वामन मल्हारांची सत्यमीमांसा

वा.म. जोशी हे मानवी जीवनाचे एक थोर भाष्यकार म्हणून ओळखले जातात. त्यांना महाराष्ट्राचे सॉक्रेटीस’ म्हणण्याचा प्रघात आहे. सॉक्रेटीसप्रमाणेच जीवनाचा अर्थ, त्याचे प्रयोजन आणि साफल्य शोधणे या गोष्टींभोवती त्यांचे तत्त्वचिंतन घोटाळत राहाते. सॉक्रेटिसाच्या संवादांचे भाषांतर ही त्यांची पहिली वाङ्यकृती असावी ही गोष्ट पुरेशी सूचक आहे. जीवनाचे मार्गदर्शक तत्त्वज्ञान म्हणून त्यांनी ‘सत्य, सौजन्य आणि सौंदर्य’ या त्रयीचा निरंतर पुरस्कार केलेला आहे. या तत्त्वत्रयीतील ‘सत्य’ ह्या संकल्पनेचा वामनरावांनी केलेला विचार प्रस्तुत निबंधाचा चर्चाविषय आहे.

वा.मं. च्या नीतिशास्त्र-प्रवेश या बृहद्रंथात दहा परिशिष्टे जोडली आहेत. त्यांतील ‘सत्य हे साधन की साध्य?’ या लेखातील प्रतिपादन प्रस्तुत चर्चेसाठी घेतले आहे. येथील त्यांचे सत्यविवेचन अनेक दृष्टींनी अपूर्व आहे. त्यांच्या पूर्वी आधुनिक मराठीत कोणी ह्या विषयावर आणि एवढे दर्जेदार तात्त्विक लेखन केले असेल असे वाटत नाही. वी.मं. चे नीति-धर्मविषयक लिखाण जसे खळबळजनक होते तसेच हे लिखाणही चांगलेच धक्कादायक आहे. परंतु तिकडे वा.मं.च्या भाष्यकारांचे लक्ष गेलेले दिसत नाही.

जीवनाच्या तीन प्राप्तव्यांपैकी सत्य हे साधे साध्य नसून सर्वश्रेष्ठ साध्य आहे अशा त-हेचे प्रतिपादन वामनरावांनी केलेले असणार अशी आपली अपेक्षा असते. परंतु सत्य हे साध्य नसून साधन आहे असा त्यांचा पक्ष आहे. नुसते सत्याला साधन ठरवून त्यांनी आपल्याला बुचकळ्यात टाकले असे नसून त्यांची सत्याबद्दलची एकूणच विचिकित्सा वाचकाला, विशेषतः तत्त्वज्ञानाच्या वाचकाला, चकित करणारी आहे. त्यांच्या या सत्यमीमांसेचा परामर्श घेण्यापूर्वी तत्त्वज्ञानात सत्यासंबंधी जी एक ढोबळ भूमिका स्थिरावलेली आहे तिची किंचित् मांडणी करून त्या अनुषंगाने वा.मं. च्या एतद्विषयक प्रतिपादनाचा विचार करू.

१. सत्यासंबंधी लक्षात घेण्यासारखी पहिली गोष्ट म्हणजे सत्य हा ज्ञानाचा धर्म आहे, वस्तूंचा नाही. ज्ञान सत्य किंवा असत्य असू शकते. एखाद्या वस्तूच्या बाबतीत ती अस्तित्वात आहे किंवा नाही असा प्रश्न प्रस्तुत असतो. एका उदाहरणाने ही स्थिती स्पष्ट होईल.
‘पृथ्वी सूर्याभोवती फिरते’ हे ज्ञान सत्य आहे.
‘सूर्य पृथ्वीभोवती फिरतो’ हे ज्ञान असत्य आहे.

त्याचप्रमाणे भारताचे वर्तमान राष्ट्रपती ही अस्तित्वात असणार गोष्ट आहे. मात्र भारताचे वर्तमान सम्राट ही अस्तित्वात नसणारी वस्तू आहे. भारताचे वर्तमान राष्ट्रपती ही वस्तू सत्यही नाही आणि असत्यही नाही. कारण येथे सत्यासत्याच प्रश्नच उद्भवत नाही. येथे जो उचित प्रश्न असतो तो आहे अस्तित्वाचा.

