विवाह आणि नीती (भाग १५)

घटस्फोट
बहुतेक सर्व देशांत आणि बहुतेक सर्व युगांत घटस्फोटाला काही कारणांकरिता संमती होती. घटस्फोटाची संकल्पना एकपतिक-एकपत्नीक (monogamous) कुटुंबाचा पर्याय म्हणून कधीच केली गेली नाही. त्याचा उद्देश जिथे विवाहितावस्था कायम ठेवणे असह्य झाले असे वाटते तिथे क्लेश कमी करणे हाच राहिला आहे. या विषयातील कायदा भिन्न देशांत आणि भिन्न काळी अतिशय भिन्न राहिलेला आहे. आजही एकट्या संयुक्त संस्थानांत तो एका टोकाला दक्षिण कॅरोलिनात घटस्फोट मुळीच शक्य नसणे येथपासून तो दुसऱ्या टोकाला नेव्हाडामध्ये तो अतिसुलभ असणे येथपर्यंत विविध आहे. अनेक ख्रिस्तीतर नागरणांत (civilizations) पतीला घटस्फोट सहज मिळे, तर काहीमध्ये तो पत्नीला सहज मिळे. चिनी कायद्यानुसार जर पत्नीला, तिने आणलेले स्त्रीधन परत केले तर घटस्फोट संमत होता. कॅथलिक धर्मात विवाह हा एक संस्कार आहे या कारणास्तव कोणत्याही सबबीवर घटस्फोटाला मनाई आहे; परंतु प्रत्यक्ष व्यवहारात, विशेषतः जिथे थोरामोठ्यांचा संबंध असतो तिथे, ह्या कठोर नियमाची कठोरता काहीशी सौम्य केली जाते, कारण अनेक कारणांस्तव विवाह शून्यवत् म्हणजे न झाल्यासारखा (null) ठरविता येतो. ख्रिस्तीधर्मीय देशांत प्रॉटेस्टंट पंथाच्या प्राबल्याच्या प्रमाणात घटस्फोटाबाबत सौम्य दृष्टिकोण अवलंबिला जातो. मिल्टन कवी घटस्फोटाचा पुरस्कर्ता होता, कारण तो प्रॉटेस्टंट होता हे सर्वश्रुत आहे. स्कडिनेव्हियात घटस्फोटाचा कायदा अतिशय सुलभ आहे; आणि तीच गोष्ट अमेरिकेतील प्रॉटेस्टंट संस्थानांची आहे. सोविएट संघात पती किंवा पत्नी कोणीही एकाने विनंती केली की घटस्फोट मिळू शकतो. परंतु व्यभिचार किंवा बेकायदा संततीला कसलीही सामाजिक किंवा कायदेशीर शिक्षा किंवा दूषण नसल्यामुळे, विवाहाला अन्यत्र जे महत्त्व आहे ते रशियात राहिलेले नाही.
