पत्रव्यवहार

संपादक, आजचा सुधारक, यांस
आपली विवेकवाद ही लेखमाला खूप उरोधक आहे. परंतु कधी कधी मला असे वाटते की, आपले निष्कर्ष आधीच ठरलेले असून त्यांच्या पुष्टीसाठी आधारविधाने शक्य त्या मागांनी शोधण्याचे काम आपण करीत आहात. सत्यशोधक शंभर टक्के नि:पक्षपाती नाही असा थोडासा जरी संशय वाचकाला आला तरी वाचक-लेखकसंवादात व्यत्यय येऊ शकतो. असा संशय हेच माझ्या पत्राचे प्रयोजन.

नोव्हेंबर ९१ च्या अंकातील ‘विवेकवाद-१७’ हा लेख व्या ‘गीतेतील नीतिशास्त्र (उत्तरार्ध हे त्याचे शीर्षक, मी स्वतः गीताभक्त नाही. मी जन्मात कधी चुकूनही जन्माधिष्ठित वर्णव्यवस्था मानली नाही. या व्यवस्थेचे समर्थन मी निंद्य मानतो. आता प्रश्न हा की, गीतेत जन्माधिष्टित वर्णभेद आणि उच्चनीचता यांचे समर्थन आहे काय ? गीतेचा सगळ रोख या अनिष्ट परंपरेचे समर्थन करण्याचा तर नाहीच उलट त्या सिद्धान्ताचे खंडन करण्याचा आहे.

भारतात ही व्यवस्था होती व दुदैवाने आजही आहे. खुद्द अर्जुन या समजुतीचा बळी आहे. भारतीय महायुद्धाने अवघी क्षत्रियजात नष्ट होईल, पुरुष मारले गेल्यावर त्यांच्या स्त्रिया भ्रष्ट होतील, वर्णसंकर होईल अशी त्याला भीती वाटते. परंतु अर्जुनाचे मत म्हणजे गीतेची शिकवण आहे असे समजणे हास्यास्पद नाही काय ? प्रश्न हा आहे की, श्रीकृष्णाने जन्माधिष्ठित वर्णव्यवस्थेचे समर्थन केले आहे काय?
चवथ्या अध्यायात, ‘चातुर्वण्यं मया सृष्टं गुणकर्मविभागशः’ या श्लोकात श्रीकृष्णाने जन्माधिष्ठित वर्णव्यवस्थेचे निःसंदिग्ध खंडन केले आहे. प्रत्येक काळात अंधश्रद्धास्त लोक जसे असतात तसे कढीविरोधक, थोडे का होईना, सम्भारक असतातच.” गीतेतला श्रीकृष्ण अशा सुधारकांचा प्रतिनिधी आहे. गीताकाराने रुढीवादी सनातन्यांचा प्रतिनिधी अर्जुनाच्या रूपाने उभा केला आहे. ‘चातुर्वयं मया सृष्टं गुणकर्मविभागशः’ या श्लोकार्धातील ‘चातुर्वर्ण्यमया सृष्ट एवढा सोयीस्कर भाग उचलून परमात्म्यानेच जन्मजात वर्णव्यवस्था निर्माण केली असा अर्थ लावणारे गीताभक्त गणकींवभागशः’ हा चरणार्थ स्वार्थापोटी फिना अंधश्रद्धेमुळे सोयिस्करपणे विसरतात, ही दुर्दैवी वस्तुस्थिती आहे. पण आ. दि. य. देशपांडे यांनीही असाच अर्थ लावावा याबद्दल सखेद आश्चर्य वाटते. महाभारत, पुराणे, स्मृती आणि गीतेवरील भाष्ये या सर्वात जन्माधिष्ठित वर्णव्यवस्थेची वर्णन आली आहेत, त्या अर्थी गीतेतील श्रीकृष्णाने सुद्धा जन्माधिष्ठित वर्णव्यवस्थेचे समर्थन केले आहे हा असंबद्ध आणि हास्यास्पद युक्तिवाद नाही काय? आपल्यासारख्या पुरोगामी सुधारकाने अशी आप्तवाक्यवादी भूमिका व्यावी हे पाहून हसावे की रडावे हे मला कळेनासे झाले आहे.

