विवाह आणि नीती (भाग ६)

कल्पनात्म प्रेम (Romantic Love)
ख्रिस्ती धर्म आणि बर्बर टोळ्या यांच्या विजयानंतर म्हणजे रोमन नागरणाच्या (civilization) पराजयानंतर स्त्री आणि पुरुष यांचे संबंध कित्येक शतकांत गेले नव्हते अशा पशुतेच्या पातळीवर गेले. प्राचीन जग दुराचारी होते, पण ते पाशवी नव्हते. तमोयुगांत धर्म आणि बर्बरता यांनी संगनमत करून जीवनाच्या लैंगिक अंगाचा अधःपात घडवून आणला, विवाहात पत्नीला कसलेच हक्क नव्हते; आणि विवाहाबाहेर सर्वच लैंगिक संबंध पापमय असल्यामुळे अनागरित (uncivilized) पुरुषाच्या स्वाभाविक पशुत्वाला वेसण घालण्याचे कारणच उरले नाही. मध्ययुगात दुराचार सर्व दूर पसरले होते, आणि ते किळसवाणे होते. बिशप उघडपणे आपल्या कन्यांशी अधर्म्य संबंध ठेवीत, आणि आर्चबिशप आपल्या पुरुषप्रेमपात्रांना बढत्या देत. धर्मगुरू ब्रह्मचारी असतात असा विश्वास वाढत होता; परंतु प्रत्यक्ष व्यवहार शिकवणीच्या फार मागे राही, पोप सातवा ग्रेगरी याने धर्मगुरूंनी आपल्या रखेल्या टाकून द्याव्या म्हणून भगीरथ प्रयत्न केले. परंतु आबेलार्डच्या काळीही (म्हणजे, १०-११व्या शतकातही) तो (आबेलार्ड) असे मानताना दिसतो की आपले लग्न हेलाँइरोशी होणे लोकापवादास कारण झाले तरी अशक्य नाही. धर्मगुरूच्या ब्रह्मचर्याची कठोर अंमलबजावणी होण्याकरिता तेरावे शतक उजाडावे लागले. धर्मगुरूंचे स्त्रियांशी अधर्म्य संबंध चालूच होते, पण ते स्वतःच ह्या संबंधांना अनैतिक आणि अपवित्र समजत असल्यामुळे त्यांच्या या संबंधांना उदात्तता किंवा सौंदर्य प्राप्त होणे शक्य नव्हते, आणि धर्मसंस्थेची कामविषयक भूमिका तापसी असल्यामुळे तीही प्रेमाच्या संकल्पनेला सौंदर्य प्रदान करू शकली नाही. हे काम सामान्य (lay म्हणजे धर्मसंस्थेत अधिकारी नसलेल्या) लोकांनी केले. युरोपीयन नीतीचा इतिहास या ग्रंथाचा लेखक लेकी म्हणतो:
‘आपल्या व्रतांचा एकदा भंग केल्यावर आणि ज्याला ते पापाचरण म्हणत असे आयुष्य व्यतीत करायला सुरुवात केल्यावर धर्मगुरूंचा अधःपात भराभर झाला, आणि ते दुराचाराच्या गर्तेत सामान्य जनांहून कितीतरी खोल कोसळले, यात आश्चर्य नव्हते.’
