पुस्तक परिचय

हिंदू संस्कृती आणि स्त्री
ले. आ. ह. साळुखे (प्रकाशक: स्त्री उवाच, मुंबई, १९८९ मूल्य रु.३५)

‘स्त्री उवाच ने अलीकडे प्रकाशित केलेले (९ डिसेंबर १९८९) डॉ. आ. ह. साळुखे यांचे हिंदू संस्कृती आणि स्त्री हे पुस्तक वाचनात आले. यात लेखकाने हिंदू संस्कृतीचा स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टिकोण किती अन्याय्य होता ह्याचे अतिशय संतुलितपणे, कोणताही अभिनिवेश न बाळगता, अतिशय अभ्यासपूर्ण विवेचन जवळ जवळ तेवीस ग्रंथांच्या साह्याने केलेले आहे. त्या ग्रंथांची सूची पुस्तकाच्या सुरुवातीला दिली आहे. त्यात मनुस्मृती, याज्ञवल्क्यस्मृती इत्यादि स्मृतींबरोबरच इतरही धर्मग्रंथांचा समावेश आहे.

हे विवेचन करीत असतांना डॉ. आळतेकर यांच्या The Position of Women in Hindu Civilisation आणि डॉ. काणे यांच्या History of Dharmashastra या ग्रंथांमध्ये व्यक्त केल्या गेलेल्या काही मतांचाही परामर्श लेखकाने घेतला आहे.

परिशिष्टात इतर धर्मांचाही स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा होता याचे संक्षिप्त विवरण केलेले आहे. भारतीय समाजात हिंदू बहुसंख्य आहेत व लेखक स्वतः हिंदू असल्याने हिंदू धर्माचा दृष्टिकोन त्याने विस्ताराने दिलेला आहे.

प्रा. साळुखे म्हणतात की, मानव संस्कृतीच्या आरंभी अपत्यनिर्मितीच्या प्रक्रियेतील आपल्या वाट्याची पुरुषाला जाणीव नसल्याने स्त्रीच्या ठिकाणी अलौकिक सामर्थ्य आहे असे मानले जात होते. परंतु हळूहळू त्या स्थानाची जाणीव झाल्यानंतर स्त्रीचे माहात्म्य कमी झाले. भारतात आर्यांच्या आगमनाबरोबर पुरुषप्रधान संस्कृतीआली. वैदिक काळात स्त्रियांची स्थिती तुलनात्मक दृष्ट्या बरी होती. परंतु मनुस्मृतीच्या काळापासून मात्र तिच्यात झपाट्याने ऱ्हास झाला.

मुलीचे कुटुंबातील स्थान गौण मानले गेले आणि मुलाग्याचे स्थान श्रेष्ठ ठरले. ऋग्वेदाच्या काळातील समाज स्त्रियांच्या बाबतीत उदार होता असे समजले जाते. परंतु त्याही काळातील उदार ऋषींनी एक नव्हे तर आठ वा दहा पुत्र होवोतअसाआशीर्वाद देताना ‘मुलगी होवों ही इच्छा एकदाही व्यक्त केली नाही. वास्तविक मानवाच्या सातत्यासाठी पुरुषांइतकीच स्त्रियांचीही गरज असते. तेव्हा मुलांबरोबर मुलीही जन्मल्या पाहिजेत. यावर अथर्ववेदाने सुचविलेले मागणे असे की, ‘आमच्या घरात पुत्र निर्माण व्हावेत आणि इतरांच्या घरात कन्या निर्माण व्हाव्यात. (पृ. १०) पुत्र या शब्दाचे स्पष्टीकरण मनुस्मृती देते की ( कंसात दिलेले पृष्ठांक डॉ. सांळुखे यांच्या पुस्तकातील आहेत.) मुलगा ‘पुत् नावाच्या नरकापासून वडिलांचे त्राण म्हणजे रक्षण करतो म्हणून स्वतः ब्रह्मदेवानेच त्याला पुत्र म्हटले आहे. (पृ. १६).

उपनयन हा विद्याज चा प्रारंभ करण्यासाठी एक महत्त्वाचा, संस्कार होता. ‘विद्याजाचा प्रारंभ करण्यासाठी गुरूच्या जवळ घेऊन जाणे असा उपनयनाचा अर्थ आहे. कधी कधी मुलींचेही उपनयन केले जात असे. परंतु तिला विशेषज्ञ गुरूकडून ज्ञान मिळविण्याची मात्र व्यवस्था केली जात नसे. वडीलच तिला घरी शिकवीत असत. शिवाय हा संस्कार सरसकट सर्व स्त्रियांसाठी नसून निवडकच ब्राह्मण स्त्रियांना लभ्य होता, व तोही कसाबसा उरकला जाई असे दिसते. मनुस्मृतीसारख्या ग्रंथांनी तर स्त्रीच्या दृष्टीने विवाह हेच उपनयन असल्याचे सांगून शिक्षणासाठी असलेले उपनयन निषिद्ध केले (पृ. ३२). आज उपनयन जरी औपचारिक वाटत असले तरी पूर्वी ते प्रतिष्ठित जीवनाचे प्रवेशद्वारच होते. तो संस्कार नाकारल्यामुळे स्त्रियांना शिक्षणाचा मार्ग बंद होऊन त्यांचा दर्जा शूद्रांप्रमाणे हीन मानला गेला.