ग्रंथकाराच्या काळी इतर लोक काय मानत होते आणि ग्रंथाचे भाष्यकार काय म्हणतात हे ग्रंथकाचा सिद्धान्त समजून घेण्याच्या दृष्टीने अगदीच असंबद्ध नाही काय? शिवाय गीताभाग्यापैकी ‘ज्ञानेश्वरी आपण सोयिस्करपणे विसरलात असे तर नाही ?
वेद संपन्न होये ठायौं। परि कृपण ऐसा आन नाही।
जे कानी लागिला तिहीं। वाँचया ।।

स्त्रीशूद्रादिकांना वेदाध्ययन नाकारणान्या उच्चवर्णी सनातनी धर्ममार्तडांवर उपहासगर्भ कोरडे ओढणारा ज्ञानेश्वर गीताभाष्यकारच होता. तो नाथसांप्रदायी होता, वैदिक नव्हे, नाथसंप्रदाय वर्णव्यवस्था मानीत नाही. त्यांनी भाष्य करण्यासाठी गीतेची निवड केली ही गोष्ट अतिशय बोलकी आहे. ज्ञानेश्वरीत ज्या ज्या ठिकाणी वर्णाचा उल्लेख आलेला आहे त्या त्या प्रत्येक ठिकाणी हे वर्ण गुणकर्मविभागशः ठरत असून ‘जातिविभागशः’ नव्हेत असे निःसंदिग्ध प्रतिपादन आहे. एवढेच नव्हे तर,
“राधवणी रससोय निकी । करोनिया मोलें विकी।
तैसा भोगासाठी अविवेकी । धाद्धिती धर्म//

अशी जन्मतः श्रेष्ठत्वाचा टेंभा मिरवणाऱ्या ब्राह्मणांवर सडकून टीका केली आहे. यज्ञयाग, व्रतवैकल्ये, सत्यनारायण, मंत्रतंत्र यांचे स्तोम माजवणाऱ्या स्वार्थसिद्ध ब्राह्मणांचे पितळ ज्ञानेश्वराने उघडे पाडले आहे. आता प्रश्न असा की, गीतेवरील भाष्यांचाच आधार घ्यायचा होता तर मग ज्ञानेश्वर का वगळले?

अध्यात्मवाद्यांनी स्वार्थासाठी प्रचंड वैचारिक गोंधळ निर्माण केला आहे हे आपणाइतकेच मीही मानतो. सब घोडे बाराटक्के असा आपला समज दिसतो. मतलबासाठी रूढींचे येनकेनप्रकारेण समर्थन करणारे आणि त्याचप्रकारे खंडन करायला निघालेले आपण यांच्यात फरक काय?

वकिली बाणा सोडून सत्यशोधनास आपण वाचकांस प्रवृत्त कराल अशी अपेक्षा होती. मी वकील आणि समाजसुधारक यांत फरक करतो. आजचा सुधारक सुरू करण्यामागे आणि “विवेकवाद’ ही लेखमाला लिहिण्यामागे समाजसुधारणा आणि लोककल्याण ही उद्दिष्टे आहेत. मला वाटते आपली सध्याची खंडन-मंडन शैली बाजुला ठेवुन अधिक उदार पद्धतीचा अवलंब केल्यास आपली अनन्यसाधारण वैचारिक स्पष्टता लोककल्याणाची तळमळ सार्थकी लागेल. एरवी कोणाचा लाभ होवो वा न होवो, मी प्रतिपक्षाची मते कचाकच कापून माझ्या मतांचे आग्रही समर्थन करीत राहणार असा निष्काम कर्मयोग आचरणारे भक्त आपल्या रूपाने गीतेला लाभले असे म्हणावे लागेल.

