धर्मनिरपेक्षता / सेक्युलरिझम

व्याज-धर्मनिरपेक्षता आणि खरी धर्मनिरपेक्षता असा भेद करणे म्हणजे बौद्धिक अप्रामाणिकपणा होय. सेक्युलरिझम ही संज्ञा ख्रिश्चन परंपरेमधून उगम पावली आहे. ईश्वराला देय असेल ते त्याला दे व राजाला देय असेल ते राजाला दे असा बायबलमध्ये मानवाला उपदेश आहे. त्यामुळे मानवी जीवन हितावह ठरते. भारतीय परंपरेत अशी संज्ञा आढळत नाही. ईश्वरी क्षेत्र आणि मानवी क्षेत्र स्वायत्त आहेत ही भूमिका भारतीय विचारपरंपरेमधे आढळत नाही. आस्तिकता आणि नास्तिकता एकत्र नांदू शकत नाहीत ही भारतीय विचारांची मूलभूत भूमिका आहे. विज्ञानाच्या विकासामुळे पाश्चिमात्य विचारामधील ईश्वरी क्षेत्र व मानवी क्षेत्र अशी द्वन्द्वात्मक स्वायत्तता ही संज्ञा मागील काही शतकात क्षीण होत जाऊन आज अनीश्वरवाद वैचारिक पातळीवर स्थिर होत चालला आहे. मानवी जीवनाच्या विविध प्रश्नांची उकल होण्यासाठी आणि त्यांचे निराकरण होण्यासाठी ईश्वरवादाचा त्याग भारतीय परंपरेत फार प्राचीन काळी झाला. पाश्चिमात्य जगात अलीकडे जे घडले आणि पौर्वात्य जगात जे फार पूर्वी घडले त्यामुळे विश्व-मानवाच्या जाणिवेत सार्वत्रिकपणे एकतर ईश्वरवाद किंवा अनीश्वरवाद अथवा एकतर ईश्वरी क्षेत्र किंवा मानवी क्षेत्र ह्यांपैकी एकच ग्राह्य ठरते. दोन्हीच्या स्वायत्त द्वन्द्वात्मक अस्तित्वाला अर्थशून्यता प्राप्त होते. ह्या वैचारिक गोंधळातून व्याज-धर्मनिरपेक्षता आणि खरी धर्मनिरपेक्षता असा भेद करण्याची प्रवृत्ती उगम पावते.

