सेक्युलरिझम : प्रा. भोळे-पळशीकर यांना उत्तर

‘आजचा सुधारक’ या मासिकाच्या संपादकांनी ‘धर्मनिरपेक्षता (सेक्युलरिझम) या विषयावर एक परिसंवाद घ्यावा या हेतूने प्रा. भा. ल. भोळे आणि श्री वसंत पळशीकर ह्या महाराष्ट्रातील ख्यातनाम विचारवंतांकडून एक दहा कलमी प्रश्नावली तयार करून घेऊन एप्रिल १९९१ च्या अंकात प्रकाशित केली. अनेक लेखकांनी ह्या उपक्रमांला प्रतिसाद देऊन आपापले विचार मांडले. मीही गेली ३०-४० वर्षे सेक्युलरिझम ह्या विषयावर लिहीत, बोलत असल्याने ‘आजचा सुधारक’मध्ये तीन लेख लिहिले.
गेल्या शंभरसव्वाशे वर्षांच्या इतिहासात आपल्या देशाला विनाशाकडे खेचून नेणार्‍या ज्या समस्येने आजच्या नेतृत्वाला आव्हान दिले आहे आणि ज्या समस्येची सोडवणूक अद्यापही होऊ शकली नाही ती समस्या म्हणजे हिंदु आणि मुस्लिम या दोन प्रमुख धार्मिक लोकसमूहांतील संघर्ष ही होय. फाळणीनंतरही ही समस्या सुटलेली नाही.
ह्या समस्येतून मार्ग काढण्यासाठी पं. नेहरूंनी भारतात सेक्युलर शासन आणि सेक्युलर समाज निर्माण करण्याचे ध्येय देशापुढे ठेविले. पारलौकिक शक्तीच्या संकल्पनेवर आधारित धर्माच्या पकडीतून जीवनव्यवहार मुक्त करणे हा सेक्युलरिझमचा आत्मा होय. सर्व सामाजिक, राजकीय, आणि आर्थिक संस्था मानवनिर्मित आहेत, पारलौकिक सत्तेचा ह्या सामाजिक संस्थांशी काहीही संबंध नाही, माणसाचे ऐहिक जीवन सुखी होण्यासाठी जे कायदे करावयाचे ते राजसत्तेने (स्टेट) त्याच्या संविधानाच्या आधारावर करावयाचे, येथे धर्माला (रिलिजन) स्थान नाही, अशी सेक्युलरिझमची संकल्पना मांडून धार्मिक संघर्षाचे मूळ नष्ट करण्याचा नेहरूंचा उद्देश होता. बहुधर्मीय समाजातील धार्मिक संघर्प मोडून काढण्याचा सेक्युलरिझम हा एकमेव उपाय आहे.
प्रा. भोळे ह्यांनी समकालीन संदर्भ मनापुढे ठेवून धर्माचे राजकारण करणार्‍या सर्वांनीच जो विविधांगी पेचप्रसंग आज देशात उभा केला आहे, त्यातून कसे सुटावयाचे ह्यावरच प्रश्नावलीचा रोख ठेवला आहे.
मी तात्त्विक आणि ऐतिहासिक विचार केल्यामुळे माझ्या लेखाची विश्वकोशी लेखन म्हणून त्यांनी हेटाळणी केली आहे. माझ्यासाख्या सामान्य लेखकाला सेक्युलरिझम ही कल्पना ग्रंथाधारे समजून घेतल्याशिवाय ह्या संकल्पनेचा आत्मा कोणता हे कळणार नाही म्हणून मला विश्वकोशी माहिती देणे भाग होते. समकालीन संदर्भातील पेचप्रसंगाची मुळे इतिहासात असतील तर इतिहासातील घटनांचा शोध घेतलाच पाहिजे. फार जुना नाही तरी गेल्या दोन शतकांतील घटनांचा शोध घ्यावा लागेल; फाळणीच्या मुळाशी जावेच लागेल.
आजच्या ‘पेचप्रसंगाला धर्मग्रंथांचा आधार घेतला जातो त्यामुळे हिंदुमुसलमानांच्या धर्मश्रद्धांचा विचार करावाच लागतो. आणि येथेच हिंदूंच्या तसेच मुसलमानांच्या मानसिकतेला कळीचे महत्त्व लाभते. ‘मुस्लिम समाजाच्या मानसिकतेचा आपल्या प्रश्नावलीत उल्लेखही नाही आणि तोच ह्या प्रश्नाच्या संदर्भात कळीचा मुद्दा आहे’ असे प्रतिपादन एका विचारवंताने (बहुधा गाडगीळ) केले आहे असे भोळे म्हणतात.
