विवेकवाद-९

नीतिविचार धर्मविचाराहून निराळा
नवा सुधारकाच्या ऑक्टोबर अंकाच्या मुखपृष्ठावर छापलेल्या आगरकरांच्या उतार्‍याचे शीर्षक आहे,‘नीतिविचार धर्मविचाराहून निराळा’. या विषयावर स्पष्टीकरणात्मक असे काही लिहावयाचा आज विचार आहे.

आजपर्यंत ‘विवेकवाद’ या शीर्षकाचे जे आठ लेख प्रसिद्ध झाले आहेत त्यांसंबंधाने काही चमत्कारिक विचारणा आमच्याकडे केल्या गेल्या आहेत. एक वाचक म्हणाले की तुमच्या विवेकवादात भावनांना काहीच स्थान नाही काय? तुमच्या लेखांवरून आमचा असा समज झाला आहे की तुम्हाला फक्त तर्ककर्कश गोष्टीच मान्य दिसतात. तुमच्या व्यवस्थेत भावनेला काहीच स्थान दिसत नाही. दुसरे एक वाचक म्हणाले की तुम्ही धर्मावर असे तुटून पडला आहात की तुमच्या विवेकवादात केवळ सुखप्राप्तीलाच तेवढे स्थान आहे. ज्याला इंग्लिशमध्ये Hedonism म्हणतात, त्या अतिशय उथळ सुखवादाचा तुम्ही पुरस्कार करता आहात काय अशी आम्हाला शंका येते. तसे असेल तर तुमचा विवेकवाद ‘अणं कृत्वा धृतं पिबेत्’ या जातीचा दिसतो, आणि तो तसा असेल तर त्यात परोपकार, स्वार्थत्याग, देशभक्ती, स्त्रीपुरुषांचे अनन्यप्रेम, कर्तव्यपरायणता, आदि नैतिक गुणांना काहीच स्थान असणार नाही, आणि हे तुमच्या विवेकवादाचे एक मोठे वैगुण्य होईल. हे दोन्ही आक्षेप कशाच्या आधाराने घेतले गेले, त्यांना ‘विवेकवाद’ या लेखमालेतील कोणती विधाने कारणीभूत झाली हे आम्हाला माहीत नाही, आणि या दोन्ही वाचकांनी ते आम्हाला सांगितले नाही. परंतु ज्याअर्थी हे आक्षेप दोन वाचकांच्या मनात उद्भवले त्या अर्थी त्यांना काही आधार असला पाहिजे असे आम्ही गृहीत धरतो, आणि इथे स्पष्ट शब्दांत सांगू इच्छितो की हे दोन्ही आक्षेप पूर्णपणे निराधार आहेत, आणि विवेकवादात त्यांना वस्तुतः मुळीच थारा नाही. एवढेच नव्हे तर या आणि पुढील लेखांकांत याच प्रश्नाची चर्चा करून वाचकांच्या मनांतील शंका दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. त्यांपैकी या लेखांकात आधी धर्म आणि नीती यांचा विचार करू.

धर्म आणि नीती यांचे स्वरूप काय आहे? त्यांचा भेद काय आहे? आणि त्यांचा संबंध काय आहे? या प्रश्नाला एक उत्तर असे आहे की धर्म आणि नीती यांत काही भेद नाही. निदान भेद असला तरी त्यांचा परस्परांशी जिव्हाळ्याचा संबंध आहे, आणि ती परस्परांवाचून अपूर्ण आहेत. उदा. वा.म. जोशी यांचे असे मत होते की धर्मावाचून नीती शक्य असली तरी अशी नीती आचरण्यास अतिशय कठीण आहे. उलट तिला जर धर्माची जोड मिळाली तर ती आचरण्यास सुलभ होते.
अन्य काही लोकांचे असे मत आहे की नीती ही धर्मान स्वतंत्र आहे, एवढेच नव्हे तर धर्माची जोड नीतीला दिली तर ती भ्रष्ट होते. शुद्ध नीतीचा धर्माशी कसलाही संबंध नाही.

