विवेकवाद -८

अध्यात्म आणि विज्ञान याच अंकात अन्यत्र वाचकांच्या पत्रल्यवहारात प्रा. श्याम कुलकर्णी यांचे एक पत्र छापले आहे. ते इत्र विवेकवादावर घेतल्या जाणार्‍या आक्षेपांचे प्रातिनिधिक मानायला हरकत नाही. प्रा. कुळकर्णी म्हणतात की जिथे विज्ञान संपते तिथे अध्यात्माची सुरुवात होते. प्रा. कुळकणी विज्ञानाचे प्राध्यापक आहेत, आणि म्हणून त्यांनी विज्ञानाचे अधिकार आणि त्याच्या मर्यादा यांविषयी व्यक्त केलेल्या मताला वजन आहे असे मानले जाणे स्वाभाविक आहे. त्यामुळे या पत्राला काहीसे सविस्तर उत्तर देण्याचे ठरविले आहे.

जिथे विज्ञानाचे क्षेत्र संपते तिथे अध्यात्माच्या क्षेत्राची सुरवात होते म्हणजे नेमके काय ? या प्रश्नाचे उत्तर देण्याकरिता आधी अध्यात्म म्हणजे काय आणि विज्ञान म्हणजे काय हे काहीशा विस्ताराने मांगावे लागेल. या दोन प्रश्नांपैकी विज्ञान म्हणजे काय याचे उत्तर निश्चित आहे, आणि म्हणून ते देणे बरेच सोपे आहे; परंतु अध्यात्म म्हणजे काय हे सांगणे मात्र बरेच कठीण आहे. विज्ञान म्हणजे काय?
विज्ञान हे एका अतिविशाल आणि सतत वाढत जाणार्‍या ज्ञानासंग्रहाचे नाव आहे. हे ज्ञान मानवाला प्राप्य असणारे सर्वात निश्चित आणि विश्वगनीय असे ज्ञान आहे. ते ज्ञान प्राप्त करण्याची विज्ञानाची एक विशिष्ट पद्धत आहे, आणि त्या ज्ञानाची मांडणी करण्याची एक विशिष्ट रीतही आहे.

विज्ञानाची ज्ञान प्राप्त करण्याची पद्धत म्हणजे जिला वैज्ञानिक पद्धती (Scientific method) म्हणतात ती. ही पद्धत अनुभवानुसारी, म्हणजे जिला ’empirical’ म्हणतात ती अमृत तिच्यात इंद्रियानुभव हा ज्ञानाचा अंतिम निकष मानला जातो. या पद्धतीत इंद्रियांनी मिळणार्‍या विशिष्ट (म्हणजे एकेकट्या वस्तूविषयीच्या, उदा. ‘ही वस्तू काळी आहे’, ‘ती वस्तू गोड आहे’, ‘हिला दोन पाय आहत’, ‘हिला पंख आहेत’ इत्यादि) विधानांवरून सामान्य (general) किंवा मार्विक {Universal) (म्हणजे एखाद्या प्रकारच्या सर्व वस्तूंविषयीच्या) विधानांची प्रस्थापना केली जाते. (उदा. ‘सर्व कावळे काळे आहेत.’) आणि त्या विधानांची जुळणी किंवा मांडणी जिला व्यवस्थित (systematic) म्हणतात त्या पद्धतीने केली जाते. एखादी विधानसंहती किंवा विधानसमूह व्यवस्थित आहे याचा अर्थ त्यात परस्परविरुद्ध आणि तसेच पूर्ण स्वतंत्र विधाने नाहीत. दोन विधाने स्वतंत्र आहेत याचा अर्थ त्यांपैकी कोणतेही खरे किंवा खोटे असेल तर, त्यामुळे दुसरे खरे की खोटे हे ठरत नाही. उदा. ‘सर्व कावळे काळे आहेत’ आणि ‘नागपुरातील कावळे काळे आहेत’ किंवा ‘नागपुरातील कावळे काळे नाहीत’ ही विधाने स्वतंत्र नाहीत; कारण जर ‘सर्व कावळे काळे आहेत’ हे खरे असेल तर तेवढयावरून ‘नागपुरातील कावळे काळे आहेत’ हे खरे असले पाहिजे आणि ‘नागपुरातील कावळे काळे नाहीत’ हे विधान खोटे असले पाहिजे असे निश्चितपणे म्हणता येते.

विश्वाचे ज्ञान मिळविण्याचे वैज्ञानिक पद्धतीडून अन्य साधन मानवाजवळ नाही असा विज्ञानाचा दावा आहे.