कधीकधी ‘सत्य’ हा शब्द ‘अस्तित्व असलेले’ ह्या अर्थी उपयोजिला जातो, नाही. असे नाही. परंतु तेथील संदर्भ पुरेसा बोलका असतो. उदाहरणार्थ सत्यासंबंधीची गांधीजींची भूमिका वाचकाने आठवावी. ते म्हणतात: ‘मी पूर्वी म्हणत असे की,“ईश्वर सत्य आहे”. दोन वर्षांपूर्वी मी एक पाऊल पुढे गेलो आणि म्हणालो “सत्य ईश्वर आहे.” यांतील पहिल्या भूमिकेतील ‘सत्य’चा अर्थ ‘अस्तित्वात असणारा’ असा आहे हे उघड आहे.

अद्वैत वेदान्ती जेव्हा ‘ब्रह्म सत्यम्’ असे म्हणतात तेव्हाही त्यांना ‘सत्य’ म्हणजे सत्तावान् (अस्तित्वात असणारे) असाच अर्थ अभिप्रेत असतो.
असे असले तरी सत्ता (म्हणजे अस्तित्व) आणि सत्य (म्हणजे भ्रमरहित ज्ञान) असा भेद भारतीय तत्त्वज्ञानातही केला जातो आणि संदर्भ पाहून उचित अर्थ ग्रहण केला जातो.

२. सत्यासंबंधी दुसरा मुद्दा असा की, (क) सत्याचे स्वरूप आणि (ख) सत्याचा निकष या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. सत्याचे स्वरूप काय म्हणजे त्याची व्याख्या काय असा एक प्रश्न असतो, आणि सत्याचा निकष कोणता हा दुसरा प्रश्न असतो. या प्रश्नाचा अर्थ असा की सत्य ओळखावे कसे ? सत्य हा ज्ञानाचा धर्म आहे हे लक्षात घेतले म्हणजे – वरील प्रश्नांमधील वेगळेपणा त्यांच्या भिन्न उत्तरांमधून दिसून येतो. ही उत्तरे अर्थातच निर्विवाद नाहीत. मुद्दा स्पष्ट करण्यासाठी केवळ त्यांचा उल्लेख केला आहे. एखादे ज्ञान सत्य आहे म्हणजे ते वस्तुस्थितीला धरून आहे, अनुरूप आहे. आणि ही अनुरूपता ओळखावी कशी तर हे ज्ञान प्रस्थापित ज्ञानव्यवस्थेशी सुसंवादी असेल तर ते अनुरूप, सत्य समजावे.

३. सत्याच्या संदर्भात तिसरा महत्त्वाचा मुद्दा असा:
सत्य ज्ञानाचा धर्म आहे असे जे वर म्हटले आहे त्यात थोडी भर घालून असे म्हटले पाहिजे की, सत्य हा वर्णनपर ज्ञानाचा धर्म आहे. वर्णनपर ज्ञान ग्रथित करणाच्या वाक्याला निवेदक वाक्य असेही म्हणतात. निवेदक वाक्याच्या अर्थाला तर्कशास्त्रात विधान म्हणतात. विधान हेच ज्ञान सत्य किंवा असत्य असते. विधान करणे हा भाषेचा एक उपयोग आहे. परंतु भाषेचे दुसरेही उपयोग आहेत. उदा. धर्मजिज्ञासा, नीतिमीमांसा, उपदेश, कलास्वाद किंवा सौंदर्यानुभव इत्यादी. या व्यवहारात आपण भाषा वापरतो; वाक्ययोजना करतो. त्यांतून विधाने व्यक्त होत नाहीत. ह्या वाक्यांना अनुलक्षून सत्य-असत्य अशी भाषा वापरता येत नाही. एका उदाहरणाने हे म्हणणे स्पष्ट होईल. सर्व मानव समान आहेत’ हे वाक्य विधान व्यक्त करीत नाही. त्याचा तोंडवळा विधानासारखा दिसला तरी त्याचा खरा रोख ‘सर्व मानव समान मानावेत’ असा उपदेशपर आहे. आणि हा मूल्यांचा प्रश्न आहे, वस्तुस्थितीचा नाही. म्हणून सत्यासत्यांपासून तो अलिप्त आहे. धर्म, कर्तव्य, सौंदर्य इत्यादींची भाषा वास्तव जगाविषयीची भाषा यांच्यात मुख्य फरक हाच की, पूर्वोक्त विषयांचे विश्व सत्यासत्याच्या कक्षेबाहेरचे आहे.
एवढ्या प्रस्तावनेची वा.मं. नी केलेली सत्यमीमांसा समजण्यास मदत व्हावी.

