सेक्युलरिझम्

आजचा सुधारक च्या संपादकांनी ‘सेक्युलरिझम् ‘ वर मला लिहावयाला सांगितले, याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. त्यांची प्रश्नावली आणि त्यानंतर आमचे मित्र श्री दिवाकरराव मोहनी यांचे आजचा सुधारकमधील लेख मी वाचले. त्या लेखातील प्रत्येक मुद्याला उत्तर देण्याऐवजी प्रथम आपली भूमिका विशद करावी आणि या विशदीकरणातून त्यांचे काही मुद्दे सुटले, तर त्यांचा परामर्श घ्यावा, असे मी ठरविले आहे. संपादकांनी घालून दिलेल्या शब्दमर्यादेचा भंग न करता मी हे करणार आहे. त्यामुळे काही मुद्दे सुटण्याचीही शक्यता आहे. पण आजचा सुधारक मध्ये या विषयावर चर्चा चालू राहणार आहे. तेव्हा आवश्यकता वाटल्यास त्या चर्चेत मीही भाग घेईन.

अनुवाद भ्रमोत्पादक
‘सेक्युलरिझम्’ हा इंग्रजी भाषेतून आलेला शब्द आहे. ‘सेक्युलर स्टेट’च्या संदर्भात तो आला आहे. मला वाटते ‘सेक्युलर’ आणि ‘सेक्युलरिझम्’ यांचे भाषिक अनुवाद करू नयेत. जसे ‘धर्म’ या शब्दाचा अनुवाद करू नये. आपण सेक्युलरिझम्’चा धर्मनिरपेक्षता असा अनुवाद करीत असतो, आणि सेक्युलर स्टेट हे धर्मनिरपेक्ष राज्य होय असे मानतो. मला हे अनुवाद मान्य नाहीत. कारण ‘धर्म’ याचा अर्थ फार व्यापक आहे. त्याचा ऊहापोह पुढे मी करणार आहे. पण येथे किती प्रकारे ‘धर्म’ शब्दाचा आपल्या व्यवहारात उपयोग होता, आणि ‘धर्म’ शब्दाचा इंग्रजीत ‘रिलिजन’ असा जो अनुवाद करण्यात येतो, तो किती भ्रमोत्पादक आहे, हे सूचित करून जातो.

मार्गाने जात असताना मी ‘धर्मकाटा’ असा फलक बघतो. त्याचा अनुवाद ‘रिलिजस बॅलेन्स’ असा कोणी करीत नाही. आपल्या येथे धर्मशाळा असते, धर्मार्थ दवाखाना असतो. त्यांचेही अनुवाद अनुक्रमे स्कूल फॉर रिलिजन आणि हॉस्पिटल फॉर रिलिजन असे करण्यात येत नाही. स्त्रीधर्म, पुत्रधर्म, राजधर्म, मानवधर्म, असेही शब्दप्रयोग आपण वाचलेले आणि ऐकलेले आहेत. त्या प्रयोगातही ‘धर्म’ शब्दाचा अर्थ ‘रिलिजन’ असा आपल्याला अभिप्रेत नसतो. श्रीमद्भगवद्गीतेत ‘यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्’ असा श्लोक आहे. येथेही ‘धर्म’ याचा अर्थ ‘रिलिजन’ नाही. दुर्योधन पूजापाठ करीत असे. यज्ञ करीत असे. ऋषिजनांचा आदर करीत असे. दुर्वास ऋषीला त्याने आपलेसे करून पांडवांची सत्त्वपरीक्षा घ्यायला वनात पाठविल्याची कथा सर्वाच्या परिचयाची असेलच, म्हणजे दुर्योधन ‘रिलिजन’चे पालन करीत होता असे आपण म्हणू शकतो. तेथेच ‘धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे’ – म्हणजे प्रत्येक युगात धर्माची संस्थापना (नुसती स्थापना नव्हे) करण्याकरिता मी जन्म घेतो असे म्हटले आहे. हा धर्म कोणता? रिलिजन नक्कीच नाही. ‘मनुस्मृति’ या नावाने ज्या ग्रंथाचा उल्लेख होतो. त्याचे खरे नांव मानवधर्मशास्त्र आहे. या मानवधर्मशास्त्राचा अर्धा भाग ‘रिलिजन’शी संबंधित नाही. त्याचा एक संपूर्ण अध्याय ‘राजा आणि त्याचे कर्तव्य’ या विषयाला दिला आहे. त्याच्या पलिकडच्या प्रदीर्घ अध्यायात राजाने कर कसे व किती लावावे याची माहिती आहे. नंतरच्या अध्यायात वारसा हक्काचे नियम सांगितले आहेत. नंतर अपराधांना शिक्षा आणि प्रायश्चित्ते यांचे वर्णन आहे. आणि तरीही मनुस्मृती हा धर्मग्रन्थ आहे. म. म. डॉ. पां. वा. काणे यांनी ‘हिस्ट्री ऑफ धर्मशास्त्र’ या नावाचे प्रचंड ग्रंथ इंग्रजीत लिहिले आहेत. त्यांना ‘रिलिजन’ हा शब्द अज्ञात होता म्हणून त्यांनी ‘हिस्ट्री ऑफ रिलिजस सायन्सेस’ हे नाव आपल्या ग्रंथांना दिले नाही, असे म्हणण्याची कुणाची प्राज्ञा असेल, असे मला वाटत नाही, याशिवाय हिंदू धर्म, बौद्ध धर्म इस्लाम धर्म ख्रिस्ती धर्म असे शब्दप्रयोग आपण करतो आणि त्या साऱ्या संकल्पना ‘रिलिजन’ या शब्दाने व्यक्त करण्याचा आपला आग्रह असतो. या आग्रहामुळेच आम्ही ‘धर्मराज्य’ म्हटले की ते ‘रिलिजस स्टेट’ किंवा ‘थिओटिक स्टेट’ असे त्याचे भाषांतर करून आम्हाला झोडपण्याची प्रक्रिया सुरू होते, असे मला सूचित करावयाचे आहे की ‘सेक्युलर’ शब्द तसाच राहू द्यावा आणि ‘धर्मनिरपेक्ष’ हे त्याचे भाषांतर टाळावे. भाषांतराचा आपला आग्रहच असेल, तर त्याला ‘संप्रदाय-निरपेक्ष’ असे म्हणावे.

