पत्रव्यवहार

संपादक, नवा सुधारक यांस
स. न. वि.वि

‘नवा सुधारक’ (जून) मिळाला.

तुम्ही दर महिन्याला वैचारिक खाद्य चांगले पुरवताहात याबद्दल धन्यवाद. रसेलची (विवाह आणि नीती) ही अनुवादित लेखमाला व श्रीमती पांढरीपांडे यांचा स्त्री दास्य याबद्दलचा लेख विचारप्रवर्तक आहेत. त्या अनुषंगाने मला दोन प्रश्न उपस्थित करायचे आहे. त्याबद्दल ‘ तयार उत्तरे’ नको आहेत. पण विचारमंथन हवे आहे.

“पुरुष हा बहुस्त्रीक (पॉलीगामस्) आहे व प्रकृतितः स्त्री तशी नाही ” हे विधान शास्त्रीयदृष्ट्या बरोबर आहे का? की त्यात पितृसत्ताक कुटुंबनीतीचेच दर्शन आहे? स्त्री पुरुषांतील प्रीती आणि त्या प्रीतीतील ‘एकनिष्ठा’ सहजात आहे की ‘अक्वायर्ड’ आणि ‘एन्व्हायरनमेंटल’ आहे ? ‘स्वामित्व भावना’ आणि तज्जन्य ‘मत्सर’ हा सहजात (instinctive) आहे की विशिष्ट नैतिक मूल्यापोटी उगवलेला, लादलेला विकार आहे? ‘स्वामिनिष्ठा’ हे आता प्रतिगामी मूल्य मानले जाते. तीच विचारधारा ‘पतिपत्नीनिष्ठेला लावली तर अयोग्य होईल काय?’ ‘स्त्रीपुरुष संबंध’ हे मुळातच irrational आहेत. मुद्दे काढून कोणी प्रेमात पडत नाही आणि प्रेमातला ओलावा सुकल्यावर कायदाही ते संबंध पुन्हा जोडू शकत नाही. ‘पतिपत्नी संबंध’, ‘भावना’, स्वामित्व, निष्ठा, या सगळ्याच मूल्यांचा “स्त्रीमुक्तीशी’ घनिष्ठ संबंध आहे. त्यामुळे ‘लैंगिक स्वातंत्र्य’ हा शब्द आजच्या समाजातल्या पुरोगामी कुटुंबातही मुक्तपणे उच्चारण्याची, स्त्रीला तर राहू देच, पण पुरुषालाही शक्यता उरलेली नाही. याबद्दल स्वच्छपण, पूर्वग्रहविरहित आणि शास्त्राची कास धरून विचार होण्याची शक्यता आहे का?

माझ्या मते ‘पातिव्रत्य’ हे नैतिक मूल्य (आणि एकूणच स्त्रीजीवनाभोवती आखलेल्या नैतिक आदर्शाच्या चतुःसीमा) उघड उघड पुरुषसत्ताक कुटुंबपद्धतीची शर्त आहे. कै. श्री. व्यं. केतकर म्हणतात त्याप्रमाणे “पुरुषांकितता ही स्त्रीच्या दृष्टीने सोयीची वा सुखाचीही मूल्यसंकल्पना असेल; पण ती न्यायाची खचितच नाही.” ‘पोषणासाठी’ आणि ‘रक्षणासाठी’, पितृसत्ताक कुटुंबपद्धतीला पर्याय नाही, हेही म्हणणे खरे नाही. स्त्री स्वतःचा आणि अपत्यांचाही पोषणभार स्वतः उचलताना आजही दिसते, आणि ‘रक्षण’ तर (स्त्रीचेच काय पण पुरुषाचेही) समाजच करतो. ढाल तरवार घेऊन कोणा तरवारीने बायको मुलांचे रक्षण केल्याचे कधी ऐकिवात नाही वा अनुभवातही नाही, पतिपत्नींच्या ‘एकनिष्ठेचा’ प्रश्न हा परस्परांतील प्रणयभावनेशी निगडित आहे. पण त्यातही ‘काव्य’ किती, ‘सोय’ किती, ‘गरज’ किती आणि ‘नाइलाजाने पत्करलेला सहवास’ किती, याची एकदा तपासणी झाली पाहिजे, या दृष्टीने विशीत, तिशीत चाळिशीत आणि पन्नाशीनंतर वयोगटाप्रमाणे प्रणयी पतिपत्नींच्या अनुभवजन्य मुलाखती घेतल्या पाहिजेत. ‘वासनापर्व’ संपल्यावर पतिपत्नी एकत्र का राहातात, याचा खराखुरा शोध घेतला पाहिजे. स्थूलमानाने असे दिसते की पहिल्यावहिल्या प्रणयाचा पाया जर ‘मदनबाधा’ असेल तर त्यातून उपजलेल्या संसारमंदिराचा कळस ‘तडजोडीचे सहजीवन’ हाच होत असतो. मग प्रश्न असा पडतो की ‘निष्ठावंत प्रगल्भ प्रेम’ ही केवळ एक कविकल्पनाच आहे का?

