विवाह आणि नीती (भाग १९)

आपल्या चर्चेतून आपण काही निष्कर्षाप्रत आलो आहोत. यांपैकी काही निष्कर्ष ऐतिहासिक आहेत, तर काही नैतिक आहेत. ऐतिहासिक दृष्टीने पाहता आपल्याला असे आढळले की आज नागरित समाजात लैंगिक नीती ज्या स्वरूपात आहे, ते स्वरूप तिला दोन भिन्न स्रोतांमधून प्राप्त झाले आहे. एका बाजूला पितृत्व निश्चित करण्याची पुरुषांची इच्छा, आणि दुसर्‍या बाजूला प्रजननाखेरीज अन्यत्र लैंगिक संबंध पापमय आहे. हा तापसवादी विश्वास. ख्रिस्तपूर्व काळातील नीती, तसेच सुदूर पूर्वेत आजतागायत आढळणारी नीती यांच्या मुळाशी फक्त पहिलाच स्रोत होता. याला अपवाद होता इराण आणि हिंदुस्थान यांचा, कारण तापसवृत्तीचा प्रसार या दोन क्षेत्रातून झालेला दिसतो. जिथे पुरुषाचा प्रजननात काही वाटा असतो ही गोष्ट अज्ञात असते त्या मागासलेल्या जमातींत पितृत्व निश्चित करण्याची इच्छा अर्थातच अस्तित्वात नसते. त्या लोकांमध्ये पुरुषी मत्सराने स्त्रीच्या स्वैर समागमावर मर्यादा पडत असल्या तरी तेथील स्त्रिया पितृसत्ताक समाजांतील स्त्रियांपेक्षा एकंदरीने पुष्कळच स्वतंत्र असत. मातृसत्ताक समाजातून पितृसत्ताक समाजाकडे वाटचाल करताना बराच संघर्ष झाला असला पाहिजे हे उघड आहे,आणि आपल्या मुलांचे बाप असण्यात ज्यांना महत्व होते अशा पुरुषांना स्त्रीयांच्या स्वातंत्र्यावर बंधने घालणे अवश्य वाटले हे निश्चित. या अवस्थेत लैंगिक नीती फक्त स्त्रियांपुरतीच अस्तित्वात होती. पुरुषाने विवाहित स्त्रियांबरोबर व्यभिचार करण्यावरबंधन होते. बाकी तो स्वतंत्र होता.
ख्रिस्ती धर्माच्या उदयानंतर पाप टाळणे हा नवा हेतू या क्षेत्रात प्रवेश करतो, आणि स्त्री व पुरुष यांच्या बाबतीत नैतिक मानदंड, निदान तत्त्वतः, एकच असतो. मात्र प्रत्यक्ष व्यवहारात तो मानदंड पुरुषांच्या बाबतीत अंमलात आणण्यातील अडचणींमुळे पुरुषांच्या चुकांकडे स्त्रीच्या चुकांपेक्षा अधिक सहिष्णुतेने पाहिले गेले. आरंभीच्या लैंगिक नीतीला जीवशास्त्रीय हेतू म्हणजे नवजात अपत्याला आरंभीच्या वर्षात एकट्या आईच्या संरक्षणाच्यापेक्षा आई आणि बाप दोघांचेही संरक्षण मिळणे हा स्पष्ट दिसतो. ख्रिस्ती व्यवहारात जरी या हेतूकडे दुर्लक्ष झाले नाही, तरी ख्रिस्ती तत्त्वांत मात्र त्याकडे दुर्लक्ष झाले.
