पत्रव्यवहार

संपादक, आजचा सुधारक,
स, न. वि. वि.
फेब्रुवारी १९९१ च्या अंकात आपण वसंत कानेटकरांचे पत्र छापले आहे. पुण्यात झालेल्या स्त्रीवादी समीक्षेवरील परिसंवादाचे वेळी घडलेल्या एका घटनेचा त्यात उल्लेख आहे. त्या परिसंवादात मी सहभागी होतो. ‘परमिसिव सोसायटी’ची भलावण केल्याबद्दल प्रा. के. ज. पुरोहित यांचा निषेध परिसंवादात सहभागी झालेल्या काही स्त्री-पुरुषांनी केला ही वस्तुस्थिती नाही. घडले ते असेः
पश्चिमी देशांमध्ये आढळणाच्या सापेक्षतः पुष्कळच दिल्या स्त्रीपुरुष लैंगिक संबंधाविषयी बोलत असताना ‘मला स्वतःला नाना बायकांचा उपभोग घ्यायला आवडेलच, पण आता माझे वय असा उपभोग घेण्याच्या दृष्टीने राहिले नाही याची खंत वाटते’ अशा आशयाचे उद्गार सत्राच्या चर्चेला अध्यक्षीय समारोप करताना प्रा. पुरोहित यांनी काढले. काहीतरी हलके फुलके (in a lighter vein) बोलण्याच्या प्रयत्नात, जाणतेपणी वा अजाणतेपणी, थिल्लर व अनुचित उद्गार मा. पुरोहितांच्या तोंडून निघून गेले. पुरुष हे स्वभावतः कामवासनेने वखवखलेले असतात, त्यांना दृष्टीस पडणार्‍या स्त्रियांपैकी अनेकींना वासनेचे शिकार बनवायचे असते, ‘परमिसिव सोसायटी’ मध्ये त्यांना याची पुरेपूर संधी मिळत असल्याने त्यांचा सदैव व तत्पर पाठिंबा लैंगिक संबंधाच्या या प्रकारच्या व्यवस्थेला राहणार, असा काहीसा त्यांचा युक्तिवाद होता. या वृत्तीने पुरुषांनी स्त्रियांकडे केवळ एक साधन म्हणून बघून व्यवहार करावा याची भलावण त्यांच्या स्वसापेक्ष उद्गारांतून जी झाली तिला तीव्र प्रतिक्रिया उमटणे स्वाभाविक होते, खेदाची गोष्ट अशी की, चर्चासत्र संपल्यावर मा. परोहितांनी आपल्या थिल्लर उद्गारांचे समर्थन करण्याचा अश्लाघ्य प्रयत्न केला. परिसंवादानंतर त्यांचा जो निषेध केला गेला त्याचे हे वास्तविक कारण होते.
पुरुषसत्ताक समाजव्यवस्थेची चौकट कायम राहून, या व्यवस्थेने घडविलेले मानस व धारणा कायम राहून लैंगिक संबंधविषयक नैतिक निबंध ढिले पडण्यामधून परमिसिव सोसायटीची रचना आकारास आलेली आहे. प्रा. के. जे. पुरोहित यांनी जे उद्गार पुण्याच्या त्या परिसंवादात काढले, आणि त्याचे नंतर ज्या प्रकारे समर्थन केले त्यावरून देखील ही गोष्ट ध्यानात येते.
