पत्रव्यवहार

संपादक, आजचा सुधारक’ यांस
जून १९९१ च्या अंकात श्री. दिवाकर मोहनी यांचा ‘धर्म, धर्मनिरपेक्षता आणि त्यातून उद्भवणारे काही प्रश्न हा विस्तृत लेख आपण प्रसिद्ध केला आहे. त्या लेखाच्या संदर्भातील काही विचार.

श्री. दिवाकर मोहनी आणि तत्सम विचारवंत धर्म, धर्मनिरपेक्षता. सर्वधर्मसमभाव, राष्ट्रीय एकात्मता, इत्यादी संकल्पना, त्यांचा सामाजिक व राष्ट्रीय जीवनातील आविष्कार यांचा विचार तात्त्विक पातळीवरून करतात आणि व्यावहारिक बाजूकडे जाणून दुर्लक्ष करतात. कधी तर वाटू लागते की हे लोक वेड पांघरून पेडगावला निघाले आहेत ! श्री. मोहनी आपल्या प्रतिपादनाची सुरुवातच ‘समजा या शब्दाने करतात, आणि मग ज्या गोष्टी गृहीत धरून चालतात त्यातील काहींची चर्चा एखाद्या महात्म्याच्या वा आचार्याच्या बौद्धिक व भावनिक पातळीवरून करू लागतात. त्यांची काही गृहीतके हास्यास्पद, तर काही मानवेतर प्राण्यांत आढळणारी वाटतात. त्यांनी लेखात वापरलेला हिंदुनेतृत्व हा शब्द उपरोधिकपणे वापरल्यासारखा वाटतो. किंबहुना, हा संपूर्ण लेख पूर्वग्रहदूषित बुद्धीने लिहिल्याचा भास होतो..

आपला देश किमान एक हजार वर्षांपासून हिंदुस्थान म्हणवला जात आहे. त्या काळी बहुसंख्य, अल्पसंख्य अशी वर्गवारी असेल असे वाटत नाही. वस्तुतः हिंदू हा शब्द धर्मवाचक नव्हता. त्याला प्रादेशिक स्वरूप होते. आणि सावरकरांनी हिंदू शब्दाच्या केलेल्या व्याख्येतही धर्माचा संबंध आलेला नाही. पण श्री. मोहनी जो विचार मांडतात तो हिंदू धर्माचा. त्यादृष्टीने कोण हिंन्दू व कोण अहिंदू, असा सयुक्तिक प्रश्न ते विचारतात. त्यांच्या लेखातील ‘मी’ हा स्थितप्रज्ञाच्या कोटीतील वाटतो. किंबहुना, ‘ब्राह्मण नाही, हिंदुहि नाही, न मी एक पंथाचा या केशवसुतांच्या ‘नव्या शिपाईं च्या जातीचा हा ‘मी दिसतो. असा एखादा अपवादात्मक महात्मा असू शकेलही. मात्र सर्वच त्या पातळीवर पोचतील हे गृहीत धरणे शक्य नाही. अगदी अलीकडील उदाहरण घ्यावयचे तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्माचा त्याग केल्यानंतर तथाकथित मानवधर्माचा स्वीकार करणे किंवा धर्मविरहित नागरिकत्व मान्य करून घेणे सहज शक्य झाले असते. तरी त्यांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. कारण ते धर्माला नगण्य न मानणाऱ्यांपैकी होते. गांधीजी सर्व धर्म समान लेखत. धर्मातीत अशी मानसिक अवस्था काही त्यांना प्राप्त करून घेता आली नाही. त्यांच्या तोंडून अंतिम शब्द बाहेर पडला तो ‘हे राम’

लेखकाच्या काल्पनिक ‘मी ला कुळाचा ,जातीता, परंपरेचा, संस्कृतीचा, धर्माचा आणि देशाचाही अभिमान नाही. ह्या अभिमानात श्रेष्ठत्वाची भावना अनुस्यूत असते अशी लेखकाची समजूत आहे. तिच्यात आंशिक तथ्य आहे. मात्र ते पूर्ण सत्य नव्हे. स्वदेश व स्वधर्म यांच्याविषयी अभिमान (दुरभिमान नव्हे) बाळगणे म्हणजे अन्यांच्या धर्माविषयी वा देशाविषयी तुच्छता, तिरस्कार वा अप्रियता बाळगणे नव्हे. लेखक जसा ‘एकाविषयी प्रेम म्हणजे दुसऱ्याविषयी द्वेष असे समीकरण मांडू इच्छीत नाही तसे सच्चे हिंदनिष्ठही ते समीकरण भांडत नाहीत. पण अभिमानाचा अभाव विकृतीला कारणीभूत होतो या संदर्भात देवनागरी लिपीची जागा रोमन लिपीला देण्याचे जे अभियान सुरू आहे त्याचा उल्लेख अनाठायी ठरू नये.

