कालचे सुधारकः ताराबाई मोडक (पूर्वार्ध)

१९ एप्रिल १९९२ रोजी, ताराबाई मोडकांची जन्मशताब्दी झाली. ताराबाई थोर शिक्षणतज्ज्ञ, विशेषतः पूर्व प्राथमिक शिक्षणाबद्दलचे त्यांचे कार्य फार मोठे आहे. पण लक्षात आले की, ताराबाईंचे कार्यच काय, नावही असावे तितके प्रसिद्ध नाही. लोकांचे अशा गोष्टींकडे लक्षच कमी आहे का? असेल. महाराष्ट्राचे सामाजिक सुधारणेसाठी थोडेबहुत नाव आहे. हे कौतुक ऐकायला बरे वाटते. पण त्याच्या मागे शेदीडशे वर्षांचे काम आहे, हे विसरायला होते. सुधारणावाद्यांची महाराष्ट्रात एक परंपरा आहे. ती क्षीण असेल, पण अजून खंड नाही. अशा कार्याच्या बाबतीत ताराबाईंनी म्हटले आहे, हा खटाटोप कशाला करायचा, हा प्रश्न … खुर्चीवर बसून विचार करण्याच्यापेक्षा प्रत्यक्ष काम करणार्‍यांना जास्त वेळा बोचतो. हे कार्य अत्यंत कठिण, क्षणोक्षणी निराशा उत्पन्न करणारे, सकृद्दर्शनी निरर्थक दिसणारे आणि कार्यकर्त्यांना थकवणारे आहे… पण माणसाचा माणूसपणा कठिण आणिअशक्यप्राय दिसणारी कामे करण्यातच आहे.
‘आजचा सुधारक” कारांना हे विचार वाचून किती दिलासा मिळत असेल याची वाचकांनी कल्पना करावी, ताराबाईंचे चरित्र, त्यांचे विचार, त्यांचे कार्य हे सारेच लोकोत्तर आहे. आम्ही त्यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने आमच्या वाचकांना त्यांच्या कामाची ओळख करून देत आहोत. त्यांचे विचार आम्हाला तर शक्ती देतातच पण वाचकांनाही स्फूर्ती देतील अशी आशा आहे.
महाराष्ट्रातल्या थोड्या नजरेआड गेलेल्या कर्त्या सुधारकांची ओळख इथेच न थांबवता पुढे चालू ठेवण्याचा आमचा विचार आहे. अगदी उडता दृष्टिक्षेप टाकला तरी, लोकहितवादी, रमाबाई रानडे, पंडिता रमाबाई, विठ्ठल रामजी शिंदे, रघुनाथ धोंडो कर्वे, श्री म. माटे अशी नावे दिसतात. त्यांचे काम किती मोठे होते हे आज सिद्ध झाले आहे.‘कालचे सुधारक’ही लेखमाला आजच्या सुधारकमधून पुढील काही महिने चालू राहील.आरंभ करीत आहोत आधी नमन ताराबाईंना करून,
ताराबाई या काही एखाद्या कादंबरीच्या नायिका नाहीत. पण त्यांच्या जीवनाच्या एका पर्वावर एक कादंबरी लिहिली गेली खरी आणि ती एक शोकांतिका म्हणून महाराष्ट्रात गाजलीही. माडखोलकरांनी तिला ‘भंगलेले देऊळ’ म्हटले पण ते ताराबाईंचे समग्र जीवन नाही. त्यांच्या जीवनाला असे काही अलंकारिक नाव द्यायचेच झाले तर ‘पुण्यसलिला भागीरथी असे काहीसे असेल. पण या कथेतील भगीरथ ताराबाईंच असेल आणि भागीरथीही ताराबाईंच असतील.