वामनराव म्हणतात की सर्व वादांची सुरुवात आपले म्हणणे सत्य आणि दसर्‍याचे असत्य अशा भूमिकांमधून होते. म्हणून चिकित्सक लोक ‘सत्य’ म्हणजे काय याचा निर्णय आधी करतात. सामान्य मनुष्य “सत्य” म्हणजे “वस्तु” असेल तसे ज्ञान व असत्य म्हणजे त्याच्या विपरीत ज्ञान, असे समजतो. परंतु मानसिक वस्तूंना आकार नसतो ही अडचण पुढे करून ते ही उपपत्ती त्याज्य ठरवतात. ते म्हणतात, ‘वस्तुचे जे स्वरूप असेल त्याचे यथार्थ प्रतिबिंब ज्या ज्ञानांत असते ते त्या वस्तूचे “अनुरूप ज्ञान” जर सत्य म्हटले तर शक्ति, ज्ञान, धर्म, नीति यांचे प्रतिबिंब कसे असते?’ या वस्तू नाहीत म्हणून त्यांचे प्रतिबिंबही नाही असे म्हणून चालायचे नाही. त्यांचा असा आग्रह दिसतो की, एकदा सत्याचा निकषग्रावा दिला की, तो सर्वत्र लागू पडला पाहिजे, आणि त्यात ‘धर्म, ‘नीति’ यासारख्या अमूर्त, निराकार गोष्टी आल्याच. तात्पर्य अनुरूपत्व ही सत्याची कसोटी होऊ शकत नाही. कारण ते (अनुरूपत्व) ठरवायचे कसे ‘येथे घोडे अडते.’

वा.मं. च्या या प्रतिपादनात यथार्थता है सत्याचे लक्षण नाकारून उपयुक्तता या तत्त्वाकडे ते सरकताना दिसतात, कारण हा नवा निकष ‘शक्ती, धर्म, नीति, ज्ञान’ यांना लागू पडतो. ते म्हणतात: ‘ज्ञान हे जर अत्यंत उपयुक्त, सुखद व कल्याणकारक आहे तर सत्य आणि असत्य यांतील भेद त्या ज्ञानाच्या कमी अधिक उपयुक्ततेवर – कल्याणप्रदतेवर ठरविण्यास काही हरकत हे काय?’ याचे उत्तर अर्थात् ‘नाही’ असेच त्यांनी दिले आहे. ‘जे ज्ञान हितकारक, जीवितोपयोगी, हितप्रद आहे ते सत्य’ अशी व्याख्या ते स्वीकारतात. परिणामतः ‘सत्य हे साध्य नसून जीवित अधिक सुखमय, निर्विघ्न, समाधानकारक करण्याचे एक साधन आहे’, असा सिद्धान्त ते मांडतात.

वरील प्रतिपादन करताना भारतीय तत्त्वज्ञानातील न्यायदर्शनाची भूमिका त्यांच्या समोर असावी. तळटीपत त्यांनी नैयायिक मताचा उल्लेख केलाही आहे. न्यायदर्शनात मात्र सत्याचे लक्षण आणि त्याचा निकष यांच्यात भेद कायम राखला जातो. या मुद्द्याचा विस्तार थोडा पुढे केला आहे.

स्वत: वामनरावांनी ‘यथार्थता’ या लक्षणाचा ‘उपयुक्तता’ हा जो परिष्कार केला आहे, त्यामुळे ‘त्याचे स्वरूप’ आणि ‘सत्याचा निकष’ हा भेद त्यांच्या विवेचनातून लोपला आहे.