पोप तेविसावा जॉन याच्यावर अन्य गुन्ह्याखेरीज अगम्यगमनाचा आणि व्यभिचाराचा आरोप सिद्ध झाला होता; किंवा कैंटरबरी येथील निर्वाचित ॲबट सेंट ऑगस्टीन याला एकाच ग्रामात सतरा बेकायदा अपत्ये होती हे उघडकीस आले होते; किंवा स्पेनमधील सेंट पेलायोच्या ॲबटला ११३० साली कमीत कमी सत्तर रखेल्या असल्याचे सिद्ध झाले होते; किंवा लीज येथील बिशप तिसरा हेन्री याला पासष्ट बेकायदा अपत्ये होती म्हणून त्याला पदच्युत व्हावे लागले — यासारख्या दुराचाराच्या तुरळक उदाहरणांना आपण कदाचित् महत्त्व देणार नाही. परंतु परिषदा आणि व्यक्ती यांची एक दीर्घ परंपरा जेव्हा एकमताने साध्या वेश्यागमनापेक्षा फार भयानक दुराचाराचे चित्र उभे करते, तेव्हा तिने पुरविलेल्या पुराव्याकडे दुर्लक्ष करणे कठीण होते. जेव्हा धर्मगुरू लग्न करीत तेव्हा हा संबंध बेकायदा आहे या जाणिवेमुळे त्यात एकनिष्ठतेची ओढ नसे, आणि बहुपत्नीत्व व प्रेमप्रकरणांची विलक्षण अस्थिरता ही त्यांत फार मोठ्या प्रमाणांत आढळत. मध्ययुगांतील लेखक भिक्षुणींचे मठ म्हणजे वेश्यागृहे असल्याच्या कहाण्या लिहीत; त्यांत मोठ्या संख्येत होणार्‍या बालहत्या, धर्मगुरूंमध्ये दृढमूल झालेला अगम्यगमनाचा सर्रास आढळ, त्यामुळे धर्मगुरूंना आपल्या आया आणि बहिणी यांच्यासह राहण्यास बंदी घालणारे कठोर फतवे, यांची वर्णने त्यांत असत. अनैसर्गिक (म्हणजे समलिंगी) संभोग ख्रिस्ती धर्माने नष्ट केला हा त्याचा एक मोठा विक्रम मानला जातो, पण त्याचेही अवशेष ख्रिस्ती मठांत सापडत असल्याचे उल्लेख येतात; आणि धर्मसुधारणेच्या (Reforma tion) थोडे आधी पापनिवेदनाच्या कक्षाचा उपयोग बदफैलीपणाकरिता होत असल्याच्या तक्रारी वारंवार आणि उच्च स्वरात केल्या जाऊ लागल्या होत्या.
मध्ययुगाच्या सबंध कालखंडात धर्मसंस्थेच्या ग्रीक-रोमन परंपरा आणि राज्यकर्त्या वर्गाच्या ट्युटन परंपरा यांचे एक चमत्कारिक विभाजन दिसून येते. दोन्हींनी नागरणाला अंशदान (contribution) दिले, परंतु ही अंशदाने अत्यंत भिन्न होती, धर्मसंस्थेने दिलेल्या गोष्टी म्हणजे विद्या, तत्त्वज्ञान, पोपप्रणीत कायदा (canon law) आणि ख्रिस्ती जगताच्या एकतेची संकल्पना, तर सामान्य (म्हणजे धार्मिकेतर) लोकांनी दिलेल्या गोष्टी म्हणजे प्रचलित लौकिक कायदा (common law), ऐहिक शासन, सरदारी दाक्षिण्य (chivalry) काव्य आणि कल्पनात्म कथा (romance). यापैकी कल्पनात्म प्रेम (romantic love)’ या विषयाशी आपल्याला कर्तव्य आहे.