भारतातील सेक्युलरिझमची चर्चा मुस्लिम मानसिकतेचा विचार केल्याशिवाय करताच यावयाची नाही. निदान गेली दोनशे वर्ष मुसलमानांचे धार्मिक नेते मुस्लिमांच्या अलगतावादाचा परिपोष करीत होते. राजकीय स्वार्थाने प्रेरित होऊन काही स्वार्थी मुस्लिम नेत्यांनी भारताची फाळणी केली असे प्रा. भोळे ह्यांना म्हणावयाचे नाही ना? फाळणी मुस्लिमांनी नव्हे तर त्यांच्या मनामध्ये भयगंड निर्माण करणार्‍या हिंदूंनी केली असे त्यांच्या लेखातील सुरावरून म्हणावे लागेल.
मुस्लिम अलगतावादाचे मूळ मुस्लिम मानसिकतेमध्ये आहे हे मुस्लिम धर्मशास्त्राच्या अभ्यासकांनी अगदी मोकळेपणाने मान्य केले आहे. ह्या मानसिकतेत मूलभूत परिवर्तन झाल्याशिवाय मुस्लिम समाज भारतीय जीवनाच्या मूळप्रवाहात येऊ शकणार नाही हे एम. आर.ए. बेग, प्रो. फैजी. प्रो. मुजीब, प्रो. मुशिरूल हसन, हमीद दलवाई ह्या मुस्लिम विचारवंतांनी अगदी निःसंदिग्धपणे सांगितले आहे. मी फक्त ह्या विचारवंतांच्या मतांचाअनुवाद केला आहे.
पूर्वी मी सुचविलेला मार्ग असा आहे :
वैज्ञानिक दृष्टिकोणाच्या आधारे धर्माकडे पाहण्याची चिकित्सक प्रवृत्ती दोन्ही समाजांत (हिंदू आणि मुस्लिम) निर्माण होणे आवश्यक आहे. हिंदू समाजात हे कार्य पुष्कळच प्रगतावस्थेत झाले आहे. परंतु मुस्लिम समाजात ह्या विचारांची बीजे अद्यापि (फारशी) रुजलेली नाहीत. वैज्ञानिक दृष्टिकोन आणि बुद्धिवाद ह्यांच्या साह्याने धर्मचिकित्सा करायला ह्या समाजातील सुशिक्षितांना प्रवृत्त करणे (त्यांच्या पाठीशी उभे राहणे) महत्त्वाचे आहे. (फे. ९२) हिंदु-मुस्लिम समाजाचे वरील दृष्टिकोनाच्या आधारे प्रबोधन करणे आवश्यक आहे. …….यावर (धार्मिक पेचप्रसंगावर) सेक्युलर तत्त्वांची निष्पक्षपाती आणि कठोर अंमलबजावणी हाच एकमेव इलाज आहे. पण केवळ कायद्याने सेक्युलर मनोवृत्ती निर्माण होऊ शकणार नाही. त्यासाठी प्रबोधन, वैचारिक जागृती, सनातनी समाजमनाचे आधुनिकीकरण, वैज्ञानिक दृष्टिकोणाची निर्मिती…..ह्या मार्गाने जावे लागेल. (जाने. ९२)
मी माझ्या लेखात धर्मचिकित्सेच्या द्वारा विचारपरिवर्तन होणे, संपूर्ण हिंदू आणि मुस्लिम अशा दोन्ही समाजांच्या मानसिकतेमध्ये परिवर्तन होणे आवश्यक आहे हे अनेक ठिकाणी सांगितले आहे.
