विवाह आणि नीती (भाग ८)

लैंगिक ज्ञानावर प्रतिषेध (Taboo)
(उत्तरार्ध)

या प्रकरणात मी लैंगिक आचार कसा असावा याचा विचार करीत नसून, लैंगिक विषयांच्या ज्ञानासंबंधी आपली अभिवृत्ती (attitude) काय असावी याचा विचार करतो आहे. अल्पवयीन मुलांना लिंगविषयक ज्ञान देण्याच्या संबंधात आतापर्यंत मी जे म्हटले त्यास सर्व प्रबुद्ध आधुनिक शिक्षणतज्ज्ञांची सहानुभूती माझ्या बाजूने आहे अशी मला आशा आणि विश्वासही आहे. परंतु आता मी एका अधिक विवाद्य मुद्दयाकडे येतो आहे, आणि त्याविषयी वाचकाची सहानुभूती प्राप्त करण्यात मला अधिक अडचण येईल अशी मला भीती वाटते. हा विषय म्हणजे अश्लील साहित्याचा.

इंग्लंड आणि अमेरिका दोन्ही देशांत जे साहित्य अश्लील मानले जाईल ते काही परिस्थितीत नष्ट करण्यात यावे, आणि त्याचा लेखक व प्रकाशक दोघांनाही शिक्षा व्हावी असे तेथील कायदा म्हणतो. इंग्लंडमध्ये ज्या कायद्यान्वये हे केले जाऊ शकते तो कायदा म्हणजे लॉर्ड कैंपबेल्चा कायदा (१८५७). हा कायदा असे म्हणतो की कोणी तक्रार केल्यास जर असे मानण्यास कारण असेल की एखाद्या घरात किंवा अन्य ठिकाणी, विक्रीकरिता किंवा वाटण्याकरिता, अश्लील पुस्तके इत्यादि ठेवली आहेत, आणि अशा प्रकारची एक किंवा अधिक वस्तू त्या ठिकाणाहून विकली किंवा वाटली गेली आहे हे सिद्ध झाले, तर, त्या वस्तूंचे स्वरूप आणि वर्णन असे आहे की त्यांचे प्रकाशन करणे गुन्हा होईल आणि त्यावर खटला करता येईल अशी खात्री झाल्यावर न्यायमूर्ती हुकूम काढू शकतील की त्या वस्तू जप्त कराव्यात; आणि त्या घरात राहणाच्या मनुष्यास बोलावून ते किंवा अन्य न्यायमूर्ती जप्त केलेल्या वस्तू वॉरंटमध्ये लिहिलेल्या वर्णनाच्या आहेत आणि त्या वर सांगितलेल्या उद्देशाने तेथे ठेवण्यात आल्या आहेत याबद्दल खातरजमा करून त्या नष्ट केल्या जाव्यात असा हुकूम देऊ शकतात.
या कायद्यात आलेल्या ‘अश्लील’ या शब्दाची कोणतीही काटेकोर व्याख्या नाही. प्रत्यक्ष व्यवहारात जर दंडाधिकार्‍याला एखादे प्रकाशन कायद्याच्या दृष्टीने अश्लील वाटले, तर ते अश्लील ठरते, आणि जरी प्रकाशित मजकूर एरव्ही अश्लील मानला जावा असा असला तरी प्रस्तुत प्रकरणी मात्र त्याने काही उपयुक्त उद्देश सफल होतो असे दाखविणारा कसलाही पुरावा ऐकण्यास तो बांधलेला नसतो. याचा अर्थ असा की लैंगिक विषयासंबंधीच्या कायद्यात सुधारणा सुचविणारी कादंबरी किंवा समाजशास्त्रीय प्रबंध यांच्या लेखकांचे लिखाण जर एखाद्या वृद्ध मनुष्यास अरुचिकारक वाटले तर ते नष्ट केले जाण्याची भीती आहे. हॅवलॉक् एलिसच्या Studies in the Psychology of Sex या ग्रंथाचा पहिला खंड दंडच ठरविला गेला होता; परंतु सुदैवाने या प्रकरणी अमेरिका अधिक उदारमतवादी सिद्ध झाली हे सुविदित आहे. हॅवलॉक् एलिसचा उद्देश अनैतिक होता असे कोणी म्हणेल असे मला वाटत नाही, आणि तो प्रचंड, विद्वत्तापूर्ण आणि गंभीर ग्रंथ कोणी केवळ अश्लील वाचनाचे रोमांच अनुभवण्याकरिता वाचील हे मला अतिशय असंभाव्य वाटते. अर्थातच या विषयावर लिहिताना अशा गोष्टींची चर्चा केल्याशिवाय चालणार नाही की ज्यांचा उल्लेख सामान्य दंडाधिकारी आपली पत्नी किंवा कन्या यांच्यासमोर करणार नाही; परंतु अशा पुस्तकाच्या प्रकाशनाला बंदी करणे म्हणजे या क्षेत्रातील वास्तवे जाणून घेण्यास जिज्ञासूंना मज्जाव करणे होय. सनातनी दृष्टिकोणातून पाहिल्यास हॅवलॉक एलिसच्या कामगिरीतील सर्वात आक्षेपार्ह गोष्ट म्हणजे त्याने गोळा केलेले प्रकरणांचे इतिहास (case histories); कारण वर्तमान रीती (आणि उपाय) नीती किंवा मानसिक आरोग्य निर्माण करण्यात केवढ्या मोठ्या प्रमाणात अपेकशी होत आहेत हे त्यांच्यावरून स्पष्ट होते. लैंगिक शिक्षणाच्या वर्तमान पद्धतींविषयी विवेकी निर्णय देण्याकरिता आवश्यक पुरावा हे इतिहास पुरवितात. परंतु कायदा असे जाहीर करतो की असा पुरावा कोणाला मिळता कामा नये, आणि या क्षेत्रातील आपले निर्णय पूर्णपणे अज्ञानावर आधारलेले राहावेत.