या मतांचा आता आपण सविस्तर विचार करू. प्रथम धर्म आणि नीती यांतील भेद काय आहे ते पाहू या. त्याकरिता आपण पुढील दोन प्रश्न विचारू. (१) नीतिहीन मनुष्य धार्मिक असू शकेल काय ? आणि (२) धर्महीन मनुष्य नीतिमान असू शकेल काय?

नीतिहीन मनुष्य धार्मिक असू शकेल काय? या प्रश्नाचे उत्तर उघडच ‘नाही’ असे आहे. ज्या मनुष्याला चांगले आणि वाईट, किंवा पुक्त (right) आणि अयुक्त (wrong) यांची कल्पना नाही, किंवा जो मनुष्य चांगली किंवा युक्त कर्मे करणे आपले कर्तव्य आहे हे मानत नाही असा मनुष्य धार्मिक असू शकत नाही हे स्पष्ट आहे. धर्माच्या आज्ञा सर्व नैतिक असतात, असेच साधारणपणे म्हटले जाते.

पण धर्महीन मनुष्य नीतिमान असू शकतो काय? या प्रश्नाचे उत्तर मात्र होकारार्थी देणारे पुष्कळ लोक निघतील, कोणताही धर्म न मानणारा मनुष्य नीतिमान असू शकतो हे अशी माणसे होऊन गेली आहेत आणि आजही आहेत याने सिद्ध होते. अशा माणसांविषयी ती धर्महीन कशावरून? आणि नीतिमान कशावरून? असे प्रश्न उद्भवू शकतात. पण त्यांना उत्तर देणे कठीण नाही. एखाद्या मनुष्याला धर्महीन म्हणण्याचे काही निकष आहेत, आणि तसेच एखादा मनुष्य नीतिमान आहे असे म्हणण्याचेही काही निकष आहेत, त्या दोन्ही निकषांवर उतरणारी काही माणसे आहेत हे नि:संशय. उदा. समजा एक मनुष्य असा आहे की तो ब्राह्मण आईबापांच्या पोटी जन्मला असूनही स्मृतींनी नेमून दिलेली कोणतीही कर्मे करीत नाही. त्याची मौंज झाली नाही, तो संध्यापूजा करीत नाही, एकादशी-शिवरात्र इत्यादि उपास करीत नाही, श्राद्धपक्षादि पाळत नाही, देवदर्शनाला जात नाही. तर असा माणूस धार्मिक नाही असे आपण निःशंकपणे म्हणू शकतो. आता हा मनुष्य नीतिमान असू शकेल की नाही? समजा हा मनुष्य सत्यवचनी आहे, दिलेली वचने पाळणारा आहे, तो दुसर्‍याच्या दुःखाने व्यथित होतो आणि ते दूर करण्याचा प्रयत्न करतो, तो कधी कोणाला फसवत नाही, कोणाच्या अज्ञानाचा फायदा घेत नाही, स्वार्थाकरिता दुसर्‍याच्या हिताकडे दुर्लक्ष करीत नाही, इत्यादि. तर असा मनुष्य नीतिमान आहे असे आपण नक्कीच म्हणू शकतो. अशी माणसे आजपर्यंत अतिशय थोडीच झाली आहेत हे खरे आहे. पण मुद्दयाची गोष्ट म्हणजे अशी माणसे झाली आहेत, आणि जे एकाने केले ते करू शकणारे अन्यही कोणी असू शकतात.