हिंदु मानसिकतेचे शुद्धीकरण, परिवर्तन, प्रा. भोळे यांना मान्य आहे; पण मुस्लिम मानसिकतेला धक्का कसा लावावयाचा असा त्यांच्यापुढे प्रश्न आहे. येथेच बहुतेक राजकीय नेते ठेचाळतात. पण विचारवंतांचे काय? मुस्लिम मानसिकतेच्या परिवर्तनावर, आधुनिकीकरणावर मी जो भर दिला आहे त्यामुळे भोळे दुखावले आहेत. माझी विधाने त्यांना पूर्वग्रहदूषित, एकांगी, टोकाला गेलेली, अनिष्ट परिणामांचा वेध न घेणारी अशी वाटतात. मुस्लिम समाज धर्माच्या बाबतीत अत्यंत असहिष्णु आहे हे मत सर्वमान्य आहे. मुस्लिम विचारवंतांनांही ते मान्य आहे. या असहिष्णुतेची मुळे अनेक मुस्लिम धर्मपंडितांच्या आधारे मी इस्लामी धर्मशास्त्रात शोधण्याचा प्रयत्न केला याचा भोळे यांना राग आला आहे. हे आधार मी माझ्या पूर्वीच्या लेखात दिलेले आहेत आणि पुढे देणार आहे. मुस्लिम मानसिकतेला कुराणात आधार नसावा असेच मी एका लेखात म्हटले आहे. (जाने. ९२) इस्लामिक धर्मशास्त्र (स्मृति) आणि पवित्र कुराण (श्रुति) यांमध्ये बरीच तफावत आहे, हे येथे लक्षात ठेवणे आवश्यक आहे. हिंदु मानसिकतेवरही मी लिहिले आहे. पण तुलनेने कमी एवढेच. गेल्या दोनतीन हजार वर्षांपासून हिंदु विचाराची चिकित्सा होत आली आहे; म्हणून हिंदूंचा समाज परिवर्तनवादी झाला. मुस्लिम मानसिकतेच्या चिकित्सेबद्दल इतके हळवे होण्याचे भोळे-पळशीकरांना कारण नाही.
फार खोलात जात नाही. गेल्या दोनतीन महिन्यांतल्या घटना चिंताजनक आहेत. ‘जमिया मिलिया इस्लामिया’ह्या संस्थेतील एक पुरोगामी उदारमतवादी प्रा. मुशिरुल हसन यांची ससेहोलपट मूठभर स्वार्थी राजकारण्यांनी नव्हे तर सुशिक्षित (?) तरुण मुस्लिम विद्यार्थ्यांनी दिल्लीत चालविली होती. बिहारमध्ये डॉ. बेदर ह्यांनी काफिर शब्दाचा कुराणाने सांगितलेला अर्थ बदलून त्याला नवा संदर्भ देण्याचा प्रयत्न केला तर
त्यांच्याविरुद्ध पाटण्याच्या विद्यार्थ्यांनी जिहाद पुकारला. मुंबईला भारतीय विद्या भवन आणि अंजुमन इ इस्लाम या दोन संस्थांनी मिळून एक नवीन शैक्षणिक संस्था सुरू केली. परंतु धर्मांधांनी ती संस्थाच नव्हे, तर एक दिवस दक्षिण मुंबई बंद पाडली. मुंबईतील मुसलमान मुसलमानेतरांना अद्याप ‘काफिर मानतात. औरंगाबादच्या इस्लामिक स्ट्यूडंटस् असोसिएशनच्या परिपदेच्या मंडपाच्या बाहेर, ‘आम्हाला भारताची घटना मान्य नाही. आमची घटना कुराण’ अशी घोषवाक्ये लिहिली होती. अशी मुस्लिमांची मानसिकता असताना तिची चिकित्सा केल्याशिवाय राष्ट्रीय एकात्मता साधू शकेल असे खरोखर भोळे-पळशीकरांना वाटते काय? पळशीकरांनी मला धर्मचिकित्सेवर न लिहिण्याचा इशाराच दिला आहे.