अगदी अलिकडच्या काळात लैंगिक नीतीच्या ख्रिस्ती आणि ख्रिस्तपूर्व अंशात बदल होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. ख्रिस्ती अंशाला पूर्वी होता तो प्रभाव आता राहिलेला नाही. याचे कारण धार्मिकसनातनीपणात घडून आलेली पिछेहाट, आणि श्रद्धावंतांच्या श्रद्धेच्या तीव्रतेत झालेली घट. चालू शतकात जन्मलेल्या स्त्रीपुरुषांच्या असंज्ञेत जुन्या श्रद्धा कायम असल्या तरी त्यांच्या संज्ञेत ते सामान्यपणे व्यभिचार पाप समजत नाहीत. ख्रिस्तपूर्व अंशामध्ये एका कारणाने बदल झालेला आहे, आणि दुसर्‍या एका कारणाने आणखी एक बदल होऊ घातला आहे. पहिले कारण म्हणजे संततिप्रतिबंधाच्या साधनांचा उपयोग. यामुळे समागमातून गर्भधारणा होण्यास आळा बसला आहे. त्याचा परिणाम असा झाला आहे की अविवाहित स्त्रियांना अपत्यसंभव पूर्णपणे टाळता येतो, आणि विवाहित स्त्रीयांना एकनिष्ठ न राहूनही आपल्या नवव्यापासूनच अपत्यसंभव होईल अशी व्यवस्था करता येते. ही प्रक्रिया अजून पुरी झालेली नाही, कारण संततिप्रतिबंधाची साधने अजून पूर्ण विश्वासार्ह झालेली नाहीत; परंतु ती लवकरच पूर्णपणे विश्वसनीय होतील असे आपणही गृहीत धरू शकतो. तसे झाल्यावर विवाहबाह्य समागम होऊ नयेत असा आग्रह न धरताही पितृत्वाची निश्चितता शक्य होईल. यावर असे म्हणता येईल की स्त्रिया आपल्या नवर्‍याला या बाबतीत फसवू शकतील; परंतु फार प्राचीन काळापासून नवर्‍याला फसविणे स्त्रियांना शक्य झाले आहे. आणि जर कोणी पिता व्हायचे हाच एकमेव प्रश्न असेल आणि उत्कट प्रेमाचा विषय असलेल्या पुरुषांबरोबर समागम व्हावा की न व्हावा हा नसेल, तर फसविण्याची इच्छा पुष्कळच दुर्बल असणार, त्यामुळे पितृत्वाच्या बाबतीत फसवणूक झाली तरी व्यभिचाराच्या बाबतीत आजपर्यंत घडणार्‍या फसवणुकीहून ती पुष्कळच कमी वेळा घडेल. पित्याचा मत्सरही परिस्थित्यनुरूप बदलणे अशक्य नाही. तसे झाले तर तो (मत्सर ) जेव्हा स्त्री आपल्या अपत्याचा पिता म्हणून अन्य पुरुषांची निवड करण्याचे ठरवील तेव्हाच फक्त जागृत होईल. पौर्वात्य देशात कंचुकींशी स्त्रियांची मैत्री पुरुष सहन करीत आले आहेत. ते त्यांनी सहज मानले कारण त्यांच्या संबंधामुळे पितृत्वाचा संभव नसतो. तीच सहिष्णुता संततिप्रतिबंधक साधनांच्या उपयोगाबाबतही दाखविली जाणे अशक्य नाही.
स्त्रियांच्या एकनिष्ठेचा पूर्वीइतका आग्रह धरला गेला तर द्विपितरीय (biparental) कुटुंब कदाचित टिकेल. परंतु लैंगिक नीतीत होऊ घातलेल्या बदलातील दुसर्‍या एका घटकामुळे अधिक दूरगामी परिणाम घडून येतील, हा घटक म्हणजे शासनसंस्थेचा मुलांचे संगोपन आणि शिक्षण यांत वाढत जाणारा सहभाग. आतापर्यंत या घटकांचे परिणाम बहुतांशी मजूरवर्गापुरते मर्यादित राहिले आहेत, परंतु काही झाले तरी लोकसंख्येत त्यांचीच बहुसंख्या असते, आणि असे ही शक्य आहे की पित्याच्या जागी शासनसंस्थेची योजना जी मजूरवर्गात घडून येत आहे ती सबंध लोकसंख्येत पसरेल. जसे प्राण्यांच्या कुटुंबात, तसेच मानवी कुटुंबातही पित्याचे कार्य संरक्षण व अपत्यसंगोपन हेच असते; परंतु नागरित समाजात संरक्षण पोलिसांकडून मिळते, आणि निर्वाहसाधन शासनसंस्थेकडून मिळू शकेल. तसे झाले तर पित्याला कसलेही उपयुक्त कार्य राहणार नाही. आईच्या बाबतीत दोन शक्यता आहेत. ती आपले पूर्वीचे काम चालू ठेवील आणि आपल्या मुलांचे संगोपन सार्वजनिक संस्थांतून करवून घेईल;किंवा जर कायद्याने तशी सोय केली तर मुले लहान असेपर्यंत त्यांच्या संगोपनाकरिता तिला शासनसंस्थेकडून भत्ता मिळू शकेल, जर हा दुसरा मार्ग स्वीकारला गेला तर त्याचा उपयोग काही काळापर्यंत पारंपरिक नीतीचा पाठपुरावा करण्याकरिता केला जाईल; कारण जी स्त्री एकनिष्ठ नसेल तिचा भत्ता बंद केला जाऊ शकेल. परंतु जर तिचा भत्ता बंद केला गेला तर तिला काम न मिळाल्यास तिला अपत्यांचे पालनपोषण करता येणार नाही, आणि त्याची रवानगी एखाद्या संस्थेत करावी लागेल. म्हणून हे संभाव्य दिसते की जिथे आईबाप श्रीमंत नसतील तिथे पित्याचे, एवढेच नव्हे तर मातेचेही मोठ्या प्रमाणावर निष्कासन होईल, पारंपारिक नीतीतील सर्व पारंपरिक कारणे नाहीशी झालेली असतील, आणि एका नव्या नीतीकरिता नवी कारणे (नवे प्रेरक) शोधावे लागतील.