सुधाकर देशपांडे
राणी पार्वतीदेवी कॉलेज ,बेळगाव ५९०००६

संपादक, आजचा सुधारक यांसी स.न.वि.वि.
प्रथम ज्या कटाक्षाने आपण ‘आजचा सुधारक चालवीत आहात त्याबद्दल हार्दिक अभिन्दन व धन्यवाद.

या संदर्भात प्रा. दि. य. देशपांडे (संपादकत्वापासून वेगळेपण या दृष्टीने हा निर्देश) यांचा नोव्हेंबर ११ च्या अंकातील ‘गीतेतील नीतिशास्त्र (उत्तरार्ध) हा लेख व विशेषतः त्यातील शेवटचा भाग खटकला. हे माझे लिहिणे कित्येकांना अतिरेकी, विपरीत व दुष्टबुद्धीचे वाटेल,’ असे प्रा. देशपांडे यांनी लिहिले आहे. तात्त्विक वादात ही विशेषणे कोणी कोणास लावू नयेत या मताचा मी आहे, परंतु आपले लिहिणे मला ‘अनभ्यस्त वाटले व हे असे होणे हे आपल्या संपादकीय कटाक्षाच्याही विरोधी आहे.

मोठ्या देशात सर्वांनी उठावे आणि गीतेला डोक्यावर घेऊन नाचत सुटावे ही गोष्ट येथील लोकांच्या बुद्धिमत्तेला अभिमानास्पद आहे काय याचा आपण विचार केला पाहिजे.” असे विधान करतात तेव्हा तर हे अवधान त्यानी अवश्य ठेवावयास हवे होते, नाहीतर हा कोण संप्रति नवा पुरुषावतार या उत्सुकतेने आपण लेखन वाचावयास घेतों व पदरी तीव्र निराशा येते. ही प्रा. देशपांडे यांना त्यांच्याच शब्दात सांगावयाचे तर – “परंतु असा निर्णय देण्यापूर्वी स्थितप्रज्ञाचे गीतेने दिलेले वर्णन काळजीपूर्वक पहा एवढेच म्हणावेसे वाटते. “साधारण सुशिक्षित अशा सामान्य वाचकालाही कळेल असे लेखातील विवेचन असावे असा आमचा प्रयत्न असतो” असे आपण काहीशा संपादकीय भूमिकेतून लेखाच्या प्रारंभी म्हटले आहे. ही मर्यादा मला मान्य आहे. त्यामुळे सर्व पूर्वसुरींचा शोध घेत विधानांचा कीस काढावयास नको.
परंतु तरीही स्थलकालाच्या दृष्टीने दूर नसलेल्या विनोबाजींनी या विषयाचे सखोल सूक्ष्म विवेचन स्थितप्रजदर्शन’ मध्ये केले आहे. ते सूक्ष्म किंवा ढोबळ दृष्टीनेही मा. देशपांडे यांनी नजरेखालून घातलेले दिसत नाही हे त्यांच्या लेखावरून स्पष्ट होते.

विनोबाजींची मांडणी मा. देशपांडे यानी पहावी, तो पूर्वपक्ष मानावा, सविस्तर त्याच तोलाचे उत्तर त्याला द्यावे व नंतर ही चर्चाही पुढे चालवावी अशी माझी त्यांना विनंती.

संपादकांची अडचण मी समजू शकतो. परंतु पृष्ठमयदिची अडचण संपादकांनी मानण्याचे कारण नाही. यासाठी जो अधिक खर्च येईल त्याची स्वतंत्र तरतूद केली जाईल हे आश्वासन मी देतो.

