेमकी हीच स्थिती धर्मक्षेत्रातील भीतीच्या बाबतीतही असू शकते. विश्वातील विविध घटकांमध्ये असलेले वस्तुनिष्ठ असे कारण-कार्य वगैरे जे संबंध असतात, त्या संबंधांविषयीच्या अज्ञानामुळे ही भीती कमालीचे उग्र रूप धारण करते आणि मनुष्य धर्माच्या अधिकाधिक आहारी जातो. तो अतिमानवी शक्तीपुढे संपूर्ण शरणागती पत्करतो, आपल्या रक्षणाची जबाबदारी त्या शक्तीवर टाकतो, आणि अशा रीतीने निश्चित व निर्भय होऊन जगतो.

धर्म आणि इतिहास
धर्म हा मानवाने निर्माण केला आहे आणि इतिहासाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर त्याने वेगवेगळी रूपे धारण केली आहेत. धर्म ही संस्था ऐतिहासिक-सामाजिक स्वरूपाची आहे. तिच्यामध्ये अतिस्थूल, स्थूल, तत्त्वज्ञानात्मक, सूक्ष्म असे विविध प्रकारचे भेद झाले आहेत. धर्माचा हा इतिहास पाहताना मानवजातीचा इतिहासच कळत असतो. माणूस बाह्यसृष्टीकडे कोणत्या दृष्टीने पाहात होता, त्याच्या मनामध्ये कोणती वादळे चालत होती, त्याच्या आशा-आकांक्षा व श्रद्धा काय होत्या, तो माणसांमाणसांतील संबंधांविषयी कोणत्या धारणा बाळगत होता, त्याच्यात बदल कसे होत होते, इत्यादी अनंत गोष्टींचा इतिहास धर्माच्या इतिहासात लपलेला आहे. धर्म स्वीकारायचा असो वा नाकारायचा असो, मानवजातीचा इतिहास समजून घेण्यासाठी धर्माचा इतिहास समजून घेणे आवश्यकच आहे.

संस्थात्मक धर्म
काळाच्या ओघात प्राथमिक स्वरूपाच्या धर्माला गुंतागुंतीचे स्वरूप येते. मग ईश्वर, देवदेवता, पुरोहित, धर्मग्रंथ, मंदिरे, पूजा, प्रार्थना, कर्मकांड, पवित्र-अपवित्र व उच्च-नीच असे भेद, पाप-पुण्य, स्वर्ग-नरक, पुराणकथा, विधिनिषेध इत्यादी गोष्टींची एक अनंत मालिका निर्माण होते. अशा रीतीने धर्म ही एक संस्था बनते. तिच्यामध्ये एक पक्की चाकोरीबद्धता येते. लवचिकपणा उरत नाही. या संस्थेशी निगडीत अशा कोणत्या ना कोणत्या घटकांमध्ये अधिकारावर असणार्‍या व्यक्तींचे केवळ पारमार्थिकच नव्हेत तर ऐहिक हितसंबंधही तयार होतात. व्यक्तीचे स्वातंत्र्य तर नाहीसे होतेच, पण व्यक्तीच्या नवनिर्माणक्षम प्रज्ञेचेही खच्चीकरण केले जाते. शिवाय वेगवेगळे जनसमूह आपापल्या श्रद्धेनुसार वेगवेगळे धार्मिक संप्रदाय तयार करतात. त्यांचे अहंकार फुलवले जातात. यातून हेकटपणा, परस्परद्वेष, हिंसाचार ह्यांची निर्मिती होते.