Well of Lonliness या पुस्तकाला झालेल्या शिक्षेने सरकारी तपासणीचे (censorship) आणखी एक अंग ठळकपणे पुढे आले आहे. ते म्हणजे समलिंगी संभोगाचा विषय कथाकांदबन्यांतून हाताळणे बेकायदा आहे. युरोपीय देशातील कायदा इंग्लंडपेक्षा कमी सत्यशोधविरोधी (obscurantist) आहे, आणि तेथील अभ्यासकांनी समलिंगी संभोगाविषयी खूप माहिती गोळा केली आहे. पण ही माहिती इंग्लंडमध्ये विद्वानांच्या भाषेत किंवा कल्पित साहित्याच्या स्वरूपात प्रकट करण्यास बंदी आहे. पुरुषांमधील समलिंगी संभोग इंग्लंडमध्ये बेकायदा आहे, खियांमधील नाही, आणि हा कायदा बदलण्याकरिता अश्लीलतेच्या कायद्यानुसार बेकायदा होणार नाही असा युक्तिवाद मांडणे अतिशय कठीण आहे. आणि तरी ज्याने या विषयाचा अभ्यास केला आहे अशा प्रत्येक माणसाला हे माहीत आहे की या बाबतीतील कायदा अशा रानटी आणि अज्ञ अंधविश्वासाचा परिणाम आहे की ज्याच्या समर्थनार्थ कसलाही विवेकी युक्तिवाद करणे अशक्य आहे. याच प्रकारचे विचार रक्ताचे नातेसंबंध असलेल्यांच्या निषिद्ध लैंगिक संबंधांनाही (incest) लागू आहेत. अशा प्रकारचे काही संबंध गुन्हा ठरविणारा एक नवीन कायदा काही वर्षांपूर्वी पास करण्यात आला; परंतु लॉर्ड कॅप्डेलच्या कायद्यान्वये या कायद्याच्या बाजूने किंवा विरुद्ध कसाही युक्तिवाद करणे हे बेकायदेशीर आहे. त्यातून सुटण्याकरिता युक्तिवादाची रचना इतक्या अवकृष्ट (abstract) स्वरूपात करावी लागेल, की त्यात त्याचा सारा जोरच नाहीसा होईल.

