पत्रव्यवहार

श्री. संपादक आजचा सुधारक
स. न. वि. वि.
श्री. निर्मलकुमार सूर्यवंशी यांनी माझे वाक्य उद्धृत करताना त्याच वेळी, दुसर्याअ अंगाने हे शब्द गाळले आहेत. सावरकरांच्या सुधारणेची प्रेरणा त्यांच्या अनुयायांवर जे परिणाम घडवून आणताना दिसते त्याकडे मला लक्ष वेधायचे होते. सुधारणेमागील प्रेरणा आणि परिणाम यांचा काही अंगभूत संबंध आहे असे मला सुचवावयाचे होते. त्यांनी सावरकरांचे जे युक्तिवाद उद्धृत केले आहेत ते लक्षात घेतलेच पाहिजेत यात शंका नाही. ते ध्यानात घेऊन मी माझी मांडणी सुधारून घेऊन असे जरूर म्हणेन की, सावरकरांच्या सुधारणाकार्याची प्रेरणा संमिश्र व गुंतागुंतीची होती. विचार करावयास बसल्यानंतर, अस्पृश्यता निवारण ‘हाच मुख्य आणि निरपेक्ष धर्म होय’ ही मांडणी ते पूर्ण विचारपूर्वक, निष्ठापूर्वक करीत होते. आजच्यापरिस्थितीत लाभालाभ काय आहेत हा प्रश्न दुय्यम व तोआपधर्म होय हे त्यांना दिसत होते.
मग प्रश्न उपस्थित होतो तो असा की, हिंदू समाजाच्या सुधारणेमागील प्रेरणा व प्रत्यक्ष कार्य यात जे इतर पदर होते ते एकंदरीने वरचढ ठरले का? अस्पृश्यतेच्या निर्मूलनाच्या संदर्भातली त्यांची भूमिका बदलली नाही. त्यांच्या अन्य कार्याचा एकंदर परिणाम त्यांचे अनुयायी व्यापक बंधुभाव, करुणा, प्रेम व माणुसकी या मूल्यांपासून दूर जाण्यात मात्र झालेला दिसतो. सावरकरांच्या अनुयायांनीच त्यांचा पराभव केला’ या आशयाचा निवाडा प्रा. स. ह. देशपांडे व प्रा. शेषराव मोरे देखील करतात तेव्हा माझ्या परिणामविषयक विधानाची एक प्रकारे पुष्टी होत नाही काय?
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा गांधींच्या व्यक्तित्वाची, विचारांची व कार्याची अनेक वर्षे, अगदी अटीतटीला जाऊन, कोणताही मुलाहिजा न ठेवता चीरफाड केली. हेतूपूर्वक बदनामीचा आरोप न करता त्यांच्या टीकेतले तथ्यातथ्य तपासून पाहिले जावे हेआपण ‘वादे वादे जायते तत्त्वबोधः’ या दृष्टीने इष्ट समजतो. प्रा. शेषराव मोरे व श्री. निर्मलकुमार सूर्यवंशी यांना हेतूचा आरोप करण्याची गरज का वाटावी?
हेत्वारोपाचा मुद्दा सोडला तर, प्रा. शेषराव मोरे यांचा ‘सावरकरांचे समाजकारण : सत्य आणि विपर्यास’ हा ग्रंथ हे सावरकर समजून घेण्याच्या दृष्टीने केलेले एक महत्त्वपूर्ण योगदान आहे, व या कामासाठी प्रा. मोरे अभिनंदनास व गौरवास पात्र आहेत. सावरकरांच्या टीकाकारांना त्यांचे काम अधिक नेटकेपणाने, चोखपणे करावे लागेल एवढी भक्कम विधायक मांडणी प्रा. मोरे यांनी अत्यंत परिश्रमपूर्वक निष्ठेने खचितच केली आहे. त्यांचा ग्रंथ चाळूनच हे मी लिहिले आहे. असो.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.