मध्ययुगाच्या पूर्वी कल्पनात्म प्रेम अज्ञात होते असे म्हणणे बरोबर होणार नाही; परंतु मध्ययुगातच त्याला पहिल्यांदा सामान्यपणे स्वीकृत अशा जीवनाचे स्वरूप प्राप्त झाले. कल्पनात्म प्रेमाचा गाभा म्हणजे त्यात प्रिय वस्तू (म्हणजे अर्थात् प्रेयसी) अतिशय दुष्प्राप्य आणि अतिशय बहुमोल मानली जाई. त्यामुळे प्रेयसीचे प्रेम मिळविण्याकरिता बहुविध प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागे. काव्याने, गीताने, पराक्रमाने किंवा प्रेयसीला आवडेल त्या अन्य कोणत्याही मार्गाने प्रयत्न केले जात. प्रेयसीची बहुमूल्यता हा तिच्या दुष्प्राप्यतेचा परिणाम असे, आणि मला वाटते की जेथे स्त्री विनासायास प्राप्त होऊ शकते तेथे तिच्याविषयीची पुरुषाची भावना कल्पनात्म प्रेमाचा स्तर गाठू शकत नाही. मध्ययुगात प्रथम प्रकट झालेले कल्पनात्म प्रेम ज्या स्त्रियांशी प्रियकराचे कायदेशीर किंवा, बेकायदा लैंगिक संबंध येऊ शकतील अशा स्त्रियासंबंधी नसे. ते अत्युच्च सन्मान्यता प्राप्त असलेल्या स्त्रियांविषयी असे, आणि या स्त्रिया आणि त्यांचे कल्पना प्रियकर यांच्यामध्ये नीती आणि रूढी यांची अनुल्लंघ्य दरी असे. कामक्रिया स्वरूपतः अशुद्ध आहे हे मनुष्यांच्या मनांवर बिंबविण्याचे काम धर्मसंस्थेने इतके पूर्णपणे केले होते की जी स्त्री अप्राप्य नसेल तिच्याविषयी कल्पनात्म भावना निर्माण होणे अशक्य झाले होते. आधुनिकांना या मध्ययुगांतील कविप्रियकरांच्या मानसशास्त्राची कल्पना करणे अतिशय कठीण आहे. ते उत्कट भक्ती प्रकट करतात, पण मिलनाची इच्छा व्यक्त करीत नाहीत; आणि हे आधुनिकाला इतके चमत्कारिक भासते की असले प्रेम म्हणजे केवळ एक कविसंकेत आहे असे त्याला वाटण्याचा संभव आहे. अनेकदा ते याहून जास्त नसते हे अर्थातच खरे आहे, आणि त्याची भाषिक अभिव्यक्ती बरीचशी सांकेतिक होती. परंतु दांतेचे Vita Nuova मध्ये प्रकट झालेले बिॲट्रिसविषयीचे प्रेम खचितच केवळ सांकेतिक नव्हते. मी तर असे म्हणेन की ते प्रेम म्हणजे बहुतेक आधुनिकांना ज्ञान अशा कोणत्याही भावनेहून अधिक उत्कट अशी भावना होती. मध्ययुगातील उदारचरित लोक पृथ्वीवरील आपले जीवन हिणकस समजत; आपल्या मानवी सहजप्रवृत्ती मूळचे पाप आणि त्यातून घडलेला अधःपात यातून निर्माण झालेल्या मानत; त्यांना आपली शरीरे आणि शारीरिक वासना यांची घृणा वाटे. शुद्ध आनंद जर कुठे शक्य असेलच तर तो कामप्रवृत्तीतून पूर्ण मुक्त अशा तल्लीन ध्यानातच आहे अशी त्यांची खात्री होती. या वृत्तीतून प्रेमाच्या क्षेत्रात दांतेच्या मनोभूमिकेच्या जातीची मनोभूमिका निर्माण होणे अपरिहार्य होते. ज्याला एखाद्या स्त्रीविषयी गाढ प्रेम आणि गाढ आदर वाटे त्याला त्या स्त्रीशी शरीरसंग करण्याची कल्पना अशक्य होई, कारण काम हा मुळात अशुद्ध होता, त्यामुळे त्याचे प्रेम काव्यात्म आणि कल्पनात्म रूपे धारण करी, आणि स्वाभाविकच त्यांत प्रतीकांचा भरणा असे. या सर्वांचा साहित्यावर फारच चांगला परिणाम झाला. दुसरा फ्रेडरिक या सम्राटाच्या दरबारात आरंभ झालेल्या आणि पुनरुत्थान कालापर्यंत (Renaissance) हळूहळू विकास पावलेल्या प्रेमकाव्याच्या इतिहासावरून हे दिसून येते.