पण धर्मवादी मनुष्य यावर असे म्हणू शकेल की हा मनुष्य उदा.हिंदुधर्म पाळत नसेल, पण तो दुसरा एखादा धर्म पाळत नसेल कशावरून? धार्मिक असणे म्हणजे विशिष्ट कर्मकांड पाळणे नव्हे. ती एक मनातील आंतरिक वृत्ती आहे. अशी धार्मिक वृत्ती या तथाकथित धर्महीन माणसाची नसेल कशावरून? खरे म्हणजे ती तशी असली पाहिजे, कारण एरव्ही त्याला नीतीने वागण्याची प्रेरणाच झाली नसती. ज्याअर्थी तो धर्माचे कर्मकांड न चिरताही नीतीने वागतो, त्याअर्थी त्याची आंतरिक वृत्ती धार्मिक असली पाहिजे. पण असे म्हणणे म्हणजे धार्मिक वृत्तीशिवाय नीतीची प्रेरणा मिळू शकत नाही असे गृहीत धरणे आहे,

आणि हे खरे आहे काय हाच तर आपल्यापुढील एक प्रश्न आहे, आणि त्याचेच उत्तर देण्याचा आपण प्रयत्न करतो आहोत.

त्याकरिता आपण धर्म आणि नीती यांचे स्वरूप थोडे बारकाईने तपासू या.

प्रथम धर्माचे स्वरूप पाहू. जगात आजपर्यंत शेकडो धर्म होऊन गेले आहेत, आणि आजही डझनभर मोठे धर्म आहेत. त्यापैकी काही खूप प्रगल्भ आहेत, आणि त्यांची खोल तत्त्वज्ञानेही आहेतउदा. हिंदू धर्म किंवा ख्रिस्तीधर्म. परंतु काही धर्म अजून अगदी प्रारंभिक अवस्थेतही आहेत. उदा. भारतीय आदिवासींचे धर्म, किंवा आफ्रिकेतील टोळ्यांचे धर्म, इ. या सर्वांत समान काय आहे ते शोधणे आणि सांगणे हे अतिशय कठीण काम आहे. नुसते प्रगल्भ धर्म घेतले तरी त्यात पाहिजे तितकी भिन्नता आहे. उदा. सर्व धर्म ईश्वर मानीत नाहीत, किंवा आत्माही सर्व धर्मांना मान्य नाही. उदा. बौद्ध धर्म, परंतु असे असले तरी अप्रगल्भ आणि प्रगल्भ सर्वच धर्मात समान असलेली एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अतिनैसर्गिक (supernatural) पारलौकिक अशा एका किंवा अनेक गोष्टींवरील विश्वास. या पारलौकिक पदार्थाच्या अनुरोधाने आपल्या ऐहिक जीवनाला वळण लावणे आणि त्यात आपल्या जीवनाची कृतार्थता मानणे ही गोष्ट सर्व धर्मात समान आहे, असे म्हणायला हरकत नाही. बौद्ध धर्म आत्मा मानीत नसेल किंवा ईश्वर मानीत नसेल; पण त्यास पुनर्जन्म मान्य आहे. शिवाय ऐहिक जीवन निर्भेळ दु:खमय असून त्यापासून सुटका करून घेणे हे आपले सर्वोच्च प्राप्तव्य आहे, आणि ही सुटका इहलोकात मिळत नाही असा विश्वास त्यात आहे. तेव्हा धार्मिक जीवन म्हणजे ऐहिक जीवनाचे उद्दिष्ट किंवा त्याची कृतार्थता इहलोकात शक्य नाही. ती मृत्यूत्तरच प्राप्त होऊ शकते या गोष्टींवर श्रद्धा असणे. हिंदूधर्मानुसार मानवी जीवनाचे सर्वोच्च लक्ष्य म्हणजे मोक्ष, किंवा जन्ममृत्यूच्या साखळीतून कायम सुटका. ही सुटका मिळविण्याचे अनेक उपाय आहेत. त्यापैकी एक आहे तत्त्वज्ञान, आणि दुसरा आहे भक्ती.