प्रमुख धर्म
प्राथमिक धर्माला संस्थात्मक स्वरूप प्राप्त होत असतानाच एका विशिष्ट टप्प्यावर हिंदू, पारशी, जैन, बौद्ध, यहुदी, ख्रिस्ती, इस्लाम इत्यादी प्रमुख धर्म निर्माण झाले आहेत. या सर्व धर्मांचा इतिहास फक्त काही हजार वर्षांचा आहे. मानवजातीचा लाखो वर्षांचा एकूण इतिहास पाहता या धर्माचा इतिहास फारच अल्पकालीन आहे. मानवजातीच्या दीर्घकालीन इतिहासात तिला मानसिक आधार देण्यासाठी हे प्रमुख धर्म अस्तित्वातच नव्हते, हे आपण ध्यानात घेतले पाहिजे. आपले पूर्वज लाखो वर्षे या धर्माच्या अभावीच जगले होते. तात्पर्य मानवजात आणि हिंदू, इस्लाम इत्यादी धर्म यांचा संबंध अविभाज्य व अपरिहार्य स्वरूपाचा नाही. त्यामुळे या धर्माच्या पलिकडे जाणे तत्त्वतः अशक्य नाही. परंतु प्राथमिक स्वरूपाचा धर्म मात्र जवळजवळ मानवजातीच्या प्रारंभापासूनच अखंडपणे सार्वत्रिक व सार्वकालिक म्हणून मानवजातीची सोबत करीत आला आहे. तेव्हा तत्त्वतः त्या धर्माच्या पलीकडे जाणे मानवाला कितपत शक्य वा इष्ट आहे, याचा आपल्याला काळजीपूर्वक विचार करावा लागणार आहे.

धर्माची अज्ञानाधिष्ठितता
धर्माच्या पलीकडे जाण्याचा विचार तरी मनात का डोकावतो, याचा आता विचार करावयाचा आहे. धर्म ज्या दोन गृहीतकांवर उभा आहे ती दोन्ही गृहीतके चुकीची आहेत, ही या बाबतीतील सर्वांत महत्त्वाची गोष्ट होय. अतिमानवी शक्ती, सृष्टीचे नियम डावलून आपल्या स्वैर इच्छेनुसार तिच्यामध्ये हस्तक्षेप करू शकते, आणि यज्ञयाग, पूजा-अर्चा, इत्यादी प्रकारच्या कर्मकांडांद्वारे त्या अतिमानवी शक्तीला अनुकूल करून घेता येते, ही ती दोन गृहीतके होत. ही दोन्ही गृहीतके चुकीची आहेत. याचा अर्थ सृष्टीमध्ये अतिमानवी शक्ती नाहीत असे मात्र नाही. विजेसारख्या अतिमानवी शक्ती सृष्टीमध्ये आहेत, आणि अजून मानवाला कळलेल्या नाहीत अशा शक्तीही असू शकतील. परंतु त्या शक्तीही सृष्टीच्या नियमबद्धतेच्या अधीन आहेत. त्या शक्तींना अनुकूल करून घेण्यासाठी ही नियमबद्धता जाणून घेणे आणि मग त्या ज्ञानाच्या आधारे सृष्टीची रचना अनुकूल करून घेण्यासाठी धडपडणे आवश्यक असते. स्वाभाविकच भक्ती करणारा मनुष्य आणि भक्तीने प्रसन्न होणारी देवता यांच्यातील देवघेव, करार इत्यादींवर सृष्टीतील फेरफार अवलंबून असत नाहीत. सृष्टीतील नियमबद्धता हाच ईश्वर असे मानले, तरी या ईश्वराला जाणून व अनुकूल करून घेण्यासाठी केल्या जाणार्‍या मानसिक उपासना, वाचिक प्रार्थना आणि शारीरिक कर्मे निरुपयोगी आहेत. तात्पर्य, धर्म हा सृष्टीतील कारण-कार्य वगैरेसारख्या संबंधांच्या अज्ञानांवर आधारलेला असल्यामुळे त्याच्या पलीकडे म्हणजे खर्‍याखुर्‍या ज्ञानाकडे जाणे गरजेचे आहे.