मध्ययुगांतील प्रेमाविषयी मला माहीत असलेल्या उत्तम निरूपणांपैकी एक Huizinga च्या The Waning of the Middle Ages या ग्रंथात आले आहे. तो म्हणतो: ‘जेव्हा बाराव्या शतकात दक्षिण फ्रान्समध्ये दरबारी गायक-कवींनी आपल्या प्रेमाच्या काव्यात्म संकल्पनेच्या केंद्रस्थानी अतृप्त इच्छेची योजना केली, तेव्हा नागरणाच्या (civilization) इतिहासाला एक नवे वळण लागले. प्रेमाच्या दुःखांची गाणी प्राचीन काळांतही गायली गेली होती; पण त्या दुःखांत एकतर भविष्यातील सुखाची अपेक्षा असे, किंवा विफल प्रेमाचे कारुण्य असे…. दरबारी काव्यात अभिलाषा हीच प्रधान गोष्ट असते, आणि म्हणून त्यातून प्रेमाची जी कल्पना निर्माण झाली तिचा आधारस्वर नकारात्मक होता. शारीर प्रेमाशी संपूर्ण काडीमोड न घेताही या नवीन काव्याला सर्व प्रकारच्या नैतिक आकांक्षांना स्पर्श करणे शक्य झाले. आता प्रेम असे क्षेत्र झाले की ज्यात सर्व प्रकारची नैतिक आणि सांस्कृतिक पूर्णता बहराला आली. दरबारी प्रेमी आपल्या प्रेमामुळेच शुद्ध आणि सच्चरित आहे. प्रेमातील आत्मिक (सात्त्विक) अंश अधिकाधिक प्रबल होत गेला, आणि तेराव्या शतकाच्या शेवटी दांते आणि त्यांचे मित्र यांच्या काव्यांत प्रेमाच्या ठिकाणी साधु आणि पुण्यशील साक्षात्काराची शक्ती आहे असे मानले गेले. येथे एक टोक गाठले गेले. त्यातून सावरून इटालियन कविता इतक्या उच्च पदावरून पुढे काहीशा निम्न कोटीच्या प्रेमाकडे आली. पेट्राची स्थिती सत्त्वशील प्रेमाचा आदर्श आणि प्राचीन नमुन्यांचे नैसर्गिक आकर्षण यांमध्ये द्विधा झालेली आढळते. दरबारी प्रेमाच्या कृत्रिम कल्पनेचा लवकरच त्याग करण्यात आला; आणि जेव्हा दरबारी संकल्पनेत अव्यक्त रूपात असलेल्या प्लेटोवादातून सत्त्वशील प्रेमाची नवी रूपे निर्माण झाली, तेव्हा दरबारी परंपरेच्या सूक्ष्म बारकाव्यांची पुनर्निर्मिती झाली नाही.
फ्रान्स आणि बर्गडी येथील काव्याचा विकास इटालीतील विकासाहून काहीसा भिन्न होता, कारण फ्रेंच राज्यकर्त्या वर्गाच्या प्रेमविषयक कल्पनांवर Romaunt of the Rose या काव्याचा परिणाम झाला होता. या काव्यात जरी सरदारी प्रेमाचे वर्णन असले तरी ते अतृप्त राहावे असा त्याचा आग्रह नव्हता. खरे म्हणजे तेथे धर्मसंस्थेच्या शिकवणीविरुद्ध प्रतिक्रिया झाली होती, आणि प्रेमाची जीवनातील रास्त स्थानावर स्थापना करण्यावर भर होता…. हा काळ अतिशय असंस्कृत आणि ग्राम्यतेचा होता; परंतु Romaunt of the Rose मध्ये पुरस्कृत प्रेम जरी धर्मसंस्थेच्या अर्थाने सत्त्वशील नसले, तरी ते सुसंस्कृत, दाक्षिण्यपूर्ण, आणि सौम्य असे होते. ह्या सर्व कल्पना अर्थातच राज्यकर्ते आणि महाजन यांच्याकरिताच होत्या. त्याकरिता रिकाम्या वेळाची गरज असते, एवढेच नव्हे तर धर्मसंस्थेपासून काही प्रमाणात मुक्तताही असणे अवश्य असते. शौर्याच्या स्पर्धांना, त्यात प्रेमाचा प्रभाव प्रबल असल्यामुळे, धर्मसंस्थेचा विरोध होता, पण ती त्यांना दडपण्यास असमर्थ होती. ती सरदारी प्रेम दडपू शकली नाही. महाजनसत्तेने (aris tocracy) जगाला वेळोवेळी दिलेल्या गोष्टींचा आपल्याला आपल्या लोकशाही युगात सहज विसर पडू शकतो. प्रेमाच्या पुनरुज्जीवनाच्या बाबतीत पुनरुत्थानाला (Renaissance) जे यश मिळाले ते, जर सरदारी प्रेमकाव्यांनी त्याची वाट प्रशस्त केली नसती, तर त्याला मिळाले नसते.