जसे की, ज्या ‘धर्म’, ‘नीति’, ‘शक्ति’ आदि गोष्टींचा समावेश करता येत नाही म्हणून त्यांनी सत्याची ‘अनुरूपत्व’ ही व्याख्या नाकारली त्या गोष्टींचे ज्ञान हे वस्तुज्ञान नाही हे उघड कबूल करूनही त्याला सत्य-असत्य ठरवण्यासाठी उपयुक्ततावादी किंवा साधनवादी उपपत्तीचा त्यांचा हव्यास न समजण्यासारखा आहे. धर्म, नीती इत्यादींच्या ज्ञानाच्या बाबतीत सत्य – असत्य ही भाषाच वापरता येत नाही. ज्यांना आपण धार्मिक सत्य म्हणतो त्यांविषयीचे प्रश्न मूल्यांचे, श्रद्धांचे, आपल्या पसंतीचे किंवा पटण्या न पटण्याचे प्रश्न असतात. नीतीचे प्रश्नही असेच असतात. नीत्युपदेश तर उघड उघड़ मान्यतेचा विषय आहे. ‘अकारण हिंसा करू नये’ असा उपदेश घेतला तरी तो फार तर ‘सर्वमान्य आहे असे म्हणता येईल. परंतु तो ‘सत्य’ या बिरुदाने गौरविता येत नाही की, ‘असत्य’ असा बोल लावून त्याला हिणविता येत नाही. खुद्द सत्य हे आपण गौरवास्पद, वरेण्य समजतो आणि असत्य हे त्याज्य, निंद्य मानतो हा भाग वेगळा. पण सत्यासत्यता ही कोटी वेगळी आणि श्रेष्ठ-कनिष्ठता ही कोटी वेगळी हे अगदी स्वच्छ आहे. ते वेगळेपण वा.मं. सारख्या स्पष्टद चिंतकाच्या नजरेतून का सुटावे हा प्रश्न आहे.
सत्याच्या अनुरूपत्ववादी (Correspondence Theory), सुसंवाद (Coherence Theory) आणि उपयुक्ततावादी किंवा साधनवादी (Pragmatic Theory) अशा उपपत्ती पाश्चात्त्य तत्त्वज्ञानात प्रसिद्ध आहेत. आपल्याकडील भारतीय तत्त्वज्ञानातील नैयायिक यापैकी ‘अनुरूपत्व’ हे ‘सत्याचे स्वरूप’ आणि उपयुक्तता हा ‘सत्याचा निकष’ मानून ह्या दोन प्रश्नांची भिन्नता कायम ठेवतात. ती कशी हे पाहण्यासारखे आहे.

नैयायिक म्हणतात: कोणतीही ज्ञानविषय वस्तु विशिष्ट स्वरूपात्मक असते.

ज्ञानविषयातील विशेष्य-विशेषण भाव ज्ञानात कायम राहिला तर ज्ञान तद्वत झाल्यामुळे ते यथार्थ असते. (‘तद्वति तत्प्रकारकम्’). ज्ञानाचा उपयोग ही पुढची पायरी आहे. जर ज्ञान यथार्थ असेल तर त्यामुळे उत्पन्न झालेल्या प्रवृत्तींचे सफलत्व साधले जाते. ही ज्ञानप्रामाण्याची कसोटी आहे (‘सफलप्रवृत्तिजनकत्व’)

‘सत्यज्ञान नसल्यास विष हे अमृतमय समजून किंवा दोरीला साप समजून आपण आपले नुकसान करून घेतो’ असा भेद वामनराव करतात खरा; पण त्यापासून ते असा निष्कर्ष काढतात की सत्य हे साधन आहे.