माझ्या दृष्टीने व्यक्तिगत कायदे नसतातच. कायदे सामाजिकच असतात. सामाजिक व्यवहाराचे नियमन आणि नियंत्रण करण्याची प्रक्रिया चालीरीती, नीती, धर्म आणि कायदा ह्या चार प्रकारच्या नियमसंहिताद्वारा मानवी समाजात पार पाडली गेली आहे. विकासाच्या प्रक्रियेत पहिल्या तीन संहिता क्षीण होत जाऊन कायद्याची संहिता संख्यात्मक आणि गुणात्मक दृष्टीने प्रबळ होत चालली आहे. ह्या चार संहितांचा संबंध समाजरचनेशी असतो. आधुनिक समाजाला अभिप्रेत असलेले मूलभूत हक्क, नागरी स्वातंत्र्ये व मानवीमूल्ये जात-जमातप्रधान समाजरचनेत आकारित होण्यात अडथळे येतात, कारण नव्या गैर समसंबंधांनी निर्धारित झालेल्या रचना स्थिर झालेल्या नसतात. पण नव्या रचना आकारित होण्याची प्रक्रिया सरू असते. त्यामळे जात-जमातीच्या रचनांमध्ये जीवन जगणाऱ्या व्यक्तींना असुरक्षिततेच्या जाणिवा ग्रासू लागतात. ह्यातून व्यक्तिगत कायदे ही संकल्पना उगम पावते. सामाजिक जीवनाच्या कार्यात्मकतेच्या दृष्टीने ही संकल्पना अर्थशून्य ठरते. व्यक्तिगत/खाजगी पातळीवर आणि सार्वजनिक पातळीवर धर्माचरण असा भेद करणे म्हणजे मानवी व्यक्तित्वाला दुभंगणे असा होतो. धर्माचरण घराच्या चार भिंतीपुरते सीमित ठेवण्याचा आग्रह धरणे म्हणजे दुभंगलेली व्यक्तित्वे/ढोंगी व्यक्तित्वे निर्माण करण्याला प्रोत्साहन देणे होय. धर्माचरणाला जीवनमार्ग मानणारी व्यक्ती विकासाच्या लाभांना मुकते. अशा व्यक्तीपासून सामाजिक जीवनातील विकासाची गति मंद होत असली तरी त्यामुळे होणारी सामाजिक सार्वजनिक पातळीवर दुहेरी जीवन जगणाऱ्या व्यक्तींपासून होणाऱ्या हानीपेक्षा कमी हानिकारक ठरते. राजकारणात, अर्थकारणात आणि समाजकारणात ह्यामुळेच संधिसाधूपणा वाढीला लागतो. परंपरागत समाजामधे चालीरीती, नीती आणि कायदा यांना धर्माचे अधिष्ठान असते ह्या विचाराला प्राधान्य दिले जाते. धर्माचे अधिष्ठान म्हणजे दैवी शक्तीचे अधिष्ठान. मानवांमधे विषमता असली तरी चालेल, पण असंतोष नको ह्या आवश्यकतेमधून दैवी शक्तीला शरण जाणे हे सर्वश्रेष्ठ मूल्य ठरविले गेले व सामाजीकरणाच्या प्रक्रियेतून मानवी जाणिवेमधे ते भक्कमपणे रुजविले गेले. त्या अनुषंगाने चालीरीती, नीतिमत्ता व कायद्याचा आशय निर्धारित केला गेला. पुरोहितवर्गाच्या उदयाशी ही प्रक्रिया मानवी इतिहासात संलग्न झालेली आढळते. ऐहिक जीवनात सर्वश्रेष्ठ असलेली राजसत्ता आणि दैवी सत्तेला एकरूपता प्रदान करण्याचे ऐतिहासिक कार्य पुरोहित वर्ग करत आला आहे. त्यामुळे धर्मप्रसाराला आणि धार्मिक संघटन बांधणीला महत्त्व प्राप्त होते. धर्मप्रसारामुळे किंवा धार्मिक संघटनबांधणीमुळे आत्मिक विकास घडतो हा समज चुकीचा आहे. उलट धर्मप्रसार व धार्मिक संघटन बांधणीमुळे पुरोहित वर्ग समाजातील शासक वर्गाना व राज्यकर्त्या वर्गाना शासितांना नियंत्रणात ठेवण्यास मदत करतो. त्या दृष्टीने धर्मप्रसाराला व धार्मिक संघटन बांधणीला कायद्याच्या मर्यादा घालणे जरूर आहे. धर्मप्रसारात आणि धार्मिक संघटन बांधणीत ऐहिक लाभांच्या प्राप्तीला मुळीच स्थान राहणार नाही ह्याची काळजी घ्यावयास हवी.