तेव्हा धार्मिक जीवनाचा अंतिम उद्देश मोक्ष किंवा ईश्वरप्राप्ती, आता नैतिक जीवनाकडे वळू या. नैतिक जीवनाचे उद्दिष्ट काय आहे? नैतिक जीवनाचे उद्दिष्ट नीती किंवा नीतिमान आचरण. नीती म्हणजे चांगला आचार किंवा सत्कर्म. पण सत्कर्म कशासाठी करायचे? याचे उत्तर आहे, सत्कर्म सत्कर्म आहे म्हणून करायचे, अन्य कोणत्याही हेतूने नाही. अन्य कदाचेही साधन म्हणून ते करायचे नाही. सत्कर्म सत् म्हणजे चांगले आहे म्हणून करणे याचा अर्थ नीती. सत्कर्म सत् आहे याहून ते करण्याचे अधिक श्रेष्ठ कारण असू शकत नाही असे नीतीचे सांगणे आहे. अन्य कोणत्याही कारणाने जर सत्कर्म केले तर ते हिणकस होते, शुद्ध सत्कर्म राहात नाही. स्वतोमूल्य आणि परतोमूल्य या संदर्भात अलीकडे मूल्याची परिभाषा वापरण्याची पद्धत आहे. मूल्य म्हणजे मूल्यवान वस्तू. काही पदार्थ आपण मूल्यवान मानतो, ते प्राप्त करण्याकरिता आपण मोठा त्याग करण्यास, मोठे मोल देण्यास तयार असतो. उदा. आरोग्य, मूल्यवान गोष्टीला नुसतेच मूल्य (value) म्हणण्याचाही प्रघात आहे. उदा. काही लोक ज्ञान हे मूल्य आहे असे मानतात; अन्य काही लोक शक्ती हे मूल्य आहे असे समजतात. आता मूल्यांचे दोन प्रकार आहेत, (१) स्वतोमूल्य (value as end), आणि (२) परतोमूल्य (value as means). एखाद्या गोष्टीचे मूल्य परतोमूल्य आहे म्हणजे तिचे मूल्य तिला ती अन्य कोणत्यातरी गोष्टीचे साधन असल्यामुळे प्राप्त झालेले असते. उदा. नागरित (civilized) समाजात पैशाला मूल्य असते, कारण त्याच्या साह्याने आपण हवे ते बहुतेक सर्व प्राप्त करू शकतो. पैशाला स्वत:चे असे कसलेच मूल्य नसते, हे आपण जर विमान अपघातात सापडून एखाद्या वाळवंटात किंवा जंगलात पडलो तर लक्षात येते. तेथे आपल्या जवळच्या पैशांना कोणी विचारीत नाही असे आपल्या लक्षात येते. तीच गोष्ट औषधांचीही आहे. आपण औषधे मोठी किंमत देऊन आणतो याचे कारण ती आपल्याला आवडतात म्हणून नव्हे, तर त्यांच्या साह्याने आपले आजार बरे होतात म्हणून. म्हणजे औषधांचे मूल्य आरोग्याचे साधन म्हणून आहे. परंतु सर्वच गोष्टींचे मूल्य असे परतोमूल्य किंवा साधनमूल्य असू शकत नाही. ज्याप्रमाणे सर्व पदार्थ परप्रकाशित असू शकत नाहीत, त्याकरिता काही पदार्थ स्वप्रकाशित असावे लागतात, त्याचप्रमाणे सर्व पदार्थ परतोमूल्यवान असू शकत नाहीत, त्याकरिता काही पदार्थ स्वतोमूल्यवान असावे लागतील. जर अचे मूल्य परतोमूल्य असेल, आणि ते त्याला ते बचे साधन आहे म्हणून प्राप्त होत असेल, तर बचे मूल्य स्वतोमूल्य असले पाहिजे; किंवा जर बचे मूल्यही साधनमूल्य असेल, आणि ते कचे साधन आहे म्हणून तिला प्राप्त झाले असेल, तर कचे मूल्य स्वतोमूल्य असावे लागेल. सर्वच मूल्ये साधनमूल्ये असू शकत नाहीत. अ चे मूल्य ब पासून प्राप्त झालेले, ब चे क पासून प्राप्त झालेले, कचे ड पासून … ही परंपरा अनंत असू शकत नाही; ती कोठेतरी अशा पदार्थाशी खंडित व्हावी लागेल की ज्याचे मूल्य त्याचे स्वतःचे आहे, किंवा जो फक्त साध्यच आहे, कशाचेही साधन नव्हे. अशा वस्तूंना स्वतोमूल्यवान वस्तू म्हणतात. त्या स्वयमेव साधु किंवा स्वयमेव चांगल्या (good in themselves) आहेत, किंवा त्या स्वार्थ अभिलषणीय (desirable for their own sake), किंवा स्वार्थ-साध्य (ends in themselves) आहेत, अशा विविध पद्धतींनी त्यांचे वर्णन केले जाते. एखादी गोष्ट साध्य आणि साधन दोन्ही असू शकेल. उदा. पैसा हे साधन आहे हे आपण पाहिलेच आहे. पण तो स्वतः साध्यही आहे, कारण पैसा मिळविण्याकरिता आपल्याला पुष्कळ मेहनत करावी लागते. महागडे शिक्षण घ्यावे लागते, अनेक वर्षे अध्ययन करावे लागते. परंतु एखादी गोष्ट जर केवळ साध्य असेल, ती अन्य कशाचेही साधन नसेल, तर तिला अंतिम साध्य (ultimate end) म्हणतात. उदा. सुख, किंवा संतोष, किंवा समाधान ही गोष्ट अंतिम साध्य आहे, निदान एक अंतिम साध्य आहे असे सामान्यपणे मानले जाईल. नैतिक मूल्य व ननैतिक मूल्य | स्वार्थ चांगली आणि साधन म्हणून चांगली या भेदाप्रमाणेच आणखी एक महत्त्वाचा २. ‘स्वार्थ अभिलषणीय’ या पदबंधातील ‘स्वार्थ’ शब्दाचा अर्थ for itselF, ‘तिच्या स्वत:खातर, तिच्यामुळे मिळणाच्या अन्य कशाखातर नव्हे’ असा आहे. ‘स्वार्थ’ म्हणजे selfishness असा इथे अर्थ नाही.

