विवाह आणि नीती – प्रकरण ५

ख्रिस्ती नीती
‘विवाहाची मुळे कुटुंबात रुजलेली आहेत, कुटुंबाची विवाहात नाहीत’ असे वेस्टरमार्क म्हणतो. हे मत ख्रिस्तपूर्व काळात उघडे सत्य म्हणून स्वीकारले गेले असते; परंतु ख्रिस्ती धर्माच्या आगमनानंतर ते एक महत्त्वाचे विधान झाले असृन त्याचे प्रतिपादन त्यावर जोर देऊन करावे लागते. ख्रिस्ती धमनि, आणि विशेषतः सेंट पॉलने, विवाहाविषयी एक अगदी नवीन कल्पना मांडली: ती अशी की विवाह प्राधान्याने अपत्योत्पादनाकरिता नसून तो अविवाहितांमधील लैंगिक संबंधाच्या (fornication) पापाचे निवारण करण्यासाठी आहे.
सेंट पॉलची विवाहविषयक मते कॉरिंथमधील रहिवाश्यांना त्याने लिहिलेल्या पहिल्या पत्रात पूर्ण स्पष्टपणे व्यक्त झाली आहेत. कॉरिंथमधील ख्रिस्ती लोकांनी रात्री आईशी अधर्म्य संबंध ठेवण्याची चमत्कारिक चाल स्वीकारली होती असे दिसते, आणि या गोष्टीचा निग्रहाने बंदोबस्त केला पाहिजे असे सेंट पॉलच्या मनाने घेतले होते. त्याने व्यक्त केलेली मते अशी आहेत:
१. आता तुम्ही मला विचारलेल्या प्रश्नाविषयी: कुणाही मनुष्याने कुणाही स्त्रीला स्पर्श न करणे चांगले.
२. परंतु विवाहबाह्य संबंधाचे पाप टाळण्याकरिता प्रत्येक मनुष्याने स्वतःची बायको करावी, आणि प्रत्येक स्त्रीने स्वतःचा नवरा करावा.
४. पत्नीचा स्वतःच्या शरीरावर कसलाही अधिकार नाही, तो पतीचा आहे; आणि तसेच पतीचाही स्वतःच्या शरीरावर अधिकार नाही, तो त्याच्या पत्नीचा आहे.
७. सर्व मनुष्यांनी माझ्यासारखे व्हावे. परंतु प्रत्येक मनुष्याला ईश्वराची देणगी सारखी नसते. कोणी या तऱ्हेचा असतो, तर कोणी अन्य तऱ्हेचा असतो.
८. म्हणून अविवाहित आणि विधवा यांना मी म्हणतो की जर ते माझ्यासारखे राहिले तर ते चांगले.
९. पण जर त्यांना राहावलेच नाही, तर त्यांनी लग्न करावे; कारण जळण्यापेक्षा लग्न करणे चांगले.