सेक्युलरिझम’चा इतिहास
‘सेक्युलरिझम’ची संकल्पना युरोपखंडातून आपणाकडे आली. एवढ्यावरून ती त्याज्य आहे असे नाही. तेथे राज्यसत्ता व पुरोहितसत्ता एकत्र एकवटली होती. ती अनेक कारणांस्तव अनेकांना जाचक ठरली. इंग्लंडच्या आठव्या हेन्रीला एका स्त्रीशी विवाह करण्याच्या बाबतीत तत्कालीन पोप महाशय आडवे आले म्हणून त्याने पोपचे वर्चस्व झुगारले आणि ‘चर्च ऑफ इंग्लंड स्थापन केले. अजूनही इंग्लंडच्या राजाला ‘डिफेंडर ऑफ द फेथ असा किताब आहे. तेथे रोमन कॅथॉलिक राजा बनू शकत नाही, तरी ते ‘सेक्युलर स्टेट आहे, असे लोक समजतात. जर्मनीमध्ये एका प्रबल राजकीय पक्षाचे नाव ‘ख्रिश्चन डेमोक्रॅटिक पार्टी आहे. तिच्यातील ‘ख्रिश्चन या विशेषणाला राजकीय क्षेत्रात कुणाचा विरोध असल्याचे माझ्या ऐकिवात नाही. आणि जर्मनी ‘सेक्युलर स्टेट आहे. ‘पोप’च्या रिलिजनच्या क्षेत्रातील दादागिरीलाही विरोध झाला. त्या दादागिरीचा ‘प्रोटेस्ट करण्यात आला. हा प्रोटेस्ट’ करणारे ‘प्रोटेस्टंट’ बनले. या मंडळींना आपल्या राज्यात पोपचा हस्तक्षेप अमान्य होता. म्हणून त्यांनी राज्य सेक्युलर असले पाहिजे असे म्हटले. बहुधा जोसेफ मॅझिनीने या शब्दाचा प्रथम प्रयोग केला असावा. याचा अर्थ तेथे असा निष्पन्न झाला की राजाला आणि प्रजेलाही ‘रिलिजन राहील. मात्र राज्याचा ‘रिलिजन राहणार नाही. असे असले. तरी राज्यातील लोक आपले ‘रिलिजन पाळतील व राजा किंवा राज्य त्याला विरोध करणार नाही.