जर कुटुंब भंगले, तर ही गोष्ट माझ्या मते स्वागतार्ह होणार नाही. मातापित्यांचा स्नेह मुलांच्या दृष्टीने महत्त्वाचा असतो, आणि संस्थांचा प्रसार जर मोठ्या प्रमाणावर झाला तर त्या नक्कीच स्नेहहीन आणि काहीशा कठोर होतील. कुटुंबा-कुटुंबातील भिन्न परिस्थितीमुळे निर्माण होणारे भेद नष्ट झाल्यामुळे भयानक एकसाचेपणा निर्माण होईल;आणि जर आंतरराष्ट्रीय शासन अगोदरच प्रस्थापित झाले नसेल, तर भिन्न देशांतील मुलांना हिंस्र देशभक्तीचे पाठ दिले जातील, आणि त्यामुळे मोठी झाल्यावर ती परस्परांना नष्ट करतील. आंतरराष्ट्रीय शासनाची आवश्यकता लोकसंख्येच्या नियंत्रणाच्या प्रश्नामुळेही निर्माण होते, कारण त्याच्या अभावी राष्ट्रवादी लोकांना जरुरीपेक्षा जास्त लोकसंख्येला उत्तेजन देण्यास एक कारण सापडेल, आणि वैद्यकशास्त्र आणि आरोग्यशास्त्र यांच्या प्रगतीमुळे अतिरिक्त लोकसंख्या कमी करण्याचा युद्ध हा एकमेव मार्ग शिल्लक राहील.
समाजशास्त्रीय प्रश्न पुष्कळदा कठीण आणि गुंतागुतीचे असले, तरी वैयक्तिक प्रश्न मात्र अगदी साधे असतात असे मला वाटते. कामप्रेरणेत काही तरी दोषास्पद आहे या समजुतीमुळे वैयक्तिक जीवनाचे अतोनात नुकसान झाले आहे. हे नुकसान बाल्यावस्थेत सुरू होते आणि ते सबंध जीवनभर चालू राहते. कामप्रेरणेला बंदिस्त करून पारंपरिक नीतीने अन्य सर्व प्रकारच्या मैत्रीच्या भावनांनाही बंदिस्त केले आहे, आणि त्यामुळे माणसेकमी उदार, कमी दयाळू, अधिक आक्रमक, अधिक दुष्ट झाली आहेत. कोणतीही नीती शेवटी स्वीकारली जावो, ती अतिश्रद्धेपासून (superstition) मुक्त असली पाहिजे, आणि तिच्या बाजूने स्पष्ट आणि समर्थनीय आधार असले पाहिजेत. कामप्ररणेचे नीतीवाचून चालणार नाही, जसे व्यापार, क्रीडा, वैज्ञानिक संशोधन किंवा कोणताही मानवी उद्योग नीतीशिवाय असू शकत नाही. पण अतिशय भिन्न समाजांतील अशिक्षित लोकांनी घालून दिलेल्या प्रतिबंधांवर आधारलेली नीती ती त्यागू शकते. जसे अर्थकारणात आणि राजकारणात, तसेच कामप्रेरणेच्या बाबतीतही आपल्या नीतीवर भीतीचे दडपण आहे; परंतु ती भीती अविवेकी असल्याचे विज्ञानातील शोधांनी दाखवून दिले आहे. परंतु त्या शोधांचा लाभ मात्र आपण त्या भयापासून मुक्त न झाल्याने आपल्याला मिळू शकत नाही.