आता उपयुक्तता हा सत्याचा निकष मानला म्हणजे सत्य आपोआप साधन ठरते हेही म्हणणे बरोबर नाही. उपयुक्तता हे मूल्य आहे. मूल्ये दोन प्रकारची असतात. साधनमूल्ये आणि साध्यमूल्ये यांची चिरपरिचित उदाहरणे अशी: ‘धन’ हे कंजूष मनुष्य सोडून इतर लोकांना साधन म्हणून मूल्यवान वाटते, तर ‘सुख’ हे सर्वांना साध्य म्हणून मूल्यवान वाटते. सत्यसंशोधक, वैज्ञानिक, तत्त्वज्ञ सत्याला साध्यमूल्य आहे असे समजतात. परंतु वामनराव जेव्हा ‘सत्या’च्या स्वरूपासंबंधी पुढीलप्रमाणे भूमिका घेतात तेव्हा वाचक चकित होतो:
‘सत्याची परीक्षा आपल्या अनुभवानुसार करावयाची असे गृहीत धरले, तर प्रत्येकजण आपापल्या अनुभवाप्रमाणे सर्व गोष्टींची सत्यासत्यता ठरवील… पण याचा अर्थ असा होतो की सत्य हे व्यक्तिशः भिन्न आहे, व हे जर कबूल केले तर अमुक विधान सत्य किंवा असत्य असे सर्वसामान्य व त्रिकालाबाधित विधान करणे शक्य होणार नाही.’ त्यांचे आणखी असेही मत आहे की ‘सत्य’ म्हणजे एक सुबोध, स्थिर, निश्चित वस्तु आहे असे म्हणता येत नाही. परंतु येथेही बा.मं.ची भूमिका बरोबर दिसत नाही. कसे ते पाहा: ३१ डिसेंबर १९९० रोजी भारताचे पंतप्रधान श्री. चंद्रशेखर आहेत हे विधान एक सत्य ज्ञान आहे आणि त्याचे सत्यत्व पुरेसे सुबोध, स्थिर आहे, इतकेच काय तर ते त्रिकालाबाधित आहे असे म्हणायला कोणताच प्रत्याय दिसत नाही.

वामनरावांना आपली भूमिका शास्त्रीय सत्यांना लागू पडणार नाही याची जाणीव आहे. ते म्हणतात,’ “सत्यत्व” बहुमतावर अवलंबून आहे…शास्त्रज्ञ मनुष्याचे “सत्य” जेव्हा सामान्य जनांस पटेल तेव्हाच ते त्यांच्या भाषेतील “सत्य” शब्दाला पात्र होईल?’त्यांचे म्हणणे की,‘सत्य हे स्थिर व अनादिसिद्ध आहे असे नव्हे, तर ते चल व कालगत्या वर्धमान होणारे आहे; “सत्य” या मूलभूत प्रमाणावरून अनुभवाची योग्यता ठरवायची असे नव्हे, तर “अनुभव” या प्रमाणाने सत्य वाटणाच्या कल्पनांची योग्यता ठरवायची. हे पटण्यासारखे आहे. पण, ‘सत्य हे उपयुक्त, असे नव्हे, तर जे उपयुक्त ते सत्य, सत्याने मन समाधान पावते असे नव्हे, तर ज्याने मन समाधान पावते ते सत्य; सत्याने कार्याचा कमी अधिक महिमा ठरतो असे नव्हे, तर कमी अधिक कार्यमहिम्यास अनुसरून ‘सत्यत्व’ ठरत असते…”व्यक्ति तितक्या प्रकृति” या न्यायाने प्रत्येक व्यक्तीचे सत्य निराळे असेल’, हे म्हणणे आपल्याला विपरीत वाटते. पण यावर त्यांचा प्रतिप्रश्न असा की,‘याला उपाय काय? कोणती गोष्ट खरी धरून चाललो असता आपल्या मनाला सर्वांत अधिक समाधान होईल, आपणास सर्वांत अधिक उपयोग होईल हे पाहूनच ना आपण सत्यासत्यता ठरवणार? शेवटी आपल्या विवेचनाचा समारोप ते असा करतात: ‘कोणते मत सत्य या प्रश्नाचे रूपांतर “कोणते मत बहुमूल्य” अशा प्रकारचे होते आणि या रूपांतराने तत्त्वविवेचन अधिक सुफलदायी होईल असा विश्वास त्यांना वाटतो. तत्त्वजिज्ञासूंनी सन्मार्ग कोणता, निश्रेयस सुख कसे प्राप्त होईल इत्यादि महत्त्वाच्या व स्फूर्तिदायक प्रश्नांचा विचार करायचा असतो हे मत जर प्रचलित झाले तर एकंदरीत हितन होईल.’