मला यातली एकच सूचना काही प्रमाणात योग्य वाटते. ती अशी की ही धर्मचिकित्सा इस्लाममधील विचारवंतांनीच प्रामुख्याने करावी. परंतु इतरांनी गप्प बसून हे सर्व बघावे किंवा तिकडे डोळेझाक करावी हे मला योग्य वाटत नाही. पुरोगामी सेक्युलर विचारांचे डावे विचारवंत आजपर्यंत हेच करीत आले. मुस्लिम समाजात उदारमतवादी, पुरोगामी, सेक्युलर असे काही विचारवंत पुढे येत आहेत हाच एक आशेचा किरण! पण हा आशेचा किरण क्षीण आहे. तीव्र प्रकाश पडतो तो बटुजांसारख्या खासदारांचा. त्यांच्या विपदिग्ध भाषणातील काही वाक्ये मी माझ्या फेब्रुवारी १९९२ च्या लेखात उधृत केली आहेत. ह्या लोकीचे व्यवहार मुस्लिमेतरांच्या दृष्टीने ऐहिक असले तरी इस्लामच्या दृष्टीने अल्लाच्या अगर प्रेषिताच्या वचनांच्या अगर कुराणाच्या आधारेच निर्णीत झाले पाहिजेत. इस्लामचा हा आदेश असल्यामुळे संसदेला अर्थव्यवस्था (व्याज), स्त्रीपुरुषसमानता (विवाह, घटस्फोट, अनेकपत्नीकत्व), लोकशाही वगैरेसारख्या विषयांमध्ये कायदे करण्याचा अधिकारच नाही अशा आशयाचे उद्गार ते संसदेमध्ये बिनदिक्कत काढू शकतात. इक्बालसुद्धा शरियतमधील स्त्रीवरील अन्यायाचे समर्थन करतात. अशा वेळी सेक्युलरिझमच्या अपयशासाठी हिंदुत्ववाद्यांना जवाबदार धरून त्यांच्याच आक्रमक भूमिकेमुळे मुस्लिम समाज अधिकाधिक कडवा, धर्माध आणि अलगतावादी होत चालला आहे असा भोळे इत्यादिकांचा आणखी एक अपूर्व सिद्धांत आहे.
‘सर्वधर्मसमभावाच्या संकल्पनेपर्यंत पोचण्याचे मार्ग कोणीही सांगू शकले नाहीत हे भोळ्यांचे म्हणणे मला मान्य नाही. कारण जाने. ९२ च्या अंकात सर्वधर्मसमभाव ह्या संकल्पनेच्या प्रचलित अर्थातील दोष स्पष्टपणे मांडून महंमद पैगंबरांनी मदीनेमध्ये पाच धर्माचे राज्य स्थापन करून सर्वधर्मसमभावाचा जो आदर्श प्रयोग केला, जी उदारमनस्कता दाखविली, त्याची विस्तृत माहिती दिली आहे आणि मौ. आझादांनी ही इष्ट आणि योग्य आहे असे सांगून तिचा पुरस्कार कसा केला ते आम्ही स्पष्ट सांगितले आहे. पण इस्लाम हा एकच परमेश्वरप्रणीत धर्म आहे असे मानणारे मुसलमान इतर धर्म ईश्वरानेच निर्मिले आहेत हे मान्य करावयाला तयार होणार नाहीत. मुसलमानांच्याअंधश्रद्धेला कोणीच स्पर्श करावयाला तयार नाहीत. ह्या कारणामुळे समान नागरी कायदा होऊ शकत नाही. शरियतला कोणी हात लावू शकत नाही. शहाबानोला न्याय मिळू शकला नाही.
ईजिप्तमध्ये, अल्जेरियामध्ये उदारमतवादी, धर्मसुधारणावादी अध्यक्षांची हत्या झाली. जेथे शरियतमध्ये बदल घडला तेथे ते देश दार-उल-इस्लाम (मुस्लिम बहुसंख्य व राज्यकर्ते) असल्यामुळे घडू शकले. दार-उल-हर्व (मुस्लिम अल्पसंख्य) देशात घडू शकले नाहीत. पण अति टोकाला गेलेल्या धर्मांना बदल मान्य नसले की राष्ट्राध्यक्षांनाही प्राणांचे मोल द्यावे लागले आहे.
