रक्षण की राखण ?

मनूचा पुढील श्लोक प्रसिद्ध आहेः
पिता रक्षति कौमारे भर्ता रक्षति यौवने ।
रक्षन्ति स्थविर पुत्रा न स्त्री स्वातंत्र्यमर्हति ।।

या श्लोकातील पहिले तीन चरण स्त्रीचे रक्षण करण्याचे काम अनुक्रमे तिचा पिता, तिचा पती आणि तिचा पुत्र यांच्याकडे सोपवितात. हे नैसर्गिक आणि न्याय्यही दिसते. स्त्री पुरुषापेक्षा शारीरिक सामर्थ्याने दुर्बल आहे, आणि तसेच तिच्यावर पुरुषाकडून बलात्कार होऊ शकतो, त्यामुळे तिला पुरुषाच्या मदतीची गरज आहे, असे मानणे रास्त आहे. त्यामुळे पहिल्या तीन चरणांबद्दल आक्षेप घेण्यासारखे काही नाही असे म्हणता येईल. परंतु या विचाराशी चौथ्या चरणातील ‘स्त्री स्वातंत्र्याला पात्र नाही’ हा विचार विसंगत दिसतो. एखादी व्यक्ती दुर्बल असेल तर तिला मदत करणे योग्य आहे, पण म्हणून ती स्वातंत्र्याला लायकच नाही असे निष्पन्न होत नाही. मग मनूने हा चरण का घातला असावा, असा विचार अनेकदा मनात येई. परंतु अलिकडे मनुस्मृतीचा नववा अध्याय चाळायला मिळाला, आणि या प्रश्नावर एक वेगळाच प्रकाश पडला. मनुस्मृतीच्या नवव्या अध्यायातील पहिल्या श्लोकापासून तो पुढील अनेक श्लोक वाचल्यानंतर आपल्या लक्षात येते की स्त्रीचे रक्षण तिच्यावर होऊ शकण्याच्या संभाव्य हल्ल्यापासून नव्हे, तर तिच्या हातून स्वेच्छेने घडू शकणाच्या व्यभिचारकर्मापासून करण्यास मनू सांगतो. ज्याप्रमाणे धनगराचा कुत्रा शेळ्यामेंढ्यांची राखण करतो म्हणजे त्यांना कळपापासून दूर जाऊ देत नाही, त्याप्रमाणे स्त्रीचीही राखण केली पाहिजे, नाहीतर तिच्या हातून व्यभिचार घडणे सहज शक्य, नव्हे अनिवार्य आहे असे मनूला म्हणायचे आहे. वर उद्धृत केलेला श्लोक तिसरा आहे. त्याच्या आधीचा आणि नंतरचे काही श्लोक वाचल्यानंतर याविषयी शंका राहात नाही. दुसरा श्लोक असा आहे:
अस्वतंत्राः स्त्रियः कार्याः पुरुषः स्वैर्दिवानिशम् ।
विषयेषु च सज्जन्त्यः संस्थाप्या आत्मनो वशे ।।
म्हणजे स्त्रीचा पती इत्यादि स्त्रीय पुरुषांनी तिला रात्रंदिवस आपल्या ध्यानात ठेवावे. कुल्लूकभट्ट हा मनुस्मृतीचा भाष्यकार म्हणतो की अनिषिद्ध अशा रूपरसादि विषयांत जरी त्यांनी आसक्ती दाखविली तरी त्यांना आपल्या ताब्यात ठेवावे. भार्यारक्षण म्हणजे पत्नीला स्वतंत्रपणे वागू न देणे असा अर्थ यावरून स्पष्ट होतो. आणि काही शंका शिल्लक असेल तर पुढील काही श्लोक वाचल्यावर ती पार नाहीशी होते. सहाव्या आणि सातव्या श्लोकांत मनू म्हणतो, भार्यारक्षण हा धर्म सर्व वर्णांच्या धर्मात सर्वश्रेष्ठ धर्म आहे, कारण तिच्या रक्षणाद्वारेच पुरुष आपली अपत्ये शुद्ध निपजतील अशी अपेक्षा करू शकतो; आणि संतती शुद्ध असेल तरच आपल्याला आणि आपल्या पितरांना औवदेहिक संस्कार यथावत् मिळू शकतील.