‘जननी जन्मभमिश्च स्वर्गादपि गरीयसी या संस्कृत सुभाषितात जो भाव आहे तो काहीसा श्रद्धेचा असला तरी दुसऱ्यांच्या श्रद्धेला नख लावणारा किंवा कमी लेखणारा आहे असे लेखक म्हणू शकेल का ? हिंदुत्वाचा अभिमान बाळगणे म्हणजे काही इतर धर्माविषयी द्वेषभावना ठेवणे नव्हे. ज्याला मुळातच स्वाभिमान नाही त्याच्याकडून समाजासाठी, देशासाठी प्रसंगी निर्भत्सनेचे उद्गार ऐकायला मिळाले तर नवल नाही. ‘जो बापाला बाप म्हणत नाही तो काकाला काय काका म्हणणार? अशा प्रकारचा एक वाक्यप्रचार रूढ आहे. त्यातील गर्भित आशय सुज्ञांस सांगण्याची गरज नाही.

धर्म, संस्कृती आणि देश यांच्याबद्दल वाजवी अभिमान न बाळगणारा ‘मी हिंदू या संज्ञेला पात्र होतो काय हे हिंदुनेतृत्वाने एकदा स्पष्ट करून टाकावे, असे श्री. मोहनी सुचवितात. हा प्रश्न राजकीय पातळीवरून आहे की तात्त्विक पातळीवरून आहे हे त्यांच्या लेखातून स्पष्टपणे प्रतीत होत नाही. पण त्याला उत्तर आहे. तात्त्विकदृष्ट्या विचार केला तरी भिन्न तत्त्वज्ञान असणारे अनेक पंथ प्राचीन सनातन धनि व अर्वाचीन हिंदुधमनि पचवून हिंदुत्वमय करून टाकले आहेत. इहवादी चार्वाक हा एक दर्शनकार म्हणून हिंदुधमनि आपलासा करून टाकला. गौतम बुद्धाला विष्णूचा अवतार मानून बौद्धांना आत्मसात् करण्याची शिकस्त केली. कबीराला त्याने कधी परका मानले नाही. तरीही दुर्दैव असे की, ज्या स्वामी विवेकानंदांनी हिंदू धर्माची पताका पाश्चात्य जगात पोचवली त्यांच्या रामकृष्ण मिशनने आपण हिंदू नाही असे जाहीर करावयास कमी केले नाही. आणि याला कारण त्यांना हिंदुत्व मान्य नाही असे नसून राजकीय सवलतींची अपेक्षा आहे, हे आहे.

