वा. म. जोशी यांच्या स्त्रीजीवनविषयक चिंतनातील माघार

प्रस्तुत लेखात कै. दा.म. जोशी यांच्या कादंबर्‍यांच्या साह्याने त्यांच्या स्त्रीजीवनविषयक चिंतनाचा आलेख काढण्याचे योजिले आहे. तात्त्विक कादंबर्‍यांचे जनक म्हणून प्रसिद्ध असलेल्या या लेखकाच्या कादंबर्‍यांत त्याच्या तत्त्वचिंतनाचे प्रतिबिंब पडलेले असेल असे मानणे गैर ठरू नये.
जोश्यांच्या कादंबरीलेखनाचा काल १९१५ ते १९.३० असा वीस वर्षांचा आहे. या अवधीत त्यांनी एकूण पाच कादंबर्‍या लिहिल्या. या पाचही कादंबर्‍यांचा विषय प्रामुख्याने एकच — म्हणजे स्त्रीजीवन — आहे. विसाव्या शतकाच्या आरंभी भारतीय समाजजीवनात जे मन्वंतर सुरू झाले होते, त्यातील महाराष्ट्रीय स्त्रीच्या जीवनात निर्माण झालेल्या समस्यांची समीक्षा या कादंबर्‍यांत त्यांनी केलेली आहे. त्यामुळे त्यांच्या स्त्रीजीवनविषयक विचारांचा प्रवास कसकसा होत गेला याची कल्पना या कादंबच्यांवरून येऊ शकते.
या दृष्टीने जोश्यांच्या कादंबर्‍यांचे ओळीने वाचन केल्यास त्यांच्या वैचारिक प्रवासाचा जो आलेख आपल्या मन:पटलावर उमटतो तो आश्चर्यकारक आहे. कारण हा वीस वर्षांचा प्रवास म्हणजे एक आग्र्तन असल्याचे दिसून येते. पहिल्या कादंबरीत जोश्यांनी जेथून प्रवासास आरंभ केला तेथेच ते शेवटच्या कादंबरीत येऊन पोचतात, किंवा वेगळ्या प्रतिमेच्या साह्याने बोलावयाचे तर त्यांचे वीजीवनविषयक चिंतन लंबकाच्या एका पूर्ण आंदोलनाप्रमाणे पुष्कळ मोटा झोका घेऊनही पुन्हा आरंभस्थळी येऊन संपते. पहिल्या कादंबरीपासून तो चवथ्या कादंबरीपर्यंत हे चिंतन एका विशिष्ट (म्हणजे सुधारणावादी) दिशेने सतत पुढे पुढेच जाते. रागिणीत नेमस्त असलेले जोशी आश्रमहरिणी व नलिनी या कादंबर्‍यांत जहाल, ब सुशीलेचा देव मध्ये ज्वलज्जहाल झालेले दिसतात. परंतु त्यानंतर मात्र त्यांच्या चिंतनाला विरुद्ध दिशेकडे एवढा मोठा हेलकावा बसतो की इंदू काळे व सरला भोळे या कादंबरीत ते प्रायः सनातनी झालेले आढळतात.
जोश्यांच्या विचारातील ही माघार मोठी चमत्कारिक आहे. सुधारणेच्या मार्गाने सतत १५ वर्षे पुढेच पाऊल टाकणाच्या या लेखकाने शेवटी संपूर्ण माघार घ्यावी हे दृश्य वाचकाला बुचकळ्यात पाडणारे आहे. हे असे कसे झाले असा कूटप्रश्न ते वाचकाच्या मनात निर्माण करते. या कुटाचा उलगडा करण्याची थोडा प्रयत्न या लेखाच्या शेवटी केला आहे; परंतु त्याचा उद्देश प्रामुख्याने हे आवर्तन सुस्पष्टपणे दाखविणे हाच आहे.
जोश्यांच्या स्त्रीजीवनविषयक चिंतनाने शेवटी अशी पूर्ण माघार का घेतली ह्या कोड्याचा उलगडा करणे कठीण आहे. त्यांच्या जीवनाच्या उत्तरकाली त्यांच्या सान्निध्यात असलेल्या मित्रमंडळींना त्याची कारणे कदाचित माहिती असतील. परंतु ती कोणी लिहून प्रसिद्ध केल्याचे पाहण्यात आलेले नाही. तेव्हा त्यांच्या शेवटच्या कादंबरीच्या साह्याने व त्यांच्या काही ललितेतर लेखांत व्यक्त झालेल्या काही उद्गारांच्या आधारे तर्क करणे एवढेच आपल्याला शक्य आहे. अशा काही संभाव्य कारणांचा उल्लेख करून हा लेख संपवू.