लॉर्ड कैंपबेलच्या कायद्याचा आणखी एक लक्षणीय परिणाम असा आहे की अनेक विषयांची चर्चा जे फक्त उच्चविद्या शिकलेले लोकच समजू शकतील अशा दीर्घ पारिभाषिक शब्दांत करण्याची परवानगी आहे, पण जे लोकांना अवगत असतील अशा भाषेत उच्चारण्याची सोय नाही. काही खबरदारी घेऊन रतिकर्माविषयी बोलणे मुद्रित केले जाऊ शकते, पण त्यांकरिता त्या क्रियेचा वाचक सर्वांना परिचित असा २. पहिल्या खंडावर खटला झाल्यामुळे या ग्रंथाचे उरलेले खंड इंग्लंडमध्ये प्रकाशित झाले नाहीत.

छोटा शब्द वापरण्याला परवानगी नाही. हे अलीकडेच Sleeveless Errand या पुरतकातील खटल्यात ठरविले गेले आहे. पुष्कळदा साध्या भाषेवरील हया निबंधाचे गंभीर परिणाम होतात. उदा. श्रीमती सँगरची कामकरी स्त्रियांना उद्देशून लिहिलेली संततिनियमनावरील पुस्तिका कामकरी बायांना ती समजू शकते या कारणावरून अश्लील ठरावली गेली. डॉ.मारी स्टोप्सची पुस्तके बेकायदा नाहीत, कारण त्यांची भाषा थोड्याबहुत सुशिक्षित लोकांनाच कळू शकते. याचा परिणाम असा होतो की सुखवस्तु लोकांना पुस्तकांच्या साहाय्याने संततिनियमन शिकविण्याची परवानगी आहे, परंतु तेच कामकरी वर्गातील स्त्रियांना शिकविणे गुन्हा होतो. ही गोष्ट मी। सुप्रजाशास्त्रीय (Eugenic) मंडळाच्या नजरेस आणतो, कारण ही मंडळी सतत अशी तक्रार करतात की कामगारवर्गात जननप्रमाण मध्यमवर्गीयांपेक्षा जास्त आहे; पण या वस्तुस्थितीला कारण असणारा कायदा बदलण्याच्या प्रयत्नापासून ते कटाक्षाने दूर राहतात.

अश्लील प्रकाशनाविरुद्धच्या कायद्याचे परिणाम शोचनीय आहेत याविषयी अनेक लोकांचे एकमत होईल, परंतु तरीही ते असे प्रतिपादतील की असा कायदा असणे आवश्यक आहे. अश्लीलताविरोधी कायद्याचे ज्यायोगे अनिष्ट परिणाम होणार नाहीत अशा त-हेने त्याचे ग्रथन करणे शक्य आहे असे मला वाटत नाही, आणि म्हणून या बाबतीत कसलाही कायदा असू नये असे माझे मत आहे. या माझ्या भूमिकेला अनुकूल युक्तिवाद दुहेरी आहे. एकतर मनाई करणारा कोणताही कायदा अनिष्टाबरोबर इष्टालाही मनाई केल्याशिवाय राहत नाही, आणि दुसरे म्हणजे जर लैंगिक शिक्षण विवेकीपणाने दिले, तर नि:संशय आणि उघडउघड अश्लील असणारी पुस्तकेही फारच थोडा अपाय करू शकतील.