प्रा. देशपांडे यांनी ज्या पद्धतीची मांडणी केली आहे. ती ज्या पद्धतीचे समाजपरिवर्तन ते घडवून आणू पहातात त्यालाही मला हानिकारक वाटते. त्या पद्धतीचे समाजपरिवर्तन मात्र मला इष्ट वाटते, परंतु जुन्यातील मांगल्याचे हार्दिक स्वागत करीत व त्याला अभिवादन करीतच नवसमाजपरिवर्तनात पुढे सरकले पाहिजे ही माझी भूमिका रहात आलेली आहे.
या दृष्टीने मला ही चर्चा महत्त्वाची वाटते. त्यासाठीच हे आवाहन व आश्वासन.
आपला
देवदत्त दाभोलकर
४३, गुरुकृपा कॉलनी,
गोडोली, सातारा शहर ४१५००१

संपादक, आजचा सुधारक, यांस
दिवाकर मोहनींच्या पत्राद्वारे एका महत्त्वाच्या प्रश्नास वाचा फुटली आहे. या संदर्भातील काही अनुभव व विचार मांडत आहे.

१. १९४८ बारावी परीक्षेआधी नागपुरातील सर्वात ‘गुणवंत महाविद्यालयाने पालक-शिक्षक सभा भरविली. सुरुवातीस मुलांशी कसे वागावे हे प्राचार्यांनी पालकांना सांगितले, तळहातावरील फोडा प्रमाणे | नंतर वेगवेगळ्या शिक्षकांना ते विद्याथ्यांसाठी काय करत आहेत ते विचारले. निरपवादपणे ते प्रश्नसंच घडवून देत होते. एकाने तर पुस्तीही जोडली, की गेल्या तीन शालान्त परीक्षांमधील प्रश्नपत्रिकांबाहेर भौतिकी या विषयात प्रश्नच नाहीत. सभेस एकूण जेमतेम चाळीसेक माणसेच असतानाही “फक्त गुणवंत विद्याथ्यांच्या पालकांना स्वतःची ओळख करून देण्यास सांगितले गेले. पहिलेच गृहस्थ उभे राहताच खोलीच्या चार कोपऱ्यातून चार शिक्षक ओरडले,” खाली बसा तुमची मुलगी गुणवंत नव्हती म्हणजे, दहावीचे परीक्षेत !

या घृणास्पद सभेचा वृतांत एका पत्राद्वारे मी स्वतः नागपुरातील एका मराठी वृत्तपत्राच्या मुख्य संपादकांकडे वाचकांच्या पत्रव्यवहाराचा भाग म्हणून नेऊन दिला. ते मला म्हणाले की तमुक महाविद्यालय चांगले आहे. त्याबद्दल असे छापणे गैर आहे, पत्र अर्थातच छापले गेले नाही. म्हणजे भ्रष्टाचार शिक्षणक्षेत्रापुरताच नाही, तर पूर्ण समाज यात सहभागी होऊ लागलेला आहे.

२. काही वर्षांपूर्वी डॉ. पनाकर पांढरीपांडे एक विदर्भ पालक-शिक्षक संघ चालवीत असत. शिकवणी वर्गाबाबत एक सभा झाल्याचे आठवते. अध्यक्षस्थानी मोहनींच्या भाषेत एक मास्टर ऑफ द मिंट होते. त्यांच्या समारोपाच्या भाषणात एकच मुदा होता – परीक्षार्थीना अशा वर्गांना पर्याय नाही. परीक्षा हो अर्थार्जनासाठी तिळा उघड ची गुरुकिल्ली तरी आहे का, याचाही विचार केला गेला नव्हता, हे उघड होते. आजही मुंबईत ‘दावर्ज कॉलेज ऑफ कॉमर्सच्या विद्याथ्यांना प्रथम श्रेणी वाणिज्य पदवीधरांहून उच्च नोकऱ्या मिळतात. नोकरी मिळेलच अशी हमी ‘दाबर्ज घेत असे. इतका त्यांचा स्वतःच्या शिक्षण प्रणालीवर भरवसा असे. आजचा एकही शिक्षणमंत्री असे छातीठोकपणे स्वतःच्या क्षेत्राबद्दल म्हणू शकणार नाही, म्हणजे श्री मोहनींची ‘माफक अपेक्षाही आजची शिक्षणप्रणाली पूर्ण करू शकत नाही.