पुनरुत्थानाच्या काळात ग्रीक-रोमन कल्पनांना अनुकूल अशा प्रतिक्रियांचा परिणाम असा झाला की प्रेम सामान्यपणे प्लेटोनीय राहिले नाही, पण ते काव्यात्म मात्र राहिले. मध्ययुगीन संकेतांविषयी पुनरुत्थानकालीन मत आपल्याला डॉन क्विक्झोट आणि त्याची प्रेयसी डुल्सिनिया यांच्या कथेत सापडते. पण मध्ययुगीन परंपरेचा परिणाम झाल्याशिवाय राहिला नाही. सिडनीच्या Astrophel and Stella मध्ये तो भरपूर आढळतो, आणि शेक्सपीअरच्या मि. W.H. ला उद्देशून लिहिलेल्या सुनीतांवरही तिचा बराच परिणाम झालेला दिसतो. मात्र पुनरुत्थान काळातील प्रातिनिधिक प्रेमकाव्य एकंदरीने प्रसन्न आणि सरळ आहे…. परंतु तरीही प्रियाराधनाकरिता कवितेचा उपयोग करण्याइतपत मध्ययुगीन प्लेटोनीय प्रेमाचा प्रभाव त्यांच्यावर पडलाच आहे. Cymbeline मधील क्लोटनला लोक हसतात, कारण त्याला स्वतःचे प्रेमकाव्य लिहिता येत नाही, आणि त्याला ते एका भाडोत्री पद्यकाराकडून लिहवून घ्यावे लागले. मध्ययुगांपूर्वी जरी प्रेमकाव्ये पुष्कळ असली तरी प्रियाराधनाकरिता लिहिलेले काव्य फारच थोडे होते याचे आश्चर्य वाटते. स्वामी परगावी गेल्यामुळे विरहाने व्याकुळ झालेल्या स्त्रीचे दुःख वर्णिणारे चिनी काव्य पुष्कळ आहे; तसेच ज्यात आत्म्याची कल्पना प्रियकराची (म्हणजे परमेश्वराची) वाट पाहणारी वधू म्हणून केली जाते असे भारतीय काव्यही पुष्कळ आहे. पण हवी असलेली स्त्री मिळविणे पुरुषांना इतके सोपे होते की त्यांचे प्रियाराधन करण्याकरिता काव्य आणि गीत यांचा वापर करावा लागत नसे असे दिसते. कलानिर्मितीच्या दृष्टीने स्त्रिया सुलभ असणे हे खरोखर शोचनीय आहे. ज्या परिस्थितीत त्या मिळणे कठीण असते, पण अशक्य नसते, अशी परिस्थिती सर्वांत इष्ट आहे. पुनरुत्थान काळानंतर ही परिस्थिती थोड्याफार प्रमाणात अस्तित्वात राहिली आहे. तिच्यातील अडचणी अंशतः बाह्य आणि अंशतः आंतर असतात, आणि आंतर अडचणी रूढ नैतिक शिकवणीतून उद्भवणाच्या आशंकांमुळे निर्माण झालेल्या असतात.
कल्पनात्म प्रेमाची पराकोटी कल्पनात्म चळवळीत (romantic movement) गाठली गेली, आणि शेली त्याचा प्रधान दूत मानता येईल. जेव्हा शेली प्रेमात पडला तेव्हा त्याचे मन अशा अतिशय मनोहर भावनांनी आणि कल्पनात्म विचारांनी भरून गेले की ज्यांचा आविष्कार काव्यात होणे स्वाभाविक होते. ज्या भावनेमुळे हे परिणाम घडून आले ती अंतर्बाह्य सर्वथा मंगल असली पाहिजे असे त्याला स्वाभाविकच वाटले, आणि प्रेमाला कसलेच बंधन असू नये असे त्याचे मत बनले. परंतु