बसवेश्वराचे अनुयायी (लिंगायत) स्वतः हिंदू नसल्याचे सांगू लागले. गुरुद्वारात रामनामाचा घोष करणारे शीख हिंदूंचा दुस्वास करू लागले. वास्तविक धार्मिकदृष्ट्या हिंदू या संज्ञेला पात्र होण्यासाठी ‘संस्कृती व परंपरेचा वारसा पुरेसा आहे. पण ‘कु-हाडीचा दांडा गोतास काळ असा पुकार पक्षीय राजकारणाने करून टाकला आहे. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा अंत्यविधी हिंदू पद्धतीने करण्यात आला. मग त्यांना हिंदू मानायचे की नाही? वास्तविक त्यांचे वडील हे पारशी होते. त्यांची आई नेहरूंची कन्या म्हणून हिंदू. अन्यथा कोणत्याही अन्य निकषावर इंदिराजींना हिंदू म्हणणे कठीण. अशा संकर झालेल्या राजीवजींचा अंत्यविधी, त्यांची पत्नी विदेशी (आणि बहुधा ख्रिश्चन) असूनही, हिंदू पद्धतीने केला गेला तो धर्मनिरपेक्षतेतूनच ना? पण अंतिम क्षणी वैदिक पद्धतीने केला जातो याचा कोणता अर्थ श्री. मोहनींना अभिप्रेत आहे, याचा खुलासा व्हावा, गंमत अशी आहे की राजकारणी लोकांचा धर्म एकच असतो आणि तो म्हणजे शासनाची सूत्रे हातून सुटून न जाऊ देण्याचा, त्यामुळे लोकप्रतिनिधी म्हणून निवडून येण्यासाठी आणि निवडून आल्यावर सत्ता टिकवण्यासाठी आपलेच लोक (भारतीयच) हव्या तशा कोलांटउड्या मारायला सदैव सिद्ध असतात. ब्रिटिशांनी भारतीय जनतेवर राज्य करताना जो (‘फोडा आणि झोडा) मंत्र वापरला तोच आजच्या काळातही वापरला जात आहे. एकीकडे राष्ट्रीय एकात्मतेचा जयघोष करायचा आणि दुसरीकडे फूट आणि तेढ वाढवत राहावयाची हा जो घृणास्पद पुकार वर्तमान राजकारणात सुरू आहे त्याने सर्व तात्त्विक व तार्किक बाबींना सुरुंग लावला आहे. श्री. मोहनी यांच्या तर्कशुद्ध विवेचनाचे कौतुक केलेच पाहिजे. तथापि ते विवेचन एकांगी व हेत्वाभास निर्माण करणारे आहे, हे त्यांनी लक्षात घ्यावे.

श्री. दिवाकर मोहनी यांच्या मते भारतातील शासनकर्ते जर बहुसंख्याक हिंदूच आहेत तर बहुसंख्याक हिंदूच हिंदूंचा अपमान कसा व कशासाठी करतात, हा प्रश्न त्यांना पडतो. बहुधा लेखक कान आणि डोळे झाकून जगात वावरतो. जगात काय चालले आहे याची दखल न घेता केवळ भारतीय परिस्थितीवर तर्कबहुल भाष्य करणाऱ्या या मित्राला काय म्हणावे? ख्रिश्चनांत रोमन कॅथॉलिक व प्रोटेस्टंट यांचे परस्पर संबंध किंवा इस्लाम जगतातील शिया व सुन्नी यांचे परस्परसंबंध जर शत्रुत्वाचे असू शकतात, तर हिंदूतही शत्रुत्व नव्हे तरी विरोध दिसला तर नवल नाही. दुर्दैवाने तात्त्विक मतभेद राजकीय पातळीवर अधिक तीव्र व प्रसंगी शत्रुत्वात परिणत होताना दिसतात. आणखी एक गोष्ट लेखक पद्धतशीरपणे दृष्टिआड करीत आहे. ती अशी की आमच्या सामान्य मतदारांत राजकीय जागरूकता, राष्ट्रीय हिताची जाण, पुढारलेल्या लोकशाही राष्ट्रांच्या मतदारांच्या तुलनेत अगदी नगण्य आहे. आमच्या निवडणुकांत मते विकत मिळतात, दहशतीने मते मिळवली जातात. साम, दाम, दंड, भेद आदी सर्व साधनांचा उपयोग करून सत्तासंपादनाचे प्रयत्न होतात. शिवाय आजच्या अस्थिरतेच्या, दहशतीच्या व हिंसाचाराच्या वातावरणात आणि ते निर्माण करण्यास कारणीभूत व त्याला पाठिंबा देणाऱ्या शेजारच्या धर्माधिष्ठित देशांच्या खुनशी मनोवृत्तीतून त्या धर्माच्या लोकांविषयी अनास्था व क्वचित द्वेषभावना जागृत करणाऱ्या पक्षांना कितपत व कसा दोष द्यायचा? यावर श्री. मोहनी तात्त्विक प्रश्न विचारतात की एकाने गाय मारली म्हणून दुसऱ्याने वासरू मारणे हे अन्याय्य नव्हे काय? आहे ना ! पण ऐतिहासिक काळापासून वर्तमानकाळापर्यंत ज्या समाजाने सतत अन्यायाचे वर्तन केले त्याला न्याय मिळावा म्हणून टाहो फोडणे अन्याय्यच नव्हे काय?