जेथे लोकशाही आहे, तेथे बहुसंख्यकांचे राज्य राहणार हे उघड आहे.(बहुसंख्यक असाच शब्द वापरावा. ‘बहुसंख्याक’ किंवा ‘बहुसंख्यांक’ हे शब्द भाषाशास्त्रीयदृष्ट्या चूक आहेत.) आणि बहुसंख्य लोक जर विशिष्ट रिलिजनचे किंवा विशिष्ट संप्रदायाचे असले, तर त्याचा परिणाम आणि प्रभाव तेथील राज्यसत्तेवर दिसणे स्वाभाविकच आहे.. अमेरिका (म्हणजे यू. एस्.ए.) ‘थिऑङ्कटिक स्टेट’ नाही. म्हणजे त्या राज्याचा कोणताही रिलिजन किंवा संप्रदाय नाही. तरी आतापर्यंत जेवढे म्हणून त्या राज्याचे अध्यक्ष निर्वाचित झाले. ते एकमात्र अपवाद वगळता सारेचे सारे ‘प्रोटेस्टंट पंथाचे होते. एकदाच एक रोमन कॅथॉलिक अध्यक्ष बनले. त्यांची कारकीर्द पूर्ण होण्याच्या पूर्वीच त्यांना ठार करण्यात आले. ही फार जुन्या काळची गोष्ट नाही. १९६४ सालची आहे. जॉन केनेडी हेच ते अध्यक्ष होत. ते ज्या निवडणुकीत विजयी झाले, त्या निवडणुकीत रिचर्ड निक्सन हे त्यांचे प्रतिस्पर्धी होते. रिचर्ड निक्सन यांनी त्या निवडणुकीत केनेडी यांच्याविरुद्ध प्रचार करतांना ‘ते रोमन कॅथॉलिक असल्यामुळे पोपकडून आदेश घेतील व अशा रीतीने अमेरिकेचे स्वातंत्र्य धोक्यात आणतील असा प्रचार केला होता. तो समर्थनीय होता, असे मला सूचित करावयाचे नाही, परंतु निवडणुकीत प्रचार कसा केला जाऊ शकतो याचा नमुना म्हणून हा प्रसंग सांगितला आहे. अमेरिकेत ज्यूंची संख्या १६ टक्के आहे. तरी पण अद्यापि एकही ज्य तेथे अध्यक्ष बन शकला नाही. आणि तरीही अमेरिका हे ‘सेक्यलर स्टेट आहे. कारण ज्यू असो की रोमन कॅथॉलिक असो, त्याला अध्यक्ष बनण्याला तेथे मज्जाव नाही. त्याचप्रमाणे आपण ‘सेक्युलर’ हे दाखविण्यासाठी मुद्दाम एखाद्या ज्यूला राष्ट्राध्यक्ष करण्याची त्याला गरज वाटत नाही.

धर्माचे सांगणे
आपला देश स्वतंत्र झाल्यानंतर आपल्या देशाचे संविधान बनविताना आपले राज्य ‘सेक्युलर’ असावे म्हणजे राज्याचा कोणताच अधिकृत ‘रिलिजन नसावा, हे आपल्या संविधानकर्त्यांना अभिप्रेत होते. तरी पण संविधानात त्यांनी ‘सेक्युलर’ शब्दाचा अंतर्भाव केलेला नव्हता. ‘राज्य हे सेक्युलरच असते अशी त्यांची धारणा असावी. हिंदुत्वाचीही हीच धारणा आहे.’सेक्युलर’ शब्दाचा संविधानात अंतर्भाव १९७६ साली आणीबाणीच्या विशेष परिस्थितीत संविधानात संशोधन करून करण्यात आला. याचा अर्थ १९७६ पूर्वी राज्य सेक्युलर नव्हते किंवा ते कमी सेक्युलर होते आणि १९७६ साली ते अधिक सेक्युलर झाले असा नाही. बहुसंख्य संविधानकर्ते आणि त्यानंतरचे बहुतेक सगळे राज्यकर्ते स्वतःला म. गांधीचे अनुयायी म्हणवीत. पण म. गांधी ‘धर्मनिरपेक्ष नव्हते. राजकारणातही ‘धर्म असावा या मताचे ते होते.

तुर्कस्थानात ‘खलिफा म्हणजे राज्यसत्ता आणि मजहबी सत्ता एकत्र असणारे पद असावे यासाठी त्यांनी हिंदुस्थानात आंदोलन उभारले होते. आताच्या तथाकथित सेक्युलरवाद्यांनी या मुद्यावरून म. गांधीचा निषेध केल्याचे ऐकिवात नाही. वस्तुतः म. गांधींचे खिलाफतीचे आंदोलन अत्यंत गैर होते. ‘थिओक्रसी’चा पुरस्कार करणारे होते. अशा हिंदुत्वाला राज्य सेक्युलर’ असावे, हेच अभिप्रेत आहे. म्हणजे राज्याचा कोणता तरी एक अधिकृत उपासनासंप्रदाय नसावा आणि त्याने कोणत्याही उपासनासंप्रदायाचा पुरस्कार व आग्रह करू नये, असा त्याचा अर्थ आहे. इस्लामच्या आक्रमणापूर्वी जे हिंदू राजे होऊन गेले ते स्वतः वैयक्तिक आचरणात कोणता तरी उपासनासंप्रदाय स्वीकारून असले तरी ते सर्वांचा समादर करीत, व आपलाच संप्रदाय सर्वांनी मानला पाहिजे असा त्यांचा आग्रह नसे. सम्राट हर्षवर्धन वैदिक हिंदू असूनही वेदप्रामाण्य न मानणाऱ्या संप्रदायांच्या भिडूंचा आणि विद्वानांचाही सत्कार करून त्यांना दाने देत असे, असे नमूद आहे. याचा अर्थ त्यांना जसे ‘धर्मराज्य’ अभिप्रेत होते, तसेच सेक्युलर’ राज्यही मान्य होते. कारण राज्य सेक्युलर’ असावे हे धर्माचेच सांगणे आहे. हे कसे ते येथे सांगतो.

