श्री. केशवराव जोशी यांचा मी आभारी आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव मी उल्लेख केलेल्या नामवलीत घेणे शक्य होते. पं. नेहरूंनी, सावरकरांप्रमाणे, जाणीवपूर्वक समाजसुधारणेचे कार्य केले असे म्हणता येणार नाही. जसे रानड्यांचे शिष्य नामदार गोखले यांनीही केले नाही. पण या दोघांचेही जीवन व कार्य सामाजिक सुधारणांना उपकारक ठरले. पं. नेहरू दीर्घकाळ पंतप्रधान नसते तर केंद्रशासनाचे वळण जेवढे सुधारणांना अनुकूल राहिले तेवढेही राहिले नसते हे अगदी शक्य आहे.
मला जो मुद्दा करावयाचा होता त्या दृष्टीने सावरकरांचे नाव तेथे घेणे आवश्यकचहोते असे मात्र नाही. यादी परिपूर्ण करायचे ठरवले तर ‘आजचा सुधारक’चा एक संपूर्ण अंकही पुरा पडावयाचा नाही. तरी परंतु, एका वेगळ्या कारणाने सावरकरांच्या नावाचे महत्त्व आहे.
हिंदू समाजाला बलवान करावयाचे, त्याची एकजूट करून शक्ती निर्माण करावयाची तर धार्मिक-सामाजिक सुधारणा घडवून आणणे अगत्याचे आहे असे त्यांनी जाणले. धर्माशी, खरे तर, त्यांना काही देणे-घेणे नव्हते, ते पिंडाने आधुनिक बनले होते. आधुनिक राष्ट्रवादी या नात्याने राष्ट्राचे अधिष्ठान म्हणून मात्र ते हिंदुत्वाचे अभिमानी होते. हिंदुधर्मीय असणे, हिंदुधर्माचा अभिमान जागवणे हा मुस्लिम व ख्रिश्चन समूहांना वगळणार्या राष्ट्रवादाच्या बांधणीचा भाग होता. म्हणजे त्यांची आधुनिकता, त्यांची धार्मिक-सामाजिक सुधारणेमागची प्रेरणा, त्याच वेळी, दुसर्याे अंगाने, माणसांना कडवी, आंधळी, निरुंद, निर्दय, वैरवृत्तीची बनविणारी, विध्वंसक व विनाशक होती.
या बाबतीत लोकमान्य टिळक आणि सावरकर यांच्यातला फरक ठळकपणे उढून दिसतो. हिंदूंचे संघटन टिळकांनीही केले. सांगून-सवरून केले. शठं प्रति शाठ्यं या न्यायाने वागण्यावर त्यांचा भर होता. पण वैरभावाची जोपासना त्यांनी केली नाही. १९१६ सालचा काँग्रेस-लीग करार (‘लखनौ करार’) त्यांच्या नेतृत्वाखाली झाला. नेतृत्वाच्या राजनीतीचा भाग म्हणून त्यांनी सुधारकांना विरोधही केला. पण त्यांचा एकंदर प्रभाव सुधारणेला अनुकूलच राहिला, कारण अनेक सुधारकांच्या तुलनेत त्यांचे प्रत्यक्ष जगणे-वागणे अधिक सुधारकी होते.
सावरकरांनी काही वर्षे क्रियाशीलपणे सुधारणेचे कार्य केले. लेखनच केवळ केले नाही. कृतीही केली. डॉ. आंबेडकरांचे आव्हान ते झेलू शकले नाहीत, पण या कारणाने मी त्यांना सुधारकांच्या पंक्तीमधून वगळणार नाही.
नाण्याची एक बाजू सुधारणेची आहे. त्याच नाण्याची दुसरी बाजू विरुद्ध दिशेचीआहे. हुकूमशाही सत्तेचा वापर करून केमाल अतातुर्कने तुर्कस्थानमध्ये १९२० नंतरच्या काळात अनेक सुधारणा घडवून आणल्या. पण हुकूमशाहीचे काय, असा प्रश्न चढतोच.
माझ्यापुरते म्हणावयाचे तर, सावरकर सुधारक होते की नाही, या प्रश्नाचे उत्तर मी होय असेच विशिष्ट संदर्भात व मर्यादेत देईन. पण न्यायमूर्ती रानडे, महात्मा गांधी, संत गाडगे महाराज, महात्मा जोतिबा फुले यांची कोटी व स्वातंत्र्यवीर सावरकरांची कोटी वेगळी वेगळी करीन.
संतांचे जीवन व कार्य कोणत्या धार्मिक शक्तींचा विरोध सहन करून झाले, त्यांचा काळ कोणता होता आणि त्यांच्या कार्याअभावी स्थिती कोणती आढळली असती, या गोष्टी ध्यानात घेऊनच निवाडा करावयास हवा. सुधारणेचे सर्व कार्य त्यांनी पार पाडले नाही; त्यांच्याही श्रद्धा, समजुती व मान्यताआजआम्हास सुधारून घ्याव्याशा वाटतात, असे(दोन्ही) म्हणता येईल. तेव्हा ‘फुले-आगरकर होण्याची गरज पडली त्या अर्थी या प्रकारचा युक्तिवाद असमंजस आहे. फुले-आगरकर यांच्यानंतरही श्री. जोशी ज्यांना सुधारक मानतात ते सावरकर-नेहरू होऊन गेले, आणि तरीही नंतर डॉ. बाबा आढाव यांना ‘एक गाव, एकपाणवठा’ चळवळ करावी लागतेच.श्री.जोशी यांच्या न्यायाने सर्व गतकालीन सुधारकांचा, ते सुधारक नव्हते असे निवाडा करावा लागेल!
