विवाह आणि नीती (भाग १७)

‘कामप्रेरणा आणि व्यक्तीचे हित’ या प्रकरणात कामप्रेरणा आणि लैंगिक नीती यांच्या व्यक्तीचे हित आणि सुख यावर होणाऱ्या परिणामांविषयी यापूर्वीच्या प्रकरणांत जे लिहिले आहे त्याचा संक्षिप्त आढावा घेण्याचा विचार आहे. या ठिकाणी मानवी जीवनाचा कामप्रेरणा प्रबळ असण्याचा काळ किंवा प्रत्यक्ष लैंगिक संबंध यांच्याशी आपल्याला कर्तव्य नाही. लैंगिक नीतीचे बाल्य, कुमारावस्था(adolesence), आणि वार्धक्यही यांवर विविध प्रकारांनी परिणाम होत असतात, आणि ते प्रसंगवशात् चांगले किंवा वाईट असतात.

रूढिवादी नीतीचा व्यापार बाल्यावस्थेत प्रतिषेध (Laboos) लादण्यापासून सुरू होतो. अतिशय अल्प वयात मुलाला आपल्या शरीराच्या काही अवयवांना चार चौघांसमोर हात लावू नये असे शिकविले जाते. शरीराचे काही अवयव आणि काही क्रिया यांत एक चमत्कारिक धर्म असतो हे मुलाला समजत नाही, आणि त्यात काही गृढ आहे असे त्यांना वाटते, आणि त्याविषयी त्यांना तीन कुतूहल निर्माण होते. मुलाला शरीराच्या एका विशिष्ट अवयवाला स्पर्श करताना पाहिल्यावर त्याला ‘त्यापेक्षा तू मेलेला मला चालेल’ असे गंभीरपणे म्हणणारी माणसे (आणि तीही वृद्ध नसलेली) मी पाहिली आहेत. सद्गुणी आचाराची वाढ व्हावी म्हणून केल्या जाणाऱ्या या सर्व उपायांचा परिणाम नीतिमार्तडांना अपेक्षित असा होत नाही हे सांगताना मला दुःख होते. बऱ्याचदा मुलाला धमक्या दिल्या जातात. मुलाला त्याचे लिंग कापून टाकण्याची धमकी कदाचित् सध्या पूर्वीइतक्या प्रमाणात दिली जात नसेल; परंतु तुला वेड लागेल अशी भीती घालणे आजही अगदी उचित मानले जाते. खरे म्हणजे वरील गोष्टीचा संभव नाही हे मुलाला कळू देणे बेकायदेशीर आहे. याचा परिणाम असा होतो की बहुतेक मुलांमध्ये कामप्रेरणेसंबंधी अपराधाची आणि भयाची भावना अल्पवयापासूनच निर्माण झालेली असते. आणि ती इतकी खोल रुजलेली असते की ती बहुधा असंज्ञेत दडपलेली असते. जे लोक स्वतःला अशा भयापासून मुक्त समजतात त्यांना वादळ घोंघावत असताना व्यभिचार कराल काय? हा प्रश्न विचारून त्याचा आकडेशास्त्रीय तपास करावा असे मला वाटते. त्या लोकांपेको निदान नव्वद टक्के लोकांना अंतर्यामात अशी भीती बसलेली असते की आपण जर या क्षणी व्यभिचार केला तर आपल्यावर वीज कोसळेल.

सॅडिझम (sadism)’ आणि मॅसोकिझम (masochism) यांची सौम्य रूपे असामान्य (normal) म्हणता येतील अशी असली तरी त्यांची दोषास्पद रूपे लैंगिक (१. दुसऱ्याला दुःख देण्यात सुख अनुभवण्याची लैंगिक विकृती. २. स्वतःस दुःख देण्यात सुख अनुभवण्याची लैंगिक विकृती.) अपराधभावनेशी संबद्ध असतात. आत्मपीडकाला (masochist) आपल्या लैंगिक अपराधांची तीव्र जाणीव असते. तर परपीडकाला (sadist) स्त्री मोह घालणारी म्हणून तिच्या अपराधांची अधिक जाणीव असते. बाल्यावस्थेतील अतिशय कडक नैतिक शिकवणीचे संस्कार किती खोल असू शकतात हे उत्तरायुष्यात आदळणाऱ्या परिणामांनी दिसून येते. या बाबतीत बालकांचे शिक्षण आणि विशेषतः त्यांचे संगोपन यांच्याशी संबंद्ध असणारे लोक अलीकडे प्रबुद्ध होत चालले आहेत. परंतु दुर्दैवाने हे प्रबोधन अजून न्यायालयापर्यत पोचलेले नाही.