या सबंध परिच्छेदात सेंट पॉल अपत्यांचा उल्लेखही करीत नाही हे सहज लक्षात येते. विवाहाच्या जीवशास्त्रीय हेतूला त्याच्या दृष्टीने काहीच महत्त्व नाही, हे स्वाभाविक आहे, कारण परमेश्वराचे दुसरे आगमन लवकरच होणार आहे आणि त्यानंतर जगाचा अंत होणार आहे अशी त्याची समजूत होती. दुसर्‍या आगमनाच्या वेळी मनुष्यांचे मेंढ्या आणि शेळ्या¹ अशा दोन वर्गात विभाजन होणार आहे, आणि त्यावेळी महत्त्वाची गोष्ट एकच असणार, आणि ती म्हणजे आपला समावेश मेंढ्यांच्या कळपात व्हावा. लैंगिक संबंध, विवाहांतर्गत संबंधही, मुक्तीच्या मार्गातील एक अडथळा आहे असे सेंट पॉलचे मत होते. तरीसुद्धा विवाहित मनुष्यांना मुक्ती मिळू शकते; परंतु विवाहबाह्य संबंध मात्र भयानक असतात, आणि पश्चात्तापदग्ध न झालेला व्यभिचारी मनुष्य शेळ्यांच्या कळपात समाविष्ट होणार हे निश्चित. मला एका डॉक्टराने धूम्रपान सोडण्याचा सल्ला दिल्याचे आठवते. जेव्हा जेव्हा धूम्रपानाची तल्लफ येईल तेव्हा जर लिमलेटची गोळी चघळली तर तिचा प्रतिकार करणे सुलभ होईल असे तो म्हणाला होता. सेंट पॉलनेही विवाहाची उपदेश याच विचाराने केलेला दिसतो. विवाह व्यभिचाराइतका सुखद आहे असे तो सुचवीत नाही; परंतु त्यामुळे आपल्या दुर्बल भाईबंदांना मोहाचा प्रतिकार करणे शक्य होईल असे त्याला वाटते. विवाहात काही स्वतंत्र चांगुलपणा असेल, किंवा पतिपत्नींच्या स्नेहात काहीतरी सुंदर आणि अभिलषणीय असू शकेल, असे तो क्षणभरही सुचवीत नाही, आणि कौटुंबिक जीवनात त्याला कसलाही रस नाही. त्याच्या लेखी या सबंध विषयातील मुख्य गोष्ट व्यभिचार ही आहे, आणि त्याच्या सबंध लैंगिक नीतीची योजना व्यभिचाराला आळा घालण्याच्या दृष्टीने केली आहे. हे म्हणणे म्हणजे पाव भाजण्याचे एकमेव कारण मनुष्यांना केक चोरण्यापासून परावृत्त करणे हा आहे असे म्हणण्यासारखे आहे. व्यभिचार इतका पापमय का आहे ते सांगण्याची तसदी सेंट पॉल घेत नाही. माझा असा संशय आह की मोझेसच्या नीतीचा त्याग केल्यानंतर तो डुकराचे मांस खाण्यास मोकळा झाला असला², तरी आपली नीती कर्मठ ज्यूंच्या नीतीइतकीच कडक आहे हे त्याला दाखवायचे असावे. कदाचित् युगानुयुगे डुकराचे मांस निषिद्ध असल्यामुळे ज्यूंना ते व्यभिचाराइतकेच मधुर वाटले असावे, आणि म्हणून आपल्याही धर्मात तापसी कठोर अंश आहेत यावर त्याने भर दिला असावा.
व्यभिचाराचा सरसकट धिक्कार ही गोष्ट ख्रिस्ती धर्माने आणलेली नवीन गोष्ट होती. प्राचीन नागरणांतील बहुतेक नीतिसंहितांप्रमाणे जुन्या करारातही व्यभिचार निषिद्ध मानला आहे; परंतु त्यात व्यभिचार या शब्दाने विवाहित स्त्रीशी संग अभिप्रेत आहे. जुना करार जो कोणी लक्षपूर्वक वाचील त्याच्या हे लक्षात येईल. उदा. जेव्हा एब्राहाम आपली पत्नी सारा हिच्याबरोबर इजिप्तमध्ये जातो, तेव्हा तो सारा आपली बहीण आहे असे सांगतो, आणि राजा तिची रवानगी आपल्या जनानखान्यात करतो. परंतु जेव्हा ती एब्राहामची पत्नी आहे हे उघडकीस येते, तेव्हा राजाला आपण पाप केल्याचे पाहून धक्का बसतो, आणि तो खरी गोष्ट न सांगितल्याबद्दल एब्राहामला दोष देतो. प्राचीन काळातील ही प्रचलित पद्धत होती. स्त्रीने विवाहबाह्य संबंध ठेवल्यास तिला वाईट समजत, परंतु पुरुषाचा मात्र दुसर्‍याच्या पत्नीशी संबंध ठेवल्यासच धिक्कार होई, कारण तसे केल्यास त्याच्या हातून दुसऱ्याच्या स्वामित्वाचा भंग केल्याचा अपराध घडतो. विवाहबाह्य सर्व लैंगिक संबंध अनीतिमय आहे हे ख्रिस्ती धर्माचे मत वर उद्धृत केलेल्या सेंट पॉलच्या सर्वच लैंगिक संबंध, विवाहांतर्गत संबंधसुद्धा, शोचनीय आहेत या मतावर आधारलेले आहे. ह्या प्रकारचे मत जीवशास्त्रीय वास्तवांच्या विरुद्ध जाणारे असून शहाण्या माणसाला ते रुग्ण आणि विकृत वाटल्यावाचून राहणार नाही. ते मत ख्रिस्ती नीतीत रुजलेले असल्यामुळे ख्रिस्ती धर्माच्या सबंध इतिहासात तो धर्म मनोविकृती आणि अनारोग्यकारक मते यांचे उगमस्थान होऊन राहिला आहे.