मध्यस्थांच्या कचाट्यात
ईश्वराचे पृथ्वीवरील प्रतिनिधी म्हणून वावरणाऱ्या पुरोहित, पोप, मुल्ला-मौलवी इत्यादींच्या हितसंबंधांचे रक्षण आणि त्यामुळे सर्वसामान्य जनतेचे शोषण करणारे हत्यार म्हणून धर्माचा उपयोग केला जातो, हे धर्मापलीकडे जाण्याची गरज निर्माण करणारे आणखी एक कारण होय. सर्वसामान्य माणसांना ईश्वरापर्यंत पोहचविण्याची जबाबदारी घेतलेले मार्गदर्शक म्हणून धर्माच्या क्षेत्रात अवतरणारे हे लोक धर्माचे मालक बनतात. धर्मग्रंथ निर्माण करणे, त्यांचा अर्थ लावणे, नीतिनियम ठरविणे, विधिनिषेध निश्चित करणे, बहिष्कारादींचे अधिकार वापरणे, इत्यादी मार्गांनी या लोकांनी आपली एक सर्वंकष हुकूमशाही निर्माण केलेली असते. अनेकदा या लोकांमध्ये परपीडनप्रवृत्ती (sadism) प्रचंड प्रमाणात असल्याचे आढळते. ते व्यक्तीचे केवळ स्वातंत्र्य हिरावून घेऊन थांबत नाहीत, तर तिला आपल्या हातचे बाहुले बनवतात, आणि तिने विरोध केल्यास तिला उद्ध्वस्तही करतात. तोंडाने पारलौकिक मूल्यांचा व त्यागाचा जप करावयाचा, कोणी ऐहिक मूल्ये मांडली तर त्याला भोगवादी म्हणून हिणवावयाचे, आणि स्वतःच्या ऐहिक सुखोपभोगांची उत्तम सोय करून घेण्यासाठी सर्वसामान्यांची सुखे हिरावून घ्यावयाची, असे यांचे वागणे असते. या लोकांच्या तडाख्यातून सुटण्यासाठी त्यांच्या हाती असलेल्या धर्माच्या पलीकडे जाणे आवश्यक आहे.

धर्मग्रंथांमध्ये बंदिस्त
धर्मग्रंथ आपण निर्माण केले आहेत असे सांगितले, तर लोक त्या ग्रंथांवर विश्वास ठेवणार नाहीत, हे ठाऊक असल्यामुळे धर्मग्रंथ ईश्वराने निर्माण केले आहेत, असा प्रचार हे लोक करतात. वस्तुतः हे ग्रंथ मानवनिर्मितच असतात. काही धर्म तर एकच प्रेषित व एकच धर्मग्रंथ मानतात. एकाच माणसाने दिलेल्या ज्ञानाच्या कोशात सर्व मानवजातीला सर्व काळांसाठी बंदिस्त करण्याचा हा प्रयत्न असतो. काहीवेळा निर्मितीनंतरच्या काळात गरजेनुसार धर्मग्रंथात हवे ते भाग घुसडण्याचे आणि या ग्रंथाचा अर्थ आपल्या सोयीनुसार करण्याचे कामही पुरोहित वगैरे लोक करीत असतात. हे ग्रंथ ईश्वरनिर्मित वा प्रेषितांनी उच्चारलेले असल्यामुळे त्यांचे तंतोतंत पालन केले पाहिजे; त्यांची चिकित्सा करता कामा नये; त्यांच्यामध्ये काना, मात्रादेखील बदलता कामा नये; ते ग्रंथ स्वतः प्रमाण आहेत. अशा प्रकारची मूलभूततावादाची हेकट वृत्ती स्वीकारली जाते. या वृतीमुळे आधी झालेल्या चुका दुरुस्त करण्याची वा नवी मूल्ये स्वीकारण्याची संधीच माणसाला मिळू शकत नाही. शिवाय, पूर्वीचे प्रेषित, महर्षी वगैरे सर्वज्ञ व पापरहित असल्यामुळे त्यांचे विचार निर्दोष होते; त्यांना अंतिम सत्य कळलेले होते; याउलट, काळाच्या ओघात माणूस अधिकाधिक अध:पतित आणि अज्ञानी होत चालला आहे, अशी भूमिका घेतली जाते. धर्म ईश्वराने वा सर्वज्ञ प्रेषितांनी सांगितलेले असतील तर सर्व धर्मामध्ये एकवाक्यता का नाही, अशी शंका घेतली जात नाही. शिवाय नवी पिढी अधिक ज्ञानी होते, असे मानले जात नाही. स्वाभाविकच टाकाऊ झालेल्या, घातक, अज्ञानाधिष्ठित इत्यादी मूल्यांना कोणी विरोध करू लागला, तर त्याचा छळ केला जातो. धर्म ज्यांच्या हाती असतो, अशा लोकांनी पावलोपावली नव्या मूल्यांना आणि बुद्धीच्या व ज्ञानाच्या विकासाला विरोध केला आहे. प्रत्येक वेळी हे लोक पराभूत झाले आहेत. परंतु नवी मूल्ये स्थिर झाल्यावर ती आमच्या धर्मग्रंथामध्ये होतीच असे म्हणून आपल्या भूतकाळाचा गौरव करण्याचे तंत्रही त्यांनी अवलंबले आहे. म्हणूनच मानवी समाजाची सदैव प्रगती व्हावी यासाठी धर्मग्रंथांमध्ये बंदिस्त झालेल्या धर्माच्या पलीकडे जाणे आवश्यक आहे.