त्याचा हा युक्तिवाद चुकीच्या मानसशास्त्रावर आधारलेला होता. त्याला कविता लिहावीशी वाटली कारण त्याच्या प्रेमाला आलेले अडथळे, जर लेडी एमिलियी व्हिव्हिॲनी हिची रवानगी मठात केली गेली नसती, तर त्याला Epipsychidion ही कविता लिहिण्याची गरज वाटली नसती; आणि जर जेन विल्यम्स ही स्त्री सद्वर्तनी नसती तर त्याने The Recollection ही कविता कधीही लिहिली नसती. ज्या सामाजिक अडथळ्यांविरुद्ध तो तक्रार करतो ते त्याच्या उत्तम काव्याला मोठ्या प्रमाणात प्रेरक झाले होते. शेलीच्या ठिकाणी असलेले कल्पनात्म प्रेम ही एका अस्थिर समतोलाच्या स्थितीवर आधारलेली भावना होती. त्या स्थितीत विघ्ने असतात, पण ती अलंध्य नसतात. जर विघ्ने अविचल असतील, किंवा ती मुळातच नसतील, तर काव्यात्म प्रेम बहरू शकत नाही. या बाबतीत एक टोक म्हणजे चिनी व्यवस्था, या व्यवस्थेत कोणीही मनुष्य आपली पत्नी सोडून कोणत्याही प्रतिष्ठित स्त्रीला भेटत नाही, आणि जेव्हा पत्नीच्याने त्याचे समाधान होत नाही तेव्हा तो वेश्यागृहात जातो. त्याच्या पत्नीची निवड त्याच्याकरिता इतर करतात, आणि बहुधा लग्नदिवसापर्यंत ती त्याला अज्ञात असते. याचा परिणाम असा होतो की त्याचे सर्व लैंगिक संबंध कल्पनात्म प्रेमापासून फार दूर राहतात, आणि ज्या प्रियाराधनातून प्रेमकाव्य निर्माण होते ते करण्याचे कारणच कधी उद्भवत नाही. याच्या उलट पूर्ण स्वातंत्र्याच्या परिस्थितीत उत्तम प्रेमकाव्य लिहिण्याची ताकद अंगी असणार्‍या मनुष्याला आपल्या नैसर्गिक आकर्षकपणानेच प्रेमात जय मिळणे शक्य असल्यामुळे त्याला त्याकरिता कल्पनात्म काव्य करण्याचे कारण उरणार नाही. याप्रमाणे प्रेमकाव्य हे रूढीचे बंधन आणि स्वातंत्र्य यांच्यातील एका नाजूक समतोलावर अवलंबून असते, आणि हा समतोल या किंवा त्या बाजूस ढळला, तर ते उत्तम स्वरूपात निर्माण होऊ शकत नाही.
परंतु प्रेमाचे प्रेमकाव्य हे एकमेव प्रयोजन नाही, आणि कल्पनात्म प्रेम त्यातून कल्पनात्म आविष्कार न होताही बहरू शकते. माझे स्वतःचे मत असे आहे की काव्यात्म प्रेम हे जीवनात मिळू शकणार्‍या अत्युत्तम आनंदाचा स्रोत आहे. परस्परांवर उत्कंठा, कल्पकता आणि मार्दव यांनी युक्त असे प्रेम करणाऱ्या स्त्रीपुरुषांच्या संबंधांत काहीतरी अनमोल मूल्य आहे हे न कळणे हे कोणाही मनुष्याचे घोर दुर्दैव मानले पाहिजे. जरी हा आनंद जीवनातील केवळ एक घटक आहे, त्याचे प्रधान प्रयोजन नव्हे, तरी आपली समाजव्यवस्था अशी असावी की तिच्यात हा आनंद मिळणे शक्य व्हावे.