एकोणवीसशे पंधरा साली के. व्ही. मोडकांशी लग्न होऊन ताराबाई उमरावतीला आल्या त्यावेळी उमरावतीने पाहिलेली ती पहिली ग्रॅज्युएट महिला होती. पाहता पाहता निष्णात फौजदारी वकील म्हणून मोडकांनी नाव मिळवलेले होते. उठण्याबसण्यात युरोपियन शिष्टाचार कटाक्षाने पाळणार्‍या या मोडकांना उमरावतीकरांनी अॅडव्होकेटचा बॅरिस्टर करून टाकले होते. मोडकांना आपली अशी प्रतिमा फुगवत राहण्याची फार हौस होती. स्वतः ताराबाईंचे पूर्वायुष्य मात्र ह्या चंगळवादाशी जुळणारे नव्हते. त्या एका ध्येयवादी कुटुंबात वाढल्या होत्या. त्यांचे वडील सदाशिवराव केळकर प्रार्थनासमाजाचे एक संस्थापक होते. न्यायमूर्ती रानडे,भांडारकर, वागळे याच्यांत वावरणारे, सामाजिक दृष्टी असणारे, स्वतः पुनर्विवाह केलेले एक सुधारक होते. के व्हीं चे वडीलही प्रि. वामन आबाजी मोडक प्रार्थनासामाजिस्ट होते. स्वतःच्या कर्तृत्वाने शिक्षणक्षेत्रात मोठ्या लौकिकला चढलेले मुंबई विद्यापीठाच्या पहिल्या पदवीधरांपैकी एक होते. असे असताना ताराबाईंनी केव्हींशी लग्न करावे असे त्यांच्या घरी कोणालाच वाटत नव्हते. पण ताराबाईंचा स्वतःच्या प्रेमावर, स्वतःवर फारच विश्वास होता. त्यांना मावशीसमान असणार्‍या डॉ. काशीबाई नवरंगे यांनाही हे लग्न मान्य नव्हते. काशीबाईंच्या मताला विशेष महत्त्व असण्याचे कारण होते. ताराबाईंचे वडील त्यांच्या वयाच्या चवदाव्या वर्षी आणि आई सोळाव्या वर्षी वारल्यावर याच काशीबाईंनी त्यांच्या पालकाची जागा घेऊन चार भाऊ आणि दोन बहिणींना जवळ केले होते.
१९२० साली ताराबाईंना कन्या झाली. केव्हींनी प्रेमाने प्रभा नाव ठेवले. ताराची प्रभा. पण ह्या बाळंतपणाच्या काळात केव्हींनी गडकर्‍यांच्या सुधाकराची वाट धरली. तशी ती वाट त्यांना लग्नाआधीच अवगत होती. इतकी की ताराबाईंनी लग्न रजिस्टर करायच्या आधल्या दिवसापर्यंत ते घडू नये म्हणून परिचितांनी प्रयत्न करून पाहिले होते. ताराबाईंची मनःस्थिती द्विधा झाली. पण आपण वचन दिले आहे ते पाळलेच पाहिजे या विचाराने त्यांनी हे लग्न केले. याच सुमारास डॉ. मिस् सुलोचना जावळे यवतमाळहून उमरावतीला प्रैक्टिस करायला आल्या होत्या. स्वतः ताराबाईंनी या डॉक्टर बाईंना उमरावतीला स्थिर व्हायला मदत केली होती. मुंबईची जुनी ओळख होती. ताराबाईंच्या गैरहजेरीत के व्हीं ची जावळ्यांशी जवळीक इतकी वाढली की ताराबाई बाळाला घेऊन परतेपर्यंत त्यांच्या बंगल्याच्या कंपौडमध्येच मागील बाजूच्या स्वतंत्र घरात डॉ. जावळ्यांचा दवाखाना आणि निवासस्थान आले होते. के व्हीं च्या पतनाने वेग घेतला. त्याचे पर्यवसात ताराबाईंनी घर सोडण्यात झाले. निर्णय कठिण होता. कोणाचा सल्ला घेणे जरुर होते. त्या हिंगण्यास जाऊन आल्या. त्यांच्या कुटुंबाचे स्नेही तिथे कर्व्यांच्या महिलाश्रमात काम करीत. त्यांचा सल्ला मानून ताराबाईंनी सबुरी धरली. पण फायदा झाला नाही. शेवटी ताराबाईंना मूळ निर्णयावर यावे लागले. अहोरात्र होणारा धिक्कार त्यांचे मानी मन सहने करू शकले नाही. आता त्यांना आप्तांचा आश्रय नव्हता. त्यांचे एक डॉक्टर बंधू माधवराव केळकर यांनी तर अजून अबोला सोडलेला नव्हता. ताराबाईंनी भावनेच्या भरात लग्न केले असेल, पण गृहत्याग मात्र विचारपूर्वक केला. खुद्द मोडकांशी त्यांनी भांडण केले नाही.शांतपणे चर्चा केली. दूर व्हायचे ठरवले. मोडक स्वतः मुंबईपर्यंत त्यांना पोचवायला आले. ताराबाई डॉ. काशीबाई नवरंग्याकडे उतरल्या त्यांची प्रभा त्यावेळी होती दीडवर्षाची. आता पुढचा मार्ग त्यांना एकटीला चालायचा होता. त्यावेळी त्यांच्या आणखी एका मानलेल्या मावशीची मदत झाली. सुप्रसिद्ध डॉ. रखमाबाई त्यावेळी राजकोट संस्थानात नोकरीला होत्या. त्यांनी पुढाकार घेतला. ताराबाईंना नोकरी मिळाली. राजकोट येथील बार्टन फीमेल ट्रेनिंग कॉलेजच्या त्या पहिला भारतीय स्त्रीप्रिन्सिपल झाल्या. पगार होता दरमहा अडीचशे रुपये. इथे ताराबाईंचे संसारपर्व जवळजवळ संपले. जवळजवळ म्हणायचे ते अशासाठी की, पुन्हा एकदा हे ‘भंगलेले देऊळ’ सांधायचा प्रयत्न उभयपक्षी झाला. आणि पुन्हा तो व्यर्थ ठरला.