विषमता, शोषण व हिंसाचार
पावित्र्याच्या संकल्पनेवर आधारलेल्या विषमतेला मान्यता ही धर्मामधील आणखी एक अनिष्ट बाब होय. शुभ अशी अलौकिक शक्ती असलेल्या वस्तू पवित्र, अशुभ अशी अलौकिक शक्ती असलेल्या वस्तू अपवित्र, आणि यांखेरीज उरलेल्या व्यावहारिक उपयोगाच्या वस्तू लौकिक, असे धार्मिक क्षेत्रामध्ये मानले जाते. ही विभागणी धर्मग्रंथ, पुरोहित इत्यादींच्या लहरीनुसार वा हितसंबंधानुसार केलेली असते. जे जे मानवी हिताचे ते ते पवित्र आणि जे जे मानवाच्या अहिताचे, ते ते अपवित्र अशी विवेकावर आधारलेली विभागणी येथे अभिप्रेत नसते. यामुळेच पुरोहित व इतर लोक, पुरुष व स्त्री, उच्चवर्गीय व हीनवर्गीय, इत्यादींमधील विषमता स्वाभाविक मानण्याच्या प्रवृत्तीला धर्माचे अधिष्ठान मिळते. एवढेच नव्हे, तर माणसांच्या एका समूहाला दुसर्‍याचे शोषण करण्याचा अधिकार धर्माच्याच आधारे दिला जातो. विशिष्ट लोक हे ‘निवडक’ लोक (chosen people) आहेत, ईश्वराचे लाडके आहेत आणि त्यांच्या विरोधात जाणारे ते काफीर, अश्रद्ध, नास्तिक, पाखंडी इत्यादी आहेत असे मानले जाते. आपल्यापेक्षा वेगळ्या श्रद्धा असणाऱ्यांना स्वतःच्या श्रद्धा सोडावयास भाग पाडणे आणि ते तसे करावयास तयार नसतील तर त्यांना नष्ट करणे, हे ईश्वरी कृत्य आहे असे मानले जाते. यातून युद्ध, रक्तपात, हिंसाचार होतो. हे भूतकाळात वारंवार घडले असून आजही घडत आहे. अशा रीतीने विषमता, शोषण व हत्या यांचे साधन बनणाऱ्या धर्माच्या पलीकडे जाणे आवश्यकच आहे.

सर्वंकष हुकूमशाही
मानवी जीवनाची सर्व अंगे आपल्या कह्यात राहिली पाहिजेत, सर्व क्षेत्रांत आपली सर्वंकष अधिकारशाही चालली पाहिजे, असे धर्ममार्तंडांना वाटत असते. वस्तुतः अतिमानवी शक्ती आणि मानव यांचा संबंध, हे धर्माचे क्षेत्र होय. धर्माने मानलेली अतिमानवी शक्ती खोटी ठरल्यानंतर खरे तर धर्माला स्वत:चेही क्षेत्र उरत नाही. परंतु धर्ममार्तंड मात्र अर्थशास्त्र, समाजशास्त्र, कामशास्त्र, नीतिशास्त्र इत्यादींवरही आपलेच नियंत्रण राहिले पाहिजे, असा अट्टाहास धरतात. एवढेच नव्हे, तर रसायनशास्त्र, पदार्थविज्ञान, खगोलशास्त्र इत्यादींसारख्या शास्त्रांवरही आपले नियंत्रण चालले पाहिजे, असे मानतात. मानवी जीवनाच्या विविध अंगांना आपल्या गतीने विकसित होऊ न देता त्यांची गळचेपी करणार्‍या धर्माच्या पलिकडे जाणे, हे मानवी हिताचेच आहे.