अगदी आधुनिक काळात, म्हणजे फ्रेंच राज्यक्रांतीच्या सुमारास, विवाह कल्पनात्म प्रेमोत्तर व्हावा अशी कल्पना वाढीस लागली आहे. बहुतेक आधुनिक, निदान आंग्लभाषाभाषी देशातील आधुनिक, ही गोष्ट गृहीत धरतात, आणि ही कल्पना अगदी अलीकडेपर्यंत एक क्रांतिकारी नवलाई होती याची त्यांना जाणीवही नसते. शंभर वर्षांपूर्वीच्या बहुतेक कादंबर्‍या आणि नाटके यांचे विषय मातापित्यांनी ठरविलेल्या विवाहाविरुद्ध नवीन प्रकारचे विवाह प्रस्थापित करण्याकरिता केलेले झगडे असत. त्या झगड्याचे परिणाम अपेक्षेइतके चांगले झाले आहेत काय याविषयी शंका घेता येईल. प्रेम आणि द्वेष दोन्ही कालांतराने क्षीण होताते या मिसेस मॅलप्रॉपच्या मतात बरेच तथ्य आहे, आणि म्हणून आरंभी थोडी अप्रीती असलेली चांगली. जेव्हा परस्परांविषयी लैंगिक माहिती नसलेले स्त्रीपुरुष कल्पनात्म प्रेमाच्या भरात लाग्न करतात तेव्हा ती दोघे परस्परांमध्ये मानवांच्या गुणांहून श्रेष्ठ गुण असल्याचे मानतात, आणि आपले वैवाहिक जीवन म्हणजे ब्रह्मानंदाचे एक दीर्घ स्वप्न होऊन राहणार आहे अशी त्यांची समजूत असते. जर स्त्री लग्नापर्यंत अज्ञ आणि शुद्ध राहिली असेल तर हे धडण्याची शक्यता विशेष असते, कारण अशा स्त्रीला कामक्षुधा आणि पतीला अनुकूल असणे यांतील भेद समजत नाही. अमेरिकेमध्ये प्रेमविवाहाचे कल्पनात्म मत अन्य कोणत्याही देशापेक्षा अधिक गंभीरपणे स्वीकारले गेले आहे, आणि कायदा आणि रूढी दोन्ही कुमारिकांच्या स्वप्नरंजनावर आधारलेली आहेत. पण तिथे घटस्फोटाचे प्रमाण भयानक वाढले आहे.
आणि सुखी विवाह अपवादात्मक झाले आहेत. विवाह ही दोन व्यक्तींना परस्परांच्या सहवासात सुख वाटणे याहून अधिक गंभीर गोष्ट आहे. ती एक संस्था आहे; तिच्यातून मुलांची उत्पत्ती होत असल्यामुळे ती समाजाच्या प्राणभूत रचनेचा भाग आहे, आणि म्हणून तिचे महत्त्व पती आणि पत्नी यांच्या वैयक्तिक भावनांपेक्षा कितीतरी जास्त आहे. कल्पनात्म प्रेम विवाहाला प्रेरक असणे इष्ट असेल. मला स्वतःला ते तसे वाटते; परंतु विवाह जर सुखी राहायचा असेल, आणि त्याचे सामाजिक कार्य जर सफल व्हायचे असेल, तर त्याकरिता त्यातील प्रेम कल्पनात्म असून चालणार नाही. ते त्याहून अधिक गाढ, स्नेहमय आणि वास्तववादी असावे लागेल हेही लक्षात घ्यावे लागेल. कल्पनात्म प्रेमात प्रियवस्तूकडे मोहक धुक्यातून पाहिले जाते, आणि त्यामुळे तिचे दर्शन यथार्थ होत नाही. आता हे खरे आहे की एक प्रकारची स्त्री लग्नानंतरही त्या धुक्यात राहू शकते. पण हे शक्य होण्याकरिता तिला आपल्या नवर्‍याशी सर्व प्रकारचा गाढ संसर्ग टाळावा लागेल, आणि आपले अत्यंत अभ्यंतर विचार आणि भावना पूर्णपणे, आणि काही प्रमाणात आपले शरीरही, गुप्त ठेवावे लागेल. परंतु अशा उपायांनी विवाहाचे शक्य असलेले उत्तम फायदे मिळण्यात अडथळे उत्पन्न होतात, कारण ते फायदे स्नेहमय आणि भ्रममुक्त गाढ संसर्गातूनच मिळू शकतात. शिवाय कल्पनात्म प्रेम हे विवाहाला आवश्यक आहे हे मत वस्तुतः अराजकवादी आहे. त्यात विवाहाला महत्त्व येते ते अपत्यांमुळे ह्या गोष्टीचा सेंट पॉलप्रमाणेच, पण विरुद्धार्थाने, विसर पडलेला दिसतो. अपत्ये जर नसती तर लैंगिक व्यवहाराची व्यवस्था करणारी संस्थाच असण्याची गरज नव्हती. पण एकदा अपत्ये अवतरली म्हणजे, जर पतिपत्नींना जबाबदारीची भावना असेल, आणि आपल्या अपत्यांचे थोडेही प्रेम असेल, तर आपल्या परस्परांविषयीच्या भावनांना आता प्रधान महत्त्व उरलेले नाही हे त्यांच्या लक्षात येईल.

अनुवादक : म. गं. नातू

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.