अध्यात्म म्हणजे काय ?
‘अध्यात्म’ म्हणजे आत्मविषयक, आत्म्याविषयी. अध्यात्मविचार म्हणजे आत्मविचार. आत्मा म्हणजे ज्याला प्रत्येक मनुष्य ‘मी’ किंवा ‘अहं’ किंवा आपले मन म्हणतो तो. परंतु इथे एक प्रश्न असा उद्भवतो की आपला प्रत्येकाचा आत्मा हा विश्वाचाच एक भाग आहे. विश्वात जसे ग्रह, तारे, पर्वत, नद्या आहेत, तसेच सर्वांचे आत्मेही आहेत. मग सबंध विश्वाचा अभ्यास करणारे विज्ञान आत्म्याचा विचार करीत नाही काय? याला उत्तर आहे, करते, आणि आत्म्याचा अभ्यास करणार्‍या विज्ञानाला ‘मानसशास्त्र’ असे नाव आहे. पण मग जर मानसशास्त्रात मनाचा किंवा आत्म्याचा अभ्यास होत असेल, तर अध्यात्मशास्त्र आणखी काय करते? आणि त्याची आवश्यकता काय आहे?

याचे एक उत्तर असे आहे की अध्यात्म हे विज्ञान नाही, तत्त्वज्ञान (philosophy) आहे, किंवा तत्त्वज्ञानाची एक शाखा आहे. तेव्हा आधी तत्त्वज्ञान म्हणजे काय हे पाहिले पाहिजे.

तत्त्वज्ञानाचे स्वरूप समाधानकारकपणे उलगडून सांगणे ही बरीच कठीण गोष्ट आहे. शिवाय ते करण्याकरिता आपल्याजवळ अवकाशही नाही. म्हणून तत्त्वज्ञानाचे स्वरूप आपण कामापुरते समजावून घेऊ.

असे अनेक प्रश्न आहेत की जे मानवापुढे स्वाभाविकपणे उद्भवतात, पण ज्यांना विज्ञानाजवळ उत्तरे नसल्यामुळे त्यांचा विज्ञानात समावेश होत नाही. ज्यांना स्थूलमानाने ‘अंतिम प्रश्न’, ‘ultimate questions’ म्हणतात ते प्रश्न असे आहेत. उदा. ‘हे विश्व कसे निर्माण झाले?’ ‘दिक्कालातीत काही आहे काय?’ या प्रश्नांच्या जोडीला काही मानवी जीविताविषयीचे आणि आत्म्याविषयीचे प्रश्नही येतात. उदा. ‘आत्म्याला मरणोत्तर अस्तित्व आहे काय?’ ‘मानवी जीविताचा हेतू काय?’ इत्यादि. आता यापैकी एकाही प्रश्नाचे उत्तर विज्ञान देऊ शकत नाही. वर सांगितल्याप्रमाणे विज्ञानाची पद्धत अनुभवानुसारी (म्हणजे इंद्रियानुभवानुसारी) आहे, म्हणजे दोवटी ते कोणत्यातरी अनुभवावर आधारलेले असते. परंतु वरील सर्व प्रश्न कोणत्याही संभाव्य अनुभवाच्या पार पलीकडे जाणारे आहेत. उदा. विश्वाच्या उत्पत्तीविषयी कसलीही पेंद्रिय माहिती मिळू शकत नाही. म्हणून विज्ञान विश्वाच्या उत्पत्तीविषयी काहीही सांगू शकत नाही. पृथ्वीची उत्पत्ती कशी झाली व केव्हा झाली यासंबंधाने काही अंदाज ते बांधू हाकेल; पण विश्वाची उत्पत्ती केव्हा झाली हे ते सांगू शकत नाही. कारण अमुक क्षणी विश्व उत्पन्न झाले असे मानल्याबरोबर त्याच्या आधी काय होते? विश्व शून्यातून उद्भवले काय? हे कृट प्रश्न उद्भवतात, आणि त्यांची उत्तरे देणे असंभव दिसते. तसेच ईश्वरविषयक प्रश्नही विज्ञान सोडवू शकत नाही. आत्म्याच्या मरणोत्तर अस्तित्वाविषयीही त्याला मूकच राहावे लागते, कारण आपल्या अनुभवाला येणारे आत्मे म्हणजे शरीरी आत्मे, अशरीरी आत्म्याचा आपल्याला कसलाही अनुभव नाही. विज्ञान अंतिम प्रश्नांची उत्तरे देऊ शकत नाही, आणि म्हणून ती देण्याच्या भानगडीत ते पडत नाही.

