विवेकवाद – ६

सत्य, सत् आणि साधु
या लेखमालेच्या पहिल्या लेखांकात आपण सत्य म्हणजे काय? या प्रश्नाचा विचार केला. आपण असे म्हणालो की ‘सत्य’ हे विशेषण फक्त विधानांनाच लागू पडू शकते. विधान म्हणजे स्थूलमानाने बोलायचे तर एखाद्या गोष्टीचे वर्णन. वर्णन हे यथार्थ किंवा अयथार्थ असते; म्हणजे वर्य वस्तूचे स्वरूप जसे असेल तसे विधानात सांगितलेले असते, किंवा ते जसे नाही तसे सांगितलेले असते. जेव्हा विधानातील वर्णन यथार्थ असते तेव्हा ते सत्य असते, आणि अयथार्थ असते तेव्हा ते असत्य असते. उदा. ‘पृथ्वी गोल आहे’ हे विधान सत्य आहे, कारण त्यात पृथ्वीच्या आकाराचे वर्णन तो जसा आहे तसे केले आहे; उलट ‘पृथ्वी सपाट आहे हे विधान असत्य आहे कारण त्यात पृथ्वीचा आकार जसा नाही तसा असल्याचे सांगितले आहे.

आता सत्याशी संबद्ध असलेली, पण त्याच्याहून अतिशय भिन्न असणारी अशी दुसरी एक कल्पना आहे. ती आहे सताची (सत् ची). सत् म्हणजे जे आहे ते, किंवा ज्याला अस्तित्व आहे ते; आणि असत् म्हणजे जे नाही ते, किंवा ज्याला अस्तित्व नाही ते. उदा. वंध्यापुत्र किंवा सशाचे शिंग यांना अस्तित्त्व नाही. उलट बैलाचे शिंग किंवा एखाद्या मातेचा पुत्र ह्या गोष्टी सत् आहेत, म्हणजे त्या गोष्टींना अस्तित्व आहे. छांदोग्य उपनिषदात श्वेतकेतूला त्याचा बाप सांगतो की जगदारंभी फक्त सत् होते; कारण आधी असत् होते असे आपण म्हणालो तर असतातून सताची उत्पत्ती कशी होईल असा निरुत्तर करणारा प्रश्न उद्भवतो. या ठिकाणी ‘सत्’ आणि ‘असत्’ हे शब्द जे आहे ते आणि जे नाही ते या अर्थानी वापरले आहेत.

आता सत्य आणि सत् या गोष्टी अतिशय भिन्न आहेत हे उघड आहे. सत्य असते एखादे वाक्य किंवा विधान, परंतु सत् असतात वाक्याहून अन्य गोष्टी. ‘सत्य’ या अर्थाचा दुसरा शब्द म्हणजे ‘यथार्थ’, तर ‘सत्’ या अर्थाचा दुसरा शब्द ‘वास्तव’ किंवा ‘वास्तविक’. ‘वस्तुस्थिती’ हाही शब्द सत् याच अर्थाचा आहे. ‘सत्’ आणि ‘सत्य’ यांचा संबंध असा सांगता येईल. जर कोणी विधान केले नाही तर जगात सत्य असू शकणार नाही. सत्य किंवा असत्य असण्याकरिता कोणीतरी कशाविषयी तरी काही तरी विधान करावे सागते. परंतु सत् असण्याकरिता कोणी त्याच्याविषयी विधान करण्याची गरज नाही. पूर्ण निर्जीव, अचेतन अशा जगातही सत् असेल, म्हणजे त्या जगात असणार्‍या वस्तू सत् असतील. उदा. सूर्य, चंद्र, पृथ्वी, त्यांचे आकार, त्यांची संख्या इत्यादी गोष्टी सत् आहेत. परंतु जर कोणी त्यांच्याविषयी कसलेही विधान केले नाही (म्हणजे उच्चारले नाही, किंवा नुसते मनातही आणले नाही) तर जगात सत्य किंवा असत्य काहीही राहणार नाही. ज्या क्षणी एखादा मनुष्य (किंवा एखादा. चेतन पदार्थ) जगाविषयी किंवा जगातील एखाद्या किंवा अनेक गोष्टीविषयी एखादा विचार मनात बाळगतो किंवा व्यक्त करतो, त्या क्षणी जगात पहिल्यांदा सत्य आणि असत्य निर्माण होते. उदा. परमेश्वर जर असेल तर परमेश्वर सत् आहे, आणि नसेल तर तो असत् आहे. परंतु परमेश्वर असेल तर परमेश्वर आहे हे वाक्य सत्य होईल आणि परमेश्वर नाही, हे वाक्य असत्य होईल. तसेच जर परमेश्वर नसेल तर ‘परमेश्वर आहे हे वाक्य असत्य होईल, आणि ‘परमेश्वर नाही’ हे वाक्य सत्य होईल परंतु सत्य आणि सत् या गोष्टी याप्रमाणे अतिशय भिन्न असल्या, तरी पुष्कळदा ‘सत्य’ या शब्दाचा उपयोग ‘सत्’ या अर्थाने केला जातो. उदा. जेव्हा आपण भ्रामक अनुभवात दोरीला साप समजतो, तेव्हा तिथे दिसणारी साप सत्य नसतो असत्य असतो असे आपण म्हणतो, आणि आपणच नव्हे, तर खुद्द तत्त्वज्ञही म्हणतात. वस्तुतः दोरी आणि सर्प ही काही वाक्ये किंवा विधाने नव्हेत, परंतु त्यांच्या बाबतीत सत्य आणि ‘असत्य हे शब्द तत्त्वज्ञही वापरतात. उदा. जेव्हा शंकराचार्य म्हणतात की ‘ब्रह्म सत्यं, जगन्मिथ्या’ म्हणजे ब्रह्म सत्य आहे आणि जगत् मिथ्या आहे तेव्हा ‘सत्य’ हा शब्द त्यांनी सत् या अर्थानेच वापरला आहे हे उघड आहे.