सामान्यांची श्रद्धा प्रामाणिक
धर्मापलीकडे जाणे ही फार सोपी गोष्ट आहे असे कोणाला वाटत असेल, मोठा भ्रम ठरेल. या बाबतीतील पहिली अडचण म्हणजे ज्या समाजाच्या कल्याणासाठी आपण धर्मापलिकडे जाण्याचा विचार मांडणार, त्या समाजातील बहुतांश लोक धर्म मानणारे असतात, दुसरी गोष्ट म्हणजे या लोकांमध्ये हितसंबंधी व स्वार्थांध लोकांची संख्या फार मोठी नाही. म्हणजेच बहुसंख्य लोकांची धर्मावरील श्रद्धा प्रामाणिक आहे, या वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करता येणार नाही. ती श्रद्धा अज्ञानावर आधारलेली असेल, ती अंधश्रद्धा असेल, ती त्यांच्या स्वतःच्याच दृष्टीने अहितकारक असेल, परंतु ती अप्रामाणिक आहे वा ढोंगीपणाची आहे, असे मात्र म्हणता येत नाही. म्हणूनच धर्मावर आघात करताना प्रामाणिक श्रद्धा बाळगणार्‍या लोकांवर आघात करून आपण त्यांना हितसंबंधी लोकांच्या गोटात ढकलत तर नाही ना, हे पाहावयास हवे. धर्मातील शोषणावर तर हल्ला करावयाचा, परंतु सर्वसामान्य लोकांना तो हल्ला आपल्यावर आहे असे न वाटता, उलट, तो आपल्या कल्याणासाठी आहे असे वाटेल याची खबरदारी घ्यावयाची, हे कठीण काम आहे. विशेषतः प्रचाराची सर्व साधने विरोधात असल्यामुळे हे करणे आणखी अवघड आहे.

मानसोपचार
धर्माचा उपयोग मनोदुर्बलांना मानसोपचाराप्रमाणे होत आला आहे. सबळ असणार्‍यांनाही जीवनातील दुर्बलतेच्या क्षणी त्याचा उपयोग झाला आहे. सर्वसामान्य माणसे दारिद्र्यवगैरेसारख्या कारणांनी दुर्बल बनलेली असतात. मानवाच्या ठिकाणी अशी दुर्बलता न ठेवणारी निकोप समाजव्यवस्था निर्माण झाल्याशिवाय धर्माची मुळे तुटणार नाहीत, हे ध्यानात घेतले पाहिजे. कारण, आर्थिक, सामाजिक इत्यादी प्रकारच्या व्यवस्थेवर माणसाचे मानसिक सुखदुःख मोठ्या प्रमाणात अवलंबून असते. मानसिक सुखाचा विचार करणे, याचा अर्थ धर्माचा स्वीकार करणे, असा होत नाही. कारण, मन हे शरीराप्रमाणेच जडाची निर्मिती आहे, असे सांख्यादी दर्शनांनीही मान्य केले आहे. त्यामुळे मानसिक सुख हे ऐहिक भौतिक सुखामध्येच अंतर्भूत होते. ते स्वभावतः धार्मिक, पारलौकिक इत्यादी प्रकारचे आहे, असे मानण्याचे कारण नाही.