ज्या तिरकस पद्धतीने श्री. मोहनी हिंदू कोण व अहिंदू कोण, याचा मागोवा घेऊ पाहतात त्या पद्धतीने तो प्रश्न अनुत्तरितच राहणार. आमची सामान्य पद्धत जन्मावरून हिंदू ठरवण्याची आहे. शुद्ध लोकशाहीचा तात्त्विक विचार काही असला तरी व्यावहारिक विचार हा एक्कावन्न विरुद्ध एकोणपन्नास असाच आहे. त्यामुळे शासनाचा अधिकार मिळवण्यासाठी धडपडणारे लोकप्रतिनिधी न्याय-अन्याय विचारात न घेता गठ्ठा मते हे लक्ष्य पुढे ठेवून वाटचाल करीत असतात. अशा अवस्थेत श्री. मोहनी यांचे धर्माभिमान्यांना केलेले अनुयायांच्या डोळ्यावर अभिमानाची झापड न बांधण्याचे आवाहन म्हणजे अरण्यरुदनच ठरणार!

हिंदुत्व, राष्ट्रीयत्व आणि हिंदुनेतृत्व यांच्याबद्दलचा आकस, विपर्यस्त दृष्टिकोण ठेवून श्री. मोहनी लेखनप्रवृत्त झालेले दिसतात. त्यांना प्रश्न मांडायचे आहेत, सोडवावयाचे नाहीत, असे वाटू लागते. कदाचित् त्यांच्या इतकी बौद्धिक उंची आणि परिस्थितिनिरपेक्ष दृष्टी यांच्या अभावामुळे मला आणि माझ्यासारख्या अनेकांना त्यांच्या लेखनातील आशयाचे नीट आकलन होऊ शकत नसावे. पण त्यांच्या विचारांची दिशा न पटणारी आहे एवढेच. त्यांच्या इतके लेखनबळ नसल्याने येथेच विराम घेतो. क्षमस्व.

आपला
म. ना. लोही

ता. क.
तात्त्विक, सांस्कृतिक व राजकीय अशा तिन्ही पातळ्यांवरून एकाच वेळी विचार करण्याच्या अट्टहासामुळे आणि काहीशा पूर्वग्रहामुळे श्री. मोहनी यांच्या विवेचनाला एकसूत्रीपणा असल्याचे दिसत नाही. हिंदू नेतृत्व (7) असे ज्याचे वर्णन श्री. मोहनी करतात ते त्यांना अभिप्रेत राजकीय व पक्षीय नेतृत्व आहे. धार्मिक पायावर उभारलेल्या संघटना, मग त्या बहुसंख्यांच्या असोत की अल्पसंख्यांच्या, आक्रमक पावित्र्यात उभ्या ठाकल्याने धर्मनिरपेक्षता मोडीत काढायला निघाल्या आहेत, हे अमान्य करता येणार नाही. धर्मनिरपेक्षतेचे तत्त्व बहुसंख्यांनी स्वीकारावे आणि अल्पसंख्यांनी त्याची पायमल्ली करावी असे जे चित्र दिसते किंवा अल्पसंख्यांनी आपल्या धार्मिक अस्मितेला जपत बहुसंख्यांच्या धार्मिक भावनांचा उपमर्द करावा ही वस्तुस्थिती धर्मनिरपेक्षतेला उपकारक नव्हे तर अपायकारक आहे. हे पद्धतशीरपणे दृष्टीआड करून केवळ हिंदुत्वाची चीरफाड केल्याने काहीच साध्य होणार नाही असे नम्रपणे सुचवायचे आहे.
१७- बी, लक्ष्मीनगर, नागपूर २२

श्री संपादक
आजचा सुधारक,
आज सारेच पंथ विश्व हिंदू परिषदेच्या व्यासपीठावर एकत्र आलेले दिसत आहेत. ते हिंदुत्वाच्या अभिमानापोटी एकत्र आले असतील तर त्यापेक्षा समाधानाची अन्य कोणतीही गोष्ट असू शकणार नाही, पण हिंदुत्व हे केवळ घोषणा देण्यापुरते असू नये.