जे दारुलहर्ब आहेत त्याने दारुलइस्लाममध्ये परिवर्तन करण्यासाठी (हुकूमत-ए-इब्राहिया) जिहाद करणे धर्ममान्य आहे असे मो. सदुद्दीन म्हणतात. मौ. आझादांनी जिहादची कल्पना कालबाह्य ठरविली आहे. त्यामुळे त्यांना चार अनुयायीही मिळाले नाहीत. भारतामध्ये मुस्लिम राजसत्ता स्थापन करणे आज तरी अशक्य असल्यामुळे पाकिस्तान ह्या स्वतंत्र राष्ट्राची मागणी पुढे आली. मुस्लिमांचा अलगतावाद वांशिक (युगोस्लावियासारखा) नाही, राष्ट्रीय नाही (आयर्लंड, युक्रेनप्रमाणे), तर तो धर्माधिष्ठित (छोटे हुकूमत ए इलाहिया) आहे. फाळणीनंतरच्या काळातही हुकूमत ए इलाहिया’ हे ध्येय भारतामधल्या मुसलमानांनी सोडलेले नाही. ह्यावर भारत सरकारची बंदी येण्याची भीती वाटल्यामुळे हे उद्दिष्ट बदलून ते इकामतदीन (धर्मस्थापना करणे) हे ध्येय निश्चित करण्यात आले. पण पुढे दोनही एकच असे स्पष्टीकरण देण्यात आले. मुस्लिम अल्पसंख्य आहेत अशा भारतासारख्या राष्ट्रात, येथे राजसत्ता मुसलमानांच्या हाती नसल्यामुळे भोळे ह्यांना अभिप्रेत असलेली ‘इजमा व ‘इजतिहाद ही धर्मसुधारणा घडणे अशक्य आहे. तिला येथे धर्ममान्यता नाही. जगातले इतर मुस्लिम राष्ट्रांमधील धर्मसुधारणांकडे गाडगीळ मुळीच काणाडोळा करीत नाहीत. प्रा. भोळे यांना मी एवढेच सांगतो की दारुल हर्व चे दारुल इस्लाम मध्ये रूपांतर करण्याचा प्रयत्न मुस्लिमानांनी आजही चालू ठेवला आहे. यातूनच आजचा पेचप्रसंग निर्माण झाला आहे. कुटुंबनियोजनाला विरोध करण्यामागे मुसलमानांची लोकसंख्या वाढविण्याचे दारुल-हर्व चे दारुलइस्लाममध्ये परिवर्तन करण्याचे उद्दिष्ट आहे. याचे दर्शन उर्दूइंग्लिश नियत कालिकांमधून होते. बंगलोरच्या कडव्या साप्ताहिक रेडियन्समध्ये ज्या जिल्ह्यांत मुस्लिम लोक संख्यावाढीचा वेग पुरेसा नाही त्यांची नावे दिली आहेत. त्या सर्व गोष्टीआमच्या सेक्युलर विचारवंतांना दिसत नाहीत. नव्या स्वरूपात प्रकट होऊ पाहणारी दुसरी फाळणी प्रत्यक्षात आल्याशिवाय त्यांचे डोळे उघडणार नाहीत.
प्रा. भोळे मात्र अल्पसंख्यकांचे आर्थिक मागासलेपण, त्यांचे शैक्षणिक मागासलेपण, त्यामुळे टिकून राहिलेली सरंजामी प्रवृत्ति, बहुसंख्याकांचा आक्रमक पवित्रा, राज्यसत्तेचे वाढते हिंदूकरण, त्यातून अल्पसंख्यकांच्या मनात पोसली जाणारी असुरक्षिततेची भावना, इ. मुळे मुस्लिम समाज परिवर्तनविरोधी होत आहे हाच मंत्र घोकत बसले आहेत. ह्या चारपाच घटकांत अल्पप्रमाणात सत्य आहे. पण हजार आठशे वर्षामध्ये मुस्लिममनात दृढ झालेली (क्राँक्रिटाइज) प्रामाणिक परंतु चुकीच्या धर्मवचनांवर आधारलेली धार्मिक श्रद्धा हीच मुस्लिमांची स्वतःची अपरिमित हानी होण्याला आणि भारताच्या राजकीय जीवनात दुर्लंघ्य असा पेचप्रसंग निर्माण करण्याला कारणीभूत आहे हे माझे मत माझे एकट्याचे मत नाही, तर अनेक मुस्लिम विचारवंतांचे हेच मत आहे हे सप्रमाण सिद्ध करून देता येईल.
शैक्षणिक मागासलेपणा घालविण्याचा मुस्लिम सुधारकांचा प्रयत्न मुल्लामौलवींनी हाणून पाडला आहे. त्यामुळे शासकीय सेवेत किंवा वरिष्ठ पदांवर मुसलमानांची नियुक्ती होऊ शकत नाही. ह्या परिवर्तनाला मदरसा शाळा व त्यांमधील ‘दीनी तालीम जबाबदार आहेत. त्यामुळे चांगले विद्यार्थीही फारसी अरबी भाषांच्या ज्ञानापुढे जाऊ शकत नाहीत. इंजिनिअर्सच्या कांही जागांसाठी ३००० अर्ज आले, त्यात मुस्लिम उमेदरावांचे फक्त चार होते. हा समाज उलेमांच्या प्रभावाबाहेर पडायला तयार होतच नाही. त्याबद्दल बेग, प्रा. मुजीब हे खेद व्यक्त करतात. शासनाचा अपराध असा की मुसलमांनाकडूनच मागणी आल्याशिवाय त्यांच्या जीवनात सुधारणेचा, आधुनिकीरणाचा प्रयत्न सुरु करावयाचा नाही. सुधारणेपूर्वी कायदा हे सूत्र आपल्या देशाला मान्य नाही त्याचे प्रा. बेग त्यांना दुःख आहे.