सेंट पॉलच्या मतांवर आरंभीच्या काळात विशेष भर देण्यात आला, एवढेच नाही तर त्यांचा अतिरेकही करण्यात आला. ब्रह्मचर्य पवित्र मानले गेले, आणि आपली मने कामुक विचारांनी भरून टाकणार्‍या सैतानाशी सामना करण्याकरिता माणसे अरण्यात वास करू लागली.
धर्मसंस्थेने स्नानावर हल्ला चढविला, कारण ज्या ज्या गोष्टीने शरीर आकर्षक होते तिने पापाची प्रवृत्ती होते. घाणीची प्रशंसा करण्यात आली, आणि पावित्र्याची दुर्गंधी अधिकाधिक भेदक होऊ लागली. ‘शरीर आणि त्याची वस्त्रे यांची शुद्धता म्हणजे आत्म्याची अशुद्धता’ असे सेंट पॉल लिहितो. उवा म्हणजे परमेश्वरी मोत्ये असे मानले गेले, आणि उवांनी भरलेले शरीर पवित्र मनुष्याचे अनिवार्य लक्षण ठरले.
जिथे कामप्रवृत्तीविषयी अशा प्रकारची मते प्रचलित होती तिथे लैंगिक संबंध जेव्हा घडत तेव्हा ते पाशवी आणि कठोर असणार हे उघड आहे. दारूबंदीच्या काळात घडणार्‍या मद्यपानासारखे. प्रेमाच्या कलेचे विस्मरण झाले, आणि विवाहाला पाशवी रूप आले.
परंतु कॅथलिक धर्मसंस्था कालांतराने सेंट पॉलइतकी जीवशास्त्रविरोधी राहिली नाही. सेंट पॉलच्या लिखाणावरून असे दिसते की विवाह हा कामासुराला थोडीबहुत वाट करून देण्याचा वैध मार्ग आहे. त्याच्या शब्दांवरून त्याचा संतति-नियमनाला विरोध असेल अशी समजूत होत नाही; उलट गरोदरपणा आणि अपत्यजन्म यांच्या काळांत लादले जाणारे ब्रह्मचर्य भयावह आहे असेच तो म्हणाला असता. धर्मसंस्थेने मात्र या बाबतीत वेगळेच मत स्वीकारले. शास्त्रसंमत (orthodox) ख्रिस्ती शिकवणीनुसार विवाहाची प्रयोजने दोन आहेत:
एक, सेंट पॉलने उल्लेखलेले, आणि दुसरे, अपत्योत्पादन. त्याचा परिणाम असा झाला की लैंगिक नीती सेंट पॉलला अभिप्रेत होती तिच्यातूनही अधिक खडतर झाली.