घटस्फोटाच्या बाबतीतील एक चमत्कारिक गोष्ट म्हणजे कायदा आणि रूढी यांत आढळून येणारी तफावत. जिथे घटस्फोट सर्वांत सुलभ असेल तिथे घटस्फोटांची संख्या सर्वात जास्त असते असे नेहमीच घडत नाही. उदा. स्वीडनमध्ये परस्परसंमतीने घटस्फोट मिळू शकतो, तर अमेरिकेत कोणत्याही संस्थानात हे कारण कायद्याला संमत नाही. परंतु १९२२ मध्ये (म्हणजे ज्या वर्षाची आकडेवारी माझ्याजवळ आहे असे सर्वात अलीकडचे वर्ष) दर एक लक्ष लोकसंख्येमागे स्वीडनमध्ये २४, तर संयुक्त संस्थानांत १३४ इतके घटस्फोट झाले. मला वाटते की कायदा आणि रूढी यांतील हा भेद महत्त्वाचा आहे; कारण मी जरी या बाबतीत कायदा अधिक सुलभ असावा अशा मताचा असलो तरी जोपर्यंत कुटुंब माता आणि पिता दोघांचे असेल तोपर्यंत काही टोकाची उदाहरणे सोडून दिली तर रूढी घटस्फोटाविरुद्ध असावी असे मला वाटते. माझे मत असे आहे याचे कारण मी विवाह केवळ लैंगिक भागीदारी समजत नाही, तर तो प्रामुख्याने मुलांना जन्म देऊन त्यांचे संगोपन करण्यात सहकार्य करण्याची जबाबदारी स्वीकारणे असते. या अनि विवाह अनेक कारणांस्तव-यांत आर्थिक कारण प्रधान असते-उद्ध्वस्त होईल हे नुसते शक्य नव्हे, संभाव्यही आहे. परंतु जर असे झाले तर घटस्फोटही नाहीसा होईल, कारण घटस्फोट विवाहसंस्थेवर अवलंबून असणारी गोष्ट आहे, आणि विवाहसंस्थेच्या रक्षणाकरिता वापरावयाचे ते एक संरक्षक साधन आहे. म्हणून आपले हे वर्तमान विवेचन मातृपित्रात्मक कुटुंबाची चौकट हा नियम आहे अशा गृहीतावर आधारलेले आहे.
परंतु प्रॉटेस्टंट आणि कॅथलिक हे घटस्फोटाकडे कुटुंबाच्या जीवशास्त्रीय प्रयोजनाच्या दृष्टिकोणातून पाहात नाहीत. ते त्याकडे पापाच्या ईश्वरशास्त्रीय कल्पनेच्या दृष्टिकोणातून पाहतात, कॅथलिकांचे मत विवाह ईश्वरशास्त्रीय दृष्टीने अविच्छेद्य आहेत असे असल्यामुळे ते स्वाभाविकच असे प्रतिपादतात की एकदा दोन व्यक्तींनी विवाह केला की त्यांच्यापैकी कोणालाही आपला जोडीदार जिवंत असेपर्यंत अन्य कोणाही व्यक्तीशी पापरहित लैंगिक संबंध ठेवता येणार नाही. प्रॉटेस्टंट घटस्फोटाचा पुरस्कार करतात याचे कारण अंशतः ते कॅथलिकांच्या संस्कारसिद्धांताविरुद्ध आहेत हे असते, आणि अंशतः हेही असते की विवाह-बंधाची अविच्छेद्यता हे व्यभिचाराचे कारण असते हे त्यांच्या लक्षात येते, आणि घटस्फोट सुलभ झाल्यास व्यभिचाराची संख्या कमी करणे सोपे होईल असे त्यांना वाटते. त्यामुळे ज्या प्रॉटेस्टंट देशांत विवाहविच्छेद सुलभ आहे तिथे व्यभिचार पापमय मानला जातो, तर जिथे विवाहविच्छेदाला संमती नसते तिथे व्यभिचार जरी पापमय मानला तरी त्याकडे काणाडोळा केला जातो. झारशाही रशियात जेव्हा घटस्फोट अतिशय कठीण होता तेव्हाही गॉर्कीला त्याच्या खाजगी जीवनाबद्दल तिथे कोणी वाईट म्हणत नसत. परंतु ज्या अमेरिकेत त्याच्या राजकारणावर कोणी आक्षेप घेत नसत तिथे नैतिक कारणांस्तव त्याला अमेरिकेतील हॉटेलांत एक रात्रही आसरा मिळू शकला नाही,