इस्लामी लोकांचा कडवा परिवर्तनविरोध, इतकी कडवी असहिष्णुता ह्यांना मागे त्यांच्या धर्माची परंपरा आहे ही मानसिकता प्रसारीभूत (concretise) झालेली आहे. इराणमधील जनतेने मुस्लिमधर्म स्वीकारल्यानंतरही त्यांच्या इस्लामपूर्व पर्शियन संस्कृतीचा त्याग केला नाही. धर्म आणि संस्कृति यामागील भेद त्यांनी बरोबर ओळखला होता. इराणी आईबाप आपल्या मुलामुलींची नावे अर्देशर, दर्युष खुसरू वहीद परवीन अशी ठेवतात. त्यांना सोराबरूस्तुम आपले राष्ट्रपुरुष वाटतात. भारतीय मुस्लिम मात्र भारतीय संस्कृतीशी, हिदुधर्माशी नव्हे, एकरूप कधी झालेच नाहीत. काही विचारवंत मुस्लिमांना ह्यांचे दुःख होते, त्यांची नावे व त्यांचे उतारे मी माझ्या पूर्वीच्या लेखात दिले आहेत. पण प्रा. भोळे त्याकडे दुर्लक्ष करतात आणि माझी तीनचार विधाने घेऊन माझ्यावर टीका करतात!
मुसलमांनाचा अलगतावाद हिन्दुत्ववादाचा जन्म होण्यापूर्वी पासूनचा आहे. तो हिन्दुत्ववादाची प्रतिक्रिया म्हणून निर्माण झालेला नाही. माझ्या पूर्वीच्या विधानांच्या पुष्ट्यर्थ उतारे देण्याचा मला अतिशय मोह होते. पण मी तो आवरतो.
भोळे ह्यांचा समकालीन संदर्भ सोडून मी इतिहासात वाहवत गेलो, ह्याबद्दल त्यांची क्षमा मागतो, पण भारताच्या राजकीय जीवनात उद्भवलेल्या अलगतावादाने, असहिष्णुतेने, धर्मांधतेने निर्माण केलेल्या पेचप्रसंगाची संघर्षाची मुळे इतिहासात सापडतात. त्याला मी तरी काय करू?’आज आणि आताचा समकालीन संदर्भ म्हणजे अयोध्येतील राम मंदिर-बाबरीमस्जिद संघर्ष एवढाच भोळे त्यांना अभिप्रेत आहे की काय अशी शंका येते. त्या समस्येची मुळेही इतिहासातच शोधावी लागतील. मुस्लिमांच्या अलगाववादाला, असहिष्णु धर्माधवृत्तीला विरोध करण्यासाठी हिंदूत्ववादी संस्था नंतर जन्माला आल्या. म्हणून आम्ही म्हणतो की हिंदुची आक्रमकता, वाढती धर्मांधता ही मुस्लिमांच्या धर्मांधतेची प्रतिक्रिया आहे. भोळे त्यांना हे कसे समजून द्यावे ते मला समजत नाही.
प्रा. भोळे ह्यांचे इतर आक्षेप विचारार्हही नाहीत. समान नागरी कायद्याचा हिन्दूंचा आग्रह अल्पसंख्यकांच्या मनात दहशत निर्माण करण्यासाठी आहे हा आक्षेप हास्यास्पद आहे. त्या कायद्याने मुस्लिम कुटुंबव्यवस्थेत क्रांति होईल. मुस्लिम लोकसंख्यावाढीचा वेग भोळे यांनी एकदा पाहावा खरी असो वा खोटी, पण हिन्दु मनाला सदैव ही भीती असते. द्वेषाचे हे कारण दूर होणे आवश्यक आहे.