लैंगिक संबंध केवळ विवाहांतर्गतच वैध आहेत, एवढेच नव्हे, तर पतिपत्नीमधील संबंधही जर अपत्यजन्माच्या आशेने केला नसेल तर तो पापमय होतो. कॅथलिक धर्मसंस्थेनुसार कायदेशीर अपत्यांची इच्छा हा लैंगिक संबंधांचे समर्थन करण्यास पुरेसा असा एकमेव हेतू आहे. हा हेतू असेल तर मात्र लैंगिक संबंध केव्हाही, त्यात कितीही क्रूरपणा असला तरीसुद्धा, समर्थनीय होतो. पत्नीला रतिकर्माची शिसारी बसली असेल, पुढच्या बाळंतपणात ती मरण्याची भीती असेल, अपत्य रोगी किंवा वेडे निपजण्याचा संभव असेल, आणि हालांना पारावार राहणार असेल आणि त्यांना तोंड देण्याकरिता पुरेसा पैसा नसेल, तरी जर त्या संबंधातून अपत्य होण्याची आशा पुरुषाला असेल, तर त्याने आपला वैवाहिक हक्क बजावण्याचा आग्रह धरणे समर्थनीय असते.
या विषयावरील कॅथलिक शिकवणीला दोन आधार आहेत. एका बाजूला ती सेंट पॉलला अभिप्रेत असलेल्या तापसवादावर आधारली आहे, आणि दुसर्‍या बाजूला आपण जितके अधिक आत्मे जगात आणू तितके चांगले, कारण प्रत्येक आत्मा मुक्ती मिळवू शकतो, या मतावर. आत्म्यांना निरंतर नरकवासही घडू शकतो याकडे दुर्लक्ष का केले जाते हे मला कळत नाही, पण ती गोष्ट या ठिकाणी विचारात घ्यायला हवी. प्रॉटेस्टंटांना संततिनियमन करण्यास कॅथलिक प्रतिबंध करतात; परंतु आपल्या त्या कृतीमुळे जन्मणारी बहुतेक प्रॉटेस्टंट मुले निरंतर नरकवासाचे धनी होतील हे त्यांना मान्य असले पाहिजे. त्यामुळे त्यांची कृती निर्दयपणाची दिसेल; परंतु अर्थात् या गोष्टी गूढ असून नास्तिकाच्या आकलनाच्या पलिकडे आहेत यात शंका नाही.
अपत्यजन्म हा विवाहाचा एक हेतू आहे हे मत कॅथलिक शिकवणीत अंशतःच स्वीकारलेले दिसते. अपत्यप्राप्त्यर्थ न केलेला संग पाप आहे एवढेच ते सांगते. वंध्यत्वाच्या कारणास्तव विवाहविच्छेदाला परवानगी देण्यापर्यंत त्याची मजल जात नाही. पुरुषाला अपत्ये कितीही तीव्रतेने हवी असोत, त्याची पत्नी जर वांझ असेल, तर त्याला ख्रिस्ती नीतीत उपाय नाही. खरी गोष्ट अशी आहे की विवाहाचे प्रमुख प्रयोजन जे अपत्यजन्म, त्याला या नीतीत फार गौण स्थान आहे, आणि त्याचे प्रधान प्रयोजन सेंट पॉलला अभिप्रेत असलेलेच, म्हणजे पापाला प्रतिबंध करणे हेच राहते. व्यभिचार आजही या प्रकरणातील प्रधान विषय राहिला आहे, आणि विवाह अजूनही काहीसा कमी शोचनीय असा पर्याय आहे असे मानले जाते.