३. अर्थार्जनक्षमतेच्या पुढे पालकांची व शिक्षकांची झेप जावी, या इच्छेने मराठी विज्ञान परिषद गेली सातेक वर्षे एक कार्यक्रम घेत असते. वर्षभरात डझनभर तीन तासांचे, शक्यतो प्रात्यक्षिकांचे, असे वैज्ञानिक कार्यक्रम व एक तीन दिवसांचे शिबिर असते. अनेकबार बोलावूनही एकही शिक्षक अशा कार्यक्रमांस एकटाही आलेला नाही. पालकांचे प्रमाणही टक्केवारीच्या पूर्णाकात जेमतेमच येते. सात वर्षांत, कमीत कमी तीन शाळांमध्ये प्रचार करूनही, सहभागी मुलामुलींची संख्या चौदाच्या वर गेलेली नाही. संख्येत वाढही दिसत नाही. तरी हे भितीवर डोके आपटणे सुरू आजर “आजचा सुधारक यावर चर्चासत्र, कार्यशाळा वगैरे घेऊ इच्छीत असेल, तर मराठी विज्ञान परिषद सहभागी होईल. विदर्भ पालक-शिक्षक संघाचेही पुनरुत्थान व्हावयाची गरज आहेच.

४. एक आशेचा किरण – गेल्या वर्षी तारा पटवर्धन व जुई दधीच या पुण्याच्या दोन बारावी पास झालेल्या मुली एक वर्षभर वेगवेगळ्या शाळा पाहत फिरल्या. यांत आदिवासी आश्रमशाळांपासून ते “ऋषी व्हॅली स्कूल” असा रंगपट होता. या मुलींना आदर्श शाळा सुरू करायची आहे, व त्या दृष्टीने उपयुक्त शिक्षण कोणते, हे त्या तपासत होत्या. त्या गुणवंत होत्या, पण वैद्यक-अभियांत्रिकी या रामरगाड्यात न जाता त्या ‘फिरायला गेल्या.

५. एक “असे न होवो, पण” छाप विचार- अर्धपक्व समाजवादाची चाळीसेक वर्षे भोगल्यावर जशी आज एक स्पष्ट (भारतात तरी नवी) आर्थिक नीति (“पॉलिसी’ या अर्थीच, फक्त !) येत आहे. तसेच सद्यःस्थिती असहा झाल्यावर एक खरोखरी ‘नवे शैक्षणिक धोरण येईल काय?

त्यावेळी तरी शिक्षणाच्या गुणवत्तेचा व खऱ्या मूल्यमापनाचा विचार होईल काय? विक्षक-विद्यार्थी प्रमाणाचा विचार होईल काय? शिक्षकांच्या गुणवत्तेतील म्हासाचे दुष्परिणाम इतर कोणत्याही पेशा, गटाच्या व्हासाहून भीषण असतात, हे जाणवेल काय?
असो. प्रत्यक्ष काम करणाऱ्या कोणाही संस्थेस वा व्यक्तीस शुभेच्छा व सहकार्याचे आश्वासन.

आपला नम्र
अ. य. खरे
१९३ मनुवाला मार्ग, शिवाजी नगर, नागपूर ४४००१०

संपादक, आजचा सुधारक’ यांसी स.न.वि.वि.
डिसेंबर १९९१ चा ‘आजचा सुधारक’चा अंक पाहिला. त्यातील मोहनी यांच्या पत्राविषयी : कोणीतरी निकडीने या प्रश्नाचा विचार करीत आहे याचा मनापासून आनंद झाला. माझे या संदर्भातील काही विचार महाराष्ट्र आचार्यकुलाचे अध्यक्ष प्राचार्य राम शेवाळकर यांना माहीत आहेत. काही “Beyond Friendship” (मैत्रीच्या पलीकडे) या मासिकाच्या (प्रकाशक : विद्यार्थी साहाय्यक समिती, फर्ग्युसन कॉलेज रोड, पुणे-५) गेल्या पाचसहा वर्षांच्या अंकांत आले आहेत.