वरील दोन मतांपैकी पहिल्याची लॉर्ड कॅपबेलच्या कायद्याच्या इंग्लंडमध्ये झालेल्या वापराने भर दूर सिद्धी झाली आहे. त्या कायद्याविषयी जे वाद झाले ते वाचून पाहणाच्या कोणाच्याही हे लक्षात येईल की लॉर्ड कैंपबेलच्या कायद्याचा उद्देश केवळ अश्लील लिखाण दडपून टाकणे एवढाच होता, आणि त्यावेळी असे मानले जाई की तो कायदा अशा रीतीने शब्दबद्ध केला गेला आहे की त्याचा अन्य कुठल्याही प्रकारच्या साहित्याविरुद्ध वापर करणे अशक्य आहे. परंतु हा विश्वास पोलिसांची हुषारी आणि दंडाधिकारचा मूढपणा यांच्याविषयीच्या अपुर्‍या ज्ञानावर आधारलेला होता. पुस्तक तपासणी (censorship) हा विषय मॉरिस एन्टै अणि वुइल्यम सीगल या दोघांनी लिहिलेल्या T० the Pure (व्हाइकिंग प्रेस, १९२८) या पुस्तकात अतिशय उत्तम तहेने हाताळला गेला आहे. ते ब्रिटन आणि अमेरिका दोन्ही ठिकाणचे अनुभव लक्षात घेतात आणि तसाच अन्यत्र आलेल्या अनुभवांचाही काहीशा संक्षेपाने विचार करतात. अनुभवावरून, विशेषत: इंग्लंडमधील नाट्यतपासणीच्या अनुभवावरून, असे दिसते की कामोत्तेजक चिल्लर नाटके तपासनिसाच्या नजरेतून सुटतात, कारण आपल्याल कोणी फाजील सोवळे समजू नये असे त्याला वाटत असते; परंतु Mrs Warren’s Profession सारखी मोठ्या समस्या मांडणारी गंभीर नाटके अनेक वर्षे अडविली तात, आणि ज्यात सेंट अँन्टनीमध्येही कामेच्छा जागृत करील असा एक शब्दही नाही अशा The Cenciया नितांतसुंदर नाटकाला मात्र लॉर्ड चेंबरलेनच्या मर्द हृदयात त्याने जी घृणा निर्माण केली तिच्यावर मात करण्याकरिता शंभर वर्षे वाट पाहावी लागली. म्हणून आपण भरीव ऐतिहासिक पुराव्याच्या आधारावर असे म्हणू शकतो की सरकारी तपासणी गंभीर कलात्मक आणि वैज्ञानिक लिखाणाविरुद्ध वापरली जाईल, परंतु ज्यांचा हेतू केवळ कामुक लिखाण करणे एवढाच असतो असे लोक मात्र कायद्याच्या कचाट्यातून सुटून जातील.

परंतु सरकारी तपासणीला आक्षेप घेण्याला आणखी एक कारण आहे, आणि ते म्हणजे असे की सरळ कामवर्णने देखील, जर ती उघड आणि निर्लज्जपणे केली असतील तर, फारशी अपायकारक होत नाहीत, पण चोरटेपणा आणि गुप्तता यांच्यामुळे रंजक झालेली कामवर्णने फार अपाय करतात. कायदा असूनही जवळपास प्रत्येक सुखवस्तु मनुष्याने कुमारावस्थेत अश्लील फोटो पाहिलेले असतात, आणि ते प्राप्त करणे कठीण असल्यामुळे एकदा ते मिळविल्यानंतर ते त्याचा अभिमान बाळगतात. रूढिप्रिय लोकांचे मत असे असते की अशा गोष्टींनी इतरांना अतिशय अपाय होतो, पण आपल्याला अपाय झाला हे मान्य करायला क्वचितच कोणी तयार असतो. त्यांनी कामेच्छा जागृत होते हे नि:संशय, पण कोणत्याही धडधाकट पुरुषात ती या नाही तर त्या कारणाने मधून मधून जागृत होणारच. त्याला हा अनुभव किती वारंवार येतो ही गोष्ट त्याच्या शारीरिक प्रकृतीवर अवलंबून असते, परंतु त्याची निमित्ते त्याच्या अंगवळणी पडलेल्या सामाजिक व्यवस्थेवर अवलंबून असतात. व्हिक्टोरियन काळाच्या आरंभी एखाद्या स्त्रीच्या पायाचे घोटे दिसणे हे पुरेसे उद्दीपक होते; परंतु आधुनिक मनुष्य मांडीपर्यंत कशानेही विचलित होत नाही. हा केवळ कपड्यातील फॅयानचा प्रश्न आहे. जर नग्नता ही फॅशन असती तर तिनेही आपण अविचलित राहिले असतो, आणि मग लैंगिक दृष्ट्या आकर्षक दिसण्याकरिता स्त्रियांना कपडे घालावे लागले असते. असे अनेक वन्य समाजात प्रत्यक्ष घडते. साहित्य आणि चित्रे यांनाही हीच गोष्ट लागू पडते. जे व्हिक्टोरियन कोळी उत्तेजक होते त्याने आजच्या अधिक मोकळया युगातील पुरुष अविचलित राहतात. अश्लील साहित्याचे जे आकर्षण आहे त्याच्या नऊ-दशांशाचे कारण नीतिमार्तंडांनी लैंगिक विषयासंबंधी मुलांच्या मनांत भरविलेल्या अयोग्य भावना असतात; उरलेला एकदशांश शारीर असतो, आणि कायदा काहीही असला तरी तो या ना त्या प्रकाराने व्यक्त झाल्याशिवाय राहत नाही. या सर्व कारणांस्तव माझे असे पक्के मत झाले आहे की अश्लील साहित्याच्या प्रकाशनासंबंधी कसलाही कायदा असू नये. परंतु फारच थोडे लोक माझ्या या मताशी सहमत होतील अशी मला भीती वाटते.