स्त्रियांचे सहा दुर्गुण आहेत — मद्यपान, असत्पुरुषसंसर्ग, पतीपासून दूर राहणे, इतस्ततः भटकणे, अकाली झोपणे, आणि परगृही निवास. यांपासून त्यांचे रक्षण करावे. (श्लोक १३)
स्त्रिया पुरुषांचे रूप पाहत नाहीत, वय पाहात नाहीत. तो सुरूप, कुरूप कसाही असला तरी तो केवळ पुरुष आहे एवढेच त्यांना पुरते, आणि त्या त्यांच्याशी संग करतात. (१४)
पुरुष पाहिल्याबरोबर त्यांच्या मनात संभोगेच्छा जागृत होते. त्यांचे चित्त अस्थिर असते; शिवाय त्या स्वभावतः स्नेहरहित असतात. त्यामुळे त्यांची कितीही रोखण केली तरी त्या संधी सापडेल तेव्हा व्यभिचार करतात. (१५)
स्त्रीचा हा स्वभाव सृष्टीच्या उत्पत्तिकाळापासून निसर्गसिद्ध आहे, हे लक्षात ठेवून पुरुषाने त्यांचे रक्षण करण्याचा आटोकाट प्रयत्न करावा. (१६)
मनूने (म्हणजे प्रजापति-मनूने, स्मृतिकार-मनूने नव्हे) झोप, बसून राहणे, अलंकारांची आवड, काम, क्रोध, कुटिलता, परहिंसा, कुत्सिताचार या गुणांची स्त्रीच्या ठिकाणी योजना केली. (१७)
स्त्रीच्या बाबतीत जातकर्मादि क्रिया मंत्रपूर्वक करता कामा नयेत अशी शास्त्राची आज्ञा आहे. त्यामुळे त्यांच्यावर मंत्रपूर्वक संस्कार होत नाहीत, आणि त्यामुळे त्यांचे अंतःकरण कधीच निष्पाप होत नाही. मंत्ररहित असल्यामुळे त्यांच्या हातून घडलेले पाप धुऊन काढता येत नाही. त्यामुळे त्या अमृत म्हणजे मूर्तिमंत असत्य असतात. (१८)

याप्रमाणे स्त्रिया जरी अनेक दोषांनी युक्त असल्या आणि त्यांचे रक्षण अतिशय कठीण असले, तरी अपत्यजन्माकरिता त्या अपरिहार्य असल्यामुळे त्यांचे महत्त्व आहे. तसेच अग्निहोत्रादि धर्मकायें, शुश्रूषा, उत्कृष्ट रतिसुख आणि पितर आणि आपण यांना पुत्रांच्या द्वारे सद्गती मिळवून देणे ह्या सर्व गोष्टी तिच्या अधीन असतात.

मनूने या ठिकाणी पुरुषाचे स्वामित्व आणि स्त्रीचे दास्य यांचे उघडे-नागडे समर्थन केले आहे हे स्पष्ट आहे. अर्थात् याकरिता मनूला दोष देण्यात काही अर्थ नाही; कारण मानव संस्कृतीच्या त्या प्राथमिक अवस्थेत सर्वत्र पितृसत्ताक कुटुंबेच होती, आणि धर्म, शास्त्र इत्यादि सर्व त्या व्यवस्थेचे समर्थन करण्याकरिताच वापरली जात होती. मनुष्यमात्र स्वतंत्र व्यक्ती आहे, प्रत्येक मनुष्याला एक स्वयंभू मूल्य आहे, ही कल्पनाच त्यावेळी अस्तित्वात नव्हती. स्त्री एक उपयुक्त आणि आवश्यक पशू आहे, याहून स्त्रीविषयी अन्य दृष्टी मनुस्मृतीत दिसत नाही.
आश्चर्य आहे ते आजही मनुस्मृतीची स्तुती करणार्‍या आणि मनूचे पुढील वचन अभिमानाने उद्धृत करणाच्या वर्तमानकाळातील लोकांचे :
एतद्देशप्रसूतस्य सकाशादग्रजन्मनः ।।
स्वं स्वं चरित्रं शिक्षेरन् पृथिव्यां सर्वमानवाः ।।
म्हणजे या देशात जन्मलेल्या ब्राह्मणाजवळून पृथ्वीवरील सर्व मानवांनी आपापले धर्म शिकावेत. यातील दर्पोक्ती केव्हाही आक्षेपार्हच मानली पाहिजे. मनूच्या काळीही ती तशीच होती. पण आज तिचा पाठपुरावा करणे मात्र अत्यंत कोत्या आणि अप्रगल्भ मनाचे द्योतक आहे.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.