विवाह ही हीन गोष्ट आहे या मतावर विवाह हा संस्कार आहे या मताचे पांघरूण घालण्याचा प्रयत्न कॅथलिक धर्मसंस्थेने केला आहे. या मताचा व्यवहारातील परिणाम म्हणजे विवाहबंधन अविच्छेद्य मानले गेले. पती किंवा पत्नी यांपैकी कोणीही एक वेडा झाला, किंवा त्याला उपदंश झाला, किंवा दारूचे व्यसन लागले, किंवा तो दुसर्‍या स्त्रीबरोबर उघडपणे राहू लागला, तरी त्यांचे पतिपत्नीचे नाते पवित्रच राहते, आणि काही परिस्थितींत त्यांना विभक्त राहण्याची परवानगी मिळाली, तरी त्यांना पुनर्विवाहाची परवानगी मात्र कदापि मिळत नाही. यामुळे अनेक प्रकरणांत अतिशय हाल होतात; परंतु तशी दुर्दशा व्हावी ही ईश्वराचीच इच्छा असल्यामुळे ती सहन करणे भाग आहे.
परंतु कॅथलिक मत तत्त्वतः जरी अतिशय कठोर असले, तरी ज्याला पाप म्हणतात त्याविषयी त्या मतात काही प्रमाणात सहिष्णुता सतत राहिली आहे. धर्मसंस्थेच्या हे लक्षात आले आहे की सामान्य मानवी मनुष्य तिच्या दंडकानुसार वागण्याची अपेक्षा करणे कठीण आहे, आणि व्यभिचारी मनुष्याने जर अपराध कबूल केला आणि त्याबद्दल प्रायश्चित्त घेतले तर त्याच्या पापातून त्याला मुक्ती द्यायची तिची तयारी असे. व्यवहारातील या सहिष्णुतेमुळे पुरोहितवर्गाचे सामर्थ्य वाढले, कारण पुरोहितच फक्त पापमुक्ती बहाल करू शकत, आणि पापमुक्ती जर मिळाली नाही तर व्यभिचाराचे फळ निरंतर नरकवास हे निश्चित होते.
प्रॉटेस्टंट पंथाची प्रवृत्ती काहीशी वेगळी होती. तत्त्वात तो कमी कठोर होता, परंतु व्यवहारात काही दृष्टींनी अधिक कडक होता. लूथरवर जळण्यापेक्षा लग्न करणे चांगले या वचनाचा बराच प्रभाव पडला होता, आणि त्याचे एका भिक्षुणीवर प्रेमही होते. त्याने असा युक्तिवाद केला की आपण जरी ब्रह्मचर्याची शपथ घेतली असली तरी आपण आणि ती भिक्षुणी यांना विवाहाचा हक्क आहे; कारण तसे नसते तर आपल्या विकारांची तीव्रता पाहता आपल्या हातून भयानक पाप घडणे अपरिहार्य होते. म्हणून जे ब्रह्मचर्य कॅथलिक नीतीचा भाग होते, त्याची प्रशंसा करणे प्रॉटेस्टंट पंथाने सोडून दिले, आणि जिथे तो (प्रॉटेस्टंट पंथ) प्रबल असेल तिथे विवाह हा संस्कार आहे हे मतही त्याने टाकून दिले, आणि काही परिस्थितीत घटस्फोटाला संमती दिली. परंतु व्यभिचार मात्र प्रॉटेस्टंटांना कॅथलिकांपेक्षा अधिक भयंकर वाटे, आणि त्याचा नैतिक धिक्कार करण्यात ते अधिक कठोर असत. कॅथलिक धर्मसंस्थेला थोड्याफार प्रमाणात पाप अपेक्षित होते, आणि त्याचा बंदोबस्त करण्याच्या त्यांच्या काही पद्धती होत्या; उलट प्रॉटेस्टंटांनी पापाची