कॅथलिक किंवा प्रॉटेस्टंट कोणत्याही दृष्टिकोणाचे नैतिक समर्थन करणे शक्य नाही. आपण प्रथम कॅथलिक दृष्टिकोणाचा विचार करू. समजा की विवाहानंतर पतीला किंवा पत्नीला वेड लागले, तसे झाले तर त्यांना अधिक संतती होणे इष्ट नसणार, आणि तसेच अगोदर झालेली मुलेही वेड्या माणसाच्या संसर्गात येणे इष्ट नाही. मातापित्यांची अशा प्रकरणात पूर्ण फारकत करणे हे अपत्यांच्या दृष्टीने इष्ट होईल, तसेच शहाण्या जोडीदाराला कायदेशीर लैंगिक संबंधापासून वंचित ठेवणे हा अकारण दुष्टपणा होईल, आणि त्याने कोणतेही सामाजिक भलेही साधणार नाही. अशा प्रसंगी शहाण्या जोडीदाराला एक फार कठीण निवड करावी लागते. तो किंवा ती एक तर ब्रह्मचर्य पाळायचे ठरवील किंवा चोरटे संबंध ठेवायचे (अपत्ये होणार नाहीत अशी काळजी घेऊन) ठरवील, किंवा उघड व्यभिचाराचा मार्ग-निरपत्य किंवा सापत्य-स्वीकारील. यांपैकी प्रत्येक पर्यायाला गंभीर आक्षेप आहेत. पूर्ण ब्रह्मचर्य (विशेषतः ज्याला विवाहानंतर लैंगिक संबंधांची सवय लागलेली असले त्याला) फार कष्टप्रद असते. त्याने मनुष्याला (स्त्रीला किंवा पुरुषाला) अकाली वार्धक्य येते. त्यातून मानसिक आजार उद्भवू शकतात, आणि काही झाले तरी त्याकरिता कराव्या लागणाऱ्या प्रयत्नातून चिडखोर, तक्रारखोर, आणि त्रासिक स्वभाव निर्माण होऊ शकतो. पुरुषाच्या बाबतीत संयम अचानक फसण्याची भीती असते, आणि त्यातून पाशवी कृती संभवतात. कारण जर विवाहबाह्य संबंध पापमय आहेत असे त्याचे मत असेल, तर जेव्हा तो असे संबंध नाइलाजाने ठेवील तेव्हा ज्याअर्थी आपण नाही म्हटले तरी पाप करतोच आहोत, त्याअर्थी त्यात नैतिक संयम ठेवण्यात अर्थ नाही असे त्याला वाटू लागेल.
दुसरा पर्याय म्हणजे चोरटे निरपत्य संबंध. याचा अशा परिस्थितीत सामान्यपणे अवलंब केला जातो. परंतु यालाही गंभीर आक्षेप आहेत. चोरटे काहीही अहितकारक असते आणि जे लैंगिक संबंध गंभीर असतात ते अपत्यजन्म आणि सामाईक जीवन यांवाचून पूर्णपणे फलदायी होत नाहीत. जर पुरुष किंवा स्त्री तरुण आणि धडधाकट असेल तर त्याला (किंवा तिला) कायदा म्हणतो त्याप्रमाणे ‘तुला मुले हवी असतील तर ती वेडीपासून (किंवा वेड्यापासून) झालेलीच मिळू शकतील असे म्हणण्यात सामाजिक हितही नाही.
तिसरा पर्याय म्हणजे उघड व्यभिचारी जीवन, हे जेव्हा शक्य असेल तेव्हा ते व्यक्ती आणि समाज दोघांच्याही दृष्टीने सर्वात कमी अपायकारक असते. परंतु आर्थिक कारणास्तव ते बहुधा संभाव्य नसते, जो डॉक्टर किंवा चकील उघडपणे व्यभिचारी जीवन जगेल तो आपले सर्व रोगी आणि अशील गमावून बसेल. शाळा कॉलेजांत काम करणाऱ्या मनुष्याची नोकरी ताबडतोब जाईल. म्हणून बहुतेक लोक सामाजिक कारणास्तव या मार्गापासून दूर राहतील. पुरुषांना क्लबमध्ये जायला आवडते, आणि स्त्रियांना आपल्याकडे अन्य स्त्रियांनी यावे असे वाटते. या सामाजिक संबंधाना वंचित होणे हे मोठे कष्टप्रद असते. म्हणून श्रीमंत लोक आणि कलावंत, लेखक आणि ज्यांच्या व्यवसायात मुलखावेगळे जीवन जगणे सुलभ असते असे लोक सोडून दिले तर हा मार्ग इतरांना दुष्कर आहे.