परंतु एक शब्द दोन अतिशय भित्र अर्थानी वापरल्याने जो गोंधळ होतो त्यात आणखी भर पडते. केवळ ‘सत्य’ हा शब्द दोन अर्थानी वापरला जातो असे नव्हे, तर ‘सत्’ हा शब्दही दोन भिन्न अर्थानी वापरला जातो. ‘सत्’ म्हणजे जे आहे ते, तसेच ‘सत्’ म्हणजे चांगले, साधु, न्याय्य, आणि ‘असत्’ म्हणजे वाईट, असाधु, अन्याय्य. उदा. ‘सत्कर्म’ म्हणजे चांगले कर्म, ‘सदाचार’ म्हणजे चांगला आचार, ‘सच्चरित्र’ म्हणजे चांगले चरित्र. तसेच ‘संत’ हे सत् चे बहुवचन आहे आणि त्याचा अर्थ आहे भली माणसे. या अर्थी ‘सत्’ हा शब्द नीतिशास्त्रीय शब्द आहे हे स्पष्ट आहे.

आणि फक्त ‘सत्च’ नव्हे, तर सत्य हा शब्दही चांगले, न्याय्य या अर्थाने वापरला जातो. उदा. आपण म्हणतो की ‘आमची बाजू सत्याची आहे’ आणि आपल्याला म्हणायचे असते ‘आमची बाजू न्यायाची आहे.’

याप्रमाणे या संदर्भात एकूण तीन कल्पना आहेत, आणि शब्द दोनच आहेत. या तीन कल्पनांना इंग्रजीत तीन स्वतंत्र शब्द असून त्यांपैकी एकही व्यर्थी नाही. हे तीन शब्द म्हणजे true real आणि good True म्हणजे यथार्थ (वाक्य), real म्हणजे सत्, किंवा जिला अस्तित्व आहे अशी वस्तू, आणि good म्हणजे चांगले किंवा भले किंवा साधु.