प्रा. गं. बा. सरदार व प्रा. दहिवले यांची महात्मा गांधीबद्दलची मते श्री. जोशी यांनी उद्धत केली आहेत. (ज्ञानेश्वरांबद्दलचेही प्रा. सरदार यांचे मत ते उद्धृत करतात.) प्रा. सरदार यांच्याविषयी पूर्ण आदरभाव बाळगून मी असे म्हणतो की, त्यांनी व प्रा. दहिवले किंवा अन्य कोणी असे म्हणते त्या अर्थी ते तसे होते असे काही ठरत नाही.
श्री. जोशी यांची मते वेगळी असण्याबद्दल माझा आक्षेप अजिबात नाही. त्यांची युक्तिवाद करण्याची पद्धती तर्कदुष्ट आहे. प्रा. सरदार व प्रा. दहिवले यांचीही मते माझ्यासारखीच आहेत असे ते म्हणू शकतात. गांधींबद्दलचा श्री. जोशी यांचा निवाडा प्रा. सरदारांना मान्य झाला असता कां?त्यांचे गांधी व आंबेडकर यांच्या भूमिका व कार्य यांची तौलनिक समीक्षा करणारे जे लेखन अखेरच्या काळात प्रसिद्ध झाले ते विचारात घेता मला याविषयी दाट शंका आहे.
श्री. जोशी यांनी मी समाजवादी आहे असे परस्पर ठरवून समाजवाद्यांवर आगपाखड करून घेतली आहे. अशी आगपाखड करणे ही श्री. जोशी यांच्यासारख्यांची एक खास लकबआहे असे म्हटले तर?.
तसेच धर्मनिरपेक्ष राज्य कोसळण्याच्या खुणा म्हणून ते मुस्लिम राजकारणी परिषदांच्या मागण्या, तलाकसंबंधीचा नवा कायदा, पैगंबरांची सुट्टी यांचा आवर्जून उल्लेख करतात. शासकीय कार्यालयात धार्मिक उत्सव करणे, मंदिरे उभारणे, देवस्थानांमध्ये जाऊन मंत्री या नात्याने अधिकृतपणे महापूजा करणे, महापौरांनी नगरपालिका/ महानगरपालिकांच्या वतीने श्री शंकराचार्यांनी स्थापलेल्या मठांच्या प्रमुखांची पूजा, स्वागत करणे यांचाही उल्लेख या संदर्भात करणे अगत्याचे होते. श्री. जोशींच्या कल्पनेतील धर्मनिरपेक्षतेचा पाया फक्त मुसलमान तेवढे उखडू पहात आहेत असे नाही. आम्हीही का मगे राहावे?’ या वृत्तीने बहुसंख्यक हिंदू समाजही उत्साहाने तेच करीत आहे.
धार्मिक सुट्या व इतरही सुट्या (थोर लोकांच्या जयंत्या, पुण्यतिथ्या) कमी करण्याच्या पक्षातला मी पण आहे. पण जोपर्यंत ते घडत नाही, व चालत आलेली रीत व समाजाला घडलेले वळण म्हणून या सुट्या आपण देत घेत आहोत, तोवर पैगंबरांची सुटी देणे अयुक्त कसे?धर्मांधता वाढेल असे सांगून ती देण्यास स्वीकृती न देणे पक्षपाती ठरेल. युक्तिवाद करायचाच असेल तर तो निःपक्ष न्याय करणारा असावा.
डॉ. राजीव जोशी यांची पुस्तिका आल्याचे मला आठवते. श्री. जोशी यांचे पत्र त्यासोबत वेगळे आल्याचे आठवत नाही. पुष्कळ साहित्य नावे-पत्ते यांचा उपयोग करून पाठवले जात असते. नियमित येणारी नियतकालिके-मासिके पण असतात. वेगवेगळ्या कामांच्या संदर्भात लेखन-वाचन, फिरती पण चालू असते. श्री. जोशी व डॉ. राजीव जोशी । यांचे खाजगी पत्र आले असते तर पोच मी दिली असती, कारण माझी पण ती रीतआहे. पण नुसतेच येऊन पडणार्या साहित्याच्या संदर्भात त्याची मला जरूर भासत नाही. श्री. जोशी यांनी त्यावेळी पत्र पाठवले असल्यास ते मला मिळाले नाही हा विश्वास त्यांनी बाळगावा.अद्यापही त्यांनी मला, माझ्या नव्या पत्त्यावर पुस्तिका पाठविल्यास मी ती सवड काढून अवश्य वाचेन व अभिप्राय कळवीन.