राजकोटापासून दीडशे मैलांवर भावनगर आहे. तेथील एका टेकडीवर’दक्षिणामूर्ती ही संस्था गिजुभाई चालवत. हे गिरिजाशंकर बधेका उर्फ गिजुभाई मॉन्टेसोरी पद्धतीने झपाटलेले होते. स्वातंत्र्य आणि स्वयंस्फूर्ती त्या तत्त्वांवर ही शिक्षणपद्धती आधारली होती. लहान मुलांच्या शाळेला बालमंदिर हे त्यांनी दिलेले नाव ताराबाईंना फार आवडले होते. ताराबाई ही संस्था पहायला गेल्या आणि परतल्या त्या, त्या संस्थेत सामील व्हायचा निश्चय करूनच. इथे दक्षिणामूर्तीमध्ये त्यांच्या एकट्या पडलेल्या प्रभाच्या शिक्षणाचा प्रश्न सुटणार तर होताच पण स्वतःचे उर्वरित आयुष्य सार्थकी लावण्याचा मार्गही त्यांना मिळणार होता. ध्येय सापडल्यानंतर त्यासाठी सुखाचा त्याग करायला सिद्ध होणे हा धडा त्यांच्या वडिलांनीच त्यांना घालून दिला होता. या विचारासणीमध्ये त्यांची भांवडेही मागे नव्हती. पुढे १९६७ साली(वयाच्या ७५ व्या वर्षी ) लिहिलेल्या एका लेखात त्या म्हणतात, ‘माझ्यावर सर्वात अधिक छाप माझे वडील व मातोश्री यांची पडली असे म्हणता येईल …. बाबांचा सहवास मला वयाच्या १४ व्या वर्षापर्यंत लाभला तरी अजूनही त्यांच्याशी झालेल्या चर्चा व घरी होत असलेल्या गोष्टी आठवतात.’
के. व्ही. मोडकांच्या संसारात भपका होता. बडेजाव होता; तिथे पाच बोटांत पाच आंगठ्या घालण्याचा थाट त्यांनी उपभोगला होता. के व्हीं ची प्रैक्टिस त्या काळात ३-४ हजारांवर पोचली होती. मात्र गिजुभाईंच्या आश्रमात त्यांना मनःशान्ति लाभली. गिजूभाई आपली वकिली सोडून मास्तर झाले होते, लहान बालकांच्या ह्या कामात ताराबाईंनी जीवओतला. त्याने त्यांना खाजगी दुःख विसरायला लावले. त्यांचे वैफल्य हरपले. माँटेसोरी पद्धतीत या दोघांनी देशमानानुसार बदल करून घेतले होते. या त्यांच्या पद्धतीला तेथे ‘गिता पद्धत म्हणत (गि = गिजुभाई, ता = ताराबाई) दोघांनी मिळून १०५ पुस्तके संपादित केली. (यातली ७६ एकट्या गिजुभाईंची होती ) त्यांचे काम महात्मा गांधींच्या प्रशंसेला कारणीभूत झाले. या कामाबद्दल खुद्द ताराबाई म्हणतात, ‘ माझ्या मुलीला शाळा शोधण्याकरिता आणि स्वप्नाळू वाटणारे सिद्धांत गिजुभाई बधेका प्रत्याक्षात कसे काय उतरवतात हे बघण्याकरिता मी तेथे गेले होते. आणि तेथेच मला माझे जीवनगुरु, माझी जीवनदिशा, माझे जीवनकार्य गवसले!