धर्म आणि नीती
धर्म नाकारणारे लोक नीतिमूल्ये नाकारतात, असा अपप्रचार हितसंबंधी लोकांकडून केला जातो आणि अनेकदा तो यशस्वीही होतो. याबाबतीत सावध राहणे आवश्यक आहे. धर्म आणि नीती या गोष्टी अलग आहेत. धर्म हा अतिमानवी शक्तीशी मानवाचा संबंध जोडत असतो; तर नीती ही अर्थ, काम इत्यादी पुरुषार्थाच्या संदर्भात माणसांमाणसांतील संबंध निश्चित करीत असते. व्यक्तीला आणि समाजालाही नीतीची नितांत गरज असते. पण धर्म नाकारूनही नीती स्वीकारता येते. शिवाय धर्मावर आधारलेली आणि शोषणाचे समर्थन करणारी परंपरागत नीतिमूल्येही झिडकारून द्यावीच लागतील. पण त्यांची जागा नवी नीतिमूल्ये घेतील. प्रत्येक माणसाच्या स्वतंत्र व्यक्तित्वाचा आदर करणारी अशी ही नीतिमूल्ये असतील. धर्माने उच्च नीतीचे शिक्षण, समर्थन व संरक्षण केले आहे, असे म्हटले जाते. परंतु धर्मामध्ये नरबळी, पशुबळी, चातुर्वर्य, स्त्रीपुरुषविषमता इत्यादींचा पुरस्कार केला आहे, हे पाहता धर्माची आणि नीतीचा संबंध अपरिहार्य आहे असे म्हणता येत नाही.

धर्म आणि कला
माणसाच्या सर्व इंद्रियांना आकृष्ट करणाच्या संगीत, नृत्य, शिल्प, चित्र इत्यादी कलांना धर्माने आपले प्रभावी माध्यम बनविले आहे. जणू काही धर्म आणि कला यांचा अविभाज्य संबंध आहे, असे चित्र निर्माण झाले आहे. मानवी संस्कृतीमध्ये कला तर हव्यातच. अशा स्थितीत नवी मूल्ये मांडण्यासाठी आपणही कलांच्या माध्यमांचा तितक्याच प्रभावी रीतीने उपयोग करण्याची गरज आहे. तशा श्रेष्ठ कलाकृती निर्माण झाल्या तर माणूस नव्या मूल्यांचाही सहजपणे स्वीकार करील, धर्माने निर्माण केलेल्या ईश्वर, ब्रह्म, मंदिर इत्यादी संकल्पनांची निंदा करण्यापेक्षा ती कलात्मक सत्ये आहेत, भव्य मिथ्यकथा आहेत, असे मानून त्यांचा कलादृष्टीने आस्वाद घेण्यासही हरकत नाही. अर्थात, कलात्मक सत्यापेक्षा वास्तव सत्य वेगळे असते, याचे भानही ठेवावे लागेल.

धर्मसमन्वय व धर्मसुधारणा
धर्माचे मानवी मनाला असलेले आकर्षण वरवरचे नाही. सुरक्षिततेची आकांक्षा ही अत्यंत मूलगामी आहे. धर्मामुळे मिळणारी सुरक्षितता खरीखुरी नाही. धर्म भीतीचे मूळ कायमचे नष्ट करू शकत नाही, तो फक्त ते झाकून टाकतो. सृष्टीच्या खर्‍याखुर्‍या ज्ञानामुळेच भीतीचा समूळ नाश होणार आहे, हे सर्वसामान्य लोकांना पटवून द्यावे लागेल. जोपर्यंत हे घडणार नाही, तोपर्यंत धर्म हलणार नाही. म्हणूनच पहिल्या टप्प्यावर धर्मसमन्वय व धर्मसुधारणा यांचा आग्रह धरावा लागेल. या पहिल्या टप्प्यावर धर्मातील शोषणासारख्या घातक मूल्यांवर हल्ला करावयाचा, परंतु ईश्वरादींच्या अस्तित्वावर फारसा हल्ला करावयाचा नाही, असे धोरण अवलंबणे योग्य ठरेल.

पुनरुज्जीवनाची लाट
सध्या तर धार्मिक पुनरुज्जीवनवादाच्या भीषण लाटेला तोंड कसे द्यावयाचे, हा विकट प्रश्न निर्माण झाला आहे. पुनरुज्जीवनवादाचे छोटे छोटे तरंग निर्माण होतात, तेव्हा त्याच क्षणी व त्याच स्थळी आपण विरोध दर्शवीत नाही. आपण कालबाह्य म्हणून त्यांची उपेक्षा करतो वा आणखी काही हेतु बाळगून मौन पत्करतो. पण या मौनालाच विषारी फळे येतात. म्हणून आपण कितीही लहान वा दुबळे असलो तरी आपापल्या क्षेत्रात आपल्या कुवतीनुसार क्षीण का होईना, पण आपला आवाज उठवीत राहणे आवश्यक असते. तरंगांना विरोध केला तर लाटा निर्माणच होणार नाहीत.

