एक निरीश्वरवादी ग्रामसेवक दांपत्य

आंध्रमध्ये विजयवाडा या ठिकाणी ‘एथिइस्ट सेंटर’ ही संस्था आपले सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे करत आहे. सुवर्णमहोत्सवी वर्षाचा प्रारंभ म्हणून अलिकडेच असा तीन दिवस एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आणि त्याला आशिया, युरोप आणि अमेरिका या तीन खंडांतून मानवतावादी, निरीश्वरवादी, बुद्धिवादी, बिनसांप्रदायिक, स्वतंत्र विचारांचे पुरस्कर्ते, नास्तिकता समर्थक आणि परिवर्तनवादी चळवळीशी निगडित प्रतिनिधी आले होते. देशातूनही ८०० प्रतिनिधी सहभागी झाले होते. प्रा रामचंद्र गोरा आणि त्यांच्या पत्नी सरस्वती गोरा यांनी या वैशिष्टयपूर्ण संस्थेचा ५० वर्षापूर्वी मुदुनुरु या आंध्र प्रदेशामधील कृष्णा जिल्ह्यातील खेड्यात पाया घातला..
दक्षिणेतल्या एखाद्या खेड्यात १९४० साली निरीश्वरवादी केन्द्र स्थापन करणे, हेच एक मोठे साहस होते. पण गोरा दांपत्याने विचारपूर्वक हे पाऊल टाकले. जातीयता, अंधश्रद्धेचा, निर्बुद्ध रीतीरिवाजाचा बुजबुजाट असलेला दैववादी भारत स्वतंत्र कसा होणार आणि लोकांची भरभराट कशी होणार, हा प्रा. गोरा यांच्या कार्याचा आधार होता. ते विज्ञानाचे प्राध्यापक होते: विज्ञान विषयात विद्यार्थ्यांना शिकवून तयार करणे हे त्यांनी इतर प्राध्यापकांप्रमाणे केवळ निर्वाहाचे साधन मानले नाही. त्यांनी वैज्ञानिक दृष्टीने जीवनाकडे पाहिले आणि आपले निष्कर्ष लोकांपुढे मांडण्याच्या आधी, स्वतःच्या जीवनात त्यांनी ते अजमावले. त्यांचा निष्कर्ष असा होता की, धर्माचा काळ उलटून गेला असून, आता धर्मोत्तर काळाला साजेल, असे जीवन तत्त्वज्ञान शोधले पाहिजे. देवाधर्माच्या नावावर जगभर जो विध्वंस, ज्या अगणित हत्या झाल्या, त्या ध्यानी घेता धर्माच्या आधारे मानवमात्राचे कल्याण होईल असे मानणे, हे अंधविश्वासाचे द्योतक ठरेल आणि म्हणून त्यांनी धर्मोत्तर नव्या जगाचा विचार मांडायला व तसा आचार करायला प्रारंभ केला.

पहिले पाऊल
भारत खेड्यांचा बनलेला देश असल्याने, खेड्या-पाड्यांत हा नवा विचार रुजवण्याचे ‘ त्यांनी ठरवले आणि मुदुनुरु खेड्यात निरीश्वरवादी केन्द्र स्थापन केले. पहिली आघाडी त्यांनी उघडली ती जातीयतेविरुद्ध. माणसाने माणसाकडेमाणसासारखे पाहणे हा निरीश्वरवादी विचाराचा पाया. त्यांचा बंडावा विधायक होता. आपल्या सर्व मुला मुलींच्या जीवनाचे जोडीदार ठरवताना त्यांनी ते अस्पृश्य समाजातून निवडले आणि त्यांचे संसार सुखाचे व आनंददायी होतात हे सिद्ध करून दाखवले. लोकांची फसवणूक करणाऱ्या दैवीशक्तीवादाच्या विरुद्ध त्यांनी दुसरी आघाडी उघडली आणि त्या पाठीमागच्या चलाख्या त्यांनी उघड केल्या. जात – वंश – धर्म • भाषा आणि लिंग यांच्या आधारे माणसा – माणसांत भेद आणि पक्षपात करणे, हा मानवद्रोह आहे, ही शिकवण त्यांनी दिली.