कळप करून राहणार्‍या प्राण्यांच्या विश्वात या प्रकारचे लैंगिक संबंध आपणास आढळतात, त्या प्रकारच्या संबंधांमध्ये जी ‘मोकळीक’ नर व मादी या दोघांना असते त्या प्रकारच्या संबंधाचे व मोकळकीचे आकर्षण प्रा. पुरोहितांप्रमाणेच श्री. कानेटकर यांनाही आहे हे त्यांच्या पत्रातून स्पष्ट होते. पण मानवेतर प्राण्यांच्या संदर्भात ‘मोकळीक’,’स्वातंत्र्य’ या शब्दांचा वापरही खरे तर अप्रस्तुत आहे. ‘माणसाचा मेंदू’ (थिकिंग कॅप) आणि ‘पशु-मेंदू’ असा भेद केलाच तर, पशु-मेंदूच्याच पातळीवर केवळ प्राकृतिक चौकटीतले जगणं असते; संगणकीय परिभाषा वापरावयाची तर एका प्रोग्रॅम नुसारचे ते जगणे असते. लैंगिक संबंधाच्या बाबतीत ‘माणसाचा मेंदू’ नावाची काही गोष्ट नाहीच असे समजून प्राण्यांसारखाच व्यवहार केला तर ती गोष्ट अधिक नैसर्गिक, कृत्रिम नीतीनिबंध विरहित असेल, व म्हणून तो व्यवहार मुक्त व स्वतंत्र असेल अशा धारणेमधून, परमसिव सोसायटी’ची भलावण केली जात आहे असे वाटते. पण येथे मुळातच मोठी गफलत आहे. माणसाला पशू असल्याची एक बाजू असली तरी अविच्छेद्य अशी दुसरोही बाजू आहे. तोही एका ‘प्रोग्रेम’ नुसारच जगत असतो, पण आपल्यासाठी ‘प्रोग्रॅम’ तयार करून त्यानुसार जगणे (संस्कृतीची निर्मिती करून जगणे) त्याच्या बाबतीत अटळ आहे. म्हणजेच नीतीअनीतीच्या, विधिनिषेधस्वरूप निबंधांच्या चौकटीतच ‘स्वातंत्र्य’ ‘मुक्ती’ हे शब्द अर्थपूर्ण व प्रस्तुत ठरतात, ‘परमिसिव सोसायटी’ ही स्त्रीमुक्तीच्या चळवळीची तर्कशुद्ध परिणती नसून ती वाटचाल माणसांना पशुपातळीवर नेऊन ठेवण्याचा प्रोग्रॅम आहे, व तोही पुरुषसत्ताक मूल्यव्यवस्थेच्या व एकंदर व्यूहरचनेच्या चौकटीतलाच प्रोग्रॅम आहे, हे दर्शन स्त्रीमुक्तिचळवळीतील क्रियाशील प्रामाणिक व्यक्तींना स्वानुभव व निरीक्षण चिंतनामधून झाले. चळवळीच्या एका टप्प्यावर ‘परमिसिव सोसायची’च्या दिशेने होत असलेल्या वाटचालीचे स्वागत करणारी ही चळवळ आज डोळसपणे त्या वाटेने जाण्याचे नाकारत आहे,
कोणत्या लैंगिक संबंधविषयक नीतीच्या चौकटीत स्त्रीपुरुष समान, स्वतंत्र व मुक्त असतील याचा शोध आज स्त्रीमुक्ती चळवळ घेत आहे, नीतीची चौकट स्वीकारली की मूल्ये, निष्ठा, निबंध, विधिनिषेध या गोष्टी आल्याच. त्याही पलीकडे, नैतिक, पवित्र या संकल्पनांचे महत्त्व व स्वीकारही आला. श्री. कानेटकर यांना या संकल्पना, आणि त्यांच्या आधारे उभी केली जाणारी व्यवहारातली चौकट यांची अडचण वाटते, ते ओझे वाटते हे उघड दिसते. त्यांना परमिसिव सोसायटी’च्या व्यूहरचनेचे आकर्षण वाटावे, व तिची त्यांनी भलावण करावी हे ओघानेच आले.
वसंत पळशीकर
५ एप्रिल १९९१
नागपूर

संपादक,”नवा सुधारक” यांस
स, न. वि. वि.
आपल्या फेब्रुवारी ९१ च्या अंकातील श्री. केशवराव जोशी यांचे पत्र वाचून वाईट वाटले.