कबुली आणि पापाची माफी या कॅथलिक पद्धतींचा त्याग केला, आणि पापी मनुष्याची स्थिती कॅथलिक पंथातील पाप्याच्या स्थितीपेक्षा अधिक निराशाजनक केली. आधुनिक अमेरिकेत आपल्याला या वृत्तीच्या दोन्ही बाजू पाहायला मिळतात. तिथे घटस्फोट अतिशय सुलभ आहे, परंतु व्यभिचार मात्र कॅथलिक देशांपेक्षा अधिक दोषार्ह मानला जातो. ख्रिस्ती नीतीच्या सबंध व्यवस्थेची, तिच्या कॅथलिक आणि प्रॉटेस्टंट अशा दोन्ही रूपांत, पुनःपरीक्षा करायला हवी, हे उघड आहे; परंतु हे ख्रिस्ती शिक्षणपद्धतीमुळे आपले जे पूर्वग्रह होतात त्यांचा शक्य तो पूर्ण त्याग करून करावे लागेल. एखाद्या दंडकाचा बलपूर्वक आणि वारंवार उच्चार, विशेषतः बाल्यावस्थेत,केल्यास त्यामुळे मनात इतका मजबूत विश्वास निर्माण होतो की त्याचा नेणिवेवरही प्रभाव पडतो, आणि आपली श्रुतिस्मृतिप्रणीत मतांविषयीची वृत्ती मुक्त झाली आहे असे मानणारे लोकही वस्तुतः त्या शिकवणीच्या असंज्ञ प्रभावाखाली असतात. धर्मसंस्थेने व्यभिचार सर्रास पापमय का मानला हा प्रश्न आपण प्रांजलपणे विचारला पाहिजे. तसे करण्यास धर्मसंस्थेजवळ वैध कारणे होती असे आपल्याला वाटते काय ? किंवा तसे नसेल तर धर्मसंस्थेने दिलेल्या कारणांखेरीज अन्य कारणे आहेत काय की ज्यामुळे आपण त्याच निष्कर्षाप्रत पोचू ? प्राचीन धर्मसंस्थेची प्रवृत्ती असे मानण्याची होती की काही अटी पुऱ्या केल्यास लैंगिक संबंध क्षम्य होत असला, तरी मुळात ती अपवित्र गोष्ट आहे. ही वृत्ती पूर्णपणे अंधश्रद्धामूलक (superstitious) मानावी लागेल. तिचा मोठ्या प्रमाणावर स्वीकार होण्याची कारणे गेल्या प्रकरणात चर्चिलेल्या कामविरोधी वृत्तीच्या कारणांच्या जातीची असावीत; म्हणजे ज्यांनी ही वृत्ती प्रथम उपदेशिली त्यांचे शरीर किंवा मन किंवा दोन्ही रुग्ण असावीत. एखादे मत सर्वत्र स्वीकारले गेले ही गोष्ट ते मत सर्वथा विपर्यस्त नाही याचा पुरावा असू शकत नाही. खरे म्हणजे बहुतेक माणसे किती मूढ असतात हे पाहता सार्वत्रिक मत शहाणपणाचे असण्यापेक्षा मूर्खपणाचेच असणे अधिक संभवते. पेल्यू बेटाचे रहिवासी असे समजतात की नाकाला भोक पाडणे हे सद्गती मिळण्याकरिता आवश्यक आहे. युरोपियन लोक असे समजतात की काही शब्दांचा उच्चार करीत डोके भिजविल्याने हे अधिक चांगल्या प्रकारे साध्य होते. पेल्यू द्वीपवासीयांचा विश्वास अंधश्रद्धा (superstition) आहे; परंतु युरोपियनांचा विश्वास मात्र आपल्या पवित्र धर्माचे एक सनातन सत्य आहे. जेरिमी बेंटमने आपल्या कर्माच्या उगमस्थानांचे एक कोष्टक तयार केले होते.