ह्यावरून हे निष्पन्न होते की ज्या देशात वेड हे घटस्फोटाला पुरेसे कारण समजत नाहीत (उदा. इंग्लंड). तेथे ज्याची बायको किंवा जिचा नवरा वेडी किंवा वेडा होतो असा पुरुष किंवा स्त्री ह्यांची अवस्था असह्य होते, आणि तिला धार्मिक अंधश्रद्धेखेरीज अन्य समर्थन नाही. आणि जे वेडाविषयी खरे आहे ते गुप्तरोग, गुन्हेगारी, दारुडेपणा यांच्याही बाबतीत खरे आहे. या गोष्टींमुळे वैवाहिक जीवनाचा सर्वच बाजूंनी विध्वंस होतो. त्यांच्यामुळे पतिपत्नीचे सख्य अशक्य होते, अपत्यनिर्मिती अहितकर होते, आणि मुलांचा अपराधी आई किंवा बाप यांच्याबरोबर सहवास वर्ण्य मानावा लागतो.
पती किंवा पत्नी टाकून देणे जिथे खरेखुरे असेल तिथे ते घटस्फोटाला पुरावे असे कारण आहे. अशा प्रकरणात घटस्फोटाला संमती देणे म्हणजे जी गोष्ट घडलेलीच आहे (म्हणजे विवाह संपलेलाच आहे) ती तशी आहे असे कायद्याने मानणे. पण यात अडचण अशी आहे की जर घटस्फोटाला हे कारण पुरत असेल तर ज्यांना घटस्फोट हवा आहे अशी माणसे त्याचा वेळीच अवलंब करतील. हीच अडचण अन्यही समर्थनीय कारणांच्या बाबतीत उद्भवते. काही जोडप्यांना विभक्त होण्याची इतकी तीव्र इच्छा असते की ती काय वाटेल त्या उपायांचा अवलंब करतील. जेव्हा इंग्लंडमध्ये व्यभिचाराखेरीज पुरुषाची दुष्टपणाची वागणूकहीं घटस्फोटास अवश्य होती, तेव्हा दृष्टपणाचा पुरावा साक्षीदाराला देता यावा म्हणन नवरे आपल्या बायकोला नोकरांसमक्ष खोटीच मारहाण करीत. परंत या कायदेशीर अडचणीकडे आपण दुर्लक्ष करू, आणि कोणत्या कारणास्तव घटस्फोटाला संमती देणे समर्थनीय होईल याचा विचार करू.
व्यभिचार घटस्फोटाला पुरेसे कारण असू नये असे मला वाटते. ज्यांच्या ठिकाणी प्रबल नैतिक निषेध प्रभावी आहे अशा व्यक्ती सोडून दिल्या तर मधून मधून व्यभिचाराची तीव्र ऊर्मी न येणे ही अतिशय असंभाव्य गोष्ट आहे. परंतु अशी ऊर्मी आल्यास तिचा अर्थ आता विवाह निरुपयोगी झाला आहे असा होत नाही. पतिपत्नींमध्ये तरीही उत्कट प्रेम असू शकेल, आणि तसेच आपला विवाह भग्न होऊ नये अशी तीव्र इच्छाही असू शकेल.