सर्व संक्रमणांप्रमाणे जुन्या व्यवस्थेतून नव्या व्यवस्थेत होणार्‍या संक्रमणात अनेक अडचणी आहेत. जे कोणी नैतिक क्षेत्रात काहीही नवे सुचवितात त्यांच्यावर सॉक्रेटिसाप्रमाणे तरुणांना बिघडविण्याचा आरोप केला जातो. आणि जरी नवी नैतिक व्यवस्था पूर्णपणे स्वीकारली गेल्यास एकूण जीवन पूर्वीपक्षा अधिक चांगले होईल हे खरे असले, तरी हा आरोप पूर्वपणे निराधार नसतो हेही खरे असते. इस्लामी पूर्वेशी परिचित असलेल्या सर्वांना माहीत असते की ज्यांना दिवसातून पाचवेळा नमाज पढणे अनावश्यक वाटते त्यांना आपण जे नियम अधिक महत्त्वाचे समजतो त्यांच्याहीविषयी आदर वाटेनासा होतो. जो मनुष्य लैंगिक नीतीमध्ये कुठलाही बदल सुचवितो त्याच्या मतासंबंधी गैरसमज होण्याची विशेष भीती असते. मीही अशा अनेक गोष्टी बोललो असेन की ज्यांच्यासंबंधी वाचकांच्या मनांत गैरसमज आहेत याची मला जाणीव आहे.
ज्या तत्त्वामुळे नवीन नीती पारंपरिक तापसी (प्यूरिटन) नीतीहून भिन्न होते ते असे आहे. सहजप्रवृत्तीला विरोध करण्यापेक्षा तिला वळण लावणे चांगले असे आमचे मत आहे. या शब्दांत व्यक्त केलेले हे मत आधुनिक स्त्रीपुरुषांना मोठ्या प्रमाणात मान्य होईल असे आहे; परंतु ते जर त्या संभाव्य परिणामांचा विचार करून स्वीकारले गेले आणि त्याचा प्रयोग अगदी बाल्यावस्थेच्या आरंभापासून केला गेला तरच ते. पूर्णपणे हितकर होईल, जर बाल्यावस्थेत सहजवृत्तीला वळण लावण्याऐवजी तिला बंदिस्त केले गेले तर परिणाम असा होण्याची भीती आहे की मग तिला आयुष्यभर थोडेबहुत बंदिस्त ठेवावे लागेल, कारण बाल्यावस्थेत तिला विरोध झाल्यामुळे तिने अनेक अतिशय अनिष्ट अशी रूपे धारण केली असतात. मी ज्या नीतीचा पुरस्कार करतो आहे ती प्रौढांना आणि कुमारांना आपल्या ऊर्मीप्रमाणे वागा आणि तुम्हाला वाटेल ते करा’ एवढेच फक्त सांगत नाही, जीवनात सुसंगती असावी लागते. जे तत्काळ लाभदायक नसतात आणि जे सर्वदा आकर्षक वाटत नाहीत अशा साध्यांच्या प्राप्तीसाठी सतत प्रयत्न करावा लागतो, आणि युक्ततेचा एक मानदंडही असावा लागतो. परंतु आत्मसंयमाची मात्रा कमाल असण्यापेक्षा किमान असेल असे आपल्या नैतिक रूढीचे स्वरूप असावे असे मला वाटते. आत्मसंयमाचा उपयोग आगगाडीच्या ब्रेकांसारखा असावा. आपण चुकीच्या मार्गाने जात आहोत हे लक्षात आले कीत्याचा उपयोग होतो; परंतु जेव्हा आपण योग्य मार्गावर असतो तेव्हा तो निव्वळ अहितकारक असतो. आगगाडीचे ब्रेक्स सदा लावलेल्या स्थितीतच असावेत असे कोणीही म्हणणार नाही; परंतु कठिण आत्मसंयमाची सवय लागली तर तिचे परिणाम उपयुक्त उपयोगांकरिता वापरायच्या शक्तीवर अतिशय अनिष्ट होतात. आत्मसंयमामुळे या शक्तीचा बाह्य उद्योगात उपयोग न होता, त्यांचा आतल्या संघर्षात अपव्यय होतो, आणि या कारणास्तव तो जरी कधीकधी आवश्यक असला तरी नेहमीच शोचनीय असतो.