त्यात मानवाच्या प्रत्येक इच्छेचा उल्लेख तिची प्रशंसा करण्याकरिता, निंदा करण्याकरिता किंवा तटस्थ वृत्तीने तिच्याविपयी बोलण्याकरिता वापरावयाच्या तीन स्वतंत्र नावांनी तीन वेगळ्या स्तंभांत केला होता. उदा. एका स्तंभात ‘खादाडपणा’ हा शब्द आढळतो, तर त्याच्या समोरच्या स्तंभात ‘पंगतीत भोजनाची आवड’ हे शब्द आहते. तसेच एका स्तंभात ‘समाजहितैपित्व’ हा शब्द आहे, तर त्याच्या पुढील स्तंभात आपल्याला ‘द्वेष’ हा शब्द दिसतो. ज्या कोणाला एखाद्या नैतिक विपयावर स्पष्ट विचार करायचा असेल त्याने या बाबतीत बेंटमचे अनुकरण करावे, आणि कोणत्याही दोपव्यंजक शब्दाचा स्तुतिव्यंजक समानार्थी शब्द असतो या गोष्टीचा पूर्ण परिचय करून घेतल्यावर जे शब्द स्तुती किंवा निंदा व्यंजित करीत नाहीत अशाच शब्दांचा वापर करण्याची सवय लावून घ्यावी अशी मी शिफारस करतो. ‘व्यभिचार’ या शब्दाला एवढा तीव्र निंदाव्यंजक अर्थ आहे की, जोपर्यंत आपण तो शब्द वापरू तोपर्यंत त्याविपयी निर्विकार मनाने विचार करणे कठीण आहे. परंतु आपली नीती भ्रष्ट करण्याची ज्यांची इच्छा आह असे काही लंपट लोक अन्य काही शब्द वापरतात: उदाहरणार्थ, ‘स्त्रीदाक्षिण्य’ (gallantry) किंवा ‘कायद्याच्या निःस्नेह बंधनांनी बद्ध नसलेली प्रीती’. दोन्ही प्रकारच्या शब्दबंधांनी पूर्वग्रह जागृत होतात. जर आपल्याला निर्विकार विचार करायचा असेल तर आपण दोन्ही प्रकारचे शब्दबंध टाळले पाहिजेत. आता हे खरे आहे की आपण जर असे वागलो तर आपल्या साहित्यिक शैलीचे वाटोळे होईल. स्तुती आणि निंदा दोन्हीचे व्यंजक शब्द रंजक आणि चित्ताकर्पक असतात. निर्भर्त्सनात्मक किंवा प्रशंसापर भाषण श्रोत्याचे मन सहज वळवू शकते आणि ड्याशा कौशल्याचा वापर केला तर त्याच्या ठिकाणी हव्या त्या भावना निर्माण करता येतात. परंतु आपल्याला विवेकाला आवाहन करायचे आहे, आणि म्हणून ‘विवाहबाह्य लैंगिक संबंध’ यासारखे रुक्ष, तटस्थ शब्द वापरले पाहिजेत. कदाचित हा सल्ला फार कठोर असेल; कारण शेवटी आपण एका अशा विपयाची चर्चा करतो आहोत की ज्यात आपल्या भावना तीव्रपणे गुंतलेल्या आहते; आणि आपण जर आपल्या लिखाणातून भावना पूर्णपणे वजा केल्या, तर आपल्या विपयाचे स्वरूप व्यक्त करणे आपल्याला कदाचित् जमणार नाही. लैंगिक संबंधाच्या बाबतीत एक प्रकारची ध्रुवात्मकता आढळून येते; त्या संबंधांचे त्यांत सहभागी होणार्‍या व्यक्तीच्या दृष्टिकोणातून आपण वर्णन करतो आहोत की त्यांचे बाहेरून अवलोकन करणार्‍या मत्सरी त्रयस्थाच्या दृष्टिकोणातून, यावर ते वर्णन अवलंबून असते. आपण स्वतः जे करतो ते ‘स्त्रीदाक्षिण्य’ (gallantry) असते; जे दुसरे करतात तो व्यभिचार असतो. म्हणून आपण भावनारंजित शब्दांविषयी सावधान राहिले पाहिजे. आपण ते कधी कधी वापरू शकतो; पण ते आपण काटकसरीने वापरले पाहिजेत, आणि सामान्यपणे मात्र तटस्थ आणि वैज्ञानिक भाषाच वापरली पाहिजे.