समजा की एखाद्या मनुष्याला महिनेच्या महिने कामानिमित्त घरापासून दूर राहावे लागते. त्याची प्रकृती जर दणकट असेल तर त्याचे आपल्या पत्नीवर कितीही प्रेम असले तरी ह्या काळात ब्रम्हचर्य पाळणे त्याला कष्टप्रद वाटेल. आणि हीच गोष्ट त्याच्या पत्नीच्याही बाबतीत, जर ती रूढ नीतीच्या औचित्याविषयी पूर्ण निःशंक असेल तर, खरी आहे. अशा प्रसंगी घडलेला व्यभिचार वैवाहिक सौख्यास बाधक होईल असे मानू नये, आणि जिथे पतिपत्नी हे तीन मत्सराने ग्रस्त नसतील तिथे तो तसा मानला जात नाही. याच्यापुढे जाऊन आपण असेही म्हणू शकतो की त्यांच्या प्रीतीला धक्का पोचत नसेल, तर पतिपत्नींनी अशा प्रकारचे तात्कालिक मोहाला बळी पडण्याचे प्रकार सहन करायला शिकले पाहिजे. व्यभिचाराचे मानसशास्त्र रूढ नीतीमुळे बरेच विकृत झाले आहे, कारण त्यात असे गृहीत धरले जाते की एकपतिक-एकपत्नीक समाजात एका व्यक्तीचे आकर्षण आणि दुसऱ्या व्यक्तीवर गंभीर प्रेम एकत्र असू शकत नाहीत. हे खरे नाही हे सर्वांना माहीत असते. आणि तरी प्रत्येक मनुष्य मत्सराच्या दडपणाने या खोट्या उपपत्तीचा आधार घेतो आणि पराचा कावळा करतो. म्हणून जिथे व्यभिचाराचा अर्थ पति-पत्नीखेरीज अन्य कोणा व्यक्तीचा जाणीवपूर्वक अधिकानुराग (preference) असा नसेल, तिथे तो घटस्फोटाकरिता पुरेसे कारण मानण्यात येऊ नये.
असे म्हणताना मी हे गृहीत धरतो आहे की व्यभिचारातून अपत्यसंभव होणार नाही. जिथे अनौरस संततीचा प्रश्न येतो तिथे हा प्रश्न अधिक गुंतागुंतीचा होतो. जिथे ही अनौरस मुले पत्नीची असतात तिथे हे विशेष गुंतागुंतीचे होते, कारण अशा प्रकरणांत जर विवाह कायम राहिला तर पतीला दुसऱ्या कुणाचे तरी मूल वाढवावे लागते, आणि जर लोकापवाद टाळायचा असेल ते आपले मूल म्हणून वाढवावे लागते. हे विवाहाच्या जीवशास्त्रीय आधाराविरुद्ध जाणारे आहे, आणि त्याने असह्य सहज प्रवृत्तिक ताणही सहन करावा लागतो. या कारणास्तव संततिप्रतिबंधक साधनांच्या शोधापूर्वी व्यभिचाराविषयी जो निषेध वाटेतो कदाचित् समर्थनीय मानावा लागेल. परंतु आता संततिप्रतिबंधक साधनांमुळे लैंगिक संबंध आणि अपत्य निर्मितीसाठी भागीदारी असलेला विवाह यांत भेद करणे अधिक शक्य झाले आहे.
ज्या कारणांमुळे घटस्फोट इष्ट ठरेल ती दोन प्रकारची आहेत. एक प्रकार ज्यात एका भागीदाराचे न्यून किंवा दोष, उदा. वेड, दारुडेपणा, गुन्हेगारी, हे कारण असते त्यांचा, आणि दुसरा ज्यात पती आणि पत्नी यांच्या संबंधावर आधारलेले कारण असते त्यांचा. असे असू शकेल की विवाहित जोडप्याला गुण्यागोविंदाने, किंवा एकाच्या मोठ्या त्यागाशिवाय राहणे शक्य नाही, आणि तरी यात कोणालाही दोष देता येत नाही. किंवा असेही असू शकेल की नवरा आणि बायको दोघांनाही महत्त्वाचे काम करायचे असेल, आणि त्याकरिता त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी राहणे अवश्य असेल. असेही असू शकेल की एकाचे दुसऱ्याविषयी नावड उत्पन्न न होता, तिसऱ्याच व्यक्तीशी गाढ सख्य होते, इतके गाढ की त्यामळे आपला विवाह हे असह्य बंधन वाटू लागते. अशा स्थितीत जर त्यावर कायदेशीर उपाय नसेल, तर द्वेषही निर्माण होऊ शकतो. खरे म्हणजे अशा प्रकरणांत खुनापर्यंत मजल जाऊ शकते हे सर्वज्ञात आहे. जिथे जोडीदार अनुरूप नसल्यामुळे, किंवा एका जोडीदाराला तिसऱ्याच व्यक्तीविषयी वाटणाऱ्या अनावर आसक्तीमुळे, विवाह उद्ध्वस्त होतो, तिथे सध्या आहे तशी दोषारोप करण्याची जरूरी असू नये, अशा प्रकरणात घटस्फोटाकरिता परस्परसंमती हे पुरेसे कारण मानले जावे. उभयतांची संमती याखेरीज अन्य कारणे जिथे विवाह एका जोडीदारातील विशिष्ट दोषामुळे फसला असेल तिथेच अवश्य मानली जावीत.