प्रभा बरीचशी बापाच्या वळणावर होती. रूपाने नाही, स्वभावाने. ताराबाईंना वाटे तिला वडील आहेत. मी तिला त्यांच्या मायेपासून का तोडावे? सुटीत बापलेकीना ठरवून त्या एकत्र आणत. थंड हवेच्या ठिकाणी बिर्हासड मांडत. वडिलांनाही मुलीचा फार लळा होता. तिच्यासाठी कोणतीही किमती खेळणी त्यांना महाग वाटत नसत. प्रभा केव्हींच्या सहवासास सदा आसुसलेली असायची. तिकडे डॉ. सुलोचनाबाईंनी गडकर्‍यांच्या सिंधूची भूमिका घेतली. आणि केव्हींनी ताराबाईंचा ध्यास घेतला होता. डॉ. जावळ्यांनी ताराबाईना विनविले की, झाले गेले विसरून जा. परत फिरून पुन्हा आपली जागा घ्यावी. ताराबाई परतल्या. आल्या आल्या
(१९३२ साली) त्यांनी उमरावतीहून ‘ शिक्षण-पत्रिका’ हे गिजूभाईंचे गुजराती मासिक मराठीतून काढायला सुरुवात केली. पण कसचे काय? दोन वर्षांच्या आतच केव्ही मूळपदावर गेले. आता मात्र ताराबाई मुक्यानेच दूर झाल्या.
यानंतरची दोन वर्षे बडोद्याजवळच्या एका छोट्या संस्थानात (बांसदा ) ताराबाईंनी राजकुमारांच्या ट्यूट्रेस म्हणून काम केले. येथे त्यांचे दुसरे नष्टचर्य उभे राहिले. प्रभाचा मानसिक आजार प्रगटला. ताराबाईंचे मन पुन्हा महाराष्ट्राकडे वळले. प्रभाचे उपचार आणि बालशिक्षणक्षेत्र दोन्ही कामांनी त्यांना मुंबईला खेचून आणले.
तेव्हा महाराष्ट्रात पूर्व प्राथमिक शिक्षणाची कल्पना नव्हती. ताराबाईंनी मुंबईला १९३६ साली, दादर भगिनी समाजातर्फे पहिले बालमंदिर काढले. अडीच ते पाच हे मुलांचे वय त्यांच्या शिक्षणाच्या आणि विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे असते, हे आज जगात सर्वमान्य झाले आहे. बालमंदिरात मुलांच्या चौफेर वाढीला रोज तीनचार तास वाहिलेले असतात. ताराबाईंनी त्याचा प्रसार सुरू केला. दक्षिणामूर्तीच्या आपल्या ‘अनुभवाचा दाखला देऊन त्या सांगत; मुलांची इच्छा, अनिच्छा न बघता चमच्याचमच्याने व कोष्टकानुसार त्यांना ज्ञान भरवण्यापेक्षा पोषक, उत्तेजक वातावरण पुरवून पुरेशी मोकळी जागा, साधने व योग्य मार्गदर्शन , स्वातंत्र्य दिल्यास मूल स्वतःच्या कलाने, स्वानुभव, स्वयंशिक्षण यांद्वारा जी प्रगती आपली आपण करते ती अवश्य जास्त फायदेशीर असते. या पद्धतीचा उपयोग जास्त टिकाऊ असतो…..’
शिशुविहारचा पाया रचताना ताराबाईंनी असे भगीरथ प्रयत्न केले. इकडे घरातले वादळ सुरूच होते. १९४० ते ४३ मध्ये अडीच तीन वर्षे केव्ही मुंबईला रेल्वेत नोकरीलाआले. उमरावतीची देणी साचली होती. प्रैक्टिस बसली होती. घटस्फोट घेतलेला नव्हताच. एकमेकांची ओढ कायम होती. पण डॉ. सुलोचनाबाईंना के.व्ही. मोडकांशी लग्न करायचे होते. ताराबाईची याला ना नव्हती . पण कायद्याची होती, ताराबाई स्वतः या लग्नाला हजर राहिल्या तर मार्ग’ निघणार होता. याला त्या तयार नव्हत्या. केव्हींना सरळ घटस्फोट नको होता. तिढा सुटलाच नाही.
१९३९ साली वयाच्या पन्नासाव्या वर्षी गिजुभाई वारले. कालेलकर म्हणाले, * बालसाहित्याचा ब्रह्मा गेला ताराबाईंनी शिशुविहारचा विस्तार करायचे ठरविले. गुरुऋणाची फेड!