ख्रिस्ती नीतीने पातिव्रत्यावर भर दिल्याने स्त्रियांचे स्थान निकृष्ट करण्यात तिचा वाटा निश्चितच मोठा आहे. नीतिमार्तड हे पुरुष असल्यामुळे स्त्री ही मोहिनी (मोह पाडणारी) ठरली; जर नीतिमार्तड स्त्रिया असते तर ते स्थान पुरुषाला मिळाले असते. ज्या अर्थी स्त्री ही मोह घालणारी होती, त्या अर्थी पुरुषांना मोह घालण्याच्या संधी कमी करणे इष्ट होते. म्हणून प्रतिष्ठित स्त्रियांभोवती बंधनांची भिंत उभारली गेली, आणि प्रतिष्ठित नसलेल्या स्त्रिया पतित समजल्या. गेल्या आणि कठोर तिरस्काराच्या घनी झाल्या. स्त्रियांना रोमन साम्राज्यात जे स्वातंत्र्य होते तसे स्वातंत्र्य अगदी अलीकडच्या काळातच त्यांना मिळाले आहे. पितृसत्ताक पद्धतीने स्त्रियांना गुलाम करण्यात खूप यश मिळविले होते; पण ख्रिस्ती धर्माच्या उदयापूर्वी त्यापैकी बरेचसे यश नाहीसे झाले होते. कॉन्स्टंटाइननंतर स्त्रियांचे पापापासून रक्षण करण्याच्या मिषाने त्यांच्या स्वातंत्र्याला फिरून कात्री लावली गेली. आधुनिक काळात पापाच्या कल्पनेचा ऱ्हास झाल्यामुळे आता कुठे स्त्रियांना स्वातंत्र्य मिळण्यास आरंभ झाला आहे.
ख्रिस्ती पितरांचे लिखाण स्त्रीच्या निंदेने भरलेले आहे. युरोपीय नीतीचा इतिहासकार लेकी म्हणतोः
‘स्त्री म्हणजे नरकाचे द्वार, सर्व मानवी दोषांची माता, असे मानले जाई. तिला आपण स्त्री आहोत या जाणिवेनेच शरम वाटली पाहिजे, तिच्यामुळे जगावर जे शाप ओढवले आहेत त्याबद्दल तिने सतत प्रायश्चित्त घेतले पाहिजे. तिला आपल्या पोषाखाची लाज वाटली पाहिजे, कारण ते तिच्या अधःपाताचे कारण आहे. विशेषतः तिला आपल्या सौंदर्याची लाज वाटली पाहिजे, कारण ते सैतानाचे सर्वात समर्थ हत्यार आहे. शारीरिक सौंदर्य हा पुरोहितांच्या निरंतर निंदेचा विषय होता. एकुलता एक अपवाद वगळता. हा अपवाद म्हणजे बिशपांच्या शारीरिक सौंदर्याचा. मध्ययुगांत बिशपांच्या शारीरिक सौंदर्याचा त्यांच्या समाधीवर हटकून उल्लेख केला जाई. यूकेरिस्ट (Eucharist) या संस्काराचा प्रसाद स्त्रियांनी आपल्या अनावृत हातात घेऊ नये असा आदेश सहाव्या शतकात एका धर्मसभेने काढला होता, इतक्या त्या अशुद्ध समजल्या जात. त्यांचे स्थान गौण आहे, ह्या गोष्टीवर निरंतर भर देण्यात आला.
मालमत्तेचा आणि वारसाहक्काचा कायदाही स्त्रियांना तो प्रतिकूल होईल अशी तऱ्हेने बदलण्यात आला. कन्येला वारसाहक्क परत मिळाला तो फ्रेंच राज्यक्रांतीनंतर, नास्तिकांच्या प्रयत्नांनी.

अनुवादक: म. गं. नातू

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.