आत्मसंयम कितपत आवश्यक असेल, ते सहजप्रवृत्तीवर ज्या प्रकारचे संस्कार बाल्यावस्थेत होतात त्यावर अवलंबून असते, बालकांच्या सहजप्रवृत्तीतून उपयुक्त व्यापार जसे उद्भवतील, तसेच अहितकर व्यापारही उद्भवतील, आगगाडीचे इंजिन जसे इच्छित स्थळी घेऊन जाऊ शकते, तसेच ते भलतीकडेही नेऊ शकते, आणि तसे झाल्यास त्याचा नाशही होतो. शिक्षणाचे कार्य सहजप्रवृत्तींना अशी दिशा देणे असते की त्यातून अहितकर व्यापारांऐवजी हितकर व्यापार उद्भवतील. जर अपवादात्मक प्रसंग सोडले तर, हे काम जर बाल्यावस्थेत नीट झाले असेल, तर स्त्री आणि पुरुष सामान्यपणे कठोर आत्मसंयमाशिवायही उपयुक्त जीवन जगू शकतील. परंतु जर बाल्यावस्थेतील शिक्षणात सहजप्रवृत्तींचा विरोध केला गेला असेल, तर सहजप्रवृत्तीतून उत्तरायुष्यात उद्भवणारी कृत्ये अंशतः अहितकर असतील, आणि म्हणून त्यांच्यावर आत्मसंयमाची सतत देखरेख असावी लागेल.
हे सामान्य विचार कामुक ऊर्मीना विशेषत्वाने लागू पडतात, कारण त्या अतिशय प्रबल असतात, आणि पारंपरिक नीतीचा त्या प्रधान विषय होत्या. बहुतेक सर्व पारंपरिक नीतिमार्तंड असे मानताना दिसतात की जर आपल्या लैंगिक ऊर्मीचा कठोर संयम केला नाही, तर त्या क्षुद्र, उच्छृखल आणि स्थूल होतील. ज्यांच्या ठिकाणी बाल्यावस्थेत नेहमीचे निरोध निर्माण झाले आहेत, आणि जे नंतर त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात अशा मानवांच्या निरीक्षणातून हे मत निर्माण होते असे मला वाटते, परंतु अशा मानवांमध्ये भूतकालीन प्रतिषेध जरी आता फारसे कार्यक्षम राहिले नसले, तरी ते अजून कार्यरत असतात. ज्याला आपण सदसद्विवेक म्हणतो म्हणजे कौमारावस्थेत मनावर बिंबलेल्या नियमाचा नकळत केलेला अचिकित्सक स्वीकार त्याच्यामुळे ज्या ज्या गोष्टींचा निरोध केला गेला असेल त्या वाईट असल्या पाहिजेत असे मानण्याची आपली प्रवृत्ती असते. आणि बुद्धीने जरी या गोष्टी वाईट नाहीत असा निर्वाळा दिला तरी ती प्रवृत्ती कायम राहू शकते. तिच्यातून मग दुभंगलेले व्यक्तित्व निर्माण होते. सहजप्रवृती आणि विवेक यांचे सहकार्य होईनासे होते, कारण सहजप्रवृतीने आपले महत्त्व गमावलेले असते, आणि विवेक दुर्बल झालेला असतो. आपल्याला आधुनिक जगात पारंपरिक शिकवणीविरुद्ध होणारी बंडे दिसतात. त्यांतील सर्वात सामान्य बंड अशा माणसाचे असते की जो तारुण्यात शिकलेल्या नैतिक नियमांचे सत्यत्व स्वीकारतो,…. परंतु जो कृतक दिलगिरीसह हेही कबूल करतो की आपण त्या नियमानुसार वागू शकत नाही. अशा माणसाच्या बाजूने बोलण्यासारखे फारसे काही नाही.