परंतु या अंतिम प्रश्नांचा विचार करण्याचे विज्ञानाने नाकारले, तरी त्यामुळे ते प्रश्न नाहीसे होत नाहीत. ते प्रश्न मनुष्याला स्वाभाविकपणे पडतात, आणि त्यांपैकी काही काही केल्या पिच्छा सोडत नाहीत. त्यांतही काही असे असतात की माणसाला त्यांचा ध्यासच लागतो. हे शेवटचे प्रश्न आत्मविषयक प्रश्न आहेत. मेल्यानंतर आत्म्याचे काय होते ह्या प्रश्नाने मनुष्य वेडावून जातो. मृत्यू ही अतिशय अस्वस्थ करणारी गोष्ट आहे. मनुष्य जेव्हा या अफाट विश्वाकडे पाहतो, जेव्हा ते विश्व मानवाला प्रतिकूल आणि त्याच्या इच्छा – आकांक्षांविषयी सर्वथा बेपर्वा असल्याचे लक्षात येते, तेव्हा त्याला आपले दौर्बल्य, क्षुद्रत्व, उपरेपणा प्रकर्षाने जाणवतो. आपण किती अल्पजीवी, आपले सामर्थ्य किती तोकडे, आपले ज्ञान किती तुटपुंजे — यांचे दर्शन घडल्यावर तो भयभीत होतो. या अफाट, उदासीन विश्वात आपण कोठून तरी अज्ञातातून येतो, आणि क्षणमात्र येथे थांबून पुन्हा कोठेतरी अज्ञातात सदाकरिता निघून जातो, या जाणिवेने मनुष्य अतिशय बेचैन होतो. आपण अतिशय उमेदीने आणि महाप्रयासाने आरंभिलेली कामे मृत्युसमयी जमीनदोस्त होणार आहेत या कल्पनेने तो चिंताग्रस्त होतो. आणि मग या भयावह परिस्थितीवर उपाय आहे काय याचा शोध तो करू लागतो. विज्ञानाकडून या शोधाला नकारच मिळतो. म्हणून मग अध्यात्माचा जन्म होतो. याप्रमाणे अध्यात्माची मूलप्रेरणाच मनुष्याला दिलासा, आश्वासन मिळावे ही आहे, आणि म्हणून अध्यात्मविचारातून जे निष्कर्ष निष्पन्न होतात ते मानवाला आश्वासक असावेत यात आश्चर्य नाही. अध्यात्म आणि तत्त्वज्ञान तत्त्वज्ञानांचे स्थूलमानाने दोन प्रकार आढळून येतात. जी तत्त्वज्ञाने मनुष्याच्या गाढ इच्छा पूर्ण करणारी असतात त्यांचा एक वर्ग आहे; आणि दुसरा वर्ग जी तत्त्वज्ञाने मनुष्यांच्या इच्छांनी प्रभावित न होता केवळ सत्याचा शोध करणारी असतात त्यांचा. यापैकी पहिल्या वर्गात अध्यात्मशास्त्राचा समावेश होतो. भारतातील तत्त्वज्ञान, काही तुरळक अपवाद सोडले तर, प्रामुख्याने इच्छापूर्तीच्या (wish-fulfilment) स्वरूपाचे आहे. येथील तत्त्वज्ञानाचे प्रयोजन काय आहे याचा शोध केला तर हे स्पष्ट दिसते. प्रसिद्ध सांख्यदर्शनाचा लेखक ईश्वरकृष्ण पहिल्याच कारिकेत हे प्रयोजन असे सांगतो: ‘दु:खत्रयाभिधातात् जिज्ञासा तदपघातके हेत’ (म्हणजे आधिभौतिक, आधिदैविक आणि आध्यात्मिक अशा त्रिविध दु:खांनी गांजल्यामुळे ती दु:खे नष्ट करण्याच्या उपायासंबंधी जिज्ञासा निर्माण होते.) आपल्या तत्त्वज्ञानांपैकी चार्वाक–दर्शन सोडले तर अन्य सर्व दर्शाने (बौद्ध आणि जैन ही अवैदिक दर्शने धरून) तत्त्वज्ञानाचे प्रयोजन मानवाच्या दुःखांचा नाश हेच समजतात. प्रथमदर्शनी हा उद्देश अतिशय स्तुत्य आणि स्वाभाविक दिसतो. पण येथे हे लक्षात ठेवले पाहिजे की ज्याप्रकारचा दुःखनाशा येथे अभिप्रेत आहे तो समूळ आणि सदाकरिता दुःखनाश आहे. ‘सदाकरिता’ या शब्दाचा अर्थ नीट लक्षात घेतला पाहिजे. मरणानेही संपूर्ण दुःखनाश होत नाही, कारण मरणानंतर पुनर्जन्म अटळ असतो, आणि जन्म म्हणजे दु:ख. संपूर्ण आणि सदाकरिता दु:खनाद होण्याकरिता पुनर्जन्मापासून सुटका व्हावी लागेल. अशा सुटकेला मोक्ष म्हणतात, आणि मोक्षप्राप्ती हे भारतीय अध्यात्माचे अंतिम साध्य आहे.