वास्तविक सर्वधर्मसमभावाला धर्मनिरपेक्षता म्हणणे म्हणजे विपर्यास करणे होय. सर्व धर्म एकच कार्य करतात. अस्तित्वात नसलेल्या दैवी शक्तीला शरण जाण्यासाठी सर्व धर्म मानवाला क्रियाशील करण्याचे ते कार्य. मानवी अस्मिता गमावून बसण्याची प्रक्रिया धर्माचरणामुळे पूर्ण होते. त्यामुळे दैवी शक्ती संकल्पनेला कार्यात्मक करणाऱ्या धर्म व्यवहाराला संरक्षण देण्याचे कार्य राजसत्ता करीत असते. उपेक्षेमधून निर्माण होणाऱ्या असंतोषाला नियंत्रित ठेवण्याचे राजसत्तेचे कार्य त्यामुळे सलभ होते. भारतीय इतिहासात विविध धार्मिक समुदायांची निर्मिती आणि विकास राजकारणाचे फलित आहे. बॅ. जिना आणि बॅ. सावरकर यांचे धर्मप्रेम त्यांच्या राजकारणाचे प्रभावी साधन होते. ह्या संदर्भात जिना किंवा सावरकर यांना मुसलमान आणि हिंदू समुदायांचे प्रातिनिधिक प्रतीक मानावयास हवे. त्यांनी निर्माण केलेल्या राजकीय, सामाजिक आणि आर्थिक चळवळींना त्यांनी प्राप्त करून दिलेल्या धार्मिक अधिष्ठानाच्या संदर्भात त्यांच्या जीवनकार्याचे मूल्यमापन व्हावयास हवे, म्हणजे त्यांच्या मागून जे घडले त्याचाअर्थ लागतो. प्रत्येक धार्मिक समुदायाची पृथक राजकीय स्वायत्त अस्मिता निर्माण झाल्यामुळे त्या समुदायाचे प्रश्न सुटतील असे मानण्याचे कारण नाही, असे असते तर धार्मिक एकजिनसीपणा असणाऱ्या समाजांमध्ये विग्रह आढळले नसते. शेवटी प्रत्येक समाजामधील विग्रह आणि असंतोष त्या समाजांमध्ये जे काही निर्माण होते त्याचा उपभोग घेण्याच्या प्रक्रियात आढळणाऱ्या विषमतेमध्ये शोधायला हवा. न लोकांच्या धर्मश्रद्धा व धार्मिक अस्मितांचे राजकीयीकरण आज जे होते आहे ते विशिष्ट वर्गाच्या हितासाठी.ह्याऐवजी हे राजकीयीकरण सर्व समाजाच्या हितासाठी केले जायला हवे असे कोणी म्हणतील. पण हे शक्य नाही, कारण धर्मश्रद्धा आणि धार्मिक अस्मिता कार्यान्वित करणारी सर्व साधारण माणसे नसतात. त्यांना कार्यान्वित करण्याचा एकाधिकार सर्व साधारण माणसांनी दैवी शक्तीला शरण जाऊन त्या शक्तीचे इहलोकी प्रतिनिधित्व करणाऱ्या पुरोहित वर्गाला बहाल केलेला असतो. धर्मप्रसाराच्या आणि धार्मिक संघटन बांधणीच्या माध्यमातन बहाल करण्याच्या ह्या प्रक्रियेचे नित्य नव्याने नवीनीकरण होत जाते. अखेर एकच उपाय उरतो. तो म्हणजे पुरोहित वर्ग मोडीत काढणे. त्या वर्गाला इतिहासजमा करणे. पण एक परोहित वर्ग मोडीत काढला तर नवीन परोहित वर्ग तयार होईल. म्हणून जे कार्य करण्यासाठी पुरोहित वर्ग निर्माण होतो ते कार्य, म्हणजेच अतिमानवी शक्तीला/दैवी शक्तीला शरण जाणे, मानवी जीवनाच्या दृष्टीने अनावश्यक व्हावयास हवे. हे तेव्हाच शक्य होईल ज्यावेळी मानवी समुदायाने निर्माण केलेल्या संस्कृतीचा-भौतिक आणि अभौतिक लाभ मानवांमध्ये कोणत्याही प्रकारचे भेद न मानता, सर्वांना प्राप्त होईल. म्हणजेच ईश्वर, दैवी शक्ती, अतिमानवी शक्ती ह्या संकल्पनाच मानवी जाणिवेत नसाव्यात.

हे शक्य होईल काय? मला त्यात अडचण दिसत नाही. फार पूर्वी तत्त्वज्ञानाच्या. पातळीवर ईश्वराचे अस्तित्व संपविले गेले होते. हे तत्त्वज्ञान प्रत्यक्षात जगण्याच्या व्यवहारप्रक्रिया मानवी जीवनात सरू व्हावयास हव्या. ईश्वर ही संकल्पना मानवनिर्मित आहे तेव्हा तिच्या विलयनाचा प्रयत्न मानवालाच करावा लागेल. समाधानाची गोष्ट आहे की मानवाने आपल्या इतिहासात असे प्रयत्न अनेकदा केले आहेत. आज विज्ञानाच्या प्रचंड गतिशीलतेमुळे ह्या प्रयत्नात मानव यशस्वी होईल, अशी आशा बाळगण्यास हरकत नसावी, सेक्युलरिझम-धर्मनिरपेक्षता ह्या संकल्पनेच्या विकासाची परिणती विज्ञानवादात/निरीश्वरवादात होणे ही प्रक्रिया मानवी संस्कृतीच्या विकास-प्रक्रियेत अनिवार्यतः येणार. ह्या ऐतिहासिक सत्याचा मागोवा घेतला म्हणजे मागील चार दशकांच्या अनुभवातून येणारी निराशेची मरगळ दूर होईल.

‘मंदार’, २, डागा लेआऊट, नागपूर १०

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.