श्री. अनंतराव भालेराव

दि. २६ ऑक्टोबर १९९१ रोजी श्री. अनंतराव भालेराव यांचे निधन झाले. पत्रकारितेच्या क्षेत्रातील एक धगधगते यज्ञकुंड शांत झाले. अनंतरावांचा जन्म खंडाळा, ता. वैजापूर, जि. औरंगाबाद येथे १४ नोव्हेंबर १९९१ या दिवशी झाला. त्यांचे वडील काशीनाथबुवा वारकरी होते. शिवूरच्या शंकरस्वामी मठातील फडाचे ते प्रमुख होते. वैजापूर, गंगापूर आणि औरंगाबाद येथे शिकून १९३६मध्ये अनंतराव मॅट्रिकची परीक्षा पास झाले. या परीक्षेत त्यांना संस्कृत या विषयात सर्वाधिक गुण मिळाल्यामुळे शिष्यवृत्ती मिळाली. पुढील शिक्षणाची सोय झाली. याच काळात श्री. गोविंदभाई श्राफ औरंगाबादच्या सरकारी शाळेत शिक्षक म्हणून रुजू झाले. त्यांनी सुरू केलेल्या तरुणांच्या संघटनेत अनंतराव सामील झाले. त्यानंतर वसतिगृहात “वंदे मातरम्” प्रकरण झाले माफी पत्र लिहून न दिल्यामुळे अनंतरावांचे नाव पटावरून कमी झाले, अनंतराव शिक्षणासाठी नागपूर येथे सिटी कॉलेजमध्ये दाखल झाले. ते इंटर पास झाले पण पुढे शिकणे शक्य झाले नाही. हैदराबाद मुक्तीसाठी १९३८ मध्ये जो पहिला सत्याग्रह झाला त्यात वैजापूर येथे अनंतराव, मनोहरराव सोनदे आणि रघुनाथ शेषराव भालेराव सहभागी होते.
शिक्षणाचा मार्ग खुटल्यानंतर परभणी जिल्ह्यात सेलू या गावी त्यांनी नूतन विद्यालय ही राष्ट्रीय शाळा काढली. येथे शिक्षकांना व शाळेला सरकारी जाच सहनकरावा लागला. हैदराबाद स्टेट काँग्रेस या संघटनेला निजामाने बंदी घातल्यानंतर हे कार्यकर्ते ‘महाराष्ट्र परिषद’ या नवीन नावाने काम करू लागले. अनंतराव पूर्णवेळ कार्यकर्ता झाले. नांदेड जिल्ह्यातील उमरी येथील बँकेवर हल्ला झाला त्यात अनंतराव प्रमुख होते. मुंबई येथे असताना त्यांना दीड वर्ष तुरुंगवास भोगावा लागला. पुढे हैदराबाद मुक्त झाले.

साधे व्यक्तिमत्त्व
अनंतराव खरोखर फार साधे होते. साधेपणात त्यांची तुलना साने गुरुजींशीच करता येईल. खादीचा शर्ट, खादीचे धोतर आणि पायात वहाणा असा त्यांच्या पोषाख असे. थंडीच्या दिवसांत किंवा परगावी जाताना त्यात कोट आणि मफलर यांची भर पडे. स्वभावाने अनंतराव शांत होते. उंचापुरा भरदार देह, प्रसन्न हसतमुख असणारे अनंतराव लोकांना आपले वाटत. कोणत्या ना कोणत्या निमित्ताने लोक त्यांना भेटण्यास येत. सर्वांचे समाधान करून ते त्यांना निरोप देत. मराठवाड्यातील गावोगावच्या कार्यकर्त्यांची सर्व माहिती त्यांना असे. त्यांची स्मरणशक्ती कुशाग्र होती. राजकीय मतभेद असले तरी त्यांनी कोणाशी वैर केले नाही. विविध पक्षातील मंडळींशी त्यांचा स्नेह असे. हैदराबादच्या स्वातंत्र्य लढ्यात सर्वस्व झोकून देणारे अनंतराव स्वाभिमानी होते. त्यांनी कोणत्याही अभिलाषेमुळे हे कार्य केले नव्हते. स्वातंत्र्य सैनिकाचे फायदे मिळावेत म्हणून त्यांनी अर्ज केला नाही. शासनानेच सन्मानपत्र व मानधन देऊन अनंतरावांचा गौरव केला. ते सभा-संमेलनापासून सतत दूर असत. प्रारंभीच्या काळात तर ते भाषणासाठी कुठे जात नसत. अनंतराव निरीश्वरवादी होते. त्यांना वाचनाचा नाद होता. धावपळीच्या जीवनात त्यांना वाचनासाठी केव्हा वेळ मिळतो याचे अनेकांना नवल वाटे. अनंतरावांच्या सहवासात नुसते बसणे आणि त्यांचेबोलणे ऐकणे हा आनंददायक अनुभव असे.