भेद नैतिक मूल्य (moral value) आणि ननैतिक मूल्य (nonmoral value) यांमधील आहे. उदा. ज्ञान किंवा सुख या गोष्टी स्वतोमूल्यवान आहेत यात शंका नाही. पण जवळ खूप ज्ञान असणे किंवा सुखी असणे म्हणजे नीतिमान असणे नव्हे. एखादा मनुष्य खूप विद्वान असेल, पण आपल्या विद्वत्तेचा उपयोग तो अनैतिक साध्यांच्या प्राप्तीकरिता करीत असेल, तीच गोष्ट सुखी माणसाची. ऐष आरामात लोळणारा माणूस बन्याचे मोठ्या सुखांचा स्वामी असतो. परंतु तेवढ्याने काही तो नीतिमान झाला असे होत नाही. उलट तो अनीतीच्या मार्गांनी सुखप्राप्ती करीत असेल कदाचित्. म्हणजे मूल्य स्वतोमूल्य आहे एवढ्यानेच ते नैतिक मूल्य होत नाही. पण मग नैतिक मूल्य कशात असते ? ते कशाने निर्माण होते ? या प्रश्नाला स्थूल उत्तर असे आहे. नैतिक मूल्य हे मुळात नैतिक ईहेत (good will) असते.