आता प्रश्न उरतो तो एवढाच की प्रत्येक मनुष्याचे सत्य जर निरनिराळे असेल तर कायमपणाच्या अभावी आपण एखादे मत (सत्यमत) प्रचलित होण्याची अपेक्षा की बाळगणार? उपयुक्ततेची संकुचित व्याख्या कोणती याबद्दल एकवाक्यता तरी की साधणार? बहुमूल्य, बहुजनसंमत सत्य नीतीचा आधार कसा होणार? ‘विवेक’ या सार्वजनिक शक्ति – पीठासमोर व्यक्तिनिरपेक्ष सत्याचे आवाहन करूनच ना आगरकरवादी किंवा कोणताही सुधारक समाजाच्या मतपरिवर्तनाची आशा बाळगणार?

आणखी एक जरा वेगळा मुद्दा: वामनरावांना सत्य, सौजन्य आणि सौंदर्य यांचे उपासक म्हणण्याचा प्रघात आहे. त्यांतील ‘सत्या’चे त्यांना कोणते स्वरूप अभिप्रेत होते हे आपण पाहिले. ‘सौजन्या’ साठी सत्य हे साधन ठरवले; मात्र धर्म व नीतीच्या स्थानाबाबत नीतिशाखप्रवेशातील त्यांची विचारसरणी पुढे बदलली आहे. म्हणून हा बदल नोंदवण् इष्ट होईल.

नीतिशास्त्रप्रवेशात त्यांची भूमिका अशी:
सदाचार हा आद्य धर्म आहे. आचार: प्रथमो धर्म: ।
‘एखादा आचार…अनीतीचा वाटू लागला म्हणजे तो त्या धमचे आवश्यक अंग म्हणून राहात नाही.’ मद्यपान ख्रिस्ती जीवनपद्धतीत निषिद्ध गणले जाताच त्याचे धार्मिक विधीतून उच्चाटन झाले. तसेच पूर्वी धर्मविरुद्ध मानलेला आचार नीतिविरुद्ध नाही असे वाटू लागले म्हणजे त्याचे धर्मबाह्यत्व नष्ट होते.

याप्रमाणे नीतीचे माहात्म्य असले तरी धर्मामुळे नीतीला सौभाग्य लाभ? असा त्यांचा दृष्टिकोण नीतिशास्त्र-प्रवेशात आहे. ते म्हणतात ‘नीतिदृष्ट्या वंद्य असले- कांही थोडे लोक नास्तिक असतात. बरेच संशयवादी किंवा स्याद्वादी (agnostic) असतात; परंतु सहधर्मचारिणी नीतीला जी शोभा प्राप्त होते व तिला जें निर्भयत्व, जो आ आंद, जें तेज, जी अव्यंग आत्मतुष्टि प्राप्त होते, ती धर्म हा सहचर लाभला नाही अशा एकाकिन, हतभागिनी नीतिमत्तेच्या वाट्याला येत नाही.’ (पृ.२७) आणि धर्मश्रद्धेचे विषय म्हटले म्ह जे आत्म्याचे अमरत्व, ईश्वराचे अस्तित्व व सदयता इत्यादि असतात. (पृ.३५) वामनरावांच्या या मतांत नंतर बदल झालेला दिसून येतो. १९३७ साली रत्नाकर मासिकात प्रसिद्ध झालेल्या ‘ध्येय हाच देव’ या लेखात वामनराव म्हणतात,’ ईश्वर मानला नाही तर नीती निराधार होईल असे काही म्हणतात (व मीही काही दिवस तसे मानीत होतो.) नीती ही धर्माची सहचारिणी झाली म्हणजे सौजन्याने ती जशी शोभते ती धर्माशी फटकून वागणारी कौमार्यावस्थेतील नीती शोभत नाही असे मी म्हणत असे व म्हणतोही. पण ईश्वराशिवाय धर्माचे धर्मत्व नष्ट होते असे मात्र मला अलीकडे वाटत नाही.” ध्येयवाद्यांना नास्तिक म्हणायला ते तयार नाहीत. त्यांचे ध्येय हाच त्यांचा देव असा वामनरावांचा सिद्धान्त आहे.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.