प्रा. गोरा यांनी ग्रामीण भागात जे काम चालविले होते, त्याची खबर गांधींच्या कानी गेली, तेव्हा त्यांनी निरीश्वरवादी केन्द्राच्या मंडळीना आपल्या सेवाग्राम आश्रमात बोलावले. जातीयता आणि अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी, अंधश्रद्धा व दैववाद यांच्या अजगर विळख्यातून लोकांना सोडविण्याकरिता आणि स्त्रियांना समान प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी प्रा. गोरा, त्यांच्या पत्नी सरस्वती आणि इतर कार्यकर्ते कसे प्रयत्न करतात, त्याची माहिती गांधीजींनी आस्थेने जाणून घेतली. दोघांच्या असे ध्यानी आले की, आपण परस्परांच्या खूप जवळ आहोत. माणसाबद्दल नितांत प्रेम व आस्था आणि त्यांच्या भलाईसाठी खटपट, यात कोणी कोणापेक्षा उजवा वा डावा नाही. निरीश्वरवादी मत आणि समाज परिवर्तन याबद्द्ल प्रा. गोरा व गांधीजी यांच्यात ज्या चर्चा झाल्या, त्या गोरांनी ‘गांधीसोबत एक निरीश्वरवादी या नावाच्या पुस्तकात लिहिल्या आणि गांधींजींनी सुरू केलेल्या नवजीवन प्रकाशनाने ते पुस्तक प्रसिद्ध केले.

मुलांच्या शिक्षणावर भर
प्रा. गोरा यांनी १९४७ साली ‘ऐथिइस्ट सेन्टर’ किंवा निरीश्वरवादी केन्द्र विजयवाड्याच्या परिसरात हलवले. प्रा. गोरा यांचे १९७५ साली निधन झाले. सरस्वती अम्मांच्या मार्गदर्शनाखाली आता त्यांची मुले आश्रमाचे कार्य चालवतात. नास्तिक म्हणजे अप्पलपोटा, सुखलोलुप, इतरांना तुच्छ समजणारा, चरित्रहीन अशी एक लोकांची समजूत झालेली आहे. गोरा यांनी खराखुरा निरीश्वरवादी समाजाच्या भल्यासाठी तळमळीने किती कार्य करतो ते दाखवून दिले. रचनात्मक कामांचे हे एक प्रमुख केन्द्र आहे. बालसेविका, आरोग्यसेविका यांना तेथे प्रशिक्षण दिले जाते. लोककलांचा अभ्यास केला जातो. नृत्य-नाट्य संगीताचे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. सामुदायिक जीवन संपन्न करण्याचा सतत प्रयत्न तेथे चालतो. निरीश्ववाद हा शब्द व्याकरणदृष्ट्या नकारदर्शी वाटतो. पण गोरा आणि त्यांचे कुटुंब त्याच्या विधायक अंगाचे उदाहरण घालून देतात. मुलांचे शिक्षण हा त्यांचा खास विषय आहे. इतरांना अनाचारावर व दुराचारावर पांघरूण घालायला देव असतो, पण निरीश्वरवाद्याला स्वतःच सदाचारसंपन्न असावे लागते.

पुनरुज्जीवनवादी आणि धर्माचा दुराभिमान बाळगणाऱ्या शक्ती डोके वर काढून देशाच्या अखंडतेला आणि एकात्मतेला धोका निर्माण करू पाहात आहेत. त्यांचा सामना करण्यासाठी ‘एथिइस्ट सेंटर कोणती पावले टाकू शकेल, याबद्द्ल उद्बोधक चर्चा तीन दिवसांच्या परिषदेत झाली. बी. प्रेमानंदांनी आपले प्रयोग दाखवून गूढ व दैवी समजल्या जाणाऱ्या प्रकारांचा उलगडा करणाऱ्या जादूच्या व हातचलाखीच्या खेळात सर्वाना रमवले आणि ढोंगेचव्हाट्यावर आणली. देवदासी-जोगतिणी म्हणजे दुराचाराला धर्माची मान्यता देण्याचा प्रकार. जोगतिणीचे लग्न लावून तिला गरत्या स्त्रीच्या पंक्तीला बसवण्याचा एक कार्यक्रम यावेळी आयोजित केला होता. प्रो. गोरांच्या कार्याचे चित्रमय दर्शन विलोभनीय होते.