स्त्रीला विवाह बंधनकारक होता. विवाह करण्याचे वा न करण्याचे स्वातंत्र्य तिला मुळीच नव्हते. स्त्रीच्या दृष्टीने विवाह अपरिहार्य आहे हे सांगणारी एक धार्मिक रूढीही वैखानस स्मार्तसूत्राने उल्लेखिली आहे. एखादी वयात आलेली मुलगी विवाह न होता मरण पावली तर सजातीय वराशी तिचा विवाहविधी करून मगच तिचे दहन केले जाई (पृ.३५).

कधी कधी तर मुलींच्या बाबतीत विवाहाचा मार्ग धर्मशास्त्रांनीच बंद केल्याचे आढळते. उदा. जिला भाऊ नाहीत तिच्याशी विवाह करू नये असे मनुस्मृतीने म्हटले आहे (पृ. ३६). याज्ञवल्क्यस्मृतीनेही जिला भाऊ असेल तिच्याशी विवाह करावा असे म्हटले आहे. पुरुषमेधामध्ये अशा स्त्रियांना नरबळी देण्याविषयीचे निर्देश आढळतांत असे काही अभ्यासकांचे म्हणणे आहे (पृ.३७).

पती कसाही असला तरी त्याची सेवा करणे हेच स्त्रीचे सर्वश्रेष्ठ कर्तव्य सांगितले गेले. पतीच्या व्यक्तिमत्त्वाहून वेगळे, स्वतंत्र व्यक्तित्व असता कामा नये. शंखलिखित म्हणतात, ‘पती लैंगिक रोगाने पीडित असला अथवा नपुंसक असला, पतित म्हणजे महपातक केल्यामुळे बहिष्कृत असला, अंगहीन म्हणजे आंधळा, पांगळा इत्यादि प्रकारे अपंग असला किंवा रोगी असला तरी पत्नीने त्याचा द्वेष करू नये; कारण पती हा स्त्रियांच्या दृष्टीने देव असतो (पृ. ५५).

‘स्त्रीला स्वातंत्र्याचा अधिकार नाही’, ‘स्त्री ही स्वातंत्र्याला पात्र नाही अशा अर्थाचे विचार मनुस्मृती, याज्ञवलक्यस्मृती इ. धर्मग्रथांनी पुन्हा पुन्हा मांडले आहेत. याविषयीचा मनुस्मृतीमधील पुढील श्लोक प्रसिद्ध आहेः

पिता रक्षति कौमारे भर्ता रक्षति यौवने ।
रक्षन्ति स्थविरे पुत्रा न स्त्री स्वातंत्र्यमर्हति।।

स्त्री स्वातंत्र्यास अपात्र आहे. पति कसाही असला तरी पत्नीने त्याचा त्याग करू नये. मनुस्मृती घटस्फोटाला मुळीच अनुकूल नाही. ‘पतीने पत्नीची विक्री केली अथवा तिचा त्याग केला, तरी त्यामुळे पत्नी ही पतीच्या बंधनातून मुक्त होत नाही. प्रजापतीने पूर्वी निर्माण केलेला हा धर्म आहे, असे आम्ही जाणतो’ (पृ. ७१).

नारद आणि कौटिल्य मात्र याला अपवाद आहेत. कौटिल्याने निःसंदिग्ध शब्दांत स्त्रीला घटस्फोटाचा अधिकार दिला आहे. ‘नीचपणाने वागणारा, परदेशी गेलेला, राजद्रोही, जिवावर उठलेला, पतित किंवा नपुंसक अशा पतीचा त्याग करावा’ (पृ. ७२).

पतिनिधनानंतर विधवा स्त्रियांची स्थिती जगातील सर्व पुरुषप्रधान समाजव्यवस्थेत फारच दयनीय होती. मनुस्मृती म्हणते, ‘पतीच्या मृत्यूनंतर स्त्रीने शुभ्र अशी फुले, कंदमुळे आणि फळे खाऊन शरीर सुकवून टाकणे चांगले, पण तिने दुसऱ्या पुरुषाचे नावही घेऊ नये’ (पृ. ८३). हीच मनुस्मृती पुरुषाने मात्र फार काळ विधुरावस्थेत राहू नये हे सांगते. ‘पत्नीचा मृत्यू झाल्यावर पतीने तिचे दाहकार्य वगैरे अंत्यसंस्कार करावे आणि पुन्हा लग्न करावें (पृ.८३).