अनंतरावांची पत्रकारिता
सुमारे पन्नास वर्षे अनंतरावांनी संपादक म्हणून काम पाहिले. अनंतराव पत्रकार झाले ते केवळ योगायोगाने. १० फेब्रुवारी १९३८ रोजी आ.कृ.वाघमारे यांनी स्वातंत्र्याच्या चळवळीसाठी ‘मराठवाडा हे साप्ताहिक पुणे येथे छापून हैदराबाद येथे सुरू केले. निजामाच्या अधिकार्‍यांनी बंदी आणल्यामुळे हे साप्ताहिक वेगवेगळ्या दहा नावांनी सुरूच राहिले.१९४८ मध्ये मराठवाडा मुंबई येथे छापला जाऊ लागला. हैदराबाद काँग्रेसचे पूर्णवेळ कार्यकर्ते असल्याने सहसंपादक म्हणून त्यांच्यावर जबाबदारी पडली. हैदराबाद मुक्त झाल्यानंतर मराठवाडा नियमितपणे हैदराबादहून प्रसिद्ध होऊ लागला. हैदराबाद मुक्तीनंतर स्वामी रामानंद तीर्थ यांनी स्टेट काँग्रेसचे विसर्जन केले आणि आपल्या कार्यकर्त्यांना कोणत्याही पक्षात जाण्यास मुभा दिली. विशाल द्विभाषिक मुंबई राज्य झाल्यानंतर मराठवाडा औरंगाबादला आला. दर रविवारी व गुरुवारी अंकप्रकाशित होत असे. मराठवाड्यास स्वतःची इमारत झाली. मोठे छपाई यंत्र आले. मराठवाडा दैनिक झाले. गेल्या पन्नास वर्षात निर्माण झालेले प्रश्न मराठवाड्याने जिद्दीने मांडले. सामान्य माणसांच्या बाजूने मराठवाडा सतत उभा राहिला. आपली वैचारिक भूमिका अग्रलेखातून प्रखरपणे मांडणार्‍या अनंतरावांनी बातम्यांच्या बाबतीत कधी पक्षपात केला नाही. १९६६ साली त्यांनी प्रकाशित केलेल्या एका लेखाबद्दल त्यांना शिक्षा झाली. ते स्वतः प्रयत्नवादी असल्यामुळे त्यांनी आपल्या अंकांत कधी भविष्य छापले नाही. पैसा मिळतो म्हणून वाटेल त्या जाहिराती छापल्या नाहीत. इतकेच नव्हे तर संपादक म्हणून आपले स्वतःचे नाव कधी शिरोभागी छापले नाही.
अनंतरावांच्या भाषेत विलक्षण सामर्थ्य होते. उपरोध आणि उपहास असलेली त्यांची भाषा सामान्य माणसांच्या मनाला भिडणारी असे. अनंतरावांनी लिहिलेल्या मृत्युलेखांनी लहानमोठ्या अनेक माणसांच्या कर्तृत्वाची समाजाला ओळख झाली. पत्रकार म्हणून अनंतरावांच्या कार्याचा आ. अत्रे पुरस्कार, फाय फाऊंडेशन पुरस्कार, गोएंका पुरस्कार, आगरकर पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी गौरव झाला. गोएंका पुरस्कार पहिल्यांदाच मराठी पत्रकारितेला आणि तोही अनंतरावांना मिळाला.