तत्त्वज्ञानांचा दुसरा जो प्रकार आहे तो शुद्ध जिज्ञासेने प्रेरित झालेला, अन्य कोणत्याही इच्छेने प्रभावित न होणारा. या प्रकारात आपल्याला अमुकच उत्तर हवे असते असे नसून शुद्ध विमर्शाला जे उत्तर सापडेल ते, मग ते अनुकूल असो की प्रतिकूल, स्वीकारण्याची त्याची तयारी असते. बरेचसे पाश्चात्य तत्त्वज्ञान या प्रकारचे आहे. पश्चिमेतही अध्यात्म आहे, नाही असे नाही. उदा. ज्याला ‘scholastic philosophy’ म्हणतात ते, म्हणजे ख्रिस्ती धर्मावर आधारलेले तत्त्वज्ञान, भारतीय अध्यात्मासारखेच आहे. परंतु निदान आधुनिक काळात, म्हणजे १६ व्या शतकापासून पुढे, पाश्चात्य तत्त्वज्ञानाची उभारणी केवळ तर्काच्या साह्याने, श्रुतींचा हवाला न देता, करण्याचा प्रयत्न झाला आहे. निदान त्या तत्त्वज्ञानाची तशी प्रतिज्ञा आहे, आणि प्रयत्नही बहंदी तसाच झालेला आहे. अध्यात्मशास्त्राचे निष्कर्ष अध्यात्मात आत्म्यासंबंधाने आणि त्याच्या अनुषंगाने जगाची जी माहिती मिळते ती काय आहे? या प्रश्नाचे उत्तर संक्षेपाने देणे सोपे नाही; कारण अध्यात्मे अनेक आहेत, आणि प्रत्येक अध्यात्म इतरांहून थोडीबहुत भिन्न माहिती पुरविते. पण असे असले तरी सर्व अध्यात्मांत समान असलेली काही तत्त्वे आहेत, आणि विशेषतः भारतीय अध्यात्मात बरीच तत्त्वे समान आहेत. त्यांचे थोडक्यात दिग्दर्शन करू.

आत्मा हे तत्त्व शरीराहून सर्वथा भिन्न आहे. शरीर जड किंवा अचेतन असते. परंतु आत्मा चेतन असतो. खरे म्हणजे आत्मा म्हणजे चैतन्यच. सामान्यपणे माणूस जन्मल्यापासून त्याच्या मृत्यूपर्यंत आत्मा शरीराला बांधलेला असतो. परंतु त्याला स्वतंत्र अस्तित्त्वही आहे. शरीराच्या मृत्यूमुळे आत्मा मरत नाही. मृत्यूनंतर तो एक शरीर सोडतो आणि दुसरे शरीर धारण करतो.

या शरीरामुळे आत्म्याला अनेकविध सुखे आणि द:खे अनुभवावी लागतात. मात्र त्यांत सुखांपेक्षा दु:खांचाच भरणा जास्त असतो. त्यामुळे प्रत्येक आत्म्याला शरीरापासून कायम सुटका कशी मिळेल याची विवंचना लागलेली असते. शरीराच्या बंधनातून सुटका होणे याला मोक्ष, कैवल्य, अपवर्ग अशी नावे भिन्न दर्शनांनी दिली असून ही स्थिती प्राप्त करणे हे मानवाचे सर्वोच्च साध्य आहे. ती स्थिती कशी प्राप्त होऊ शकेल हे आपल्याला अध्यात्मशास्त्र सांगते.

याप्रमाणे मानसशाखाला (म्हणजे विज्ञानाला) सर्वथा अप्राप्य अशी बरीच माहिती अध्यात्मशाखात मिळते. ती मनुष्याला अनुकूल आहे, त्याच्या इच्छा-आकांक्षांची पूर्ती करणारी आहे, त्याच्या चिंतेचे, भीतीचे बर्‍याच प्रमाणात निराकरण करणारी आहे, हे सहज लक्षात येईल. मृत्यू ही भानवी जीवनाची समाप्ती नव्हे; इहलोकात आपल्याला मिळू दाकणान्या कोणत्याही गोष्टीपेक्षा अधिक मूल्यवान गोष्टी आपल्याला मरणोत्तरच मिळविता येतात; मात्र त्याकरिता तयारी आणि प्रयत्न मात्र या जीवनातच करावे लागतात, इत्यादि माहिती अध्यात्म देते. त्यामुळे मृत्यूचे भय समूळ नाहीसे न झाले, तरी बन्याच प्रमाणात कमी होते असे म्हणता येईल.

विज्ञान सोडून मनुष्य अध्यात्माकडे का जातो याचा उलगडा असा आहे.