ईहा म्हणजे जिला सामान्यपणे इच्छाशक्ती म्हणतात ती. आपल्या मनाच्या अनेक शक्तींपैकी एक आपल्याला कर्मांना प्रेरणा देणारी शक्तीही आहे. आता चांगली किंवा साधु ईहा म्हणजे आपले कर्तव्य कर्तव्य म्हणून करण्याची ईहा. आपले कर्तव्य कचित् आपल्याला आवडणारे असेल, आणि असे असेल तर ते कर्तव्य आपण आवडीने करू, अशा कर्मात नैतिक मूल्य असणार नाही. तेव्हा कर्तव्य करणे आणि कर्तव्य कर्तव्याखातर करणे यात फरक आहे. या दोहोंपैकी दुसच्या प्रकारच्या कर्मातच साधु ईहा व्यक्त होते. कर्तव्य असलेले कर्म आपल्या फायद्याचेही असू शकेल, किंवा ते आपल्याला आवडणारे असू शकेल. अशा परिस्थितीत आपण करीत असलेले कर्म कर्तव्य असून देखील, ते कर्तव्याखातर म्हणजे कर्तव्यबुद्धीने न करता, ते अन्य हेतूंनी किंवा अन्य कारणास्तव केले तर त्यात नैतिक मूल्य नसते, निदान ते त्यात असले तरी ते शुद्ध नैतिक मूल्य असू शकत नाही. नैतिक मूल्य याप्रमाणे कर्तव्यबुद्धीत किंवा सदीहेत (सत् + ईहा) मुळात असते. तिथून ते अशी सदीहा ज्या मनुष्याजवळ असेल त्या मनुष्यात, त्याच्या शीलात, आणि त्या बुद्धीने केलेल्या कर्मातही अवतरते.

ननैतिक मूल्यांची गोष्ट वेगळी आहे. सुख, ज्ञान, कलास्वाद, मनुष्यांची मैत्री इत्यादि गोष्टी स्वतोमूल्यवान आहेत असे सामान्यपणे मानले जाते. पण ही मूल्ये नैतिक मूल्यांहून भिन्न आहेत. केवळ ही ननैतिक मूल्ये जीवनात असल्याने ते नीतिमान होत नाही. ते जीवन मूल्यवान असेल, स्वतोमूल्यवान असेल; पण ते नैतिकमूल्यवान नसेल. एखादा मनुष्य आपली कर्तव्ये नाकारून सुख, ज्ञान, कलास्वाद, मैत्री इत्यादि ननैतिक मूल्यांतच रमत असेल, तर त्याच्या जीवनाचे नैतिक मूल्य त्यात साधु ईहा फारशी व्यक्त होत नसल्यामुळे फारच अल्प, शून्यप्रायही असू शकेल.

धार्मिक जीवन नैतिक असते काय?
धार्मिक जीवन नैतिक असते असे म्हटले जाते. त्या मुद्दयाकडे आता वळू. धर्माच्या शिकवणीनुसार मनुष्याचे सर्वोच्च साध्य म्हणजे मोक्ष हे आपण पाहिले. म्हणून धार्मिक कर्मे म्हणजे मोक्षप्रद कर्मे, धर्माने सांगितलेली कर्मे केल्याने आपल्याला मृत्यूनंतर सद्गती मिळते असे धर्माचे सांगणे आहे. आता ही कर्मे कोणती आहेत ? याचे एक उत्तर असे दिले जाते की ही कर्मे बहुधा ज्यांना आपण नैतिक कर्मे म्हणतो त्या प्रकारचीच असतात.