‘यतोऽभ्युदयनिःश्रेयससिद्धिः स धर्मः’ अशी धर्माची एक व्याख्या आहे. ज्यामुळे अभ्युदय व निःश्रेयस यांची सिद्धी होते तो धर्म, असा या व्याख्येचा अर्थ आहे. अभ्युदयाचा संबंध ऐहिकाशी आहे. निःश्रेयसाचा संबंध संप्रदायाशी आणि उपासनेशी आहे. तो श्रद्धेचा विषय आहे. राज्याचा संबंध अभ्युदयाशी असल्यामुळे राज्य ऐहिक असले पाहिजे, हे ओघानेच आले. फक्त ते निःश्रेयसाच्या विरोधात किंवा त्याला बाधा उत्पन्न करणारे नसले पाहिजे. लोकांना मोकळेपणाने निःश्रेयसाची साधना करता आली पाहिजे, या बाबतीत त्यांच्या ज्या श्रद्धा आहेत, त्या त्यांना बाळगता आल्या पाहिजेत आणि त्या श्रद्धानुरूप वागता आले पाहिजे, हे बघणे राज्याचे कर्तव्य आहे. आपल्या सध्याच्या राष्ट्रसंघानेही एवढे मान्य केलेले आहे.

कम्युनिस्ट तत्त्वप्रणाली मानणाऱ्या देशांमध्ये तेथील सत्ताधीशांनी सेक्युलर स्टेट स्थापन करण्याचे ठरविले. कोणत्याही रिलिजनवर त्यांचा विश्वास नसल्यामुळे त्यांनी ‘सेक्युलर स्टेट चा उद्घोष करावा यात आश्चर्य नाही. पण त्यांनी लोकांना त्यांच्या श्रद्धेप्रमाणे उपासना करण्याचेही स्वातंत्र्य ठेवले नाही. कारण ‘रिलिजन त्यांच्या दृष्टीने अफूची गोळी होती. आता त्या ‘अफूची उपयोगिता त्यांना पटली हा भाग वेगळा. हिंदुत्व उपासना-स्वातंत्र्याचे पक्षघर आहे आणि त्याचबरोबर सेक्युलर स्टेटचेही पक्षधर आहे.

छद्मी सेक्युलरिझम्
याच भूमिकेतून ‘सर्वधर्मसमभावा ची कल्पना उद्भूत होते. येथे ‘धर्म याचा ‘रिलिजन असाच संकुचित अर्थ स्वीकारण्यात आलेला आहे. ‘सेक्युलर शब्दाचा अर्थ कोणत्याही कोषात सर्वधर्मसमभाव असा दिलेला नाही. पण आपण तो रूढ केलेला आहे. हिंदुत्वाचा त्याला विरोध असण्याचे कारणच नाही. उलट ते तर त्याचे खास असे वैशिष्ट्य आहे. ‘पाक आणि काफीर,’दारुल इस्लाम’ आणि ‘दारुल हरब, ‘ख्रिश्चन आणि हीदन असे दैत हिंदुत्वाने मानलेले नाही. परंतु ज्यांनी स्वतःला ‘सेक्युलर मानले त्यांचे वर्तन, सर्वधर्मसमभावाला अनुरूप राहिलेले नाही. ‘सेक्युलर’ चा अर्थ ऐहिक असेल, तर राज्याच्या मुख्य मंत्र्यांनी सरकारी इतमामाने पंढरीच्या विठ्ठलाची पूजा करण्याचे कारण नाही. शरद पवार व्यक्ती म्हणून कोणाचीही पूजा करू शकतात. मुख्यमंत्री म्हणून नाही. राज्यकर्त्याचे अनेक प्रकारचे सांप्रदायिक कर्मकांड दूरदर्शनवर दाखविले जाते. ते राज्याच्या ऐहिकतेशी विसंगत आहे. तेव्हा हे मान्य व्हावे की आमच्या सेक्युलरवादी राज्यकत्यांना सेक्युलर’ याचा ऐहिक हा अर्थ मान्य नाही, ‘सर्वधर्मसमभावी हाच अर्थमान्य आहे. तेही चांगलेच आहे. तेव्हा त्याप्रमाणे त्याचे वर्तन असावे पण ते असत नाही. ‘सेक्युलर’ राज्याने कोणत्याही संप्रदायाचा विचार न करता सर्वांविषयी समान दृष्टिकोण ठेवून आणि सर्वांसाठी समान नियम करून राज्य केले पाहिजे. सर्वांसाठी समान कायदा त्याने केला पाहिजे. पण ते तसे करीत नाही. ते ‘हिंदू कोड बनविते. ‘नागरी कोडाचे त्याला वावडे असते. एका विशिष्ट प्रदेशात मुसलमान जास्त आहेत. आणि जास्त तरी किती तर मुंबई शहराच्या अर्ध्याइतकेही नाही, तरी त्या प्रदेशासाठी वेगळे ३७० वे कलम असते. विशिष्ट संप्रदायांच्या अनुयायांनी शिक्षण-संस्था काढल्या तर त्याला सरकारचे सर्वसामान्य नियम लाग होत नाहीत. देशातल्या सर्वोच्च न्यायालयाने कायद्याच्या आणि मानवतेच्या भूमिकेतून एखादा निर्णय दिला, तर त्या निर्णयाला निष्प्रभ करण्यासाठी संविधानात बदल करण्याचे टोकाचे पाऊल उचलले जाते. आणि हे कशासाठी तर एका संप्रदायाचा त्या निर्णयाला विरोध असतो म्हणून ! ही खुशामतखोरीची प्रवृत्ती निर्लज्जपणे सर्वत्र धुमाकूळ घालते. मग ‘वंदे मातरम्’ वर बंदी येते. कुसुमाग्रजांच्या कवितेवर आक्षेप घेतला तर तोही मान्य केला जातो. सलमान रशदीच्या पुस्तकावर बंदी घालण्यात येते. मिझोराममध्ये ख्रिश्चन रिलिजननुसार राज्य चालविण्याचेच आश्वासन दिले जाते आणि मुसलमानांसाठी वेगळे फायनान्स कार्पोरेशन काढण्याचा मनोदय व्यक्त होतो. हे सारे छा सेक्युलरिझम् चे नान आविष्कार आहेत. नाव सेक्युलरिझमचे घ्यावयाचे आणि मतांच्या लालचेपायी असो अथवा अन्य कारणाने असो, सांप्रदायिक अल्पसंख्यकांची खुशामत करावयाची याला ढोंगीपणा म्हणावयाचे नाही तर काय म्हणावयाचे?