आपला,
‘शिवाई’ शरणपूर रस्ता,
वसन्त कानेटकर नाशिक.

‘नवा सुधारक’ मिळाला. वाचलाही, तो सुरू करण्यामागची प्रेरणा, मनुताईंची ओळख आणि इतर लेख फार वाचनीय वाटले. तुमचं मनःपूर्वक अभिनंदन, आणि मनूताई नाहीत या दुःखद वास्तवात सहभागही! माझी एक विनंती आहे. या अंकातला मनूताईविषयींचा लेख मी ‘मिळून साऱ्याजणी’ या माझ्या मासिकात ‘नवा सुधारक’ चा उल्लेख करून प्रसिद्ध करायला तुमची परवानगी आहे का कळवाल? तुम्हाला गैर वाटत नसेल तर या प्रकारे ‘नवा सुधारका’ ते पुढेही प्रसिद्ध होणार्‍या लेखातून पुनःप्रसिद्धीसाठी ‘साऱ्याजणी’ ला संमती द्यावी ही विनंती.
संपादक – विद्या बाळ ‘मिळून सार्‍याजणी,’ ३३/३५ एरंडवना, प्रभात रोड गल्ली क्र. ४, पुणे – ४११ ००४.

‘धर्माने आपल्या सामाजिक जीवनांत घातलेला धुडगूस’…. आदि शब्दयोजना खडतर सुधारकांनाही खटकावी. सुधारणा जरूर करा. पण जाता जाता ज्या दुर्दम्य विश्वासाने समाज गेली हजारो वर्षे बांधला गेला आहे त्यावर प्रहार करण्याचे प्रयोजन नाही. सुधारकालाही कांही मूल्यांवर पूर्ण विश्वास ठेवावाच लागतो. श्रद्धा ही धार्मिक विश्वास आहे तर व्यापारक्षेत्रांत वचनांवर/वायद्यांवर विश्वास असतो. तेव्हा श्रद्धा व विश्वास यांतील लक्ष्मणरेषा जाणून घ्यावयास हवी. नुसती टीका करणं सर्वांनाच जमतं ना?

ना. बी. मराठे डी १०४, अमरेन्द्र सोसा. गणेशमळा, पुणे – ३०.

मासिकातील सर्वच लेख विचारप्रवर्तक व उद्बोधक आहेत. प्रा. कुळकर्णीच्या लेखातून नातूबाईंच्या स्वभावाचे, विचारांचे यथार्थ दर्शन घडते, तो लेख वाचताना माझ्या डोळ्यांपुढे वि.म.वि. तील ‘staff room’ मधील दृश्य सतत येत असे. It was a veritable bliss to be in those exhilarating times.’ ते हि नो दिवसाः गताः असे सारखे मनात येते. एक प्रकारच्या वैचारिक धुंदीतच आपण सर्व राहात होतो. ह्या दैवी नशेच्या (divine frenzy) नातूबाई High Priestess होत्या.

वा. प्र. पांडे स्वानंद’, गणेश कॉलनी
अमरावती – ४४४६०५

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.