उदा. खरे बोलावे, अहिंसा पाळावी, इतरांस मदत करावी, इत्यादि विधी (विधी म्हणजे आपण अमुक कर्म करावे असे सांगणारी वाक्ये) जसे धर्माचे आहेत तसेच ते नीतीचेही आहेत. त्यामुळे धार्मिक मनुष्य नीतिमान असतो असे आपण म्हणू शकतो असा दावा धार्मिकांकडून केला जातो. परंतु हे म्हणणे केवळ अंशत:च खरे आहे, आणि त्या दोन प्रकारच्या कर्मात अतिशय महत्त्वाचे भेद आहेत.
(१) पहिला आणि सर्वांत महत्त्वाचा भेद असा आहे की धार्मिक कर्माचा हेतू स्वार्थी आहे, कारण ती कर्मे स्वत:च्या मोक्षासाठी करावयाची असतात. म्हणजे ती कर्मे चांगली आहेत किंवा युक्त आहेत म्हणून करायची नसून ती केल्याने आपल्याला मरणोत्तर सद्गती किंवा मोक्ष प्राप्त होतो म्हणून करायची असतात. नैतिक कर्मीची गोष्ट यांहून अगदी वेगळी आहे. ती कर्तव्ये आहेत याचे कारण त्यांच्यामुळे स्वतोमूल्यवान गोष्टी (उदा. सुख) निर्माण होतात, आणि ती कर्तव्ये कर्तव्यबुद्धीने करावयाची असतात. धार्मिक कर्तव्ये केल्याने आपल्याला वैयक्तिक लाभ होतो, आपल्याला सद्गती मिळते हे ती कर्मे करण्याचे फळ असते, आणि या फळाकरिता (म्हणजे मुक्तीकरिता) आपण सर्व धडपड करावयाची असते. नीतिमान मनुष्याला कर्तव्य केल्याचे समाधान मिळते एवढा एकच लाभ होतो. त्यापलीकडे त्याला कसलीही अभिलाषा नसते, आणि त्याहून अधिक त्याला काही मिळतही नाही.
आता हे खरे आहे की भगवद्गीता आपल्याला सांगते की फलाशा सोडून कर्मे करा. ही शिकवण व कर्तव्य कर्तव्यार्थ करा ही नीतीची शिकवण एकच आहेत असे काही लोक म्हणतात. पण त्या दोहोंत फार मोठा भेद आहे. फलाशा सोडून कर्मे करा, आपल्या कर्माची फळे परमेश्वराला अर्पण करा, असे सांगताना गीता असे कोठेही सांगत नाही की मोक्षाची इच्छा करू नका. उलट मोक्षप्राप्तीसाठी कर्मे करा अशीच गीतेची शिकवण आहे. ज्या फळांचा त्याग करायचा आहे ती फळे म्हणजे कर्मांची लौकिक फळे. उदा. युद्धातील जय-पराजय, परीक्षेतील यशापयश इ. त्यामुळे कर्मे करण्याचा धर्माने पुरस्कारलेला हेतू आणि नीतीने पुरस्कारलेला हेतू अतिशय भिन्न आहेत, आणि त्यांपैकी धार्मिक कर्माचा हेतू स्वत:चा मोक्ष असल्यामुळे तो वैयक्तिक स्वार्थामध्ये जमा आहे. हा हेतू फार उदात्त आहे असे म्हणता येणार नाही. म्हणून धार्मिक आचरण नैतिक आचरण नव्हे, एवढेच नव्हे तर ते नैतिक आचरणाहून फारच हिणकस असते हे मान्य करावे लागेल.
(२) धर्मविहित कर्मे आणि नीतिविहित कर्मे पुष्कळदा एकच असतात याविषयी वर विवेचन केले आहे. पण धर्माने सांगितलेली कर्मे बहुतेक ननैतिक असतात हे आपण लक्षात घेतले पाहिजे. यज्ञादीतील कर्मकांड अगदी निरर्थक असून ते यज्ञाच्या अतिनैसर्गिक शक्तीवरील अंधविश्वासाने प्रेरित झालेले असते. यज्ञाने पाऊस पडतो, किंवा यज्ञाने आपल्याला इष्टप्राप्ती होते ह्या गोष्टी पूर्णपणे खोट्या आहेत हे आज विस्ताराने दाखविण्याची गरज नाही. कोणी असे म्हणतील की प्राचीन यज्ञाचे स्वरूप तुम्ही म्हणता तसे असेल; पण यज्ञाचे सुधारलेले स्वरूप आपल्याला गीतेत पाहायला मिळते. पण सुधारलेल्या स्वरूपातही यज्ञक्रियांचे (म्हणजे प्रार्थनादिकांचे) निरर्थकत्व आणि ननैतिकत्व दूर झालेले नाही. प्रार्थनांनी थोडेबहुत मानसिक समाधान मिळत असेल; पण त्या सफल झाल्याच तर केवळ योगायोगानेच होतात हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे.