हा ढोंगीपणाही सहन करता आलाअसता. आपण अनेक ढोंगे सहन करतो की नाही। परंतु या ढोंगी सेक्युलरिझमने राष्ट्र दुर्बल बनते. राष्ट्राची आधारभूत शक्ती असलेला बहुसंख्य समाज त्यामुळे कुंठित होतो. उत्पीडित होतो. आपण अल्पसंख्य व्हावे असे त्याला वाटू लागते. रामकृष्ण मिशनलाही न्यायालयात आपण हिंदू नाही असे प्रतिज्ञापत्र लिहून देण्याची पाळी येते. तर दुसरीकडे राष्ट्रीय एकात्मतेचा मार्ग अवरुद्ध होतो. आपला रिलिजन किंवा मजहब वेगळा म्हणून आपले राष्ट्र वेगळे अशी भावना बळावते. ते मग रिलिजस राइट्स् मागून संतुष्ट होत नाहीत. अधिकाधिक वेगळे असे सामाजिक, नागरिक आणि राजकीय हक्क मागू लागतात, आणि शेवटी आपले राज्य वेगळे हवे याची मागणी करतात. राज्य का वेगळे हवे? तर राष्ट्र वेगळे आहे म्हणून ! १९४७ साली या आधारावर फाळणीची मागणी करण्यात आली आणि ती मान्य करण्यात आली. आता पंजाबात आणि काश्मीरात तेच चालू आहे. हिंदूंच्या मानसिकतेवर याचा काहीही परिणाम होऊ नये, यासाठी ते मुक्तोऽथवा पशुः या कोटीत पोचले नाहीत. तसे ते पोचू नये, यासाठी हिंदुत्ववाद्यांचे प्रयत्न आहेत. ते प्रयत्न खऱ्या सेक्युलरिझमच्या विरोधातून नाहीत.