परंतु या ठिकाणी एक प्रश्न विचारावासा वाटतो. अध्यात्म आपल्याला ही जी अतिशय दुर्मिळ आणि महत्वाची माहिती देते तिचा आधार काय आहे? ती माहिती खरी आहे असे मानायला काही प्रमाण आहे काय? मनुष्याचा आत्मा मृत्यूनंतर नष्ट होत नाही, तो अदारीरी अवस्थेत राहू शकतो, आणि तो एक शरीर टाकून दुसन्या शरीरात प्रवेश करतो, त्याचे जनन· मरण असेच अव्याहत चालू राहते याचे कारण त्याला कमांची फळे भोगावी लागतात; परंतु ही जन्ममृत्यूची अनादि परंपरा तत्त्वज्ञानाने भग्न करता येते, आणि त्यायोगे संसारातून (म्हणजे पुनर्जन्मातून) कायमची सुटका होते — हे सारे विश्वसनीय मानायला काही प्रमाण आहे?

या प्रश्नांची उत्तरे या लेखमालेच्या या पूर्वीच्या एकदोन लेखांकांत दिली गेली आहेत. म्हणून येथे मी फक्त त्यांचा संदर्भ देऊन त्रोटक उल्लेख करतो. अध्यात्मशास्त्राची तत्त्वज्ञान मिळविण्याची साधने मुख्यतः दोन आहेत: (१) शब्दप्रमाण किंवा आप्तवचन, आणि (२) साक्षात्कार. ही दोन्ही साधने अनिर्णायक आणि अविश्वसनीय आहेत हे अनुक्रमे लेखांक ७ (ऑक्टोबर २०) आणि लेखांक ४ (जुलै २.०) यांत विस्ताराने दाखविले आहे. ते युक्तिवाद बरोबर असतील तर असे मानायला हरकत नाही की अध्यात्मशास्त्राचे निष्कर्ष निराधार आहेत, निदान शंकास्पद आहेत.

खरी गोष्ट अशी आहे की विज्ञानाजवळ नाही असे कोणतेही ज्ञानसाधन अध्यात्माजवळ किंवा तत्त्वज्ञानाजवळ नाही. मनुष्याला मिळू शकेल असे सर्व ज्ञान प्राप्त करण्याचे उपाय विज्ञानाजवळ आहेत, आणि जो विज्ञानाजवळ नाही असा एकही उपाय अन्य कोणाही जवळ नाही. अध्यात्माला हवे असलेले ज्ञान इंद्रियानुभवाचा आधार सोडल्यावर अध्यात्माला म्हणून अध्यात्म त्या क्षेत्राच्या बाहेर जाते; पण इंद्रियानुभवाचा आधार सोडल्यावर अध्यात्माला विश्वाचे किंवा जगाचे ज्ञान मिळविण्याचे अनुमान हेच एकमेव साधन उरते. आता अनुमान म्हणजे एका ज्ञानावरून दुसरे ज्ञान मिळविण्याची रीत; परंतु पहिले आधारभूत ज्ञान अनुमानाखेरीज अन्य प्रमाणाने (म्हणजे इंद्रियानुभवाने) मिळवावे लागते, आणि ऐंद्रिय ज्ञानावरून अतींद्रिय गोष्टींचे अनुमान करता येत नाही. इंद्रियाभवाचा आधार त्यागल्यामुळे अध्यात्माला स्वैर तर्क करण्यावाचून गत्यंतर नसते. अशा स्वैर तर्काला इंग्लिदाध्येि ‘speculation’ असे नाव असून आपण त्याकरिता ‘वितर्क’ असा शब्द वापरू शकतो. म्हणून सर्व अध्यात्म वितर्कशील असते. वितर्क म्हणजे मोकाट, अनिबंध, निराधार तर्क. अशा तर्काने आपल्याला केवळ कल्पनांखेरीज आणखी काही गिळू शकत नाही. त्या कल्पना आपल्या अदम्य, गाढ इच्छांची पूर्ती करणार्‍या असतील; पण त्या सत्य आहेत असे मानायला काडीइतकेही कारण असणार नाही.

एवढ्या प्रस्तावनेनंतर आता आपण प्रा. श्याम कुळकर्ण्यांच्या पत्राकडे वळू शकतो.

प्रा. कुळकर्ण्यांची विज्ञानाविषयी एक तक्रार अशी आहे की त्याची (म्हणजे विज्ञानाची) उत्तरे अपुरी असतात, आणि अशा कितीतरी गोष्टी आहेत की त्यांचा उलगडा विज्ञान करू शकत नाही. उदा. ते म्हणतात की पृथ्वी गोल आहे हे विज्ञानाने सिद्ध केले आहे, पण ती गोल का आहे या प्रश्नाचे उत्तर ते देऊ शकत नाही. मला या तक्रारीचा चमत्कार वाटला, कारण पृथ्वी गोल का आहे याचे कारण विज्ञान देऊ शकते, एवढेच नव्हे तर विज्ञानाचा पदवीधर नसलेल्या माझ्यासारख्या सामान्य मनुष्यालासुद्धा एक उत्तर सुचते.