बाल्य आणि तारुण्य या दोन्ही अवस्थांत खोड्या आणि निषिद्ध कृती करणे स्वाभाविक आणि उत्स्फूर्त असते. आणि त्यांचा अतिरेक न झाला तर त्याबद्दल फार चिंता करणे बरोबर नाही. परंतु लैंगिक निषेधांच्या भंगाकडे वडील माणसे अन्य निषेधाहून वेगळ्या तऱ्हेने पाहतात, आणि म्हणून मुलालाही ते कर्म अगदी वेगळ्या प्रकारचे आहे असे वाटते. मुलाने जर फडताळातून फळे चोरून खाल्ली तर तुम्ही नाराज व्हाल, तुम्ही त्याला रागे भराल; परंतु तुम्हाला त्या कृत्यात नैतिक भीषणता वाटणार नाही, आणि काहीतरी घोर गोष्ट घडली आहे अशी जाणीव तुम्ही मुलाला देणार नाही. परंतु तुम्ही जर प्रौढ मनुष्य असाल, आणि तुम्ही मुलाला मुष्टिमैथुन करताना पाहिले, तर तुमच्या आवाजात जो करडेपणा येतो तो त्याला अन्यत्र कुठेही ऐकायला मिळत नाही. या आवाजातील स्वराने मुलाच्या मनात जी धडकी भरते, ती आणखीच उग्रतर वाटते, कारण ज्या कृतीमुळे मुलावर हा निर्भर्त्सनचा प्रयोग केला जातो ते कर्म न करणे त्याला अशक्य वाटते. तुमच्या गांभीर्यामुळे मृष्टिमैथुन हे पाप आहे अशी त्याची खात्री पटते, आणि तरी तो ते करीत राहतो, आणि याप्रकारे पुढे, बहुदा जन्मभर कायम राहणाऱ्या विकृतीचा पाया घातला जातो. तारुण्याच्या आरंभापासूनच तो स्वतःला पापी समजायला लागतो. तो लवकरच हे पाप गुप्तपणे करायला शिकतो, आणि आपले पाप इतरांना कळत नाही यातून अर्धवट समाधान तो मिळवतो. खोल असमाधानामुळे जे आपले अपराध लपविण्यात कमी यशस्वी झाले आहेत अशा लोकांवर तो सूड उगवतो. लहानपणापासूनच फसविण्याची सवय लागल्यामुळे उत्तरायुष्यात ते करण्यात त्याला अडचण वाटत नाही. अशाप्रकारे त्याला सदाचारी बनविण्याच्या चुकीच्या प्रयत्नामुळे तो शेवटी विकृत, अंतर्मुख होंगी आणि परपीडक असा मनुष्य बनतो.

परंतु अपराधी भावना, शरम किंवा भय यांचा पगडा बालकांच्या जीवनावर असता कामा नये. बालके आनंदी, संतुष्ट आणि उत्स्फूर्तपणे वागणारी असावीत. आपल्या ऊर्मीची त्यांना भीती वाटणे बरोबर नाही. नैसर्गिक गोष्टींचा शोध घेण्याची त्यांना भीती वाटता कामा नये. आपले सहजभावृत्तिक जीवन त्यांना अंधारात घालवावे लागू नये. ज्या कितीही प्रयत्न केला तरी नष्ट होत नाहीत त्या ऊर्मी असंज्ञेत दडपायच्या लागू नये. ती मोठेपणी सरळ आणि प्रांजळ स्त्रिया आणि पुरुष पहायची असतील, ती जर बौद्धिक प्रामाणिकपणा, सामाजिक निर्भयता अंगी असलेले उत्साही कार्यकर्ते व्हायला हवे असतील, तर त्यांचे शिक्षण आपण आरंभापासूनच त्या दृष्टीने केले पाहिजे, नाचणाऱ्या अस्वलांना शिकविण्याच्या पद्धतीचा शिक्षणावर खोल ठसा उमटला आहे. अस्वलांना नाचायला कसे शिकवतात हे सर्वांना ठाऊक आहे. त्यांना गरम जमिनीवर उभे करतात, आणि त्यामुळे ती नाचायला लागतात, कारण ती नाचली नाहीत तर त्यांचे पाय भाजतात. हे करताना एक वाद्य वाजविले जाते. काही वेळानंतर केवळ ते वाद्य त्यांना नाचायला लावायला पुरते. बालकाचेही तसेच होते. त्याला जेव्हा आपल्या जननेंद्रियाची जाणीव होते, तेव्हा वडील माणसे त्याला रागावतात. पुढे त्या जाणिवेतून वडील माणसांच्या रागवण्याचा विचार उद्भवतो, आणि ती त्या संगीताबरोबर नाच लागतात. निरोगी आणि सुखी लैंगिक जीवनाच्या सर्व शक्यतांची राखरांगोळी होते.