धर्माची व्याप्ती
आता श्री. दिवाकरराव मोहनी यांच्या लेखासंबंधी, व्यष्टी, समष्टी, सृष्टी आणि परमेष्टी यांना जोडणारे जे सूत्र ते धर्म होय, असे मी म्हटल्याचे त्यांनी जे नमूद केले आहे ते बरोबर आहे. या अनि हिंदू धर्म आहे. आपण स्वतःसाठी घर बांधतो, तेव्हा ‘धर्म होत नाही. इतरांसाठी बांधतो की ती ‘धर्मशाळा बनते. स्वतःच्या स्वास्थ्याची व्यवस्था करतो तेव्हा तो धर्म नव्हे. जेव्हा इतरांच्या स्वास्थ्याची व्यवस्था करतो तेव्हा तो धर्मार्थ दवाखाना बनतो. व्यष्टीला समष्टीशी अर्थात् समष्टीच्या कल्याणाशी जोडणारे जे जे असेल ते सारे धर्म. म्हणून धर्मकाटा. म्हणून विहीर खणणे, घाट बांधणे, पाणपोई काढणे, दान देणे हे सारे ‘धर्म. व्यष्टी आणि समष्टीला सृष्टीशी जोडतो तोही धर्मच. म्हणून वडाची, आवळीची, तुळशीची पूजा हा धर्म. नदीची, पर्वताची, गाईची पूजा हाही धर्मच. उपयुक्ततावाद्यांनी पर्यावरणाची गोष्ट करावयाला हरकत नाही. सामान्यजनांना धर्माची गोष्ट सहज समजते. व्यष्टी, समष्टी आणि सृष्टी यांना सर्वव्यापी चैतन्याशी म्हणजेच परमेष्टीशी जोडणे हाही धर्मच. म्हणून पूजा हा धर्म. प्रार्थना हा धर्म, ही पूजा कशी करायची, प्रार्थना कशी म्हणायची हे वेगवेगळ्या रीतीने सांगितले जाऊ शकते. ते सारे प्रकार म्हणजे संप्रदाय, सांप्रदायिक असणे वाईट नाही. माझाच संप्रदाय श्रेष्ठ असा अहंकार आणि त्या अहंकारातून जन्मलेली असहिष्णुता आणि त्या असहिष्णुतेतून उत्पन्न होणारा अत्याचार आणि आतंक वाईट, प्रॉटेस्टंट आणि कॅथॉलिक हे संप्रदाय असणे चूक नाही. कॅथॉलिकांनी प्रॉटेस्टंटांना जिवंत जाळणे चूक आहे. मूर्तिपूजेवर विश्वास नसणे हे चूक नाही. पण ज्यांचा आहे, त्यांच्या मूर्ती फोडणे चूक आहे. लाकडाचे काम करणारा शिल्पी, एका विशिष्ट आकाराची वस्तू तयार करतो तेव्हा ती खुर्ची होते. दुसरा आकार दिला तर स्टूल होतो. तिसरा आकार दिला तर टेबल होईल. चौथा आकार दिला तर पार होईल, आणि खुर्चीचे व टेबलाचे तरी प्रकार किती! हे सर्व लाकडाचे संप्रदाय व उपसंप्रदाय होत. पंथोपपंथ होत. पण सर्वामध्ये अनुस्यूत आहे ते लाकूड होय. लाकूड हा मूळ धर्म, बाकी संप्रदाय आणि पंथ, रिया हिंदू धर्माला त्यामुळे सर्व संप्रदाय आणि पंथ चालतात. अमक्याचे सत्याचे दर्शन खरे आणि अमक्याचे खोटे असे तो मानीत नाही. पण माझेच खरे म्हणणारे जेव्हा अत्याचाराला प्रवृत्त होतात, तेव्हा काय करावयाचे हा प्रश्न उपस्थित होतो. काही असे म्हणतात की ते आपण सहन केले पाहिजे म्हणजे असहिष्णुताही सहन केली पाहिजे. ती तुम्ही सहन करू शकणार नसाल, तर तुम्ही सहिष्णू कसे हा त्यांचा सवाल असतो. श्री. मोहनी यांचे प्रतिपादन याच स्वरूपाचे आहे. “हिंदुचे धर्मान्तर होऊच शकत नाही हे त्यांचे प्रतिपादन (आजचा सुधारक, मे १९९१, पृष्ठ २२) असेच आहे. तर्कदृष्ट्या त्यात विसंगती नाही. व्यावहारिक दृष्टीने आहे. तर्क व्यवहारात अनेकदा बसत नाही. मी गणिताचे एक उदाहरण देतो. १० मजूर एक भिंत दहा दिवसांत बांधतात. एका दिवसात भिंत बांधायला १०० मजूर लागतील आणि एका तासात बांधायची असेल तर २४०० मजूर लागतील. आणि एका सेकंदात बांधायची असेल तर १४४०० मजूर लागतील. या गणितात तर्कशास्त्र दृष्ट्या काय चूक आहे? काहीही नाही. तरी व्यवहारात ते शक्य नाही. म्हणून ‘तर्क अप्रतिष्ठः’ असे एका सुभाषितात म्हटले आहे. नवे जागृत हिंदुत्ववादी इतरांची असहिष्णुता सहन करावी या मताचे नाहीत. याला विसंगती म्हणायचे असेल तर खुशाल म्हणावे. अपूर्णता म्हणायची असेल, तर त्यालाही हरकत नाही. मानवी जीवन अशा अपूर्णतांनी आणि विसंगतींनी भरलेलेच आहे.