एकच शब्द अनेक अर्थानी वापरल्यामुळे विचारात गोंधळ निर्माण होतो. वस्तुतः भिन्न असणार्‍या गोष्टी एकच आहेत असा भ्रम होतो, आणि त्यातून पुष्कळदा निरर्थक अशी मते निर्माण होतात. तत्त्वज्ञानाचे स्वरूप आणि कार्य यांच्याविषयी तत्त्वज्ञांत अनेक मते रूढ आहेत. उदा. एक मत असे आहे की अनेकतेतील एकता शोधणे हे तत्त्वज्ञानाचे कार्य आहे. एका अर्थाने अनेकतेत एकता शोधणे हे मानवी विचाराचेच स्वरूप आहे. आपल्या भोवती असंख्य वस्तूंची गर्दी असते; पण आपण त्या असंख्य वस्तूंचे वर्गीकरण करतो, आणि त्या प्रत्येक वर्गाला एकेक सामान्य नाम देतो. उदा. खुर्ची, टेबल, लेखणी किंवा गाय, बैल, घोडा किंवा चिमणी, कावळा, पोपट इत्यादि. म्हणजे जिथे अगणित गायी आहेत तिथे ‘गाय हा एकच शब्द वापरून आपण सर्व गायींत काहीतरी समान आहे हे दाखवतो. असे जर आपण केले नाही तर आपले जीवनच अशक्य होऊन जाईल. याप्रमाणे अनेकतेमधील एकता शोधणे हे मानवी विचाराचे स्वरूपच आहे; आणि विज्ञानही स्थूलमानाने हेच कार्य, पण अधिक खोलात जाऊन करीत असते. परंतु तत्त्वज्ञानात ही प्रवृत्ती अगदी टोकाला नेऊन भिडविली जाते. तत्त्वज्ञांना एकत्वाची एक गूढ आणि अतिशय अनावर अशी ओढ लागलेली असते. सामान्य लोकांप्रमाणे किंवा वैज्ञानिकांप्रमाणे केवळ मर्यादित वर्गीकरणाने त्यांचे समाधान होत नाही. त्यांचा उद्योग अधिकाधिक व्यापक अशी वर्गाच्या शोधात मग्न असतो, आणि शेवटी जगात फक्त एकाच प्रकारच्या वस्तू आहेत असे म्हणता यावे अशी त्यांची इच्छा आहे.

आणि खरे म्हणजे जगात फक्त एकाच प्रकारच्या वस्तू आहेत असे मानूनही त्याचे समाधान होत नाही. जगात फक्त एकाच प्रकारच्या वस्तू आहेत एवढेच नव्हे, तर जगात वस्तुतः एकच वस्तु आहे असे त्यांना म्हणायचे असते. उदा. वेदांती म्हणतो की ब्रह्म हो। एकमेव वस्तू सत् आहे, बाकीच्या सर्व मिथ्या आहेत. या ब्रह्माचे वर्णन ‘सच्चिदानंद’ असे केले जाते, म्हणजे ते सत् आहे, चित् म्हणजे चेतन आहे, आणि आनंदमयही आहे. पण यानेही काही तत्त्वज्ञांचे समाधान होत नाही. जगाचे सार तीन गुणांनी युक्त आहे असे म्हणण्यात अनेकतेतून अजून आपली सुटका झाली नाही असे त्यांना वाटते. जर आपण म्हण शकलो की सत्य, सत् आणि साधुत्व ही मुळात एकच आहेत तर तत्त्वज्ञांना अपूर्व समाधान वाटते. ह्या प्रवृत्तीला वरील प्रकारची अनेकार्थता उपकारक होऊ शकते हे उघड आहे. अंती सत् आणि सत्य एकच आहेत, एवढेच नव्हे तर जे संत् आणि सत्य आहे तेच साधूही आहे असे म्हणण्यात तत्त्वज्ञानाची अत्युच्च परिसीमा आपण गाठली असे काही तत्त्वज्ञांना वाटते. या दृष्टीने ‘सत्य’ आणि ‘सत् हे शब्द प्रत्येकी दोन भिन्न अर्थानी वापरले जातात, किंवा या दोन (किंवा एका) शब्दाने तीन कल्पना व्यक्त केल्या जातात यात काही आक्षेपार्ह नसून, उलट हा तत्त्वज्ञानातील मोठा विक्रम आहे असे काही तत्त्वज्ञ म्हणतील.

परंतु जे स्वच्छ आणि काटेकोर विचाराचे पुरस्कर्ते आहेत त्यांना ही सबंध प्रकार शब्दच्छलाचा आणि गोंधळलेल्या विचाराचा द्योत्क वाटते. तसेच या प्रकारात शेवटी अपरिहार्य असलेला गूढवादही त्यांना अत्यंत आक्षेपार्ह वाटतो. तत्त्वज्ञानाने अनेकतेतील एकता अवश्य शोधावी, पण ते करताना स्वच्छतेचा, स्पष्टतेचा कधी बळी देऊ नये असा त्यांचा आग्रह असतो. तत्त्वज्ञानातील ही परंपरा विश्लेषक परंपरा (analytical tradition) म्हणून प्रसिद्ध आहे. या परंपरेतील तत्त्वज्ञ असे म्हणतील की ‘सत्य’ आणि ‘सत्’ हे शब्द तीन स्वतंत्र आणि अतिशय भिन्न कल्पनांचे वाचक आहेत,आणि म्हणून त्यांचा दुव्यर्थी उपयोग आपण त्याज्य मानला पाहिजे. वरील तीन कल्पना दोन किंवा एका शब्दाने व्यक्त करणे, किंवा त्यांचे अद्वैत कल्पिणे हे निरर्थक आहे, आणि त्याला एक गृढ अर्थ आहे असे म्हणणे एक फार मोठी चूक करणे होय.