घटस्फोटाविषयीचे कायदे करण्यात एक फार मोठी अडचण अशी आहे की कायदे काहीही असले तरी न्यायाधीश आणि ज्यूरी दोघेही आपल्या तीव्र भावनांनी प्रभावित झाल्याशिवाय राहात नाहीत, आणि तसेच पती आणि पत्नी घटस्फोटाला अवश्य मानलेल्या सर्व गोष्टी करण्यास तयार असतात. जिथे पती आणि पत्नी यांचे संगनमत असते तिथेघटस्फोट दिला जात नाही असा जरी इंग्लिश कायदा असला, तरी प्रत्यक्ष व्यवहारात असे संगनमत अनेकदा असते हे सर्वांना माहीत असते. क्रौर्य हे तत्त्वतः घटस्फोटाकरिता अगदी पुरेसे कारण आहे. परंतु त्याचा अर्थ पुष्कळदा हास्यास्पद होईल असा लावला जाणे शक्य आहे. जेव्हा एका अतिशय प्रसिद्ध सिनेनटाला त्याच्या बायकोने क्रौर्याच्या कारणास्तव घटस्फोट दिला तेव्हा क्रौर्याचे एक उदाहरण म्हणून तो घरी कांट या तत्त्वज्ञाविषयी बोलणारे मित्र आणत असे हे तिने दिले होते. या गोंधळ, छद्म आणि बहाणे यांतून मार्ग म्हणजे जिथे वेडासारख्या निश्चित आणि सिद्ध करण्यासारख्या कारणास्तव एकतर्फी घटस्फोटाची मागणी नसेल अशा सर्व प्रकरणांत उभयसंमतीने घटस्फोटाला मान्यता देणे, अशा प्रकरणांत त्यातील पक्षांना पैशाची व्यवस्था कोर्टाबाहेर करावी लागेल, आणि दुसरा जोडीदार अन्यायाचा पुतळा आहे हे सिद्ध करण्याकरिता डोकेबाज वकील नेमावे लागणार नाहीत, मी असेही म्हणेन की जिथे लैंगिक संबंध अशक्य असतात तिथे ज्याप्रमाणे विवाह झालाच नाही असा निकाल सध्या मिळतो त्याप्रमाणे जिथे विवाह निरपत्य असेल तिथे तो निकाल केवळ अर्जावर मिळावा. म्हणजे ज्यांना अपत्य नाही असे पतिपत्नी जेव्हा विभक्त होऊ इच्छितात तेव्हा पत्नी गरोदर नाही असे वैद्यकीय प्रमाणपत्र आणल्यास त्यांना तसे करू द्यावे. अपत्य हे विवाहाचे प्रयोजन आहे, आणि जिथे विवाह निरपत्य असेल तिथे स्त्रीपुरुषांना बांधून ठेवणे क्रूर फसवणूक आहे.”