त्याने एक तर आपला व्यवहार बदलावा किंवा तत्त्वे बदलावी, आणि त्यांच्यामध्ये सुसंगती निर्माण करावी हे श्रेयस्कर. यानंतर येतो असा मनुष्य की ज्याने जागृत बुद्धीने बाल्यात आत्मसात् केलेले बरेचसे त्यागले आहे, परंतु ज्याची असंज्ञा त्या सबंध शिकवणीला कवटाळून बसली आहे, असा मनुष्य एखाद्या भावनिक तणावाच्या प्रसंगी, विशेषतः भीतीच्या प्रसंगी, आपली सबंध कार्यपद्धती बदलेल. एखादे कठीण दुखणे, किंवा धरणीकंप यामुळे त्याला पश्चात्ताप वाटू लागेल, आणि बाल्यावस्थेतील विश्वासांच्या आवेगात तो आपल्या बौद्धिक निष्ठांचा त्याग करील. सामान्य काळीही त्याचे वर्तन अवरुद्ध ( inhibited) असते, आणि त्याचे अवरोध (inhibitions) अनिष्ट वळण घेऊ शकतात. पारंपरिक नीतीच्या अनुसार जे वर्तन निषिद्ध आहे ते करण्यास ते प्रतिबंध करू शकत नाहीत, परंतु त्या प्रकारचे वर्तन सर्वस्वाने करण्यास मात्र ते प्रतिबंध करतात, आणि अशा प्रकारे त्याच्या कृतीमध्ये जे मूल्यवान आहे त्यांपैकी काहींचा ते नाश करतील, जर आपल्या पूर्ण व्यक्तित्वाने नव्या नीतीचा स्वीकार केला नसेल, आणि त्याच्या वरच्या केवळ संज्ञारूपी स्तरानेच तो केला असेल, तर जुन्या नीतीच्या जागी नवी नीती प्रस्थापित करणे कधीही संपूर्णपणे सामाधानकारक होणार नाही. जर बहुतेक माणसांवर त्यांच्या पूर्वायुष्यात जुन्या नीतीचाच प्रभाव पडला असेल, तर हे विशेषच कठीण जाते. यास्तव नव्या नीतीचा प्रयोग प्रारंभिक शिक्षणात केला जाईपर्यंत तिच्याविषयी रास्त निर्णय देणे अशक्य आहे.
लैंगिक नीती काही सामान्य तत्त्वांपासून निष्पन्न होते. या सामान्य तत्त्वांतून उद्भवणार्‍या परिणामांच्या बाबतीत जरी मोठा मतभेद असला, तरी त्या तत्त्वांबाबत मात्र बरेच ऐकमत्य आहे. यासंबंधात पहिली अवश्य गोष्ट ही आहे की स्त्री आणि पुरुष यांत असे गाढ आणि गंभीर प्रेम असावे की जे त्या दोघांचीही व्यक्तित्वे व्यापून टाकील, आणि त्यांचे असे एक रसायन बनवील की ज्याने ती दोघेही समृद्ध आणि विशाल होतील. दुसरी महत्त्वाची गोष्ट ही की अपत्यांची शारीरिक आणि मानसिक अशी दोन्ही प्रकारची पुरेशी काळजी घेतली जावी.