स्तु सत् किंवा असत् असतात, आणि वाक्ये सत्य किंवा असत्य असतात या गोष्टीकडे दुर्लक्ष करून ते शब्द समानार्थी म्हणून वापरल्यामुळे अनेक निरर्थक वाक्ये आपण उच्चारतो आणि अनेक निष्फळ वादही करतो. याचे उत्तम उदाहरण म्हणून पुढील घेऊ.

सत्यमेव जयते
काही दिवसांपूर्वी मुंबई दूरदर्शनवर एक समूहगान ऐकवले गेले. ते अनेकांनी ऐकले असेल त्यात आठ-दहा तरुण स्त्रिया आणि आठ-दहा तरुण पुरुष एका सुरात आणि एका तालात गात होते. त्यांच्या गाण्याचे धृवपद होते : ‘सत्यमेव जयते अमुचे ब्रीदवाक्य आहे’. हे धृवपद आपल्याला स्फूर्तिप्रद वाटते, आणि ते गाताना (आणि ऐकतानाही) आपली छाती अभिमानाने फुगते. पण, या वाक्याचा अर्थ काय आहे? असा प्रश्न विचारला आणि त्याचे उत्तर देण्याचा प्रयत्न केला, तर अनेक चमत्कारिक गोष्टी आपल्या नजरेस पडतात.
पहिला प्रश्न उद्भवतो तो ‘सत्यमेव जयते म्हणजे काय? आपण सत्य म्हणजे काय याची बारीक चर्चा आताच केली असल्यामुळे ‘सत्यमेव जयते’ याचा अर्थ आपल्याला सांगता यावा. ‘सत्यमेव जयते’ म्हणजे सत्याचाच जय होतो, सत्याहून अन्य कशाचाच जय होत नाही. आता काटेकोर अर्थाने बोलायचे तर सत्याचा (किंवा सत्याचाच) जय होतो हे वाक्य निरर्थक आहे. जय किंवा पराजय होण्याकरिता दोन व्यक्ती, किंवा दोन चमू, किंवा दोन सैन्ये इत्यादींत स्पर्धा व्हावी लागते. तशी स्पर्धा सत्य करू शकत नाही. सत्य हा एक गुण किंवा धर्म आहे, आणि कोणताही गुण स्पर्धा करीत नाही, करू शकत नाही. सत्य म्हणजे सत्य वाक्य हा अर्थ घेतला तरी वाक्य ही स्पर्धा करणारी गोष्ट नसल्यामुळे सत्य वाक्याचाच जय होतो हे वाक्यही निरर्थक आहे. परंतु यावर असे म्हटले जाईल की ‘सत्यमेव जयते’ हे वाक्य वाच्यार्थाने घ्यायचे नाही, लक्ष्यार्थाने घ्यायचे. सत्य म्हणजे सत्य वाक्याचे पुरस्कर्ते, आणि वाक्याची जरी परस्परात स्पर्धा शक्य नसली तरी वाक्यांच्या पुरस्कर्त्या मनुष्यांची स्पर्धा सहज शक्य आहे. विविध वाक्यांच्या पुरस्कर्त्यांमध्ये जी स्पर्धा किंवा संघर्ष होतो त्यात सत्य वाक्यांच्या पुरस्कर्त्यांचाच विजय होतो असा वरील वाक्याचा अर्थ आहे. असे म्हटले तर ‘सत्यमेव जयते’ या वाक्याला स्वच्छ आणि निःसंदिग्ध अर्थ आहे असे म्हणायला हरकत नाही.