हिंदुत्वाचा विरोध का?
व्यवहारात हिंदूंचे धर्मान्तर झाले आहे. त्यामुळे केवळ संप्रदायांतर होत नाही. तसे झाले असते, तर चिंतेचे कारण नव्हते. परंतु ते राष्ट्रान्तर होते. नाव बदलते. श्रद्धा बदलतात, परंपरा तुटते, संस्कृति-विच्छेद होतो. आक्रमक असहिष्णुता येते, एवढेच नव्हे तर एक वेगळे समाजान्तरच घडून येते. हिंदुत्ववाद्यांना यात राष्ट्रीय धोका दिसतो. सर्व हिंदूंना तो दिसत नाही हे खरे आहे. पण अनेकांना तो दिसतो हेही खरे आहे. आणि त्यांची संख्या वाढत आहे. मला हिंदुत्वाचा अभिमान आहे. श्री. मोहनी यांना नाही. पण श्री मोहनी यांना आपल्या कुळाचा अभिमान आहे. या कुळात एखादा वेडापीर निघाला. कोणी गटारात लोळणारा दारुडा निपजला तर काय मोहनी कुळाचा अभिमान सोडून देतील? आपल्या कुळाला कलंक लावणाऱ्याला ते सुधारण्याचा प्रयत्न करतील की त्याला कुळातून बहिष्कृत करतील? दोन्ही प्रतिक्रिया संभाव्य आहेत. हिंदुत्ववाद्यांनी स्वजनांना सुधारण्याचा पर्याय स्वीकारला आहे. ज्यांना जुन्या समाजात नवीनता आणावयाची असते, त्यांना प्रयत्नपूर्वक आणावयाचे नवीन तर ज्ञात असावेच लागते, पण जे जुनाट, कालबाह्य आणि त्याज्य आहे त्याचेही भान ठेवावे लागते. शिवाय समाज जिवंत माणसांचा, भावभावना, ग्रह-पूर्वग्रह असलेल्या माणसांचा असल्यामुळे, विचारपूर्वक वागावे लागते, प्रसंगी तर्कालाही मुरड घालावी लागते. सामना हिंदुत्वाला अनेक हिंदू पुढाऱ्यांचा विरोध यासाठी आहे की, त्यांच्या राजकीय शक्तीचे मूळ त्यांच्या जातीच्या संघटनेत आणि जातीय भावनेच्या भक्कमतेत आहे. हिंदुत्वाची भाषा उच्चारली की त्यांचा हा शक्तीचा आधार कमजोर होतो. वैयक्तिक जीवनात ते खूप कर्मनिष्ठ असतात. सर्व कर्मकांडे पाळीत असतात. या कर्मकांडपालनाचे जाहीर प्रदर्शनही करीत असतात. हे सारे कर्मकांड हिंदूंच्या विशिष्ट संप्रदायाचे कर्मकांड असते. परंतु ते हिंदुत्वाचा विरोध करतात. कारण हिंदुत्वाचा व्यापक आधार घेतला की, शक्तीचा संकुचित जातिगत आधार दुबळा होतो. उलट, हिंदुत्ववादी सर्व हिंदूंना (हिंदूची व्याख्या कशीही करा. ज्यांना आपण हिंदू आहोत असे वाटते त्यांनाच हिंदू म्हणा) एकत्र आणणाऱ्या, आणि जातीची किंवा अन्य संकुचित भावना क्षीण करणाऱ्या उपक्रमांवर भर देत असतात. अयोध्येचे राममंदिर हा असा एक उपक्रम आहे. त्या मुद्यावर हिंदु जातपात विसरून मोठ्या संख्येने एकत्र आले. म्हणून भाजपाचा विजय झाला. १९८९ च्या निवडणुकीत हिंदुत्वापेक्षा ‘जात बलवान ठरली म्हणून यादवजातिबहुल अयोध्येतून मित्रसेन यादव हे कम्युनिस्ट उमेदवार विजयी झाले. तो विजय यादवत्वाचा होता, कम्युनिझमचा नव्हता हे वास्तव आपण समजून घेतले पाहिजे. माझे स्वतःचे गाव वर्धा जिल्ह्यात आहे. तेथे तेली जातीच्या लोकांची ७५% संख्या आहे. आमच्या गावातून डाव्या कम्यनिस्ट पक्षाच्या उमेदवाराला इतर सर्व उमेदवारांना मिळून जेवढी मते मिळाली, त्यापेक्षा जास्त मते मिळाली. ज्यांनी रामशिलापूजन केले त्यांनीही त्याच उमेदवाराला मते दिली. ते म्हणाले, ‘आमच्या समाजाचा माणूस उभा आहे. त्याला आम्ही मत देऊ आणि त्याला त्यांनी आपली मते दिली. ‘कम्युनिझम्’ आमच्या गाववाल्यांना माहीत नाही. ‘राम’ माहीत आहे. पण मते कम्युनिस्ट उमेदवाराला पडली. कुणी म्हणेल की तुमच्या गावच्या हिंदूंनी रामाला नाकारले, ‘मार्क्स’ला मानले, तर त्याला तसे म्हणता येईल काय? कोणीही या प्रश्नाचे उत्तर द्यावे. श्री. मोहनी यांनी हिंदूंचे दोन गट कल्पिले आहेत. हिंदुत्वाचा अभिमान असलेला एक गट आणि हिंदुत्वाचा अभिमान नसलेला दुसरा गट. त्यांचे हे कल्पन बरोबर आहे. हिंदुत्वाचा अभिमान नसलेल्यांना हिंदू कोणत्या निकषावर ठरवावयाचे, हा त्यांचा प्रश्न आहे. त्याचे उत्तर असे की, त्यांना आपण हिंदू आहोत असे वाटते, हाच तो निकष आहे. राष्ट्रीयत्वाचा निकष हा मुख्यतः भावनेचा निकष असतो, हे सुज्ञांना ज्ञात आहेच.