हे घटस्फोटाच्या कायद्याविषयी झाले; रूढीची गोष्ट वेगळी आहे. आपण पाहिलेच आहे की कायद्याने घटस्फोट सोपा करणे शक्य आहे, पण रूढीमुळे त्याचा वापर विरळ होतो. अमेरिकेत घटस्फोटांचे प्रमाण इतके जास्त आहे याचे कारण, मला वाटते, अंशतः हे आहे की लोक विवाहातून जे अपेक्षू नये त्याची अपेक्षा करतात, आणि याचे कारण व्यभिचार सहन केला जात नाही हे अंशतः आहे. विवाह ही एक भागीदारी आहे, आणि ती निदान मुले तरुण होईपर्यंत टिकावी असा तिचा उद्देश असावा. ती कोणाच्याही तात्कालिक प्रेमप्रकरणामुळे भंग पावणारी नसावी. कारण जर एखादी स्त्री दर दोन वर्षांनी नवा नवरा करील आणि प्रत्येकाकडून तिला एक मूल होईल, तर याचा परिणाम एवढाच होईल की त्या मुलांना बाप मिळणार नाही, आणि विवाहाचे उद्दिष्ट विफल होईल.
विवाहाचा विचार अपत्यांच्या संबंधात केला गेल्यास एक नवीच नीती त्यात प्रविष्ट होते. जर पती आणि पत्नी यांना आपल्या अपत्यांचे प्रेम असेल तर ते आपले वर्तन अशा त-हेने नियमित करतील की ज्यामुळे त्यांच्या मुलांना सुखी आणि निरोगी वाढ होण्याची अत्युत्कृष्ट संधी मिळावी. याकरिता त्यांना अनेकदा संयम करावा लागेल, आणि त्याकरिता त्या दोघांनाही हे ओळखावे लागेल की आपल्या काव्यात्म (romantic) भावनांपेक्षा मुलांचा हक्क वरचढ आहे. जर वात्सल्यभावना सच्ची असेल आणि खोट्या नीतिकल्पनांनी मत्सराग्नी चेतविला गेला नसेल, तर सर्व गोष्टी आपोआप स्वाभाविकपणे घडून येतील. काही लोक म्हणतात की जर पतिपत्नींचे उत्कट प्रेम नाहीसे झाले असेल, त्यांनी जर परस्परांच्या विवाहबाह्य संबंधावर प्रतिबंध ठेवला नाही, तर त्यांना मुलांच्या शिक्षणात पुरेसे सहकार्य करता येणार नाही. उदा. मि. वॉल्टर लिपमन म्हणतात : ‘पतिपत्नी जर प्रेमी नसतील तर बरलूंड रसेल म्हणतात त्या प्रकारे ती मुलांच्या संगोपनात खरे सहकार्य करू शकणार नाहीत. त्यांच्या अवधानात विक्षेप येईल. त्यांचे सहकार्य अपुरे पडेल, आणि सर्वात वाईट म्हणजे ती फक्त कर्तव्य बजावतील.’ यात प्रथमतः एक छोटीशी चूक, बहुधा अनुद्दिष्ट अशी, आहे. जी पतिपत्नी प्रेमी नसतील ती अपत्यांना जन्म देण्यात सहकार्य करणार नाहीत; परंतु झालेली मुले नाहीशी होत नाहीत. आणि उत्कट प्रेम नाहीसे झाल्यानंतर मुलांच्या संगोपनात सहकार्य करणे हे शहाण्या आणि वत्सल व्यक्तींच्या दृष्टीने अतिमानुष कर्म नव्हे. याविषयी मी माझ्या स्वतःच्या अनुभवातून कितीतरी उदाहरणे सांगू शकतो, अशी मातापितरे ही फक्त कर्तव्यप्रेरित असतील असे म्हणणे वात्सल्यभावाकडे दुर्लक्ष करणे होय. ही भावना जिथे प्रबल असते तिथे ती पती आणि पत्नी यांमध्ये त्यांचे परस्परांवरील उत्कट प्रेम नाहीसे झाल्यानंतर किती तरी काळ अविच्छेद्य असा बंध बनून राहते. मि. लिपमन यांनी फ्रान्स देशाचे