विविध देशांतून आलेल्या प्रतिनिधीनी तेथील कार्याचा आढावा सादर केला आणि विधायक निरीश्वरवादाचे महत्त्व प्रतिपादन केले. लंडनच्या ‘न्यू ह्यूमॅनिस्ट पत्राचे संपादक जिम हेरिक म्हणाले की, ‘विजयवाड्याचे ‘एथिइस्ट सेंटर’ ही अवघ्या जगातली एकमेवाद्वितीय अशी संस्था आहे.निरीश्वरवादाला मानव कल्याणाची दीक्षा नसेल, तर तो विचार प्रभावी ठरणार नाही. माणसाबद्दल निरीश्वरवादी आस्थाशून्य असूच शकत नाही. निरीश्वरवादाचा स्वीकार केल्यावाचून दीन-दलितांना सुटकाच नाही. पण लोक मात्र असे समजतात की, निरीश्वरवाद, बुद्धिवाद, मानवतावाद इत्यादी श्रीमंतांची बौद्धिक आतषबाजी आहे. प्रा. गोरा यांनी निरीश्वरवादाचा प्रचार ग्रामीण लोकांत करून ही समजूत खोटी पाडली आहे. दास्य-दारिद्रय, अज्ञान -विषमता यांच्या अजगर विळख्यातून जनतेची सुटका व्हावी व आत्मविश्वासाने त्यांनी स्वतःची भरभराट करून घ्यावी, असे वाटत असेल, तर विधायक निरीश्वरवादी बनू हाच त्यावर उपाय आहे.
प्रा. गोरा यांच्या जीवनसाथी सरस्वतीअम्मा या ऐंशीच्या घरात आहेत. त्यांनी आपले अनुभव कथन केले. तेव्हा त्यांच्या तपःपूत व्यक्तिमत्त्वाने लोक भारावून गेले. एकाद्या स्त्रीने निरीश्वरवादाचे कंकण बांधून खेडोपाडी ही चळवळ पोचवणे हे केवढे अवघड काम आहे ! निरीश्वरवादाचे हे केंद्र केवळ लोकाश्रयावर चालू शकले; कारण लोकांनी स्वयंस्फूर्तीने केंद्राला सर्वतोपरी सतत साह्य केले. परलोकाच्या व पापपुण्याच्या कल्पनांतून मुक्त झाल्याशिवाय सर्वसामान्यांचा पुरुषार्थ जागा होणार नाही, असा सर्व भाषणांचा रोख होता.

निरीश्वरवादी केंद्रातर्फे खेडोपाडी नवजीवनाचे जे विधायक कार्य चालते, त्याचे निरीक्षण करण्याचा कार्यक्रम हा महत्त्वाचा भाग होता. निरीश्वरवाद म्हणजे आत्मकर्तृत्वाने परीवर्तन घडवून आणण्याचा प्रयत्न. ग्रामीण लोकांत त्यामुळे निर्माण झालेले चैतन्य अनेकांना विस्मयजनक वाटले. आर्थिक समता मंडळाच्या शाखा गावोगावी’ कार्यरत आहेत. निखाऱ्यांवरून अनवाणी चालत जाण्याच्या कार्यक्रमात अनेक स्त्री पुरुषांनी भाग घेतला आणि त्यापाठचे विज्ञान सांगून गूढतेचा पडदा टरकावून टाकला.

वर्षभर या केंद्राच्या सुवर्ण महोत्सवाचे कार्यक्रम चालणार असून विधायक निरीश्वरवाद हाच मानवाचा सामुदायिक पुरुषार्थ जागवणारा एकमेव मार्ग आहे, ही गोष्ट ठामपणे लोकांपुढे मांडली जाणार आहे. निरीश्वरवादी दीन-दलितांना आणि दुःखित पीडितांना दैवाच्या भरवशावर सोडून न देता, करुणेच्या भावनेने त्यांच्या सेवेसाठी धावून जातो, हे लोकांना दिसेल, तेव्हाच ते देवाच्या व देवाच्या फेऱ्यातून बाहेर पडू शकतील. आत्मशक्तीने जेव्हा गोष्टी घडतात, तेव्हाच आश्रिताची भूमिका माणूस सोडून देतो. आत्मशक्तीतून परिवर्तन हे निरीश्वरवादी विधायक कार्याचे प्राणतत्त्व आहे.

(महाराष्ट्र टाइम्स च्या सौजन्याने )

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.