उत्स्फूर्त, वैयक्तिक धर्म
कर्मकांडाचे अर्थहीन जंजाळ, शोषण, विषमता इत्यादींनी युक्त असलेला धर्म टाकून दिल्यानंतरही विशिष्ट स्वरूपातील वैयक्तिक धर्म अस्तित्वात राहू शकेल. मनःशांतीसाठी प्रार्थना करणे, मनाला प्रसन्न करणार्‍या पदार्थापुढे हात जोडणे, पूर्वजांचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करणे इत्यादी प्रकारे हा धर्म व्यक्त होऊ शकेल. परंपरागत धर्माहून वेगळेपण दाखविण्यासाठी त्याला काही वेगळे नावही देता येईल. तथापि येथे दोन बाबी ध्यानात ठेवाव्या लागतील. पहिली गोष्ट म्हणजे या धर्माची कोणतीही बंदिस्त चाकोरी असणार नाही. त्या त्या व्यक्तीचे वैयक्तिक अनुभव, दृष्टिकोन, मानसिक व शारीरिक गरज, आवडीनिवडी इत्यादींनुसार तो वागत राहील. वैयक्तिक जीवनातही कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी किंवा अशाच दुसर्‍या गरजेसाठी तो सदैव विशिष्ट चाकोरीबद्ध पद्धतीचा अवलंब करणार नाही. त्याची प्रत्येक कृती उत्स्फूर्त व ताजी असेल, या दृष्टीने परंपरागत धर्माहून हा धर्म वेगळे असेल. या ठिकाणी ध्यानात ठेवण्याची दुसरी बाब म्हणजे या वैयक्तिक व उत्स्फूर्त धर्मालाही क्रमशः बंदिस्त व चाकोरीबद्ध धर्माचे स्वरूप प्राप्त होण्याचा धोका उरतोच. त्यामुळे पुन्हा एकदा त्या चाकोरीबद्ध धर्माच्या पलीकडे जाण्याची धडपड करावीच लागेल.

समारोप
धर्माशी निगडित असलेले अज्ञान, विषमता, शोषण, द्वेष, हिंसाचार इत्यादी दोष मानवी जीवनाला गढूळ करणार नाहीत, याची दक्षता आपल्याला घ्यावयाची आहे. यासाठी धर्मावर नियंत्रण आणावीच लागतील. धर्मसुधारणा, धर्मसमन्वय, धर्मत्याग इत्यादी मार्ग त्या दृष्टीने आपल्यापुढे आहेत. वेगवेगळे लोक यांपैकी वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब करण्याची शक्यता आहे. एक निकोप समाज निर्माण व्हावा, माणसाचा माणूस म्हणून आदर राखला जावा आणि मानवी संस्कृतीला आनंदाचे नवे नवे धुमारे फुटावेत अशी यो सर्वांचीच अपेक्षा असेल. त्यांनी तपशिलातील मतभेदांमुळे आपापसांत लढत बसू नये. नाहीतर आपसांतील लढाईने आपल्याच शक्तीचे खच्चीकरण करावयाचे आणि समाजाला धर्मामार्तंडांच्या कळपात ढकलावयाचे हे काही योग्य नाही. आपले मित्र कोण आणि आपले शत्रू कोण याचे पक्के भान असणे, हे अत्यंत महत्त्वाचे आहे. अज्ञान आणि हितसंबंध यांच्याबरोबरची ही लढाई केवळ धैर्याने व चिकाटीने लढता येणार नाही. ती लढाई लढण्यासाठी कुशलता आणि शहाणपण यांचीही गरज आहे. आज तरी धर्मापलीकडे जाण्याचे ध्येय फार फार दूर आहे. ते ध्येय कधी काळी प्राप्त होईल की नाही, हेही सांगता येत नाही. पण त्या दिशेने प्रवास करणेदेखील खूप आनंदाचे आहे आणि मानवी कल्याणासाठी ते आवश्यकही आहे.

लालबहादुर शास्त्री कॉलेज, सातारा.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.