थोडक्यात काही प्रत्यक्ष कार्यक्रम सुचवितो. इतरांना त्याविषयी अधिक सुचवता येईल. अन्यही काही सुचवता येतील.

(१) कॉपी विरोधी मोहीम, यात प्राध्यापक व शिक्षणप्रेमी नागरिक यांचा सहभाग असेल, अचानक ते पर्यवेक्षक-मदतनीस म्हणून काम करू शकतील. मूळ यंत्रणेला धक्का न लावता. जेवढ्या ठिकाणी सुरू करण्यासारखा असेल त्या ठिकाणी सुरू करता येईल. नंतर विस्तारत जाईल. शासनाशी व शिक्षणसंस्थांशी चर्चा करावीच लागेल. सुयोग्य पद्धतीने नियमित केल्यास कोणाचाच विरोध (कॉपीतच ज्यांचे हितसंबंध गुंतलेले आहेत त्यांच्याखेरीज) असणार नाही. हितसंबंधी विरोधाचेही यथाकाल निराकरण होईल, ‘छात्रभारती या विद्यार्थी संघटनेने तर आपण “कॉपी करणार नाही, करू देणार नाही’ अशी प्रकट भूमिका घेतली आहे.

(२) प्राध्यापक व नागरिक यांच्या सहकायनि एखाद्या ठिकाणी तरी आदर्श निवडणुका, आदर्श स्नेहसंमेलने आयोजित करण्याचा प्रयत्न करणे, प्रथम प्रथम अल्प यश येईल किंवा मोठे अपयशही येईल. परंतु त्यातूनही पुष्कळच शिकता येईल,

(३) विद्यार्थी प्रत्यक्ष विधायक (कागदी दिखाऊ नव्हे) कामात जितके ओडले जातील तितक्या प्रमाणात त्यांच्यातील अदम्य उत्साहाला वाव मिळेल व अपप्रवृत्तीकडे ते कमी वळतील आज असे दोन स्पष्ट कार्यक्रम आकार घेत आहेत.
(अ) श्री. नरेन्द्र दाभोलकर यांचा अंधश्रद्धा निर्मूलनाचा कार्यक्रम
(ब) श्री. श्रीपाद दाभोलकर यांचा शेती उत्पादनवाढीचा व प्रयोग परिवार पद्धतीचा कार्यक्रम.
या कार्यक्रमांचा पुष्कळसा तपशील मांडला गेला आहे व राज्यस्तरावर व राष्ट्रीय स्तरावरही त्यांना मान्यता असल्यामुळे अधिक विस्ताराची आवश्यकता नाही म्हणून हा निर्देश.

या व अशा इतर कार्यक्रमांबाबत विचार करून, पूर्वतयारी करून पुढील शैक्षणिक वर्षात तरी काही कार्यक्रम निदान काही ठिकाणी प्रयोगरूपाने आजमावून पाहता येतील,

‘आजचा सुधारक ने असे व्यासपीठ उपलब्ध करून दिले तरी मला आनंदच होईल. माझे अशा प्रयोगांचे नांव Programcorie ASSET असे आहे. (Action for Simultaneous Social and Educational Transformation), परंतु कोणत्याही नावाचा किंवा व्यासपीठाचा माझा आग्रह नाही. हे कार्य आपापल्या शक्तीप्रमाणे व्यक्तिगत पातळीवरही सुरू करता येते व गुणवत्तेप्रमाणे आकार घेत जाते. वरील क्रमांक तीन मधील ‘अ व ब याची साक्ष आहेत.

आपला
देवदत्त दाभोलकर
गोडोली,
सातारा ४११००१

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.