जनाब शाह तुराब अली काकोर्वी यांनी ‘शहरुल अवलिया’ या ग्रंथात हजरत आदमनेच अयोध्या हे शहर वसविले असे म्हटले आहे. ‘तारिखुल असर व अलजुग्राफिया मुल्क अवध’ ह्या १८६३ साली प्रसिद्ध झालेल्या ग्रंथात पृ. ४०१ वर लिहिले आहे की, हजरत शेष व हजरत नूह या पैगंबरांच्या कबरी अयोध्येत आहेत. हे संदर्भ पाहता अयोध्येवर केवळ मुस्लिमांचाच हक आहे असा दावा जर भारतीय मुस्लिम करायला लागले तर आश्चर्य वाटायला नको.

भारतात ‘जमाते इस्लामी आणि ‘जमियतुल उलेमा’ या मुस्लिमांच्या दोन प्रमुख संस्था आहेत. देशातील ९९ % मुसलमान या दोनपैकी एखाद्या संस्थेशी संलग्न आहेत,
जमाते इस्लामीचे संस्थापक जनाब अबुल आला मौदूदी हे दारुल इस्लामचे कट्टर पुरस्कर्ते होते. ते लिहितातः
‘लोकांचे लोकांसाठी सरकार या लोकशाही प्रणालीशी मी सहमत नाही. माझ्या मते हकीम अल्लाह अली उन्नासे बिल हक (Rulership of God on man with justice) हीच प्रणाली योग्य आहे. इस्लामी सियासत भाग ३, पृ. ९६]

पाकिस्ताननिर्मितीपूर्वी याच मौदूदींनी लिहिले होते की, पाकिस्तानी शासन जर पाश्चात्य लोकशाहीप्रमाणे चालणार असेल, आणि ती इस्लामी शरियतप्रमाणे चालणार नसेल, तर मी त्या देशाला नापाक स्थान म्हणेन. (तत्रैव)

उर्दू फार्सीचे महाकवी डॉ. महमंद इक्बाल यांचेही विचार मौदूदींच्या फार मागे नव्हते. ‘दावत हे उर्दू पत्र सतत ह्याच विचाराचा प्रचार करते. व्यक्तिशः उदार चारित्र्याचे मुस्लिम बांधव सामुदायिक धर्माच्या बाबतीत अत्यंत कडवे आहेत. त्यामुळे हिंदूंनी आपल्यातील सर्व पंथांचे एकत्रीकरण करणे व संपूर्ण हिंदूसमाज संघटित करणे अत्यावश्यक आहे. या विशाल एकीकरणात गैर काहीच नाही. मुस्लिमांना त्यांचा धर्म टिकवून या राष्ट्रीय प्रवाहात सामील होता येईल. पोस्ट : सोनपेठ
वा. रा. जहागीरदार
जि. परभणी ४३१५१६

श्री संपादक,
आजचा सुधारक,
“आजचा सुधारक’ च्या जुलै ९१ च्या अंकात श्री. श्याम कुलकर्णी यांचे पत्र व खुद्द संपादकांचा त्यातील मुद्यांना उत्तरे देणारा लेख वाचल्यावर, त्यासंबंधी मला काय वाटले, ते मी नमूद करू इच्छितो.

“आइनस्टाइन यांनीसुद्धा धर्म व देव यांचे अस्तित्व अमान्य केले नाही” असे एक विधान उपरोक्त पत्रात आहे. याला श्री. कुळकर्णी यांच्याजवळ काय आधार आहे. ते त्यांनी सांगावे, अशी माझी त्यांना विनंती आहे. कारण माझ्या नोंदवहीत आइन्स्टाइनना देव अमान्य होता असे दर्शविणारी त्यांची स्वतःचीच वाक्ये आहेत. श्री. दि. य. देशपांडे यांच्या लेखातही यासंबंधीचे “आइन्स्टाइनने जर …….” असे वाक्य आहे; आणि ते श्री. कुळकर्णी यांच्या विधानाबाबत शंका व्यक्तवते, असे मला वाटते. बीड रसेल यांच्या वाक्याचा सदोष मराठी अनुवाद आधाराला घेऊन श्री. कुळकर्णीची जी दिशाभूल झाल्याचे श्री. देशपांडे यांनी दाखवून दिले आहे, ते वाचून तर गंमतच वाटली. बुद्धिवादाचा प्रतिवाद करणारे अशासारख्या गफलतींना कसे बळी कडतात, याचा मलाही अनुभव आहे.