यांपैकी कोणतेही तत्त्व धक्का देणारे आहे असे म्हणता येत नाही, परंतु या तत्त्वांच्या पूर्तीकरिताच मी पारंपरिक संहितेत काही बदल सुचविणार आहे. सध्याच्या परिस्थितीत बाल्य प्रतिषेधांनी इतके व्यापलेले असते की त्यामुळे स्त्री किंवा पुरुष कोणीही वैवाहिक जीवनात पूर्ण आणि उदार प्रेम आणू शकत नाही. त्यांना एकतर आवश्यक अनुभव नसतो, किंवा तो असला तर तो त्यांनी चोरट्या आणि अनिष्ट मार्गांनी मिळविलेला असतो. याशिवाय मत्सराला नीतिमार्तंडांची मान्यता असल्यामुळे एकमेकांवर पाळत ठेवणे ते समर्थनीय मानतात, पती आणि पत्नी ही एकमेकांवर इतकी पूर्णपणे अनुरक्त असतील की त्यांना व्यभिचारांचा मोहच होत नाही असे असेल तर ती फारच इष्ट गोष्ट आहे. परंतु जर एकनिष्ठा भंग पावली तर काही तरी भयंकर घडले आहे असे मानणे इष्ट नाही, आणि तसेच भिन्नलिंगी व्यक्तींची मैत्री अशक्य होईल अशी अवस्था येणे हेही अनिष्ट आहे. सुजीवन हे भय, प्रतिबंध आणि स्वातंत्र्यात दोन्ही पक्षांकडून होणारा हस्तक्षेप यांच्या पायावर उभे राहूशकत नाही. या सर्वांशिवाय एकनिष्ठ असणे हे उत्तम पण जर वरील सर्व गोष्टींची गरज भासली तर ती फारचभारी किंमत दिल्यासारखे होईल, आणि क्वचित् होणार्‍या स्खलनाकडे डोळेझाक करणे कदाचित श्रेयस्कर असेल जिथे शारीरिक एकनिष्ठा असेल तिथे परस्परांविषयीच्या असहिष्णुतेमुळे वैवाहिक जीवनात असंतोष निर्माण होऊशकतो; परंतु जर गाढ आणि टिकाऊ प्रेमाच्या अंतिम सामर्थ्यावर विश्वास असेल तर उत्पन्न होणार्‍या असंतोषापेक्षा तो क्वचितच जास्त असेल हे निःसंशय.
स्वतःला सदाचारी समजणारी अनेक माणसे अपत्याबाबतची जबाबदारी पुरेशा गांभीयाने पाळत नाहीत हे मला चूक वाटते. सध्याच्या द्विपित्रीय कुटुंबात अपत्यजन्म झाल्या क्षणापासून पती आणि पत्नी यांचे परस्परांतील संबंध सर्व प्रकारे सलोख्याचे ठेवणे त्याकरिता पुष्कळ आत्मसंयम करावा लागला तरी दोघांचेही कर्तव्य ठरते. परंतु हा आत्मसंयम पारंपरिक नीतिमार्तंड समजतात त्याप्रमाणे फक्त व्यभिचाराच्या ऊर्मी दडपण्यापुरताच असून चालत नाही. तितकाच संयम मत्सर, चिडखोरपणा, अरेरावी वृत्ती यांच्या बाबतीतही अवश्य आहे. मात्यापित्यांची परस्परांत होणारी गंभीर भांडणे बालकांच्या मनोविकृतींचे प्रमुख कारण असतात यांत शंका नाही. म्हणून अशी भांडणे होऊ नयेत म्हणून अवश्य ते सर्व उपाय योजले जावेत. त्याचप्रमाणे मात्यापित्यांपैकी एक किंवा दोघेही जर आपले मतभेद अपत्यापासून लपवून ठेवण्याइतके संयमी नसतील, तर असे विवाह मोडणेही श्रेयस्करच असू शकते. मुलांच्या दृष्टीने विवाहभंग ही सर्वात अनिष्ट गोष्ट आहे असे नव्हे. खरे म्हणजे चढलेले सूर, परस्परांवर केले जाणारे भयंकर आरोप, प्रसंगी मारहाणी या गोष्टी मुलांना अनुभवाव्या लागण्यापेक्षा विवाहभंग निश्चितच कमी अनिष्ट आहे.