नेपोलियनच्या कोशात ‘अशक्य’ हा शब्द नव्हता; ताराबाईंच्या कोशात वाईट मूल’ हा शब्द नव्हता. आपण मुलांना गैरवागणूक देतो म्हणून ती तशी वागतात असा त्यांचा सिद्धान्त. आपल्या प्रत्येक मताला अभ्यासाचा, अनुभवाचा आधार देत त्यांचे प्रतिपादन चाले. त्यांच्या प्रयत्नाकडे शासनाचे लक्ष गेले. लोक त्यांना भारताच्या मादाम मॉन्टेसोरी म्हणू लागले. १९४६ ते १९५१ अशी पाच वर्षे ताराबाई महाराष्ट्र विधानसभेच्या सदस्य होत्या. १९४९ साली परदेशात गेल्या. त्यांच्या माघारी त्यांच्या शिक्षण-पत्रिकेचे काम भास्करराव कर्त्यांनी केले. पुढे शिक्षण क्षेत्रातल्या कामगिरीबद्दल (१९६० साली) त्यांना पद्मभूषण हा किताब मिळाला.
प्रभाचा आजार वाढत होता. १९५० मध्ये डॉ. सुलोचनाबाई वारल्या. केव्हींची घसरण थांबली नव्हतीच. ताराबाईंची त्यांच्या बद्दलच्या आकर्षणाची आणि प्रेमाची जागाआता माणुसकीने आणि भूतदयेने घेतली.
मुंबईच्या शिशुविहाराचा विस्तार होत असताना त्यांना वाटे की, मुंबईसारखे सुखसोयींनी युक्त असे ठिकाण सोडून खेड्यात जावे. गरिबांची मॉन्टेसरी होण्याचा निश्चय करून ताराबाई बोर्डीला आल्या.१९४३ साली बोरिवली येथील एका शिबिरात ताराबाईंना अनुताई वाघ प्रथम भेटल्या, पुढे पुष्कळ कार्यकर्ते आले आणि गेले. पण वामन चपराशी आणि अनुताई यांनी आपली साथ कधी सोडली नाही याचा त्या गौरवपूर्ण उल्लेख करीत. मुंबईहून ८० मैलांवर समुद्रकिनारी बोर्डी नावाचे एक खेडे त्यांनी निवडले. यावेळी अनुताई पस्तिशीच्या आणि ताराबाई त्रेपन्न वर्षांच्या होत्या. खेडेगावात कमी खर्चात चालविण्यात येणार्‍या बालमंदिराला ‘ बालवाडी ‘ हे नाव मिळाले. तिथले प्रश्न शहरी लोकांना समजण्यासारखे नव्हते. इथे पोर शाळेत जाण्यापेक्षा म्हशीमागे गेलेले लोकांना परवडे. महार-मांगानी आपल्या मुलांजवळ बसलेले लोकांना चालणार नव्हते. इवल्याशा मुलांना शाळा कशाला असा साधा प्रश्न गावकर्‍यांना पडलेला असायचा. ताराबाईंना मुलांना आंघोळ घालूनच शाळा सुरू करावी लागे. सर्व आघाड्यांवर अनुनय करावा लागे. अपयश जीवघेणे होते. दूर वस्त्यांवरून येणार्‍या मुलांसाठी त्यांनी बैलगाडीची व्यवस्था केली. त्यावरून हेवेदावे सुरू झाले. त्या मुलांसाठी गाडी मग आमच्या मुलांसाठी का नाही असे गावातल्यांना वाटे. दलितांचे दुःखही असेच होते. पुढे शेवटी चिकाटीला फळ आले. दोन अडीच वर्षे रोजचा निम्मा वेळ मुले गोळा करण्यातच जाई. सुईने खडक पोखरायला घ्यावे तसे चालले होते. ताराबाईंनी खर्च आणि वेळ वाचवायचा आणखी एक उपाय शोधून काढला. फिरती बालवाडी–अंगणवाडी. एका अंगणात काही दिवस झाले की दुसरीकडे मुक्काम हलवायचा. खर्चात इतकी बचत झाली की शिक्षकाचा पगार सोडला तर मुलामागे रुपया- दोन रुपये पुरू लागले. पुढे ग्रामसेविका प्रशिक्षणाचे केंद्र कस्तुरबा ट्रस्टच्या निधीतून सुरू करता आले.
प्रभाचे मन आईच्या उद्योगात रमणारे नव्हतेच. ती स्वतःच्या आयुष्यातच रमत नव्हती. काही खरी, काही काल्पनिक उपेक्षा असह्य होऊन झोपेच्या गोळ्या घेऊन तिने आपला अंत करुन घेतला. तारीख होती. २६ ऑगस्ट १९५३.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.