यानंतरच्या अवस्थेत, म्हणजे कुमारावस्थेत, कामप्रेरणेची हाताळणी परंपरागत पद्धतीने केल्याने होणारा अनर्थ बाल्यावस्थेत होणाऱ्या अनर्थाहून भयंकर होतो. अनेक मुलांना आपल्याला काय होते आहे याची नीटशी कल्पना नसते, आणि झोपेत जेव्हा त्यांचे पहिले वीर्यस्खलन होते तेव्हा ती भयभीत होतात, ज्या इच्छा अत्यंत पापमूलक म्हणून आपल्याला शिकविले गेले त्यांनी आपण पुरेपूर ग्रस्त आहोत असे त्यांना आढळून येते. या ऊर्मी इतक्या प्रवळ असतात की त्यांचा त्यांना दिवसरात्र ध्यास लागून राहतो, त्यांच्यापैकी जो इतरांपेक्षा थोडा चांगला मुलगा असेल त्याच्या ठिकाणी कामोर्मीबरोबरच सौंदर्य, काव्य, कामप्रेरणेने लांछित नसलेले आदर्श प्रेम याविषयी आत्यंतिक ध्येयवादी स्वरूपाच्या ऊर्मीही असतात. ख्रिस्ती शिकवणीतील मौनकीयन (Manichean) अंशामुळे कौमारावस्थेतील सात्त्विक आणि शारीर ऊर्मी परस्परांपासून पूर्णपणे विभक्त, एवढेच नव्हे तर परस्परांशी समर करीत राहतात. या मुद्द्याच्या बाबतीत मी माझ्या एका बुद्धिमान मित्राचे निवेदन इथे उद्धृत करतो. तो म्हणतो, “माझी कौमारावस्था असामान्य नसावी असे मला वाटते. त्या अवस्थेत हा विच्छेद अतिशय स्पष्ट स्वरूपात व्यक्त होत होता. कित्येक तास मी शेलीच्या कविता वाची, आणि पतंगाची ताऱ्याच्या प्राप्तीची इच्छा, किंवा रात्रीची दिवसाशी मीलनाची इच्छा यांत रंगून जाई. आणि मग एकदम मी या उच्च भूमीवरून उतरे आणि आमची मोलकरीण कपडे बदलत असताना तिच्याकडे चोरून पाही. या दुसऱ्या ऊर्मीची मला शरम वाटे. पहिलीत अर्थातच बालिशपणाचा अंश होता, कारण तिच्यातील आदर्शवाद कामप्रेरणेविषयी वाटणाऱ्या भयाचे दुसरे अंग होते.”

कौमारावस्थेत मानसिक विकृती मोठ्या प्रमाणात आढळतात आणि ज्या व्यक्ती जीवनाच्या अन्य अवस्थांत संतुलित असतात, त्या कालखंडात समतोल मावू शकतात ही गोष्ट सर्वज्ञात आहे. ‘सॅमोआ बेटातील वयात येणे’ या पुस्तकात लेखिका कु. मोड म्हणते की कौमारावस्थेतील विकार त्या बेटात अज्ञात असतात आणि त्याचे कारण तिच्या मते तिथे प्रचालित असलेली लैंगिक मोकळीक, तेथे चालू असलेल्या ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या उद्योगामुळे ही मोकळीक काहीशी कमी झाली आहे. तेथील मिशनऱ्याच्या घरात राहणाऱ्या काही मुलींना विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तरात त्या म्हणाल्या की कौमारावस्थेत त्या फक्त (जगातील सर्व गोष्टी प्रकाश आणि घार, शुभ आणि अशुभ अशा दोन विरुया त्यापासून निर्माण झाल्या आहेत ते मत) स्वमैथुन आणि समलिंगी मैथुन करू शकत. परंतु ज्या मुली अन्यत्र राहात त्या भिन्नलिंगी संबंध करू शकत. आपल्या उत्तमांतल्या उत्तम मुलांच्या शाळेतील स्थिती सॅमोआतील मिशनऱ्याच्या घरात आदळणाऱ्या स्थितीहून फारशी वेगळी नसते. परंतु ज्या कृती इंग्लिश मुलाने केल्यास अनर्थकारी होतात त्या समोआत निरुपद्रवी मानल्या जातात. याचे कारण येथील मुलांच्या अंतर्मनात रूद नीतीविषयी आदर असतो, तर सॅमोअन लोकांच्या दृष्टीने मिशनरी हा चमत्कारिक आवडी असणारा गोरा मनुष्य आहे, आणि त्याचे छंद सांभाळावे लागतात.