(३) पण नीतीला संमत कर्तव्ये कोणती आहेत ? ते ठरविण्याचा उपाय आहे काय?
या ठिकाणी या विषयात काहीशी संदिग्धता आणि विवाद आहेत हे मान्य ले पाहिजे. पण त्यातही काही गोष्टी निर्विवाद आहेत हेही खरे आहे. कांट नावाचा थोर नीतिमीमांसक अठराव्या शतकात होऊन गेला. त्याने कर्तव्याची किंवा युक्त (right) कर्माची आवश्यक अट सांगितली आहे. ती अट म्हणजे अशी की जर एखाद्या परिस्थितीत एखादे कर्म माझे कर्तव्य असेल तर ते तशा परिस्थितीत असलेल्या कोणत्याही मनुष्याचे कर्तव्य असावे लागेल. एखादा मनुष्य जर म्हणू लागला की या परिस्थितीत मी हे कर्म करणे युक्त आहे, पण त्याच परिस्थितीत असणाच्या अन्य कोणी ते कर्म करणे मात्र अयुक्त आहे, तर तो नीतीच्या या प्राथमिक नियमाचा भंग करतो आहे असे खुशाल समजावे. नीतीच्या आज्ञा सार्विक असतात, म्हणजे त्या कोणा एका व्यक्तीला उद्देशून केलेल्या नसतात, तर त्या यच्चयावत् मनुष्यांना केलेल्या असतात. म्हणून कांट म्हणतो की आचरणाचा जो नियम सर्व मनुष्यांचा आचरणाचा नियम होऊ शकतो तोच नियम नैतिक नियम आहे असे समजावे. ह्या अटीला सार्विकीकरणाची (universalisation) अट म्हणतात. ही अट कर्तव्याची आवश्यक अट आहे असे म्हणण्याचा अर्थ असा की जर एखाद्या कर्माने ही अट पुरी झाली नाही तर ते कर्म कर्तव्य होणार नाही. पण ही अट पर्याप्त अट नाही, कारण एखादे कर्म कर्तव्य ठरण्यास ह्या एका अटीचे पालन पुरेसे होत नाही. कर्तव्याची पर्याप्त अट म्हणजे अशी अट की जी पुरी झाली तर एखादे कर्म कर्तव्य आहे हे सिद्ध होते. याचा अर्थ असा की सार्तिकीकरणाच्या निकषाने कोणते कर्म कर्तव्य नाही ते कळते.

गेल्या शतकात होऊन गेलेल्या सिविक या प्रसिद्ध उपयोगितावादी (Utilitarian) नीतिमीमांसकाने हीच गोष्ट काहीशा वेगळ्या भाषेत व्यक्त केली आहे. त्याने अपक्षपातित्वाचे तत्त्व म्हणून एक सिद्धांत प्रतिपादला आहे. त्याचे प्रतिपादन असे आहे की जर कोणी एखादे कर्म आपण करणे युक्त आहे असे ठरविले, तर त्याने अभिप्रायाने हेही ठरविले असते की ते कर्म त्यासारख्या परिस्थितीत असलेल्या त्यासारख्या कोणाही व्यक्तींनी करणे युक्त होईल. किंवा हीच गोष्ट अशीही व्यक्त करता येते की जर एखादे कर्म मी करणे युक्त असेल, परंतु अन्य कोणी करणे अयुक्त असेल, तर याचे कारण तो आणि मी भिन्न व्यक्ती आहोत या गोष्टीखेरीज त्या दोन प्रकरणांत आणखी काहीतरी भेद असला पाहिजे.
(अपूर्ण)

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.