नाव ऐकले नसावे असे म्हणावे लागते. कारण तिथे कुटुंब मजबूत आहे, व्यभिचाराच्या बाबतीत पुष्कळ मोकळीक असूनही कुटुंब मजबूत आहे, आणि आईबाप अतिशय कर्तव्यदक्ष असतात. कौटुंबिक भावना अमेरिकेत अतिशय दुर्बल आहे, आणि घटस्फोटाचे मोठे प्रमाण त्याचा परिणाम आहे. जिथे कुटुंबभावना प्रबल असेल तिथे घटस्फोट सुलभ असला तरी कमी प्रमाणात होईल. अमेरिकेत आढळणारा सुलभ घटस्फोट हा उभयपित्रीय (biparental) कुटुंबापासून मात्रीय कुटुंबाकडे चाललेल्या संक्रमणातील एक अवस्था आहे. मात्र ही अवस्था
(१. संस्कृतमध्ये व मराठीत parent’ या अर्थाचा शब्द नाही. परंतु ‘माता च पिता च पितरौं या अर्थाचा ‘पितरों हा शब्द संस्कृतमध्ये आहे. त्यापासून ‘उपयपित्रीय, म्हणजे ज्यात माता व पिता दोन्ही आहेत असे कुटुंब. )
अपत्यांच्या दृष्टीने बरीच कष्टप्रद आहे, कारण प्रचलित जगात मुलांना माता आणि पिता या दोघांच्याही कुटुंबाची अपेक्षा असते, आणि त्यांना पित्याचा लळा लागलेला असू शकतो. जोपर्यंत उभयपित्रीय कुटुंब हा नियम राहील तोपर्यंत अतिशय गंभीर कारणांवाचून घटस्फोट घेणारे पतिपत्नी आपल्या अपत्यविषयक कर्तव्यात चुकतात असे मला वाटते, परंतु कायद्याने त्यांना विवाहित ठेवण्याने काही साधेल असे मला वाटत नाही. माझ्या मते प्रस्तुत प्रकरणी अवश्य असणाऱ्या गोष्टी म्हणजे प्रथम, एका विशिष्ट प्रमाणात परस्पर स्वातंत्र्य, आणि दुसरे, मुलांच्या महत्त्वाची जाणीव. पण ही सेंट पॉल आणि कल्पनात्मतेचे आंदोलन (Romantic Movement) यांच्या प्रभावामुळे लैंगिक अंगावर दिल्या गेलेल्या भराने गुदमरून गेली आहे.
या सर्व विवेचनाचा निष्कर्ष असा आहे की काही देशांत (उदा. इंग्लंडमध्ये) घटस्फोट अति कठीण असला तरी सुलभ घटस्फोट हे विवाहाच्या समस्येचे खरे उत्तर नव्हे. विवाहाचे स्थैर्य अपत्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. परंतु हे स्थैर्य प्राप्त होण्याकरिता विवाह आणि केवळ लैंगिक संबंध यात फरक करावा लागेल, आणि विवाहाच्या कल्पनात्म अंगापेक्षा त्याच्या जीवशास्त्रीय अंगावर भर द्यावा लागेल. वैवाहिक जीवनाची कठीण कर्तव्यातून सुटका होऊ शकते अशी बतावणी मी करू शकत नाही. मी ज्या व्यवस्थेची शिफारस करतो आहे तिच्यांत स्त्रीपुरुषांची लैंगिक एकनिष्ठेच्या कर्तव्यातून सुटका होते हे खरे आहे. परंतु त्यांना त्याऐवजी मत्सरावर नियंत्रण ठेवावे लागेल. सुजीवन हे आत्मसंयमावाचून जगता येत नाही; परंतु उदार आणि व्यापक भावनेपेक्षा विद्वेषी आणि संकोचकारी भावनेवर नियंत्रण ठेवणे श्रेयस्कर आहे. नीतिमंतांची चूक झाली ती त्यांनी आत्मसंयमाची मागणी केली यात नव्हे, तर ती चुकीच्या क्षेत्रात केली ही आहे.

अनुवादक : म. गं. नातू

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.