बहुतेक तरुण मनुष्यांना यौवनारंभी कामप्रेरणेच्या बाबतीत अनेक अनावश्यक अडचणी आणि क्लेश सहन करावे लागतात. जर एखादा तरुण शुद्ध राहिला तर त्याकरिता कराव्या लाणाऱ्या संयमामुळे तो भिजा आणि अवरुद्ध (inhibited) होतो. त्यामुळे शेक्टी जेव्हा त्याचे लान होते तेव्हा आपला जुना संयम सोडणे त्याला कठीण जाते. आणि त्याचा लैंगिक व्यवहार पाशवी आणि अकस्मात घडणारा होतो, आणि आपल्या पत्नीचा प्रियकर होण्याची जबाबदारी तो पार पाडू शकत नाही. तो जर वेश्येकडे गेला तर सात्त्विक प्रेम आणि शारीर संबंध यांची कौमारावस्थेत झालेली फारकत चालू राहते, आणि त्याचे स्त्रियांशी घडणारे संबंध एकतर प्लेटॉनिक किंवा त्याच्या समजुतीनुसार अधःपाताच्या स्वरूपाचे राहतात. शिवाय त्याला गुप्त रोग होण्याचे भयही असते. जर त्याचे संबंध त्याच्या सामाजिक वर्गातील मुलींशी आले तर त्यामुळे बरेच कमी अहित होते. पण तेथेही गुप्तता राखण्याची आवश्यकता अहितकर असते, आणि तिच्यामुळे संबंध प्रस्थापित होण्यात अडचणी निर्माण होतात. खोट्या मोठेपणाच्या जाणिवेमुळे, आणि विवाहानंतर अपत्यजन्म अविलंबे झाला पाहिजे, या मतामुळे मनुष्याला यौवनात लग्न करणे कठीण जाते. याशिवाय जेधे घटस्फोट कठीण असतो तेथे अल्पवयात होणाऱ्या विवाहात अनेक घोके असतात. विशीत परस्परांना अनुरूप वाटणारी जोडपी तिशीत तशी राहतील असे नाही. एका जोडीदाराबरोबर स्थिर संबंध प्रस्थापित करणे अनेक व्यक्तींना विविधतेचा बराच अनुभव येईपर्यंत कठीण जाते. जर आपली लैंगिक संबंधाविषयीची दृष्टी निकोप असती तर विद्यापीठातील विद्याथ्यांनी अल्पकालिक, निरपत्य विवाह करावेत असे आपण मानले असते. असे केल्याने त्यांची लिंगाच्या ध्यासातुन मुक्तता झाली असती. सध्या या ध्यासाने त्यांच्या अभ्यासात फार विक्षेप येतो. तसेच त्या योगाने सापत्य विवाहाच्या गंभीर सहकार्याच्या उद्योगाला आवश्यक असा भिन्नलिंगी व्यक्तींचा अतिशय इष्ट असलेला अनुभव त्यांना मिळू शकेल. आणि फसवेगिरी. लपवाछपवी आणि गुप्तरोगांचे भय यापासून मुक्त असलेल्या प्रेमाचा अनुभव घेण्यास ते मोकळे राहतील.