पण आता असा प्रश्न उद्भवतो की हे वाक्य खरे आहे काय? निदान सकृद्दर्शनी तरी हे वाक्य खरे नाही असे म्हणावे लागते, कारण आपण प्रत्यही अनेक खोट्या विधानांच्या पुरस्कर्त्यांना विजयी होताना पाहतो. उदा. न्यायालयीन निवाडे अनेकदा खोटे बोलणार्‍या लोकांच्या बाजूने लागतात. तसेच कितीतरी खोटी विधाने शतकानुशतके लोकांच्या विश्वासास पात्र ठरतात. यावर कोणी असे म्हणेल की ‘सत्यमेव जयते’ याचा अर्थ सत्याचा अंती जय होतो. पण अंती म्हणजे केव्हा? जगाच्या अंतकाळी? आणि सत्याचा जय होतो हे आपल्याला कसे कळले? या विधानाला काही पुरावा आहे काय? एक पुरावा असा सांगता येईल की खोटी विधाने सतत मागे पडतात, आणि त्यांची जागा सत्य विधाने घेतात. उदा. सूर्य पृथ्वीभोवती फिरते हे विधान मागे पडले आणि त्याची जागा ‘पृथ्वी सूर्याभोवती फिरते या विधानाने घेतली. विज्ञानाच्या वाटचालीत सतत असेच घडत असते. हे खरे आहे; पण या गोष्टीचे वर्णन ‘सत्याचाच जय होतो असे करण्यापेक्षा विज्ञान सत्याखेरीज अन्य काही स्वीकारायचे नाही या प्रतिज्ञेला बांधलेले आहे असे करणे जास्त यथार्थ होईल. विज्ञान हा बोलून चालून सत्याच्या शोधार्थ प्रवृत्त झालेला प्रयत्न आहे, आणि त्यात जे सत्य नसेल त्याचा सतत त्याग केला जातो. असे असल्यामुळे विज्ञानात फक्त सत्याचाच स्विकार केला जातो. म्हणजे ‘सत्यमेव जयते’ असे न म्हणता ‘विज्ञानात फक्त सत्याचाच स्वीकार केला जातो’ असे म्हटले पाहिजे. जर असे नसते, जर विज्ञान हा उद्योग अस्तित्वात नसता, तर असंख्य असत्य विधाने आपण सत्य म्हणून स्वीकारली असती. ‘पृथ्वीभोवती सूर्य फिरतो’ हे विधान आपण अनंत काळपर्यंत. स्वीकारले असते.

पण ‘सत्यमेव जयते’ या वाक्याचा आणखी एक अर्थ करणे शक्य आहे; एवढेच नव्हे तर त्या अर्थानच ते वाक्य आपण उच्चारतो असेही अनेक लोक म्हणतील. ते म्हणतील की ‘सत्य’ म्हणजे सत् म्हणजे साधु, किंवा चांगले, किंवा न्याय्य, ‘असतो मा सद् गमय’ या वाक्यात ‘सत्’ हा शब्द याच अर्थाने वापरला आहे. नेहमी सताचाच, म्हणजे जे भले असेल, साधु असेल, न्याय्य असेल त्याचाच फक्त जय होतो असे त्या वाक्याचे प्रतिपादन असू शकेल, आणि ते तसे आहे असे अनेक लोक म्हणतील. तसे असेल तर फिरून हे वाक्य सत्य कशावरून असा प्रश्न उपस्थित होईल.

आता हे वाक्य सत्य असण्याची सुतराम शक्यता नाही हे उघड आहे. भल्याचा जय होतो त्यापेक्षा अधिक वेळा बुन्याचा जय होताना आपण पाहतो. बरे, सताचा अंती जय होतो असेही म्हणण्यात काही अर्थ नाही, कारण एक तर अंती म्हणजे केव्हा? या प्रश्नाला उत्तर देणे अशक्य आहे, आणि जरी केव्हातरी जगाच्या अंतकाळी सताचा जय झाला, तर त्यामुळे असंख्य वेळा असताचा जय होतो ही गोष्ट अबाधितच राहते. तेव्हा सत्यमेव जयते हे वाक्य वस्तुतः खरे नाही हे मान्य करावे लागेल