साहित्य परिषदेत सहभाग
मराठवाडा साहित्य परिषदेच्या कार्यात प्रारंभापासून अनंतरावांचा मोठा सहभाग होता. परिषद हैदराबादहून औरंगाबादला आल्यानंतर सरस्वती भुवन विद्यालयात नव्या-जुन्या लेखक कवींच्या कथा-कविता-निबंध यांचे वाचन आणि त्यावर चर्चा हे उपक्रम सुरू झाले. १९५६मध्ये औरंगाबादला साहित्य संमेलन झाले, त्यातही अनंतरावांचा मोठा सहभाग होता. मराठवाडा साहित्य परिषदेचे प्रतिष्ठान सुरू झाले त्याच्या संपादकमंडळावर अनेक वर्षे अनंतराव होते. अनंतरावांनी मराठवाड्याइतकेच परिषदेवर प्रेम केले. त्यामुळे मराठवाडा साहित्य परिषदेने ‘अनंत भालेराव भवन’ बांधण्याचा घेतलेला निर्णय औचित्यपूर्ण आहे.

मौलिक ग्रंथलेखन
अनंतरावांनी केलेले ग्रंथलेखन गेल्या दहा वर्षांतील आहे. ‘पळस गेला कोकणा’ १९८४ साली प्रकाशित झाले. या ग्रंथात अनंतरावांना आलेल्या अमेरिकेच्या प्रवासातील अनुभवांचे चित्रण आहे. त्यास मराठवाडा साहित्य परिषदेचा कुरुंदकर पुरस्कार मिळाला. आलो याची कारणासी ही अनंतरावांच्या मराठवाडामधील निवडक अग्रलेखांचा संग्रह आहे. ‘पेटलेले दिवस ‘ या पुस्तकात हैदराबाद स्वातंत्र्यसंग्रामातील आठवणी आहेत. ही दोन्ही पुस्तके १९८५ मध्ये प्रकाशित झाली. हैदराबादचा स्वातंत्र्य संग्राम आणि मराठवाडा या १९८७ साली प्रकाशित झालेल्या पुस्तकात अधिकृत इतिहासाची नोंद झाली असून संशोधनपूर्वक लिहिलेल्या प्रबंधाचे स्वरूप त्यास आलेआहे. या ग्रंथाला केशवराव कोठावळे आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचा म.म.द.वा. पोतदार पुरस्कार मिळाला. स्वामी रामानंद तीर्थ यांचे चरित्र १९८९ मध्ये आले. कावड हा अनंतरावांनी निवृत्त झाल्यानंतर दर शनिवारी मराठवाड्यात लिहिलेल्या विविध व्यक्तिरेखांचा संग्रह मांदियाळी मौज प्रकाशनाकडून प्रसिद्ध होणार आहे.

पत्रकारांना अखेरचा संदेश
गुरुवार दि. १०-१०-९१ रोजी जालना येथील चेतना व्याख्यानमालेतील अनंतरावांचे व्याख्यान हे शेवटचे. या व्याख्यानात त्यांनी पत्रकारांना अखेरचा संदेश दिला आहे.”मराठी पत्रकारितेला टिळक-आगरकर आणि आंबेडकर यांचा वारसा आहे.धंद्याची प्रेरणा हा वारसा कधी नव्हता. काही संदर्भात ज्यांना इतर क्षेत्रात काही जमले नाही ती माणसे या क्षेत्रात येत आहेत. वृत्तपत्राला जनहिताचे निश्चित धोरण असावे. वृत्तपत्रांना ‘फोर्थ इस्टेट’ म्हणतात. पण जेव्हा माणसे विकत मिळतात आणि विद्वत्ता व शब्द घेऊन बाजारात उभी राहातात तेव्हा ही ‘फोर्थ इस्टेट राहात नाही. लोकशाहीला आधार देण्यासाठी हा चौथा स्तंभ आपण पडू देता कामा नये. वृत्तपत्रांनी धंदा अवश्य करावा, पण त्यालाही नीतिमत्ता आणि ध्येय असावे.” हे विचार सदैव प्रेरक ठरणारे आहेत.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.