एक स्पष्टीकरण असे असू शकेल की जोश्यांच्या कादंबर्‍यांकडे वास्तववादी दृष्टिकोनातून पाहिल्यास इंदू काळे व सरला भोळेत्यांच्या स्त्रीजीवनविषयक दृष्टीसंबंधी कसलीच समस्या निर्माण करीत नाही. सरला, काशी, इंदू यांच्यासारख्या स्त्रिया तत्कालीन समाजात नव्हत्या असे आपल्याला म्हणता येणार नाही. तेव्हा त्यांचे जोश्यांनी चित्रण केले म्हणून त्याबद्दल आश्चर्य वाटण्याचे काय कारण? किंवा त्याबद्दल त्यांनी माघार घेतली असे त्यांना दूषण देण्याचे तरी काय प्रयोजन? रागिणी, उत्तरा, नलिनी, सुशीला, सरला, इंदू, या साच्या स्त्रिया त्यांना जेव्हा आणि जश्या दिसल्या तेव्हा आणि तश्या त्यांनी त्या चितारल्या. यात माघार किंवा पुढार यांचा संबंधच कोठे येतो?
परंतु हे स्पष्टीकरण चालण्यासारखे नाही. कारण केवळ वास्तववादी कादंबच्या लिहिणे हा जोश्यांच्या कादंबरीलेखनाचा स्वभाव होता असे म्हणता येणार नाही. स्त्रीजीवनातील वर्तमान समस्यांविषयीचे आपले चिंतनच त्यांनी कथानक, पात्रे व संवाद यांच्या द्वारे व्यक्त केले असे मानणेच वस्तुस्थितीस धरून होईल. सुरुवातीला उघडउघड सुधारणावादी असलेले हे चिंतन शेवटी अकस्मात् परंपरावादी झाले असेल तर ते का झाले हा प्रश्न अस्थानी म्हणता येणार नाही, आणि या प्रश्नाचा उलगडा वरील स्पष्टीकरणाने होऊ शकत नाही. शिवाय वास्तववादी दृष्टीने पाहायचे ठरविले तरी सुशीलेचा देव लिहिण्याच्या वेळी सरलेसारख्या खिया नव्हत्या, किंवा आणखी पाच वर्षांनी सुशीलेसारख्या खिया नाहीश्या झाल्या, असेही म्हणता येणार नाही. अर्थात् जोश्यांच्या स्त्रीसृष्टीतील बदल वस्तुस्थितिनिदर्शक नसून त्यांच्या बदललेल्या विचारांचाच द्योतक म्हणावा लागेल.
दुसरी एक उपपत्ती अशी असू शकेल की पहिल्या चार कादंबच्या आणि शेवटची कादंबरी यात जो वैचारिक भेद दिसतो तो केवळ तत्त्व आणि व्यवहार यांच्यातील भेद होय.तात्त्विक भूमिकेवरून एखादी गोष्ट उचित किंवा इष्ट म्हणून स्वीकारली तरी तिचा प्रत्यक्ष आचारात स्वीकार करणे सर्वदा शक्य असतेच असे नाही आणि हेच कदाचित जोश्यांना वरील कादंबर्‍यांतील दृष्टिकोणभिन्नतेतून सुचवायचे असेल. स्त्रीपुरुषांची संपूर्ण समता, पती आणि पत्नी या उभयतांच्या स्वातंत्र्यावर अधिष्ठित असलेले कुटुंब, इत्यादी गोष्टी खचितच उचित आणि अभिलषणीय आहेत, परंतु त्या स्वप्नासारख्या रम्य आहेत व स्वप्नाप्रमाणेच प्रत्यक्ष हस्तगत होण्यासारख्या नाहीत. एखादे ध्येय कितीही उदात्त असले तरी ते आचरिले जाण्याची शक्यता कितपत आहे, मानवी स्वभावाशी ते कितपत सुसंगत आहे, आणि समाजजीवनाच्या वर्तमान चौकटीत ते कितपत बसू शकते, याचाही विचार करावा लागतो आणि पुष्कळदा ते ध्येय व्यवहार्य नाही म्हणून दुसरे एखादे सामान्य, साधे, सुलभ असे ध्येय समाजापुढे ठेवावे लागते. स्त्रियांच्या ध्येयासंबंधाने जोश्यांना कदाचित हेच म्हणावयाचे असेल.
परंतु हेही स्पष्टीकरण समाधानकारक नाही. ध्येय आणि व्यवहार यांची सांगड घालणे ही गोष्ट कठीण खरी, आणि व्यवहारात ध्येयाला मर्यादा घालाव्या लागतात हेही खरे.