मुस्लिमांमध्ये अत्यल्प संख्येत विद्यमान असलेल्या बेग, मुजीब, फैजी वगैरे विचारवंतांना त्यांचे भान असले तरी एकूण मुस्लिमसमाजाच्या विचारांचे अश्मीभवन (fossilization) झालेले आहे. ते फोडले पाहिजे. हा विचार दगडासारखा चेतनाहीन झालाआहे. त्यात परिवर्तन घडवून आणणे भाग आहे. बेग, मुजीब व फैजी आदि सुधारणावाद्यांच्या विचारांवरुन तीन गोष्टी स्पष्ट होतात. (१) सेक्युलरिझमची आवश्यकता, (२) त्यासाठी मुस्लिम मानसिकतेची सूक्ष्म चिकित्सा, आणि (३) त्यामुळे सनातन्यांच्या भावना दुखावण्याची शक्यता. हाच उद्योग मी केला आहे. मला त्याचा पश्चाताप होत नाही. अर्थात् हे खरे की त्या उद्योग एखाद्या सुधारणावादी मुस्लिमाने मराठीत केला असता तर अधिक बरे झाले असते. हमीद दलवाईंनी ते केलेच आहे.
मौ. आझादांनी कुराणाचा नवा अर्थ लावला. पण भारतातील मुसलमान अजून वलीउल्ला. मौ.मौदूदी, मौ. सद्रुद्दीन, मौ. अबुल हसन नडवी ह्यांच्या सारख्या कट्टर सनातनपंथीयांच्या प्रभावाखालीच आहेत. त्यातूनच केवळ समकालीन नव्हे तर सर्वकालीन पेच प्रसंग निर्माण झाला. त्या सनातनमताप्रमाणे इस्लाम हा प्रेषितांच्या माध्यमातून अल्लाने पाठविलेला एकमेव परिपूर्ण धर्म.आहे. त्यात सुधारणेला अवकाश नाही. फक्त इस्लामच्याच अनुयायांना स्वर्गप्राप्तीचा अधिकार आहे. ज्यू खिश्चन हे ही प्रेषितांच्या धर्मग्रंथांचे पालन करीत असल्यामुळे त्यांना जिझिया कर देऊन जगण्याचा हक्क आहे. बाकी काफिराशी लढा असा प्रेषितांचा आदेश आहेत. ‘धर्माच्या बाबतीत कोणावरही जबरदस्ती होऊ नये, असेही वचन कुराणात असले तरी ते मानले गेले नाही.
एका बाजूला “मुस्लिमधर्म’’ हा परिपूर्ण धर्म आहे म्हणून त्यामध्ये सुधारणा शक्य नाहीअसे डॉ. गाडगीळ म्हणतात आणि दुसर्‍या बाजूला प्रसंगी कुराणातील आधार घेऊनही आधुनिक सुधारणावादी इस्लाममध्ये दुरगामी परिवर्तन करू लागल्याचेही तेच गाडगीळ सांगतात असा माझ्यावर आक्षेप येईल. त्यावर माझे म्हणणे इतकेचे की हा सुधारणावाद गेल्या शंभर सव्वाशे वर्षातील आहे. कुराणात परस्पराविरोधी वचने असली तरी पैगंबरांनी इज्जा आणि इज्तिहाद ह्या तत्त्वांच्या आधारे धर्मसुधारणेची व्यवस्था करून ठेवली होती. ती पुढच्या उल्लेमांनी मोडून इस्लाम बंदिस्त करून टाकला.
आता यावर इलाज एकच. तो म्हणजे भारतीय मुसलमांनी कट्टरपंथीयांच्या मगरमिठीतून स्वतःची सुटका करून घेणे आणि सेक्युलेरिझमच्या संकल्पनेचा स्वीकार करणे.
कुराणात त्या संकल्पनेला आधार आहे. ‘ऐहिक विधिनिषेध निश्चित करण्याचे अधिकार मानवाचे आणि स्वर्ग, मोक्ष आदि पारलौकिक संकल्पनांचा विचार करण्याचा अधिकार धर्माचा, प्रेषितांचा-माझ्या मते हाच सेक्युलरिझमचा आत्मा. भारतातील हिन्दु मुसलमान हा उपदेश स्वीकारतील तर भारतात आता आणि आजच्या संदर्भात निर्माण झालेला संघर्ष नष्ट होईल.’

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.