पृथ्वी घनरूप होण्याआधी एकाकाळी वायुरूप होती, मग ती द्रवरूप झाली. अशा अवस्थेत ती स्वत:भोवती वेगाने फिरत असल्यामुळे तिला गोलाकार प्राप्त झाला असले पाहिजे असे मला वाटते. पण ते एक असो. प्रा. कुळकर्त्यांनी दुसरे एक उदाहरण दिले आहे. आइनस्टाइनच्या या समीकरणासंबंधी ते म्हणतात ही ‘हे असे का होते यावर मला मात्र त्या (आइनस्टाइनला) यापलीकडे कुठली तरी शक्ती आहे व तिच्याच नियंत्रणाने या गोष्टी घडतात असे म्हणावे लागले. आइनस्टाइनचे नेमके शब्द कोणते होते हे प्रा. कुळकर्त्यांनी उद्धृत केले असते तर बरे झाले असते. त्यांनी तसे करावे अशी मी त्यांना विनंती करतो. तोपर्यंत एक काहीसा वेगळा मुद्दा मी विषद करतो.

विज्ञानात घटनांची आणि घटितांची (phenomena) उपपत्ती (explanation) लावली जाते असे म्हणतात. या उपपत्तीच्या स्वरूपाविषयी काही लोक असे म्हणतात की तिच्यात ‘कसे ?’ (How ?) या प्रश्नाचे उत्तर दिले जाते, ‘का ?’ (Why?) या प्रश्नाचे नाही. हे म्हणणे ‘का’ या शब्दाच्या एका अर्थाविषयी खरे आहे. “का?’ या प्रश्नार्थी क्रियाविशेषणाच्या साह्याने आपण घटनांची कारणे विचारतो, आणि कोणत्याही घटनेचे कारण सांगायचे म्हणजे त्या घटनेपूर्वी नियमपूर्वक घडणारी घटना सांगणे. उदा. पाऊस का पडतो?’ या प्रश्नाचे उत्तर ‘वाफेला थंडी लागल्यामुळे असे दिले जाते; पण हे उत्तर फक्त एवढेच सांगते की जेव्हा जेव्हा वाफेला थंडी लागते तेव्हा तेव्हा तिचे पाण्यात रूपांतर होते असा निसर्गाचा नियम आहे. म्हणजे एखाद्या घटनेचा एका नियमात अंतर्भाव करून, किंवा ती घटना एका नियमाचे उदाहरण आहे हे दाखवून त्या प्रश्नाचे उत्तर दिले गेले आहे. काही विद्वान म्हणतात की हे उत्तर का? या प्रश्नाचे नसून ‘कसे?’ या प्रश्नाचे आहे. कसे?’ म्हणजे कोणत्या परिस्थितीत एखादी घटना घडते. पण मग या विद्वानांना अभिप्रेत का?’ या शब्दाचा अर्थ कोणता? याला त्यांचे उत्तर आहे, ‘का?’ म्हणजे कशाकरिता? काय प्राप्त करण्याकरिता? कोणत्या हेतूने? या अर्थी ‘का?’ प्रश्न विचारणे म्हणजे हेतू किंवा प्रयोजन विचारणे, आता एक अपवाद सोडून दिला तर विज्ञान घटनांचे हेतू किंवा प्रयोजने विचारीत नाही हे खरे आहे. त्याचे कारण निर्जीव अचेतन निसर्गात घटना कसल्यातरी प्रयोजनार्थ किंवा हेतूने घडतात असे कोठेही दिसत नाही. वर उल्लेखलेला अपवाद म्हणजे प्राणि-सृष्टीचा आणि विशेषतः मानवी जीवनाचा. मनुष्यांची कर्मे हेतुपुरस्सर असतात, आणि काही प्रमाणात हे प्राण्यांच्या बाबतीतही खरे आहे. परंतु हे अपवाद सोडून दिले तर विज्ञान विश्वाचे किंवा त्यातील घटकांचे प्रयोजन काय आहे हा प्रश्न विचारत नाही.

आता या अर्थाने विज्ञान ‘का?’ या प्रश्नाचे उत्तर देत नाही हे मान्य केले पाहिजे; आणि कदाचित प्रा. कुळकर्यांना हीच गोष्ट अभिप्रेत असेल. पण तसे असेल तर विज्ञानाची ही प्रवृत्ती सर्वस्वी समर्थनीय आहे असेच म्हणावे लागेल. ‘का?’ या शब्दाचा त्यांना तिसरा एखादा अर्थ अभिप्रेत असल्यास त्यांनी तो सांगावा अशी माझी त्यांना विनंती आहे.