‘सत्यमेव जयते या वाक्यासंबंधी आणखी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. हे वाक्य उच्चारणारे लोक असेही मानतात की सत्यामध्ये किंवा सतामध्ये अशी एक अंगभूत शक्ती आहे की जिच्यामुळे त्यांचा जय होणे अपरिहार्य आहे. मनुष्यांनी सत्य किंवा सत् यांच्या जयार्थ कसलाही प्रयत्न केला नाही तरी त्यांचा जय होतोच अशी अनेकांची समजूत असते; आणि निदान ही समजूत काहीशा सौम्य स्वरूपात अनेकांच्या मनांत असते. ते असे मानतात की जगाचा एकूण व्यवहार सत्याच्या किंवा सताच्या जयार्थच होत असतो. असे मानणे म्हणजे अचेतन निसर्ग सत्य आणि सत् यांचे रक्षण करतो असे मानणे आहे. परंतु वर आपण पाहिले की सत्याची कल्पना मानवसापेक्ष आहे, आणि तीच गोष्ट सताचीही (म्हणजे साधुत्वाचीही) आहे. सत्य आणि साधुत्व यांना निर्मनुष्य जगात कसलेही अस्तित्व नाही. त्या दोन्ही कल्पना मानवाच्या निर्मिती आहेत, आणि मानवाचे मन, त्याच्या आकांक्षा आणि त्याचे प्रयत्न यांच्याबाहेर त्यांना कसलेही अस्तित्व नाही आणि अर्थ नाही.

अमुचे ब्रीदवाक्य आहे
आतापर्यंत आपण वरील समूहगानाच्या ध्रुवपदाचा पहिला अर्ध तपासला. आता आपण त्याच्या उत्तरार्धाकडे वळू. त्या उत्तरार्धात पूर्वार्धासंबंधाने ते आमचे ब्रीदवाक्य आहे असे म्हटले आहे. परंतु हेही विधान बरोबर नाही. कारण ब्रीद म्हणजे प्रतिज्ञा किंवा बाणा. अमुक गोष्ट आपण कोणत्याही परिस्थितीत करू, चुकणार नाही अशी प्रतिज्ञा किंवा बाणा म्हणजे ब्रीद. म्हणजे ब्रीदवाक्य नेहमी आपण अमुक कर्म करू असा निर्धार व्यक्त करणारे वाक्य असते. ते वस्तुस्थितीचे वर्णन करणारे वाक्य नसते. उदा. ‘पृथ्वी गोल आहे’ हे आमचे ब्रीदवाक्य आहे असे आपण म्हणत नाही. अमुक वस्तु अशी आहे हे सांगणे संत्य वाक्याचे काम आहे, तर आपण अनमुक कर्म अमुक परिस्थितीत निश्चयाने करू, चुकणार नाही, असे सांगणारे वाक्य म्हणजे ब्रीद, उदा. शरणागताला अभय देणे हे आमचे ब्रीद आहे असे अनेक राजे लोक म्हणत किंवा सत्याचा शोध हे विज्ञानाचे ब्रीद आहे असे वैज्ञानिक म्हणतो.

आता ब्रीदवाक्य आणि विधान यांतील भेद जर स्पष्ट झाला असेल, तर ‘सत्यमेव जयते’ हे वाक्य विधान आहे, ब्रीदवाक्य नव्हे हे आपल्या चटकन लक्षात येईल. सत्याचाच जय होतो हे वाक्य खरे असेल किंवा नसेल; पण ते ब्रीद खचितच नव्हे. ब्रीदवाक्यात काही कर्म करण्याची प्रतिज्ञा असते. तेव्हा ‘सत्यमेव जयते हे आपले ब्रीदवाक्य असू शकत नाही हे मान्य केले पाहिजे. ‘आम्ही सत्य कधीच सोडणार नाही’ हे ब्रीदवाक्य होईल; किंवा ‘आम्ही अन्याय कधी सहन करणार नाही’ हेही ब्रीदवाक्य होऊ शकेल. परंतु सत्याचा कधी पराजय होत नाही किंवा अन्यायाचा कधी जय होत नाही ही वाक्ये ब्रीदवाक्ये होऊ शकत नाहीत.

याप्रमाणे ब्रीदवाक्य आणि विधान व्यक्त करणारे वाक्य यांमधील भेद आपल्या लक्षात आला असेल तर आता ब्रीद, निष्ठा आणि श्रद्धा यांतील भेद समजावून सांगता येईल, आणि मग ‘श्रद्धा’ या शब्दाच्या एका वेगळ्याच अर्थाकडे बोट दाखविता येईल..पण हे काम पुढे केव्हातरी करू.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.