परंतु ध्येय आणि व्यवहार यांची पूर्ण फारकत करून चालणार नाही. सुशीलेचा देवमधील ध्येयाकडे जाण्याकरिता इंदू काळे व सरला भोळे मधील व्यवहार उपकारक होऊ शकेल हे सर्वथा अशक्य आहे. प्रत्यक्ष आचरणात ध्येयाला क्वचित मुरड घालूनही ते दृष्टीसमोरून हलू न देता क्रमशः त्याकडे वाटचाल करणे वेगळे, आणि त्याला संपूर्ण विघातक असा आचार करणे वेगळे, तेव्हा जोश्यांना अभिप्रेत असलेला आदर्श पूर्वीच्या कादंबर्‍यांत व्यक्त झाला आहे; आणि त्यांना इष्ट वाटणारा आचार इंदू काळे व सरला भोळेमध्ये व्यक्त झाला आहे, हे म्हणणे विपर्यस्त आहे. ध्येय आणि आचार, आदर्श आणि व्यवहार, याची जगेच भिन्न आहेत, त्यांचा परस्परांशी काहीच संबंध नाही, असेच म्हणावयाचे असल्यास गोष्ट वेगळी!
याप्रमाणे जोश्यांच्या कादंबर्‍यांत व्यक्त झालेल्या विचारांत पडलेल्या तफावतीची उपपत्ती वरील दोन्ही कल्पनांनी लागू शकत नाही. त्यांच्या स्त्रीजीवनाच्या ध्येयातच फरक पडला आहे असे मानण्यावाचून गत्यंतर नाही. या तर्काला जोश्यांच्या ललितेतर लिखाणातही पुरावा आहे. उदा. “स्त्रियांनी आधी घर आणि मग समाज ही वृत्ती सामान्यतः स्वीकारावी, असे माझे मत आहे…स्त्रियांना जातीने प्रत्यक्ष समाजकार्य करणे शक्य नसले तरी अप्रत्यक्ष कार्य करणे पुष्कळ शक्य आहे. पुरुषमंडळीला चांगले जेवावयाला वाढले तर तेदेखील मोठे समाजवर्य होईल… प्रत्यक्ष समाजकार्य करता आले नाही तरी ते कार्य करणे पुरुषांना शक्य करून देणे हे देखील कमी महत्त्वाचे नाही!” “स्त्रियांच्या हक्कासंबंधी प्रश्न या आपल्या भाषणातही ते म्हणतात,“स्त्रियांसंबंधीच्या मोठमोठ्या अपेक्षा तुम्ही सोडून दिल्या एहिजेत.” अर्थात् जोश्यांचे हे मतांतर कसे घडून आले हा प्रश्न शिल्लकच राहतो. मझ्या मते या प्रश्नाचे उत्तर एकच संभवते, आणि ते म्हणजे जोश्यांच्या विचारांना समता आणि स्वातंत्र्य ही ध्येये शेवटपर्यंत पेलता आली नाहीत. त्यांनी या ध्येयाचा पुष्कळ काळपर्यंत समर्थपणे पुरस्कार केला, त्यांच्या आक्षेपकांना वादात अनेकवार निरुत्तर केले, परंतु त्यांचा अखेरपर्यंत पाठपुरावा करण्यास ते असमर्थ ठरले. त्यांच्या विचारांना पुढे मरगळ आली. त्यांची बुद्धी ती तत्त्वे पेलता पेलता श्रांत झाली, त्यांना पूर्ण पचविण्यास असमर्थ ठरली. त्यांची समन्वयवादी प्रवृत्तीही त्यांच्या ध्येयदर्शी प्रतिमेस मारक ठरली असावी. ध्येयव दास समन्वयवादाचे पथ्य मानवत नाही; आणि समन्वय हा तर जोश्यांचा स्थायीभाव होता. सामाजिक मन्वंतराच्या वेळी अपरिहार्यपणे निर्माण होणार्‍या अराजकामुळे त्यांची बुद्धी आंबावली असावी. कोणत्याही सामाजिक ध्येयाच्या सिद्धीकरिता कराव्या लागणाच्या आचारामुळे समाजाची वर्तमान घडी विस्कटते; आणि नवी घडी बसेपर्यंत अराजकाची अवस्था निर्माण होऊन अनेक अनिष्ट प्रवृत्ती बळावतात. अशा अराजकाची चिन्हे प्रस्तुत मन्वंटातही दिसू लागली होती. ती पाहून जोश्यांचे मन शंकित झाले असावे, आणि त्यापेक्षा जुनी व्यवस्था बरी, असे त्यांना वाटले असावे. याचाच अर्थ त्यांची क्रांतदर्शी प्रज्ञा तोकडी पडली असावी. कारण जे खरे क्रांतदर्शी असतात ते अशा तात्कालिक मोडतोडीने किंवा त्यातून आरंभी उद्भवणाच्या अराजकाने डगमगत नाहीत. नव्या मनूचा जन्म वर्तमान मनूचे कवच फोडूनच होऊ शकतो ह्याची त्यांना पूर्ण कल्पना असल्यामुळे ते प्रचलित रूढींच्या विध्वंसाने विचलित होत नाहीत. पण जोशी विचलित झाले. त्यांच्या प्रकृतीलाच हा प्रखर ध्येयवाद मानवला नाही असे दिसते. हेच त्यांच्या वैचारिक माघारीचे रहस्य असेल काय?

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.