विज्ञान ज्यांची कारणे देऊ शकत नाही अशा आणखीही अनेक गोष्टींचा उल्लेख प्रा. कुळकण्यांनी केला आहे. उदा. ते म्हणतात की एकाच परिस्थितीत लावलेल्या १०० बीजापैकी ५० च उगवतात, आणि ५० उगवत नाहीत. ५० का उगवतात याचे कारण विज्ञान देते, पण ५० च का उगवतात याला मात्र त्याला हात वर करावा लागतो. त्याही पुढे जाऊन तीच ५० का उगवतात हा प्रश्न तर आणखी अवघड आहे. पण हे असे घडते हेच मुळी मला मान्य नाही. सर्व बाबतींत समान असणारी १०० बीज जर सरित्र्याच जमिनीत पेरली, आणि त्या सर्वांना पाणी आणि अन्य गोष्टी सारख्याच मिळाल्या, तर ती सर्व उगवणार यात शंका नाही.

प्रा. कुळकर्णी शंभर फूट खोल दरीत कोसळलेल्या गाडीचे आणि नारा फुटांवरून पृथ्वीवर कोसळणाच्या विमानाचे उदाहरण देतात. अशा अपघातात सर्व प्रवासी मृत्युमुखी पडतात, पण कचित् एखादा बचावतो. तो का बचावतो याचे कारण विज्ञान देऊ टाकत नाही असा प्रा. कुळकर्यांचा दावा आहे. पण हाही दावा व्यर्थ आहे असे मला म्हणायचे आहे. दरीत कोसळलेली बस किंवा पृथ्वीवर कोसळणारे विमान नेमके कसे पडते, त्याची अंतर्गत स्थिती कशी आहे, कोण कुठे बसलेला आहे, गाडी किंवा विमान कोसळल्यामुळे होणार्‍या आघातांपैकी कोणाच्या वाट्याला कोणते येतात, या व इतर अशाच गोष्टींवर कोण जगेल आणि कोण मेरेल हे अवलंबून असते. उदा. दान वाहनांची जेव्हा टक्कर होते तेव्हा पुढच्या आसनांवरील उतारूवर आघात मोठा होतो, त्या मानाने मागच्या आसनावरील उतारूना कमी इजा होते हे स्वाभाविक आहे.

अपघातात सर्व उतारू मरतात, फक्त एक सुखरूप का राहतो याचे कारण विज्ञानाजवळ नाही असे म्हणताना प्रा. कुळकर्ण्यांना उघडच असे सुचवायचे आहे की त्याचे कारण आहे, आणि ते अध्यात्माला ठाऊक आहे. ते म्हणतील की त्या एका उतारूला अतिक शक्तीची मदत असते. पण ही अतिनैसर्गिक शक्ती काय आहे, आणि ती नैसर्गिक घडामोदर प्रभाव कसा पाडते हे ते सांगू शकतील काय ? खरी गोष्ट अशी आहे की अतिनेमगिक शक्तींचा हवाला दणे (उदा. अरक्षितं तिष्ठति दैवरक्षितम्) आणि आपल्याला त्याचे कारण माहीत नाही असे म्हणणे एकच आहे. कारण या अतिनैसर्गिक शक्तीचे कसलेही वर्णन ते देऊ शकणार नाहीत. एखाद्या गोष्टीचे कारण ‘माझे नशीब’, किंवा ‘माझे प्रारब्ध’, किंवा ‘परमेश्वराची इच्छा’ असे म्हणणे म्हणजे तिचे कारण मला माहीत नाही यापक्षा अधिक काही नसते. फक्त आपण काही कारण देतो असा दिलासा मिळतो. ‘परमेश्वराची करणी, नारळात पाणी’ असे म्हणण्यात आपण कसलेही स्पष्टीकरण दिलेले नाही हे आपण लक्षात घेतले पाहिजे. सर्वच गोष्टींचे समान कारण परमेश्वर असेल, तर अमुक घटनेचे कारण परमेश्वर असे म्हणणे किती निरुपयोगी आहे!
प्रा. कुळकर्णी असे म्हणतात की काही असामान्य गोष्टी प्रत्यक्षात अस्तित्वात आहेत, परंतु विवेकवादी किंवा विज्ञान त्यांची उपपत्ती लावू शकत नाहीत. उदा. ज्ञानेश्वरांनी माळाव्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली; परंतु ही गोष्ट कुठल्याच वैज्ञानिक निकषावर बसणार नाही.’ तसेच एखादा मुलगा वयाच्या पाचव्या वर्षीच उत्कृष्ट पियानो वाजवू शकतो, क्वचित् पवादा मुलगा आठव्या वर्षी कठीण गणिती प्रमेये मांडतो. या गोष्टींची उपपत्ती कशी लावायची?