“सापेक्षतावाद आइन्स्टाइना सुचला’ ! प्रयोग वगैरे करतांना सापडला नाही” या विधानातून श्री. कुळकर्णी यांना मन हे भौतिकी साधनांहून श्रेष्ठ आहे, असे सुचवायचे आहे, हे स्पष्ट आहे. प्रयोगात एखादी गोष्ट सापडते, त्यात मनाचा भाग नसतो, असे त्यांना म्हणावयाचे आहे काय? किंवा ‘सुचलें याला आधी केलेल्या प्रयोगांचा आधार नसतोच. असे ते म्हणू शकतील काय? मन हे जीवंत शरीराच्या बधिर नसलेल्या (वा केलेल्या) मज्जासंस्थेचे अदृश्य अपत्य असल्यामुळे भौतिकी व अभौतिकी असे द्वंद्व गृहीत धरून, एकाला दुसऱ्यापेक्षा श्रेष्ठ समजणे हे शास्त्रतः चूक आहे, असे माझ्या अल्पमतीला वाटते.

श्री. कुळकर्णी साक्षात्काराचा अनुभव नसतांनाही साक्षात्काराची भलावण करीत आहेत ! अर्थात, याला इतरांच्या साक्षात्कारकथा’ एवढाच आधार असणार. विज्ञानाचा अभ्यासक यावर, वैज्ञानिक चिकित्सा न करता विश्वास ठेवतो, हे केवढे आश्चर्य । “ज्याचा ध्यास, त्याचा भास” हे साक्षात्काराचे खरे स्वरूप असते. त्यामुळे त्यात भिन्नता अटळ आहे.

पत्राच्या शेवटी पत्रलेखकांनी बीड रसेलचे “माझ्या मते गूढवादी तत्त्वज्ञानात शहाणपणाचा गाभा असल्यामुळे त्या तत्त्वज्ञानाचे विडंबन न करणे अत्यंत महत्त्वाचे आहे” हे वाक्य उद्धृत केले आहे. याही अनुवादात काही गफलत नसो अशी सदिच्छा. यावर मीही सध्याच काही म्हणू इच्छीत नाही. तथापि श्री. कुळकर्णी यांनी याचाही संपूर्ण संदर्भ द्यावा, अशी नम्र विनंती.
क्षमस्व !
य. ज. महाबळ

आपल्या अंकात प्रसिद्ध झालेल्या एका चर्चेत “विज्ञान संपते तिथे अध्यात्म सुरू होते”, असे एक विधान आहे. याच्यासंबंधीचा माझा एक अनुभव आपल्याला व वाचकांनाही रोचक, उद्बोधक वाटेल, असे वाटल्याने तो थोडक्यात खाली देतो. माझ्या एका अध्यात्मसमर्थक मित्राने आमच्या मेळाव्यात हा उद्गार काढला, मी त्यांना विचारले, “विज्ञान कुठं संपतं, हे तुम्ही सांगू शकाल का?” त्यावर ते चक्क अवाक झाले व म्हणाले, “विचार करून सांगतो.”आठदहा दिवस गेल्यानंतर ते मेळाव्यात आले, ते उत्तर घेऊनच. त्यांचे उत्तर असे होते. “माझ्या नात्यातील एक व्यक्ती आजारी पडली. डॉक्टरांनी औषधे दिली. तरीही गुण नाही. असे २-३ दिवस झाल्यावर डॉक्टर म्हणाले की आता देवाधर्माचे काहीतरी करा. बोला. इथे विज्ञान संपून अध्यात्म आले की नाही?” मी शांतपणे व नम्रतेने त्यांना म्हणालो, “राग मानू नका; आपल्या निष्कर्षात थोडी गफलत झाली आहे. इथे विज्ञान संपले नाही ! संपले ते त्या डॉक्टरचे विज्ञानाबद्दलचे ज्ञान | त्यांचा शेवटचा सल्ला ते स्वतः श्रद्धावादी असल्यामुळे वा अगतिकतेपोटी त्यांनी दिला असावा.” यावर माझ्या मित्राला पुढे काहीच सांगता आले नाही. त्यांचे हे मौनच केवढे बोलके आहे?
य. ज. महाबळ
द्वारा : स्टेट बँक ऑफ इंडिया मेन बॅच, परभणी (मराठवाडा)

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.