नग्नतेवरील निर्बध हा लैंगिक विषयासंबंधी निरोगी अभिवृत्ती (attitude) निर्माण होण्याच्या मार्गातील मोठा अडथळा आहे. बालकांच्या बाबतीत ही गोष्ट आजकाल बच्याच लोकांना पटली आहे. बालकांनी परस्परांना आणि आपल्या मातापित्यांना, जेव्हा ते नैसर्गिकपणे घडेल तेव्हा, विवख पाहणे हितकर आहे. बहुधा वयाच्या तिसर्‍या वर्षांत असा एक छोटासा कालखंड येईल की जेव्हा बालकाला आपले वडील आणि आई यांच्यातील भेदात कुतूहल असते, आणि ते त्याची तुलना आपण स्वतः आणि आपली बहीण यांच्यातील भेदाशी करते, पण हा कालखंड लवकरच संपतो, आणि त्यानंतर त्याच्या ठिकाणी नग्नता आणि कपडे यासंबंधी सारखाच कुतूहलाचा अभाव निर्माण होतो. जोपर्यंत मातापिता विवस्त्र दिसण्यास नाखूष असतील तोपर्यंत मुलांना त्यात काही तरी गुह्य आहे असे अनिवार्यपणे वाटेल, आणि मग ती चाबट आणि फाजील होतील. चावटपणा आणि फाजीलपणा टाळण्याचा एकच उपाय आहे, आणि तो म्हणजे गुह्यता टाळणे.

उचित परिस्थितीत नग्न राहण्याची अनेक कारणे आरोग्याशी संबद्ध आणि महत्त्वाचीही आहेत. उदा. उन्हे असताना घराबाहेर, अनावृत कातडीवर सूर्यप्रकाशाचा अतिशय आरोग्यकारी परिणाम होतो. तसेच ज्याने बालकांना उघड्या हवेत नग्नावस्थेत बागडताना पाहिले असेल त्याच्या हे लक्षात आले असेल की ती कपडे घालून हिंडू फिरू शकतात त्याहून अधिक मोकळेपणाने नग्नावस्थेत हालचाली करू शकतात, एवढेच नव्हे तर त्या हालचाली अधिक सुंदर आणि देखण्याही असतात. तीच गोष्ट प्रौढांचीही आहे. नग्न राहण्याची योग्य जागा म्हणजे घराबाहेर उन्हात आणि पाण्यात. आपल्या रूढींनी जर याला संमती दिली, तर लवकरच नग्नतेचे लैंगिक आकर्षण नाहीसे होईल. आपल्या हालचाली अधिक सुंदर होतील, ऊन्ह आणि वारा यांचा आपल्या त्वचेला होणाच्या स्पर्शामुळे आपण अधिक निरोगी होऊ, आणि सौंदर्याचे आपले मानदंड आरोग्याच्या मानदंडाशी एकरूप होतील, कारण ते सबंध शरीर आणि त्याचे व्यापार यांशी संबद्ध असतील, आताप्रमाणे केवळ चेहर्‍याशी नव्हे. या बाबतीत प्राचीन ग्रीकांचा व्यवहार प्रशंसनीय होता.

अनुवादक : म. गं. नातू

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.