मला वाटते या प्रश्नांचे उत्तर पुढीलप्रमाणे देता येईल. आज आपल्याला मानवी मेंदूची माहिती इतकी थोडी आहे की वरील चमत्कारसदृश घटनांचा उलगडा कसा करायचा हे सांगणे अवघड आहे. पण बुद्धीचे प्रमाण भिर व्यक्तींत भिन्न असते ही गोष्ट सुपरिचित आहे. मंदबुद्धि मुलांपासून आरंभ करून अतिथि प्रतिभावान मुलांपर्यंत बुद्धीचे प्रमाण विखुरलेले असते. हे प्रमाण जेव्हा सामान्य फरकाच्याहून अधिक असते तेव्हा त्याचा आपल्याला चमत्कार वाटतो. नापास होणारी मुले, जेमतेम पास होणारी मुले, बर्‍यापैकी द्वितीय श्रेणीत पास होणारी मुले, प्रथम श्रेणीत येणारी मुले, आणि प्रावीण्य संपादन करणारी मुले इतपत प्रमाणभेद आपल्या परिचयाचे असतात. पण क्वचित् त्याच्यापलीकडे जाणारा म्हणजे प्रतिभावान म्हणता येईल असा मुलगा आपल्या दृष्टीस पडतो तेव्हा तो मात्र विज्ञानाच्या कक्षेत येत नाही असे भाविक सश्रद्ध लोक म्हणतात. पण नित्य अनुभवाला येणार्‍या कमीजास्त प्रमाणाची ती एक थोडी आणखी वरची पायरी आहे असे का मानू नये? आणि प्रतिभावान मुलाच्या बाबतीत आपल्याला परमेश्वरी कृपेचा हात दिसतो, तसा अतिशय मंदबुद्धि, ज्यांना ‘idiots’ म्हणतात अशा मूढ व्यक्तींच्या बाबतीतही दिसतो असे म्हणायचे काय?

प्रा. कुळकर्णी म्हणतात की स्टॅटिस्टिक्सच्या शास्त्रावर आधारलेले हवामानाचे अंदाज चुकतात, पण ते विवेकवाद्याला चालतात, आणि ज्योतिषातील भविष्ये मात्र चालत नाहीत हे चमत्कारिक आहे. परंतु हवामानशास्त्राचे अंदाज स्टॅटिस्टिक्मवर आधारलेले असल्यामुळे ते पूर्ण निश्चित नसतात, ते कमी अधिक संभाव्य असतात हे ते शाखच स्वत: सांगते. शिवाय त्या शास्त्रात सतत सुधारणा होत असून आता त्याची भविष्ये मोठ्या प्रमाणावर खरी होतात असा अनुभव आहे. आपली सर्व वैमानिक सेवा त्या शास्त्रावर अवलंबून आहे हे लक्षात ठेवले पाहिजे. परंतु ज्योतिष्यांची कुंडलीवरून किंवा हस्तरेषांवरून वर्तवलेली भविष्ये कधी खरी ठरली असतील, तर ती योगायोगानेच.

प्रा. कुळकर्णी म्हणतात की अध्यात्म ही विज्ञानाच्या पुढची पायरी आहे. जिथे विज्ञानाची उनके संपतात तिथे अध्यात्माची सुरवात होते. अध्यात्माची म्हणजे कदाची सुरवात होते ? वर वर्णिल्याप्रमाणे अध्यात्म म्हणजे मानवाला अनुकूल असे निष्कर्ष काढण्याचा प्रयत्न, हा प्रयत्न पूर्णपणे निराधार असून तो इच्छापूर्तीच्या (wish-fulfilment) स्वरूपाचा असतो. आध्यात्मिक ज्ञानाची तुलना मी दारुड्याला दिसणाच्या गुलाबी उंदरांशी केली याचा प्रा. कुळकर्यांना धक्का बसला आहे. माझे लिहिणे त्यांना थिल्लरपणाचे वाटलेले दिसते. त्यांच्या भावना दुखावल्या असतील तर मी त्यांची क्षमा मागतो. परंतु माझ्या म्हणण्याचा अर्थ इतकाच होता की दारुड्याला दिसणारे गुलाबी उंदीर जसे कोटेही नसतात, फक्त त्याच्या मनात असतात, तशाच अध्यात्मात अनुभवाला येणार्‍या गोष्टीही केवळ काल्पनिक असतात,
आणि त्यांना वास्तवात अस्तित्व नसते.

अभिप्राय 1

  • ……एकच गोष्ट माझ्यासारख्याला समजते,ती ही की…..
    विज्ञान हे वस्तुनिष्ठ(objective), तर अध्यात्म हे व्यक्तिनिष्ठ.(subjective)….सबंध मानवजातीतील कुणालाही जे ज्ञान त्यांच्या ज्ञानेंद्रियांद्वारे होते,त्याचे वर्णन सारखेच असणार…..कारण विज्ञानाने सिद्ध केले आहे की sense organs are species-specific
    पण प्रत्येकाचा स्वानुभव हा फक्त त्या व्यक्तीपुरताच मर्यादित….. त्याच्या मन/बुद्धि/पूर्व अनुभव आदिंच्या प्रगल्भते नुसार.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.