ज्या स्त्रियांना वर्तमान व्यवस्थेमुळे निरंतर अविवाहित राहावे लागते त्यांच्या दृष्टीने रूढ नीतिमत्ता दुःखदायी आणि अनेकदा अहितकरही असते. ज्यांचे सर्व बाजूंनी मोठ्या प्रमाणात कौतुक व्हावे अशा अविवाहित स्त्रिया मी आणि आपणा सर्वांनी पाहिल्या आहेत. पण सामान्य नियम, मला वाटते, याहून वेगळा असावा. जिला लैंगिक संबंधाचा कसलाही अनुभव आलेला नाही, आणि आपले साध्वीत्व सांभाळणे जिला महत्त्वाचे वाटते अशी स्त्री भीतियुक्त नकारात्मक प्रतिक्रियेत गुंतलेली असते. त्यामुळे ती भित्री होते, परंतु त्याचबरोबर स्वाभाविक परंतु असंज्ञत असलेल्या मत्सरामुळे सामान्य लोकांसंबंधी निला नाराजी असते, आणि ज्यापासून ती वंचित राहिली तो अनुभव ज्यांना मिळाला अशा लोकांना शिक्षा करण्याची तिची इच्छा असते. बौद्धिक भय हे दीर्घ कौमार्यातून सामान्यपणे उद्भवते. मला तर असेही वाटते की स्त्रियांची बौद्धिक कनिष्ठता (inferiority), जितपत ती खरी आहे. ती मुख्यतःलैंगिक गोष्टीबद्दलच्या भयाने कुतूहलावर घातलेल्या बंधनामुळे आलेली असते. ज्यांना आपला एकटीचा पती मिळत नाही त्या स्त्रियांच्या वाट्याला आजीव कौमार्यामुळे येणारे कष्ट आणि शक्तींचा आपश्यय का यावा याला कसलेही सयुक्तिक कारण नाही. आजच्या परिस्थितीत हे वारंवार घडून येते. जेव्हा स्त्रिया आणि पुरुष यांची संख्या स्थूलमानाने सारखी होती तेव्हा ह झालेल्या विवाहसंस्थेत्त ह्या परिस्थितीचा विचार न सुचणे स्वाभाविक होते. अनेक देशांत आढळणारे स्त्रियांच्या संख्येचे आधिक्य रूद्ध नीतिसंहितेत बदल करायला हवा ही गोष्ट निःसंशय सुचविते.

विवाह हे कामपूर्तीचे एकमेव रूढ नीतिसंमत साधन आहे, परंतु त्यात दाद्य (rigidity) हा दोष आहे. बाल्यावस्थेत प्रस्थापित झालेले गंड, पुरुषांना येणारा वेश्यांचा अनुभव, आणि तरुण स्त्रियांना साध्वित्व राखण्याकरिता आवश्यक म्हणून रुजविली गेलेली लैंगिक संबंधाविषयीची प्रतिकूलता- या सर्व गोष्टी वैवाहिक सुखाच्या वैरिणी आहेत. जर चांगले संगोपन झालेल्या मुलीची कामोर्मी प्रबल असेल, तर तिचे प्रियाराधन करणाऱ्या तरुणांपैकी आपला समानधर्मा कोण आहे आणि कोणाचे आकर्षण केवळ लैंगिक आहे यात ती फरक करू शकत नाही. लैंगिक इच्छा जागृत करणाऱ्या पहिल्या मनुष्याशी ती लग्न करण्याचा संभव असतो, आणि तिची इच्छा तृप्त झाल्यावर फार उशिरा तिच्या लक्षात येते की तो आणि आपण यात समान काही नाही. त्यांच्या शिक्षणात तिला कामप्रेरणेची भीती घालणारे आणि त्याला कामक्रिया एकदम (प्रियाराधनेशिवाय) उरकून घेण्याला अनुकूल असेच शिक्षण दिले गेले असते. त्यांपैकी एकालाही लैंगिक गोष्टीविषयी असावयास हवी ती माहिती नसते, आणि पुष्कळदा या अज्ञानामुळे प्रारंभी येणाऱ्या अपयशामुळे विवाह सदाकरिता असमाधानकारक होतो. तसेच शारीर सहकार्याबरोबरच मानस सहकार्यही कठीण होते. स्त्रीला लैंगिक गोष्टीविषयी मुक्त भाषणाचा परिचय नसतो, आणि पुरुषाला जो असतो तो अन्य पुरुष आणि वेश्या यांच्या संबंधातच तो असतो. आपल्या सहजीवनातील अत्यंत गाढ आणि महत्त्वाच्या बाबतीत दोघेही लाजरी, अकुशल आणि अबोल असतात, पत्नी रात्री जागत तळमळत असते, आणि आपल्याला काय हवे ते तिला कळत नाही, आणि वेश्यासुद्धा आपल्या पत्नीपेक्षा सहकार्य देण्यात जास्त उदार असतात हा विचार पतीच्या डोक्यात येतो – प्रथम निसटता, आणि त्याची लगेच हकालपट्टी होते; पण नंतर हळूहळू तो प्रबळ होत जातो. तिच्या थंडपणाने तो रुष्ट होतो, आणि त्याचवेळी तिला उत्तेजित कसे करावे हे त्याला न समजल्यामुळे तीही कष्टी असते. ही दुर्दशा आपल्या मौनामुळे आणि सात्विकतेच्या चुकीच्या कल्पनांमुळे घडून येते.