विधवा स्त्रीचे दर्शनही अमंगल मानले गेले. स्कंदपुराणात ‘अमंगल अशा सर्व गोष्टींपेक्षा विधवा ही अधिक अमंगल असते. विधवेचे दर्शन झाले तर कधीही कार्यसिद्धी हेत नाही. एक आई सोडली तर बाकीच्या सर्व विधवा अमंगल होत. प्राज्ञाने एखाद्या सापाप्रमाणे त्यांचा आशीर्वाद देखील त्याज्य मानावा’ (पृ. ९१), असे सांगितले आहे.

वैधव्याखालोखाल क्लेशकारक घटना म्हणजे वंध्यत्व ! एरवी क्षेत्राला दुय्यम स्थान व बीजाला महत्त्व देणाऱ्या व्यवस्थेने वंध्यत्वाची जबाबदारी मात्र पूर्णपणे स्त्रीवर ढकललेली आढळते.

हिंदू विधवेला एकत्र कुटुंबाच्या संपत्तीतून उदरनिर्वाहाखेरीज काहीही दिलेले नव्हते. बंगालमध्ये मात्र जीमूतवाहनाने आपल्या दायभाग’ या ग्रंथात विधवेला तिच्या मृत पतीचा संपूर्ण हिस्सा देण्याचा नियम केला. परंतु हे लोकांना आवडले नाही, व त्यांनी सतीच्या प्रथेचा मोठ्या प्रमाणात पुरस्कार केला. विधवा सती गेली की तिचा वाटा देण्याचा प्रश्नच उरत नाही.

पतिव्रतेचे लक्षण सांगणाऱ्या हारीताच्या श्लोकाचा आशय असा की, ‘स्त्री पती दुःखी-कष्टी झाला असता दुःखी-कष्टी होते, तो आनंदी झाला असता आनंदी होते, तो प्रवासाला गेला असता मलिन व कृश होते आणि तो मरण पावला असता मरण पावते ती पतिव्रता जाणावी (पृ. ९२). पतीच्या मृत्यूनंतर अग्निप्रवेशाखेरीज दुसरा धर्म नाही, सती जाणे हे स्त्रीचे महान कर्तव्य आहे, या शब्दांत सतीप्रथेचा पुरस्कार केलेला आहे, तिचे गोडवे, गायिले आहेत.

‘जीवनव्यापी गौणत्व या प्रकरणात लेखकाने चार आश्रम, तीन ऋणे, कर्मसिद्धांत व पुनर्जन्म, ईश्वर व अवतार, चार पुरुषार्थ, चार वर्ण इ. च्या संदर्भात स्त्रीविषयक मूल्यांचे विवेचन केले आहे.

ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ, संन्यास अशा चार आश्रमांचा विचार करतांना पुरुषाचेच जीवन सर्व शास्त्रांपुढे होते. पुरुषाने वानप्रस्थाश्रम स्वीकारतांना पत्नीला एकतर मुलांच्या स्वाधीन करावे किंवा स्वतःबरोबर घेऊन जावे असे मनुस्मृती सांगते.
पुरुषाच्या सुखाच्या इतर अनेक साधनांपैकी स्त्री ही एक साधन मानले गेले. ‘रतिपुत्रफला दाराः’, ‘पुत्रप्रयोजना दाराः’ ही सुभाषिते तिचे साधनत्व स्पष्ट करतात. स्त्रीची पशूबरोबर अगदी निःसंकोचपणे तुलना केलेली आढळते. संत तुलसीदासांचा याच आशयाचा श्लोक प्रसिद्ध आहे

ढोल गवाँर शूद्र पशु नारी
ये सब ताडन के अधिकारी’

कर्मसिद्धान्त व पुनर्जन्म या हिंदुसंस्कृतीतील महत्त्वाच्या संकल्पना होत. त्याचा स्त्रीजीवनावर परिणाम झाला तो असा की स्त्री म्हणून जन्माला येणे पूर्वजन्मातील पापकृत्याचे फळ होय ही विचारसणी रुजली. कर्मसिद्धांताचा तर्कप्राप्त अर्थ स्त्रीच्या संदर्भात बदलला गेला. प्रत्येक माणूस एका जन्मातून दुसऱ्या जन्मात गेल्यावर त्याची गती, इहलोकीची नाती बदलतात; मग स्त्रीच कशी सात जन्म एका पतीबरोबर राहते?

हिंदू संस्कृतीच्या या अन्यायाच्या परंपरेला अपवाद फक्त चार्वाक आणि वराहमिहिर यांचा होय. त्यांनी स्त्री-पुरुष समतेच्या विचारांचा पुरस्कार करून स्त्रीनिंदकांची अतिशय कडक शब्दात निर्भत्सना केली.
हिंदू संस्कृतीचा अभिमान बाळगणाऱ्या प्रत्येक स्त्रीपुरुषाने हे पुस्तक वाचलेच पाहिजे असे आहे. त्यानिमित्ताने आपण आपल्या संस्कृतीचा बाळगत असलेला अभिमान किती पोकळ आहे ही जाणीव जरी मनात निर्माण झाली तरी लेखकाचे श्रम सार्थकी लागले असे म्हणता येईल.

कर्मयोग बलराज मार्ग धंतोली, नागपूर ४४००१२

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.