मी दिलगिरी व्यक्त केलेली नाही-माफी मागितलेली नाही. वृत्तपत्रांनी ज्या खोडसाळपणाने माझ्या भाषणाचा विकृत वृत्तांत छापला त्याच खोडसाळपणाने मी माफी मागितल्याचे वृत्त छापले. सुदैवाने सर्वच वृत्तपत्रे त्यात सामील झाली नाहीत. जी झाली त्यांच्या तोंडी लागण्यात अर्थ नव्हता, म्हणून मी गप्प बसलो. पण जोशींसारख्या माणसांचा गैरसमज होता कामा नये असे वाटले, म्हणून हा पत्राचा प्रपंच. माझ्या भाषणाचा वृत्तांत छापला गेला आणि एक काहूर उठले. अत्यंत निरर्गल भाषेत मला निनावी फोनने आणि पत्रांनी धमक्या दिल्या जाऊ लागल्या. जागतिक म्हणवणार्‍या वृत्तपत्रांनी अग्रलेख स्फुटे, पत्रे याद्वारा माझा निषेध केला. पुण्याला तर उघड गुंडगिरीला मला तोंड द्यावे लागले. तेव्हा वस्तुस्थिती लोकांसमोर ठेवावी म्हणून मी एक खुलाशाचे पत्र प्रसिद्धीकरता सर्व वृत्तपत्रांकडे पाठवले. त्या माझ्या पत्रांतल्या ज्या परिच्छेदावरून ‘मी माफी मागितली’ असा निष्कर्ष काढण्यात आला तो परिच्छेद येणेप्रमाणे:
“मी बोललो ते गणपतीच्या नावाखाली घातल्या जाणार्‍या बीभत्स धांगडधिंग्याबद्दल, त्यामुळे होणार्‍या उपद्रवाबद्दल, विद्यार्थ्यांच्या, आजारी माणसांच्या, समाजाच्या निर्मितिक्षमतेच्या होणार्‍या प्रचंड नुकसानाबद्दल, पैसा आणि मानवी उत्साह ह्यांच्या होणार्‍या वारेमाप उधळपट्टीबद्दल….गणपती उत्सव नव्हे तर हा सारा उपद्रव आणि धांगडधिंगा कायद्याने बंद करण्याबद्दल!”
“या असल्या माझ्या बोलण्याने कुणाच्या धार्मिक भावना दुखावल्या असतील तर मात्र मी शरमेने माफी मागतो, ‘धार्मिक भावना’ मला कळलीच नाही एवढाच त्याचा अर्थ!”
या माझ्या खुलाशाचा अर्थ मी माफी मागितली, दिलगिरी व्यक्त केली असा करण्यात आला.
मला हौतात्म्य वगैरे पत्करण्याची हौस नाही, आगरकरांचा वारसा पुढे चालवण्याची माझी पात्रता नाही हेही मी जाणतो. पण काही बाका प्रसंग गुदरलाच तर माझ्या वाट्याला आलेली शिक्षा भोगायला दुसर्‍या कुणालातरी पुढे करून मी पळ काढणार नाही, एवढी ग्वाही मी श्री. केशवराव जोशी आणि तत्सम विचाराच्या माणसांना देऊ शकतो! कळावे.
आपला,
श्रीराम लागू

मा. संपादक,
‘आजचा सुधारक’
नागपूर
महोदय,
फेब्रुवारी १९९१ चा अंक वाचला. पत्रव्यवहारातील श्री. केशवराव जोशी यांचे पत्रात “डॉ. श्रीराम लागूंनी दिलगिरी व्यक्त केली” असे वाक्य प्रथमच लिहिले आहे. श्री. जोशी यांची माहिती चुकीची आहे. डॉ. लागू यांनी या प्रकरणात अजिबात माफी मागितलेली नाही, माफीपत्र द्यावे म्हणून पुण्यात काही तरुणांनी त्यांना घेराव घातला पण डॉ. लागू यांनी या तरुणांबरोबर चर्चा केली. लिहून आणलेले माफीपत्र हे तरुण तसेच परत घेऊन गेले.
माझी माहिती वरीलप्रमाणे आहे. डॉ. लागू यांच्यावर अन्याय होऊ नये म्हणून हे पत्र
आपला,
कृ. रा. लंके
४९ म. फुले पेठ “आजचा सुधारक
पुणे ४११०४२
दि. १६.३.११

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.