या सर्व प्रकारांनी बाल्यापासून कौमारावस्था, तारुण्य आणि शेवटी विवाह या सर्वांत जुन्या नीतिमत्तेमुळे प्रेम दूषित होते. त्यात विषाद, भय, परस्परगैरसमज, पश्चात्ताप आणि मनोविकृती यांचे प्राबल्य होते, आणि शारीर प्रेरणा आणि आदर्श प्रेमाची सात्त्विक प्रेरणा यांत विच्छेद केला जाऊन पहिली पाशवी आणि दसरी निष्फल होते. जीवन असे जगणे बरोबर नाही. पाशवी आणि सात्त्विक प्रेरणा यांचे परस्परांशी युद्ध होता कामा नये, त्यांपैकी एकीतही दुसरीशी विरोध करील असे काही नाही; उलट कोणत्याही प्रेरणेला दुसरीशी सहकार्य करीत असतानाच पूर्ण समाधान प्राप्त होऊ शकते. स्त्री आणि पुरुष यांचे प्रेम मुक्त आणि निर्भय असले पाहिजे. त्यात शरीर आणि मन यांचा समप्रमाणात संगम झाला पाहिजे. त्याला शारीर आधार आहे. म्हणून त्याला सात्त्विक बनविण्याची भीति असू नये, आणि शारीर आधार सात्त्विक अंगाशी विरोध करील म्हणून त्याला भिऊ नये, प्रेमाच्या बक्षाची मळे पृथ्वीत खोल रुजलेली असावीत. आणि त्याच्या फांद्या स्वर्गापर्यंत पोचलेल्या असाव्यात; पण प्रतिषेध आणि अविवेकी भीती यांनी आणि दूषण आणि भयग्रस्त मौन यांनी वेढलेले असेल, तर प्रेम जगू आणि वाढू शकत नाही. स्त्रीपुरुषांचे प्रेम, तसेच आईबाप व अपत्ये यांचे प्रेम या आपल्या भावजीवनाच्या केंद्रीय गोष्टी आहेत. त्यांपैकी पहिल्याला हलके लेखन दुसऱ्याचे उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न रूढ नीतिमत्तेने केला. पण खरे सांगायचे तर मातापित्यांच्या परस्परांविषयीच्या प्रेमाचा अवमान केल्याने अपत्याविषयीच्या प्रेमाचेही नुकसान झाले आहे. जी मुले आनंदी आणि कृतार्थ कामजीवनाची फळे असतात, त्यांच्यावर अधिक दुढ आणि निकोप असे प्रेम करता येते. हे प्रेम जास्त नैसर्गिक असून ते सरळ, सहज आणि प्राणिसुलभ असते. जी मातापितरे उपासमार झालेली, बुभुक्षित असतात, आणि आपल्याला जे वैवाहिक जीवनात मिळाले नाही त्या पोषक अन्नाचे कण आपल्या असहाय अपत्यांना भरवण्यात व्यग्र असतात, आणि तसे करीत असताना बालकांची मने विकृत करून पुढील पिढीच्या जीवनात त्याच पीडांचा पाया घालतात, त्यांच्या प्रेमापेक्षा कृतार्थ मातापित्याचे प्रेम अधिक श्रेयस्कर असते. प्रेमाला भिणे म्हणजे जीवनाला भिणे, आणि जे जीवनाला भितात ते आधीच तीनचतुर्थांश मृत असतात.

अनुवादक : म. गं. नातू

अभिप्राय 1

  • प्राजक्ता,
    हे प्रकरण १९ हवे. ते १६ झाले आहे.
    कृपया दुरुस्त करावे.
    बहुतेक सर्वच प्रकरणांची शीर्षके मजकुरात गेली आहेत. ती वेगळी करावीत, ही विनंती.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.