अधिक स्वातंत्र्याचा पुरस्कार करणार्‍या लोकांना इष्ट वाटणारी व्यवस्था प्रौढांना (किंवा कुमारांनाही) त्यांच्या ऊर्मीवर विसंबू देऊन साध्य होईल असे मानणे चुकीचे होईल; कारण ते जुन्या कठोर नियमांच्या तालमीत वाढले असल्यामुळे त्या ऊर्मीचे विकृत स्वरूपच आता शिल्लक राहिलेले असते. तरीसुद्धा ही अवस्था आवश्यकच आहे, कारण नाही तर ते आपल्या मुलांना ते स्वतः जसे वाढले तसेच वाढवितील. पण ही केवळ एक अवस्थाच आहे हे लक्षात ठेवले पाहिजे. स्वातंत्र्याचे धडे बालकांना अगदी बालवयापासूनच मिळाले पाहिजेत; कारण तसे झाले नाही तर त्यांचे स्वातंत्र्य उथळ, पोरकट होईल, ते सबंध व्यक्तिमत्त्वाचे स्वातंत्र्य असणार नाही. क्षुद्र ऊर्मीतून शारीर अतिरेक उद्भवेल, आणि आत्मा मात्र बंधनातच राहील. कामप्रेरणा पापमूलक आहे ह्या सिद्धांतावर आधारलेल्या शिक्षणाने होऊ शकतील त्यापेक्षा कितीतरी चांगले परिणाम पहिल्यापासून योग्य प्रशिक्षण मिळालेली सहजप्रवृत्ती घडवू शकेल, पण जर त्या सिद्धांताने आपले अनिष्ट कार्य केले असेल, तर उत्तरायुष्यात त्याचे निराकरण करणे अतिशय कठीण असते. मनोविश्लेषणशास्त्रामुळे झालेल्या अतिशय महत्त्वाच्या लाभांपैकी एक म्हणजे बाल्यावस्थेत निरोध आणि धमक्या यांनी होणार्‍या दुष्परिणामांचा लागलेला शोध. या दुष्परिणामांचा निरास करण्यात मनोविश्लेषणशास्त्रीय चिकित्सेला आपले सर्व तंत्रदीर्घकालपर्यंत वापरावे लागेल. सर्वाना सहज दिसणार्‍या अशा मज्जाविकृतीने पछाडलेल्या लोकांविषयीच फक्त हे म्हणणे खरे आहे असे नाही. अगदी सामान्य, शाबूत लोकांविषयीही ते खरे आहे. माझे असे मत आहे की जे पारंपरिक वातावरणात वाढतात अशा दहांपैकी नऊ लोकांना त्यामुळे विवाह आणि कामप्रेरणा यांच्याविषयी निर्मळ आणि शहाणी अभिवृत्ती स्वीकारणे थोड्याफार प्रमाणात अशक्य होऊन बसते. जी मी उत्तम समजेन अशी अभिवृत्ती ते लोक स्वीकारू शकत नाहीत, त्यांचे केवढे नुकसान झाले आहे हे त्यांना समजावून सांगणे, आणि त्यांना झालेले अपाय आपल्या मुलांना न करण्याबद्दल त्यांचे मन वळविणे एवढेच फक्त आपण त्यांच्या बाबतीत करू शकतो.
मला ज्या मताचा पुरस्कार करायचा आहे ते मत म्हणजे स्वैराचार नव्हे. पारंपरिक मतात जितका संयम आवश्यक असतो, जवळपास तितकाच संयम याही मतात आवश्यक आहे. परंतु हा संयम स्वतःच्या स्वातंत्र्याचा करावा लागणार नाही, तर तो इतरांच्या स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा करावा लागेल. प्रथमपासूनच जर उचित शिक्षण दिले गेले, तर इतरांचे व्यक्तित्व आणि त्यांचे स्वातंत्र्य यांच्याविषयी आदर बाळगणे बरेच सोपे जाईल. परंतु इतरांच्या कृतीवर बंधन घालण्याचा आपल्याला नैतिक अधिकार आहे अशा समजुतीचे शिक्षण ज्यांना मिळाले आहे त्यांना इतरांचा छळ करण्याचा हा सुखदायी हक्क न वापरणे जड जाते हे निःसंशय. ते कदाचित अशक्यही होईल. पण म्हणून जे प्रथमपासूनच कमी प्रतिबंधक नीतिव्यवस्थेत वाढले आहेत त्यांनाही ते अशक्य होईल असे मानणे चूक होईल. यशस्वी विवाहाचे सार म्हणजे परस्परांच्या व्यक्तित्वाविषयी आदर, आणि ज्यामुळे स्त्रीपुरुषांचे गंभीर प्रेम हा मानवी अनुभवातील सर्वांत फलदायी अनुभव होतो ते शारीर, मानस आणि आत्मिक गाढ सख्य. अशा प्रेमाला इतर कोणत्याही थोर आणि मूल्यवान गोष्टीप्रमाणे स्वतःची नीती अपेक्षित असते, आणि कित्येकदा त्यागही करावा लागतो. परंतु हा त्याग स्वेच्छेने केलेला असावा लागतो. कारण जिथे तो तसा नसतो तिथे ज्या प्रेमाखातर तो करावयाचा असतो त्या प्रेमाच्या तो नाश करतो.

अनुवादक : म. गं. नातू