अत्याचाराची चिन्हे
रामजन्मभूमि आणि बाबरी मशीद या वादाचाही उल्लेख करण्यात आला. प्रश्न तोच आहे की इतरांची असहिष्णुताही सहन करावयाची काय? काही म्हणतात की सहन केली पाहिजे. आमचे मत तसे नाही. अनेकांचे नाही. मुसलमानांचे कबरस्थान उद्ध्वस्त करून सोमनाथ मंदिर का उभारावयाचे? अहल्याबाई होळकरांनी उभारलेले सोमनाथाचे मंदिर तेथे जवळच होते की? याचे कारण भावना आहे. अत्याचाराची चिन्हेही कुणा वीतराग्याला गौरवाची वाटू शकतात. आम्हाला तसे वाटत नाही. पण वीतरागित्व सोयीनुरूप (selective) नको, व्हिक्टोरियाचा पुतळा चालायचा नाही, वेरावळचे कबरस्थान चालायचे नाही, आणि बाबरी मशिदीचे खंडार मात्र चालावे हे ढोंग आहे. व्यावहारिकता आणि वास्तविकता यांच्या आधारावर हे प्रश्न सोडविले जाऊ शकतात. त्याबाबत तडजोडही होऊ शकते. पण तर्कनिष्ठांना व्यवहारवादाचे वावडे असते. म्हणून ते असे प्रश्न उपस्थित करीत असतात. आणि जेथे मशीद नाही, कोणी नमाज पढायला जात नाही अशा वास्तूंच्या संरक्षणाचा मुद्दा उपस्थित करतात. कुणी म्हणतील की मुसलमानांच्या भावनांचे काय? आता मुसलमानांच्या भावना मूर्तिभंजनात गुंतल्या असतील तर त्यांना सांगावे लागेल की या भावनांची आम्ही कदर करणार नाही. भविष्यातील आक्रमकांच्याही लक्षात यावे की इतरांची श्रद्धास्थाने भग्न करून व त्यांची विटंबना करून तुम्हाला तुमची श्रद्धास्थाने या हिंदुस्थानात उभारता यावयाची नाहीत. तुम्ही हा अत्याचार करू शकलात पण नंतरच्या पिढ्या तो सहन करणार नाहीत. मला माझा हात वाटेल तसा हलवायला स्वातंत्र्य आहे. परंतु तिथपर्यंत की जेथे दुसऱ्याचे नाक सुरू होते. आपले नाक कापले गेले तरी चालेल पण दुसऱ्याला तलवार चालविण्याचे स्वातंत्र्य असले पाहिजे, नाही तर त्यांची भावना दुखेल असाही विचार करण्यात उदात्तता असेलही; पण त्या उदात्ततेचे आम्ही पुरस्कर्ते नाहीत. एका गालावर मारले, तर दुसरा गाल पुढे करावा, असा उपदेश देणारा जगात झाला. पण आम्ही हिंदुत्ववाले त्याचे अनुयायी नाही. त्या उपदेशकांच्या अनुयायांनी केवळ पाव शतकात दोन मानवसंहारक युद्धे जगावर लादली. आणि त्यांच्याजवळच पराकोटीची मानवसंहारक शस्त्रास्त्रे आहेत. विचारांना गौरीशंकराची उंची द्यायची आणि आचरणाला मुंग्यांच्या वारुळाइतकेही उंच होऊ द्यायचे नाही, या विसंगतीला आमचा विरोध आहे. आम्ही तसे युद्धखोर नाही. परंतु आम्हाला आमच्या राष्ट्राचा, आमच्या धर्माचा म्हणजे आमच्या जीवनमूल्यांचा, म्हणजेच आमच्या संस्कृतीचा अभिमान आहे, आणि त्या अभिमानासहित आम्हाला या जगात जगावयाचे आहे. असा ‘संकुचित अभिमान न बाळगणाऱ्या मानवतावादी, किंवा केवळ मानवतावादीच का, अखिल पंचमहाभूतात्मक सृष्टिवादी महानुभावांना आमचे वंदन आहे. त्यांच्याविषयी राग नाही. परंतु आम्हाला अभिप्रेत असलेल्या हिंदुत्वाचा अभिमान धारण करणारे बलवंत राहतील तरच या महानुभावांचा निभाव आहे असा आमचा विश्वास आहे. कारण ते हिंदूच कल्पनाविश्वात रममाण होण्यासाठी आत्मभान हरविणाऱ्या स्वजनांकडे आत्मीयतेने बघू शकतात.

तरोडा, जि. वर्धा

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.